तू ख्रिस्ताशी अनुरूप होण्याचा मार्ग शोधला पाहिजेस
मी मनुष्यासाठी खूप कार्य केले आहे. त्या काळात मी अनेक वचनेही व्यक्त केली आहेत. ही सर्व वचने मनुष्याच्या उद्धारासाठी आहेत आणि मनुष्य माझ्याशी अनुरूप व्हावा म्हणून मी ती व्यक्त केली आहेत. तथापि, पृथ्वीवर माझ्याशी अनुरूप असलेली खूपच कमी माणसे मला प्राप्त झालेली आहे. म्हणूनच मी म्हणतो, की मनुष्य माझ्या वचनांची कदर करत नाही—कारण मनुष्य माझ्याशी अनुरूप झालेला नाही. अशा प्रकारे, मी जे कार्य करतो ते केवळ मनुष्याला माझी उपासना करता यावी यासाठी नव्हे, तर त्याहून महत्त्वाचे म्हणजे मनुष्य माझ्याशी अनुरूप व्हावा यासाठी ते असते. मनुष्य भ्रष्ट झाला आहे व तो सैतानाच्या जाळ्यात अडकला आहे. सर्व लोक देहाच्या सापळ्यात, स्वार्थी वासनांमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांच्यापैकी एकही माझ्याशी अनुरूप नाही. असे लोक आहेत जे म्हणतात, की ते माझ्याशी अनुरूप आहेत, परंतु असे लोक सर्व संदिग्ध आदर्शांची पूजा करतात. जरी ते माझे नाव पवित्र मानत असले, तरी प्रत्यक्षात ते माझ्या शिकवणीच्या विरोधातील मार्गावरच वाटचाल करत असतात. त्यांच्या वचनांत आत्मप्रौढी व अनाठायी आत्मविश्वास भरलेला असतो. कारण मूलतः ते सर्व माझ्या विरुद्ध आहेत आणि माझ्याशी अनुरूप नाहीत. दररोज, ते बायबलमध्ये माझा शोध घेतात व दिसेल तो कुठलाही “योग्य” परिच्छेद शोधून तो सतत वाचतात आणि शास्त्रवचन म्हणून त्याचे पठण करतात. माझ्याशी अनुरूप कसे असावे व माझ्याविरुद्ध असण्याचा अर्थ कोणता, हे त्यांना माहीत नाही. काही समजून न घेता ते केवळ धर्मग्रंथ वाचत असतात. त्यांनी आजवर कधीही न पाहिलेल्या आणि पाहण्यास असमर्थ असलेल्या एका संदिग्ध रूपातील देवाला बायबलमध्ये बंदिस्त केले आहे. असे लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या देवाला दर्शनासाठी बाहेर काढतात. बायबलमध्ये जेवढे म्हटले आहे, तेवढेच माझे अस्तित्व आहे, यावरच त्यांचा विश्वास असतो. ते माझी बायबलशी बरोबरी करतात; जणू बायबलशिवाय मी नाही व माझ्याशिवाय बायबल नाही. ते माझ्या अस्तित्वाकडे किंवा कृतींकडे लक्ष न देता त्याऐवजी पवित्र शास्त्रांत लिहिलेल्या प्रत्येक वचनाकडे कमालीचे आणि विशेष लक्ष देतात. जर पवित्र शास्त्रात सांगितलेले नसेल, तर मला इच्छा असलेली कृतीही मी करू नये, असेही अनेकांना वाटते. ते शास्त्रवचनांना फारच महत्त्व देतात. ते वचन व अभिव्यक्तीला खूपच महत्त्व देतात, असेही म्हणता येईल. ते इतके, की बायबलमधील वचनांचा आधार घेऊन मी बोललेला प्रत्येक शब्द ते तोलून-मापून पाहातात आणि माझी निंदा करतात. ते माझ्याशी किंवा सत्याशी अनुरुपतेचे नाते कशा प्रकारे जोडता येईल अशा मार्गाचा शोध घेत नाहीत, तर बायबलमधील वचनांशी कसे जुळवून घेता येईल असा मार्ग शोधतात. बायबलशी मिळतीजुळती नाही ती कोणतीही गोष्ट हे माझे कार्य नाही, असा त्यांचा दृढ विश्वास आहे व याला एकही अपवाद नाही. मग असे लोक परुशांचेच कर्तव्यदक्ष वंशज म्हणता येणार नाहीत का? यहुदी परुशांनी येशूला दोषी ठरवण्यासाठी मोशेच्या नियमशास्त्राचा वापर केला. त्यांनी त्या काळातील येशूशी एकरूप होण्यासाठीचा मार्ग शोधला नाही, परंतु शास्त्रवचनातल्या प्रत्येक अक्षर अन् अक्षराचे काटेकोरपणे पालन केले होते. ते इतक्या प्रमाणात होते की—येशूवर जुन्या कराराच्या नियमशास्त्राचे पालन न करण्याचा आणि मसिहा नसल्याचा आरोप करून, अखेर निष्पाप येशूला वधस्तंभावर खिळले. त्यांचे मुद्दा नेमका काय होता? त्यांनी सत्याशी अनुरूपतेचा मार्ग शोधलाच नाही असे ते नव्हते का? त्यांनी माझ्या इच्छेकडे किंवा माझ्या कार्याच्या टप्प्यांकडे व पद्धतींकडे लक्ष न देता, बायबलमधील प्रत्येक शब्दाचे अगदी शब्दशः पालन केले. ते सत्य शोधणारे नव्ह, तर केवळ वचनांना कठोरपणे चिकटून राहणारे लोक होते. ते देवावर विश्वास ठेवणारे नव्हे, तर बायबलवरच विश्वास ठेवणारे लोक होते. मूलतः ते बायबलचे राखणदार होते. बायबलच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, बायबलचा सन्मान राखण्यासाठी आणि बायबलच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी दयाळू येशूला अगदी वधस्तंभावर खिळण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांनी केवळ बायबलच्या रक्षणासाठी व लोकांच्या हृदयात बायबलमधील शब्दनशब्दाचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी हे केले होते. त्यामुळे त्यांनी पवित्र शास्त्राच्या सिद्धांतानुसार वर्तन नसलेल्या येशूला मृत्यूदंड देण्यासाठी त्यांचे भवितव्य आणि पापार्पण यांचा त्याग करणे पसंत केले. ते सर्वजण पवित्र शास्त्रातील प्रत्येक शब्दाचे जणू गुलामच नव्हते का?
आणि आजच्या लोकांचे काय? ख्रिस्त सत्य खुले करण्यासाठी आला आहे, तरीही त्यांना स्वर्गात प्रवेश मिळावा व कृपेचा लाभ व्हावा यासाठी ते ख्रिस्ताला या जगातून घालवून देऊ इच्छितात. बायबलच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी हे लोक सत्याचे आगमन पूर्णपणे नाकारतील, आणि बायबलचे अस्तित्व चिरंतन राहावे हे सुनिश्चित करण्यासाठी ते, देहात परतलेल्या ख्रिस्ताला पुन्हा एकदा वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकतील. जर मनुष्याचे हृदय द्वेषाने भरलेले असेल आणि त्याचा स्वभाव माझ्या इतका विरोधात असेल, तर त्याला मी देऊ केलेले तारण कसे मिळेल? मी मनुष्यामध्ये वास करतो, तरीही मनुष्याला माझे अस्तित्व माहीत नाही. मी मनुष्यावर माझा दिव्य प्रकाश टाकला, तरीही तो माझ्या अस्तित्वाबद्दल अनभिज्ञच राहतो. मी मनुष्याला माझे क्रोधित रुप दाखवतो, तेव्हा तर तो माझे अस्तित्व आणखी जोराने नाकारतो. मनुष्य स्वतःला वचनांशी व बायबलशी अनुरूप कसे होता येईल याचा प्रयत्न करत राहतो, तरीदेखील सत्याशी एकरुप होण्यासाठीचा मार्ग शोधण्यासाठीची तळमळ असणारी एकही व्यक्ती माझ्यासमोर येत नाही. मनुष्य मी स्वर्गात असेन अशा दृष्टीने माझ्याकडे पाहतो आणि स्वर्गातील माझ्या अस्तित्वाची विशेष दखल घेतो, तरीही मी देहस्वरूपात असताना माझी कोणीही काळजी घेत नाही, कारण मनुष्यामध्ये राहणारा मी अगदीच क्षुल्लक आहे. जे केवळ बायबलमधील वचनांशी व केवळ संदिग्ध अशा देवांशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा मला तिटकारा वाटतो. कारण ते ज्याची उपासना करतात, ते निष्प्राण असे शब्द आहेत. शिवाय देव जो त्यांना अगणित खजिना देण्यास सक्षम आहे; त्याची उपासना न करता ते ज्या देवाचे अस्तित्व केवळ मनुष्याच्या अनुकंपेवर अवलंबून आहे, त्याची उपासना करतात—असा देव मुळात अस्तित्वातच नाही. मग, अशा लोकांना माझ्याकडून काय मिळणार? मनुष्य केवळ वचनांच्या आधारे खूप खालच्या पातळीला जाऊ शकतो. जे माझ्या विरुद्ध आहेत, जे माझ्याकडे अमर्याद मागण्या करत राहतात, ज्यांना सत्याबद्दल प्रेम नाही, जे माझ्या विरोधात बंड करतात, ते मला अनुरूप कसे असतील?
जे माझ्याशी अनुरुप नाहीत, ते माझ्याविरुद्ध आहेत. ज्यांचे सत्यावर प्रेम नाही, त्यांबाबतही असेच म्हणावे लागेल. जे माझ्याविरुद्ध बंड करतात, ते माझ्या अधिकच विरोधात आहेत आणि माझ्याशी अनुरूप नाहीत. जे माझ्याशी अनुरूप नाहीत, त्यांना मी त्या दुष्टाच्या हाती सोपवतो, आणि अशा लोकांना दुष्टाच्या भ्रष्टाचारात जाण्यासाठी सोडून देतो, त्यांचा दुष्टपणा प्रकट करण्याची मोकळीक देतो व शेवटी त्यांना गिळंकृत करण्यासाठी त्या दुष्टाच्या हाती सोपवतो. किती लोक माझी उपासना करत असतात याची मला पर्वा नाही, म्हणजे किती लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, याची तमा मी बाळगत नाही. कितीजण माझ्याशी अनुरूप आहेत याचीच मला केवळ चिंता आहे. कारण जे माझ्याशी अनुरूप नाहीत, ते सर्व दुष्ट आहेत, ते माझा विश्वासघात करतात; ते माझे शत्रू आहेत, आणि मी माझ्या शत्रूंना कदापि माझ्या घरातल्या “देव्हाऱ्यात” ठेवणार नाही. जे माझ्याशी अनुरूप आहेत, ते माझ्या घरी सदैव माझी सेवा करतील आणि जे माझ्या विरुद्ध जातील त्यांना कायमच माझी शिक्षा भोगावी लागेल. जे केवळ बायबलमधल्या शब्दांनाच चिकटून राहतात व त्यांचा सत्याचा शोध घेण्याची किंवा माझ्या पाऊलखुणा शोधण्याची फिकीर वाटत नाही, ते माझ्या विरोधातलेच आहेत, कारण ते मला बायबलच्या शब्दांत अडकवू पाहतात, ते मला बायबलमध्ये बंदिस्त करतात आणि माझी पराकोटीची निंदा करतात. असे लोक माझ्यासमोर कसे येऊ शकतात? ते माझ्या कृतींकडे, किंवा माझ्या इच्छेकडे, किंवा सत्याकडे लक्ष देत नाहीत, त्याउलट ते तीव्रतेने दुखवणाऱ्या शब्दांच्या पुरते आहारी जातात. असे लोक माझ्याशी अनुरूप कसे असतील?
मी बरीच वचने व्यक्त केली आहेत. तसेच माझी इच्छा व प्रवृत्ती यांबद्दल देखील मी मत व्यक्त केले आहे, तरीही लोक अजूनही मला ओळखण्यास आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यास असमर्थ आहेत. किंवा असेही म्हणता येईल, लोक अजूनही माझ्या आज्ञांचे पालन करण्यास असमर्थ आहेत. जे बायबलमध्ये व, नियमशास्त्राच्या बंधनात राहतात, जे वधस्तंभाच्या आधारावर जगतात, जे केवळ सिद्धांतानुसार जगतात व जे आज मी करत असलेल्या कार्याचा भाग बनून जगतात—त्यांच्यापैकी कोण माझ्याशी अनुरूप आहे? तुम्ही फक्त आशीर्वाद आणि इनाम मिळवण्याचा विचार करता, परंतु माझ्याशी खरोखर अनुरूप कसे व्हावे किंवा स्वतःला माझ्याविरुद्ध होण्यापासून कसे रोखावे, याचा विचार मात्र तुम्ही कधीही करत नाही. माझा तुमच्याकडून खूपच अपेक्षाभंग झाला आहे, कारण मी तुम्हाला खूप काही दिले आहे, त्याउलट मला मात्र तुमच्याकडून खूपच कमी प्राप्त झालेले आहे. तुमच्याकडून झालेली फसवणूक, तुमचा अहंकार, तुमचा लोभ, तुमच्या अवाजवी इच्छा, तुमच्याकडून झालेला विश्वासघात, तुम्ही केलेल्या अवज्ञा—यापैकी काय बरे माझ्या नजरेतून सुटू शकेल? तुम्ही माझ्याबाबत निष्काळजी आहात, तुम्ही मला मूर्ख बनवू पाहता, माझा अपमान करता, मला धुडकावता, तुम्ही माझ्याकडून त्यागाबद्दल सक्तीने व बळजबरीने हिसकावून घेऊ पाहता—अशा मनमानीबद्दलची मी तुम्हाला करत असलेली शिक्षा कशी टाळता येईल? ही सर्व दुष्कृत्ये तुमच्या माझ्याशी असलेल्या शत्रुत्वाचा आणि माझ्याशी तुम्ही अनुरूप नसल्याचा पुरावा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण स्वतःला माझ्याशी इतके अनुरूप असल्याचे मानतो, परंतु जर खरोखरच असे असते, तर असा खंडन न करता येण्यायोजागा ठोस पुरावा कोणाला लागू होईल? तुम्ही माझ्याप्रती अत्यंत प्रामाणिक व एकनिष्ठ आहात, असा तुमचा विश्वास आहे. तुम्ही खूप दयाळू, खूप कनवाळू आहात आणि माझ्याप्रती खूप समर्पित आहात, असे तुम्हाला वाटते. तुम्ही माझ्यासाठी आवश्यक त्यापेक्षाही जास्त गोष्टी केल्या आहेत, असे तुम्हाला वाटत असते. पण तुम्ही हे तुमच्या कृतींसोबत कधी ताडून पाहिले आहे का? मी म्हणेन, की तुम्ही अत्यंत गर्विष्ठ, अत्यंत लोभी व अत्यंत निष्काळजी आहात. ज्या युक्त्या वापरून तुम्ही मला मूर्ख बनवू पाहता, त्या खूप चलाखीच्या आहेत आणि तुमचे हेतू व पद्धती खूपच अवमानकारक आहेत. तुमची निष्ठा खूपच कमी आहे, तुमची कळकळ अपुरी आहे आणि तुमचा विवेक तर त्याहूनही खूपच कमी आहे. तुमच्या अंतःकरणात कमालीचा द्वेष भरलेला आहे व या द्वेषापासून कोणीही वाचलेले नाही, अगदी मीही नाही. तुम्ही तुमच्या मुलांसाठी, किंवा तुमच्या पतीसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी मला दूर ठेवलेले आहे. माझी काळजी करण्याऐवजी, तुम्ही तुमचे कुटुंब, तुमची मुले, तुमची प्रतिष्ठा, तुमचे भविष्य आणि तुमचे स्वतःचे समाधान यांचीच काळजी घेत आहात. तुम्ही बोलता-वागताना कधी माझा विचार केला आहे का? अगदी कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत, तुमच्या मनात तुमची मुले, तुमचे पती वा पत्नी किंवा तुमचे आईवडिल यांचेच विचार येत असतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांतही तुमच्या विचारांमध्ये मला स्थान नसते. जेव्हा तू तुझे कर्तव्य बजावत असतोस, तेव्हा तू कायमच तुझ्या स्वतःच्या हितसंबंधांचा, तुझ्या वैयक्तिक सुरक्षिततेचा, तुझ्या कुटुंबातील सदस्यांचाच विचार करतोस. तू कधी माझ्यासाठी म्हणून असे काय केले आहेस? तू कधीतरी माझा विचार केला आहेस का? तू स्वतःला, लागेल ती किंमत देऊन, कधीतरी माझ्यासाठी व माझ्या कार्यासाठी समर्पित केले आहेस का? तुझ्या माझ्यासोबतच्या अनुरूपतेचा पुरावा कोठे आहे? तुझी माझ्याप्रती असलेली निष्ठा वास्तवात कोठे दिसते आहे का? तुझ्याकडून माझ्या आज्ञांचे पालन होत असल्याचे वास्तवात कोठे दिसते आहे का? केवळ माझे आशीर्वाद मिळवण्यासाठी नाहीत असे तुझे हेतू कधी नव्हते? तुम्ही मला मूर्ख बनवता आणि माझी फसवणूक करता, तुम्ही सत्याशी खेळता, तुम्ही सत्याचे अस्तित्व दडवून ठेवता व सत्याच्या मूलतत्त्वाशी विश्वासघात करता. अशा प्रकारे माझ्याविरुद्ध जाऊन भविष्यात तुम्हाला काय प्राप्त होणार असेल? तुम्ही केवळ एका संदिग्ध अशा देवाशी अनुरूपता शोधता आणि स्पष्ट नसलेल्या श्रद्धेचा शोध घेता, तरी देखील तुम्ही ख्रिस्ताशी अनुरूप होऊ शकत नाही. मग जी शिक्षा दुष्टांना दिली जात असते, तीच तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्हालाही मिळणार नाही का? त्या वेळी, तुम्हाला हे उमजेल, की जो ख्रिस्ताशी अनुरूप नाही, त्याची क्रोधाच्या दिवशी सुटका होऊ शकणार नाही, आणि जे ख्रिस्ताविरुद्ध वागत आहेत, त्यांना कोणत्या प्रकारचे शासन दिले जाईल, हेही तुम्हाला कळेल. तो दिवस उगवेल, तेव्हा देवावरील श्रद्धेसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीची व स्वर्गात प्रवेश मिळवण्यासाठीची तुमची सारी स्वप्ने भंग पावतील. तथापि, जे ख्रिस्ताशी अनुरूप आहेत, त्यांच्याबाबत मात्र असे होणार नाही. त्यांनी खूप काही गमावलेले असले, त्यांना आयुष्यभरात खूप त्रास सहन करावा लागला असला, तरी मी मानवजातीसाठी दिलेला सर्व वारसा त्यांनाच लाभेल. सरतेशेवटी, तुम्हाला समजेल, की एकटा मीच नीतिमान देव आहे आणि एकटा मीच मानवजातीला त्याच्या सुंदर अंतिम गंतव्यस्थानावर नेण्यासाठी सक्षम आहे.