देहधारणेचे रहस्य (३)
जेव्हा देव त्याचे कार्य पार पाडतो, तेव्हा तो कोणत्याही इमारतीत किंवा हालचालींमध्ये गुंतण्यासाठी नाही, तर त्याचे सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी येतो. प्रत्येक वेळी तो देह धारण करतो, तेव्हा ते फक्त कार्याचा टप्पा पूर्ण करण्यासाठी आणि नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी असते. आता राज्याचे युग आले आहे, तसेच राज्याच्या प्रशिक्षणाचेदेखील युग आहे. कार्याचा हा टप्पा मनुष्याचे कार्य नाही व ते मनुष्यासाठी एका विशिष्ट प्रमाणात कार्य करण्याकरिता नाही, तर केवळ देवाच्या कार्याचा एक भाग पूर्ण करण्यासाठी आहे. तो जे करतो ते मनुष्याचे कार्य नाही, पृथ्वी सोडण्यापूर्वी मनुष्यामध्ये कार्य करून निश्चित परिणाम साध्य करणे नाही; तर हे त्याचे सेवाकार्य पूर्ण करणे आणि त्याने करायचे असलेले कार्य पूर्ण करणे, म्हणजे पृथ्वीवरील त्याच्या कार्यासाठी योग्य व्यवस्था करणे व त्याद्वारे गौरव प्राप्त करणे आहे. देहधारी देवाचे कार्य पवित्र आत्म्याने वापरलेल्या लोकांच्या कार्यापेक्षा वेगळे आहे. जेव्हा देव पृथ्वीवर त्याचे कार्य करण्यासाठी येतो, तेव्हा तो केवळ त्याच्या सेवाकार्याच्या पूर्ततेविषयीच विचार करतो. त्याच्या सेवाकार्याशी संबंधित नसलेल्या इतर सर्व बाबींमध्ये, तो जवळजवळ बिलकुल सहभाग घेत नाही, अगदी त्याकडे डोळेझाकदेखील करतो. त्याने जे कार्य केले पाहिजे ते फक्त तो पार पाडतो आणि मनुष्याने जे कार्य केले पाहिजे त्याबद्दल तो किंचितही चिंतित नसतो. तो जे कार्य करतो ते केवळ त्याच्या युगाशी संबंधित असते व त्याने पूर्ण केले पाहिजे अशा सेवाकार्याशी संबंधित असते, जणू काही इतर सर्व बाबी त्याच्या कक्षेबाहेर आहेत. तो स्वतःला मानवजातीमधील एक म्हणून जगण्याबद्दल अधिक मूलभूत ज्ञान देत नाही किंवा तो आणखी सामाजिक कौशल्ये शिकत नाही अथवा मनुष्याला समजेल अशा इतर कोणत्याही गोष्टीने तो स्वतःला सुसज्ज करत नाही. मनुष्याकडे जे सर्व काही असायला हवे ते त्याला अजिबात चिंतित करत नाही आणि तो फक्त त्याचे कर्तव्य असलेले कार्य करतो. आणि म्हणूनच, मनुष्याने पाहिल्याप्रमाणे, देहधारी देव इतका अपुरा आहे, की मनुष्याकडे असायला पाहिजेत अशा अनेक गोष्टींकडे तो लक्ष देत नाही व त्याला अशा गोष्टींची समजही नाही. जीवनाविषयीचे सामान्य ज्ञान, तसेच वैयक्तिक आचरण आणि इतरांशी परस्परसंवाद नियंत्रित करणारी तत्त्वे यांचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे दिसून येते. परंतु तुला देहधारी देवामध्ये असामान्यतेचा किंचितही मागमूस लागू शकत नाही. म्हणजेच, त्याची मानवता केवळ एक सामान्य व्यक्ती म्हणून त्याचे जीवन व त्याच्या मेंदूची सामान्य तर्कशक्ती राखते, ज्याद्वारे त्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता प्राप्त होते. तथापि, तो इतर कोणत्याही गोष्टींनी सुसज्ज नाही, जे सर्व फक्त मनुष्याने (निर्मिलेल्या प्राण्याने) धारण केले पाहिजे. देव फक्त स्वतःचे सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी देह धारण करतो. त्याचे कार्य संपूर्ण युगावर निर्देशित केले जाते, कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा स्थानावर नाही, तर संपूर्ण विश्वावर निर्देशित केले जाते. ही त्याच्या कार्याची दिशा आहे आणि तो ज्या तत्त्वानुसार कार्य करतो ते तत्त्व आहे. यात कोणीही बदल करू शकत नाही व मनुष्याने त्यात गुंतण्याचा कोणताही मार्ग नाही. प्रत्येक वेळी जेव्हा देव देह धारण करतो, तेव्हा तो त्या युगातील कार्य त्याच्यासोबत आणतो आणि मनुष्याने त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यावे आणि त्याच्याविषयी अंतर्दृष्टी प्राप्त करावी, यासाठी वीस, तीस, चाळीस किंवा अगदी सत्तर अथवा ऐंशी वर्षे मनुष्यासोबत राहण्याचा त्याचा कोणताही हेतू नसतो. त्याची काही गरज नाही! असे केल्याने देवाच्या उपजत प्रवृत्तीचे मनुष्याला असलेले ज्ञान कोणत्याही प्रकारे सखोल होणार नाही; उलट, त्याने केवळ त्याच्या धारणांमध्ये भर पडेल आणि त्याच्या धारणा व विचार कालबाह्य होतील. त्यामुळे देहधारी देवाचे कार्य नेमके काय आहे हे समजून घेणे तुम्हा सर्वांसाठी आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलेली वचने तुम्हाला नक्कीच समजली असतील: “मी सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आलो नाही”? ही वचने तुम्ही विसरलात का: “देव सामान्य मनुष्याचे जीवन जगण्यासाठी पृथ्वीवर येत नाही”? देह धारण करण्याचा देवाचा उद्देश तुम्हाला समजत नाही किंवा “निर्मिलेल्या प्राण्याच्या जीवनाचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने देव पृथ्वीवर कसा आला?” याचा अर्थदेखील तुम्हाला माहीत नाही. देव पृथ्वीवर फक्त त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी येतो आणि म्हणून पृथ्वीवरील त्याचे कार्य अल्पकालीन असते. देवाच्या आत्म्याने त्याच्या देहातून चर्चचे नेतृत्व करणारा श्रेष्ठ मनुष्य घडवावा, या हेतूने तो पृथ्वीवर येत नाही. जेव्हा देव पृथ्वीवर येतो, तेव्हा वचन देह धारण करते; तथापि, मनुष्याला त्याचे कार्य माहीत नसते व तो बळजबरीने त्याच्यावर काही गोष्टी लादतो. परंतु तुम्ही सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की देव म्हणजेच देह धारण केलेले वचन आहे, तो देवाच्या आत्म्याने या क्षणासाठी देवाची भूमिका स्वीकारण्याकरिता विकसित केलेला देह नाही. स्वतः देव म्हणजे विकसित केलेले उत्पादन नाही, तर वचनाने देह धारण केला आहे आणि आज तो अधिकृतपणे तुम्हा सर्वांमध्ये त्याचे कार्य पार पाडतो आहे. तुम्ही सर्व जाणता व कबूल करता, की देवाची देहधारणा हे वास्तविक सत्य आहे, तरीही तुम्ही ते समजून घेतल्याप्रमाणे वागता. देहधारी देवाच्या कार्यापासून ते त्याच्या देहधारणेचे महत्त्व आणि मूलतत्त्वापर्यंत, या सर्व गोष्टी तुम्ही किंचितही समजू शकत नाही व फक्त स्मृतीतून वचने पाठ करून इतरांचे अनुसरण करता. देहधारी देव तुझ्या कल्पनेप्रमाणे आहे असे तू मानतोस का?
देव फक्त युगाचे नेतृत्व करण्यासाठी आणि नवीन कार्याला गती देण्यासाठी देह धारण करतो. तुम्ही हा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. हे मनुष्याच्या कार्यापेक्षा बरेच वेगळे आहे व दोन्ही एकाच वेळी नमूद केले जाऊ शकत नाही. कार्य करण्यासाठी मनुष्याचा उपयोग होण्यापूर्वी त्याला दीर्घ कालावधीसाठी विकसित करणे आणि परिपूर्ण करणे आवश्यक आहे व त्यासाठी विशेषतः उच्च दर्जाची मानवता आवश्यक आहे. मनुष्याला सामान्य मानवतेची भावना टिकवून ठेवता आली पाहिजे, तसेच त्याने इतरांशी संबंधित त्याच्या आचरणावर नियंत्रण ठेवणारी अनेक तत्त्वे आणि नियम समजून घेतले पाहिजेत व त्याशिवाय, त्याने मनुष्याचे शहाणपण आणि नैतिक ज्ञानाचा अधिक अभ्यास करण्यास वचनबद्ध राहिले पाहिजे. मनुष्याने यासह सुसज्ज असले पाहिजे. मात्र, देहधारी देवाच्या बाबतीत हे असे नाही, कारण त्याचे कार्य मनुष्याचे प्रतिनिधित्व करत नाही किंवा ते मनुष्याचे कार्यही नाही; उलट, हे त्याच्या अस्तित्वाची थेट अभिव्यक्ती आहे व त्याने जे कार्य केले पाहिजे त्या कार्याची थेट अंमलबजावणी आहे. (साहजिकच, त्याचे कार्य योग्य वेळी पार पाडले जाते, ते अनपेक्षितपणे किंवा यादृच्छिकपणे केले जात नाही आणि जेव्हा त्याचे सेवाकार्य करण्याची वेळ येते, तेव्हा ते सुरू होते.) तो मनुष्याच्या जीवनात किंवा मनुष्याच्या कार्यात भाग घेत नाही, म्हणजेच, त्याची मानवता यापैकी कशानेही सुसज्ज नाही (जरी याचा त्याच्या कार्यावर परिणाम झाला नाही तरीही). जेव्हा त्याचे सेवाकार्य पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हाच तो ते पूर्ण करतो; त्याचा दर्जा काहीही असो, त्याने जे कार्य केले पाहिजे फक्त ते करत तो पुढे जात राहतो. मनुष्याला त्याच्याबद्दल काहीही माहीत असले व मनुष्याचे त्याच्याबद्दल काहीही मत असले, तरी त्याच्या कार्यावर कोणताही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, जेव्हा येशूने त्याचे कार्य पार पाडले, तेव्हा तो नक्की कोण होता हे कोणालाच माहीत नव्हते, परंतु त्याने फक्त त्याचे कार्य पुढे सुरू ठेवले. त्याने जे कार्य केले पाहिजे ते पूर्ण करण्यात यापैकी कशानेही त्याला अडथळा आला नाही. म्हणूनच, त्याने प्रथम स्वतःची ओळख कबूल किंवा जाहीर केली नाही आणि मनुष्याला फक्त त्याचे अनुसरण करण्यास सांगितले. साहजिकच ही देवाची केवळ नम्रता नव्हती, तर देवाने देहात ज्या पद्धतीने कार्य केले तेदेखील होते. तो फक्त अशा प्रकारे कार्य करू शकला, कारण मनुष्य काही केल्या उघड्या डोळ्यांनी त्याला ओळखू शकत नव्हता. आणि मनुष्याने जरी त्याला ओळखले असते, तरी तो त्याच्या कार्यात मदत करू शकला नसता. शिवाय, मनुष्याने त्याचा देह ओळखावा म्हणून त्याने देह धारण केला नाही; तर कार्य पार पाडण्यासाठी आणि त्याचे सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी त्याने तसे केले. या कारणास्तव, त्याने त्याची ओळख उघड करण्याला महत्त्व दिले नाही. त्याने केले पाहिजे ते सर्व कार्य पूर्ण केल्यावर, त्याची संपूर्ण ओळख व दर्जा मनुष्यापुढे स्वाभाविकपणे स्पष्ट झाला. देहधारी देव शांत राहतो आणि कधीही कोणतीही घोषणा करत नाही. तो मनुष्याकडे लक्ष देत नाही किंवा मनुष्य त्याचे अनुसरण करण्यात कसा सामील होत आहे याकडेदेखील लक्ष देत नाही, परंतु त्याचे सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी व त्याने केले पाहिजे ते कार्य पार पाडण्यासाठी तो फक्त पुढे जात राहतो. त्याच्या कार्याच्या मार्गात बाधा आणू शकत नाही. जेव्हा त्याने त्याचे कार्य पूर्ण करण्याची वेळ येईल, तेव्हा ते कार्य नक्कीच पूर्ण केले जाईल आणि ते कार्य समाप्त केले जाईल व इतर कोणीही अधिकारवाणीने बोलण्यास सक्षम नसेल. त्याचे कार्य पूर्ण करून तो मनुष्यामधून निघून गेल्यानंतरच मनुष्याला तो करत असलेले कार्य समजेल, तरीही ते पूर्णपणे स्पष्ट होणार नाही. आणि ज्या हेतूने त्याने प्रथम त्याचे कार्य केले ते पूर्णपणे समजून घेण्यासाठी मनुष्याला बराच वेळ लागेल. दुसऱ्या शब्दांत, देहधारी देवाच्या युगाचे कार्य दोन भागात विभागलेले आहे. एका भागामध्ये स्वतः देहधारी देव करत असलेले कार्य आणि स्वतः देहधारी देव उच्चारत असलेली वचने यांचा समावेश असतो. त्याच्या देहाचे सेवाकार्य पूर्ण झाल्यावर, कार्याचा दुसरा भाग पवित्र आत्म्याद्वारे वापरल्या जाणार्या लोकांद्वारे पार पाडण्यासाठी शिल्लक राहतो. या वेळी मनुष्याने त्याचे कार्य पूर्ण केले पाहिजे, कारण देवाने आधीच मार्ग तयार केला आहे आणि त्यावर मनुष्यानेच चालले पाहिजे. म्हणजेच, देहधारी देव कार्याचा एक भाग पार पाडतो आणि नंतर पवित्र आत्मा व पवित्र आत्म्याद्वारे वापरले जाणारे लोक या कार्यात यशस्वी होतील. म्हणूनच, देहधारी देवाने मुख्यत्वे कोणते कार्य पाडले आहे हे मनुष्याला माहीत असले पाहिजे आणि देहधारी देवाचे महत्त्व काय आहे व त्याने जे कार्य केले पाहिजे ते काय आहे आणि मनुष्याकडे जशा मागण्या केल्या जातात, तशा मागण्या देवाकडे करू नयेत, हे त्याने समजून घेतले पाहिजे. यातच मनुष्याची चूक, त्याची धारणा व त्याहूनही अधिक म्हणजे त्याची अवज्ञा दिसून येते.
मनुष्याने देवाचा देह ओळखावा या हेतूने किंवा मनुष्याला देहधारी देवाचा देह आणि मनुष्याचा देह यातील फरक ओळखता यावा या हेतूने देव देह धारण करत नाही; किंवा मनुष्याच्या विवेकबुद्धीला प्रशिक्षित करण्यासाठी देव देह धारण करत नाही व महान गौरव प्राप्त व्हावा यासाठी मनुष्याला देहधारी देवाच्या देहाची उपासना करू देण्याच्या उद्देशाने असे करणे तर दूरच. देवाने देह धारण करण्यामागे यापैकी कोणताही हेतू नाही. तसेच मनुष्याला दोषी ठरवण्यासाठी किंवा जाणूनबुजून मनुष्याला उघडकीस आणण्यासाठी अथवा त्याच्यासमोर आणखी संकटे उभी करण्यासाठी देव देह धारण करत नाही. यापैकी कोणताही देवाचा हेतू नाही. प्रत्येक वेळी देव देह धारण करतो, तेव्हा ते अटळ असे कार्य असते. तो त्याच्या महान कार्यासाठी आणि त्याच्या महान व्यवस्थापनासाठी तसे वागतो व मनुष्याच्या कल्पनेतील कारणांमुळे नाही. देव फक्त त्याच्या कार्याच्या आवश्यकतेसाठी आणि जरुरी असेल तेव्हाच पृथ्वीवर येतो. तो केवळ आजूबाजूला पाहण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर येत नाही, तर त्याने जे कार्य केले पाहिजे ते पार पाडण्यासाठी येतो. नाहीतर तो एवढा मोठा भार का घेईल आणि हे कार्य पार पाडण्यासाठी एवढी मोठी जोखीम का पत्करेल? देव केवळ त्याला आवश्यक असते आणि नेहमी अनन्य महत्त्व असते तेव्हाच देह धारण करतो. जर फक्त लोकांना त्याच्याकडे पाहण्याची अनुमती देण्यासाठी व त्यांची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी असते, तर तो निश्चितच लोकांमध्ये इतका सहज कधीच आला नसता. तो पृथ्वीवर त्याच्या व्यवस्थापनासाठी आणि त्याच्या महान कार्यासाठी व मानवजातीच्या अधिकाधिक प्राप्तीसाठी येतो. तो युगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येतो, तो सैतानाला पराभूत करण्यासाठी येतो आणि सैतानाला पराभूत करण्यासाठी तो स्वतः देहाचे वस्त्र परिधान करतो. त्याहूनही अधिक म्हणजे, तो संपूर्ण मानवजातीला त्यांचे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता येतो. हे सर्व त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे आणि ते संपूर्ण विश्वाच्या कार्याशी संबंधित आहे. जर देवाने फक्त मनुष्याला त्याच्या देहाबद्दल माहीत करून देण्यासाठी व लोकांचे डोळे उघडण्यासाठी देह धारण केला, तर तो प्रत्येक राष्ट्रात का फिरणार नाही? ही अत्यंत सोपी बाब नसती का? पण त्याने तसे केले नाही, त्याऐवजी त्याने एका ठिकाणी राहण्यासाठी आणि जे कार्य केले पाहिजे ते कार्य सुरू करण्यासाठी योग्य जागा निवडली. फक्त या देहालाच महत्त्वाचे मानले गेले आहे. तो संपूर्ण युगाचे प्रतिनिधित्व करतो व संपूर्ण युगाचे कार्यदेखील पार पाडतो; तो पूर्वीचे युग समाप्त करतो आणि नवीन युगाची सुरुवातदेखील करतो. या सर्व देवाच्या व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आहेत व हे सर्व कार्याच्या एका टप्प्याचे महत्त्व आहे जे पार पाडण्यासाठी देव पृथ्वीवर येतो. जेव्हा येशू पृथ्वीवर आला, तेव्हा त्याने फक्त काही वचने उच्चारली आणि काही कार्य पार पाडले; त्याला मनुष्याच्या जीवनाची काळजी नव्हती व त्याने त्याचे कार्य पूर्ण केल्यावर तो निघून गेला. आज, जेव्हा मी माझे बोलणे पूर्ण केले आणि माझी वचने तुमच्यापर्यंत पोहोचवली व जेव्हा तुम्हाला सर्व समजले असेल, तेव्हा तुमचे जीवन कसेही असले तरी माझे कार्य पूर्ण होईल. माझ्या कार्याचा हा टप्पा पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि या वचनांनुसार पृथ्वीवर कार्य करत राहण्यासाठी भविष्यात काही लोक असले पाहिजेत; त्या वेळी, मनुष्याचे कार्य व मनुष्याची उभारणी सुरू होईल. परंतु, सध्या देव फक्त त्याचे सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या कार्याचा एक टप्पा पूर्ण करण्यासाठी कार्य करतो. देव मनुष्याच्या विपरीत रीतीने कार्य करतो. मनुष्याला मंडळ्या व मंच आवडतात आणि मनुष्य समारंभाला महत्त्व देतो, तर देवाला मनुष्याच्या मंडळ्या व सभा यांचा सर्वात जास्त तिरस्कार वाटतो. देव अनौपचारिकपणे मनुष्याशी संभाषण करतो आणि बोलतो; हे देवाचे कार्य आहे, जे अपवादात्मकपणे मुक्त आहे व तुम्हालादेखील मुक्त करते. मात्र, मला तुमच्यासोबत एकत्र येण्याचा प्रचंड तिरस्कार वाटतो आणि मला तुमच्यासारख्या अत्यंत नियंत्रित जीवनाची सवय होऊ शकत नाही. मला नियमांचा सर्वात जास्त तिरस्कार वाटतो; ते मनुष्यावर एवढी बंधने आणतात की मनुष्य हालचाल करण्यास, बोलण्यास व गाण्यास घाबरतो, त्याचे डोळे थेट तुझ्याकडे पाहत असतात. तुमच्या एकत्र येण्याच्या पद्धतीचा मला पूर्णपणे तिरस्कार वाटतो आणि मोठ्या मंडळ्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तुमच्यासोबत अशा प्रकारे एकत्र येण्यास पूर्णपणे नकार देतो, कारण या जीवनशैलीमुळे एखाद्याला बेड्या घातल्यासारखे वाटते व तुम्ही खूप जास्त समारंभ करता आणि बरेच नियम पाळता. जर तुम्हाला नेतृत्व करण्याची अनुमती दिली असती, तर तुम्ही सर्व लोकांना नियमांच्या बंधनात नेले असते व तुमच्या नेतृत्वाखाली नियम मोडण्याचा त्यांना कोणताही मार्ग नसता; त्याऐवजी धर्माचे वातावरण अधिकच तीव्र होत गेले असते आणि मनुष्याच्या चालीरीती वाढतच राहिल्या असत्या. काही लोक एकत्र आल्यावर बोलत व बडबड करत राहतात आणि त्यांना कधीही थकवा जाणवत नाही व काही लोक न थांबता बरेच दिवस प्रवचन देऊ शकतात. या सर्व मोठ्या मंडळ्या आणि मनुष्याच्या सभा मानल्या जातात; त्यांचा खाण्यापिण्याच्या, उपभोगाच्या जीवनाशी किंवा आत्मा मुक्त होण्याशी काहीही संबंध नाही. या सर्व सभा आहेत! तुमच्या सहकर्मचाऱ्यांच्या सभा, तसेच मोठ्या व लहान मंडळ्या या सर्व माझ्यासाठी घृणास्पद आहेत आणि मला त्यात कधीच स्वारस्य वाटले नाही. मी या तत्त्वाद्वारे कार्य करतो: मी मंडळ्यांमध्ये प्रवचन देण्यास इच्छुक नाही किंवा मला मोठ्या सार्वजनिक संमेलनात काहीही जाहीर करण्याची इच्छा नाही व विशेष परिषदेच्या काही दिवसांसाठी तुम्हा सर्वांना बोलावण्याची माझी इच्छा नाही. तुम्ही सर्वांनी मेळाव्यात व्यवस्थित, नीटनेटके बसावे हे मला पटत नाही; कोणत्याही समारंभाच्या मर्यादेत तुम्ही राहता हे पाहून मला तिरस्कार वाटतो आणि त्याहीपेक्षा मी तुमच्या अशा समारंभात भाग घेण्यास नकार देतो. तुम्ही हे जितके जास्त करता तितकेच मला ते अधिक घृणास्पद वाटते. मला तुमच्या या समारंभांमध्ये व नियमांमध्ये किंचितही स्वारस्य नाही; तुम्ही त्याद्वारे कितीही चांगले कार्य केले तरी मला ते सर्व घृणास्पद वाटते. तुमची व्यवस्था अयोग्य आहे किंवा तुम्ही खूप खालच्या पातळीचे आहात असे नाही; हे असे आहे की मला तुमच्या राहणीचा तिरस्कार वाटतो आणि त्याहीपेक्षा मला त्याची सवय होऊ शकत नाही. मला जे कार्य करण्याची इच्छा आहे ते तुम्हाला किंचितही समजत नाही. जेव्हा येशूने भूतकाळात त्याचे कार्य केले, तेव्हा एखाद्या ठिकाणी प्रवचन दिल्यानंतर, तो त्याच्या शिष्यांना शहराबाहेर नेत असे व त्यांनी समजणे आवश्यक असे मार्ग त्यांना सांगत असे. त्याने अनेकदा अशा पद्धतीने कार्य केले. लोकसमुदायामध्ये त्याचे कार्य फार कमी आणि अल्प होते. तुमची त्याच्याबद्दल जी अपेक्षा असते त्यानुसार, देहधारी देवाला सामान्य माणसाचे जीवन मिळू नये; त्याने त्याचे कार्य पार पाडले पाहिजे व तो बसलेला असो, उभा असो किंवा चालत असो, त्याने बोललेच पाहिजे. त्याने नेहमी कार्य केले पाहिजे आणि तो “कृती” कधीही थांबवू शकत नाही, अन्यथा तो त्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असेल. मनुष्याच्या या मागण्या मानवी तर्कशक्तीनुसार योग्य आहेत का? तुमचा प्रामाणिकपणा कुठे आहे? तुम्ही जास्त अपेक्षा करत नाही का? मी कार्य करत असताना तू माझी तपासणी करण्याची गरज आहे का? मी माझे सेवाकार्य पूर्ण करत असताना तू माझ्यावर देखरेख करण्याची गरज आहे का? मी कोणते कार्य करावे व केव्हा करावे हे मला चांगले ठाऊक आहे; इतरांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही. कदाचित मी फार काही केले नाही असे तुला वाटेल, पण तोपर्यंत माझे कार्य संपलेले असेल. उदाहरणार्थ चार सुवार्तांमधील येशूची वचने घ्या: तीदेखील मर्यादित नव्हती का? त्या वेळी, जेव्हा येशूने सभास्थानात प्रवेश केला आणि उपदेश केला, तेव्हा त्याने काही मिनिटांतच त्याचे बोलणे संपवले व त्याचे बोलणे संपल्यावर, तो त्याच्या शिष्यांना नावेत घेऊन गेला व कोणतेही स्पष्टीकरण न देता तेथून निघून गेला. बहुतेक, सभास्थानातील लोक याविषयी आपापसात चर्चा करत होते, परंतु येशूचा त्यात काही सहभाग नव्हता. देव फक्त तेच कार्य करतो जे त्याने केले पाहिजे आणि त्याहून अधिक काहीही करत नाही. आता, अनेकांना मी दिवसातून किमान काही तास जास्त बोलावे व जास्त सांगावे असे वाटते. तुम्ही पाहू शकता, देव बोलत नाही तोपर्यंत तो देव नसतो आणि जो बोलतो तोच देव असतो. तुम्ही सर्व आंधळे आहात! सर्व मूर्ख मनुष्य आहात! तुम्ही सर्व अज्ञानी आहात ज्यांच्याकडे काहीच तर्कशक्ती नाही! तुमच्याकडे खूप धारणा आहेत! तुमच्या मागण्या खूप जास्त आहेत! तुम्ही अमानुष आहात! देव म्हणजे काय हे तुम्हाला कळतही नाही! तुमचा विश्वास आहे, की सर्व वक्ते आणि भाषणकर्ते देव आहेत व जो कोणी तुम्हाला वचने सांगण्यास तयार आहे तो तुमचा पिता आहे. मला सांगा, तुम्हा सर्वांकडे तुमच्या सुव्यवस्थित वैशिष्ट्यांसह आणि असामान्य स्वरुपासह थोडीशी तरी तर्कशक्ती आहे का? तुम्हाला अद्याप स्वर्गसूर्य माहीत आहे का! तुमच्यापैकी प्रत्येकजण लोभी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यासारखा आहे, मग तुमच्या ठायी तर्कशक्ती कशी असेल? तुम्ही योग्य व अयोग्य यामध्ये फरक कसा करू शकता? मी तुम्हाला खूप काही दिले आहे, पण तुमच्यापैकी किती जणांनी त्याची किंमत ठेवली आहे? ते पूर्णपणे कोणी प्राप्त केले आहे? आज ज्या मार्गाने तुम्ही चालत आहात तो मार्ग कोणी खुला केला हे तुम्हाला माहीत नाही, म्हणूनच तुम्ही माझ्याकडे या हास्यास्पद आणि मूर्खपणाच्या मागण्या करत राहता. तुम्हाला लाज वाटत नाही का? मी पुरेसे बोललो नाही का? मी पुरेसे केले नाही का? तुमच्यापैकी कोण माझ्या वचनांना मौल्यवान मानू शकेल? माझ्या उपस्थितीत तुम्ही माझी खुशामत करता, पण मी नसताना खोटे बोलता व फसवता! तुमच्या कृती खूप घृणास्पद आहेत आणि त्यांचा मला तिटकारा आहे! मला माहीत आहे, की तुम्ही मला फक्त तुमच्या डोळ्यांना सुखावण्यासाठी व तुमची क्षितिजे रुंदावण्यासाठी बोलायला आणि कार्य करायला सांगता, तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी नाही. मी तुमच्याशी खूप बोललो आहे. तुमचे जीवन खूप पूर्वी बदलायला हवे होते, मग आताही तुम्ही तुमच्या जुन्या अवस्थेत का फिरत आहात? असे होऊ शकते का, की माझी वचने तुमच्याकडून हिरावून घेतली गेली आहेत व तुम्हाला ती मिळाली नाहीत? खरे सांगायचे तर, तुमच्यासारख्या भ्रष्ट लोकांना मी आणखी काही बोलू इच्छित नाही—ते व्यर्थ असेल! मला इतके निरुपयोगी कार्य करण्याची इच्छा नाही! तुम्हाला फक्त तुमची क्षितिजे रुंदावायची आहेत किंवा तुमच्या डोळ्यांना सुखावायचे आहे, जीवन प्राप्त करायचे नाही! तुम्ही सर्व स्वतःलाच फसवत आहात! मी तुम्हाला विचारतो, मी तुमच्याशी समोरासमोर जे बोललो ते तुम्ही किती आचरणात आणले आहे? तुम्ही फक्त इतरांना फसवण्यासाठी डावपेच खेळता! तुमच्यापैकी जे बघे म्हणून पाहण्यात आनंद घेतात त्यांचा मला तिरस्कार वाटतो आणि मला तुमची उत्सुकता अत्यंत घृणास्पद वाटते. जर तुम्ही खर्या मार्गाचा पाठपुरावा करत नसाल किंवा सत्यासाठी तहानलेले नसाल, तर तुम्ही माझ्या तिरस्कारासाठी पात्र आहात! मला माहीत आहे, की तुम्ही माझे बोलणे फक्त तुमची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची एखाद दुसरी लोभी इच्छा पूर्ण करण्यासाठी ऐकता. तुम्ही सत्याचे अस्तित्व शोधण्याचा अथवा जीवनात प्रवेश करण्यासाठी योग्य मार्ग शोधण्याचा कोणताही विचार करत नाही; या मागण्या तर तुमच्यामध्ये अस्तित्वातच नाहीत. तुम्ही देवाला फक्त खेळण्यासारखे वागवता ज्याचे तुम्ही निरीक्षण आणि प्रशंसा करता. तुम्हाला जीवनाचा पाठपुरावा करण्याची खूप कमी आवड आहे, परंतु उत्सुकता बाळगण्याची इच्छा भरपूर आहे! अशा लोकांना जीवनाचा मार्ग समजावून सांगणे म्हणजे निरर्थक बोलण्यासारखे आहे; मी पण अजिबात बोलणार नाही! मी तुम्हाला सांगतो: जर तुम्ही फक्त तुमच्या हृदयातील पोकळी भरून काढू पाहत असाल, तर तुम्ही माझ्याकडे येऊ नये, हेच उत्तम! तुम्ही जीवन प्राप्त करण्याला महत्त्व दिले पाहिजे! स्वतःला फसवू नका! तुम्ही तुमची जिज्ञासा हा तुमच्या जीवनाचा आधार म्हणून न घेणे किंवा मला तुमच्याशी बोलण्यास सांगण्याचे निमित्त म्हणून न वापरणे हेच उत्तम आहे. हे सर्व डावपेच आहेत ज्यात तुम्ही अत्यंत पारंगत आहात! मी तुला पुन्हा विचारतो: मी तुला ज्यामध्ये प्रवेश करण्यास सांगतो त्यात तू खरोखर किती प्रवेश केला आहेस? मी तुझ्याशी जे बोललो ते सर्व तुला समजले आहे का? मी तुझ्याशी जे बोललो ते सर्व तू प्रत्यक्षात आणले आहेस का?
स्वतः देव प्रत्येक युगाच्या कार्याची सुरुवात करतो, परंतु तू हे जाणून घेतले पाहिजेस, की देव ज्या पद्धतीने कार्य करतो, ते तो चळवळ सुरू करण्यासाठी किंवा विशेष परिषदा आयोजित करण्यासाठी अथवा तुमच्या वतीने कोणत्याही प्रकारची संघटना स्थापन करण्यासाठी करत नाही. तो केवळ जे कार्य त्याने केले पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी येतो. त्याच्या कार्यामध्ये कोणत्याही मनुष्याची अडचण येत नाही. तो त्याचे कार्य त्याच्या इच्छेनुसार करतो; मनुष्याला त्याबद्दल काहीही वाटत असले किंवा माहीत असले, तरी त्याचा संबंध फक्त त्याचे कार्य पार पाडण्याशी असतो. जगाच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंतच्या कार्याचे तीन टप्पे झाले आहेत; यहोवापासून येशूपर्यंत आणि नियमशास्त्राच्या युगापासून ते कृपेच्या युगापर्यंत, देवाने मनुष्यासाठी कधीच विशेष परिषद बोलावली नाही किंवा विशेष जागतिक कार्य परिषद बोलावली जाईल यासाठी त्याने कधीही सर्व मानवजातीला एकत्र जमवले नाही व त्याद्वारे त्याचे कार्यक्षेत्र वाढवले नाही. तो फक्त संपूर्ण युगाची सुरुवातीची कार्ये योग्य वेळी व योग्य ठिकाणी पार पाडतो, त्याद्वारे युगाची सुरुवात करतो आणि मनुष्याने त्याचे जीवन कसे जगावे यासाठी मानवजातीचे नेतृत्व करतो. विशेष परिषदा म्हणजे मनुष्याच्या मंडळ्या; लोकांना एकत्र जमवून सुट्टी साजरी करणे हे मनुष्याचे कार्य आहे. देव सुट्ट्या साजऱ्या करत नाही व शिवाय त्याला त्या घृणास्पद वाटतात; तो विशेष परिषदा भरवत नाही, एवढेच नव्हे तर त्याला त्या घृणास्पद वाटतात. आता, देहधारी देवाचे नेमके काय कार्य आहे ते तू समजून घेतले पाहिजेस!