संपूर्ण विश्वासाठी उद्देशून असलेली देवाची वचने—अध्याय २९

ज्या दिवशी सर्व गोष्टींचे पुनरुत्थान झाले, तेव्हा मी मनुष्यामध्ये आलो आणि त्याच्यासोबत मी उत्तमरीत्या दिवस आणि रात्री व्यतीत केल्या आहेत. केवळ याच वेळी मनुष्याला माझ्याशी संपर्क करता येणा-या सुलभत्वाची थोडीशी जाणीव होते आणि जसजसा त्याचा माझ्याबरोबर अधिक वारंवार संवाद होऊ लागतो, तसतसे त्याला माझ्याकडे काय आहे आणि मी काय आहे हे दिसते—परिणामी, त्याला माझ्याविषयी थोडेसे ज्ञान प्राप्त होते. सर्व लोकांमध्ये, मी माझे मस्तक उंचावतो व पाहतो आणि ते सर्व मला पाहतात. तरीही जेव्हा जगावर संकट कोसळते, तेव्हा ते लगेच चिंतित होतात आणि त्यांच्या हृदयातून माझी प्रतिमा अदृश्य होते; संकट आल्यामुळे भयभीत होऊन ते माझ्या उपदेशांकडे लक्ष देत नाहीत. मी मनुष्यामध्ये अनेक वर्षे व्यतीत केली आहेत, तरीही तो कायमच अजाण राहिला आहे आणि त्याने मला कधीही जाणलेले नाही. आज मी माझ्या स्वतःच्या मुखाने त्याला हे सांगतो आहे, आणि मी सर्व लोकांना माझ्याकडून काहीतरी प्राप्त व्हावे म्हणून माझ्यासमोर यायला लावतो आहे, पण तरीही ते माझ्यापासून अंतर बाळगतात आणि म्हणून त्यांना माझ्याविषयी ज्ञान होत नाही. माझी पावले जेव्हा विश्वभर आणि पृथ्वीच्या टोकांपर्यंत मार्गक्रमण करतील, तेव्हा मनुष्य स्वतःवर चिंतन करण्यास सुरुवात करेल, आणि सर्व लोक माझ्याकडे येतील, माझ्यासमोर नतमस्तक होतील आणि माझी पूजा करतील. हा दिवस म्हणजे मला महिमा प्राप्त होण्याचा दिवस असेल, माझ्या परतण्याचा दिवस असेल आणि माझ्या गमनाचाही दिवस असेल. आता, सर्व मानवजातीमधील माझे कार्य मी सुरु केले आहे, माझ्या व्यवस्थापन योजनेच्या अंतिम फेरीला संपूर्ण विश्वातून मी औपचारिकरीत्या प्रारंभ केला आहे. या क्षणापासून, जे कोणी सतर्क नसतील त्यांना कठोर ताडणाला सामोरे जाणे भाग असेल आणि हे कोणत्याही क्षणी घडू शकते. हे मी निर्दय आहे म्हणून नव्हे; किंबहुना, हा माझ्या व्यवस्थापन योजनेचा एक टप्पा आहे; सर्व काही माझ्या योजनेच्या टप्प्यांनुसार झालेच पाहिजे आणि कोणताही मनुष्य यात बदल करू शकत नाही. मी जेव्हा माझ्या कार्याला औपचारिकरीत्या सुरुवात करतो, तेव्हा सर्व लोक मी जसा वावरतो तसे जातील, जेणेकरून विश्वभरातील लोक माझ्या पावलावर पाऊल ठेवून व्यग्र राहतील, विश्वात “आनंद” पसरेल, आणि मनुष्याला माझ्याकडून प्रेरणा मिळेल. याचा परिणाम म्हणून, तो महान अग्निवर्ण अजगर माझा तडाखा बसून तो स्वतःच पिसाटलेल्या व गोंधळाच्या अवस्थेत जाईल आणि त्याने माझा कार्यभाग साधेल आणि त्याची इच्छा नसतानाही त्याला त्याच्या स्वतःच्या इच्छांनुसार वागता येणार नाही आणि माझ्या नियंत्रणास शरण जाण्याखेरीज त्याच्याकडे उपाय असणार नाही. माझ्या सर्व योजनांमध्ये, तो महान अग्निवर्ण अजगर माझ्या विरोधी आहे, सहयोगी आहे आणि माझा सेवक देखील आहे; तसेच, मी त्याच्यासाठी माझ्या “आवश्यकता” यांमध्ये कधीही सूट दिलेली नाही. म्हणून, माझ्या देहधारणेच्या कार्याचा अंतिम टप्पा त्याच्या घरात पूर्ण होतो. अशा प्रकारे, तो महान अग्निवर्ण अजगर माझी योग्य प्रकारे सेवा करण्यास अधिक सक्षम होतो, ज्याच्याद्वारे मी त्याच्यावर विजय मिळवतो आणि माझी योजना पूर्ण करतो. मी कार्य करतो तेव्हा सर्व देवदूत माझ्यासह निर्णायक लढाईस प्रारंभ करतात आणि अंतिम टप्प्यात माझ्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार करतात, जेणेकरून पृथ्वीवरील लोक देवदूतांप्रमाणे माझ्यासमोर शरण येतील आणि मला विरोध करण्याची इच्छा बाळगणार नाहीत, आणि माझ्याविरुद्ध बंड होईल असे काहीही करणार नाहीत. विश्वातील माझ्या कार्याचे हे पैलू आहेत.

मनुष्यांमध्ये माझ्या आगमनाचा हेतू आणि महत्त्व हे सर्व मानवजातीला वाचवणे, सर्व मानवजातीला माझ्या घरी परत आणणे, स्वर्गाचे पृथ्वीशी पुनर्मीलन करणे आणि मनुष्याला स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या दरम्यान “संकेतांची” देवाणघेवाण करायला लावणे हा आहे, कारण मनुष्याचे हे अंतर्निहित कार्य आहे. मी जेव्हा मानवजातीची निर्मिती केली, तेव्हा मी मानवजातीसाठी सर्व गोष्टी तयार करून ठेवल्या होत्या आणि नंतर मी माझ्या आवश्यकतांनुसार, मी मानवजातीला दिलेली समृद्धी मिळवू दिली. अशा प्रकारे, माझे असे म्हणणे आहे, की माझ्या मार्गदर्शनाखाली मानवजात आजपर्यंत पोहोचली आहे. आणि ही सर्व माझी योजना आहे. सर्व मानवजातीमध्ये, असंख्य लोक माझ्या प्रेमाच्या संरक्षणाखाली राहतात आणि असंख्य लोक माझ्या तिरस्काराच्या ताडणाखाली राहतात. सर्व लोक जरी माझी प्रार्थना करत असले, तरीही ते त्यांची वर्तमान परिस्थिती बदलू शकत नाहीत; एकदा त्यांनी आशा सोडून दिली, की ते फक्त प्रकृतीला आपल्या मार्गाने जाऊ देतात आणि माझी अवज्ञा करणे थांबवतात, कारण मनुष्याला इतकेच साध्य होऊ शकते. मनुष्याच्या जीवनाच्या अवस्थेबद्दल बोलायचे, तर मनुष्याला अजून वास्तविक जीवन सापडायचे आहे, त्याने अद्याप अन्याय, एकाकीपणा आणि जगातली दुःखी परिस्थिती यांच्या पलीकडे पाहिलेले नाही—आणि म्हणून, संकटाची सुरुवात झाली नसती, तर अनेक लोकांनी प्रकृतीमातेला आपलेसे केले असते आणि ते “जीवना” चा आस्वाद घेण्यात मग्न झाले असते. ही जगाची वास्तविकता नाही का? मी मनुष्यासमोर सांगितलेला तारणाचा संदेश हाच नव्हे का? मानवजातीमध्ये कोणीही माझ्यावर कधीही खरे प्रेम का केले नाही? मनुष्य केवळ ताडणाच्या आणि कसोट्यांच्या काळातच माझ्यावर प्रेम का करतो, मात्र माझ्या संरक्षणाखाली असताना कोणीही माझ्यावर प्रेम का करत नाही? मी मानवजातीला अनेक वेळा माझे ताडण प्रदान केले आहे. ते त्याकडे बघतात, पण ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ते त्यावेळी त्याचा अभ्यास करत नाहीत, त्यावर चिंतन करत नाहीत आणि त्यामुळे मनुष्याला कठोर न्यायाचा सामना करावा लागतो. माझ्या कार्य करण्याच्या पद्धतींमधील ही फक्त एक पद्धत आहे, पण तरीही मनुष्याला बदलण्याच्या आणि त्याला माझ्यावर प्रेम करायला लावण्यासाठी ती उपयुक्त आहे.

राज्यावर माझी सत्ता असते आणि त्याखेरीज माझी संपूर्ण विश्वभरात सत्ता असते; मी राज्याचा राजा आणि विश्वाचा प्रमुखदेखील आहे. इथून पुढे, जे निवडले गेलेले नाहीत अशा सर्वांना मी एकत्र करेन आणि परराष्ट्रीय लोकांमध्ये माझे कार्य सुरू करेन आणि संपूर्ण विश्वात मी माझे प्रशासकीय आदेश घोषित करेन, जेणेकरून मी माझ्या कार्याच्या पुढच्या टप्प्याला यशस्वीपणे सुरुवात करू शकेन. परराष्ट्रीय लोकांमध्ये माझ्या कार्याचा प्रसार करण्यासाठी मी ताडणाचा वापर करेन, म्हणजे जे परराष्ट्रीय आहेत त्या सर्वांविरुद्ध मी बळाचा वापर करेन. स्वाभाविकच, निवडक लोकांमधील माझे कार्य आणि हे कार्य एकाच वेळी पार पाडले जाईल. जेव्हा माझे लोक पृथ्वीवर राज्य करतील आणि सत्ता मिळवतील, त्याच दिवशी पृथ्वीवरील सर्व लोकांवर विजय मिळवला जाईल आणि त्याखेरीज, त्याच वेळी मी विश्रांतीही घेईन—आणि केवळ तेव्हाच मी विजय मिळवलेल्या सर्वांसमोर प्रकट होईन. मी पवित्र राज्यासमोर प्रकट होईन, आणि घाणीच्या प्रदेशापासून स्वतःला लपवेन. विजय मिळवलेले आणि माझ्यासमोर आज्ञाधारक झालेले सर्वजण माझा चेहरा त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या कानांनी माझा आवाज ऐकू शकतात. शेवटच्या दिवसांमध्ये जे जन्मले आहेत त्यांचे हे वरदान आहे, मी पूर्वनिर्धारित केलेले हे वरदान आहे आणि कोणताही मनुष्य ते बदलू शकत नाही. आज, भविष्यातील कार्याखातर मी या प्रकारे काम करतो. माझे सर्व कार्य हे संपूर्णपणे परस्परसंबंधित असते, त्यात एक साद आणि प्रतिसाद असतो: कोणतेही पाऊल कधीही अचानकपणे थबकलेले नाही आणि कोणतेही पाऊल कधीही दुसऱ्या पावलाशी असंबद्ध प्रकारे टाकलेले नाही. हे असे नाही का? भूतकाळातील कार्य हा आजच्या कार्याचा पाया नसतो का? भूतकाळातील वचने ही आजच्या वचनांची पूर्वनांदी नसतात का? भूतकाळातील पावले ही आजच्या पावलांचे मूळ नसतात का? मी जेव्हा औपचारिकरीत्या पत्र उघडतो, त्यावेळी विश्वभरातील लोकांचे ताडण केले जाते, त्यावेळी जगभरातील लोकांना कसोट्यांना सामोरे जावे लागते आणि तो माझ्या कार्याचा कळस आहे. सर्व लोक एका प्रकाशरहित भूमीवर राहतात आणि सर्व लोक त्यांच्या पर्यावरणाने निर्माण केलेल्या भयामध्ये जगतात. दुसऱ्या शब्दांत, निर्मितीच्या वेळेपासून आजच्या दिवसापर्यंत मनुष्याने कधीही न अनुभवलेले असे हे जीवन आहे आणि युगानुयुगे कोणीही अशा प्रकारच्या जीवनाचा “आनंद घेतलेला” नाही आणि म्हणून मी म्हणतो की, यापूर्वी कधीही न केले गेलेले कार्य मी केले आहे. हीच गोष्टींची खरी अवस्था आहे आणि हाच अंतःस्थ अर्थ आहे. माझा दिवस मानवजातीच्या जवळ येत असल्यामुळे, तो दूर नव्हे तर मनुष्याच्या अगदी दृष्टीसमोरच असल्यामुळे, कोणाला भीती वाटणार नाही? आणि कोणाला यात आनंद वाटणार नाही? बाबेलच्या गलिच्छ शहराचा अखेर अंत झाला आहे; मनुष्याला पुन्हा एक नवेकोरे जग मिळाले आहे आणि स्वर्ग आणि पृथ्वी बदलले आहेत, पुन्हा नूतन झाले आहेत.

मी जेव्हा सर्व राष्ट्रांपुढे आणि सर्व लोकांपुढे प्रकट होतो, तेव्हा आकाशात पांढऱ्या मेघांचे मंथन होते आणि ते मला वेढतात. तसेच, पृथ्वीवरचे पक्षी माझ्यासाठी आनंदाने गातात आणि बागडतात, पृथ्वीवरचे वातावरण अधोरेखित करतात आणि अशा प्रकारे पृथ्वीवरील सर्व गोष्टी जिवंत होण्यास मदत करतात. आता त्या “सावकाश अधोगतीकडे घसरत” नाहीत, तर चैतन्याच्या वातावरणात राहतात. मी जेव्हा नभात असतो, तेव्हा मनुष्याला माझा चेहरा आणि माझे डोळे अंधुकपणे जाणवतात आणि यावेळी त्याला थोडी भीती वाटते. भूतकाळात, त्याने दंतकथांमध्ये माझ्याविषयीच्या ऐतिहासिक गोष्टी ऐकल्या आहेत आणि त्यामुळे तो माझ्यावर अर्धवट विश्वास आणि अर्धवट संशय बाळगून असतो. मी कुठे आहे किंवा अगदी माझा चेहरा किती मोठा आहे हे त्याला माहीत नसते—तो समुद्राइतका विशाल आहे की हिरव्यागार कुरणांसारखा असीम आहे? या गोष्टी कोणालाही माहीत नसतात. मनुष्य जेव्हा आज नभात माझा चेहरा पाहतो, केवळ तेव्हाच मनुष्याला वाटते की दंतकथेतील मी खरा आहे आणि म्हणून त्याची माझ्याविषयी थोडी अधिक अनुकूल प्रवृत्ती होते आणि केवळ माझ्या कृत्यांमुळेच त्याचे माझ्याविषयीचे कौतुक थोडे वाढते. पण तरीदेखील मनुष्य मला जाणत नाही आणि माझा केवळ एक भागच त्याला नभात दिसतो. त्यानंतर, मी माझे हात लांबवतो आणि ते मनुष्याला दाखवतो. मनुष्य आश्चर्यचकित होतो आणि म्हणून त्याला वाटणाऱ्या कौतुकात थोड्या आदराची भर पडते. मनुष्य माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर भिडवून असतो, तो लक्ष देत नसताना माझ्याकडून त्याच्यावर प्रहार होईल याची त्याला खोलवर भीती वाटत असते—मात्र मनुष्याचे लक्ष माझ्यावर असण्याचे बंधन मला नाही आणि मी माझ्या हाताने कार्य करतच राहतो. मी केलेल्या सर्व कृत्यांमध्ये मनुष्य माझ्याविषयी थोडा अनुकूल असतो आणि अशा प्रकारे माझ्याशी सहयोग करण्यासाठी तो हळूहळू माझ्यासमोर येतो. मी जेव्हा संपूर्णतेने मनुष्यासमोर स्वतःला प्रकट करेन, तेव्हा मनुष्याला माझा चेहरा दिसेल आणि त्यानंतर मी स्वतःला मनुष्यापासून लपवणार किंवा धूसर ठेवणार नाही. विश्वभरात मी जाहीरपणे सर्व लोकांसमोर प्रकट होईन आणि जे रक्तामांसाचे आहेत ते सर्वजण माझी कृत्ये पाहतील. जे आत्मे आहेत ते सर्वजण माझ्या घरात नक्कीच शांतपणे निवास करतील आणि माझ्यासमवेत खात्रीने उत्तम वरदानांचा आनंद घेतील. ज्यांची मला काळजी आहे असे सर्वजण नक्कीच ताडणातून वाचतील आणि निश्चितच ते आत्म्याची वेदना आणि देहाची यातना टाळतील. मी सर्व लोकांसमोर जाहीरपणे प्रकट होईन, राज्य करेन आणि सत्ता धारण करेन, जेणेकरून विश्वावर प्रेतांच्या दुर्गंधीचे अधिराज्य असणार नाही; त्याऐवजी, माझा तीव्र सुवास संपूर्ण जगभर पसरेल, कारण माझा दिवस जवळ येतो आहे, मनुष्य जागृत होतो आहे, पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे आणि पृथ्वीच्या वाचण्याचे दिवस उरलेले नाहीत, कारण मी आलो आहे!

६ एप्रिल १९९२

मागील:  संपूर्ण विश्वासाठी उद्देशून असलेली देवाची वचने—अध्याय २६

पुढील:  विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन कसा असावा

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger