देवाचे नवीनतम कार्य जाणून घ्या आणि त्याचे अनुसरण करा

आता तुम्हा सर्वांना देवाचे लोक होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी योग्य मार्गावर संपूर्णतः प्रवेश करायचा आहे. देवाचे लोक होणे म्हणजे राज्याच्या युगात प्रवेश करणे. आज तुम्ही अधिकृतरीत्या राज्याच्या प्रशिक्षणामध्ये प्रवेश करत आहात व भविष्यातील तुमची जीवने आता पूर्वीसारखी ढिसाळ आणि सुस्त नसतील; तुम्ही तशा प्रकारे जगत राहिलात, तर देवाला आवश्यक असलेला दर्जा गाठणे अशक्य आहे. तुला जर बदलाची कसलीही निकड वाटत नसेल, तर त्यातून हेच प्रतीत होते की तुला स्वतःमध्ये सुधारणा करण्याची काहीही इच्छा नाही, तू तुझ्या ध्येयाविषयी गोंधळलेला आहेस व देवाची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ आहेस. राज्याच्या प्रशिक्षणात प्रवेश करणे याचाच अर्थ देवाचे लोक म्हणून जीवन सुरू करणे-असे प्रशिक्षण प्राप्त करण्याची तुझी इच्छा आहे का? त्याबाबत अशी तातडीने पावले उचलण्याची तुझी इच्छा आहे का? देवाने आखून दिलेल्या शिस्तीत राहण्याची तुझी इच्छा आहे का? देवाच्या ताडणाखाली राहण्याची तुझी इच्छा आहे का? जेव्हा देवाची वचने तुझ्यापर्यंत येतील आणि तुझी परीक्षा घेतील, तेव्हा तू नेमके कशा प्रकारे वागशील? सर्व प्रकारची तथ्ये समोर आल्यावर तू काय करशील? पूर्वी, तुझे लक्ष जीवनाकडे एकाग्र झालेले नव्हते; आता मात्र तू जीवनातल्या वास्तविकतेत प्रवेश करण्याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजेस व तुझ्या जीवन प्रवृत्तीतील बदलांचा पाठपुरावा केला पाहिजेस. राज्यातील लोकांनी हे साध्य करायला हवे. जे देवाचे लोक आहेत, त्यांनी जीवनावर पकड मिळवायला हवी, त्यांनी राज्याकडून मिळू घातलेले ज्ञान—प्रशिक्षण स्वीकारले पाहिजे आणि त्यांच्या जीवन प्रवृत्तीमधील बदलांचा पाठपुरावा केला पाहिजे. राज्यातील लोकांकडून देवाला हेच हवे आहे.

राज्यातील लोकांकडून देवाच्या आवश्यकता पुढीलप्रमाणे आहेत:

१. देवाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या पाहिजे. म्हणजेच शेवटच्या दिवसांत देवाने उच्चारलेली सर्व वचने त्यांनी स्वीकारली पाहिजेत.

२. त्यांनी राज्यातील प्रशिक्षणासाठी प्रवेश केला पाहिजे.

३. त्यांच्या हृदयाला देवाचा दिव्यस्पर्श व्हावा म्हणून त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. जेव्हा तुझे हृदय पूर्णपणे देवाकडे वळलेले असते आणि तुझे आध्यात्मिक आयुष्य नियमितपणे सुरू असते, तेव्हा तू स्वातंत्र्यात राहशील, म्हणजेच देवाच्या संगोपनात व संरक्षणात राहशील. जेव्हा तू देवाच्या संगोपनात आणि संरक्षणात राहशील, तेव्हाच तू देवाचा होशील.

४. त्यांना देवाने प्राप्त केले पाहिजे.

५. त्यांनी पृथ्वीवरील देवाच्या गौरवाचे मूर्तस्वरूप बनले पाहिजे.

या पाच गोष्टी म्हणजेच मी तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. मी उच्चारलेली वचने देवाच्या लोकांसाठी आहेत. या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची इच्छा नसेल, तर मी तुझ्यावर कुठलीच बळजबरी करणार नाही—मात्र तू खरोखरच ती जबाबदारी स्वीकारलीस, तरच तू देवाची इच्छा पूर्ण करू शकशील. आजपासून तुम्ही देवाने दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास सुरुवात करा, राज्यातील लोक होण्याचा पाठपुरावा सुरू करा आणि त्या राज्यातील लोकांना आवश्यक असणारा दर्जा स्वतःसाठी प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. प्रवेशाची ही पहिली पायरी आहे. देवाची इच्छा पूर्णपणे पार पाडायची असेल, तर या पाच जबाबदाऱ्या तू स्वीकारल्या पाहिजेस आणि जर तुला त्या साध्य करता आल्या, तर मग तू देवाच्या हृदयात स्थान प्राप्त करून घेशील व त्या वेळी देव नक्कीच तुझा उत्तम उपयोग करून घेईल. आजच्या घडीला राज्याच्या प्रशिक्षणात प्रवेश मिळवणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या प्रशिक्षणात प्रवेश मिळवण्यामध्ये आध्यात्मिक जीवनाचा समावेश आहे. यापूर्वी, आध्यात्मिक जीवनाविषयी काहीही सांगण्यात आलेले नव्हते. आज मात्र, राज्याच्या प्रशिक्षणात तुम्ही प्रवेश करत असताना त्यासोबत तुम्ही अधिकृतपणे आध्यात्मिक आयुष्यातदेखील प्रवेश करत आहात.

कोणत्या प्रकारच्या जीवनाला आध्यात्मिक जीवन म्हणावे? ज्या जीवनात तुझे हृदय पूर्णपणे देवाच्या भक्तीकडे वळलेले आहे आणि त्याला देवाच्या प्रेमाची जाणीव होऊ शकते आहे, तेच खरे आध्यात्मिक जीवन. त्या जीवनात तुम्ही केवळ देवाच्या वचनांनुरूपच जगत असता, तुमच्या हृदयात त्याशिवाय आणखी काहीही नसते आणि आज तुम्हाला देवाची इच्छा समजून घेता येते व तुम्हाला तुमचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडता यावे यासाठी पवित्र आत्म्याचा प्रकाश आज तुम्हाला मार्ग दाखवत असतो. मनुष्य आणि देव यांदरम्यानचे असे जीवन म्हणजे खरे आध्यात्मिक जीवन आहे. जर तुला आजच्या दिव्य प्रकाशाचे अनुसरण करता आले नाही, तर तुझ्या व देवाच्या नात्यात अंतर निर्माण झाले आहे असे समज—कदाचित ते नाते तुटलेही असेल—आणि तुझे नेहमीसारखे आध्यात्मिक जीवन उरले नसेल. देवाबरोबरचे सामान्य नाते हे आज देवाच्या वचनांचा स्वीकार करण्याच्या पायावरच निर्माण केलेले आहे. तुझे आध्यात्मिक जीवन सामान्य आहे का? तुझे देवाबरोबरचे नाते सामान्य आहे का? तू पवित्र आत्म्याचे कार्य अनुसरणारा आहेस का? जर आज तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाचे अनुसरण करू शकत असशील व देवाच्या वचनांमधून व्यक्त होणारी त्याची इच्छा समजू शकत असशील, तसेच त्याच्या वचनांमध्ये प्रवेश करू शकत असशील, तरच तू पवित्र आत्म्याचा प्रवाह अनुसरणारा आहेस. जर तू पवित्र आत्म्याचा प्रवाह अनुसरत नसशील, तर तू नक्कीच सत्याचा पाठपुरावा करणारा नाहीस. ज्यांना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची इच्छा नाही, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा त्याचे कार्य करू शकत नाही, परिणामी अशा लोकांना त्यांचे बळ एकवटता येत नाही आणि ते कायम निष्क्रीयच राहतात. आज, तू पवित्र आत्म्याच्या प्रवाहाचे अनुसरण करत आहेस का? तू पवित्र आत्म्याच्या प्रवाहात आहेस का? तू निष्क्रीय अवस्थेतून बाहेर आला आहेस का? जे आज देवाच्या वचनांवर विश्वास ठेवतात, देवाचे कार्य पायाभूत असल्याचे मानतात व पवित्र आत्म्याच्या प्रकाशाचे अनुसरण करतात—ते सर्वजण पवित्र आत्म्याच्या प्रवाहासोबत आहेत. देव काहीही म्हणाला, तरीही देवाची वचने निःसंदिग्धपणे खरी आणि बरोबर असल्याचे तू मानत असशील आणि त्याच्या वचनांवर तुझा पूर्ण विश्वास असेल, तर तुम्ही देवाच्या कार्यात प्रवेश करू पाहात आहेस व अशा प्रकारे तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करतोस.

पवित्र आत्म्याच्या प्रवाहात प्रवेश करण्यासाठी, देवाबरोबरचे नाते सामान्य असले पाहिजे आणि प्रथम निष्क्रिय अवस्थेतून बाहेर आले पाहिजे. काही लोक कायम गर्दीतील बहुसंख्यांकांचे अनुसरण करतात व त्यांची हृदये देवापासून फार दूर भरकटलेली असतात; अशा लोकांना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची जराही इच्छा नसते आणि ते ज्या दर्जाचा पाठपुरावा करू पाहतात, तो अत्यंत कनिष्ठ दर्जा असतो. देवावर प्रेम करण्याचा पाठपुरावा करणे व देवाने तुम्हाला प्राप्त करणे हीच देवाची इच्छा आहे. काही लोक असे असतात, जे देवाच्या प्रेमाची परतफेड केवळ स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार करतात, पण त्यामुळे देवाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही; तू जितक्या उच्च दर्जाचा पाठपुरावा करशील, तितके ते देवाच्या इच्छेशी सुसंगत असेल. सामान्य आणि देवाच्या प्रेमाचा पाठपुरावा करणारी व्यक्ती म्हणून, देवाच्या लोकांपैकी एक म्हणून, त्याच्या राज्यात प्रवेश मिळवणे हेच तुमचे खरे भविष्य आहे व हे जीवनच सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाचे आहे; तुमच्याइतके आशीर्वादित आजवर कोणीच झालेले नाही. असे मी का म्हणत आहे? कारण जे देवावर विश्वास ठेवत नाहीत ते केवळ देह म्हणून जगतात व ते सैतानासाठी जगत असतात, आज तुम्ही मात्र देवासाठी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत आहात. म्हणूनच तुमचे जीवन अतिशय महत्त्वाचे आहे, असे मी म्हणत आहे. केवळ देवाने निवडलेले असे लोकच अत्यंत मोलाचे जीवन जगू शकतात: पृथ्वीवरील इतर कोणीही इतके मौल्यवान व अर्थपूर्ण जीवन जगू शकत नाही. देवाने तुमची निवड केल्याने, देवाने तुम्हाला वाढवल्याने आणि त्याहून अधिक म्हणजे देवाला तुमच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे तुमच्या आवाक्यात खरे अर्थपूर्ण जीवन आलेले आहे व असे अतिमौल्यवान जीवन कसे जगावे, हे तुम्ही जाणता. हे तुम्ही चांगला पाठपुरावा केले म्हणून घडलेले नाही, तर ही गोष्ट देवाच्या कृपेने घडलेली आहे; देवाने तुमच्या आत्म्याचे डोळे उघडले आणि देवाच्या आत्म्याने तुमच्या हृदयाला स्पर्श करून तुम्हाला त्याच्यापुढे येण्याचे महद्‍भाग्य प्राप्त करून दिले. देवाच्या आत्म्याने तुम्हाला हे ज्ञान दिले नसते, तर देवाच्या बाबतीत सुंदर गोष्ट काय आहे, ते बघण्यास तुम्ही असमर्थ असता, तसेच, देवावर प्रेम करणेही तुम्हाला शक्य झाले नसते. केवळ देवाच्या आत्म्याने लोकांच्या हृदयाला स्पर्श केल्या कारणानेच त्यांची मने देवाकडे वळली आहेत. कधीकधी, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनांचा आनंद लुटत असता, तेव्हा तुमच्या आत्म्याला दिव्य स्पर्श होऊन जातो आणि तुम्ही देवावर प्रेम करण्यावाचून राहू शकत नाही व तुमच्यात प्रचंड ताकद आहे आणि तुम्ही मार्गातील कोणताही अडथळा सहजगत्या बाजूला सारू शकता, असेही तुम्हाला वाटू लागते. तुला जर असे वाटू लागले असेल, तर तुला देवाच्या आत्म्याचा स्पर्श झालेला आहे व तुझे मन पूर्णपणे देवाकडे वळलेले आहे. अशा वेळी तू देवाला प्रार्थना करून म्हणशीलः “हे देवा! आम्हाला खरोखर तू पूर्वभाग्यामुळे निवडलेले आहेस. तुझ्या गौरवाचा मला अभिमान वाटतो आणि तुझ्या लोकांपैकी एक होण्यात मला स्वतःचा गौरव वाटतो. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी सारे काही पणाला लावेन व कोणतीही गोष्ट करेन. माझे सर्व जीवन आणि संबंध जीवनभरातले कष्ट मी तुझ्याच चरणी अर्पण करेन.” जेव्हा तू अशी प्रार्थना करशील, तेव्हा तुमच्या हृदयात देवाविषयी अपार प्रेम व खराखुरा आज्ञाधारकपणा दाटून येईल. तुला असा अनुभव कधी आला आहे का? जर लोकांना अनेकदा देवाच्या आत्म्याचा स्पर्श जाणवलेला असेल, तर ते विशेषतः त्यांच्या प्रार्थनेतून देवाला शरण जायला तयार असतात: “हे देवा! मला तुझा गौरवदिन बघायचा आहे. माझी तुझ्यासाठी जगण्याची इच्छा आहे—तुझ्यासाठी जगण्यापेक्षा अधिक योग्य आणि अधिक अर्थपूर्ण दुसरे काहीच नाही व सैतानासाठी आणि केवळ देह म्हणून जगण्याची माझी जराही इच्छा नाही. आज तुझ्यासाठी जगता यावे याकरताच तू मला वाढव.” जेव्हा तू अशा प्रकारे प्रार्थना करतोस, तेव्हा तुला असे जाणवेल, की तू तुझे हृदय देवाला अर्पित केल्याशिवाय राहू शकत नाहीस, तू देवाला प्राप्त केले पाहिजेस व जिवंतपणी देवाला प्राप्त केल्याशिवाय तुला मृत्यू स्वीकारायचा नाही अशी प्रार्थना केल्यानंतर, तुझ्यात अमर्याद, कधीही न घटणारी ताकद येईल आणि तिचा स्रोत कोणता, हे तुला कळणारही नाही; तुझ्या हृदयात अमर्याद शक्ती असेल व देव किती प्रेमळ आहे आणि त्याच्यासाठीच जगणे हे किती अर्थपूर्ण आहे, असे तुला जेव्हा जाणवेल, तेव्हा तुला देवाचा स्पर्श झालेला असेल. ज्यांना ज्यांना हा अनुभव आला आहे, त्या सर्वांनाच देवाचा स्पर्श झाला आहे. ज्यांना देवाचा वारंवार स्पर्श होतो, त्यांच्या जीवनात बदल घडून येतात, त्यांना त्यांचे संकल्प पूर्ण करता येतात, त्यांची देवाला पूर्णपणे प्राप्त करण्याची इच्छा असते, देवाविषयी त्यांच्या मनात असलेले प्रेम अधिक ठोस असते, त्यांची हृदये संपूर्णपणे देवाच्या चरणी असतात, कुटुंब, जग, त्यातली गुंतागुंत किंवा त्यांचे भविष्य यांकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते, ते संपूर्ण जीवन देवाला समर्पित करण्यास इच्छुक असतात. ज्यांना देवाच्या आत्म्याचा स्पर्श झाला आहे, ते लोक सत्याचा पाठपुरावा करतात, देवाने आपल्याला परिपूर्ण बनवावे अशी त्यांची मनोकामना असते.

तू तुझे हृदय देवाकडे वळवले आहेस का? तुझ्या हृदयाला देवाच्या आत्म्याचा स्पर्श झाला आहे का? जर तुला कधीच असा अनुभव आला नसेल व जर तू अशा प्रकारे कधीही प्रार्थना केली नसशील, तर मग त्यातून तुझ्या हृदयात देवासाठी काहीही स्थान नाही असे दिसते. ज्यांना देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन मिळाले आहे, ज्यांना देवाच्या आत्म्याचा स्पर्श झाला आहे, ते देवाच्या कार्याने पछाडले गेलेले आहेत, यावरून दिसून येते, की देवाची वचने आणि प्रेम त्यांच्यात रुजले आहे. काही लोक म्हणतात: “मी प्रार्थना करताना ती तुझ्याइतकी मनापासून करत नाही तसेच देवाने कधी मला इतका स्पर्शही केलेला नाही; कधीकधी—जेव्हा मी ध्यान व प्रार्थना करत असतो—तेव्हा मला असे वाटते, देव किती प्रेमळ आहे आणि माझ्या हृदयाला देवाचा स्पर्श झाला आहे.” मनुष्याच्या हृदयापेक्षा अधिक महत्त्वाचे काहीच नाही. जेव्हा तुझे हृदय देवाकडे वळलेले असेल, तेव्हा तुझे पूर्ण अस्तित्त्व देवाकडे वळलेले असेल व तेव्हा तुझ्या हृदयाला देवाच्या आत्म्याचा स्पर्श झालेला असेल. तुमच्यापैकी बहुतेकांना अशा प्रकारचा अनुभव आला असेल—फक्त तुमच्या अनुभवांची खोली एकसारखी नसेल इतकेच. काही लोक म्हणतात: “मी तर प्रार्थनेची पुष्कळशी वचनेही उच्चारत नाही. मी फक्त इतरांचा भक्तिभाव ऐकतो आणि तो ऐकूनच माझ्यात बळ येते.” यावरून हेच दिसून येते, की देवाने तुझ्या हृदयाला आतून स्पर्श केला आहे. ज्यांच्या हृदयाला देवाने स्पर्श केलेला असतो, त्यांनाच इतरांचा भक्तिभाव बघून अशी प्रेरणा मिळते; हृदयाला प्रेरणा देणारी वचने ऐकूनही ज्यांचे हृदय मुळीच विचलित होत नाही, त्यांच्यात पवित्र आत्म्याचे कार्य घडत नाही, हे सिद्ध होते. त्यांच्यात कसलीही तळमळ नसते, यावरून त्यांनी मनात कसलाही संकल्प केलेला नाही, हेच सिद्ध होते व अशा प्रकारे ते पवित्र आत्म्याच्या कार्यापासून वंचित असतात. एखाद्या मनुष्याला देवाचा स्पर्श झाला असेल, तर देवाची वचने ऐकल्यावर त्यांची प्रतिक्रिया उमटेल; त्यांना देवाचा स्पर्श झालेला नसेल, तर ते देवाच्या वचनांशीही जोडले जाणार नाहीत, देवाच्या वचनांचे त्यांच्याशी काही नाते नसेल आणि ते ज्ञानप्राप्तीसाठी असमर्थ असतील. ज्यांनी देवाची वचने ऐकली आहेत व तरीही त्यांच्यामध्ये काहीही प्रतिक्रिया उमटू शकलेली नाही, अशा लोकांना देवाने स्पर्श केलेला नाही—त्यांच्यात पवित्र आत्म्याने कार्य केलेले नाही. जे लोक तो नवीन प्रकाश स्वीकारू शकतात, अशा सर्वांना पवित्र आत्म्याच्या कार्याचा स्पर्श झालेला असतो आणि ते कार्य त्यांच्यात आलेले असते.

स्वतःचे मूल्यांकन कर:

१. तू पवित्र आत्म्याच्या सध्याच्या कार्यात सहभागी आहेस का?

२. तुझे हृदय देवाकडे वळले आहे का? तुला देवाचा स्पर्श झाला आहे का?

३. देवाच्या वचनांनी तुझ्या मनात घर केले आहे का?

४. तुझे आचरण देवाच्या आवश्यकतांच्या पायावर आहे का?

५. पवित्र आत्मा सध्या देत असलेल्या प्रकाशाच्या मार्गदर्शनाखाली तू राहात आहेस का?

६. तुझ्या हृदयावर जुन्या धारणांचे अधिराज्य आहे की देवाच्या आजच्या वचनांचे?

ही वचने ऐकल्यावर तुमच्या मनात कोणती भावना उत्पन्न होते? इतकी वर्षे विश्वास ठेवल्यानंतर, आता देवाची वचने हेच तुझे आयुष्य झाले आहे का? तुझ्या पूर्वीच्या, भ्रष्ट प्रवृत्तीत बदल झाला आहे का? जीवन प्राप्त होणे म्हणजे काय आणि जीवनाशिवाय राहणे म्हणजे काय, हे देवाच्या सद्य वचनानुसार तुला माहीत आहे का? हे सर्व तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे का? देवाचे अनुसरण करताना सर्व गोष्टी देवाच्या आजच्या वचनांनुसार असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहेः तुम्ही आयुष्यात प्रवेश करत असा किंवा देवाच्या इच्छेची पूर्तता करत असा, सर्व काही देवाच्या आजच्या वचनांभोवती फिरले पाहिजे. जर देवाच्या आजच्या वचनांभोवती तुझे बोलणे व पाठपुरावा केंद्रित झालेला नसेल, तर देवाची वचने तुला अपरिचित वाटतील आणि पवित्र आत्म्याच्या कार्यापासून तू पूर्णपणे वंचित राहशील. देवाला त्याचे अनुसरण करणारे लोक हवे असतात. तुला याआधी समजलेल्या गोष्टी कितीही अद्भुत व शुद्ध असल्या, तरी देवाला त्या नको आहेत आणि अशा गोष्टी बाजूला ठेवणे तुला शक्य नसेल, तर तो भविष्याकडे वाटचाल करण्यातला मोठा अडथळा आहे. पवित्र आत्म्याच्या आजच्या प्रकाशाचे अनुसरण करणाऱ्या लोकांना आशिर्वाद मिळतील. मागच्या युगातील लोकांनीदेखील देवाचे अनुसरण केले होते, तरीही ते आजपर्यंत देवाच्या मार्गावर येऊ शकले नाहीत; हा शेवटच्या दिवसांतील लोकांचा आशीर्वाद आहे. जे पवित्र आत्म्याच्या आजच्या कार्याचे अनुसरण करू शकतात व जेथे देव जाईल तेथे त्याच्या मागोमाग जात जे देवाचे अनुसरण करतात—अशाच लोकांना देवाचा आशीर्वाद लाभतो. जे पवित्र आत्म्याच्या आजच्या कार्याचे अनुसरण करू शकत नाहीत, त्यांनी देवाच्या वचनाच्या कार्यात प्रवेश केलेला नाही, मग त्यांनी कितीही कार्य केले, कितीही वेदना सोसल्या किंवा कितीही धावपळ केली, तरी देवाला त्या कशानेच काही वाटणार नाही आणि तो त्यांची प्रशंसा करणार नाही. आज, जे कोणी देवाची सध्याची वचने अनुसरत आहेत, ते पवित्र आत्म्याच्या प्रवाहाचे अनुसरण करत आहेत; ज्यांना देवाची आजची वचने परकी वाटतात, ते पवित्र आत्म्याच्या प्रवाहाबाहेर गेले आहेत व देव अशा लोकांची प्रशंसा करणार नाही. पवित्र आत्म्याच्या सध्याच्या वचनांशी सुसंगत नसलेली सेवा म्हणजे केवळ देहाची आणि धारणांची सेवा आहे व ती सेवा देवाच्या इच्छेप्रमाणे असणे अशक्य आहे. जर लोक धार्मिक धारणांमध्ये जगत असतील, तर ते देवाच्या इच्छेशी सुसंगत असणाऱ्या गोष्टी करू शकत नाहीत आणि जरी ते देवाची सेवा करत असले, तरी त्यांच्या कल्पना व धारणांमध्ये राहूनच ते अशी सेवा करत असतात आणि देवाच्या इच्छेनुसार सेवा करण्यास ते पूर्णतः असमर्थ असतात. जे पवित्र आत्म्याच्या कार्याचे अनुसरण करू शकत नाहीत, त्यांना देवाची इच्छा समजत नाही व ज्यांना देवाची इच्छा समजत नाही ते देवाची सेवाही करू शकत नाहीत. देवाला त्याच्या हृदयातील इच्छांप्रमाणे असेल अशीच सेवा हवी असते; त्याला कोणत्याही धारणांची आणि देहाची केलेली सेवा नको असते. जर लोकांना पवित्र आत्म्याच्या कार्याच्या पायऱ्यांचे अनुसरण करता येत नसेल, तर ते जुन्या धारणांमध्ये जगत आहेत. अशा लोकांनी केलेली सेवा देवाच्या कार्यात व्यत्यय आणते व त्रासदायक असते आणि ती देवाच्या इच्छेविरुद्ध जाते. अशा प्रकारे, जे देवाच्या मार्गावर वाटचाल करण्यास असमर्थ असतात, ते देवाची सेवा करण्यास असमर्थ असतात; देवाच्या मार्गावर वाटचाल करण्यास असमर्थ असणारे लोक हमखास देवाला विरोध करतात व ते देवाशी जुळवून घ्यायला असमर्थ असतात. “पवित्र आत्म्याच्या कार्याचे अनुसरण करणे” म्हणजे देवाची आजची इच्छा समजून घेणे, देवाच्या आजच्या आवश्यकतांनुसार वर्तन करू शकणे, आजच्या देवाची आज्ञा पाळणे व त्यानुसार वागणे आणि देवाच्या नवीनतम वचनांशी सुसंगत वागण्यात प्रवेश करणे. केवळ अशी व्यक्ती पवित्र आत्म्याच्या कार्याचे अनुसरण करते व ती व्यक्ती पवित्र आत्म्याच्या प्रवाहात येते. असे लोक देवाच्या प्रशंसेस व त्याच्या दर्शनास पात्र ठरण्यास सक्षम असतात, शिवाय देवाच्या नवीनतम कार्यातून त्याची प्रवृत्ती काय आहे हे त्यांना समजते आणि देवाच्या नवीनतम कार्यातून त्यांना मनुष्याच्या धारणा व त्याची अवज्ञा करण्याची वृत्ती तसेच मानवी स्वभाव आणि त्याचे मूलतत्त्व समजून घेता येतो; शिवाय सेवा करत असताना, त्यांना हळूहळू त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणता येतो. केवळ अशा लोकांना देव प्राप्त होऊ शकतो व त्यांनाच सच्चा मार्ग सापडलेला असतो. पवित्र आत्म्याचे कार्य ज्या लोकांना बाजूला सारते, ते लोक मुळात देवाच्या नवीनतम कार्याचे अनुसरण करण्यास असमर्थ असतात आणि ते देवाच्या नवीनतम कार्याविरुद्ध बंड करतात. असे लोक उघडपणे देवाला विरोध करतात, कारण देवाने आता नवीन कार्य केलेले असते व देवाची प्रतिमा त्यांच्या आधीच्या धारणांप्रमाणे राहिलेली नसते—त्याचा परिणाम म्हणजे ते उघडपणे देवाला विरोध करतात आणि देवाच्या कार्याचा न्याय करू लागतात, परिणामी देव त्यांच्यावर संतापतो व त्यांना दूर लोटतो. देवाच्या नवीनतम कार्याबाबतचे ज्ञान प्राप्त करणे, ही सोपी गोष्ट नव्हे, मात्र जर लोकांना देवाच्या कार्याचे आज्ञापालन करण्याची आणि देवाच्या कार्याच्या मार्गावर जाण्याची इच्छा असेल, तर त्यांनाही देवाच्या दर्शनाची संधी मिळू शकेल व त्यांना पवित्र आत्म्याच्या नवीनतम मार्गदर्शनाचीही संधी मिळू शकेल. जाणूनबुजून देवाला विरोध करणाऱ्या लोकांना पवित्र आत्म्याचा प्रकाश किंवा देवाचे मार्गदर्शन मिळत नाही. अशा तऱ्हेने, लोकांना देवाचे नवीनतम कार्य प्राप्त होऊ शकेल की नाही हे केवळ देवाच्या कृपेवर अवलंबून असते, ते त्याचा किती पाठपुरावा करतात त्यावर अवलंबून असते आणि त्यांच्या हेतूंवरदेखील ते अवलंबून असते.

पवित्र आत्म्याची सध्याची वचने जे पाळू शकतात त्यांना आशीर्वाद मिळालेले आहेत. ते लोक यापूर्वी कसे होते किंवा पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये पूर्वी कसे कार्य करत असे याने काही फरक पडत नाही—देवाच्या नवीनतम कार्याची प्राप्ती झालेले जे लोक आहेत ते सर्वाधिक आशीर्वाद मिळालेले आहेत. ज्यांना देवाचे आजचे नवीनतम कार्य समजून घेता आले नाही, त्यांना आता बाहेर काढून टाकण्यात आले आहे. जे नवीन प्रकाश स्वीकारू शकतात आणि ज्यांना देवाचे नवीनतम कार्य माहीत आहे व जे लोक ते कार्य स्वीकारतात केवळ असेच लोक देवाला हवे आहेत. तुम्ही पवित्र कुमारिकेसारखे असले पाहिजे असे का म्हटले जाते? कारण पवित्र कुमारिकेला पवित्र आत्म्याचे कार्य अनुसरता येते आणि तिला नवीन गोष्टी समजून घेता येतात व जुन्या धारणा बाजूला ठेवून देवाच्या आजच्या कार्याचे पालन करता येते. आजचे नवीनतम कार्य स्वीकारणाऱ्या लोकांचा हा समूह देवाने युगांपूर्वीच सुनिश्चित केला होता. हे लोक सर्वात जास्त आशीर्वादित आहेत. तुम्हाला थेट देवाचा आवाज ऐकू येतो आणि देवाचे रूप दिसते. म्हणून सबंध स्वर्गात व पृथ्वीवर मिळून, सर्व युगांमध्ये तुमच्याइतके, या विशिष्ट समूहातील लोकांइतके आशीर्वादित कोणीच नाही. हे सर्व देवाच्या कार्यामुळे, देवाच्या पूर्वयोजनेमुळे, त्याने केलेल्या निवडीमुळे तसेच देवाच्या कृपेने घडले आहे; जर देवाने त्याची वचने व्यक्त केली नसती आणि उच्चारली नसती, तर तुमची स्थिती आजच्यासारखी झाली असती का? म्हणूनच आपण सारे देवाचा गौरव करू या, देवाची स्तुती करू या, कारण तोच तुमचा उद्धार करतो. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर तू निष्क्रीय राहू शकशील का? मग तुझी ताकद जोमाने आणखी वर येऊ शकणार नाही का?

तुम्ही वचनांचा न्याय, ताडण, प्रभाव आणि परिष्करण स्वीकारू शकाल व त्यापेक्षाही जास्त म्हणजे देवाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारू शकाल, या गोष्टी देवाने कित्येक युगांपूर्वीच पूर्वनियोजित केलेल्या होत्या व म्हणूनच जेव्हा तुझे ताडण केले जाते, तेव्हा त्या प्रक्रियेचा जास्त त्रास करून घेऊ नको. तुम्हा लोकांमध्ये जे कार्य घडून आले आहे आणि तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले आहेत ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तसेच कोणीही तुम्हा लोकांना दिले गेलेले सर्व काढून घेऊ शकत नाही. तथाकथित धार्मिक लोकांशी तुमची तुलना होऊ शकत नाही. तुम्ही काही बायबलचे फार मोठे तज्ज्ञ नाही व तुम्हाला पुष्कळ धार्मिक सिद्धांत माहीत आहेत असेही नाही, मात्र देवाने तुमच्यामध्ये कार्य केले आहे. त्यामुळे एवढ्या युगांमध्ये कोणालाही मिळाले नसेल, इतके काही तुम्हाला मिळालेले आहे—तुम्हाला मिळालेला हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही देवाच्या चरणी स्वतःला अधिकच वाहून घेतले पाहिजे. तसेच देवाशी अधिकाधिक एकनिष्ठ राहिले पाहिजे. देव तुझा उद्धार करत असल्यामुळे, तू तुझे प्रयत्न अधिक बळकट केले पाहिजेत आणि देवाने दिलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तुझी पातळी उंचावली पाहिजे. देवाने देऊ केलेल्या ठिकाणी तू पाय रोवून भक्कमपणे उभे राहिले पाहिजे, तुम्ही देवाच्या लोकांपैकी एक होण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, देवाच्या राज्यातून प्रशिक्षण स्वीकारले पाहिजे. देवाने तुम्हाला प्राप्त केले पाहिजे व शेवटी तुम्ही देवाची एक गौरवशाली साक्ष ठरले पाहिजे. या संकल्पांनी तुला झपाटून टाकले आहे का? तुला या संकल्पांनी झपाटून टाकले असेल, तर अखेर देव तुला नक्कीच प्राप्त करेल आणि तू देवाची एक गौरवशाली साक्ष असशील. देवाने तुझी निवड करावी व तू देवाची एक गौरवशाली साक्ष ठरावेस हीच तुझी प्रमुख जबाबदारी आहे, हे तू समजून घेतले पाहिजेस. हीच देवाची इच्छा आहे.

पवित्र आत्म्याची आजची वचने हीच पवित्र आत्म्याच्या कार्याला गती देणारी शक्ती आहे, या काळात मनुष्याला अखंड ज्ञान देणे हाच पवित्र आत्म्याच्या कार्याचा कल आहे. मग पवित्र आत्म्याच्या आजच्या कार्यामधील कल काय आहे? देवाच्या आजच्या कार्यात आणि सामान्य आध्यात्मिक जीवनाच्या मार्गात लोकांना पुढे घेऊन जाणे. सामान्य आध्यात्मिक जीवनात प्रवेश करण्यासाठीच्या अनेक पायऱ्या आहेत:

१. पहिली पायरी ही, की तू देवाच्या वचनांमध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजेस. तुम्ही भूतकाळातील देवाच्या वचनांचा पाठपुरावा करू नये आणि त्यांचा अभ्यास करू नये किंवा आजच्या वचनांशी त्यांची तुलना करू नये. त्याऐवजी, तुम्ही देवाच्या आजच्या वचनांमध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. ज्यांना देवाची वचने, आध्यात्मिक पुस्तके किंवा भूतकाळातल्या उपदेशाच्या इतर नोंदी वाचण्याची अजूनही इच्छा असते व जे पवित्र आत्म्याच्या आजच्या वचनांचे अनुसरण करत नाहीत, असे लोक सर्वात निर्बुद्ध असतात; देवाला अशा लोकांबद्दल तिरस्कार वाटतो. तुला पवित्र आत्म्याचा आजचा प्रकाश स्वीकारायची इच्छा असेल, तर स्वतःला देवाच्या आजच्या वचनांमध्ये पूर्णपणे झोकून दे. तू सर्वप्रथम हीच गोष्ट साध्य करायला हवीस.

२. देवाने आज उच्चारलेल्या वचनांच्या पायावर आधारित तू अशी प्रार्थना केली पाहिजेस, देवाच्या वचनांमध्ये मनोभावे सहभागी झाले पाहिजेस आणि देवाशी नाते जोडले पाहिजेस, तसेच देवासमोर तुझे संकल्प केले पाहिजेस. तुला कोणता दर्जा प्राप्त करण्याचा पाठपुरावा करायचा आहे, ते तू देवाला सांगितले पाहिजेस.

३. पवित्र आत्म्याच्या आजच्या कार्याच्या आधारावर तुम्ही सत्यात निर्णायक प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भूतकाळातल्या कालबाह्य वचनांना आणि सिद्धांतांना धरून राहू नये.

४. पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श करावा आणि देवाच्या वचनांमध्ये प्रवेश करता यावे यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत.

५. पवित्र आत्म्याने आज ज्या मार्गावरून वाटचाल केली आहे, त्या मार्गावर प्रवेश करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.

आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श करावा यासाठी तुम्ही कसे प्रयत्न कराल? देवाच्या सध्याच्या वचनांमध्ये जगणे व देवाच्या आवश्यकतांनुसार प्रार्थना करणे ही त्यासाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे प्रार्थना केल्यास तुला पवित्र आत्म्याचा खात्रीपूर्वक स्पर्श होईल. देवाने आज उच्चारलेल्या वचनांच्या पायामध्ये तू आधार शोधत नसशील, तर मग हे प्रयत्न निष्फळ आहेत. तू प्रार्थना करताना म्हटले पाहिजेस: “हे देवा! मी तुला विरोध करत असतो. मी तुला फार मोठे देणे लागतो; मी इतकी अवज्ञा करत असतो आणि मी कधीही तुला संतुष्ट करू शकत नाही. हे देवा, तूच मला वाचवावे अशी माझी प्रार्थना आहे, मला तुझी सेवा शेवटपर्यंत करण्याची इच्छा आहे, तुझ्यासाठी प्राण देण्याचीही माझी तयारी आहे. तू माझा न्याय व ताडण कर आणि माझी त्याविषयी कोणतीही तक्रार नाही; मी तुला विरोध करतो व मी मरण्यायोग्य आहे, जेणेकरून मा‍झ्या मृत्यूमुळे सर्व लोकांना तुझी नीतिमान प्रवृत्ती दिसून येईल.” तू अशा प्रकारे अंतःकरणापासून प्रार्थना करशील, तेव्हाच देव तुझे ऐकेल आणि तुला मार्ग दाखवेल; पवित्र आत्म्याच्या सध्याच्या वचनांच्या आधारे तू प्रार्थना केली नाहीस, तर तो तुला स्पर्श करण्याची कोणतीही शक्यता नाही. तू देवाच्या इच्छेनुसार व देवाला आज काय करायचे आहे त्यानुसार प्रार्थना केलीस, तर तू म्हणशील: “हे देवा! मला तू माझ्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची आणि त्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीत प्रामाणिक राहण्याची इच्छा आहे व तुझ्या गौरवासाठी माझे सबंध आयुष्य वेचण्याचीही माझी तयारी आहे, जेणेकरून, मी जे काही करेन ते देवाच्या लोकांच्या दर्जाला पोहोचेल. तुझा स्पर्श माझ्या हृदयाला होऊ दे. तुझ्या आत्म्याने मला अखंड ज्ञान प्रदान करत राहावे, अशीच माझी इच्छा आहे ज्यामुळे, मी जे काही करेन त्याने सैतानाला लाज वाटेल आणि अखेर तू मला प्राप्त करशील.” अशा प्रकारे तू प्रार्थना केलीस, देवाच्या इच्छेशी केंद्रित असणारी पद्धत अंगीकारलीस, तर पवित्र आत्मा नक्कीच तुझ्यामध्ये कार्य करेल. तुझ्या प्रार्थनेत किती वचने आहेत, या संख्येने काही फरक पडत नाही—तुला देवाची इच्छा समजते की नाही, हाच येथे कळीचा मुद्दा आहे. तुम्हा सर्वांना पुढीलप्रमाणे अनुभव आला असेल: कधीकधी समूहात प्रार्थना करताना, पवित्र आत्म्याच्या कार्याचा वेग अगदी कळसाला पोहोचतो व प्रत्येकाचेच बळ वाढते. काही लोक प्रार्थना करताना ढसाढसा रडतात आणि अश्रू ढाळतात, देवासमोर त्यांचे मन पश्चात्तापाने भरून येते, काही लोक निर्धार व्यक्त करतात व तशा शपथा घेतात. पवित्र आत्म्याच्या कार्यातून असा परिणाम साध्य करायचा असतो. आज सर्व लोकांनी त्यांचे अंतःकरण देवाच्या वचनांमध्ये पूर्णपणे झोकून देणे अगदी महत्त्वाचे आहे. यापूर्वी बोलल्या गेलेल्या जुन्या वचनांवर लक्ष केंद्रित करू नको; यापूर्वी होऊन गेलेल्या गोष्टीवर तू अजूनही लक्ष केंद्रित करत असशील, तर पवित्र आत्मा तुझ्यामध्ये कार्य करू शकणार नाही. हे किती महत्त्वाचे आहे ते तुला दिसते आहे का?

पवित्र आत्मा आज ज्या मार्गावरून पुढे चालला आहे याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? वर उल्लेख केलेल्या अनेक गोष्टी पवित्र आत्मा आज आणि भविष्यात पूर्ण करणार आहे; या साऱ्या गोष्टी म्हणजेच पवित्र आत्म्याने अनुसरलेला मार्ग आहे व मनुष्याने त्याच मार्गावरून प्रवेश केला पाहिजे. तुम्ही आयुष्यात प्रवेश करताना निदान देवाच्या वचनांमध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे आणि देवाच्या वचनांचा न्याय व ताडण स्वीकारणे तुम्हाला जमले पाहिजे; तुमच्या हृदयाला देवाची आस लागली पाहिजे. तुम्ही सत्यामध्ये खोलवर शिरण्याचा आणि देवाला हव्या असलेल्या उद्दिष्टांकडे जाण्याचा मनोमन प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा ही ताकद तुला झपाटून टाकते, तेव्हा तुला देवाचा स्पर्श झाला असे दिसून येते व तुझे चित्त देवाकडे वळू लागलेले असते.

आयुष्यात प्रवेश करण्याची पहिली पायरी म्हणजे देवाच्या वचनांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देणे, त्याची दुसरी पायरी म्हणजे पवित्र आत्म्याचा स्पर्श स्वीकारणे. पवित्र आत्म्याचा स्पर्श स्वीकारून तुम्हाला कोणता परिणाम साधायचा आहे? अधिक गहिऱ्या सत्याची आस लागणे, ते शोधणे आणि त्याचा कायम पाठपुरावा करणे व सकारात्मक पद्धतीने देवाला सहकार्य करण्यासाठी सक्षम होणे हे आहे. आज तुम्ही देवाला सहकार्य करत आहात, याचाच अर्थ तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या प्रार्थनेला, देवाच्या वचनांशी असलेल्या भावनिक ऐक्याला खास उद्दिष्ट आहे, तुम्ही तुमचे कर्तव्य देवाच्या आवश्यकतांनुसार पार पाडता आहात—केवळ असे करणे म्हणजेच देवाला सहकार्य करणे आहे. तू केवळ देवाने करावे अशा बाता मारत राहिलास, मात्र स्वतः प्रार्थना करणे किंवा सत्याचा शोध घेणे असे काहीही केले नाहीस, तर त्याला खरे सहकार्य म्हणता येईल का? तुमच्या वागण्यात सहकार्याचा जराही मागमूस नसेल आणि तुमच्याकडे उद्दिष्टपूर्ण प्रवेशाच्या प्रशिक्षणाचा अभाव असेल, तर तुम्ही सहकार्य करत नाही. काही लोक म्हणतात: “देवाने काय पूर्वनियोजित करून ठेवले आहे, त्यावरच सर्व काही अवलंबून असते. सर्व काही स्वतः देवानेच घडवून आणलेले असते; देवाने ते केले नाही, तर मनुष्य तरी कसे करू शकेल?” देवाचे कार्य हे सामान्य असून त्यात अलौकिक असे काहीही नाही, केवळ तू कृतीशीलपणे शोध घेतल्यानंतरच पवित्र आत्मा त्याचे कार्य करतो, देव मनुष्यावर कोणतीही बळजबरी करत नाही—तू देवाला कार्य करण्याची संधी द्यायला हवी, तू तसे प्रयत्न केले नाहीस किंवा प्रवेश केला नाहीस व जर तुला मनातून जराही सत्याची आस लागलेली नसेल, तर तू देवाला कार्य करण्याची संधी देत नाहीस. देवाने स्पर्श करावा यासाठी तू कोणता मार्ग शोधणार आहेस? प्रार्थनेचा मार्ग आणि देवाच्या अधिक जवळ जाणे. मात्र देवाने उच्चारलेल्या वचनांच्या पायावरच तो आधारित असला पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट अवश्य लक्षात ठेव. जेव्हा देव तुला वारंवार स्पर्श करतो तेव्हा तू देहाच्या गुलामगिरीत अडकत नाहीस: नवरा, बायको, मुले व पैसा—या गोष्टी तुला बांधून ठेवू शकत नाहीत आणि केवळ सत्याचा पाठपुरावा करणे व देवाच्या चरणी लीन होऊन जीवन व्यतीत करणे एवढीच तुझी एकमेव इच्छा उरते. अशा वेळेस मग तू खऱ्या स्वातंत्र्याच्या वातावरणात राहू लागतोस.

मागील:  ज्यांना देवाचे कार्य माहीत आहे, तेच आज देवाची सेवा करू शकतात

पुढील:  जे देवाच्या इच्छेनुरूप कार्य करतात त्यांना देव परिपूर्ण करतो

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger