अध्याय १२
पूर्वेकडून जेव्हा विजा चमकतात, तोच नेमका असा क्षण आहे की मी माझी वचने उच्चारण्यास सुरुवात करतो—जेव्हा विजा चमकतात, तेव्हा संपूर्ण विश्व प्रकाशित होते आणि सर्व ताऱ्यांमध्ये परिवर्तन घडते. संपूर्ण मानवजात जणू वेगळी केल्यासारखी होते. पूर्वेकडील या प्रकाशझोताच्या खाली, सर्व मानवजात त्यांच्या मूळ रूपात प्रकट होते, त्यांचे डोळे दिपतात, काय करावे हे त्यांना कळत नाही, आणि त्याहीपेक्षा त्यांची कुरूप देहवैशिष्ट्ये कशी झाकावीत हे त्यांना कळत नाही. तसेच ते माझ्या प्रकाशापासून पळणाऱ्या आणि पर्वतांतील गुहांमध्ये आश्रय घेणाऱ्या पशूंसारखे असतात—तरीही माझ्या प्रकाशापासून त्यांच्यातील कोणीही बचावू शकत नाही. सर्व मनुष्य आश्चर्यचकित झालेले असतात, प्रतीक्षा करत असतात, पाहत असतात; माझ्या प्रकाशाचा प्रारंभ झाल्याने सर्वजण त्यांच्या जन्मदिवसाचा आनंद साजरा करत असतात आणि त्याचप्रमाणे सर्वजण ते जन्माला आले त्या दिवसाचा धिक्कारही करतात. परस्परविरोधी भावना स्पष्ट करणे अशक्य असते; आत्मधिक्काराच्या अश्रूंच्या नद्या तयार होतात आणि त्यात जोराच्या प्रवाहात त्या दूर वाहून जातात, एका क्षणात त्यांचा मागमूसही उरत नाही. पुन्हा एकदा, माझा दिवस सर्व मानवजातीवर दबाव आणतो, पुन्हा एकदा मानववंशाला उत्तेजित करतो, मानवजातीला आणखी एक नवी सुरुवात देतो. माझे हृदय धडधडते आणि, माझ्या हृदयाच्या ठोक्यांच्या तालावर पर्वत आनंदाने उड्या मारतात, जल आनंदाने नाचते आणि खडकाळ कड्यांवर लाटा आघात करतात. माझ्या हृदयात काय आहे हे व्यक्त करणे कठीण आहे. मला माझ्या नजरेसमोर सर्व अस्वच्छ गोष्टी भस्मसात करायच्या आहेत; सर्व अवज्ञाकारी पुत्रांना मला माझ्या नजरेसमोरून अदृश्य करायचे आहे, जेणेकरून त्यांचे अस्तित्व उरणार नाही. मी त्या महान अग्निवर्ण अजगराच्या निवासस्थानात एक नवी सुरुवात केली आहे, इतकेच नव्हे तर मी विश्वात नवीन कार्यही सुरू केले आहे. लवकरच, पृथ्वीवरील राज्ये माझे राज्य होतील; माझ्या राज्यामुळे लवकरच, पृथ्वीवरील राज्यांचे अस्तित्व कायमचे संपुष्टात येईल, कारण मी आधीच विजय मिळवला आहे, कारण मी विजयी होऊन परतलो आहे. त्या महान अग्निवर्ण अजगराचा, पृथ्वीवरील माझे कार्य नष्ट करण्याच्या आशेने माझी योजना बिघडवण्याचा, पृथ्वीवरील माझे कार्य पुसून टाकण्याचा शक्य असलेला प्रत्येक मार्ग संपून गेलेला आहे, पण त्याच्या फसव्या डावपेचांमुळे मी हताश होऊन चालेल का? त्याच्या धमक्यांमुळे माझा आत्मविश्वास कमी होऊन मला घाबरवले जाऊ शकते का? मी ज्याला माझ्या तळहातावर धारण केले नाही असा एकही जीव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कधीही झालेला नाही; माझा विरोध म्हणून कार्य करणाऱ्या या साधनाच्या, या अग्निवर्ण अजगराच्या बाबतीत हे कितपत सत्य आहे? तेही माझ्या कुशलतेने हाताळावयाचे खेळणे असणारी एक वस्तुमात्रच नव्हे का?
मानवी जगातील माझ्या देहधारणादरम्यान, माझ्या मार्गदर्शनाखाली मानवजात अजाणता या दिवसापर्यंत पोहोचली आहे आणि अजाणता ती मला जाणू लागली आहे. पण, पुढे असणाऱ्या मार्गावरून कसे चालावे, याबाबत कोणालाही कल्पनादेखील नाही, कोणालाही त्याची जाणीव नाही—आणि तो मार्ग त्यांना कोणत्या दिशेला घेऊन जाईल याची तर कोणाला सुतराम कल्पना नाही. केवळ सर्वशक्तिमानाचे त्यांच्यावर लक्ष असतानाच मनुष्य त्या मार्गाच्या अंतापर्यंत पोहोचू शकतो; केवळ पूर्वेकडील आकाशातील विजांचे मार्गदर्शन घेऊनच मनुष्य माझ्या राज्याकडे आणणारा उंबरठा ओलांडू शकतो. मनुष्यांमध्ये, ज्याने माझा चेहरा पाहिला आहे, ज्याने पूर्वेकडील विजांचा कडकडाट पाहिला आहे असा कोणीही मनुष्य कधीही झालेला नाही; मग माझ्या सिंहासनावरून केलेले उच्चारण ऐकणारा मनुष्य कसा झालेला असेल? वस्तुतः, प्राचीन काळापासून, एकही मनुष्य माझ्या व्यक्तित्वाच्या थेट संपर्कात आलेला नाही; केवळ आजच, आता मी जगात आलेला असल्यामुळे, मनुष्यांना मला पाहण्याची संधी आहे. पण अजूनही, मनुष्य मला जाणत नाहीत, ते केवळ माझा चेहरा पाहतात आणि माझा आवाज ऐकतात, तरीही त्यांना माझा अर्थ समजत नाही. सर्व मनुष्य असेच आहेत. माझ्या लोकांपैकी एक असताना, माझा चेहरा पाहताना तुम्हाला गाढ अभिमान वाटत नाही का? आणि तुम्ही मला जाणत नाही याची तुम्हाला प्रचंड शरम वाटत नाही का? मी मनुष्यांमध्ये वावरतो आणि मनुष्यांमध्ये राहतो, कारण मी देहधारी झालो आहे आणि मानवी जगात आलो आहे. माझे ध्येय हे मानवजातीला केवळ माझा देह पाहण्यास सक्षम करणे इतकेच नाही; त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते मानवतेला मला जाणण्यास सक्षम करणे. त्याहीपेक्षा, माझ्या देहधारी शरीराच्या माध्यमातून मी मानवजातीला त्यांची पापे सिद्ध करून दाखवेन; माझ्या देहधारी शरीरातून मी अग्निवर्ण अजगराचा नाश करेन आणि त्याचे घर नष्ट करेन.
पृथ्वीवर राहणारे मनुष्य हे जरी ताऱ्यांइतके असंख्य असले, तरी मी त्या सर्वांना माझ्या स्वतःच्या तळहाताइतके स्पष्टपणे ओळखतो आणि, माझ्यावर “प्रेम” करणारे मनुष्य जरी समुद्रातील वाळूच्या कणांइतके असंख्य असले, तरी केवळ थोडेच जण मी निवडलेले असतात: केवळ तेच जे दीप्तिमान प्रकाशाचे अनुसरण करतात, जे माझ्यावर “प्रेम” करणाऱ्या मनुष्यांपेक्षा वेगळे असतात. मी मनुष्याला फार मोठाही समजत नाही, तसेच त्याला कमीही लेखत नाही; किंबहुना, मी मनुष्याच्या नैसर्गिक गुणांनुसार त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि म्हणून माझा प्रामाणिकपणे शोध घेणारी व्यक्ती मला हवी असते, जेणेकरून लोक निवडण्याचे माझे उद्दिष्ट मी साध्य करू शकेन. पर्वतराजीमध्ये असंख्य जंगली पशू असतात, पण ते माझ्यापुढे मेंढरांप्रमाणे गरीब असतात; लाटांखाली अथांग रहस्ये असतात, पण ती पृथ्वीच्या भूमीवरील सर्व वस्तूंइतक्याच स्पष्टपणे माझ्यासमोर प्रकट होतात; मनुष्य जिथे कधीही पोहोचू शकणार नाही असे प्रदेश आकाशस्थ स्वर्गात असतात, पण तरीही त्या अप्राप्य प्रदेशात मी मुक्तपणे विचरण करतो. मनुष्याने मला कधीही प्रकाशात ओळखलेले नाही, तर त्याने मला केवळ अंधाराच्या जगात पाहिलेले आहे. आज तुमचीही परिस्थिती अगदी अशीच नाही का? अग्निवर्ण अजगराच्या नाशाचा कळसाध्याय म्हणजे माझे कार्य करण्यासाठी औपचारिकरीत्या मी देह धारण केला. जेव्हा अग्निवर्ण अजगराने प्रथम त्याचे खरे रूप उघड केले, तेव्हा मी माझ्या नावाची साक्ष दिली. जेव्हा मी मानवजातीच्या मार्गांवरून चाललो, तेव्हा एकही जीव किंवा एकही व्यक्ती दचकून जागी झाली नाही आणि म्हणून मी जेव्हा मानवी जगात देहधारण केला, तेव्हा कोणालाही ते कळले नाही. पण जेव्हा माझ्या देहधारी रूपात मी माझे कार्य करू लागलो, तेव्हा मानवजात जागी झाली आणि माझ्या कडाडत्या आवाजाने त्यांना त्यांच्या स्वप्नांतून दचकून जागे केले आणि या क्षणापासून, त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जीवनाची सुरुवात केली. माझ्या लोकांमध्ये, मी पुन्हा एकदा नवीन कार्य सुरू केले आहे. पृथ्वीवरील माझे कार्य संपलेले नाही असे म्हणणे हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे, की ज्यांच्याबद्दल मी बोललो ते माझे लोक म्हणजे मी मनापासून अपेक्षा करतो ते लोक नव्हेत, पण तरीही, मी त्यांच्यातील काहींना निवडतो. यावरून हे स्पष्ट आहे की, मी माझ्या लोकांना देहधारी देवाला ओळखण्यास तसेच त्यांना शुद्ध करण्यासही मदत करतो. माझ्या व्यवस्थापकीय आदेशांच्या गंभीरतेमुळे, बहुसंख्य लोकांना अद्यापही माझ्याकडून बाहेर काढून टाकले जाण्याचा धोका आहे. तुम्ही स्वतःशी सामना करण्याचा, तुमच्या स्वतःच्या शरीराला नियंत्रित करण्याचा हरेक प्रयत्न केला नाही—तुम्ही जर हे केले नाही, तर तुम्ही खात्रीने एक अशी गोष्ट व्हाल ज्याचा मला तिरस्कार आहे आणि जी मी नाकारतो, जी नरकात टाकली जाते. ज्याप्रमाणे पौलाला थेट माझ्या हातून ताडण मिळाले, ज्यातून त्याची सुटका नव्हती तसेच. माझ्या वचनांतून तुम्हाला काही कळले आहे का? माझा उद्देश पूर्वीप्रमाणेच चर्च शुद्ध करणे, मला ज्यांची गरज आहे त्या लोकांना शुद्ध करत राहणे हा आहे, कारण मी स्वयमेव देव आहे, जो सर्वपवित्र आणि विशुद्ध आहे. मी माझे मंदिर इंद्रधनुष्याच्या रंगांनी केवळ प्रकाशमानच बनवणार नाही तर निष्कलंक स्वच्छही करेन, ज्याचा अंतर्भाग त्याच्या बाह्यभागाशी मिळता जुळता असेल. माझ्या उपस्थितीत, तुम्ही प्रत्येकाने भूतकाळात काय केले आहे याचे सिंहावलोकन करावे आणि आज तुम्ही माझ्या हृदयाचे पुरेपूर समाधान करण्याचा निर्धार करू शकता का हे ठरवावे.
मनुष्य मला माझ्या देहरूपात तर ओळखत नाहीच व एव्हढेच नाही तर; त्याहीपेक्षा, तो देहधारी शरीरात वसणाऱ्या त्याच्या स्व-रूपाला ओळखण्यातही अपयशीच ठरला आहे. अनेक वर्षे, मनुष्य मला फसवत आला आहे, मला परकी पाहुणा म्हणून वागवत आला आहे. अनेक वेळा, त्यांनी मला “त्यांच्या घराच्या दाराबाहेर” ठेवले आहे; अनेक वेळा, माझ्यासमोर उभे असतानाही त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे; अनेक वेळा त्यांनी इतर लोकांमध्ये माझा त्याग केला आहे; अनेक वेळा त्यांनी सैतानाच्या समक्ष मला नाकारले आहे; आणि अनेक वेळा त्यांनी त्यांच्या बरळणाऱ्या मुखांनी माझ्यावर हल्ला केला आहे. तरीही मी मनुष्याच्या उणिवांचा जमाखर्च ठेवत नाही किंवा त्याने अवज्ञेबद्दल डोळ्यासाठी डोळा मागण्याची भूमिका ठेवत नाही. मी त्याचा असाध्य आजार बरा करण्यासाठी त्याच्या आजारांवर केवळ औषधच लावले आहे आणि त्याद्वारे त्याला पुन्हा आरोग्य दिले आहे, जेणेकरून तो मला ओळखू शकेल. मी जे कार्य केले आहे ते सर्व मानवजात टिकून राहण्यासाठी, मानवजातीला जीवनात एक संधी देण्यासाठीच नाही का? अनेकदा मी मनुष्यांच्या जगात आलो आहे, पण मी माझ्या स्वतःच्या व्यक्तित्वाने जगात आल्यामुळे मनुष्यांनी मला आदर दिला नाही; उलट प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटेल तसे आणि मार्ग सापडेल तसे वर्तन केले. जगातील प्रत्येक मार्ग माझ्याच हातून येतो हे त्यांना माहीतच नाही! जगातील प्रत्येक गोष्ट माझ्या आदेशाच्या अधीन असते हे त्यांना माहीतच नाही! तुमच्यापैकी कोण आपल्या हृदयात नाराजी जोपासण्याचे धाडस करेल? तुमच्यापैकी कोण क्षुल्लकपणे निष्कर्षाप्रत येण्याचे धाडस करेल? मी मानवजातीमधील माझे कार्य शांतपणे चालू ठेवले आहे—बस इतकेच. माझ्या देहधारणेच्या काळात जर मला मनुष्याच्या उणिवांबद्दल सहानुभूती वाटली नसती, तर केवळ माझ्या देहधारणेमुळे, सर्व मानवजात घाबरून गर्भगळित झाली असती आणि परिणामी नरकात गेली असती. मी स्वतःला नम्र केल्यामुळेच आणि लपवून ठेवल्यामुळेच मानवजातीची संकटातून सुटका झाली, ते माझ्या ताडणापासून मुक्त झाले आणि अशा प्रकारे, ते आजच्या टप्प्यावर आले. आजच्या टप्प्यावर पोहोचणे किती कठीण होते हे ध्यानात ठेवून, अद्याप येणार असलेला उद्याचा दिवस तुम्ही अधिकच जपायला नको का?
८ मार्च १९९२