परिशिष्ट 3: मनुष्याला केवळ देवाच्या व्यवस्थापनामध्येच वाचवले जाऊ शकते
प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने, देवाचे व्यवस्थापन ही एक अतिशय अपरिचित गोष्ट आहे, कारण लोक त्याच्या व्यवस्थापनाला त्यांच्यापासून पूर्णपणे वेगळे असल्यासारखे समजतात. लोकांना असे वाटते, की देवाचे व्यवस्थापन हे केवळ त्याचे कार्य आहे आणि ते केवळ त्याच्याशी संबंधित आहे—आणि म्हणूनच मानवजात त्याच्या व्यवस्थापनाबाबत उदासीन आहे. अशा प्रकारे, मानवजातीचे तारण अस्पष्ट व अंधुक बनले आहे आणि आता ते रिक्त वक्तृत्वाशिवाय दुसरे काहीही नाही. जरी मनुष्य तारण प्राप्त करण्यासाठी व अद्भुत गंतव्यस्थानात प्रवेश करण्यासाठी देवाचे अनुसरण करत असला, तरीही देव त्याचे कार्य कसे चालवतो याची त्याला चिंता नसते. मनुष्य देवाने काय योजले आहे याकडे लक्ष देत नाही किंवा वाचवले जाण्यासाठी त्याने कोणती भूमिका बजावली पाहिजे याची काळजी घेत नाही. हे खरोखरच दुःखद आहे. मनुष्याचे तारण देवाच्या व्यवस्थापनापासून वेगळे केले जाऊ शकत नाही किंवा त्याच्या योजनेपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. तरीही मनुष्य देवाच्या व्यवस्थापनाबद्दल काहीही विचार करत नाही आणि अशा प्रकारे त्याच्यापासून अधिक दूर होत जातो. यामुळे तारणाच्या प्रश्नाशी अगदी जवळून संबंधित समस्यांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे—जसे की सृष्टी म्हणजे काय, देवावर विश्वास ठेवणे काय आहे, देवाची उपासना कशी करावी इत्यादी—जेणेकरून त्यांना त्याच्या अनुयायांच्या श्रेणीत सामील होता यावे. म्हणूनच, आता आपण देवाच्या व्यवस्थापनावर चर्चा केली पाहिजे, जेणेकरून त्याच्या प्रत्येक अनुयायाला त्याचे अनुसरण करणे व त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे काय हे स्पष्टपणे समजेल. असे केल्याने प्रत्येक व्यक्तीला केवळ आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा संकटे टाळण्याकरिता अथवा इतरांमध्ये उभे राहण्यासाठी देवाचे अनुसरण करण्याऐवजी, त्यांनी चालावयाचा मार्ग अधिक अचूकपणे निवडण्यास मदत होईल.
देवाचे व्यवस्थापन सखोल असले, तरी ते मनुष्याच्या आकलनापलीकडे नाही. याचे कारण असे, की देवाचे सर्व कार्य त्याच्या व्यवस्थापनाशी आणि मानवजातीचे तारण करण्याच्या त्याच्या कार्याशी निगडीत आहे व मानवजातीचे जीवन, जगणे आणि गंतव्यस्थान यांच्याशी संबंधित आहे. देव मनुष्यामध्ये व मनुष्यावर जे कार्य करतो ते अतिशय व्यावहारिक आणि अर्थपूर्ण असते, असे म्हणता येईल. हे मनुष्याला पाहता व अनुभवता येते आणि ते अमूर्त गोष्टीपासून दूर असते. देव जे कार्य करतो ते सर्व स्वीकारण्यास मनुष्य असमर्थ असेल, तर त्याच्या कार्याचे महत्त्व काय? आणि अशा व्यवस्थापनामुळे मनुष्याला तारण कसे प्राप्त होऊ शकते? देवाचे अनुसरण करणारे अनेकजण केवळ आशीर्वाद कसे मिळवायचे किंवा आपत्ती कशी टाळायची याची पर्वा करतात. देवाच्या कार्याचा व व्यवस्थापनाचा उल्लेख होताच ते शांत होतात आणि त्यांचे सर्व स्वारस्य संपुष्टात येते. त्यांना असे वाटते, की अशा नीरस समस्या समजून घेतल्याने त्यांचे जीवन वाढण्यास मदत होणार नाही किंवा कोणताही फायदा होणार नाही. परिणामी, त्यांनी देवाच्या व्यवस्थापनाविषयी ऐकले असले, तरी ते त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. ते स्वीकारण्यासाठी मौल्यवान असे काहीतरी आहे, या दृष्टीने पाहत नाहीत, मग त्यांच्या जीवनाचा एक भाग म्हणून ते स्वीकारणे तर दूरच. अशा लोकांचे देवाचे अनुसरण करण्याचे एकच उद्दिष्ट असते व ते म्हणजे आशीर्वाद प्राप्त करणे. असे लोक या उद्दिष्टाचा थेट समावेश नसलेल्या इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देण्याची तसदी घेत नाही. त्यांच्यासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा अन्य कोणतेही ध्येय योग्य नाही—हे त्यांच्या श्रद्धेचे मूल्य आहे. जर एखाद्या गोष्टीने या उद्दिष्टात योगदान दिले नाही, तर ते त्यापासून पूर्णपणे अविचल राहतात. आज देवाला मानणाऱ्या बहुतेक लोकांची हीच स्थिती आहे. त्यांचे उद्दिष्ट आणि हेतू योग्य वाटतात, कारण त्यांचा देवावर विश्वास असल्याने ते देवासाठी कष्ट करतात, स्वतःला देवासाठी समर्पित करतात व त्यांचे कर्तव्य बजावतात. ते त्यांचे तारुण्य सोडून देतात, कुटुंब आणि व्यवसाय यांचा त्याग करतात व घरापासून दूर स्वतःमध्ये व्यस्त राहून कित्येक वर्षे घालवतात. त्यांच्या अंतिम ध्येयासाठी, ते त्यांच्या आवडीनिवडी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि ते शोधत असलेली दिशादेखील बदलतात; तरीही ते देवावरील त्यांच्या विश्वासाचे उद्दिष्ट बदलू शकत नाहीत. ते स्वतःच्या आदर्शांच्या व्यवस्थापनासाठी धावत असतात; रस्ता कितीही लांब असला व वाटेत कितीही अडचणी आणि अडथळे आले, तरी ते चिकाटीने पुढे जातात व मृत्यूला घाबरत नाहीत. अशी कोणती शक्ती त्यांना स्वतःला समर्पित करत राहण्यास भाग पाडते? ही त्यांची सदसद्विवेकबुद्धी आहे का? हे त्यांचे महान आणि उदात्त चरित्र आहे का? हा त्यांचा वाईट शक्तींशी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार आहे का? फळाची अपेक्षा न धरता देवाची साक्ष देणे ही त्यांची श्रद्धा आहे का? देवाची इच्छा साध्य करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार असणे ही त्यांची निष्ठा आहे का? की अमर्याद वैयक्तिक मागण्या नेहमी सोडून देणे हा त्यांचा भक्तीचा आत्मा आहे? ज्याला देवाच्या व्यवस्थापनाचे कार्य कधीच समजले नाही अशा व्यक्तीसाठी अद्याप इतके देणे हा निव्वळ चमत्कार आहे! तूर्तास या लोकांनी किती दिले याची चर्चा करू नये. तथापि, त्यांचे वर्तन आमच्या विश्लेषणास अत्यंत योग्य आहे. त्यांच्याशी इतक्या जवळून निगडीत असलेल्या फायद्यांव्यतिरिक्त, देवाला कधीच समजून घेत नसलेले लोक त्याच्यासाठी इतके दान का करतील याची आणखी काही कारणे असू शकतात का? यामध्ये, आम्हाला एक पूर्वी अज्ञात असलेली समस्या आढळते: मनुष्याचा देवाशी असलेला संबंध हा केवळ नग्न स्वार्थ आहे. आशीर्वाद घेणारा आणि देणारा यांच्यातील हा संबंध आहे. स्पष्टपणे सांगायचे तर, हे कर्मचारी व नियोक्ता यांच्यातील संबंधांसारखे आहे. कर्मचारी केवळ नियोक्त्याने दिलेले बक्षीस मिळवण्यासाठी काम करतो. अशा नात्यात स्नेह नसतो, फक्त व्यवहार असतो. यात प्रेम करणे किंवा प्रेम मिळवणे नसते, फक्त दान आणि दया असते. कोणतीही समज नसते, फक्त दडपलेला राग व फसवणूक असते. कोणतीही जवळीक नसते, फक्त अभेद्य दरी असते. आता गोष्टी इथपर्यंत पोहोचल्या आहेत, त्यामुळे ही परिस्थिती कोण पालटवू शकेल? आणि हे नाते किती गंभीर झाले आहे हे समजून घेण्यास किती लोक सक्षम आहेत? माझा विश्वास आहे, की जेव्हा लोक आशीर्वाद मिळाल्याच्या आनंदात मग्न होतात, तेव्हा कोणीही कल्पना करू शकत नाही, की देवाशी असलेले नाते किती लाजिरवाणे आणि बेढब आहे.
मानवजातीच्या देवावरील श्रद्धेबाबतची सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे मनुष्य देवाच्या कार्यामध्ये स्वतःचे व्यवस्थापन करतो आणि तरीही देवाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाही. मनुष्याचे सर्वात मोठे अपयश हे आहे, की देवाच्या अधीन होऊन त्याची उपासना करण्याचा प्रयत्न करत असताना, मनुष्य स्वतःचे आदर्श गंतव्यस्थान कसे तयार करतो व सर्वात मोठा आशीर्वाद आणि सर्वोत्तम गंतव्यस्थान कसे मिळवायचे याचे षडयंत्र रचतो. ते किती दयनीय, घृणास्पद व तिरस्करणीय आहेत हे जरी त्यांना समजले, तरी किती जण त्यांचे आदर्श आणि आशा सोडू शकतात? आणि कोण स्वतःची पावले थांबवू शकतात व फक्त स्वतःचा विचार करणे थांबवू शकतात? देवाला त्याचे व्यवस्थापन पूर्ण करण्यासाठी त्याच्याशी जवळून सहकार्य करणाऱ्यांची गरज आहे. त्याला अशा लोकांची गरज आहे जे त्याचे संपूर्ण मन आणि शरीर त्याच्या व्यवस्थापनाच्या कार्यासाठी समर्पित करून त्याच्या अधीन होतील. त्याला अशा लोकांची गरज नाही जे दररोज त्याच्याकडे भीक मागण्यासाठी हात पसरतात, मग जे थोडेफारच देतात आणि नंतर बक्षीस मिळण्याची प्रतीक्षा करतात, त्यांची त्याला गरज असणे तर दूरच. जे तुटपुंजे योगदान देतात व नंतर त्यांच्या गौरवावर विसावतात, त्यांना देव तुच्छ मानतो. तो त्या भावनाशून्य लोकांचा तिरस्कार करतो जे त्याच्या व्यवस्थापनाच्या कार्यावर राग व्यक्त करतात व फक्त स्वर्गात जाऊन आशीर्वाद मिळवण्याबद्दल बोलू इच्छितात. मानवजातीचे रक्षण करण्यासाठी तो करत असलेल्या कार्यामुळे प्राप्त झालेल्या संधीचा फायदा घेणाऱ्यांबद्दल त्याला आणखीनच तिरस्कार आहे. कारण देव त्याच्या व्यवस्थापनाच्या कार्यातून काय साध्य करू इच्छितो आणि मिळवू इच्छितो याकडे या लोकांनी कधीही लक्ष दिले नाही. त्यांना फक्त देवाच्या कार्यामुळे मिळालेल्या संधीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कसा उपयोग करता येईल याची काळजी असते. त्यांना देवाच्या हृदयाची पर्वा नाही, ते त्यांच्या स्वतःच्या भविष्यात व नशिबाचा विचार करण्यात पूर्णपणेव्यग्र असतात. ज्यांना देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्याचा राग आहे आणि देव मानवजातीला कसा वाचवतो याबद्दल व त्याच्या इच्छेबद्दल जराही स्वारस्य नाही, असे लोक देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्यापासून अलिप्त असलेल्या मार्गाने स्वतःला जे हवे तेच करतात. त्यांचे वर्तन देवाने लक्षात ठेवलेले नाही किंवा मंजूर केले नाही—देवाने त्यांच्याकडे कृपेच्या दृष्टीने पाहणे तर दूरच.
ब्रह्मांड आणि आकाशाच्या विशालतेमध्ये, असंख्य प्राणी जगतात व पुनरुत्पादन करतात, जीवनाच्या चक्रीय नियमाचे पालन करतात आणि एका स्थिर नियमाचे पालन करतात. जे मरतात ते त्यांच्यासोबत जिवंत लोकांच्या कथा घेऊन जातात व जे जगतात ते मरून गेलेल्यांच्या त्याच दुःखद इतिहासाची पुनरावृत्ती करतात. आणि म्हणूनच, मानवजात स्वतःला विचारल्याशिवाय राहू शकत नाही: आपण का जगतो? आणि का मरतो? या जगाला कोण आज्ञा देतो? आणि ही मानवजात कोणी निर्माण केली? मानवजातीला खरोखरच निसर्ग मातेने निर्माण केले होते का? मानवजात खरोखरच स्वतःच्या नशिबावर नियंत्रण ठेवते का? … हे असे प्रश्न आहेत जे मानवजातीने हजारो वर्षांपासून अविरतपणे विचारले आहे. दुर्दैवाने, मनुष्याला या प्रश्नांचे जितके वेड लागले आहे, तितकीच त्याची विज्ञानाची तहानही वाढली आहे. विज्ञान देहाला अल्पसंतुष्टता व तात्पुरता उपभोग देते, परंतु मनुष्याला एकाकीपणा, एकटेपणा आणि त्याच्या आत्म्यामध्ये खोलवर लपलेली दहशत व असहायता यापासून मुक्त करण्यासाठी ते पुरेसे नाही. मानवजात केवळ अशा वैज्ञानिक ज्ञानाचा वापर करते जे मनुष्य त्याच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि त्याच्या मेंदूने समजू शकतो, जेणेकरून त्याच्या हृदयाला भूल देऊ शकतो. तरीही असे वैज्ञानिक ज्ञान मानवजातीला गूढ शोधण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे नाही. विश्वाचा आणि सर्व गोष्टींचा सार्वभौम कोण आहे हे मानवजातीला माहीतच नाही, मानवजातीची सुरुवात व भविष्य याबद्दल माहीत असणे तर दूरच. मानवजात केवळ या नियमशास्त्रामध्ये सक्तीने जगते. यातून कोणीही सुटू शकत नाही आणि कोणीही ते बदलू शकत नाही, कारण सर्व गोष्टींमध्ये व स्वर्गात तो एकच आहे जो अनंतकाळपासून अनंतकाळपर्यंत सर्व गोष्टींवर प्रभुत्व धारण करतो. तो असा आहे ज्याला मनुष्याने कधीही पाहिले नाही, ज्याला मानवजातीने कधीही ओळखले नाही, ज्याच्या अस्तित्वावर मानवजातीने कधीही विश्वास ठेवला नाही—तरीही हा तोच आहे ज्याने मानवजातीच्या पूर्वजांमध्ये प्राण फुंकले व मानवजातीला जीवन दिले. तोच मानवजातीला पुरवतो आणि तिचे पोषण करतो, त्याला अस्तित्वात राहू देतो; आणि तोच आहे ज्याने आजपर्यंत मानवजातीला मार्गदर्शन केले आहे. शिवाय, त्याच्यावर, केवळ त्याच्यावर मानवजात जगण्यासाठी अवलंबून आहे. तो सर्व गोष्टींवर सार्वभौमत्व धारण करतो व विश्वातील सर्व सजीवांवर राज्य करतो. तो चार ऋतूंना आज्ञा देतो आणि तोच वारा, दंव, बर्फ व पाऊस यांना बोलावतो. तो मानवजातीला सूर्यप्रकाश देतो आणि रात्रीची सुरुवात करतो. त्यानेच आकाश व पृथ्वीची रचना केली आणि मनुष्याला पर्वत, सरोवरे, नद्या व त्यांच्यातील सर्व सजीव सृष्टी प्रदान केली. त्याची कृत्ये सर्वव्यापी आहेत, त्याची शक्ती सर्वव्यापी आहे, त्याचे शहाणपण सर्वव्यापी आहे आणि त्याचा अधिकार सर्वव्यापी आहे. यातील प्रत्येक नियमशास्त्र व नियम हे त्याच्या कृत्यांचे मूर्त स्वरूप आहे आणि प्रत्येक कृत्य त्याचे शहाणपण व अधिकार प्रकट करते. त्याच्या सार्वभौमत्वापासून स्वतःला कोण मुक्त करू शकेल? आणि त्याच्या रचनांपासून स्वतःला कोण मुक्त करू शकेल? सर्व गोष्टी त्याच्या नजरेखाली अस्तित्वात आहेत व शिवाय, सर्व गोष्टी त्याच्या सार्वभौमत्वांतर्गत राहतात. त्याची कृत्ये आणि त्याचे सामर्थ्य यामुळे तो खरोखरच अस्तित्वात आहे व सर्व गोष्टींवर त्याचे सार्वभौमत्व आहे हे मान्य करण्याशिवाय मानवजातीला पर्याय नाही. या मानवजातीसाठी त्याच्याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट विश्वाला हुकूम देऊ शकत नाही, अविरतपणे प्रदान करू शकणे तर दूरच. तू देवाची कृत्ये ओळखण्यास सक्षम आहेस की नाही आणि तुझा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे की नाही याची पर्वा न करता, तुझे नशीब देवाने ठरवले आहे यात काही शंका नाही व देव नेहमीच सर्व गोष्टींवर सार्वभौमत्व ठेवेल यात शंका नाही. त्याचे अस्तित्व आणि अधिकार हे मनुष्याने ओळखले व त्याला समजले की नाही यावरून ठरत नाही. फक्त त्यालाच मनुष्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य माहीत आहे व तोच मानवजातीचे भवितव्य ठरवू शकतो. तू ही वस्तुस्थिती स्वीकारण्यास सक्षम आहेस की नाही याची पर्वा न करता, मानवजातीने या सर्व गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यास वेळ लागणार नाही आणि हे सत्य देव लवकरच समोर आणेल. मानवजात देवाच्या नजरेखाली जगते व मरते. मनुष्य देवाच्या व्यवस्थापनासाठी जगतो आणि जेव्हा त्याचे डोळे अखेरचे बंद होतात, तेव्हा या व्यवस्थापनासाठीच ते बंद होतात. मनुष्य वारंवार येतो व परत जातो आणि हे सुरू राहते. अपवाद न करता, हे सर्व देवाच्या सार्वभौमत्वाचा व त्याच्या रचनेचा भाग आहे. देवाचे व्यवस्थापन कधीही थांबलेले नाही; ते सतत प्रगती करत आहे. तो मानवजातीला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल, त्याच्या सार्वभौमत्वाबाबत विश्वास निर्माण करेल, त्याच्या कृत्यांची जाणीव करून देईल आणि त्याच्या राज्यात परत येईल. ही त्याची योजना आहे व हजारो वर्षांपासून तो व्यवस्थापित करत असलेले कार्य आहे.
देवाच्या व्यवस्थापनाचे कार्य जगाच्या निर्मितीपासून सुरू झाले आणि मनुष्य हा या कार्याचा गाभा आहे. असे म्हणता येईल, की देवाने मनुष्यासाठीच सर्व गोष्टींची निर्मिती केली आहे. कारण त्याच्या व्यवस्थापनाचे कार्य हजारो वर्षांचे आहे व ते केवळ काही मिनिटांच्या किंवा सेकंदांच्या अवधीत अथवा पापणी लवेपर्यंत किंवा एक अथवा दोन वर्षांमध्ये पूर्ण होत नाही, त्याला मानवजातीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या आणखी गोष्टी निर्माण करायच्या होत्या, जसे की सूर्य, चंद्र, सर्व प्रकारचे सजीव प्राणी, अन्न आणि आतिथ्यशील वातावरण. ही देवाच्या व्यवस्थापनाची सुरुवात होती.
त्यानंतर, देवाने मानवजातीला सैतानाच्या स्वाधीन केले आणि मनुष्य सैतानाच्या अधिपत्याखाली राहिला, ज्यामुळे हळूहळू देवाच्या पहिल्या युगाच्या कार्याची सुरुवात झाली: नियमशास्त्राच्या युगाची कथा…. नियमशास्त्राच्या युगातकित्येक हजार वर्षांच्या कालावधीत, मानवजातीला नियमशास्त्राच्या युगाच्या मार्गदर्शनाची सवय झाली व त्यांनी ते गृहीत धरले. हळूहळू मनुष्याने देवाचे संगोपन सोडले. आणि म्हणूनच, नियमशास्त्राचे पालन करताना, त्यांनी मूर्तिपूजा केली व दुष्कृत्येदेखील केली. ते यहोवाच्या संरक्षणापासून वंचित होते आणि मंदिरातील वेदीसमोर त्यांचे जीवन जगत होते. खरे तर, देवाच्या कार्याने त्यांना खूप पूर्वी सोडले होते व जरी इस्रायली लोक अजूनही नियमशास्त्राला चिकटून राहिले होते आणि यहोवाचे नाव घेत होते व अभिमानाने विश्वास ठेवत होते, की केवळ तेच यहोवाचे लोक आहेत आणि यहोवाचे निवडलेले लोक आहेत, तरीही देवाच्या गौरवाने त्यांचा शांतपणे त्याग केला होता …
जेव्हा देव त्याचे कार्य करतो, तेव्हा तो नेहमी शांतपणे एक ठिकाण सोडतो आणि गुपचूप दुसऱ्या ठिकाणी नवीन कार्य करतो. सुन्न झालेल्या लोकांना हे अविश्वसनीय वाटते. लोकांनी नेहमी जुन्या गोष्टींची कदर केली आहे व नवीन, अपरिचित गोष्टींकडे शत्रूत्वाने पाहिले आहे किंवा उपद्रव म्हणून पाहिले आहे. आणि म्हणूनच, देव जे काही नवीन कार्य करतो, सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत, मनुष्याला त्या सर्व गोष्टी अगदी शेवटी माहीत होतात.
नेहमीप्रमाणेच, नियमशास्त्राच्या युगात यहोवाच्या कार्यानंतर, देवाने दुसऱ्या टप्प्यातील त्याचे नवीन कार्य सुरू केले: देह धारण करून—दहा, वीस वर्षे मनुष्य म्हणून देहधारण करणे—आणि आस्तिकांमध्ये बोलणे व त्याचे कार्य करणे. तरीही कोणत्याही अपवादाविना, कोणालाही हे माहीत नव्हते आणि प्रभू येशूला वधस्तंभावर खिळले गेल्यानंतर व पुनरुत्थान झाल्यानंतर केवळ काही लोकांनी तो देहधारी देव होता हे मान्य केले. समस्या अशी होती, की पौल नावाचा एक मनुष्य प्रकट झाला, ज्याने स्वतः देवाशी प्राणघातक वैर केले. त्याला मारून टाकल्यानंतर तो प्रेषित बनल्यानंतरही, पौलाने त्याचा जुना स्वभाव बदलला नाही आणि तो देवाच्या विरोधाच्या मार्गावर चालत राहिला. तो कार्य करत असताना, पौलाने अनेक पत्ररूपी साहित्यकृती लिहिल्या; दुर्दैवाने, नंतरच्या पिढ्यांनी त्याच्या पत्ररूपी साहित्यकृतींचा देवाची वचने म्हणून आस्वाद घेतला व ते अगदी नवीन करारातही समाविष्ट केले गेले आणि देवाने उच्चारलेल्या वचनांशी एकत्रित केले गेले. पवित्र ग्रंथाच्या आगमनापासून हे अत्यंत अपमानास्पद आहे! आणि ही चूक मनुष्याच्या पराकोटीच्या मूर्खपणामुळे झाली नाही का? त्यांना फारसे माहीत नव्हते, की कृपेच्या युगातील देवाच्या कार्याच्या नोंदींमध्ये, मनुष्याच्या पत्ररूपी साहित्यकृती किंवा आध्यात्मिक लिखाण केवळ देवाच्या कार्याची व वचनांची तोतयागिरी करण्यासाठी असू नये. पण हे विषयांतर आहे, म्हणून आपल्या मूळ विषयाकडे वळू या. देवाच्या कार्याचा दुसरा टप्पा पूर्ण होताच—वधस्तंभावर खिळल्यानंतर—मनुष्याला पापातून मुक्त करण्याचे देवाचे कार्य (म्हणजे, सैतानाच्या हातातून मनुष्याला पुनर्प्राप्त करण्याचे) पूर्ण झाले. आणि म्हणूनच, त्या क्षणापासून, मानवजातीला फक्त प्रभू येशूला तारणहार म्हणून स्वीकारायचे होते व त्याच्या पापांची क्षमा केली गेली असती. ढोबळमानाने बोलायचे झाले तर, मनुष्याची पापे यापुढे त्याचे तारण प्राप्त करण्यात आणि देवासमोर येण्यात अडथळा ठरली नसती व सैतानाने मनुष्यावर आरोप लावण्यासाठी कारण ठरले नसते. कारण देवानेच खरे कार्य केले होते, तो पापी देहाचे प्रतिरूप आणि पूर्वाभास बनला होता व स्वतः देव पापार्पण होता. अशा प्रकारे, मनुष्य वधस्तंभावरून खाली आला आणि या पापी देहाशी समानता असलेल्या देवाच्या देहाद्वारे त्याची सुटका झाली व त्याला वाचवले गेले. आणि म्हणूनच, सैतानाने बंदिवान केल्यावर, मनुष्य देवासमोर त्याचे तारण स्वीकारण्याच्या एक पाऊल जवळ आला. अर्थात, कार्याचा हा टप्पा नियमशास्त्राच्या युगात देवाच्या व्यवस्थापनापेक्षा अधिक सखोल व अधिक विकसित होता.
देवाचे व्यवस्थापन असे आहे: मानवजातीला सैतानाच्या स्वाधीन करणे—देव काय आहे, निर्माणकर्ता काय आहे, देवाची उपासना कशी करावी किंवा देवाच्या अधीन होणे का आवश्यक आहे हे माहीत नसलेल्या मानवजातीला सैतानाच्या स्वाधीन करणे—आणि सैतानाला त्याला भ्रष्ट करू देणे. टप्प्याटप्प्याने, जेव्हा मनुष्य पूर्णपणे देवाची उपासना करतो व सैतानाला नाकारतो, तेव्हा देव नंतर मनुष्याला सैतानाच्या हातातून पुनर्प्राप्त करतो. हे देवाचे व्यवस्थापन आहे. ही पौराणिक कथा वाटू शकते आणि ती गोंधळात टाकणारी वाटू शकते. लोकांना ही पौराणिक कथा आहे असे वाटते, कारण गेल्या हजारो वर्षांत मनुष्याच्या बाबतीत किती घडले आहे याची त्यांना कल्पना नाही, ब्रह्मांड व आकाशात किती कथा घडल्या हे त्यांना फारच कमी माहिती आहे. आणि शिवाय, त्याचे कारण हे आहे, की ते भौतिक जगाच्या पलीकडे अस्तित्वात असलेल्या अधिक विस्मयकारक, अधिक भय निर्माण करणाऱ्या जगाला समजून घेऊ शकत नाहीत, जे त्यांचे नश्वर डोळे त्यांना पाहण्यापासून रोखतात. हे मनुष्याला अनाकलनीय वाटते, कारण मनुष्याला देवाच्या मानवजातीच्या तारणाचे महत्त्व किंवा त्याच्या व्यवस्थापनाच्या कार्याचे महत्त्व समजलेले नाही व शेवटी मानवजात कशी असावी याबद्दलची देवाची इच्छा मनुष्याला समजत नाही. सैतानाने बिलकुल भ्रष्ट न केलेल्या आदाम आणि हव्वा यांच्यासारखे ते असावे का? नाही! देवाच्या व्यवस्थापनाचा उद्देश देवाची उपासना करणाऱ्या व त्याच्या अधीन असलेल्या लोकांचा समूह प्राप्त करणे हा आहे. या लोकांना सैतानाने भ्रष्ट केले असले, तरी ते आता सैतानाला त्यांचा बाप म्हणून पाहत नाहीत; ते सैतानाचा तिरस्करणीय चेहरा ओळखतात आणि त्याला नाकारतात व ते देवाचा न्याय आणि ताडण स्वीकारण्यासाठी देवासमोर येतात. काय वाईट आहे व ते पवित्र असलेल्या गोष्टींपेक्षा कसे वेगळे आहे हे त्यांना कळते आणि देवाची महानता व सैतानाच्या दुष्ट गोष्टी ते ओळखतात. अशी मानवजात यापुढे सैतानासाठी काम करणार नाही किंवा सैतानाची उपासना करणार नाही अथवा सैतानाला पवित्र ठिकाणी ठेवणार नाही. याचे कारण असे, की ते अशा लोकांचा समूह आहेत ज्यांना खरोखर देवाने प्राप्त केले आहे. मानवजातीचे व्यवस्थापन करण्याच्या देवाच्या कार्याचे हे महत्त्व आहे. या काळातील देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्यादरम्यान, मानवजात हा सैतानाचा भ्रष्टाचार आणि देवाचे तारण या दोन्हींचा उद्देश आहे व मनुष्य हे असे उत्पादन आहे ज्यासाठी देव आणि सैतान लढत आहेत. जसजसे देव त्याचे कार्य करतो, तो हळूहळू मनुष्याला सैतानाच्या हातातून सोडवत आहे व त्यामुळे मनुष्य देवाच्या जवळ येतो …
आणि मग राज्याचे युग आले, जो कार्याचा अधिक व्यावहारिक टप्पा आहे व तरीही तो स्वीकारणे मनुष्यासाठी सर्वात कठीण आहे. कारण मनुष्य जितका देवाच्या जवळ येतो तितकाच देवाचा दंड मनुष्याच्या जवळ येतो आणि देवाचा चेहरा मनुष्यासमोर अधिक स्पष्टपणे प्रकट होतो. मानवजातीच्या सुटकेनंतर, मनुष्य अधिकृतपणे देवाच्या कुटुंबाकडे परत येतो. मनुष्याला वाटले, की आता आनंद घेण्याची वेळ आली आहे, तरीही देवाने त्याच्यावर पूर्ण बळाने हल्ला केला आहे, ज्याचा कोणीही कधीही विचार करू शकत नाही: असे दिसून आले, की हा बाप्तिस्मा आहे ज्याचा देवाच्या लोकांनी “आनंद” घ्यायचा असतो. अशा वागणूकी अंतर्गत, लोकांकडे थांबून स्वतःशी विचार करण्याशिवाय पर्याय नसतो, “मी अनेक वर्षे हरवलेले कोकरू आहे, ज्याला परत प्राप्त करण्यासाठी देवाने खूप काही खर्चले आहे, तरीही देव माझ्याशी असे का वागतो? माझ्यावर हसण्याची व मला उघड करण्याची देवाची ही पद्धत आहे का? …” अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर, परिष्करण व ताडणाचा त्रास सहन करून, मनुष्य सर्व परिस्थितींनी झोडपून गेला आहे. जरी मनुष्याने भूतकाळातील “वैभव” आणि “रोमांच” गमावले असले, तरी त्याला नकळत मानवी आचरणाची तत्त्वे समजली आहेत व मानवजातीला वाचवण्यासाठी देवाचे अनेक वर्षांचे समर्पणही त्याने ओळखले आहे. मनुष्य हळूहळू स्वतःच्या रानटीपणाचा तिरस्कार करू लागतो. तो किती क्रूर आहे, देवाबद्दलचे त्याचे सर्व गैरसमज आणि त्याने त्याच्याकडून केलेल्या अवास्तव मागण्यांचा त्याला तिरस्कार वाटू लागतो. घड्याळाचे काटे उलट फिरवता येत नाहीत. भूतकाळातील घटना मनुष्याच्या खेदजनक आठवणी बनतात व देवाची वचने आणि प्रेम मनुष्याच्या नवीन जीवनात प्रेरक शक्ती बनतात. मनुष्याच्या जखमा दिवसागणिक भरून येतात, त्याची शक्ती परत येते व तो उभा राहतो आणि सर्वशक्तिमान देवाच्या चेहऱ्याकडे पाहतो … तेव्हा तो नेहमीच माझ्या पाठीशी आहे व त्याचे हास्य आणि त्याचा सुंदर चेहरा अजूनही खूप विस्मयकारक आहे, याचीच जाणीव त्याला होते. त्याच्या हृदयात त्याने निर्माण केलेल्या मानवजातीबद्दल अजूनही काळजी आहे आणि त्याचे हात आजही तितकेच उबदार व सामर्थ्यवान आहेत जसे ते सुरुवातीच्या काळात होते. जणू काही मनुष्य एदेन बागेत परतला आहे, पण आता मनुष्य सर्पाच्या लोभांचे ऐकत नाही आणि आता यहोवाच्या चेहऱ्यापासून दूर जात नाही. मनुष्य देवासमोर गुडघे टेकतो, देवाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहतो व त्याचे सर्वात मौल्यवान बलिदान अर्पण करतो—हे देवा! माझ्या प्रभू, माझ्या देवा!
देवाचे प्रेम आणि करुणा त्याच्या व्यवस्थापनाच्या कार्याच्या प्रत्येक तपशिलावर पसरते व लोक देवाचे चांगले हेतू समजून घेण्यास सक्षम आहेत की नाही याची पर्वा न करता, तो अजूनही अथकपणे कार्य करत आहे, जे पूर्ण करण्याचे त्याने ठरवले आहे. देवाच्या व्यवस्थापनाबद्दल लोकांना कितीही माहिती असली, तरीही देवाच्या कार्यामुळे मनुष्याला मिळणारी मदत आणि फायदे प्रत्येकजण ओळखून आहे. कदाचित, या दिवशी, तुला देवाने प्रदान केलेले प्रेम किंवा जीवन जाणवले नसेल, परंतु जर तू देवाचा त्याग करत नाहीस व सत्याचा पाठपुरावा करण्याचा निर्धार सोडत नाहीस, तर असा दिवस येईल जेव्हा देवाचे स्मितहास्य तुझ्या समोर प्रकट केले जाईल. कारण देवाच्या व्यवस्थापनाच्या कार्याचे उद्दिष्ट सैतानाच्या अधिपत्याखाली असलेल्या लोकांना पुनर्प्राप्त करणे हे आहे, सैतानाने भ्रष्ट झालेल्या आणि देवाला विरोध करणाऱ्या लोकांना सोडून देणे हे नाही.
२३ सप्टेंबर २००५