देवाने धारण केलेल्या देहाचे मूलतत्त्व
देव त्याच्या पहिल्या देहधारणेमध्ये साडे तेहतीस वर्षे पृथ्वीवर राहिला आणि त्यापैकी केवळ साडे तीन वर्षे त्याने त्याचे सेवाकार्य केले. त्याने कार्य केले त्या काळात आणि त्याने कार्य सुरू करण्यापूर्वीदेखील, त्याच्याकडे सामान्य मानवता होती; साडे तेहतीस वर्षे त्याने त्याच्या सामान्य मानवतेत निवास केला. शेवटच्या साडेतीन वर्षांमध्ये, त्याने स्वतः देहधारी देव असल्याचे प्रकट केले. त्याने त्याचे सेवाकार्य सुरू करण्यापूर्वी, तो त्याच्या देवत्वाच्या कोणत्याही खुणा न दाखवता सर्वसाधारण, सामान्य मानवतेसह प्रकट झाला आणि त्याने त्याच्या सेवाकार्याला औपचारिकरीत्या सुरुवात केल्यावरच त्याचे देवत्व प्रकट झाले. सुरुवातीच्या त्या एकोणतीस वर्षांमधील त्याचे जीवन आणि कार्य यांवरून हे दिसून आले, की तो एक सच्चा मनुष्य होता, मनुष्याचा पुत्र होता आणि एक रक्तमांसाचा देह होता, कारण त्याचे सेवाकार्य वयाच्या एकोणतीस वर्षांनंतरच खऱ्या अर्थाने सुरू झाले. “देहधारणा” म्हणजे देवाचे देहातील प्रकटीकरण; निर्माण केलेल्या मानवजातीमध्ये देव देहाच्या प्रतिमेतून कार्य करतो. त्यामुळे देवाला देहधारी होण्यासाठी, सर्वप्रथम तो देह असला पाहिजे, सामान्य मानवतेने युक्त देह असला पाहिजे; ही सर्वांत मूलभूत आवश्यक गोष्ट आहे. खरे तर, देवाच्या देहधारणेचा मथितार्थ हा आहे, की देव देहामध्ये राहतो आणि कार्य करतो, देव त्याच्या मूलतत्त्वाने देहधारी होतो, मनुष्य बनतो. त्याचे देहधारी जीवन आणि कार्य दोन टप्प्यांमध्ये विभागता येते. सेवाकार्य करण्यापूर्वी त्याने जगलेले जीवन हा पहिला टप्पा आहे. तो सर्वसामान्य मानवी कुटुंबात, अत्यंत सामान्य मानवतेत राहतो, सामान्य तत्त्वे आणि मानवी जीवनाच्या कायद्यांचे पालन करतो, त्याच्या गरजा सामान्य मनुष्यासारख्या असतात (अन्न, वस्त्र, झोप, निवारा), त्याच्यात सामान्य मानवी दोष असतात आणि सामान्य मानवी भावना असतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, पहिल्या टप्प्यात तो दैवी नसलेल्या, पूर्णपणे सामान्य मानवतेत राहतो, सर्व सामान्य मानवी कृतींमध्ये सामील होतो. त्याने सेवाकार्य करण्यास सुरुवात केल्यानंतरचे जीवन हा दुसरा टप्पा आहे. तो अजूनही सामान्य मानवी देहात सामान्य मानवतेत राहतो, अलौकिकतेची कोणतीही बाह्य खूण तो दाखवत नाही. तरीही तो निव्वळ त्याच्या सेवाकार्यासाठी जगतो आणि या काळात त्याची सामान्य मानवता पूर्णतः त्याच्या देवत्वाच्या सामान्य कार्याला आधार देण्यासाठी अस्तित्वात असते, कारण तोपर्यंत त्याची सामान्य मानवता त्याचे सेवाकार्य करण्याइतकी प्रगल्भ झालेली असते. त्यामुळे, त्याच्या जीवनातील दुसरा टप्पा म्हणजे त्याच्या सामान्य मानवतेमध्ये त्याचे सेवाकार्य करणे, जेव्हा ते सामान्य मानवता आणि पूर्ण देवत्व या दोन्हींचे जीवन असते. त्याच्या जीवनाच्या पहिल्या टप्प्यात तो पूर्णपणे सामान्य मानवतेत राहतो याचे कारण म्हणजे, दैवी कार्याची संपूर्णता राखण्यास त्याची मानवता अद्याप सक्षम झालेली नसते, अद्याप प्रगल्भ झालेली नसते; त्याची मानवता प्रगल्भ झाल्यानंतरच, त्याच्या सेवाकार्याचा भार वाहण्यास सक्षम झाल्यानंतरच तो त्याने जे करणे आवश्यक आहे ते सेवाकार्य करण्यास सुरुवात करू शकतो. देह म्हणून त्याने वाढणे, परिपक्व होणे आवश्यक असल्यामुळे, त्याच्या जीवनाचा पहिला टप्पा सामान्य मानवतेचा असतो—तर दुसऱ्या टप्प्यात, त्याची मानवता त्याच्या कार्याची जबाबदारी घेण्यास आणि त्याचे सेवाकार्य करण्यास सक्षम झाल्यामुळे, देहधारी देव त्याच्या सेवाकार्यात जे जीवन जगतो ते मानवता आणि संपूर्ण देवत्व या दोन्हींनी युक्त असते. जर त्याच्या जन्मापासूनच देहधारी देवाने त्याचे सेवाकार्य जोराने सुरू केले, अलौकिक संकेत आणि चमत्कार करण्यास सुरुवात केली, तर त्याच्याकडे कोणतेही भौतिक मूलतत्त्व असणार नाही. म्हणून, त्याची मानवता त्याच्या भौतिक मूलतत्त्वासाठी अस्तित्वात असते; मानवतेशिवाय देह असू शकत नाही, आणि मानवता नसलेली व्यक्ती ही मनुष्य असू शकत नाही. अशा प्रकारे, देवाच्या देहाची मानवता देवाच्या देहधारी शरीराचा अंतर्निहित गुणधर्म आहे. “देव जेव्हा देह धारण करतो, तेव्हा त्याच्यामध्ये फक्त देवत्व असते आणि मानवता अजिबात नसते” असे म्हणणे म्हणजे ईश्वरनिंदा आहे, कारण हे विधान अस्तित्वातच नाही आणि ते देहधारणेच्या तत्त्वाचा भंग करते. देवाने त्याचे सेवाकार्य करण्यास सुरुवात केल्यानंतरदेखील, त्याचे कार्य करताना तो बाह्य मानवी देहाने त्याच्या देवत्वामध्ये राहतो; फक्त त्यावेळी त्याची मानवता त्याच्या देवत्वाला सामान्य देहातून कार्य करू देण्याचा एकमेव उद्देश पार पाडत असते. त्यामुळे त्याच्या मानवतेत वसणारे देवत्व हा त्याच्या कार्याचा दूत असतो. त्याची मानवता नव्हे तर त्याचे देवत्व कार्य करत असते, तरीही त्याचे देवत्व त्याच्या मानवतेमध्ये लपलेले असते; थोडक्यात, त्याच्या मानवतेद्वारे नव्हे तर त्याच्या संपूर्ण देवत्वाद्वारे त्याचे कार्य केले जाते. पण त्या कार्याचा कर्ता हा त्याचा देह असतो. कोणी म्हणेल, की तो मनुष्य आहे आणि देवही आहे, कारण देवच देहात राहणारा, मानवी आवरण आणि मानवी मूलतत्त्व असणारा देव असतो पण त्याचप्रमाणे तो देवाचे मूलतत्त्वदेखील असतो. कारण तो देवाचे मूलतत्त्व असणारा मनुष्य असतो, तो निर्माण केलेल्या सर्व मनुष्यांपेक्षा श्रेष्ठ असतो, देवाचे कार्य करू शकणाऱ्या कोणत्याही मनुष्यापेक्षा श्रेष्ठ असतो. आणि म्हणून, त्याच्यासारखा मानवी देह असणाऱ्या सर्वांमध्ये, मानवता असणाऱ्या सर्वांमध्ये, केवळ तोच स्वतः देहधारी देव असतो—बाकी सर्व निर्माण केलेले मनुष्य असतात. निर्माण केलेल्या सर्व मनुष्यांकडे जरी मानवता असली, त्यांच्याकडे मानवतेखेरीज अन्य काहीच नसते, मात्र देहधारी देव वेगळा असतो: त्याच्या देहामध्ये त्याच्याकडे मानवता असतेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, देवत्व असते. त्याची मानवता त्याच्या देहाच्या बाह्य रूपात आणि त्याच्या रोजच्या जीवनात दिसते, पण त्याचे देवत्व जाणणे अवघड असते. कारण त्याचे देवत्व हे केवळ त्याच्याकडे मानवता असेल तेव्हाच व्यक्त होते, आणि ते लोकांची कल्पना असते तसे अलौकिक नसते, ते लोकांना दिसणे अत्यंत अवघड असते. अगदी आजही, देहधारी देवाच्या खऱ्या मूलतत्त्वाचा थांग लागणे लोकांना अतिशय कठीण जाते. मी त्याविषयी इतके सविस्तर बोलल्यानंतरही, तुमच्यापैकी अनेकांना हे गूढच वाटेल हे मला ठाऊक आहे. खरे तर हा मुद्दा अगदी साधा आहे: देव जेव्हापासून देहधारी होतो, तेव्हापासून त्याचे मूलतत्त्व हे मानवता आणि देवत्व यांचा संगम असते. या संगमालाच स्वयमेव देव, पृथ्वीवरील स्वयमेव देव असे म्हणतात.
येशू पृथ्वीवर जे जीवन जगला, ते देहातील सामान्य जीवन होते. तो त्याच्या देहाच्या सामान्य मानवतेत जगला. त्याचे कार्य करण्याचा आणि त्याचे वचन सांगण्याचा किंवा रोग्यांना बरे करण्याचा आणि राक्षसांना पळवून लावण्याचा, अशा प्रकारच्या असामान्य गोष्टी करण्याचा त्याचा अधिकार जोवर त्याने त्याचे सेवाकार्य सुरू केले नाही, तोवर बराच काळ स्वतः व्यक्त झाला नाही. वयाच्या एकोणतीस वर्षांपर्यंतचे, त्याने सेवाकार्य करण्यापूर्वीचे त्याचे जीवन हे तो केवळ एक रक्तमांसाचा देह असल्याचा पुरेसा पुरावा आहे. यामुळे आणि त्याने तोपर्यंत त्याचे सेवाकार्य सुरू केलेले नसल्यामुळे, लोकांना त्याच्यात काहीच दैवी दिसले नाही, त्यांना त्याच्यात सामान्य मनुष्यापेक्षा अधिक काहीच दिसले नाही—ज्याप्रमाणे त्यावेळी काही लोकांना तो योसेफचा पुत्र वाटला. लोकांना वाटले, की तो एका सामान्य मनुष्याचा पुत्र आहे, तो देहधारी देवाचे शरीर असल्याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती; अगदी त्याचे सेवाकार्य करतानादेखील जेव्हा त्याने अनेक चमत्कार केले, तेव्हादेखील अनेक लोक म्हणाले की तो योसेफचा पुत्र आहे, कारण तो सामान्य मानवतेच्या बाह्य आवरणातील ख्रिस्त होता. त्याची सामान्य मानवता आणि त्याचे कार्य हे दोन्हीही प्रथम देहधारणेचे महत्त्व सार्थ करण्यासाठी, देव संपूर्णपणे देहात आला आहे, तो अत्यंत सामान्य मनुष्य बनला आहे हे सिद्ध करण्यासाठी अस्तित्वात होते. त्याने त्याचे कार्य सुरू करण्यापूर्वीची त्याची सामान्य मानवता हा तो सामान्य देह असल्याचा पुरावा होता; आणि नंतर त्याने कार्य केले त्यावरूनही तो सामान्य मनुष्य होता हे सिद्ध झाले, कारण त्याने देहात असताना सामान्य मानवतेने संकेत आणि चमत्कार केले, रोग्यांना बरे केले आणि भुतांना पळवून लावले. तो चमत्कार करू शकला याचे कारण म्हणजे त्याच्या देहाने देवाचा अधिकार धारण केला होता, हा देह देवाच्या आत्म्याचे वस्त्र होता. देवाता आत्मा म्हणून हा अधिकार त्याला प्राप्त झाला होता आणि याचा अर्थ असा नव्हे की तो देह नव्हता. रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे हे कार्य त्याच्या सेवाकार्यात करणे आवश्यक होते, त्याच्या मानवतेत लपलेल्या देवत्वाची ती अभिव्यक्ती होती आणि त्याने कोणतेही संकेत दाखवले किंवा त्याचा अधिकार कसाही दाखवून दिला, तरीही तो सामान्य मानवतेत राहिला आणि तरीही तो सामान्य देह होता. वधस्तंभावर मरण पावल्यानंतर त्याचे पुनरुत्थान होईपर्यंत, तो सामान्य देहात राहिला. वरदान देणे, रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे हे सर्व त्याच्या सेवाकार्याचे भाग होते, त्याने त्याच्या सामान्य देहात असताना केलेले हे सर्व कार्य होते. वधस्तंभावर जाण्यापूर्वी त्याने त्याच्या सामान्य मानवी देहाचा कधीही त्याग केला नाही, मग तो काहीही करत असो. तो स्वतः देव होता, देवाचेच कार्य करत होता, तरीही तो देवाचे देहधारी शरीर असल्यामुळे, तो अन्न भक्षण करत होता, वस्त्र परिधान करत होता, त्याच्या सामान्य मानवी गरजा होत्या, त्याच्याकडे सामान्य मानवाची तर्कशक्ती होती आणि सामान्य मानवी मनही होते. तो सामान्य मनुष्य होता, याचे हे सर्व पुरावे आहेत. यावरून हे सिद्ध झाले, की देवाचे देहधारी शरीर हे सामान्य मानवता असलेला देह होता, ते अलौकिक नव्हते. देवाच्या प्रथम देहधारणेचे कार्य पूर्ण करणे, प्रथम देहधारणेस करणे आवश्यक असलेले सेवाकार्य पूर्ण करणे हे त्याचे कार्य होते. देहधारणेचे महत्त्व हे आहे, की एक सर्वसाधारण, सामान्य मनुष्य स्वयमेव देवाचे कार्य करतो, म्हणजे देव त्याचे दैवी कार्य मानवतेमधून करतो आणि त्याद्वारे सैतानाचा पराभव करतो. देहधारणा म्हणजे देवाच्या आत्म्याने देह धारण करणे, म्हणजे देव देहधारी होणे; देह जे कार्य करतो ते आत्म्याचे कार्य आहे, जे देहात वास्तवात येते, देहाद्वारे व्यक्त होते. देहधारी देवाचे सेवाकार्य देवाच्या देहाव्यतिरिक्त कोणीही पूर्ण करू शकत नाही; म्हणजे केवळ देवाचे देहधारी शरीर, ही सामान्य मानवता हे दैवी कार्य व्यक्त करू शकते—अन्य कुणीही नाही. त्याच्या प्रथम आगमनादरम्यान, जर वयाच्या एकोणतीस वर्षांपूर्वी देवाकडे सामान्य मानवता नसती—जर जन्मतःच तो चमत्कार करू शकला असता, जर बोलता येऊ लागताच तो स्वर्गाची भाषा बोलू शकला असता, जर पृथ्वीवर पाऊल टाकता क्षणीच त्याला सर्व लौकिक विषयांचे आकलन होऊ शकले असते, प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि हेतू ओळखता आले असते—तर अशा व्यक्तीला कोणी सामान्य मनुष्य म्हटले नसते आणि अशा देहाला सामान्य देह म्हणता आले नसते. हे जर ख्रिस्ताच्या बाबतीत झाले असते, तर देवाच्या देहधारणेचा अर्थ आणि मूलतत्त्व हरवले असते. त्याच्याकडे सामान्य मानवता आहे यावरून हे सिद्ध होते, की तो देह धारण केलेला देव आहे; तो सामान्य मनुष्याच्या वाढीच्या प्रक्रियेतून जातो यावरून तो सामान्य देह आहे हे दिसते; तसेच त्याचे कार्य हा त्याच्या रूपाने देवाचे वचन, देवाच्या आत्म्याने देह धारण केल्याचा पुरेसा पुरावा आहे. देवाच्या कार्याच्या गरजांमुळे तो देहधारी होतो. दुसऱ्या शब्दांत, कार्याचा हा टप्पा देहाद्वारेच पार पाडला पाहिजे, तो सामान्य मानवतेद्वारेच पार पाडला पाहिजे. “वचन देहधारी होणे”, “वचनाचे देहातील प्रकटीकरण” यासाठी हे आवश्यक आहे, आणि देवाच्या दोन देहधारणांमागील ही सत्य कथा आहे. लोकांना असे वाटू शकते, की येशूने आयुष्यभर चमत्कार केले, पृथ्वीवरील त्याचे कार्य संपेपर्यंत त्याने मानवतेचे कोणतेही लक्षण दाखवले नाही, त्याच्यामध्ये सामान्य मानवी गरजा किंवा दोष किंवा मानवी भावना नव्हत्या, त्याला जीवनाच्या मूलभूत गरजा नव्हत्या किंवा सामान्य मानवी विचारांची तो दखल घेत नव्हता. त्याच्याकडे केवळ अतिमानवी मन होते, पारलौकिक मानवता होती, अशी त्यांची कल्पना असते. त्यांना वाटते, की तो देव असल्यामुळे त्याने सामान्य मनुष्यांसारखा विचार करता कामा नये आणि राहता कामा नये, केवळ एक सामान्य मनुष्य, एक खराखुरा सामान्य मनुष्यच सामान्य मानवी विचार करू शकतो आणि सामान्य मानवी आयुष्य जगू शकतो. या सर्व मानवी कल्पना आणि मानवी धारणा आहेत आणि या धारणा देवाच्या कार्याच्या मूळ हेतूंच्या विरोधी आहेत. सामान्य मानवी विचार हे सामान्य मानवी तर्क आणि सामान्य मानवतेला आधार देतात; सामान्य मानवता देहाच्या सामान्य कार्यांना आधार देते; आणि देहाची सामान्य कार्ये देहाचे संपूर्ण सामान्य जीवन शक्य करतात. केवळ अशा देहाद्वारे कार्य करूनच देव त्याच्या देहधारणेचा हेतू पूर्ण करू शकतो. देहधारी देवाकडे जर केवळ देहाचे बाह्य आवरणच असेल, पण सामान्य मानवी विचार नसतील, तर त्याच्या देहाकडे मानवी तर्क असणार नाही, तसेच खरीखुरी मानवताही असणार नाही. असा मानवतारहित देह देहधारी देवाने करणे आवश्यक असलेले सेवाकार्य कसा पूर्ण करू शकेल? सामान्य मन हे मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना आधार देते; सामान्य मन नसेल तर व्यक्ती मनुष्य असणार नाही. दुसऱ्या शब्दांत, जी व्यक्ती सामान्य विचार करत नाही ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि ज्या ख्रिस्ताकडे मानवता नाही आणि फक्त देवत्व आहे त्याला देवाचे देहधारी शरीर म्हणता येत नाही. मग, देवाच्या देहधारी शरीराकडे सामान्य मानवता नाही हे कसे शक्य आहे? ख्रिस्ताकडे मानवता नाही असे म्हणणे म्हणजे ईश्वरनिंदा नव्हे का? सामान्य मनुष्य ज्या कृती करतात, त्या सर्व सामान्य मानवी मनाच्या कार्यावर आधारलेल्या असतात. ते नसते, तर मनुष्य विचित्र वागला असता, त्याला अगदी काळे आणि पांढरे, इष्ट आणि अनिष्ट यांच्यातील फरकही सांगता येणार नाही; आणि त्याच्याकडे मानवी नीतिमूल्ये आणि तत्त्वे राहणार नाहीत. तसेच, जर देहधारी देवाने सामान्य मनुष्यासारखा विचार केला नाही, तर तो खराखुरा देह राहणार नाही, सामान्य देह राहणार नाही. विचार न करणारा असा देह दैवी कार्य स्वीकारण्यास सक्षम नसेल. सामान्य देह सर्वसाधारणपणे ज्या कृती करतो त्या करण्यास असा मनुष्य समर्थ राहणार नाही, तसेच पृथ्वीवर मनुष्यांसह राहूही शकणार नाही. आणि त्यामुळे, देवाच्या देहधारणेचे महत्त्व, देवाने देह धारण करण्यामागचे मूलतत्त्वच हरवून जाईल. देहधारी देवाची मानवता देहा द्वारे केलेल्या सामान्य दैवी कार्याचे रक्षण करण्यासाठी अस्तित्वात असते. त्याचे सामान्य मानवी विचार त्याच्या सामान्य मानवतेचा आणि त्याच्या सर्व सामान्य भौतिक कृतींचा आधार असतात. कोणी म्हणेल, की त्याचे सामान्य मानवी विचार हे देहधारी देवाचे सर्व कार्य धारण करण्यासाठी अस्तित्वात असतात. जर या देहात सामान्य मानवी मन नसेल, तर देव देहात राहून कार्य करू शकत नाही, आणि त्याने देहात राहून जे करण्याची गरज असते ते कधीही साध्य होऊ शकणार नाही. देहधारी देवाकडे जरी सामान्य मानवी मन असले, तरी त्याच्या कार्यात मानवी विचारांची भेसळ झालेली नसते. तो सामान्य मनाने मानवतेतील कार्य हाती घेतो, त्याला मनासह मानवता असण्याची पूर्वअट असते, सामान्य मानवी विचारांनी कृती करण्याची नसते. त्याच्या देहाचे विचार कितीही उदात्त असले, तरी त्याचे कार्य तर्क किंवा विचार मलिन झालेले नसतात. दुसऱ्या शब्दांत, त्याचे कार्य त्याच्या देहाच्या मनाने कल्पिलेले नसते, तर ती त्याच्या मानवतेची थेट अभिव्यक्ती असते. त्याचे सर्व कार्य म्हणजे त्याने पूर्ण कऱणे आवश्यक असलेले सेवाकार्य असते, ती त्याच्या बुद्धीची निर्मिती नसते. उदाहरणार्थ, रोग्यांना बरे करणे, भुतांना पळवून लावणे आणि वधस्तंभावर खिळणे ही त्याच्या मानवी मनाची निर्मिती नव्हती, आणि कोणत्याही मनुष्याला मानवी मनाने ते साध्य करणे शक्य नव्हते. तसेच, आजचे विजयाचे कार्य हे देहधारी देवाने करणे आवश्यक असलेले सेवाकार्य आहे, परंतु ते मानवी इच्छेचे कार्य नाही, ते देवत्वाने करणे आवश्यक असलेले कार्य आहे, कुणीही सामान्य मनुष्य करू शकणार नाही असे हे कार्य आहे. त्यामुळे देहधारी देवाकडे सामान्य मानवी मन असले पाहिजे, सामान्य मानवता असली पाहिजे, कारण त्याने त्याचे मानवतेतील कार्य हे सामान्य मनासह केले पाहिजे. हे देहधारी देवाच्या कार्याचे मूलतत्त्व आहे, देहधारी देवाचे खरे मूलतत्त्व आहे.
कार्याला सुरुवात करण्यापूर्वी, येशू केवळ त्याच्या सामान्य मानवतेत राहात होता. तो देव आहे हे कोणीही सांगू शकत नव्हते, तो देहधारी देव आहे हे कोणालाही कळले नव्हते; लोकांना फक्त तो सामान्य माणूस म्हणून माहीत होता. त्याची अत्यंत साधी, सामान्य मानवता हा देवाने देह धारण केल्याचा आणि कृपेचे युग हे आत्म्याच्या कार्याचे नव्हे तर देहधारी देवाच्या कार्याचे युग असल्याचा पुरावा होता. देवाचा आत्मा पूर्णपणे देहात साकार झाल्याचा, देवाच्या देहधारणेच्या युगात त्याचा देह आत्म्याचे सर्व कार्य करणार असल्याचा तो पुरावा होता. सामान्य मानवता असलेला ख्रिस्त हा ज्यात आत्मा साकार झाला आहे असा देह आहे आणि त्याच्याकडे सामान्य मानवता, सामान्य तर्कशक्ती आणि मानवी विचार आहे. “साकार होणे” म्हणजे देवाने मनुष्य होणे, आत्म्याने देह होणे; अधिक सोपेपणाने सांगायचे तर, जेव्हा स्वतः देव सामान्य मानवतेसह देहात राहतो आणि त्याद्वारे त्याचे दैवी कार्य व्यक्त करतो—त्याचाच अर्थ साकार होणे किंवा देह धारण करणे. देवाच्या प्रथम देहधारणेदरम्यान, रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे आवश्यक होते, कारण सुटका करणे हे त्याचे कार्य होते. संपूर्ण मानववंशाची सुटका करण्यासाठी त्याला करुणामय आणि क्षमाशील असणे आवश्यक होते. वधस्तंभावर खिळण्यापूर्वी त्याने जे कार्य केले ते रोग्यांना बरे करण्याचे आणि भुतांना पळवून लावण्याचे होते, जे करून त्याने मनुष्याची पापापासून आणि मलीनतेपासून केलेल्या तारणाची पूर्वसूचना दिली. ते कृपेचे युग असल्यामुळे, रोग्यांना बरे करून त्याद्वारे त्या युगात कृपेचे प्रतीक असणारे संकेत आणि चमत्कार दाखवणे आवश्यक होते—कारण कृपेच्या युगाच्या केंद्रस्थानी कृपा करणे हे होते, शांती, आनंद आणि भौतिक आशीर्वाद या लोकांच्या येशूवरील श्रद्धेच्या सूचक गोष्टी त्याचे प्रतीक होत्या. म्हणजेच, रोग्यांना बरे करणे, भुतांना पळवून लावणे आणि कृपा कऱणे या कृपेच्या युगातील येशूच्या देहाच्या उत्स्फूर्त क्षमता होत्या, ते देहात साकार झालेल्या आत्म्याचे कार्य होते. पण तो जेव्हा असे कार्य करत होता, तेव्हा तो देहात राहात होता आणि तो देहाच्या पलीकडे गेला नाही. त्याने बरे करण्याच्या कोणत्याही कृती केल्या, तरी त्याच्याकडे सामान्य मानवताच होती, तो सामान्य मनुष्याचे जीवनच जगला. देवाच्या देहधारणेच्या युगात देहाने आत्म्याचे सर्व कार्य केले असे मी म्हणण्याचे कारण म्हणजे, त्याने कोणतेही कार्य केले तरी ते देहाद्वारेच केले. पण त्याच्या कार्यामुळे, लोकांनी त्याच्या देहात पूर्णपणे शारीरिक मूलतत्त्व असल्याचे मानले नाही, कारण हा देह चमत्कार करू शकत होता आणि ठरावीक खास क्षणी देहाच्या आवाक्यापलीकडील गोष्टी करू शकत होता. अर्थात, हे प्रसंग त्याने त्याच्या सेवाकार्याला सुरुवात केल्यानंतर घडले, उदाहरणार्थ त्याची चाळीस दिवस कसोटी घेतली जाणे किंवा पर्वतावर त्याचे रूपांतरण होणे. त्यामुळे येशूच्या बाबतीत, देवाच्या देहधारणेचा अर्थ पूर्ण झाला नव्हता, तर फक्त अंशतः पूर्ण झाला होता. तो त्याचे कार्य सुरू करण्यापूर्वी देहात जे जीवन जगला ते सर्व बाबतींत अत्यंत सामान्य होते. त्याने त्याचे कार्य सुरू केल्यानंतर, त्याने देहाचे केवळ बाह्य आवरण राखून ठेवले. त्याचे कार्य ही देवत्वाची अभिव्यक्ती असल्यामुळे, ते देहाच्या सामान्य कार्यांपेक्षाही श्रेष्ठ ठरले. शेवटी, देवाचे देहधारी शरीर हे रक्तामांसाच्या मनुष्यांपेक्षा वेगळे होते. अर्थात त्याच्या दैनंदिन आयुष्यात, त्याला अन्न, वस्त्र, झोप आणि निवारा यांची गरज होती, त्याला सर्व मानवी गरजेच्या गोष्टींची आवश्यकता होती आणि त्याच्याकडे सामान्य मनुष्याची तर्कशक्तीही होती आणि तो सामान्य मनुष्याप्रमाणे विचार करत होता. तरीही, त्याने केलेले कार्य अलौकिक होते याचा अपवाद वगळता लोकांनी त्याला सामान्य मनुष्यच मानले. खरे तर, त्याने काहीही केले तरी, तो एका साध्या आणि सामान्य मानवतेत राहिला आणि जोवर त्याने त्याचे कार्य केले, तोवर त्याची तर्कशक्ती विशेषतः सामान्य होती, त्याचे विचार विशेषतः प्रवाही होते, अन्य कोणत्याही सामान्य मनुष्यापेक्षा प्रवाही होते. असे विचार आणि तर्कशक्ती देहधारी देवासाठी आवश्यक होती, कारण ज्याची तर्कशक्ती अतिशय सामान्य आणि ज्याचे विचार अतिशय प्रवाही असतील, अशा देहाद्वारेच दैवी कार्य व्यक्त होणे गरजेचे होते—केवळ याच मार्गाने त्याच्या देहाला दैवी कार्य व्यक्त करणे शक्य झाले. येशू पृथ्वीवर राहिला त्या साडे तेहतीस वर्षांमध्ये, त्याने त्याची सामान्य मानवता राखली, परंतु साडेतीन वर्षांमधील सेवाकार्यादरम्यान त्याच्या कार्यामुळे, लोकांना वाटले की तो अतिशय श्रेष्ठ आहे, तो पूर्वीपेक्षा जास्त अलौकिक आहे. प्रत्यक्षात, येशूची सामान्य मानवता त्याने त्याच्या सेवाकार्याला सुरुवात करण्यापूर्वी आणि नंतरही अपरिवर्तित राहिली; त्याची मानवता कायम तीच होती, पण त्याने त्याच्या सेवाकार्याला सुरुवात करण्यापूर्वी आणि केल्यानंतर यातील फरकामुळे, त्याच्या देहासंबंधी दोन वेगळे दृष्टिकोन निर्माण झाले. लोकांनी काहीही विचार केला तरी, देहधारी देवाने त्याची मूळ, सामान्य मानवता सर्वकाळ कायम ठेवली, कारण जेव्हापासून देवाने देह धारण केला, तेव्हापासून तो देहात राहिला, सामान्य मानवता असलेल्या देहात राहिला. तो त्याचे सेवाकार्य करत होता अगर नव्हता असे मानले तरी, त्याच्या देहाची सामान्य मानवता दूर करता येत नाही, कारण मानवता हे देहाचे पायाभूत मूलतत्त्व आहे. येशूने त्याचे सेवाकार्य करण्यापूर्वी, त्याचा देह पूर्णपणे सामान्य राहिला, तो सर्व सामान्य मानवी कृतींमध्ये सहभागी होत होता; तो जराही अलौकिक वाटत नव्हता, त्याने कोणतेही चमत्कारसदृश संकेत दाखवले नाहीत. त्यावेळी, तो देवाची उपासना करणारा केवळ अतिशय सामान्य मनुष्य होता. त्याचा उद्देश मात्र अधिक प्रामाणिक, अन्य कोणाहीपेक्षा अधिक प्रामाणिक होता. अशा प्रकारेच त्याची अत्यंत सामान्य मानवता प्रकट झाली. त्याने त्याचे सेवाकार्य स्वीकारण्यापूर्वी अजिबातच कार्य केले नसल्यामुळे, कोणालाही त्याच्या ओळखीची जाणीव नव्हती, अन्य सर्वांपेक्षा त्याचा देह वेगळा आहे असे कोणीही सांगू शकले नाही, कारण त्याने एकही चमत्कार केला नाही, देवाचे स्वतःचे कार्य जराही केले नाही. मात्र, त्याने त्याचे सेवाकार्य करण्यास सुरुवात केल्यानंतर, त्याने सामान्य मानवतेचे बाह्य आवरण राखून ठेवले आणि सामान्य मानवी तर्कासहदेखील राहिला, पण त्याने स्वतः देवाचे कार्य करण्यास, ख्रिस्ताचे सेवाकार्य स्वीकारण्यास आणि जे कार्य करण्यास रक्तमांसाचे मनुष्य असमर्थ होते, ते करण्यास सुरुवात केलेली असल्यामुळे लोकांनी असे गृहीत धरले, की त्याच्याकडे सामान्य मानवता नाही आणि तो पूर्णपणे सामान्य देह नाही तर एक अपूर्ण देह आहे. त्याने केलेल्या कार्यामुळे, तो सामान्य मानवता नसलेला देहधारी देव आहे असे लोकांनी म्हटले. अशी समजूत चुकीची आहे, कारण लोकांना देवाच्या देहधारणेचे महत्त्व कळले नाही. देहधारी देवाने केलेले कार्य हे सामान्य मानवता असलेल्या देहाद्वारे व्यक्त झालेले दैवी कार्य आहे, या वस्तुस्थितीतून हा गैरसमज निर्माण झाला. देवाने देहाचे वस्त्र परिधान केले होते, तो देहात राहात होता आणि त्याच्या मानवतेतील कार्याने त्याच्या मानवतेची सामान्यता अस्पष्ट झाली. याच कारणामुळे, देवाकडे मानवता नाही तर फक्त देवत्व आहे असे लोकांना वाटले.
देवाने त्याच्या पहिल्या देहधारणेदरम्यान देहधारणेचे कार्य पूर्ण केले नाही; त्याने केवळ कार्याचा पहिला टप्पा पूर्ण केला जो देवाने देहाद्वारे करणे आवश्यक होते. त्यामुळे, देहधारणेचे कार्य पूर्ण करण्यासाठी, देव पुन्हा एकदा देहात परतला आहे, देहाच्या सर्व सामान्यता आणि वास्तविकता जगतो आहे, म्हणजे पूर्णपणे सामान्य आणि साध्या देहात देवाचे वचन प्रकट करतो आहे आणि त्याद्वारे त्याने देहाद्वारे करणे शिल्लक ठेवलेले कार्य पूर्ण करतो आहे. थोडक्यात, दुसरे देहधारी शरीर हे पहिल्यासारखे आहे, पण पहिल्यापेक्षा ते अधिक वास्तविक आहे, पहिल्यापेक्षा अधिक सामान्य आहे. परिणामी, दुसरे देहधारी शरीर भोगत असलेला त्रास हा पहिल्यापेक्षा जास्त आहे, पण हा त्रास हा त्याच्या देहातील सेवाकार्याचा परिणाम आहे, जो भ्रष्ट मनुष्याच्या त्रासाहून वेगळा आहे. तसेच तो त्याच्या देहाच्या सामान्यतेतून आणि वास्तविकतेतूनदेखील उत्पन्न होतो. तो त्याचे सेवाकार्य अत्यंत सामान्य आणि वास्तविक देहातून करत असल्यामुळे, देहाला अनेक कष्ट सोसावे लागतात. देह जितका सामान्य आणि वास्तविक, तितका त्याला त्याचे सेवाकार्य करताना त्रास सोसावा लागतो. देवाचे कार्य एका अत्यंत सामान्य देहातून, अजिबात अलौकिक नसलेल्या देहातून व्यक्त होते. त्याचा देह सामान्य असतो आणि त्याला मनुष्याला वाचवण्याच्या कार्याचा भारही घ्यायचा असतो, त्यामुळे अलौकिक देहाला सोसावा लागेल त्याहून त्याला अधिकच जास्त प्रमाणात त्रास सोसावा लागतो—आणि त्याचा सर्व त्रास त्याच्या देहाच्या वास्तविकतेतून आणि सामान्यतेतून उत्पन्न होतो. दोन देहधारी शरीरे त्यांचे सेवाकार्य करताना ज्या त्रासातून गेली आहेत, त्यावरून देहधारी शरीराचे मूलतत्त्व दिसू शकते. देह जितका सामान्य, तितका त्याला कार्य करताना सोसावा लागणारा त्रास अधिक; कार्य स्वीकारणारा देह जितका जास्त वास्तविक, तितक्या लोकांच्या धारणा अधिक कठोर आणि त्याला असलेला धोका तितकाच जास्त. आणि तरीही, देह जितका जास्त वास्तविक, त्याच्यामध्ये सामान्य मनुष्याच्या गरजा आणि पूर्ण तर्कशक्ती जितकी अधिक, तितका तो देवाचे कार्य स्वीकारण्यास जास्त सक्षम. वधस्तंभावर खिळला तो येशूचा देह होता, पापार्पण म्हणून त्याने ज्याचा त्याग केला तो देह होता; सामान्य मानवतेसह असलेल्या देहाच्या माध्यमातूनच त्याने सैतानाला पराभूत केले आणि मनुष्याला वधस्तंभापासून संपूर्णपणे वाचवले. आणि देव त्याच्या दुसऱ्या देहधारणेत विजयाचे कार्य करतो आणि सैतानाचा पराभव करतो ते पूर्ण देहाद्वारेच. जो पूर्णपणे सामान्य आणि वास्तविक आहे असा देहच विजयाचे कार्य संपूर्णपणे करू शकतो आणि साक्ष देऊ शकतो. म्हणजेच, मनुष्यावरील विजय हा देहातील देवाच्या वास्तविकतेतून आणि सामान्यतेतून साध्य केला जातो, अलौकिक चमत्कार आणि प्रकटीकरणांद्वारे नाही. या देहधारी देवाचे सेवाकार्य म्हणजे बोलणे आणि त्याद्वारे मनुष्यावर विजय मिळवणे आणि त्याला परिपूर्ण करणे हे आहे; दुसऱ्या शब्दांत, आत्म्याचे देहात साकार झालले कार्य, त्या देहाचे कर्तव्य म्हणजे बोलणे आणि त्याद्वारे मनुष्यावर विजय मिळवणे, त्याला उघड करणे, परिपूर्ण करणे आणि पूर्णपणे बाहेर काढून टाकणे हे आहे. आणि म्हणून, देवाचे देहातील कार्य हे विजयाच्या कार्याच्या रूपाने पूर्णपणे साध्य केले जाईल. सुटकेचे सुरुवातीचे कार्य ही देहधारणेच्या कार्याची फक्त सुरुवात होती; जो देह विजयाचे कार्य करतो, तो देहधारणेचे संपूर्ण कार्य पूर्ण करेल. लिंगाच्या बाबतीत, एक पुरुष आहे आणि दुसरी स्त्री आहे, अशा प्रकारे ते देवाच्या देहधारणेचे महत्त्व पूर्ण करतात आणि मनुष्याच्या देवाविषयीच्या धारणा दूर करतात: देव स्त्री आणि पुरुष दोन्ही होऊ शकतो आणि थोडक्यात, देहधारी देव हा लिंगातीत आहे. त्याने पुरुष आणि स्त्री या दोघांनाही निर्माण केले आणि त्याच्यासाठी कोणताही लिंगभेद नाही. कार्याच्या या टप्प्यात, देव संकेत आणि चमत्कार करत नाही, जेणेकरून वचनांच्या माध्यमातून कार्याचे परिणाम साध्य होतील. तसेच, याचे कारण म्हणजे यावेळी देहधारी देवाचे कार्य हे रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे हे नाही, तर बोलण्याने मनुष्यावर विजय मिळवणे हे आहे, म्हणजे देवाच्या देहधारी शरीराकडे असलेली मूळ क्षमता ही वचने सांगणे आणि मनुष्यावर विजय मिळवणे ही आहे, रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे ही नाही. त्याचे सामान्य मानवतेतील कार्य चमत्कार करणे हे नाही, रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे हे नाही, तर बोलणे हे आहे आणि म्हणून दुसरे देहधारी शरीर लोकांना पहिल्यापेक्षा जास्त सामान्य दिसते. लोकांना दिसते की देवाची देहधारणा हे असत्य नाही; पण हा देहधारी देव देहधारी येशूपेक्षा वेगळा आहे आणि ते दोघेही देहधारी देव असले, तरी ते पूर्णपणे सारखे नाहीत. येशूकडे सामान्य मानवता होती, साधी मानवता होती, पण त्याचबरोबर अनेक संकेत आणि चमत्कारही होते. या देहधारी देवामध्ये, कोणतेच संकेत आणि चमत्कार मानवी डोळ्यांना दिसणार नाहीत किंवा रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणेही दिसणार नाही किंवा समुद्रावरून चालणे किंवा चाळीस दिवस उपवास करणेही दिसणार नाही…. थोडक्यात, येशूने जे कार्य केले तेच कार्य तो करत नाही, येशूच्या देहापेक्षा त्याचा देह वेगळा आहे म्हणून नव्हे, तर रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे हे त्याचे सेवाकार्य नाही म्हणून. तो त्याचे स्वतःचे कार्य उद्ध्वस्त करत नाही, त्याचे स्वतःचे कार्य बिघडवत नाही. त्याच्या खऱ्या वचनांनी तो मनुष्यावर विजय मिळवतो, त्यामुळे त्याला चमत्कारांनी मनुष्याला शरण आणण्याची गरज नसते आणि म्हणून देहधारणेचे कार्य पूर्ण करण्यासाठी हा टप्पा आहे. आज तू जो देहधारी देव पाहतोस तो संपूर्णपणे देह आहे आणि त्याच्यामध्ये काहीही अलौकिक नाही. इतरांप्रमाणेच तो आजारी पडतो, इतरांप्रमाणेच त्याला अन्नाची आणि वस्त्राची गरज असते; तो पूर्णपणे देह असतो. जर या दरम्यान देहधारी देवाने अलौकिक संकेत आणि चमत्कार केले, जर त्याने रोग्यांना बरे केले, भुतांना पळवून लावले किंवा एका वचनाने मारू शकला, तर विजयाचे कार्य कसे पार पाडता येईल? परकीय देशांमध्ये कार्याचा प्रसार कसा करता येईल? रोग्यांना बरे करणे आणि भुतांना पळवून लावणे हे कृपेच्या युगातील कार्य होते, सुटकेच्या कार्यातील तो पहिला टप्पा होता आणि आता देवाने मनुष्याला वधस्तंभापासून वाचवले असल्यामुळे, तो आता ते कार्य करत नाही. शेवटच्या दिवसांमध्ये जर येशूसारखाच रोग्यांना बरे करणारा, भुतांना पळवून लावणारा आणि मनुष्यासाठी वधस्तंभावर मरण स्वीकारणारा “देव” प्रकट झाला, तो “देव” बायबलमधील देवाच्या वर्णनाशी जुळणारा असला आणि मनुष्याला स्वीकारण्यास सोपा असला, तरीही तो त्याच्या मूलतत्त्वाने देवाच्या आत्म्याने धारण केलेला देह असणार नाही, तर दुष्ट आत्म्याने धारण केलेला देह असेल. कारण देवाने जे आधीच पूर्ण केले आहे, त्याची कधीही पुनरावृत्ती न करणे हे देवाच्या कार्याचे तत्त्व आहे. आणि म्हणून, देवाच्या दुसऱ्या देहधारणेचे कार्य हे पहिल्याच्या कार्यापेक्षा वेगळे आहे. शेवटच्या दिवसांमध्ये, देव विजयाचे कार्य साध्या, सामान्य देहातून साकार करतो; तो रोग्यांना बरे करत नाही, तो मनुष्यासाठी वधस्तंभावर मरण स्वीकारत नाही, तर केवळ देहातून वचने सांगतो आणि देहातून मनुष्यावर विजय मिळवतो. देवाच्या देहधारी शरीराचा केवळ असा देह; केवळ असा देहच देवाचे कार्य देहाद्वारे पूर्ण करू शकतो.
या टप्प्यामध्ये देहधारी देवाने कष्ट सोसले किंवा त्याचे सेवाकार्य केले, तरी तो हे देहधारणेच्या अर्थाची पूर्तता करण्यासाठी करतो, कारण ही देवाची अंतिम देहधारणा आहे. त्याची तिसरी वेळ असणार नाही. देवाची देहधारणा दोनदाच होऊ शकते. पहिली देहधारणा पुरुषरूपात होती, दुसरी स्त्रीरूपात होती आणि त्यामुळे देवाच्या देहाची प्रतिमा मनुष्याच्या मनात पूर्ण झाली; तसेच, दोन देहधारणांनी देवाचे देहातील कार्य आधीच पूर्ण केले आहे. पहिल्या वेळी, देहधारी देवाकडे देहधारणेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी सामान्य मानवता होती. यावेळी त्याच्याकडे सामान्य मानवताही होती, पण या देहधारणेचा अर्थ वेगळा होता: तो अधिक सखोल आहे आणि त्याचे कार्य अधिक प्रगाढ महत्त्वाचे आहे. देवाने पुन्हा एकदा देह धारण केला आहे याचे कारण देहधारणेचा अर्थ पूर्ण करणे हे आहे. देवाने त्याच्या कार्याचा हा टप्पा पूर्णपणे संपवल्यानंतर, देहधारणेचा पूर्ण अर्थ म्हणजेच देवाचे देहातील कार्य पूर्ण होईल, आणि देहाद्वारे करण्याचे कार्य उरणार नाही. याचाच अर्थ, इथून पुढे देव त्याचे कार्य करण्यासाठी पुन्हा कधीही देह धारण करणार नाही. केवळ मानवजातीला वाचवण्यासाठी आणि परिपूर्ण करण्यासाठी देव देहधारणेचे कार्य करतो. दुसऱ्या शब्दांत, देहात येणे हे देवासाठी कार्याचा अपवाद वगळता कोणत्याही प्रकारे सामान्य नव्हते. कार्य करण्यासाठी देहात येऊन, तो सैतानाला दाखवतो की देव हा देह आहे, एक सामान्य व्यक्ती आहे, एक साधी व्यक्ती आहे—आणि तरीही तो विजयी होऊन जगावर राज्य करू शकतो, सैतानाला पराभूत करू शकतो, मानवजातीची सुटका करू शकतो, मानवजातीवर विजय मिळवू शकतो! सैतानाच्या कार्याचे उद्दिष्ट मानवजातीला भ्रष्ट करणे हे आहे, तर देवाच्या कार्याचे उद्दिष्ट मानवजातीला वाचवणे हे आहे. सैतान मनुष्याला एका अथांग खड्ड्यात अडकवतो, तर देव त्याची त्यातून सुटका करतो. सैतान सर्व मनुष्यांना त्याची उपासना करायला लावतो, तर देव त्यांना त्याच्या सत्तेला शरण यायला लावतो, कारण तो सृष्टीचा प्रभू आहे. हे सर्व कार्य देवाच्या दोन देहधारणांद्वारे साध्य झाले आहे. थोडक्यात, त्याचा देह हे मानवता आणि देवत्व यांचे ऐक्य आहे आणि त्याच्याकडे सामान्य मानवता आहे. त्यामुळे देवाच्या देहधारी शरीराशिवाय मानवजातीला वाचवण्याचा परिणाम देवाला साध्य करता आला नसता, आणि सामान्य मानवतेशिवाय त्याच्या देहातील कार्याला हे परिणामही साध्य करता आले नसते. देवाच्या देहधारणेचे मूलतत्त्व हे आहे की त्याच्याकडे सामान्य मानवता असली पाहिजे; कारण ते तसे नसेल तर ते देहधारी होण्यातील देवाच्या उद्देशाच्या विरोधात जाईल.
येशूच्या कार्यातून देहधारणेचा अर्थ पूर्ण झाला नव्हता, असे मी का म्हणतो? कारण वचन पूर्णपणाने देह झाले नव्हते. येशूने जे केले तो देवाच्या देहातील कार्याचा फक्त एक भाग होता; त्याने केवळ सुटकेचे कार्य केले, मनुष्याला पूर्णपणे प्राप्त करण्याचे कार्य केले नाही. या कारणासाठी, शेवटच्या दिवसांमध्ये देवाने पुन्हा देह धारण केला आहे. कार्याचा हा टप्पादेखील साध्या देहातून केला जातो; ज्याची मानवता अजिबातच अलौकिक नाही अशा अत्यंत सामान्य मनुष्याद्वारे तो केला जातो. दुसऱ्या शब्दांत, देव संपूर्ण मनुष्य झाला आहे; देव म्हणून, कार्य करणारा एक पूर्ण मनुष्य, एक पूर्ण देह म्हणून ज्याची ओळख आहे असा मनुष्य झाला आहे. मानवी डोळ्यांना अजिबात अलौकिक नसलेला असा रक्तामांसाचा देह दिसतो, स्वर्गाची भाषा बोलू शकणारा, कोणतेही चमत्कारसदृश संकेत न दाखवणारा, कोणतेही चमत्कार न करणारा, विशाल सभागृहांमध्ये धर्माबाबतचे अंतःस्थ सत्य उघड न करणारा अतिशय साधा मनुष्य दिसतो. लोकांना दुसऱ्या देहधारी शरीराचे कार्य पहिल्यासारखे अजिबातच दिसत नाही, इतके की त्यांच्यात काहीही साम्य दिसत नाही आणि पहिल्याच्या कार्यातील काहीही या वेळी दिसत नाही. दुसऱ्या देहधारी शरीराचे कार्य पहिल्यापेक्षा जरी वेगळे असले, तरी त्यांचा स्रोत एकच आणि एकसारखा नाही, याचा तो पुरावा होत नाही. त्यांचा स्रोत एकसारखा आहे की नाही हे देहांनी केलेल्या कार्याच्या स्वरूपावर अवलंबून असते, त्यांच्या बाह्य आवरणांवर नव्हे. देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांदरम्यान त्याने दोनदा देह धारण केला आणि दोन्ही वेळा देहधारी देवाच्या कार्याने एका नव्या युगाची सुरुवात केली, एक नवे कार्य सुरू केले; देहधारणा एकमेकांना पूरक आहेत. दोन देह खरोखरच एकाच स्रोतापासून आहेत हे सांगणे मानवी डोळ्यांना अशक्य आहे. मानवी डोळ्यांच्या किंवा मानवी मनाच्या क्षमतेच्या हे पलीकडचे आहे, हे सांगण्याची गरजच नाही. पण त्यांच्या मूलतत्त्वाच्या बाबतीत ते एकच आहेत, कारण त्यांचे कार्य एकाच आत्म्यातून उगम पावले आहे. दोन्ही देहधारी शरीरे एकाच स्रोतातून उगम पावतात की नाही हे ती ज्या युगात आणि ज्या ठिकाणी जन्म घेतात त्यावरून किंवा अशा अन्य घटकांवरून ठरवता येत नाही, तर त्यांनी व्यक्त केलेल्या दैवी कार्यावरून ठरवता येते. दुसरे देहधारी शरीर येशूने केलेल्यापैकी कोणतेही कार्य करत नाही, कारण देवाचे कार्य प्रथांना चिकटून नसते, तर ते दर वेळी एक नवा मार्ग खुला करते. दुसऱ्या देहधारी शरीराचे लक्ष्य लोकांच्या मनात पहिल्या देहाचा प्रभाव दृढ करणे किंवा खोलवर नेणे हे नाही, तर त्याला पूर्ण करणे आणि परिपूर्ण करणे, मनुष्याला असलेले देवाचे ज्ञान सखोल करणे, लोकांच्या हृदयांत अस्तित्वात असणारे सर्व नियम मोडणे आणि त्यांच्या हृदयांतील देवाच्या भ्रामक प्रतिमा दूर करणे हे आहे. असे म्हणता येईल, की देवाच्या स्वतःच्या कार्याचा कोणताही एक टप्पा मनुष्याला त्याचे पूर्ण ज्ञान देऊ शकत नाही; प्रत्येक भाग केवळ अंशतःच देतो, पूर्ण नाही. मनुष्याच्या आकलनाच्या मर्यादित क्षमतेमुळे, देवाने त्याची प्रवृत्ती पूर्णतः व्यक्त केली असूनसुद्धा त्याचे देवाबद्दलचे ज्ञान अपूर्ण राहते. मानवी भाषेचा उपयोग करून देवाच्या प्रवृत्तीची संपूर्णता व्यक्त करणे अशक्य आहे; तसेच, त्याच्या कार्याचा केवळ एक टप्पा देवाला पूर्णपणे व्यक्त कसे करू शकतो? तो त्याच्या सामान्य मानवतेच्या आवरणाखाली देहात कार्य करतो आणि मनुष्य केवळ त्याच्या देवत्वाच्या अभिव्यक्तीतूनच त्याला ओळखू शकतो, त्याच्या शारीरिक आवरणावरून नाही. त्याच्या विविध कार्यांच्या माध्यमातून मनुष्याला देवाला जाणता यावे म्हणून देव देहधारी होतो आणि त्याच्या कार्याचे कोणतेही दोन टप्पे एकसारखे नसतात. केवळ याच प्रकारे मनुष्याला देवाच्या देहातील कार्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकते, केवळ एका घटकाला चिकटून राहिल्याने नाही. दोन देहधारी शरीरांचे कार्य जरी वेगळे असले, तरी त्यांच्या देहांचे मूलतत्त्व आणि त्यांच्या कार्याचा स्रोत समान आहे; फक्त ते कार्याचे दोन वेगवेगळे टप्पे पार पाडण्यासाठी अस्तित्वात असतात आणि दोन वेगवेगळ्या युगांमध्ये उदयाला येतात. काहीही झाले तरी, देवाच्या देहधारी शरीरांचे मूलतत्त्व एकच असते आणि एकाच स्रोतातून आलेले असते—हे असे सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही.