देवाचा न्याय आणि ताडण यांमध्ये देवाचे स्वरूप पाहणे

प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुसरण करणार्‍या कोट्यवधी लोकांप्रमाणे, आम्ही बायबलच्या नियमशास्त्रांचे आणि आज्ञांचे पालन करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या विपुल कृपेचा आनंद घेतो व एकत्र जमतो, प्रार्थना करतो, स्तुती करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सेवा करतो—आणि हे सर्व आम्ही प्रभूच्या देखरेखीखाली व संरक्षणाखाली करतो. आम्ही अनेकदा कमकुवत असतो आणि अनेकदा बलवानही असतो. आमच्या सर्व कृती प्रभूच्या शिकवणुकीनुसार आहेत असा आमचा विश्वास आहे. हे सांगण्याची गरज नाही, की आम्ही स्वतःला स्वर्गातील पित्याच्या इच्छेनुसार वागण्याच्या मार्गावर असल्याचे मानतो. आम्ही प्रभू येशूच्या पुनरागमनासाठी, त्याच्या गौरवशाली अवरोहणासाठी, पृथ्वीवरील आमच्या जीवनाच्या समाप्तीसाठी, राज्याच्या आगमनासाठी व प्रकटीकरणाच्या पुस्तकात भाकीत केलेल्या सर्व गोष्टींसाठी आतुर आहोत: प्रभू येतो, तो आपत्ती आणतो, तो चांगल्याला बक्षीस देतो आणि दुष्टांना शिक्षा देतो व जे त्याचे अनुसरण करतात आणि त्याच्या पुनरागमनाचे स्वागत करतात, त्या सर्वांना तो हवेत भेटण्यासाठी घेऊन जातो. जेव्हा आम्ही याचा विचार करतो, तेव्हा आम्ही भावनेवर मात करू शकत नाही, आम्ही शेवटच्या दिवसात जन्मलो आहोत व प्रभूच्या आगमनाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे, याबद्दल आनंदी होतो. आमचा छळ झाला असला तरी, त्या बदल्यात आम्हाला “मर्यादांपलिकडे जाणारा आणि चिरंतन असा गौरवाचा भार” मिळालेला आहे. हा मोठा आशीर्वाद आहे! ही सर्व उत्कंठा आणि प्रभूने दिलेली कृपा प्रार्थनेसाठी आम्हाला सदैव शांत करते व एकत्र येण्यासाठी अधिक मेहनती बनवते. कदाचित पुढच्या वर्षी, कदाचित उद्या आणि कदाचित मनुष्याच्या कल्पनेपेक्षा कमी कालावधीत, प्रभू अचानक खाली अवतरेल, त्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या लोकांच्या समूहामध्ये त्याचे आगमन होईल. आम्ही एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी घाई करतो, कोणाचीही मागे पडण्याची तयारी नसते, प्रभूचे आगमन पाहणाऱ्यांच्या पहिल्या समूहात असावे, स्वर्गारोहण लाभलेल्या लोकांमध्ये असावे, यासाठी हे सर्व असते. हा दिवस यावा म्हणून आम्ही किमतीकडे दुर्लक्ष करून सर्व काही दिले आहे; काहींनी त्यांचे कामधाम सोडले आहे, काहींनी त्यांच्या कुटुंबाचा त्याग केला आहे, काहींनी लग्नाचा त्याग केला आहे व काहींनी आपली सर्व जमापुंजी दान केली आहे. किती ती निस्वार्थ भक्ती! अशी मनःपूर्वकता आणि निष्ठा भूतकाळातील संतांच्याही पलीकडे आहे! प्रभू त्याला हवे त्याच्यावर कृपा करत असतो व त्याला हवे त्याच्यावर दया दाखवत असतो, म्हणून आपली भक्ती आणि खर्च करण्याची कृती त्याच्या डोळ्यांनी फार पूर्वीपासून पाहिली आहे, असे आम्हाला वाटते. आम्ही मनःपूर्वक केलेल्या प्रार्थनादेखील त्याच्या कानापर्यंत पोहोचल्या आहेत व प्रभू आम्हाला आमच्या समर्पणाचा मोबदला देईल, असा आम्हाला विश्वास आहे. एवढेच नव्हे, तर देवाने हे जग निर्माण करण्यापूर्वी आमच्यावर कृपा केली होती आणि कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही असे आशीर्वाद व वचने त्याने आम्हाला दिली आहेत. आम्ही सर्वजण भविष्यासाठी योजना आखत आहोत आणि अर्थातच, प्रभूला हवेत भेटण्यासाठी स्वर्गारोहणाच्या बदल्यात आमचे समर्पण दिले आहे व खर्च केला आहे. इतकेच काय, आम्ही कोणत्याही प्रकारचा संकोच न करता, सर्व राष्ट्रे आणि सर्व लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी किंवा राजा म्हणून राज्य करण्यासाठी स्वतःला भविष्याच्या सिंहासनावर बसवले आहे. आम्ही हे सर्व दिलेले म्हणून घेतो, अपेक्षित काहीतरी म्हणून घेतो.

प्रभू येशूच्या विरोधात असलेल्या सर्वांचा आम्ही तिरस्कार करतो; त्यांचा सर्वनाश होईल. प्रभू येशू हा तारणारा आहे यावर विश्वास ठेवू नका, असे त्यांना कोणी सांगितले? अर्थात, अशा काही वेळा असतात जेव्हा आम्ही प्रभू येशूचे अनुकरण करत जगातील लोकांप्रति दयाळूपणे वागतो, कारण त्यांना पुरेशी जाण नसते व आम्ही त्यांच्याबद्दल सहिष्णु आणि क्षमाशील असणे योग्य असते. आम्ही जे काही करतो ते बायबलमधील वचनांनुसार असते, कारण बायबलशी सुसंगत नसलेली प्रत्येक गोष्ट अधर्मी व पाखंडी असते. या प्रकारचा विश्वास आम्हा प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेला आहे. आमचा प्रभू बायबलमध्ये आहे आणि जर आम्ही बायबलपासून दूर गेलो नाही तर आम्ही प्रभूपासून दूर जाणार नाही; जर आम्ही या तत्त्वाचे पालन केले तर आम्हाला तारण मिळेल. आम्ही एकमेकांना प्रोत्साहन देतो, एकमेकांना आधार देतो व प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही एकत्र जमतो, आम्ही आशा करतो की आम्ही जे काही बोलतो आणि करतो ते प्रभूच्या इच्छेनुसार आहे व प्रभूसाठी स्वीकार्य आहे. आमच्या वातावरणाचा तीव्र विरोध असूनही, आमचे अंतःकरण आनंदाने भरलेले आहे. इतक्या सहज आवाक्यात असलेल्या आशीर्वादांचा आम्ही विचार करतो, तेव्हा आम्ही बाजूला ठेवू शकत नाही असे काही आहे का? असे काही आहे का, जे गमावण्यास आम्ही नाखूष आहोत? हे सर्व सांगण्याची गरज नसते आणि या सर्वावर देवाची सावध नजर असते. शेणाच्या ढिगाऱ्यातून उचलले गेलेले आम्ही मूठभर गरजू हे प्रभू येशूच्या सर्व सामान्य अनुयायांप्रमाणेच आहोत, स्वर्गारोहण लाभण्याची, आशीर्वादित होण्याची व सर्व राष्ट्रांवर राज्य करण्याची स्वप्ने पाहत आहोत. देवाच्या नजरेत आमचा भ्रष्टाचार उघड झाला आहे आणि आमच्या इच्छा व लोभ देवाच्या नजरेत दोषी ठरला आहे. तरीसुद्धा, हे सर्व इतके सामान्यपणे आणि इतके तार्किकदृष्ट्या घडते, की आमच्यापैकी कोणीही हा विचार करत नाही की आमची इच्छा योग्य आहे की नाही, मग आम्ही धरलेल्या प्रत्येक गोष्टीच्या अचूकतेबद्दल आमच्यापैकी कोणालाही शंका येणे तर दूरच. देवाची इच्छा कोण जाणू शकेल? मनुष्य ज्या मार्गाने चालतो तो नेमका कोणता, याचा शोध घेणे आम्हाला माहीत नाही व आम्हाला त्याबद्दल जाणून घेण्यातही रस नाही. कारण आम्हाला केवळ याचीच काळजी असते, की आम्हाला स्वर्गारोहण लाभेल की नाही, आम्ही आशीर्वादित होऊ शकतो की नाही, स्वर्गाच्या राज्यात आमच्यासाठी जागा आहे की नाही आणि जीवनसरितेच्या पाण्याचा वाटा आम्हाला मिळेल की नाही व जीवनाच्या झाडाचे फळ आम्हाला मिळेल की नाही. या गोष्टी मिळवण्यासाठीच आम्ही प्रभूवर विश्वास ठेवून त्याचे अनुयायी बनत नाही का? आमच्या पापांना क्षमा केली आहे, आम्ही पश्चात्ताप केला आहे, आम्ही द्राक्षारसाचा कटू प्याला प्राशन केला आहे आणि आम्ही आमच्या पाठीवर वधस्तंभ ठेवला आहे. आम्ही मोजलेली किंमत प्रभू स्वीकारणार नाही, असे कोण म्हणू शकेल? आम्ही पुरेसे तेल तयार केले नाही, असे कोण म्हणू शकेल? आम्ही त्या मूर्ख कुमारिका किंवा त्यागलेल्यांपैकी एक होऊ इच्छित नाही. शिवाय, आम्ही निरंतर प्रार्थना करतो, खोट्या ख्रिस्तांकडून फसवले जाण्यापासून आम्हाला वाचवण्याची विनंती करतो, कारण बायबलमध्ये असे म्हटले आहे: “त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हटले, ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे’ किंवा ‘तेथे आहे,’ तर ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील’” (मत्तय २४:२३-२४). आम्ही सर्वांनी बायबलच्या या वचनांना स्मरणात ठेवले आहे; आम्ही त्यांना तोंडपाठ ओळखतो व आम्ही एक मौल्यवान खजिना म्हणून, जीवन म्हणून आणि पत पत्र म्हणून त्याकडे पाहतो, जे ठरवते की आम्ही वाचवले जाऊ की स्वर्गारोहण करू …

हजारो वर्षे, जिवंत लोक त्यांच्या उत्कट इच्छा व स्वप्ने सोबत घेऊन निघून गेले आहेत, परंतु ते स्वर्गाच्या राज्यात गेले आहेत की नाही हे कोणालाही खरोखर माहीत नाही. मृत परत येतात, एकदा घडलेल्या सर्व कथा विसरून जातात आणि ते अजूनही पूर्वजांच्या शिकवणीचे व मार्गांचे अनुसरण करतात. आणि अशाप्रकारे, जसजशी वर्षे सरतात व दिवस निघून जातात, तसतसे आम्ही जे काही करतो ते आमचा प्रभू येशू, आमचा देव खरोखर स्वीकारतो की नाही हे कोणालाच कळत नाही. आम्ही केवळ निकालाची वाट पाहत राहू शकतो आणि जे काही घडेल त्याबद्दल अंदाज लावू शकतो. तरीही देवाने सातत्याने मौन पाळले आहे, तो कधीही आम्हाला दिसत नाही, कधीही आमच्याशी बोलत नाही. आणि म्हणून, बायबलचे अनुसरण करून व संकेतांनुसार, आम्ही देवाच्या इच्छेबद्दल आणि प्रवृत्तीबद्दल मनमानीपणे अंदाज मांडतो. आम्हाला देवाच्या मौनाची सवय झाली आहे; स्वतःच्या विचारपद्धतीने आमचे आचरण योग्य व अयोग्य हे जोखण्याची आम्हाला सवय झाली आहे; देवाच्या आमच्याकडून असलेल्या मागण्यांऐवजी आमच्या ज्ञानावर, धारणांवर आणि नैतिकतेवर अवलंबून राहण्याची आम्हाला सवय झाली आहे; देवाच्या कृपेचा उपभोग घेण्याची आम्हाला सवय झाली आहे; आम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा देवाने मदत करण्याची सवय झाली आहे; सर्व गोष्टींसाठी देवापुढे हात पसरण्याची व देवाला आज्ञा देण्याची आम्हाला सवय झाली आहे; आम्हाला नियमांचे पालन करण्याचीदेखील सवय झाली आहे, पवित्र आत्मा आम्हाला कसे मार्गदर्शन करतो याकडे आमचे लक्ष नाही आणि त्याहीपेक्षा, ज्या दिवसात आम्ही स्वतःचे मालक असतो त्या दिवसांची आम्हाला सवय झाली आहे. आम्ही अशा देवावर विश्वास ठेवतो, ज्याला आम्ही कधीही समोरासमोर भेटलो नाही. त्याची प्रवृत्ती कशी आहे, तो काय आहे व त्याच्याकडे काय आहे, त्याची प्रतिमा कशी आहे, तो आल्यावर आम्ही त्याला ओळखू की नाही, इत्यादी प्रश्न—यापैकी काहीही महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे ते म्हणजे, तो आमच्या अंतःकरणात आहे आणि आम्ही सर्व त्याची वाट पाहत आहोत व तो असा आहे किंवा तसा आहे याची कल्पना करण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्ही आमच्या विश्वासाची कदर करतो आणि आमच्या आध्यात्मिकतेचा ठेवा जपतो. आम्ही या सर्व गोष्टींकडे शेणाप्रमाणे पाहतो व सर्व गोष्टी पायाखाली तुडवतो. कारण आम्ही तेजस्वी प्रभूवर विश्वास ठेवणारे आहोत, प्रवास कितीही दूरचा आणि खडतर असो, कितीही अडचणी व संकटे येवोत, प्रभूचे अनुसरण करत असताना आमची पावले थांबू शकत नाही. “देवाच्या व कोकर्‍याच्या राजासनापासून जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी निघाली. नदीच्या दोन्ही बाजूंना बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास आपली फळे देत होते: आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या सुधारणेसाठी होती: आणि तेथे काहीही शापित असणार नाही: तर त्यात देवाचे व कोकराचे राजासन राहिल; आणि त्याचे दास त्याची सेवा करतील: ते त्याचा चेहरा पाहतील; व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. आणि तेथे रात्र असणार नाही; आणि त्यांना ना दिव्याची गरज ना सूर्याच्या प्रकाशाची; कारण प्रभू देव त्यांना प्रकाश देईल: आणि ते युगानुयुग राज्य करतील” (प्रकटीकरण 22:1-5). प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही ही वचने गातो, तेव्हा आमचे अंतःकरण अमर्याद आनंद व समाधानाने भरून जाते आणि डोळ्यांतून अश्रू वाहतात. आम्हाला निवडल्याबद्दल आम्ही प्रभूचे आभार मानतो, त्याच्या कृपेसाठी प्रभूचे आभार मानतो. त्याने आम्हाला या जीवनात शंभरपट दिले आहे व आम्हाला येणाऱ्या जगात अनंतकाळचे जीवन दिले आहे. जर तो आम्हाला आता मरण्यास सांगणार असेल, तर आम्ही थोडीही तक्रार न करता तसे करू. हे प्रभू! कृपया लवकर ये! आम्ही तुझ्यासाठी किती उत्कंठेने आसुसलेले आहोत आणि तुझ्यासाठी सर्व काही त्यागले आहे हे लक्षात घेता, एक मिनिट, एक सेकंद अधिक विलंब करू नकोस.

देव शांत आहे व त्याने आम्हाला कधीच दर्शन दिलेले नाही, तरीही त्याचे कार्य कधीही थांबलेले नाही. तो संपूर्ण पृथ्वीचे सर्वेक्षण करतो आणि सर्व गोष्टींवर स्वामित्व राखतो व मनुष्याची सर्व वचने आणि कृती पाहतो. तो त्याचे व्यवस्थापन मोजूनमापून व त्याच्या योजनेनुसार, शांतपणे आणि नाट्यमय परिणामाविना करतो, तरीही त्याची पावले एक एक करून मानवजातीच्या अधिक जवळ जातात व त्याचे न्यायाचे आसन विजेच्या वेगाने विश्वात तैनात केले जाते, त्यानंतर त्याचे सिंहासन ताबडतोब आमच्यामध्ये उतरते. केवढा भव्य देखावा आहे हा, किती भव्य आणि पवित्र दृश्य! एखाद्या पारव्यासारखा आणि गर्जणाऱ्या सिंहासारखा आत्मा आमच्यामध्ये येतो. तो शहाणपणा आहे, तो नीतिमत्त्व व वैभव आहे आणि तो हळुवारपणे आमच्यामध्ये येतो, अधिकार चालवतो व प्रेम आणि दयेने भरलेला असतो. कोणालाच त्याच्या आगमनाची जाणीव नसते, कोणीही त्याच्या आगमनाचे स्वागत करत नाही, एवढेच नव्हे तर तो जे काही करणार आहे ते कोणालाच माहीत नसते. मनुष्याचे आयुष्य पूर्वीसारखेच सुरू राहते, त्याचे हृदय काही वेगळे नसते व दिवस नेहमीप्रमाणेच जातात. देव आमच्यामध्ये, इतर मनुष्यांसारखाच एक मनुष्य म्हणून अनुयायांपैकी सर्वात नगण्य आणि एक सामान्य श्रद्धाळू म्हणून राहतो. त्याला स्वतःचे प्रयत्न आहेत, स्वतःची ध्येये आहेत; एवढेच नव्हे तर त्याला दैवत्व आहे जे सामान्य मनुष्याकडे नाही. त्याच्या दैवत्वाचे अस्तित्व कोणाच्याही लक्षात आले नाही व त्याचे मूलतत्त्व आणि मनुष्याचे मूलतत्त्व यांच्यातील फरक कोणालाच कळला नाही. आम्ही त्याच्याबरोबर एकत्र राहतो, निर्बंधमुक्त व निर्भय, कारण आमच्या नजरेत तो एक सामान्य श्रद्धाळू असतो. तो आमची प्रत्येक हालचाल पाहतो आणि आमचे सर्व विचार व कल्पना त्याच्यासमोर उघडपणे मांडल्या जातात. कोणीही त्याच्या अस्तित्वात रस घेत नाही, कोणीही त्याच्या कार्याबद्दल काहीही कल्पना करत नाही, एवढेच नव्हे तर कोणाला त्याच्या ओळखीबद्दल अंधुकशीही शंका नसते. आम्ही केवळ आमचे प्रयत्न करत असतो, जणू काही “त्याचा” आमच्याशी काही संबंध नाही …

योगायोगाने, पवित्र आत्मा त्याच्या “माध्यमातून” वचनांचा उतारा व्यक्त करतो आणि जरी ते खूप अनपेक्षित वाटत असले तरी, आम्ही ते देवाकडून आलेले वचन म्हणून ओळखतो व देवाकडून ते सहजपणे स्वीकारतो. कारण, ही वचने कोणीही व्यक्त करत असले तरीही, जोपर्यंत ती पवित्र आत्म्याकडून येतात, तोपर्यंत आम्ही ती स्वीकारली पाहिजेत आणि ते नाकारू नयेत. पुढील उच्चार माझ्याद्वारे किंवा तुझ्याद्वारे किंवा इतर कोणाकडूनही येऊ शकतात. तो कोणीही असला, तरी ही सर्व देवाची कृपा आहे. तरीही, तो कोणीही असला, तरी आम्ही या व्यक्तीची उपासना करू शकत नाही, काहीही झाले तरी, ही व्यक्ती देव असू शकत नाही किंवा आम्ही कोणत्याही प्रकारे अशा सामान्य मनुष्याला देव म्हणून निवडणार नाही. आमचा देव खूप महान व आदरणीय आहे; इतका क्षुद्र मनुष्य त्याच्या जागी कसा उभा राहू शकेल? इतकेच काय, देव येण्याची आणि स्वर्गाच्या राज्यात परत घेऊन जाण्याची आम्ही वाट पाहत आहोत, मग इतक्या क्षुल्लक व्यक्तीने इतके महत्त्वाचे व कठीण कार्य कसे केले असेल? जर प्रभू पुन्हा आला, तर तो पांढऱ्या मेघावर असावा, जेणेकरून सर्व लोकसमुदाय पाहू शकतील. ते किती वैभवशाली असेल! सामान्य लोकांच्या समूहामध्ये तो गुप्तपणे लपून राहू शकतो हे कसे शक्य आहे?

आणि तरीही लोकांच्या मध्ये लपलेला हा सामान्य मनुष्यच आम्हाला वाचवण्याचे नवीन कार्य करतो आहे. तो आम्हाला कोणतेही स्पष्टीकरण देत नाही किंवा तो का आला आहे हे सांगत नाही, परंतु तो केवळ मोजूनमापून व त्याच्या योजनेनुसार इच्छित कार्य करतो. त्याची वचने आणि उच्चार अधिक वारंवार होत आहेत. सांत्वन, उपदेश, स्मरण व चेतावणीपासून ते निंदा आणि शिस्त लावण्यापर्यंत; सौम्य व हळुवार स्वरापासून ते भयंकर आणि वैभवशाली वचनांपर्यंत—हे सर्व मनुष्यावर दया करते व त्याच्यामध्ये भीती निर्माण करते. तो जे बोलतो ते सर्व आमच्यात खोलवर दडलेल्या रहस्यांमध्ये वास करते; त्याची वचने आमच्या अंतःकरणाला डंख मारतात, आमच्या आत्म्याला डंख मारतात आणि आम्हाला असह्य लज्जेने भरून टाकतात, स्वतःला कुठे लपवायचे हे आम्हाला कळत नाही. या व्यक्तीच्या हृदयातील देव खरोखरच आमच्यावर प्रेम करतो की नाही व तो नेमका काय करत आहे, याचा आम्ही विचार करू लागतो. कदाचित हे दुःख सहन केल्यानंतरच आम्हाला स्वर्गारोहण लाभू शकेल? आमच्या डोक्यात, आम्ही गणना करत असतो … येणार्‍या गंतव्यस्थानाबद्दल आणि आमच्या भविष्यातील प्राक्तनाबद्दल. तरीही, पूर्वीप्रमाणेच, आमच्यापैकी कोणीही विश्वास ठेवत नाही, की देवाने आमच्यामध्ये कार्य करण्यासाठी आधीच देह धारण केला आहे. एवढा प्रदीर्घ काळ तो आमच्यासोबत असतानाही, त्याने आमच्याशी समोरासमोर अनेक शब्द बोलूनही, असा सामान्य मनुष्य आमच्या भविष्याचा देव आहे, हे आम्ही मानायला तयार नसतो, मग अशा क्षुल्लक व्यक्तीच्या हाती आमचे भविष्य व आमचे प्राक्तन यांचे नियंत्रण सोपवणे तर आणखीच दूर. त्याच्याकडून आम्ही जिवंत झऱ्याचा अविरत पुरवठा उपभोगतो आणि त्याच्याद्वारे आम्ही देवासोबत समोरासमोर राहतो. परंतु आम्ही केवळ स्वर्गातील प्रभू येशूच्या कृपेबद्दल कृतज्ञ असतो व दैवत्व धारण केलेल्या या सामान्य व्यक्तीच्या भावनांकडे कधीही लक्ष देत नाही. तरीही, पूर्वीप्रमाणेच, तो त्याचे कार्य देहात लपून नम्रपणे करतो, त्याच्या अंतःकरणाला अभिव्यक्ती देतो, जणू मानवजातीने त्याला नाकारल्याबद्दल तो संवेदनाहीन असतो, जणू काही मनुष्याच्या बालिशपणाला आणि अज्ञानाला तो चिरंतन क्षमा करतो व मनुष्याचा त्याच्याबद्दलचा अनादर निरंतर सहन करतो.

आमच्या नकळत, या क्षुल्लक मनुष्याने आमच्या देवाच्या कार्यात एकापाठोपाठ एक पाऊल टाकले आहे. आम्ही असंख्य परीक्षांना सामोरे जातो, असंख्य ताडणे सहन करतो आणि मृत्यूद्वारे आमची परीक्षा घेतली जाते. आम्ही देवाच्या नीतिमान व भव्य प्रवृत्तीबद्दल शिकतो, त्याच्या प्रेमाचा आणि दयेचादेखील आनंद घेतो, देवाच्या महान सामर्थ्याची व शहाणपणाची प्रशंसा करतो, देवाच्या प्रेमाची साक्ष होतो आणि मनुष्याला वाचवण्याची देवाची उत्सुक इच्छा पाहतो. या सामान्य व्यक्तीच्या वचनांमध्ये, आम्हाला देवाची प्रवृत्ती व सार कळते, देवाची इच्छा समजते, मनुष्याचा स्वभाव आणि सार समजते व तारण आणि परिपूर्णतेचा मार्ग दिसतो. त्याची वचने आम्हाला “मरण्यास” प्रवृत्त करतात व ती आम्हाला “पुनर्जन्म” घेण्यास प्रवृत्त करतात; त्याची वचने आम्हाला सांत्वन देतात आणि आम्हाला अपराधी व कर्जाच्या भावनेनेही ग्रासून टाकतात; त्याची वचने आम्हाला आनंद आणि शांती देतात, परंतु असीम वेदनादेखील देतात. कधी कधी आम्ही त्याच्या हातातील कत्तलीसाठीच्या कोकरांप्रमाणे असतो; तर कधीकधी आम्ही त्याचे अत्यंत प्रिय असतो व त्याच्या हळुवार प्रेमाचा आनंद घेतो; कधीकधी आम्ही त्याच्या शत्रूसारखे असतो आणि त्याच्या नजरेतील क्रोधाने राख होऊन जातो. आम्ही त्याने वाचवलेली मनुष्यजात आहोत, आम्ही त्याच्या नजरेतील अळी आहोत आणि आम्ही हरवलेले कोकरू आहोत, ज्यांना तो दिवसरात्र शोधत असतो. तो आमच्याप्रती दयाळू आहे, तो आमचा तिरस्कार करतो, आम्हाला वाढवतो, आम्हाला सांत्वन देतो व उपदेश करतो, तो आम्हाला मार्गदर्शन करतो, तो आम्हाला ज्ञान देतो, तो आम्हाला ताडण आणि शिस्त देतो व तो आम्हाला शापही देतो. रात्र असो वा दिवस, तो आमची काळजी करणे कधीही सोडत नाही आणि रात्रंदिवस आमचे रक्षण करतो व आमची काळजी घेतो, आमची साथ कधीही सोडत नाही, आमच्यासाठी त्याच्या हृदयाचे रक्त सांडतो आणि आमच्यासाठी कोणतीही किंमत मोजतो. या लहान व सामान्य देहाच्या उच्चारांमध्ये, आम्ही देवाचा संपूर्ण आनंद घेतला आहे आणि देवाने आम्हाला दिलेले गंतव्यस्थान पाहिले आहे. असे असूनही, व्यर्थपणा अजूनही आमच्या अंतःकरणाला त्रासदायक ठरतो व आम्ही अजूनही अशा व्यक्तीला आमचा देव म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. जरी त्याने आम्हाला इतका मान्ना दिला आहे, आनंद घेण्यासाठी इतके काही दिले आहे, परंतु यापैकी काहीही आमच्या हृदयात प्रभूचे स्थान प्राप्त करू शकत नाही. आम्ही या व्यक्तीची विशेष ओळख आणि दर्जा केवळ अनिच्छेनेच मानतो. जोपर्यंत तो देव आहे हे कबूल करण्याची विनंती आम्हाला करण्यासाठी तोंड उघडत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला देव म्हणून कधीही स्वीकारणार नाही, जो लवकरच येणार आहे व तरीही तो आमच्यामध्ये बराच काळ कार्यरत आहे.

देव त्याचे उच्चार चालू ठेवतो, आम्ही काय करावे याबद्दल आम्हाला सल्ला देण्यासाठी विविध पद्धती आणि दृष्टिकोन वापरतो, त्याच वेळी, त्याच्या अंतःकरणालाही आवाज देतो. त्याची वचने जीवन शक्ती देतात, आम्ही कोणत्या मार्गाने चालले पाहिजे ते दाखवतात व सत्य काय आहे हे समजून घेण्यास आम्हाला सक्षम करतात. आम्ही त्याच्या वचनांनी आकर्षित होऊ लागतो, आम्ही त्याच्या बोलण्याच्या स्वरावर आणि पद्धतीवर लक्ष केंद्रीत करू लागतो व अवचेतनपणे आम्ही या सामान्य व्यक्तीच्या अंतर्मनातील भावनांमध्ये रस घेऊ लागतो. आमच्या वतीने कार्य करताना तो आमच्या हृदयातील रक्त ओततो, आमच्यासाठी त्याची झोप आणि भूक हरपते, आमच्यासाठी तो रडतो, आमच्यासाठी उसासे टाकतो, आमच्यासाठी आजारपणात विव्हळतो, आमचे गंतव्यस्थान व तारणासाठी अपमान सहन करतो आणि आमची सुन्नता व बंडखोरी यामुळे त्याच्या हृदयातून रक्त सांडतो आणि अश्रू ढाळतो. असे अस्तित्व कोणत्याही सामान्य व्यक्तीचे असू शकत नाही व कोणत्याही भ्रष्ट मनुष्याला ते साध्य किंवा प्राप्त होऊ शकत नाही. त्याने दाखवलेली सहिष्णुता आणि संयम सामान्य व्यक्तीमध्ये असूच शकत नाही व त्याचे प्रेम असे आहे, जे कोणत्याही निर्मित जीवाच्या ठायी नाही. त्याच्याखेरीज अन्य कोणीही आमचे सर्व विचार जाणू शकत नाही किंवा आमच्या स्वभावाचे आणि मूलतत्त्वाचे इतके स्पष्ट व पूर्ण आकलन करू शकत नाही किंवा मानवजातीची बंडखोरी आणि भ्रष्टाचाराचा न्याय करू शकत नाही किंवा स्वर्गातील देवाच्या वतीने आमच्याशी बोलू शकत नाही व आमच्यावर असे कार्य करू शकत नाही. देवाचा अधिकार, शहाणपण आणि प्रतिष्ठा त्याच्याखेरीज अन्य कोणाकडेही नाही; देवाची प्रवृत्ती व देव जे आहे आणि देवाकडे जे आहे ते संपूर्णपणे त्याच्यामध्ये सामावलेले आहे. त्याच्याखेरीज अन्य कोणीही आम्हाला मार्ग दाखवू शकत नाही व प्रकाश देऊ शकत नाही. सृष्टीच्या निर्मितीपासून आजवर देवाने उघड न केलेली रहस्ये त्याच्याखेरीज अन्य कोणीही उघड करू शकत नाही. त्याच्याखेरीज कोणीही आम्हाला सैतानाच्या गुलामगिरीपासून आणि आमच्या स्वतःच्या भ्रष्ट प्रवृत्तीपासून वाचवू शकत नाही. तो देवाचे प्रतिनिधित्व करतो. तो देवाचे अंतःकरण, देवाचे उपदेश व सर्व मानवजातीसाठी देवाच्या न्यायाची वचने व्यक्त करतो. त्याने एक नवीन युग, एक नवीन कालखंड सुरू केला आहे आणि एक नवीन स्वर्ग व पृथ्वी आणि नवीन कार्य सुरू केले आहे व त्याने आमच्यासाठी आशा आणली आहे, आम्ही अस्पष्टतेत जगत असलेल्या जीवनाचा शेवट केला आहे आणि आमच्या संपूर्ण अस्तित्वाला तारणाचा मार्ग संपूर्ण स्पष्टपणे पाहण्यास सक्षम केले आहे. त्याने आमचे संपूर्ण अस्तित्व जिंकले आहे व आमचे हृदय प्राप्त केले आहे. त्या क्षणापासून, आमची मने सजग झाली आहेत आणि आमचे आत्मे पुनरुज्जीवित झाल्याचे दिसत आहे: ही सामान्य, क्षुल्लक व्यक्ती, जी आमच्यामध्ये राहते व जिला आम्ही दीर्घकाळ नाकारले आहे—हा प्रभू येशू नाही का, जो नेहमी आमच्या विचारांमध्ये असतो, जागेपणी किंवा स्वप्नात आणि ज्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस आसुसलेले असतो? हा तोच आहे! हा खरोखर तोच आहे! तो आमचा देव आहे! तो सत्य, मार्ग व जीवन आहे! त्याने आम्हाला पुन्हा जगण्यास आणि प्रकाश पाहण्यास सक्षम केले आहे व आमची अंतःकरणे भरकटण्यापासून थांबवली आहेत. आम्ही देवाच्या घरी परतलो आहोत, आम्ही त्याच्या सिंहासनासमोर परतलो आहोत, आम्ही त्याच्यासमोर आहोत, आम्ही त्याच्या चेहऱ्याचे साक्षीदार आहोत आणि आम्ही पुढे असलेला रस्ता पाहिला आहे. यावेळी, आमची अंतःकरणे त्याने पूर्णपणे जिंकली आहेत; तो कोण आहे याबद्दल आम्हाला आता शंका नाही, आम्ही त्याच्या कार्याला व त्याच्या वचनांना विरोध करत नाही आणि आम्ही त्याच्यापुढे नतमस्तक होतो. आयुष्यभर देवाच्या पावलांचे अनुसरण करावे, त्याच्याकडून परिपूर्ण व्हावे व त्याच्या कृपेची परतफेड करावी आणि आमच्यावरील त्याच्या प्रेमाची परतफेड करावी व त्याच्या नियोजनाचे आणि व्यवस्थांचे पालन करावे व त्याच्या कार्यात सहकार्य करावे आणि त्याने आमच्यावर जे सोपवले आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करावे, यापेक्षा आमची अधिक काही इच्छा नाही.

देवाने विजय प्राप्त करणे हे एखाद्या मार्शल आर्ट स्पर्धेसारखे आहे.

देवाचे प्रत्येक वचन हे आमच्या एका नश्वर बिंदूवर आघात करते, ज्यामुळे आम्ही जखमी होतो आणि भयभीत होतो. तो आमच्या धारणा, आमच्या कल्पना व आमच्या भ्रष्ट स्वभावाचा पर्दाफाश करतो. आम्ही जे काही बोलतो आणि करतो त्यापासून ते आमचा प्रत्येक विचार व कल्पनांपर्यंत, आमचा स्वभाव आणि सार त्याच्या वचनांमधून प्रकट होते, त्यामुळे आम्हाला भीती वाटते व आमची लज्जा लपवण्यासाठी कोणतीही जागा नसल्याने आम्ही थरथरत राहतो. एकामागून एक, तो आम्हाला आमच्या सर्व कृती, उद्दिष्टे आणि हेतूंबद्दल, अगदी आमच्या भ्रष्ट प्रवृत्तीबद्दलही सांगतो, जे आम्हालाही कधी समजलेले नव्हते. त्यामुळे आम्हाला आमच्या सर्व वाईट अपूर्णता उघड झाल्याची एवढेच नव्हे तर आमच्यावर पूर्णपणे विजय मिळवल्याची भावना निर्माण होते. त्याला विरोध केल्याबद्दल तो आमचा न्याय करतो, त्याची निंदा व निषेध केल्याबद्दल आमचे ताडण करतो आणि आम्हाला असे वाटू देतो की, त्याच्या नजरेत, आमच्यामध्ये एकही मुक्ती देणारे वैशिष्ट्य नाही व आम्ही जिवंत सैतान आहोत. आमच्या आशा धुळीला मिळाल्या; आम्ही आता त्याच्याकडे कोणत्याही अवाजवी मागण्या करण्याचे किंवा त्याच्यावर कोणतीही रचना ठेवण्याचे धाडस करत नाही आणि आमची स्वप्नेसुद्धा रातोरात नाहीशी होतात. हे एक सत्य आहे ज्याची आमच्यापैकी कोणीही कल्पना करू शकत नाही व कोणीही स्वीकारू शकत नाही. क्षणार्धात, आम्ही आमचा अंतर्मनाचा तोल गमावून बसतो आणि पुढे असलेल्या मार्गावर कसे चालत राहायचे किंवा आमचा विश्वास पुढे कसा कायम ठेवायचा, हे आम्हाला कळत नाही. असे दिसते, की जणू आमचा विश्वास पुन्हा आरंभबिंदूवर गेला आहे व जणू काही आम्ही प्रभू येशूला कधीच भेटलो नाही किंवा त्याला ओळखले नाही. आमच्या डोळ्यांसमोरील प्रत्येक गोष्ट आम्हाला गोंधळात टाकते आणि आम्हाला अनिश्चितपणे अस्थिर करते. आम्ही हताश झालो आहोत, निराश झालो आहोत व आमच्या अंतःकरणात अदमनीय क्रोध आणि अपमान आहे. आम्ही बाहेर पडण्याचा, मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो एवढेच नव्हे तर आमच्या तारणहार येशूची वाट पाहत राहण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आम्ही त्याच्याकडे आमचे अंतःकरण रिते करू. जरी काही वेळा अशा असतात, जेव्हा आम्ही बाहेरून एकसारखेपणा दाखवत असतो, गर्विष्ठ किंवा नम्रही नसतो, तरीही आमच्या अंतःकरणात आम्ही काही तरी गमावल्याच्या भावनेने ग्रासलेले असतो, जी पूर्वी कधीही अनुभवली नव्हती. जरी कधी कधी आम्ही बाहेरून विलक्षण शांत वाटत असलो, तरी आमची अंतःकरणे खवळलेल्या समुद्रासारखी यातनेने त्रस्त असतात. त्याच्या न्यायाने व ताडणाने आमच्या सर्व आशा आणि स्वप्ने ओरबाडून टाकलेल्या आहेत, आमच्या अमर्याद इच्छांचा अंत केला आहे व तो आमचा तारणहार आहे आणि आम्हाला वाचवण्यास सक्षम आहे यावर विश्वास ठेवण्यास आम्ही तयार नाही. त्याच्या न्यायाने व ताडणाने आम्ही आणि त्याच्यामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे, ती इतकी खोल आहे, की कोणीही ती ओलांडण्यास तयार नाही. त्याचा न्याय व ताडणामुळे आयुष्यात प्रथमच आम्हाला इतका मोठा धक्का बसला आहे, इतका मोठा अपमान झाला आहे. त्याच्या न्यायामुळे आणि ताडणामुळे आम्हाला देवाच्या सन्मानाची व मनुष्याच्या अपराधाबद्दल त्याच्या असहिष्णुतेची खरोखर कदर करायला शिकवले आहे, ज्याच्या तुलनेत आम्ही खूप तळाशी, अत्यंत अपवित्र आहोत. त्याच्या न्यायाने आणि ताडणांनी प्रथमच आम्ही किती गर्विष्ठ व उद्धट आहोत याची आणि मनुष्य कधीच देवाच्या बरोबरीचा किंवा देवाच्या तोडीचा कसा होणार नाही याची जाणीव करून दिली आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तीत यापुढे जगू नये, शक्य तितक्या लवकर या स्वभावापासून आणि मूलतत्त्वापासून मुक्ती मिळावी व त्याच्याप्रती नीच आणि घृणास्पद होणे थांबवावे, अशी इच्छा त्याच्या न्यायाने व ताडणाने आमच्या मनी निर्माण केली आहे. त्याच्या न्याय आणि ताडणामुळे आम्ही आनंदाने त्याच्या वचनांचे पालन करत आहोत, आता त्याचे नियोजन व व्यवस्थेविरुद्ध बंड करत नाही. त्याच्या न्यायाने आणि ताडणाने पुन्हा एकदा आम्हाला जगण्याची इच्छा दिली आहे व त्याला आमचा तारणहार म्हणून स्वीकारण्यात आनंद दिला आहे…. आम्ही विजयाच्या कार्यातून बाहेर आलो आहोत, नरकातून, मृत्यूच्या सावलीच्या दरीतून बाहेर पडलो आहोत…. सर्वशक्तिमान देवाने आम्हाला, लोकांच्या या समूहाला प्राप्त केले आहे! त्याने सैतानावर विजय मिळवला आणि त्याच्या अनेक शत्रूंचा पराभव केला आहे!

आम्ही भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती असलेला, देवाने कित्येक युगांपूर्वी प्राक्तन ठरवून दिलेला आणि देवाने शेणाच्या ढिगाऱ्यातून वर काढलेल्या गरजू लोकांचा सामान्य समूह आहोत. आम्ही एकेकाळी देवाला नाकारले होते व त्याचा निषेध केला होता, परंतु आता आम्हाला त्याने जिंकले आहे. देवाकडून आम्हाला जीवन मिळाले आहे, शाश्वत जीवनाचा मार्ग मिळाला आहे. आम्ही पृथ्वीवर कोठेही असलो, आम्ही कितीही छळ आणि संकटे सहन केली, तरी आम्ही सर्वशक्तिमान देवाच्या तारणापासून वेगळे राहू शकत नाही. कारण तो आमचा निर्माणकर्ता आहे व आमची एकमेव मुक्ती आहे!

देवाचे प्रेम झर्‍याच्या पाण्यासारखे पसरते आणि ते तुला व मला, इतरांना आणि खरोखर सत्य शोधणाऱ्या व देवाच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या सर्वांना दिले जाते.

ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र पाळीपाळीने उगवतात, त्याचप्रमाणे, देवाचे कार्य कधीही थांबत नाही व ते तुझ्यावर, माझ्यावर, इतरांवर आणि जे देवाच्या पाऊलखुणांचे अनुसरण करतात व त्याचा न्याय आणि ताडण स्वीकारतात त्यांच्यावर चालते.

२३ मार्च २०१०

मागील:  देवाला जाणून घेणे हा देवाची भीती बाळगण्याचा आणि वाईटापासून दूर राहण्याचा मार्ग आहे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger