स्वर्गीय पित्याच्या इच्छेचे आज्ञापालन करणे हेच ख्रिस्ताचे मूलतत्त्व आहे

देहधारी देवाला ख्रिस्त म्हणतात आणि ख्रिस्त हा देवाच्या आत्म्याने धारण केलेला देह आहे. हा देह, देह असलेल्या कोणत्याही मनुष्यासारखा नाही. या फरकाचे कारण हे आहे, की ख्रिस्त हा रक्तामांसाचा नाही; तो आत्म्याचा अवतार आहे. त्याच्याकडे सामान्य मानवता आणि संपूर्ण देवत्व दोन्ही आहे. त्याचे देवत्व कोणाही मनुष्याला लाभलेले नाही. त्याची सामान्य मानवता त्याच्या सर्व सामान्य क्रिया देहात टिकवून ठेवते, तर त्याचे देवत्व स्वतः देवाचे कार्य पार पाडते. त्याची मानवता असो किंवा देवत्व असो, दोन्ही स्वर्गीय पित्याच्या इच्छेच्या अधीन असतात. ख्रिस्ताचे मूलतत्त्व म्हणजे आत्मा, म्हणजेच देवत्व. म्हणूनच, त्याचे मूलतत्त्व हे स्वतः देवाचेच आहे; हे मूलतत्त्व त्याच्या स्वतःच्या कार्यात अडथळा आणणार नाही आणि तो त्याच्या स्वतःच्या कार्याचा नाश करणारी कोणतीही गोष्ट करू शकत नाही किंवा तो कधीही त्याच्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध जाणारी वचने उच्चारणार नाही. म्हणूनच, देहधारी देव त्याच्या स्वतःच्या व्यवस्थापनात अडथळा आणणारे कोणतेही कार्य कधीही करणार नाही. हे सर्व लोकांनी समजून घेतले पाहिजे. पवित्र आत्म्याच्या कार्याचे मूलतत्त्व हे मनुष्याला वाचवणे आहे आणि ते देवाच्या स्वतःच्या व्यवस्थापनासाठी आहे. त्याचप्रमाणे, ख्रिस्ताचे कार्यदेखील मनुष्याला वाचवण्याचे आहे आणि ते देवाच्या इच्छेसाठी आहे. देव देह धारण करतो हे लक्षात घेता, त्याला त्याच्या देहात त्याचे मूलतत्त्व जाणवते, जसे की त्याचे कार्य करण्यासाठी त्याचा देह पुरेसा आहे. म्हणूनच, देवाच्या आत्म्याच्या सर्व कार्याची जागा देहधारणेच्या काळातील ख्रिस्ताच्या कार्याने घेतली आणि देहधारणेच्या संपूर्ण काळात सर्व कार्याचा मुख्य भाग ख्रिस्ताचे कार्य आहे. हे इतर कोणत्याही युगाच्या कार्याशी एकत्रित केले जाऊ शकत नाही. आणि देवाने देह धारण केल्यामुळे, तो त्याच्या देहाच्या ओळखीनुसार कार्य करतो; जेव्हा तो देह धारण करतो, तेव्हा देहामध्ये जे कार्य त्याने केले पाहिजे ते तो पूर्ण करतो. देवाचा आत्मा असो किंवा तो ख्रिस्त असो, दोघेही स्वतः देव आहेत व जे कार्य आणि सेवाकार्य त्याने केले पाहिजे ते तो करतो.

देवाचे मूलतत्त्व स्वतःच अधिकार चालवते, परंतु तो त्याच्याकडून आलेल्या अधिकाराला पूर्णपणे अधीन होण्यासाठी सक्षम आहे. ते आत्म्याचे कार्य असो किंवा देहाचे कार्य असो, दोन्हीपैकी काहीही परस्परविरोधी नाही. देवाचा आत्मा हा सर्व सृष्टीवरील अधिकार आहे. देवाचे मूलतत्व असलेल्या देहातदेखील अधिकार आहे, परंतु देहधारी देव स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार सर्व कार्य करू शकतो. हे कोणत्याही एका व्यक्तीला मिळू शकत नाही किंवा त्याची विचारही करता येत नाही. देव स्वतः अधिकार आहे, परंतु त्याचा देह त्याच्या अधिकाराच्या अधीन राहू शकतो. “ख्रिस्त परमपिता परमेश्वराच्या इच्छेचे आज्ञापालन करतो” असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा हेच सूचित केले जाते. देव आत्मा आहे आणि तारणाचे कार्य करू शकतो, तसेच देव मनुष्य बनू शकतो. कोणत्याही परिस्थितीत, देव स्वतः त्याचे कार्य करतो; तो अडथळा आणत नाही किंवा हस्तक्षेप करत नाही, स्वतःच्या कार्याच्या विरुद्ध तर फारच कमी कार्य करतो, कारण आत्मा व देह यांनी केलेल्या कार्याचे मूलतत्त्व सारखेच आहे. आत्मा असो वा देह, दोघेही एकच इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच कार्याचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्य करतात. आत्मा व देह या दोघांचेही गुण वेगळे असले तरी त्यांचे मूलतत्त्व एकच आहे; दोन्हीमध्ये स्वतः देवाचे मूलतत्त्व आहे आणि स्वतः देवाची ओळख आहे. स्वतः देवाकडे आज्ञाभंगाची कोणतीही मूलतत्त्वे नाहीत; त्याचे मूलतत्त्व चांगले आहे. तो सर्व सौंदर्य आणि चांगुलपणा तसेच सर्व प्रेमाची अभिव्यक्ती आहे. देह धारण केलेला असतानादेखील परमपिता परमेश्वराची अवज्ञा करणारी कोणतीही गोष्ट देव करत नाही. त्याच्या जीवनाचा त्याग करावा लागला तरी, तो तसे करण्यास मनापासून तयार असेल व तो दुसरा कोणताही विचार करणार नाही. देवाकडे आत्मप्रौढीची किंवा स्वतःला महत्त्व देण्याची अथवा गर्व आणि अहंकाराची कोणतीही मूलतत्त्वे नाहीत; त्याच्याकडे कुटिलपणाची मूलतत्त्वे नाहीत. देवाची आज्ञा मोडणारी प्रत्येक गोष्ट सैतानाकडून येते; सैतान सर्व कुरूपता व दुष्टतेचा उगम आहे. मनुष्यामध्ये सैतानासारखे गुण असण्याचे कारण म्हणजे सैतानाने मनुष्याला भ्रष्ट केले आहे आणि त्यावर ताबा मिळवला आहे. ख्रिस्ताला सैतानाने भ्रष्ट केलेले नाही, म्हणून त्याच्याकडे फक्त देवाची वैशिष्ट्ये आहेत व सैतानाची कोणतीही वैशिष्ट्ये नाहीत. कितीही कठीण कार्य असो किंवा देह कितीही कमकुवत असो, देव देह धारण करून वास्तव्य करत असताना स्वतः देवाच्या कार्यात अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट कधीही करणार नाही, मग परमपिता परमेश्वराची आज्ञा मोडून त्याच्या इच्छेचा त्याग करणे तर दूरच. परमपिता परमेश्वराच्या इच्छेविरोधात जाण्यापेक्षा तो देहातील वेदना सहन करेल; हे येशूने प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणेच आहे, “हे बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” लोक स्वतःहून निवड करतात, परंतु ख्रिस्त तसे करत नाही. जरी त्याची स्वतःची देव म्हणून ओळख असली, तरीही तो परमपिता परमेश्वराची इच्छा शोधतो आणि देहाच्या दृष्टिकोनातून परमपिता परमेश्वराने त्याच्यावर जे सोपवले आहे ते पूर्ण करतो. ही अशी गोष्ट आहे जी मनुष्य प्राप्त करू शकत नाही. जे सैतानाकडून येते त्यात देवाचे मूलतत्त्व असू शकत नाही; त्यात फक्त एकच असू शकतो तो देवाची आज्ञा मोडतो आणि त्याचा प्रतिकार करतो. तो पूर्णपणे देवाचे आज्ञापालन करू शकत नाही, स्वेच्छेने देवाच्या इच्छेचे आज्ञापालन करणे तर दूरच. ख्रिस्ताखेरीज इतर सर्व मनुष्य, ते करू शकतात जे देवाच्या विरुद्ध आहे व देवाने सोपवलेले कार्य कोणीही प्रत्यक्षपणे करू शकत नाही; देवाचे व्यवस्थापन कार्य हे स्वतःचे कर्तव्य आहे असे कोणी मानू शकत नाही. ख्रिस्ताचे मूलतत्त्व म्हणजे परमपिता परमेश्वराच्या इच्छेला अधीन होणे आहे; देवाची अवज्ञा करणे हे सैतानाचे स्वाभाविक वैशिष्ट्य आहे. हे दोन गुण विसंगत आहेत आणि ज्याच्याकडे सैतानाचे गुण आहेत त्याला ख्रिस्त म्हणता येणार नाही. देवाऐवजी मनुष्य त्याचे कार्य करू शकत नाही याचे कारण म्हणजे मनुष्यामध्ये देवाचे कोणतेही मूलतत्त्व नाही. मनुष्य त्याच्या वैयक्तिक हितासाठी व भविष्यातील संधींसाठी देवाकरिता कार्य करतो, परंतु ख्रिस्त मात्र परमपिता परमेश्वराच्या इच्छेसाठी कार्य करतो.

ख्रिस्ताची मानवता त्याच्या देवत्वाद्वारे नियंत्रित केली जाते. जरी त्याने देह धारण केला असला, तरी त्याची मानवता पूर्णपणे देहातील मनुष्यासारखी नाही. त्याचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि हेदेखील त्याच्या देवत्वाद्वारे नियंत्रित केले जाते. त्याच्या देवत्वात कोणतीही कमतरता नाही; ख्रिस्ताची कमतरता म्हणजे त्याच्या मानवतेमधील कमतरता. काही प्रमाणात, ही कमतरता त्याच्या देवत्वाला मर्यादा घालते, परंतु अशा मर्यादा विशिष्ट व्याप्ती व वेळेत असतात आणि त्या अमर्याद नसतात. जेव्हा त्याच्या देवत्वाचे कार्य पार पाडण्याची वेळ येते, तेव्हा त्याच्या मानवतेची पर्वा न करता ते केले जाते. ख्रिस्ताची मानवता पूर्णपणे त्याच्या देवत्वाद्वारे निर्देशित आहे. त्याच्या मानवतेच्या सामान्य जीवनाशिवाय, त्याच्या मानवतेच्या इतर सर्व क्रिया त्याच्या देवत्वाने प्रभावित, परिणामीत आणि निर्देशित आहेत. ख्रिस्तामध्ये मानवता असली तरी, ती त्याच्या देवत्वाच्या कार्यात व्यत्यय आणत नाही व ख्रिस्ताची मानवता त्याच्या देवत्वाद्वारे निर्देशित होण्याचे हेच कारण आहे; जरी त्याची मानवता त्याच्या इतरांसोबतच्या वर्तनात परिपक्वता नसली तरी ती त्याचा त्याच्या देवत्वाच्या सामान्य कार्यावर परिणाम होत नाही. जेव्हा मी म्हणतो, की त्याची मानवता भ्रष्ट झालेली नाही, तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होतो, की ख्रिस्ताच्या मानवतेला त्याच्या देवत्वाद्वारे थेट आज्ञा दिली जाऊ शकते आणि सामान्य मनुष्यापेक्षा त्याच्याकडे उच्च ज्ञान आहे. त्याची मानवता देवत्वाद्वारे त्याच्या कार्यात निर्देशित होण्यास सर्वात अनुकूल आहे; त्याची मानवता देवत्वाचे कार्य व्यक्त करण्यास सर्वात सक्षम आहे व अशा कार्याच्या अधीन जाण्यास सक्षम आहे. देव देहात कार्य करत असल्यामुळे, देहातील मनुष्याने जे कर्तव्य पार पाडले पाहिजे ते तो कधीही विसरत नाही; तो खऱ्या अंतःकरणाने स्वर्गातील देवाची उपासना करू शकतो. त्याच्याकडे देवाचे मूलतत्त्व आहे आणि त्याची ओळख स्वतः देव आहे. केवळ तो पृथ्वीवर आला आहे व निर्मित जीवाचे बाह्य आवरण असलेली निर्मिती बनला आहे आणि आता त्याच्याकडे पूर्वी नसलेली मानवता आहे. तो स्वर्गातील देवाची उपासना करू शकतो; हे स्वतः देवाचे अस्तित्व आहे व मनुष्याला त्याची नक्कल करता येणार नाही. स्वतः देव ही त्याची ओळख आहे. देहाच्या दृष्टिकोनातून तो देवाची उपासना करतो; म्हणूनच, “ख्रिस्त स्वर्गातील देवाची उपासना करतो” हे शब्द चुकीचे नाहीत. तो मनुष्याकडून जी अपेक्षा करतो तेच त्याचे स्वतःचे अस्तित्व आहे; तो मनुष्याकडून जी अपेक्षा करतो ते त्याने असे काही मागण्याआधीच साध्य केले आहे. तो स्वत: त्यांच्यापासून मुक्त असताना इतरांकडून कधीही मागण्या करणार नाही, कारण हे सर्व त्याचे अस्तित्व आहे. तो त्याचे कार्य कसेही पार पाडत असला तरीही, तो देवाची अवज्ञा होईल अशा पद्धतीने वागणार नाही. त्याने मनुष्याकडे काहीही मागितले तरीही, कोणतीही मागणी मनुष्य जे काही प्राप्त करू शकतो त्यापेक्षा जास्त नसते. तो जे काही करतो ते देवाच्या इच्छेनुसार आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी आहे. ख्रिस्ताचे देवत्व सर्व मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ आहे; म्हणूनच, तो सर्व निर्मिलेल्या जीवांमधील सर्वोच्च अधिकार आहे. हा अधिकार म्हणजे त्याचे देवत्व, म्हणजेच स्वतः देवाची प्रवृत्ती व अस्तित्व, जो त्याची ओळख ठरवतो. त्यामुळे त्याची मानवता कितीही सामान्य असली, तरी त्याला स्वतः देवाची ओळख आहे हे निर्विवाद आहे; तो कोणत्याही दृष्टिकोनातून बोलला आणि देवाच्या इच्छेचे कितीही आज्ञापालन केले तरीही, असे म्हणता येत नाही की तो स्वतः देव नाही. मूर्ख आणि अज्ञानी लोक नेहमीच ख्रिस्ताच्या सामान्य मानवतेला दोष मानतात. त्याने त्याचे देवत्व कसेही व्यक्त व प्रकट केले तरीही, तो ख्रिस्त आहे हे मनुष्य मान्य करू शकत नाही. आणि ख्रिस्त त्याची आज्ञाधारकता व नम्रता जितकी जास्त प्रदर्शित करेल, तितकेच मुर्ख लोक ख्रिस्ताला गांभीर्याने घेत नाहीत. त्याच्याबद्दल बहिष्कार व तिरस्काराची वृत्ती स्वीकारणारे लोकदेखील आहेत, तरीही उदात्त प्रतिमा असलेल्या त्या “महान पुरुषांना” उपासनेसाठी ते मेजवर ठेवतात. देहधारी देवाचे मूलतत्त्व देवाच्या इच्छेच्या अधीन आहे या वस्तुस्थितीतून, तसेच ख्रिस्ताच्या सामान्य मानवतेतून मनुष्याचा प्रतिकार आणि देवाची अवज्ञा उद्भवते; हाच मनुष्याच्या प्रतिकाराचा व देवाच्या अवज्ञेचा स्रोत आहे. जर ख्रिस्ताला त्याच्या मानवतेचा वेष नसता किंवा निर्मिलेल्या जिवाच्या दृष्टिकोनातून त्याने परमपिता परमेश्वराची इच्छा शोधली नसती, उलट त्याऐवजी त्याला महामानवता प्राप्त झाली असती, तर बहुधा मनुष्यामध्ये अवज्ञा नसती. मनुष्य स्वर्गातील अदृश्य देवावर विश्वास ठेवण्यास नेहमीच तयार असतो, याचे कारण म्हणजे स्वर्गातील देवाच्या ठायी मानवता नाही किंवा त्याच्याकडे निर्मिलेल्या जीवाचा एकही गुण नाही. म्हणून, मनुष्य नेहमी त्याला सर्वात मोठ्या आदराने मानतो, परंतु ख्रिस्ताबद्दल तिरस्काराची वृत्ती ठेवतो.

जरी पृथ्वीवरील ख्रिस्त स्वतः देवाच्या वतीने कार्य करण्यास सक्षम असला, तरी तो सर्व मनुष्यांना त्याची देहातील प्रतिमा दाखवण्याच्या उद्देशाने येत नाही. सर्व लोकांनी त्याला पाहावे यासाठी तो येत नाही; तो मनुष्याला त्याच्या हाताने नेतृत्व करण्यास परवानगी देण्यासाठी येतो आणि त्याद्वारे मनुष्य नवीन युगात प्रवेश करतो. ख्रिस्ताच्या देहाचे कार्य हे स्वतः देवाच्या कार्यासाठी आहे, म्हणजेच, देहातील देवाच्या कार्यासाठी आहे व ते मनुष्याला त्याच्या देहाचे मूलतत्त्व पूर्णपणे समजण्यास सक्षम करण्यासाठी नाही. त्याने कार्य कसेही केले तरी, देहाने साध्य करण्यापलीकडे असलेले कोणतेही कार्य तो करत नाही. त्याने कार्य कसेही केले तरी, तो ते कार्य देहातील सामान्य मानवतेने करतो आणि देवाचे खरे रूप मनुष्यासमोर पूर्णपणे प्रकट करत नाही. याव्यतिरिक्त, देहातील त्याचे कार्य मनुष्याच्या कल्पनेइतके अलौकिक किंवा अमूल्य नसते. जरी ख्रिस्त देहस्वरूपात स्वतः देवाचे प्रतिनिधित्व करत असला आणि देवाने स्वतः केले पाहिजे असे कार्य वैयक्तिकरीत्या पार पाडत असला तरीही, तो स्वर्गातील देवाचे अस्तित्व नाकारत नाही अथवा तो त्याची स्वतःची कृत्ये जाहीर करत नाही. उलट, तो त्याच्या देहात नम्रपणे लपून राहतो. ख्रिस्ताशिवाय, जे खोटेपणे ख्रिस्त असल्याचा दावा करतात त्यांच्यात त्याचे गुण नाहीत. जेव्हा त्या खोट्या ख्रिस्तांची गर्विष्ठ आणि आत्म-उच्चार प्रवृत्ती समोर आणली जाते, तेव्हा हे उघड होते की देहामधील खरा ख्रिस्त कसा आहे. असे खोटे ख्रिस्त जितके खोटे असतील, तितकेच स्वतःला मिरवतात व मनुष्याला फसवण्यासाठी ते संकेत आणि चमत्कार करण्यास अधिक सक्षम असतात. खोट्या ख्रिस्तांमध्ये देवाचे गुण नसतात; खोट्या ख्रिस्तांशी संबंधित कोणत्याही गोष्टीमुळे ख्रिस्त कलंकित होत नाही. देव केवळ देहाचे कार्य पूर्ण करण्यासाठी देह धारण करतो, केवळ मनुष्याला त्याला पाहण्याची परवानगी देण्यासाठी नाही. उलट, तो त्याच्या कार्याद्वारेच त्याची ओळख अधोरेखित करतो आणि तो जे प्रकट करतो ते त्याच्या मूलतत्त्वाची साक्ष देते. त्याचे मूलतत्त्व निराधार नाही; त्याची ओळख त्याच्या हातावरून होत नाही; ती त्याचे कार्य व त्याच्या मूलतत्त्वाद्वारे निश्चित केली जाते. जरी त्याच्याकडे स्वतः देवाचे मूलतत्त्व असले आणि तो स्वतः देवाचे कार्य करण्यास सक्षम असला, तरीही तो आत्म्यापेक्षा वेगळा आहे, तो देह आहे. तो आत्म्याचे गुण असलेला देव नाही; तो देहाचे बाह्य आवरण असलेला देव आहे. म्हणूनच, तो कितीही सामान्य आणि कितीही कमकुवत असला आणि तो परमपिता परमेश्वराच्या इच्छेचा कितीही पाठपुरावा करत असला, तरी त्याचे देवत्व निर्विवाद आहे. देहधारी देवामध्ये सामान्य मानवता व त्याची कमतरता आहे; तसेच त्याच्या देवत्वाची अद्भुतता आणि अथांगता, तसेच देहातील त्याची सर्व कृत्येदेखील आहेत. म्हणूनच, मानवता आणि देवत्व हे दोन्ही प्रत्यक्षात व व्यावहारिकदृष्ट्या ख्रिस्तामध्ये अस्तित्वात आहेत. हे बिलकुलच काही रिक्त किंवा अलौकिक नाही. तो कार्य पूर्ण करण्याच्या प्राथमिक उद्देशाने पृथ्वीवर येतो; पृथ्वीवर कार्य करण्यासाठी सामान्य मानवता असणे अत्यावश्यक आहे; अन्यथा, त्याच्या देवत्वाची शक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्या मूळ कार्याचा चांगला उपयोग होऊ शकत नाही. जरी त्याची मानवता खूप महत्त्वाची असली तरी ते त्याचे मूलतत्त्व नाही. त्याचे मूलतत्त्व देवत्व आहे; म्हणूनच, ज्या क्षणी तो पृथ्वीवर त्याचे सेवाकार्य सुरू करतो त्या क्षणी तो त्याच्या देवत्वाचे अस्तित्व व्यक्त करण्यास सुरुवात करतो. त्याची मानवता केवळ त्याच्या देहाचे सामान्य जीवन टिकवून ठेवण्यासाठी अस्तित्वात आहे जेणेकरून, त्याचे देवत्व देहात सामान्यपणे कार्य करू शकेल; हे देवत्वच त्याचे कार्य संपूर्णपणे निर्देशित करते. जेव्हा तो त्याचे कार्य पूर्ण करेल, तेव्हा त्याने त्याचे सेवाकार्य पूर्ण केलेले असेल. मनुष्याला त्याच्या कार्याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि तो त्याच्या कार्याद्वारेच मनुष्याला त्याला ओळखण्यास सक्षम करतो. त्याच्या कार्यादरम्यान, तो त्याच्या देवत्वाचे अस्तित्व पूर्णपणे व्यक्त करतो, ही अशी प्रवृत्ती आहे जी मानवतेने किंवा मानवी विचार आणि वर्तनाने कलंकित नाही. जेव्हा त्याचे सर्व सेवाकार्य संपुष्टात येईल, तेव्हा त्याने व्यक्त केली पाहिजे अशी प्रवृत्ती त्याने आधीच परिपूर्णरीत्या व पूर्णपणे व्यक्त केलेली असेल. त्याचे कार्य कोणत्याही मनुष्याच्या सूचनांनुसार चालत नाही; त्याच्या प्रवृत्तीची अभिव्यक्तीदेखील अगदी मुक्त आहे आणि ती मनाद्वारे नियंत्रित केली जात नाही अथवा विचारांद्वारे प्रक्रिया केलेली नाही, तर ती नैसर्गिकरीत्या प्रकट होते. ही अशी गोष्ट आहे जी कोणताही मनुष्य साध्य करू शकत नाही. आजूबाजूची परिस्थिती कठीण असली किंवा परिस्थिती प्रतिकूल असली तरी तो योग्य वेळी त्याची प्रवृत्ती व्यक्त करू शकतो. जो ख्रिस्त आहे तो ख्रिस्ताचे अस्तित्व व्यक्त करतो, तर जे ख्रिस्त नाहीत त्यांच्याकडे ख्रिस्ताची प्रवृत्ती नसते. म्हणूनच, जरी सर्वांनी त्याला विरोध केला किंवा त्याच्याबद्दल धारणा बाळगल्या तरी, ख्रिस्ताने व्यक्त केलेली प्रवृत्ती देवाची प्रवृत्ती आहे हे मनुष्याच्या धारणांच्या आधारे कोणीही नाकारू शकत नाही. जे लोक खऱ्या अंतःकरणाने ख्रिस्ताचा पाठपुरावा करतात किंवा हेतुपुरस्सर देवाचा शोध घेतात ते सर्व त्याच्या देवत्वाच्या अभिव्यक्तीच्या आधारे तो ख्रिस्त असल्याचे कबूल करतील. मनुष्याच्या धारणांना अनुरूप नसलेल्या त्याच्या कोणत्याही पैलूंच्या आधारावर ते ख्रिस्ताला कधीही नाकारणार नाहीत. मनुष्य खूप मूर्ख असला तरी मनुष्याची इच्छा काय आहे आणि देवापासून कोणती उत्पत्ती होते हे सर्वांना माहीत आहे. हे केवळ इतकेच आहे, की बरेच लोक त्यांच्या हेतूंचा परिणाम म्हणून जाणूनबुजून ख्रिस्ताचा प्रतिकार करतात. तसे नसते, तर ख्रिस्ताचे अस्तित्व नाकारण्याचे कारण एकाही मनुष्याकडे नसते, कारण ख्रिस्ताने व्यक्त केलेले देवत्व खरेच अस्तित्वात आहे व त्याचे कार्य उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकते.

ख्रिस्ताचे कार्य आणि अभिव्यक्ती त्याचे मूलतत्त्व ठरवते. जे त्याच्यावर सोपवले आहे ते तो खऱ्या अंतःकरणाने पूर्ण करण्यास सक्षम आहे. तो स्वर्गातील देवाची खऱ्या हृदयाने उपासना करू शकतो व खऱ्या अंतःकरणाने परमपिता परमेश्वराच्या इच्छेचा पाठपुरावा करू शकतो. हे सर्व त्याच्या मूलतत्त्वाने ठरवले आहे. आणि त्याचप्रमाणे त्याचे नैसर्गिक प्रकटीकरणदेखील त्याच्या मूलतत्त्वाने निर्धारित केले आहे; मी याला त्याचे “नैसर्गिक प्रकटीकरण” म्हणण्याचे कारण म्हणजे त्याची अभिव्यक्ती ही नक्कल नाही किंवा मनुष्याने केलेल्या शिक्षणाचा परिणाम नाही अथवा मनुष्याच्या अनेक वर्षांच्या सुसंस्कृतपणाचा परिणाम नाही. त्याने ते शिकले नाही किंवा त्याद्वारे स्वतःला अलंकृत केले नाही; उलट, ते त्याच्यात अंतर्भूत आहे. मनुष्य त्याचे कार्य, त्याची अभिव्यक्ती, त्याची मानवता आणि त्याच्या सामान्य मानवतेचे संपूर्ण जीवन नाकारू शकतो, परंतु तो खऱ्या हृदयाने स्वर्गातील देवाची उपासना करतो हे कोणीही नाकारू शकत नाही; तो स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही व ज्या प्रामाणिकपणाने तो परमपिता परमेश्वराचा शोध घेतो ते कोणीही नाकारू शकत नाही. जरी त्याची प्रतिमा इंद्रियांना आनंद देणारी नसली, त्याच्या प्रवचनात विलक्षण शक्ती नसली आणि त्याचे कार्य मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे पृथ्वीला हादरवून टाकणारे किंवा स्वर्ग हादरवणारे नसले तरी, तो खरोखरच ख्रिस्त आहे, जो खऱ्या हृदयाने स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करतो, जो पूर्णपणे स्वर्गीय पित्याच्या अधीन आहे आणि जो मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहील. कारण त्याचे मूलतत्त्व हेच ख्रिस्ताचे मूलतत्त्व आहे. या सत्यावर विश्वास ठेवणे मनुष्याला कठीण आहे, परंतु हेच सत्य आहे. जेव्हा ख्रिस्ताचे सेवाकार्य संपूर्णपणे पूर्ण होईल, तेव्हा मनुष्य त्याच्या कार्यातून पाहू शकेल की त्याची प्रवृत्ती आणि त्याचे अस्तित्व हे स्वर्गातील देवाची प्रवृत्ती व अस्तित्व दर्शवते. त्या वेळी, त्याच्या सर्व कार्याचा सारांश याची पुष्टी करू शकेल, की तो खरोखरच देह बनलेले वचन आहे आणि तो रक्तामांसाच्या मनुष्यासारखा नाही. पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या कार्याच्या प्रत्येक पायरीला त्याचे प्रातिनिधिक महत्त्व आहे, परंतु प्रत्येक पायरीचे प्रत्यक्ष कार्य अनुभवणारा मनुष्य त्याच्या कार्याचे महत्त्व समजू शकत नाही. हे विशेषतः देवाने त्याच्या दुसऱ्या देहधारणेत केलेल्या कार्याच्या अनेक पायऱ्यांसाठी लागू आहे. ज्यांनी ख्रिस्ताची वचने फक्त ऐकली किंवा पाहिली आहेत परंतु अद्याप त्याला पाहिले नाही, त्यांच्यापैकी बहुतेकांच्या ठायी त्याच्या कार्याबद्दल कोणत्याही धारणा नाहीत; ज्यांनी ख्रिस्ताला पाहिले आणि त्याची वचने ऐकली, तसेच त्याचे कार्य अनुभवले, त्यांना त्याचे कार्य स्वीकारणे कठीण जाते. ख्रिस्ताचे स्वरूप आणि सामान्य मानवता मनुष्याच्या आवडीनुसार नाही म्हणून तर हे नाही का? ख्रिस्त गेल्यानंतर जे त्याचे कार्य स्वीकारतात त्यांना अशा अडचणी येणार नाहीत, कारण ते केवळ त्याचे कार्य स्वीकारतात व ख्रिस्ताच्या सामान्य मानवतेच्या संपर्कात येत नाहीत. मनुष्य देवाबद्दलच्या त्याच्या धारणा सोडू शकत नाही आणि त्याऐवजी त्याची तीव्रपणे छाननी करतो; हे या वस्तुस्थितीमुळे आहे, की मनुष्य केवळ त्याच्या दिसण्यावर लक्ष केंद्रित करतो व त्याचे कार्य आणि त्याच्या वचनांवर आधारित त्याचे मूलतत्त्व ओळखू शकत नाही. जर मनुष्याने ख्रिस्ताच्या दिसण्याकडे डोळेझाक केली किंवा ख्रिस्ताच्या मानवतेबद्दल चर्चा करण्याचे टाळले आणि केवळ त्याच्या देवत्वाबद्दल चर्चा केली, ज्याचे कार्य व वचने कोणत्याही मनुष्याला अगम्य आहेत, तर मनुष्याच्या धारणा अर्ध्याने कमी होतील, इतक्या की मनुष्याच्या सर्व अडचणी दूर होतील. देहधारी देवाच्या कार्यादरम्यान, मनुष्य त्याला सहन करू शकत नाही आणि त्याच्याबद्दल असंख्य धारणांनी भरलेला आहे व प्रतिकार आणि अवज्ञेची उदाहरणे तर सामान्य आहेत. मनुष्य देवाचे अस्तित्व सहन करू शकत नाही, ख्रिस्ताची नम्रता आणि त्याचे लपलेले असणे याप्रती नरमाई दाखवू शकत नाही किंवा स्वर्गीय पित्याची आज्ञा पाळणाऱ्या ख्रिस्ताचे मूलतत्त्व माफ करू शकत नाही. म्हणूनच, त्याचे कार्य पूर्ण केल्यानंतर तो मनुष्यासोबत अनंतकाळ राहू शकत नाही, कारण मनुष्य त्याला त्यांच्याबरोबर राहू देण्यास तयार नाही. जर मनुष्य त्याच्या कार्याच्या कालावधीत त्याच्याशी दयाळूपणा दाखवू शकत नाही, तर त्याने त्याचे सेवाकार्य पूर्ण केल्यावर मनुष्य हळूहळू त्याची वचने अनुभवताना पाहता यावीत यासाठी त्याच्याबरोबर राहणे ते कसे सहन करू शकतील? मग त्याच्यामुळे पुष्कळजण कोसळून पडणार नाहीत का? मनुष्य त्याला फक्त पृथ्वीवर कार्य करू देतो; ही मनुष्याच्या उदारतेची सर्वात मोठी मर्यादा आहे. जर त्याच्या कार्यासाठी नसते तर मनुष्याने त्याला फार पूर्वीच पृथ्वीवरून हद्दपार केले असते, मग त्याचे कार्य पूर्ण झाल्यावर ते किती कमी सौम्यता दाखवतील? मग मनुष्य त्याचा छळ करून त्याला जिवे मारणार नाही का? जर त्याला ख्रिस्त म्हटले नाही, तर तो कदाचित मानवजातीमध्ये कार्य करू शकत नाही; जर त्याने स्वतः देवाची ही ओळख दाखवून कार्य केले नाही आणि त्याऐवजी फक्त एक सामान्य मनुष्य म्हणून कार्य केले, तर मनुष्य त्याचे एकही वाक्य उच्चारणे सहन करणार नाही, त्याचे थोडेफार कार्य सहन करणे तर दूरच. त्यामुळे ही ओळख तो फक्त त्याच्या कार्यात सोबत घेऊन जाऊ शकतो. अशाप्रकारे, त्याचे कार्य त्याने तसे केले नसते तर त्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान असते, कारण मनुष्य स्थायी रूप आणि महान ओळखीचेच आज्ञापालन करण्यास तयार असतो. जर त्याने स्वतः कार्य करत असताना देव ही ओळख धारण केली नाही किंवा तो स्वतः देवाच्या रूपात प्रकट झाला नाही, तर त्याला कार्य करण्याची संधी अजिबात मिळणार नाही. त्याच्याकडे देवाचे मूलतत्त्व व ख्रिस्ताचे अस्तित्व असूनही, मनुष्य हे सहजतेने घेणार नाही आणि त्याला मानवजातीमध्ये सहजतेने कार्य करू देणार नाही. तो त्याच्या कार्यात स्वतः देव ही ओळख धारण करतो; जरी असे कार्य अशा ओळखीशिवाय केलेल्या कार्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सामर्थ्यवान असले तरी, मनुष्य अद्याप पूर्णपणे त्याच्याप्रति आज्ञाधारक झालेला नाही, कारण मनुष्य केवळ त्याच्या स्थायी रूपाला अधीन असतो आणि त्याच्या मूलतत्त्वाला नाही. जर असे असेल तर, कदाचित एके दिवशी जेव्हा ख्रिस्त त्याच्या पदावरून खाली उतरेल, तेव्हा मनुष्य त्याला एक दिवसही जिवंत राहू देईल का? देव मनुष्यासोबत पृथ्वीवर राहण्यास इच्छुक आहे जेणेकरून, त्याच्या हाताने केलेल्या कार्याचे पुढील वर्षांमध्ये होणारे परिणाम तो पाहू शकेल. तथापि, मनुष्य त्याची उपस्थिती एका दिवसासाठीही सहन करू शकत नाही, म्हणून त्याला हार मानावीच लागते. देवाने जे कार्य केले पाहिजे आणि त्याचे जे सेवाकार्य पूर्ण केले पाहिजे ते मनुष्यामध्ये करू देणे हे आधीच मनुष्याच्या उदारतेचे व कृपेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ज्यांच्यावर त्याने वैयक्तिकरीत्या विजय मिळवला आहे ते त्याच्यावर अशी कृपा दाखवतात, तरीही ते त्याला फक्त त्याचे कार्य पूर्ण होईपर्यंत राहण्याची परवानगी देतात आणि त्यापेक्षा एक क्षणही जास्त राहू देत नाहीत. जर असे असेल, तर ज्यांच्यावर त्याने विजय मिळवला नाही त्यांचे काय? देहधारी देव हा सामान्य मानवतेचे आवरण असलेला ख्रिस्त आहे हे तर मनुष्याने त्याच्याशी अशा प्रकारे वागण्याचे कारण नाही ना? जर त्याच्याकडे फक्त देवत्व असते आणि सामान्य मानवता नसती, तर मनुष्याच्या अडचणी सर्वात सहजतेने सोडवल्या जाणार नाहीत का? त्याचे मूलतत्त्व ख्रिस्ताचे आहे जे स्वर्गीय पित्याच्या इच्छेच्या अधीन आहे, हे सत्य असूनही मनुष्य नाखुषीने त्याचे देवत्व कबूल करतो आणि त्याच्या सामान्य मनुष्याच्या आविर्भावात स्वारस्य दाखवत नाही अशा प्रकारे, तो फक्त मनुष्यामध्ये राहून सुख आणि दुःख वाटून घेण्याचे कार्य रद्द करू शकतो, कारण मनुष्य त्याचे अस्तित्व यापुढे सहन करू शकत नाही.

मागील:  देवाचे कार्य आणि मनुष्याचे आचरण

पुढील:  मनुष्याचे सामान्य जीवन पुनर्संचयित करणे आणि त्याला एका अद्भुत गंतव्यस्थानावर नेणे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger