तू नेमका कोणाशी एकनिष्ठ आहेस?
आत्ता तुम्ही जगत असलेला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. तुम्हाला ज्या अंतिम मुक्कामी पोहोचायचे आहे, त्यासाठी व तुमच्या भाग्योदयासाठीही तो अत्यंत अनमोल आहे. यामुळेच आज आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही कदर केली पाहिजे. खर्च होणारा प्रत्येक क्षण अनमोल आहे, हे जाणून तो तसा वापरला पाहिजे. स्वतःचा अधिकतम फायदा करून घेण्यासाठी शक्य तितका, जास्तीत जास्त वेळ काढला पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन व्यर्थ जाणार नाही. मी अशी वचने का उच्चारत आहे, असे वाटून तुम्ही कदाचित गोंधळून जाल. मात्र स्पष्ट शब्दांतच सांगायचे, तर तुमच्यापैकी कोणाच्याच वर्तनामुळे मला अजिबात आनंद होत नाही, याचे कारण, मला तुमच्याकडून ज्या अपेक्षा होत्या तसे तुम्ही आज वागत नाही. म्हणूनच, मी हे म्हणू शकतो की: तुमच्यापैकी प्रत्येकजणच आता धोक्याच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि फार पूर्वी तुम्ही करत असलेला मदतीसाठीचा आक्रोश, तसेच सत्याचा पाठपुरावा करण्याची आणि प्रकाशाचा शोध घेण्याची तुमची पूर्वीची आकांक्षा आता संपत चाललेली आहे. परतफेडीची ही तुमच्यासाठीची अंतिम संधी आहे आणि जे घडते आहे, ते मला कधीच अपेक्षित नव्हते. मला वस्तुस्थितीच्या विरोधात बोलायची इच्छा नाही, कारण तुम्ही माझी खूपच निराशा केलेली आहे. कदाचित तुम्हाला अशीच सहजासहजी हार पत्करायची नसेल वा, वास्तवाचा सामना करण्याची तुमच्यात इच्छा नसेल—तरीही मला तुम्हाला हे गंभीरपणे विचारले पाहिजे: या इतक्या वर्षांत तुमच्या अंतःकरणात नेमके काय आहे? ती नेमकी कुणाशी एकनिष्ठ आहेत? हे प्रश्न आताच अचानक आम्हाला का विचारत आहेत, असे म्हणू नका. मी अशा गोष्टी का विचारतो आहे अशी पृच्छाही मला करू नका. एक गोष्ट पुरती जाणून घ्या: मी तुम्हाला अगदी नीटपणे ओळखतो, मी तुमची खूपच काळजी घेतो, तुमचे वर्तन आणि कृत्यांमध्ये मी माझ्या अंतःकरणाची फार मोठी गुंतवणूक केली आहे, त्यामुळे मी तुम्हाला सातत्याने बोलावत राहिलो आहे आणि त्यासाठी कठोर परिस्थितीचा सामनाही मी केलेला आहे. तरीही तुम्ही मात्र फक्त बेपर्वाई आणि पराकोटीचा निष्काळजीपणा यांशिवाय मला कसलीही परतफेड केलेली नाही. तुम्ही माझ्याकडे खूपच दुर्लक्ष करत राहिलेले आहात; यांबद्दल मला काहीही माहीत नसेल, असे शक्य आहे का? जर तुम्हाला असे वाटत असेल, तर तुम्ही माझ्याशी खरोखरच प्रेमाने वागत नाही, हेच सत्य यातून सिद्ध होते. म्हणूनच मी म्हणत असतो, की तुम्ही मुद्दाम आपले डोके वाळूत खुपसून ठेवत असता. तुम्ही इतके चाणाक्ष आहात, की आपण स्वत: नेमके काय करत आहोत, याची तुम्हाला स्वत:लाही जाणीवही नसते—मग मला याचा जाब देण्याकरता तुम्ही नेमके काय सांगाल?
तुमचे अंतःकरण नेमके कोणाशी एकनिष्ठ आहे, या बाबीची मला सर्वाधिक चिंता आहे. मला अशीही आशा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकजण स्वत:चे विचार मनात नीट जुळवण्याचा प्रयत्न करेल आणि स्वतःला विचारेल की, आपण नेमके कोणाशी एकनिष्ठ आहोत आणि आपण कोणासाठी जगत आहोत? कदाचित तुम्ही आजवर या प्रश्नांचा कधी काळजीपूर्वक विचारही केला नसेल. त्यामुळे मग आता मी तुम्हाला त्यांची उत्तरे सांगू का?
स्मरणशक्ती असलेला कोणीही पुढील वस्तुस्थितीची दखल घेईल: माणूस स्वतःसाठीच जगतो आणि तो स्वतःशीच एकनिष्ठ असतो. तुमची उत्तरे पूर्णत: बरोबर असतीलच असे मला वाटत नाही. कारण तुम्ही सर्वजण आपापले जीवन जगण्यात मग्न आहात आणि प्रत्येकजण स्वतःच्या भोगांशी झगडतो आहे. उदा., तुम्हाला प्रिय असणाऱ्या लोकांशी आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींशीच तुम्ही एकनिष्ठ आहात; तुम्ही अगदी स्वतःशीही पूर्णपणे एकनिष्ठ नाही. कारण तुम्हा प्रत्येकावरच तुमच्या आजूबाजूचे लोक, घटना आणि वस्तूंचा इतका प्रभाव असतो, की तुम्ही धडपणे स्वतःशीही एकनिष्ठ नसता. तुम्ही स्वत:शी एकनिष्ठ राहावे, हे ठसवण्यासाठी मी ही वचने सांगत नसून, कोणत्याही गोष्टीबाबत तुमची निष्ठा उघड करण्यासाठी असे सांगतो आहे. याचे कारण इतक्या वर्षांच्या कालावधीत, मला तुमच्यापैकी कोणाकडूनही कधीही निष्ठा प्राप्त झालेली नाही. तुम्ही एवढी वर्षे माझे अनुयायी म्हणून माझे अनुसरण करत आहात, पण तरीही तुम्ही मला कधी निष्ठेचा अल्पसा वाटाही दिला नाहीत. त्याऐवजी, तुम्ही केवळ तुमच्या प्रियजनांभोवती आणि तुम्हाला भौतिक आनंद देणाऱ्या गोष्टींभोवती रुंजी घालत राहिलात—हे इतक्या मोठ्या प्रमाणात घडते, की तुम्ही सदैव, जेथेही जाल तेथे त्यांना आपल्या हृदयाच्या कप्प्यात ठेवता आणि त्यांना कधीही अंतर देत नाही. जेव्हाही तुम्हाला आवडत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही उत्सुक किंवा उत्कट असता, तेव्हा हेच घडत असते. तुम्ही माझे अनुयायी म्हणून मार्गक्रमण करत असताना किंवा तुम्ही माझे शब्द ऐकत असतानादेखील असे घडते. म्हणूनच, मी म्हणतो की तुमच्याकडून मी ज्या प्रकारची निष्ठा मागतो आहे, ती तुम्ही तुमच्या “आवडत्या गोष्टींची” काळजी घेण्यासाठी खर्च करत आहात. जरी तुम्ही माझ्यासाठी एखाद-दोन आवडीच्या गोष्टींचा त्याग केलात, तरीही त्या तुमच्या सर्वस्वाचे प्रतिनिधित्व करत नाहीत आणि तुम्ही ज्याच्याशी खरोखर एकनिष्ठ आहात, तो मीच आहे, हेही यातून दिसून येत नाही. तुम्ही ज्या गोष्टीनी झपाटून गेले असता, त्यांमध्ये स्वतःला अगदी झोकून देता: काही लोक आपल्या मुलामुलींशी एकनिष्ठ असतात, तर काही आपला पती वा पत्नी, धन, काम, वरिष्ठ, पद किंवा स्त्रियांशी एकनिष्ठ असतात. तुम्ही ज्या गोष्टींशी एकनिष्ठ असता, त्यांचा तुम्हाला कधीही कंटाळा येत नाही किंवा त्यांमुळे मनाला त्रासही होत नाही. त्याउलट, तुम्ही या गोष्टी अधिकाधिक प्रमाणात तसेच आणखी उच्च गुणवत्तेच्या मिळवू पाहता. त्या प्राप्त करण्यासाठी तुम्ही अथकपणे प्रयत्न करत राहता. ज्या गोष्टी तुम्हाला भारून टाकतात, त्यांपुढे मी आणि माझी वचने नेहमी दुर्लक्षित राहतात. त्यांना प्राधान्यक्रमात सर्वात शेवटी ठेवण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो. असेही काही लोक आहेत, जे एकनिष्ठतेचा हा शेवटचा क्रमांक सुद्धा, त्यांना ज्या आवडीच्या गोष्टींचा अद्याप शोध लागलेला नाही अशा गोष्टीकरिता ठेवतात. अशांच्या अंतःकरणात माझ्याबद्दल कधीच जराही प्रीतीचे लक्षण दिसले नव्हते. मी तुमच्याकडून फार जास्त अपेक्षा करतो आहे किंवा मी तुमच्यावर अवाजवी आरोप करतो आहे, असे तुम्हाला कदाचित वाटत असेल—परंतु तुम्ही कधी या वस्तुस्थितीचा विचार केला आहे का की तुमच्या कुटुंबासह आनंदाने वेळ घालवत असताना तुम्ही एकदा तरी माझ्याशी एकनिष्ठ राहिलात का? अशा वेळी तुम्हाला काहीच त्रास होत नाही का? ज्या वेळी तुमचे अंतःकरण आनंदाने भरलेले असते आणि तुम्हाला तुमच्या श्रमांचे फळ मिळते, त्या वेळी पुरेसे सत्य प्राप्त झाले नाही, म्हणून तुम्हाला कधी निराश वाटत नाही का? माझी कृपादृष्टी न मिळाल्याबद्दल तुम्ही कधी शोक केला आहे का? आपल्या अपत्यांच्या हितांसाठी तुम्ही आपल्या मेंदूला खूप शिणवता आणि त्यांच्याकरता खूप त्रास सहन करता, तरीही तुम्ही समाधानी नसता. तुम्ही त्यांच्यासाठी पुरेसे कष्ट घेतलेले नाहीत व आपल्या अपत्यांसाठी जे काही करता येईल, ते सर्व तुम्ही केलेले नाही, असेच तुम्हाला वाटत राहते. तथापि, माझ्याबाबतीत मात्र तुम्ही नेहमीच उदासीन आणि निष्काळजी राहिलेले आहात. मी तुमच्या स्मरणातच असतो खरा, पण तुमच्या हृदयात कधीच वास करत नाही. माझी तुमच्या बाबतीतील सातत्यपूर्णता आणि प्रयत्न तुम्हाला कधीच जाणवत नाहीत आणि तुम्हाला या गोष्टींचे कधीही कौतुकही वाटत नाही. तुम्ही केवळ अल्पकाळापुरतेच माझ्या चिंतनात गुंतलेले असता आणि तुम्हाला वाटते की, एवढे केले तरी पुरे होईल. मी तुमच्या अशा “निष्ठेची” कधीही मनापासून वाट पाहिलेली नाही, उलट याची मी फार पूर्वीपासून घृणाच करत आलो आहे. असे असले, मी काहीही म्हणालो तरी तुम्ही त्यातल्या फक्त एखाद-दोन गोष्टीच मान्य करता. तुम्ही हे सत्य पूर्णपणे स्वीकारू शकत नाही, याचे कारण तुम्हाला सर्वांना फाजील “आत्मविश्वास” असतो आणि तुम्ही नेहमी माझ्या वचनांमधून काय स्वीकारायचे ते सोयीस्करपणे निवडून घेता. जर तुम्ही आजही असेच वागत असाल, तर तुमच्या वृथा आत्मविश्वासाला सामोरे जाण्यासाठी माझ्याकडेही काही योजना आहेत. एवढेच नव्हे, तर माझी सर्व वचने खरी आहेत आणि त्यात कुठेही तथ्यांचा विपर्यास केला गेलेला नाही, हे स्वीकारायला मी तुम्हाला भाग पाडेन.
जर मी आत्ता तुमच्यासमोर काही धन ठेवून तुम्हाला निवडीचे स्वातंत्र्य दिले—आणि जर त्यातल्या तुमच्या निवडीवर मी वर टीका केली नाही—तर तुमच्यापैकी बहुतेकजण धनच निवडतील आणि सत्याचा त्याग करतील. तुमच्यातील जे जरा चांगले असतील, ते धनाचा मोह सोडून देतील आणि काहीशा अनिच्छेनेच सत्याची निवड करतील. जे या दोहोंच्या मधले लोक आहेत, ते एका हाताने धन धरून ठेवतील आणि दुसऱ्या हाताने सत्यालाही स्पर्श करतील. या वागण्यातून तुमचे खरे रंग आपोआप उघड होतील, नाही का? सत्य आणि तुम्ही ज्या प्रिय गोष्टींशी एकनिष्ठ आहात या दोहोंमधून निवड करताना, तुम्ही सर्वचजण अशाच प्रकारची निवड कराल आणि तुमची वृत्ती आहे तशीच राहील. असेच असणार आहे, नाही का? तुमच्यातील अनेक लोक योग्य व अयोग्य यांदरम्यानच्या कात्रीत सापडलेले असतात ना? सकारात्मक आणि नकारात्मक, काळा आणि पांढरा यांच्यातील द्वंद्वामध्ये, तुम्ही कुटुंब आणि देव, मुले आणि देव, शांतता आणि अशांतता, श्रीमंती आणि गरिबी, प्रतिष्ठा आणि सामान्यता, समाजमान्यता असणे आणि वाळीत टाकले जाणे, यामध्ये केलेल्या निवडींची तुम्हाला नक्कीच जाणीव असेल. एक समाधानी कुटुंब आणि भग्न कुटुंब यांच्यामध्ये, तुम्ही निःसंकोचपणे समाधानी कुटुंबाची निवड केलीत; धन आणि कर्तव्य या दोहोंमध्येही तुम्ही पहिला पर्यायच निवडलात, अगदी अनैतिक मार्गांपासून मागे परतण्याची इच्छा नसतानाही तुम्ही हे केलंत;[अ] चैनी जीवनशैली आणि दारिद्र्य यांमध्येही तुम्ही पहिलाच पर्याय निवडलात; तुमची मुले, मुली, पत्नी वा पती आणि मी यांमध्ये निवड करतानाही तुम्ही पहिला पर्याय निवडलात. धारणा आणि सत्य यांच्यात निवड करतानाही, तुम्ही पहिला पर्याय निवडलात. तुमच्या सर्व प्रकारच्या वाईट कृत्यांना सामोरे गेल्यावर, आता माझा तुमच्यावरचा विश्वासच उडाला आहे. तुम्ही किती पाषाणहृदयी आहात, याचे मला खरोखर आश्चर्य वाटते. अनेक वर्षांचे समर्पण आणि परिश्रम यांनंतरही मला तुमच्याकडून त्याग आणि निराशेपेक्षा काहीच वेगळे मिळालेले नाही, परंतु तरीही प्रत्येक सरत्या दिवसासोबत तुमच्याबद्दल माझ्या आशा मात्र दुणावत जातात, कारण माझा प्रकाशमान दिवस सर्वांसमोर पूर्णपणे खुला आहे. तरीही तुम्ही मात्र काळोख्या आणि अनैतिक गोष्टी शोधत राहता आणि त्यावरील आपली पकड सोडण्यास नकार देता. मग, तुमची परिणती आणखी काय होईल, याचा तुम्ही कधी काळजीपूर्वक विचार केला आहे का? जर तुम्हाला पुन्हा निवड करण्यास सांगितले, तर तुमची मन:स्थिती काय असेल? तरीही तुम्ही पहिला पर्यायच निवडाल का? तरीही तुम्ही मला निराशा आणि पराकोटीचं दुःखच द्याल का? तरीही तुमच्या अंतःकरणात माझ्याबद्दल अगदी अल्पच प्रेम असेल का? माझ्या हृदयाचे सांत्वन कसे करावे याबद्दल तेव्हाही तुम्हाला काहीच समजले नसेल का? या क्षणी तुम्ही कशाची निवड करता आहात? तुम्ही माझ्या शब्दांना शरण जाल की त्यांना कंटाळाल? माझा प्रकाशमान दिवस तुमच्या डोळ्यांसमोर स्पष्ट उघड केलेला आहे आणि आता तुम्ही एका नवीन जीवनाचा आणि नवीन प्रारंभबिंदूचा सामना करीत आहात. तथापि, मी तुम्हाला हे सांगितले पाहिजे, की असा प्रारंभबिंदू म्हणजे मागील नवीन कार्याचा प्रारंभ नसून जुन्या कार्याचा अंत आहे. अर्थातच ही त्यासाठीची अंतिम कृती आहे. मला वाटतं, की या प्रारंभबिंदूमध्ये काय असामान्य आहे हे तुम्हाला सर्वांना काहीसं समजत असेल. तथापि, लवकरच एक दिवस, तुम्हाला या प्रारंभबिंदूचा खरा अर्थ समजेल, म्हणूनच, चला आपण सर्व मिळून यातून पुढे जाऊ या आणि नजीक येत असलेल्या जुन्याच्या अंताचे स्वागत करू या! परंतु, जेव्हा अन्याय आणि न्यायाचा सामना करावा लागतो, तेव्हा तुम्ही नेहमी अन्यायाचीच निवड करता, याबाबत मला तुमच्याबद्दल सतत चिंता वाटत असते. तथापि, ते सर्व तुमच्या भूतकाळात घडलेले आहे. माझ्यासाठी तुमचे भूतकाळातील वागणे विसरणे खूप कठीण असले, तरीदेखील मी ते विसरण्याची आशा करतो. अर्थात, हे करण्यासाठीचा माझ्याकडे एक चांगला मार्ग आहे: तो म्हणजे भविष्याला भूतकाळाची जागा घेऊ द्या, आणि तुमच्या भूतकाळाच्या काळ्या सावल्या तुमच्या आजच्या निखळ ‘स्व’ च्या बदल्यात दूर होऊ द्या. अशा प्रकारे मी तुम्हाला पुन्हा एकदा निवड करण्याचे कष्ट घ्यायला लावतो आहे: तुम्ही नेमके कोणाशी एकनिष्ठ आहात?
तळटीप:
अ. किनाऱ्याकडे परत जा: एक चिनी म्हण, ज्याचा अर्थ “एखाद्याच्या पापी मार्गापासून दूर जा.”