पृथ्वीवरील देवाला कसे ओळखावे

तुम्हा सर्वांवर देवाची कृपा असावी व देवाकडून फळ मिळावे अशी तुमची इच्छा असते; देवावर विश्वास ठेवायला सुरुवात केली की प्रत्येकाला अशा गोष्टींची अपेक्षा असते, कारण प्रत्येकजण उच्च उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यात आधीच मग्न असतो आणि कुणालाही इतरांपेक्षा मागे पडायचे नसते. लोक हे असेच असतात. अगदी याच कारणासाठी, तुमच्यापैकी अनेकजण सतत स्वर्गातील देवाच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असतात, पण वस्तुतः तुमची देवाप्रति असलेली निष्ठा आणि निरागसता स्वतःविषयीच्या निष्ठेपेक्षा आणि निरागसतेपेक्षा फारच कमी असते. मी असे का म्हणतो? कारण मला तुमची देवाप्रति असलेली निष्ठा अजिबात मान्य नाही आणि तुमच्या हृदयात असलेल्या देवाचे अस्तित्व मी नाकारतो. याचा अर्थ असा, की ज्या देवाची तुम्ही उपासना करता, ज्या अस्पष्ट देवाची तुम्ही स्तुती करता तो मुळात अस्तित्वातच नाही. मी असे म्हणू शकतो, कारण तुम्ही खर्‍या देवापासून खूप दूर आहात. तुमच्या निष्ठेचे कारण तुमच्या हृदयात असलेली देवाची मूर्ती हे आहे; परंतु, माझ्या मते, तुम्ही ज्याला महान किंवा लहान समजत नाही, त्या देवाचे अस्तित्व केवळ वचनांनी मान्य करत असता. मी जेव्हा म्हणतो, की तुम्ही देवापासून दूर आहात, तेव्हा मला म्हणायचे असते, की तुम्ही खर्‍या देवापासून खूप लांब आहात, पण तो अस्पष्ट देव तुमच्या जवळच असतो. जेव्हा मी “महान नाही” असे म्हणतो, त्याचा अर्थ तुम्ही आज ज्या देवावर विश्वास ठेवता, तो महान क्षमता नसलेली, फार उच्च नसलेली केवळ एक व्यक्ती असल्याचे दिसते. आणि मी जेव्हा “लहान नाही” असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा, की ही व्यक्ती वार्‍याला बोलावू शकत नसली, पावसाला आज्ञा करू शकत नसली, तरी ती पृथ्वी आणि स्वर्गाला हलवून टाकणारे, लोकांना पूर्णपणे आश्चर्यचकित करणारे कार्य करण्यासाठी देवाच्या आत्म्याला सांगू शकते. बाह्यतः तुम्ही सर्व या पृथ्वीवरील ख्रिस्ताप्रति अतिशय आज्ञाधारक वाटत असलात तरी, मूलतः तुमची त्याच्यावर श्रद्धा नसते किंवा तुम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही. म्हणजेच, ज्याच्यावर तुम्ही खरोखर विश्वास ठेवता तो तुमच्या स्वतःच्या भावनांचा अस्पष्ट देव आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात कधीही पाहिलेले नसते तरीही ज्या देवासाठी तुम्ही रात्रंदिवस तळमळत राहता या ख्रिस्ताप्रति तुमची श्रद्धा अपुरी आहे आणि तुमचे प्रेम शून्यवत आहे. श्रद्धा याचा अर्थ विश्वास आणि निष्ठा; प्रेम याचा अर्थ हृदयात भक्ती आणि आदर असणे आणि त्याच्यापासून कधीच न दुरावणे. तरीही आज तुमचे ख्रिस्तावरील प्रेम आणि विश्वास यापेक्षा खूपच कमी पडत आहे. विश्वासाबद्दल बोलायचे तर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवू शकता? प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावर प्रेम करू शकता? तुम्हाला त्याच्या प्रवृत्तीची समजच नाही, त्याच्या मूलतत्वाची अजूनही ओळख नाही, तर मग तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवता? तुमच्या त्याच्यावरील श्रद्धेमध्ये वास्तविकता कुठे आहे? तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे प्रेम करता? तुमच्या त्याच्यावरच्या प्रेमामध्ये वास्तविकता कुठे आहे?

अनेक लोकांनी आजवर न डगमगता माझे अनुसरण केले आहे. आणि तुम्हीही गेली अनेक वर्षे खूप शीण सहन केला आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाचा नैसर्गिक स्वभाव आणि सवयी मी अतिशय स्पष्टपणे समजून घेतल्या आहेत; तुमच्यापैकी प्रत्येकाशी परस्पर संवाद करणे अतिशय कठीण होते. जरी मी तुमच्याविषयी बरेच काही जाणून घेतले असले, तरी तुम्हाला माझ्याबद्दल काहीच उमजले नाही याची कीव वाटते. गोंधळाच्या एका क्षणी तुम्ही कुणाच्या तरी फसवणुकीला बळी पडलात असे लोक म्हणत असतील, तर त्यात काही नवल नाही. खरोखर, तुम्हाला माझ्या प्रवृत्तीविषयी काहीच ठाऊक नाही, माझ्या मनात काय आहे ते तर त्याहूनही ठाऊक नाही. आज, तुमचे माझ्याविषयीचे गैरसमज वाढत चालले आहेत आणि तुमची माझ्यावरची श्रद्धा ही गोंधळलेली श्रद्धा आहे. तुमची माझ्यावर श्रद्धा आहे असे म्हणण्याऐवजी तुम्ही सर्वजण माझी तोंडपुजी स्तुती आणि खुशामत करण्याचा प्रयत्न करत आहात असे म्हणणे अधिक योग्य होईल. तुमची उद्दिष्टे अगदी साधी आहेत: मला ज्याच्याकडून काही फळ मिळेल, मी त्याचे अनुसरण करेन आणि देव असो की आणि दुसरा कोणी ठराविक देव असो, जो कोणी मला मोठ्या संकटांपासून दूर ठेवेल त्याच्यावर मी विश्वास ठेवेन. यातील कशाशीच माझा संबंध नाही. तुमच्यामध्ये असे अनेक लोक आहेत आणि ही परिस्थिती फार गंभीर आहे. जर एक दिवस, ख्रिस्ताच्या मूलतत्वाचे आकलन असल्यामुळे तुमच्यापैकी किती जणांची ख्रिस्तावर श्रद्धा आहे याची चाचणी घेतली तर, मला शंका आहे की माझ्या दृष्टीने तुमच्यापैकी एकही व्यक्ती समाधानकारक नसेल. म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाने या प्रश्नावर विचार करण्यात काही नुकसान नाही: तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता तो माझ्यापेक्षा अतिशय वेगळा आहे आणि असे असल्यामुळे, तुमच्या देवावरील विश्वासाचे मूलतत्त्व काय आहे? तुमच्या तथाकथित देवावर तुम्ही जितका जास्त विश्वास ठेवाल, तितके तुम्ही माझ्यापासून दूर जाल. तर मग, या समस्येतील मूलतत्त्व काय आहे? हे नक्की आहे, की तुमच्यापैकी कोणीही या समस्येवर कधीच विचार केलेला नाही, पण तुम्हाला त्याचे गांभीर्य जाणवले आहे का? अशा प्रकारे विचार करणे पुढे सुरू ठेवले ठेवले तर त्याचे परिणाम तुम्ही कधी लक्षात घेतले आहेत का?

आज तुमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि तुमच्यापैकी एकही व्यक्ती समस्या सोडवण्यात निपुण नाही. ही परिस्थिती पुढे सुरू राहिली तर केवळ तुमचेच नुकसान होणार आहे. मी तुम्हाला समस्या जाणून घेण्यास मदत करेन परंतु, त्या सोडवणे तुमच्यावर अवलंबून आहे.

जे इतरांबद्दल संशय घेत नाहीत ते मला आवडतात आणि जे सहजपणे सत्य स्वीकारतात ते मला प्रिय असतात; अशा दोन प्रकारच्या लोकांबद्दल मला बरीच आस्था असते, कारण माझ्या नजरेत ते लोक प्रामणिक असतात. तू कपटी असशील, तर तू सर्व लोकांबाबत आणि सर्व गोष्टींबाबत सावध आणि संशयपूर्ण असशील आणि अशा प्रकारे, तुझी माझ्यावरची श्रद्धा संशयाच्या पायावर आधारित असेल. मी अशा प्रकारची श्रद्धा कधीच मान्य करू शकत नाही. खरी श्रद्धा नसल्याने, तुझ्यात खरे प्रेम तर अजूनही कमी असते. आणि जर तू देवाबद्दल वाटेल त्या शंका आणि तर्कवितर्क करत असशील तर, तू निःसंशयपणे सर्व लोकांमध्ये अत्यंत कपटी आहेस. देव मनुष्यासारखा असेल का यावर तू तर्कवितर्क करतोस: अक्षम्यपणे पापी, क्षुद्र चारित्र्याचा, विवेक आणि तारतम्य नसलेला, न्याय्यबुद्धी नसलेला, दुष्ट डावपेच करणारा, बेइमान व लबाड, दुष्ट्पणा आणि तमोगुणाच्या आहारी गेलेला आणि अशा प्रकारच्या मनुष्यासारखा. देवाबद्दल यत्किंचितही ज्ञान नसल्यामुळे लोक असा विचार करतात, हेच याचे कारण नसेल ना? अशी श्रद्धा पापाहून कमी म्हणता येणार नाही! असेही काही लोक आहेत ज्यांना वाटते, की मला संतुष्ट करणारे फक्त स्तुती करणारे आणि हांजी हांजी करणारे असतात आणि असे कौशल्य नसणार्‍या लोकांचे देवाच्या घरी स्वागत होणार नाही आणि ते तेथील स्वतःचे स्थान गमावतील. एवढ्या वर्षांत तुम्ही फक्त हेच ज्ञान प्राप्त केले आहे का? तुम्ही हेच प्राप्त केले आहे का? तुमचे माझ्याविषयीचे ज्ञान या गैरसमजावर थांबत नाही; तर तुम्ही केलेली देवाच्या आत्म्याची बदनामी आणि स्वर्गाची नालस्ती अजूनही वाईट आहे. म्हणून मी म्हणतो, की तुमची अशी श्रद्धा तुम्हाला माझ्यापासून अजून दूर नेईल आणि माझ्या अधिकच विरोधात जाईल. अनेक वर्षे केलेल्या कार्यातून तुम्ही बरीच सत्ये पाहिली असतील, परंतु माझ्या कानांनी काय ऐकले ते तुम्हाला ठाऊक आहे का? तुमच्यापैकी किती लोकांना सत्य स्वीकारण्याची इच्छा आहे? तुम्हा सर्वांना वाटते, की तुम्ही सत्याची किंमत मोजायला तयार आहात, पण तुमच्यापैकी किती जणांनी सत्यासाठी खरोखर त्रास सहन केला आहे? तुमच्या हृदयात दुसरे काही नाही, फक्त अनीतिमत्त्व आहे, ज्यामुळे तुम्हाला वाटते, की कोणी का असेना, प्रत्येकजण सारखाच कपटी आणि कुटिल आहे—इतका की तुम्हाला असेही वाटू लागते, की देहधारी देवाकडे सामान्य माणसाप्रमाणेच दयाळू हृदय आणि परोपकारी प्रेमळपणा नाही. त्याहूनही अधिक म्हणजे, तुम्हाला वाटेल की फक्त स्वर्गातील देवाच्या ठायीच उदात्त चारित्र्य व दयाळू, परोपकारी वृत्ती असते. तुम्हाला वाटेल, की अशा प्रकारचा संत अस्तित्वात नसतो, पृथ्वीवर फक्त अंधःकार आणि दुष्टतेचे राज्य असते आणि देव म्हणजे लोक स्वतःचे कल्याण आणि सुंदरतेच्या आकांक्षा यांची पूर्ती ज्याच्यावर सोपवू शकतात असा कोणी असतो, त्यांनी निर्माण केलेली एक कल्पित प्रतिमा असतो. तुमच्या मनातला स्वर्गातला देव अतिशय सशक्त, नीतीमान आणि महान असतो, उपासना आणि आदराला पात्र असतो; पण हा पृथ्वीवरील देव फक्त एक बदली प्रतिनिधी आणि स्वर्गातील देवाचे एक साधन असतो. तुम्हाला वाटते की हा देव स्वर्गातील देवाची बरोबरी करू शकत नाही आणि त्याच श्वासात त्याचा उल्लेख करणे तर अजूनही शक्य नाही. देवाची महानता आणि आदर या बाबतीत, ते स्वर्गातील देवाच्या गौरवाशी नाते सांगतात, पण मनुष्याचा स्वभाव आणि भ्रष्टता या बाबतीत सांगायचे तर या प्रवृत्तींमध्ये पृथ्वीवरील देवाचा सहयोग असतो. स्वर्गातील देव चिरकाल भव्यदिव्य असतो तर पृथ्वीवरील देव नेहमी क्षुद्र, अशक्त आणि अकार्यक्षम असतो. स्वर्गातील देव भावनाशील नसतो, फक्त नीतीमान असतो, तर पृथ्वीवरील देवाकडे फक्त स्वार्थी हेतू असतात आणि त्याच्याकडे तारतम्य आणि विवेकबुद्धी नसते. स्वर्गातील देवाकडे किंचितही कुटिलता नसते आणि तो सतत निष्ठावान असतो, तर पृथ्वीवरील देवाला नेहमी एक अप्रामाणिक बाजू असते. स्वर्गातील देव मनुष्यावर अतिशय प्रेम करतो, तर पृथ्वीवरील देवाकडे माणसाबद्दल पुरेशी आस्था नसते, तो त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. हे चुकीचे ज्ञान बराच काळ तुमच्या हृदयात राहिले आहे आणि भविष्यातही ते कायम राहू शकेल. तुम्ही ख्रिस्ताच्या सर्व कृत्यांकडे अनीतीमान लोकांच्या दृष्टिकोनातून पाहता आणि त्याच्या सर्व कार्याचे तसेच त्याची ओळख आणि मूलतत्वाचे दुष्ट लोकांच्या दृष्टीतून मूल्यमापन करता. तुम्ही एक गंभीर चूक केली आहे आणि तुमच्या आधीच्या लोकांनी कधी नाही केले ते तुम्ही केले आहे. म्हणजे, तुम्ही डोक्यावर मुकुट धारण केलेल्या त्या स्वर्गातील भव्य देवाचीच सेवा करता आणि दिसतही नाही इतके क्षुल्लक ज्याला समजता त्या देवाकडे तुम्ही कधीही लक्ष देत नाही. हे तुमचे पाप नाही काय? देवाच्या प्रवृत्तीचा अवमान करण्याचे हे एक नमुनेदार उदाहरण नाही का? तुम्ही स्वर्गातील देवाची उपासना करता. तुम्ही भव्य प्रतिमा आणि वाक्चातुर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोकांचा आदर करता. जो तुझे हात समृद्धीने भरून टाकतो त्या देवाची आज्ञा तू खुशीने पाळतोस आणि तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकणार्‍या देवाबद्दल तीव्र आस धरतोस. तू ज्याची उपासना करत नाहीस असा हा एकच देव आहे जो भव्यदिव्य नाही; कुणीही मनुष्य ज्याला फार उच्च मानत नाही अशा देवाशी सहयोग असणे या एकाच गोष्टीचा तू तिरस्कार करतोस. तुला एकच गोष्ट करायची इच्छा नसते ती म्हणजे ज्याने तुला कधी एक पैसाही दिला नाही त्या देवाची सेवा करणे आणि जो तुला त्याचा ध्यास घ्यायला लावण्यास असमर्थ ठरला तो हा एकच विरूप देव आहे. हा देव तुमची क्षितिजे विस्तारू शकत नाही, तुला एक ठेवा सापडला आहे असे भासू देत नाही, तुला हवे आहे ते मिळवणे तर दूरच राहिले. तर मग, तू त्याचे अनुसरण का करतोस? अशा प्रश्नांवर तू कधी विचार केला आहेस का? तू जे करतोस त्यातून केवळ ख्रिस्ताचा अवमानच होतो असे नाही, तर अधिक महत्त्वाचे म्हणजे त्यातून स्वर्गातील देवाचा अवमान होतो. मला वाटते, देवावरील तुमच्या श्रद्धेचा हा हेतू नाही.

स्वतःला आनंद मिळावा म्हणून तुम्ही देवाची आस धरता, पण तरी तुम्ही देवापासून दूर आहात. येथे काय समस्या आहे? तुम्ही फक्त त्याची वचने स्वीकारता, पण त्याचे व्यवहार किंवा त्याने केलेली काटछाट स्वीकारत नाही, त्याने केलेली प्रत्येक व्यवस्था स्वीकारणे आणि त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे तर अजूनही कमी असते. तर मग येथे काय समस्या आहे? अंतिम मीमांसा केली तर दिसते, की तुमची श्रद्धा म्हणजे एक रिकामे अंड्याचे कवच आहे ज्यातून कधीच कोंबडीचे पिल्लू निर्माण होणार नाही. कारण तुमच्या श्रद्धेतून तुम्हाला कधीही सत्य प्राप्त झालेले नाही किंवा तुम्हाला जीवन प्राप्त झालेले नाही, उलट त्यातून तुम्हाला संवर्धन आणि आशेचा एक काल्पनिक भास झाला आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवता, यामागे अशा प्रकारचे संवर्धन आणि आशा हा तुमचा हेतू असतो, सत्य आणि जीवन हा नव्हे. म्हणून, मी असे म्हणू शकतो, की तुमच्या देवावरील श्रद्धेचे कारण दुसरे काही नाही तर गुलामगिरी आणि निर्लज्जतेतून देवाची खुशामत करण्याचा प्रयत्न करणे हे आहे आणि त्याला कधीही खरी श्रद्धा समजता येणार नाही. अशा प्रकारच्या श्रद्धेतून एखादे कोंबडीचे पिल्लू कसे जन्माला येऊ शकेल? दुसर्‍या शब्दात सांगायचे, तर अशा श्रद्धेतून काय मिळणार आहे? तुमची स्वतःची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देवाचा उपयोग करून घेणे हा तुमच्या देवावरील श्रद्धेचा हेतू आहे. देवाच्या प्रवृत्तीचा तुम्ही अवमान केल्याचा हा अजून एक पुरावा नाही का? तुम्ही स्वर्गातील देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवता आणि पृथ्वीवरील देवाचे अस्तित्व नाकारता, तरीही मला तुमची मते मान्य नाहीत; ज्यांची पावले जमिनीवर टिकतात आणि जे पृथ्वीवरील देवाची सेवा करतात अशा लोकांचीच मी प्रशंसा करतो, परंतु जे पृथ्वीवरील ख्रिस्ताला कधीच मानत नाहीत त्यांची मी कधीच प्रशंसा करत नाही. असे लोक स्वर्गातील देवाशी कितीही एकनिष्ठ असोत, दुष्ट लोकांना शिक्षा करणार्‍या माझ्या हातातून ते शेवटी कधीच सुटणार नाहीत. हे लोक दुष्ट आहेत; देवाला विरोध करणारे ते वाईट लोक आहेत आणि त्यांनी कधीच ख्रिस्ताच्या आज्ञेचे आनंदाने पालन केले नाही. अर्थात, त्यांच्यात ख्रिस्ताला न ओळखणार्‍या, तसेच त्याला न मानणार्‍या सर्व लोकांचा समावेश होतो. जोवर तू स्वर्गातील देवाशी एकनिष्ठ आहेस, तोवर तू ख्रिस्ताबरोबर वाटेल तसे वागू शकतोस असे तुला वाटते का? चूक! ख्रिस्ताबद्दल तुझे अज्ञान म्हणजे स्वर्गातील देवाबद्दलचे अज्ञान. तू स्वर्गातील देवाशी कितीही एकनिष्ठ असलास, तरी ते म्हणजे केवळ पोकळ शब्द आणि खोटे अवसान आहे, कारण पृथ्वीवरील देव मनुष्याला केवळ सत्य आणि अधिक सखोल ज्ञान मिळवून देण्यासाठी कारणीभूत असतो असे नव्हे, तर मनुष्याचा धिक्कार करून नंतर दुष्ट लोकांना शिक्षा देण्यासाठी पुरावे शोधण्यासाठी तो त्याहूनही अधिक कारणीभूत असतो. तुला या ठिकाणी झालेली उपकारक आणि हानिकारक निष्पत्ती उमजली का? तू त्यांचा अनुभव घेतलास का? तुम्हाला एक दिवस लवकरच हे सत्य समजो अशी इच्छा मी व्यक्त करतो: देव समजण्यासाठी, तुम्ही केवळ स्वर्गातील देवच समजायला हवा असे नाही तर, अधिक महत्त्वाचे म्हणजे पृथ्वीवरील देवही समजून घ्यायला हवा. तुमच्या प्राथमिकतांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका किंवा दुय्यम गोष्टींना प्राथमिक गोष्टींच्या पुढे जाऊ देऊ नका. फक्त अशा प्रकारे, तू देवाबरोबर एक खरेखुरे नाते जोडशील, देवाच्या जवळ जाऊ शकशील आणि तुझे हृदय त्याच्याजवळ नेऊ शकशील. जर तू अनेक वर्षे श्रद्धाळू राहिला असशील आणि बराच काळ माझ्याबरोबर सहयोगी असशील आणि तरीही माझ्यापासून दूर राहिला असशील, तर मला म्हणायचे आहे की तू नक्कीच देवाच्या प्रवृत्तीचा वारंवार अवमान करत आहेस आणि तुझ्या अंताचा अंदाज करणे खूप कठीण आहे. माझ्याबरोबरच्या अनेक वर्षांच्या सहयोगातूनही तू मानवता आणि सत्याने युक्त अशी व्यक्ती बनू शकला नाहीस आणि एवढेच नव्हे तर, तुझे वाईट मार्ग स्वतःच्या स्वभावात अंतर्भूत केले आहेत; तुझ्याकडे पूर्वीच्या दुप्पट उद्धटपणा आहे एवढेच नव्हे तर माझ्याबद्द्लचे तुझे गैरसमज मला तुझा लहानसा सहकारी समजण्याइतके वाढले आहेत, तर मला म्हणायचे आहे, की तुझ्या दुःखाचे मूळ वरवरचे उरलेले नाही, तर ते तुझ्या हाडापर्यंत आत शिरले आहे. आता तुझ्या अंत्ययात्रेची तयारी करण्यासाठी वाट पाहणे एवढेच तुझ्यासाठी उरले आहे. मग तू तुझा देव बनण्यासाठी माझी मनधरणी करायची गरज नाही, कारण तू एक अक्षम्य पाप, मृत्यूच्या शिक्षेसाठी योग्य असे पाप केले आहेस. जरी मी तुझ्यावर दया केली, तरी स्वर्गातील देव तुझा जीव घेण्यासाठी आग्रह धरेल, कारण देवाच्या प्रवृत्तीविषयी तू केलेला अवमान ही साधीसुधी समस्या नाही, तर तो एक गंभीर स्वरूपाचा अपराध आहे. जेव्हा वेळ येईल, तेव्हा मी आधी सांगितले नाही म्हणून मला दोष देऊ नकोस. हे सगळे पुन्हा एकाच मुद्द्याशी येते: जेव्हा तू पृथ्वीवरील देव म्हणजे ख्रिस्ताशी एक सामान्य व्यक्ती म्हणून सहयोग करतोस, म्हणजेच जेव्हा तुला वाटते की देव म्हणजे दुसरे कोणी नाही परंतु एक व्यक्ती आहे तेव्हा तू नष्ट होशील. ही माझी तुम्हा सर्वांना एकच सक्त ताकीद आहे.

मागील:  देवाची प्रवृत्ती समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे

पुढील:  एक अतिशय गंभीर समस्या: विश्वासघात (१)

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger