भ्रष्ट मानवजातीला देहधारी देवाच्या तारणाची अधिक गरज आहे

देवाने देह धारण केला कारण त्याच्या कार्याचे लक्ष्य हे सैतानाचा आत्मा किंवा कोणतीही निराकार गोष्ट नाही, तर मनुष्य आहे, जो रक्तमांसाचा बनलेला आहे आणि ज्याला सैतानाने भ्रष्ट केलेले आहे. मनुष्याचा देह भ्रष्ट झाल्यामुळेच देवाने रक्तमांसाच्या मनुष्याला त्याच्या कार्याचे लक्ष्य बनवले आहे; एवढेच नव्हे तर मनुष्य हा भ्रष्टाचारी आहे म्हणून, देवाने त्याच्या तारणाच्या कार्याच्या सर्व टप्प्यांमध्ये मनुष्याला त्याच्या कार्याचे एकमेव लक्ष्य बनवले आहे. मनुष्य हा एक मर्त्य प्राणी आहे, तो रक्तमांसाचा बनलेला आहे आणि केवळ देवच मनुष्याला वाचवू शकतो. अशा प्रकारे, देवाने त्याचे कार्य करण्यासाठी मनुष्यासारखेच गुणधर्म असलेला देह धारण केला पाहिजे, जेणेकरून त्याचे कार्य अधिक परिणामकारक होईल. देवाने त्याचे कार्य करण्यासाठी देह धारण केला पाहिजे, याचे मुख्य कारण म्हणजे मनुष्य रक्तमांसाचा बनलेला आहे आणि पापावर मात करण्यास किंवा स्वतःला देहापासून विलग करण्यास असमर्थ आहे. जरी देहधारी देवाचे मूलतत्त्व आणि त्याची ओळख ही मनुष्याचे मूलतत्त्व आणि त्याची ओळख यापेक्षा खूप वेगळी असली तरी, त्याचे स्वरूप मनुष्यासारखेच आहे; त्याचे स्वरूप एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे आहे आणि तो सामान्य व्यक्तीप्रमाणेच जीवन जगतो आणि त्याला बघणारे त्याच्यात आणि सामान्य व्यक्तीत फरक ओळखू शकत नाहीत. हे सामान्य स्वरूप आणि सामान्य मानवता ही त्याला सामान्य मानवजातीमध्ये त्याचे दैवी कार्य करण्यासाठी पुरेशी आहे. त्याच्या देहामुळे तो सामान्य मानवजातीमध्ये कार्य करू शकतो आणि त्याचा देह त्याला मनुष्यामध्ये कार्य करण्यास मदत करतो, याशिवाय, सामान्य मानवता मनुष्यामध्ये तारणाचे कार्य करण्यास मदत करते. जरी त्याच्या सामान्य मानवतेमुळे लोकांचा खूप गोंधळ उडाला असला तरी, अशा गोंधळामुळे त्याच्या कार्याच्या सामान्य परिणामांवर प्रभाव पडलेला नाही. थोडक्यात, त्याच्या सामान्य देहाचे कार्य मनुष्यासाठी सर्वाधिक लाभदायक आहे. जरी बहुतांश लोक त्याच्या सामान्य मानवतेचा स्वीकार करत नाहीत, तरीही त्याचे कार्य परिणाम साध्य करू शकते आणि हे परिणाम त्याच्या सामान्य मानवतेमुळेच प्राप्त होतात. याविषयी किंचितही शंका नाही. देहातील त्याच्या कार्यामुळे, मनुष्याला त्याच्या सामान्य धारणांपेक्षा दहापट किंवा डझनपट अधिक गोष्टी मिळतात आणि अशा धारणांना शेवटी त्याच्या कार्याद्वारे गिळंकृत केले जाईल. आणि जो परिणाम त्याच्या कार्याने साधला आहे, म्हणजेच जे ज्ञान मनुष्याला त्याच्याबद्दल आहे, ते मनुष्याच्या धारणांपेक्षा खूप जास्त आहे. तो देहात जे कार्य करतो, त्याची कल्पना करण्याचा किंवा मोजमाप करण्याचा कोणताही मार्ग नाही, कारण त्याचा देह कोणत्याही रक्तमांसाच्या मनुष्यासारखा नाही; जरी बाह्य आवरण एकसारखे असले तरी, त्याचे मूलतत्त्व एकसारखे नाही. त्याचा देह देवाविषयी लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या धारणांना जन्म देतो, तरीही त्याचा देह मनुष्याला बरेच ज्ञान प्राप्त करण्यासदेखील अनुमती देऊ शकतो आणि समान बाह्य आवरण असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर विजय प्राप्त करू शकतो. कारण तो केवळ मनुष्य नाही, तर तो मनुष्याचे बाह्य आवरण असलेला देव आहे, कोणीही त्याला पूर्णपणे ओळखू शकत नाही किंवा त्याची खोली समजूही शकत नाही. सर्व लोक अदृश्य आणि अमूर्त देवावर प्रेम करतात आणि त्याचे स्वागत करतात. जर देव केवळ एक अदृश्य आत्मा असेल, तर देवावर विश्वास ठेवणे मनुष्यासाठी सोपे होते. लोक हवी तशी कल्पना करू शकतात, स्वतःला खुश करण्यासाठी आणि स्वतःला आनंदी करण्यासाठी कोणत्याही प्रतिमेला देवाची प्रतिमा म्हणून निवडू शकतात. अशा प्रकारे, लोक ते सर्व करू शकतात, जे त्यांच्या स्वतःच्या देवाला पसंत आहे आणि जे तो त्यांच्याकडून करवून घेऊ इच्छितो, ते ही कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता. इतकेच काय, लोकांचा असा विश्वास आहे, की देवाप्रति त्यांच्यापेक्षा अधिक निष्ठावान आणि श्रद्धावान कोणीही नाही आणि इतर सर्व लोक परराष्ट्रीय कुत्रे आहेत आणि देवाप्रति प्रामाणिक नाहीत. असे म्हणता येईल, की ज्यांचा देवावरील विश्वास अस्पष्ट आहे आणि सिद्धांतावर आधारित आहे त्यांना हेच हवे असते; अशा लोकांचा शोध थोड्या फार फरकाने सारखाच असतो. हे केवळ इतकेच आहे, की त्यांच्या कल्पनेतील देवाच्या प्रतिमा वेगवेगळ्या असतात, तरीही त्यांचे मूलतत्त्व एकच असते.

मनुष्य देवावरील त्याच्या बेफिकीर विश्वासामुळे त्रस्त होत नाही आणि त्याला जसे वाटेल त्या पद्धतीने देवावर विश्वास ठेवतो. हा “मनुष्याचा अधिकार आणि स्वातंत्र्या” चा भाग आहे, ज्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, कारण लोक त्यांच्या स्वतःच्या देवावर विश्वास ठेवतात आणि इतर कोणाच्या देवावर विश्वास ठेवत नाहीत; ही त्यांची स्वतःची खाजगी मालमत्ता असते आणि जवळजवळ प्रत्येकाकडे या प्रकारची खाजगी मालमत्ता असते. लोक ही मालमत्ता एखाद्या मौल्यवान खजिन्यासारखी मानतात, परंतु देवाच्या दृष्टीने यापेक्षा नीच किंवा निरुपयोगी गोष्ट काहीही नाही, कारण मनुष्याच्या या खाजगी मालमत्तेपेक्षा देवाच्या विरोधाचा अन्य कोणताही स्पष्ट संकेत नाही. देहधारी देवाच्या कार्यामुळेच देव मूर्त स्वरूप असलेला देह बनतो, ज्याला मनुष्य पाहू शकतो आणि स्पर्श करू शकतो. तो निराकार आत्मा नाही, तर एक देह आहे ज्याला मनुष्य पाहू शकतो आणि त्याच्या संपर्कात येऊ शकतो. मात्र, बहुतेक लोक ज्या देवावर विश्वास ठेवतात, ते निराकार देव असतात, ज्यांचे कोणतेही रूप नसते. अशा प्रकारे, देहधारी देव हा देवावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी बहुतेकांचा, जे देवाच्या देहधारणेची वस्तुस्थिती स्वीकारू शकत नाहीत, शत्रू बनला आहे, त्याचप्रमाणे तेदेखील देवाचे वैरी झाले आहेत. मनुष्य त्याच्या विचारपद्धतीमुळे किंवा त्याच्या बंडखोर वृत्तीमुळे नव्हे, तर या खाजगी मालमत्तेमुळे धारणा बाळगत असतो. या खाजगी मालमत्तेमुळेच बहुतेक लोक मरण पावतात आणि हाच तो अस्पष्ट देव असतो ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याला पाहू शकत नाही आणि त्याचे कोणतेही वास्तविकअस्तित्व नसते, ज्यामुळे मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त होते. देहधारी देवाने किंवा स्वर्गातील देवाने नव्हे, तर मनुष्याच्या स्वतःच्या कल्पनेतील देवाने मनुष्याचे जीवन ताब्यात घेतलेले आहे. भ्रष्ट मनुष्याच्या गरजांसाठीच देहधारी देवाने देह धारण केला. देवाचे सर्व त्याग आणि दुःखे हे मानवजातीच्या गरजांसाठी आहेत, ते स्वतः देवाच्या गरजांसाठी नाहीत किंवा देवाच्या फायद्यासाठीही नाहीत. देवाला यात काहीही फायदा-तोटा किंवा फळ नाही; देवाला भविष्यात काहीही लाभ होणार नाही, परंतु जे मुळात त्याचे होते, तेच तो प्राप्त करेल. तो मानवजातीसाठी जे काही करतो आणि जे काही त्यागतो, ते त्याला मोठे बक्षीस मिळावे, यासाठी नव्हे, तर तो ते केवळ मानवजातीसाठी करतो. देवाच्या देहातील कार्यामध्ये अनेक अकल्पनीय अडचणी असल्या तरी, शेवटी त्याचे जे परिणाम प्राप्त होतात ते थेट आत्म्याने केलेल्या कार्यापेक्षा खूप अधिक असतात. देहाच्या कार्यात खूप कष्ट असतात आणि देह आत्म्यासारखी महान ओळख धारण करू शकत नाही, तो आत्म्यासारखी अलौकिक कृत्ये करू शकत नाही, मग त्याच्याकडे आत्म्यासारखाच अधिकार असणे तर दूरच. तरीही या सामान्य देहाने केलेल्या कार्याचे मूलतत्त्व थेट आत्म्याने केलेल्या कार्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि हा देह हेच सर्व मानवजातीच्या सर्व गरजांवरील उत्तर आहे. ज्यांना वाचवायचे आहे त्यांच्यासाठी, आत्म्याचे उपयोगमूल्य देहाच्या तुलनेत खूपच कमी आहे: आत्म्याचे कार्य संपूर्ण विश्व, सर्व पर्वत, नद्या, तलाव आणि महासागर व्यापण्यास सक्षम आहे, तरीही त्याचे देहधारी देवाचे कार्य त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी अधिक प्रभावीपणे संबंधित आहे. इतकेच काय, देवाच्या मूर्त देह स्वरूपाला मनुष्य अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि त्यावर विश्वास ठेवू शकतो, तसेच त्यामुळे मनुष्याचे देवाबद्दलचे ज्ञान अधिक सखोल होऊ शकते आणि देवाच्या वास्तविक कृत्यांचा मनुष्यावर अधिक सखोल प्रभाव पडू शकतो. आत्म्याच्या कार्यावर गूढतेचा पडदा असतो; मर्त्य प्राण्यांना त्याचा थांग लागणे कठीण असते आणि ते पाहता येणे तर त्याहूनही कठीण असते. त्यामुळे ते केवळ पोकळ कल्पनांवर अवलंबून राहू शकतात. मात्र, देहाचे कार्य सामान्य असते आणि वास्तविकतेवर आधारित असते, त्याची बुद्धी कुशाग्र असते आणि ती अशी वस्तुस्थिती असते, जी मनुष्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येईल; मनुष्य वैयक्तिकरीत्या देवाच्या कार्यातील बुद्धीचा अनुभव घेऊ शकतो आणि त्यासाठी त्याला त्याच्या विपुल कल्पनाशक्तीचा वापर करण्याची आवश्यकता नसते. हीच देहधारी देवाच्या कार्याची ही अचूकता आणि त्याचे वास्तविक मूल्य आहे. आत्मा केवळ अशा गोष्टी करू शकतो ज्या मनुष्याला दिसत नाहीत आणि ज्याची कल्पना करणे त्याला कठीण असते, उदाहरणार्थ आत्म्याचे ज्ञान, आत्म्याची प्रेरणा आणि आत्म्याचे मार्गदर्शन, परंतु समजूतदार मनुष्याला त्यातून कोणताही स्पष्ट अर्थ समजत नाही. ते केवळ एक प्रेरणादायी किंवा ढोबळ अर्थ प्रदान करतात आणि वचनांद्वारे कोणतीही सूचना देऊ शकत नाहीत. मात्र, देहातील देवाचे कार्य खूप वेगळे असते: त्यात वचनांचे अचूक मार्गदर्शन असते, स्पष्ट इच्छा असते आणि स्पष्ट उद्दिष्टे असतात. त्यामुळे मनुष्याला अंधारात भटकण्याची किंवा कल्पनाशक्ती वापरण्याची गरज नसते आणि अंदाज बांधण्याची तर बिलकुलच गरज नसते. देहात केलेले कार्य अतिशय स्पष्ट असते आणि पवित्र आत्म्याच्या कार्यापेक्षा बरेच वेगळे असते. आत्म्याचे कार्य केवळ मर्यादित व्याप्तीसाठी योग्य असते आणि ते देहाच्या कार्याची जागा घेऊ शकत नाही. देहाचे कार्य मनुष्याला आत्म्याच्या कार्यापेक्षा अधिक अचूक आणि आवश्यक उद्दिष्टे प्रदान करते आणि कितीतरी अधिक वास्तविक, मौल्यवान ज्ञान देते. भ्रष्ट झालेल्या मनुष्यासाठी सर्वात मोलाचे कार्य असते ते म्हणजे अचूक वचने, पाठपुरावा करण्यासाठी स्पष्ट उद्दिष्टे आणि ज्याला पाहता आणि स्पर्श करता येते असे कार्य. केवळ वास्तववादी कार्य आणि योग्य वेळी मार्गदर्शन हेच मनुष्याच्या अभिरुचीसाठी उपयुक्त असते आणि केवळ वास्तविक कार्यच मनुष्याला त्याच्या भ्रष्ट आणि अनीतिमान प्रवृत्तीपासून वाचवू शकते. हे केवळ देहधारी देवालाच साध्य होऊ शकते; केवळ देहधारी देवच मनुष्याला त्याच्या पूर्वीच्या भ्रष्ट आणि अनीतिमान प्रवृत्तीपासून वाचवू शकतो. जरी आत्मा हे देवाचे अंतर्निहित मूलतत्त्व असले, तरी असे कार्य केवळ त्याचा देहच करू शकतो. जर आत्म्याने एकट्याने कार्य केले, तर त्याचे कार्य प्रभावी होऊ शकणार नाही—हे एक उघड सत्य आहे. जरी बहुतेक लोक या देहामुळे देवाचे शत्रू झाले असले तरी, जेव्हा तो त्याचे कार्य पूर्ण करतो, तेव्हा त्याचे विरोधक त्याचे शत्रू राहणार नाहीत, तर त्याचे साक्षीदार बनतील. ते असे साक्षीदार होतील, ज्यांच्यावर त्याने विजय प्राप्त केलेला असेल, असे साक्षीदार होतील जे त्याच्याशी अनुरूप असतील आणि त्याच्यापासून अविभाज्य असतील. मनुष्यासाठी त्याने देहात जे कार्य केले आहे, त्याचे महत्त्व तो मनुष्याला समजावेल आणि मनुष्याच्या अस्तित्वाच्या अर्थासाठी मनुष्याला त्या देहाचे महत्त्व कळेल, मनुष्याच्या जीवनाच्या प्रगतीसाठी त्याचे खरे मूल्य कळेल, शिवाय, त्याला हेही कळेल की हा देह जीवनाचा जिवंत झरा बनेल ज्यापासून वेगळे होणे मनुष्य सहन करू शकत नाही. जरी देवाने धारण केलेला देह हा देवाची ओळख आणि त्याचे स्थान याच्याशी मिळताजुळता नसला आणि मनुष्याला त्याच्या वास्तविक स्थितीशी विसंगत वाटला तरी, देवाची खरी प्रतिमा किंवा देवाची खरी ओळख नसलेला हा देह असे कार्य करू शकतो जे देवाचा आत्मा प्रत्यक्षपणे करू शकत नाही. हेच देवाच्या देहधारणेचे खरे महत्त्व आणि मूल्य आहे, हेच महत्त्व आणि मोल मनुष्य ना समजून घेऊ शकतो, ना स्वीकार करू शकतो. जरी सर्व मानवजात देवाच्या आत्म्याचा आदर करते आणि देवाच्या देहाचा तिरस्कार करते, तरीही ते कसे पाहतात किंवा विचार करतात याचा विचार न करता, देहाचे खरे महत्त्व आणि मूल्य आत्म्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. अर्थात, हे केवळ भ्रष्ट मानवजातीच्या बाबतीत आहे. सत्याचा शोध घेणार्‍या आणि देवाच्या दर्शनाची आकांक्षा बाळगणार्‍या प्रत्येकासाठी, आत्म्याचे कार्य केवळ हृदयस्पर्शी असते किंवा प्रेरणादायी असते आणि ते अवर्णनीय आणि अकल्पनीय आहे ही आश्चर्यकारकतेची भावना प्रदान करू शकते, ते कार्य महान, अलौकिक आणि प्रशंसनीय आहे, तरीही ते सर्वांसाठी अप्राप्य आणि असाध्यदेखील आहे ही भावना प्रदान करू शकते. मनुष्य आणि देवाचा आत्मा केवळ दुरूनच एकमेकांकडे पाहू शकतात, जणू काही त्यांच्यामध्ये खूप अंतर आहे आणि ते कधीही एकसारखे असू शकत नाहीत, जणू मनुष्य आणि देव एका अदृश्य रेषेने वेगळे केले आहे. खरं तर, हा आत्म्याने मनुष्याला दिलेला एक भ्रम आहे, कारण आत्मा आणि मनुष्य एकाच प्रकारचे नाहीत आणि एकाच जगात कधीही एकत्र राहणार नाहीत आणि कारण आत्म्याकडे मनुष्यासारखे काहीही नाही. त्यामुळे मनुष्याला आत्म्याची गरज नाही, कारण आत्मा मनुष्याला आवश्यक असलेले कार्य प्रत्यक्षपणे करू शकत नाही. देहाचे कार्य मनुष्याला वास्तविक उद्दिष्टे, स्पष्ट वचने आणि तो वास्तविक आणि सामान्य आहे, तो नम्र आणि साधारण आहे याची जाणीव देते. जरी मनुष्य त्याला घाबरत असला तरी, बहुतेक लोकांना तो त्यांच्याशी संबंधित वाटतो: मनुष्य त्याचा चेहरा पाहू शकतो, त्याचा आवाज ऐकू शकतो आणि त्याला दुरून त्याच्याकडे पाहण्याची आवश्यकता नसते. हा देह मनुष्याला जवळ येण्याजोगा वाटतो, दूरचा किंवा अथांग नव्हे तर दृश्यमान आणि स्पर्श करता येण्यासारखा वाटतो, कारण हा देह मनुष्याच्याच जगात असतो.

जे लोक देहात वास्तव्य करतात त्या सर्वांसाठी, त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्यासाठी पाठपुरावा करण्याकरीता उद्दिष्टे आवश्यक असतात आणि देवाला जाणून घेण्यासाठी त्याची वास्तविक कृत्ये आणि त्याचा वास्तविक चेहरा पाहणे आवश्यक असते. या दोन्ही गोष्टी केवळ देवाच्या देहधारणेनेच साध्य होऊ शकतात आणि दोन्ही गोष्टी केवळ सामान्य आणि वास्तविक देहाद्वारेच साध्य होऊ शकतात. म्हणूनच देहधारणा आवश्यक असते आणि म्हणूनच ती सर्व भ्रष्ट मानवजातीसाठी आवश्यक असते. लोकांना देव जाणून घेणे आवश्यक असल्याने अस्पष्ट आणि अलौकिक देवांच्या प्रतिमा त्यांच्या अंतःकरणातून काढून टाकणे आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांची भ्रष्ट प्रवृत्ती सोडून देणे आवश्यक असल्याने, त्यांनी प्रथम स्वतःची ही भ्रष्ट प्रवृत्ती ओळखली पाहिजे. केवळ अस्पष्ट देवांच्या प्रतिमा लोकांच्या हृदयातून काढून टाकण्याचे कार्य मनुष्याने केले, तरच तो योग्य परिणाम साधण्यात अपयशी ठरेल. लोकांच्या हृदयातील अस्पष्ट देवांच्या प्रतिमा केवळ वचनांद्वारे उघड केल्या जाऊ शकत नाहीत, टाकल्या जाऊ शकत नाहीत किंवा पूर्णपणे काढून टाकल्या जाऊ शकत नाहीत. असे करूनदेखील, अंततः या खोलवर रुजलेल्या गोष्टी लोकांमधून काढून टाकणे शक्य होणार नाही. केवळ या अस्पष्ट आणि अलौकिक गोष्टींच्या जागी व्यावहारिक देव आणि देवाची खरी प्रतिमा ठेवणे आणि लोकांना त्यांची हळूहळू ओळख करून देणे याच मार्गांनी योग्य परिणाम साधता येऊ शकतो. मनुष्याला याची जाणीव होते, की भूतकाळात ज्या देवाचा त्याने शोध घेतला, तो अस्पष्ट आणि अलौकिक आहे. आत्म्याचे नेतृत्व हा परिणाम साध्य करू शकत नाही, ते आत्म्याचे थेट नेतृत्व नाही, एखाद्या विशिष्ट व्यक्तीची नव्हे, तर देहधारी देवाची शिकवणच हे साध्य करू शकेल. जेव्हा देहधारी देव अधिकृतपणे त्याचे कार्य करतो, तेव्हा मनुष्याच्या धारणा उघड होतात, कारण देहधारी देवाची सामान्यता आणि वास्तविकता ही मनुष्याच्या कल्पनेतील अस्पष्ट आणि अलौकिक देवाशी पूर्णपणे विसंगत असते. मनुष्याच्या मूळ धारणा तेव्हाच उघड होतात, जेव्हा देहधारी देवाशी त्याची तुलना केली जाते. देहधारी देवाशी तुलना केल्याखेरीज मनुष्याच्या कल्पना उघड होऊ शकत नाहीत; दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, वास्तविकता हा विरोध असल्याविना, अस्पष्ट गोष्टी उघड होऊ शकत नाहीत. हे कार्य करण्यासाठी कोणीही वचनांचा वापर करण्यास सक्षम नाही आणि कोणीही वचनांचा वापर करून हे कार्य स्पष्टपणे व्यक्त करण्यास सक्षम नाही. केवळ स्वतः देव स्वतःचे कार्य करू शकतो आणि त्याच्या वतीने अन्य कोणीही हे कार्य करू शकत नाही. मनुष्याची भाषा कितीही समृद्ध असली, तरीही तो देवाची वास्तविकता आणि सामान्यता स्पष्टपणे व्यक्त करण्यास असमर्थ असतो. जर देव वैयक्तिकरीत्या मनुष्यामध्ये कार्य करत असेल आणि त्याची प्रतिमा आणि त्याचे अस्तित्व पूर्णपणे दाखवत असेल, तरच मनुष्य अधिक व्यावहारिकदृष्ट्या देवाला ओळखू शकतो आणि त्याला अधिक स्पष्टपणे पाहू शकतो. हा प्रभाव कोणत्याही रक्तमांसाच्या मनुष्याला साधता येत नाही. अर्थात, देवाचा आत्मादेखील हा परिणाम साध्य करण्यास असमर्थ असतो. देव भ्रष्ट मनुष्याला सैतानाच्या प्रभावापासून वाचवू शकतो, परंतु हे कार्य थेटपणे देवाच्या आत्म्याकडून पूर्ण होऊ शकत नाही; हे केवळ देवाच्या आत्म्याने धारण केलेल्या देहाद्वारे, देहधारी देवाच्या देहाद्वारे केले जाऊ शकते. हा देह मनुष्य आहे आणि देवदेखील आहे, हा सामान्य मानवता असलेला मनुष्य आहे आणि पूर्ण दैवत्व प्राप्त असलेला देवदेखील आहे. आणि म्हणूनच, जरी हा देह देवाचा आत्मा नसला आणि तो आत्म्यापासून खूप वेगळा असला, तरीही तो स्वतः देहधारी देव आहे जो मनुष्याला वाचवतो, जो आत्मा आणि देहदेखील आहे. त्याला कोणत्याही नावाने संबोधले जात असले, तरी शेवटी तो स्वतः देवच असतो, जो मानवजातीला वाचवतो. कारण देवाचा आत्मा देहापासून अविभाज्य असतो आणि देहाचे कार्य हेदेखील देवाच्या आत्म्याचे कार्य असते; फरक केवळ एवढाच असतो की हे कार्य आत्म्याची ओळख वापरून केले जात नाही, तर देहाची ओळख वापरून केले जाते. थेट आत्म्याद्वारे करावयाच्या कार्यासाठी देहधारणेची आवश्यकता नसते आणि जे कार्य करण्यासाठी देहाची आवश्यकता असते ते थेट आत्म्याद्वारे करता येत नाही आणि केवळ देहधारी देवाद्वारेच केले जाऊ शकते. या कार्यासाठी हेच आवश्यक आहे आणि भ्रष्ट मानवजातीसाठी तेच आवश्यक आहे. देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांमध्ये, केवळ एक टप्पा थेट आत्म्याद्वारे पार पाडला गेला आणि उर्वरित दोन टप्पे देहधारी देवाद्वारे पार पाडले जातात, ते थेट आत्म्याद्वारे पार पाडले जात नाहीत. आत्म्याने नियमशास्त्राच्या युगामध्ये केलेल्या कार्यामध्ये मनुष्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीत बदल घडवण्याच्या कार्याचा समावेश नव्हता तसेच देवाबद्दलच्या मनुष्याच्या ज्ञानाशीदेखील त्याचा काहीही संबंध नव्हता. मात्र, कृपेच्या युगात आणि राज्याच्या युगात देहधारी देवाच्या देहाचे कार्यामध्ये मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती आणि देवाबद्दलचे त्याचे ज्ञान यासंदर्भातील कार्याचा समावेश आहे आणि तारणाच्या कार्याचा तो एक महत्त्वाचा आणि निर्णायक भाग आहे. म्हणून, भ्रष्ट मानवजातीला देहधारी देवाच्या तारणाची अधिक गरज आहे आणि देहधारी देवाच्या प्रत्यक्ष कार्याची अधिक गरज आहे. मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी, आधार देण्यासाठी, खतपाणी घालण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी, न्याय आणि सुधारणूक करण्यासाठी देहधारी देवाची आवश्यकता आहे आणि त्याला देहधारी देवाकडून अधिक कृपेची आणि मोठ्या सुटकेची आवश्यकता आहे. केवळ देहधारी देव हाच मनुष्याचा विश्वासू, मनुष्याचा मार्गदर्शक, मनुष्याची सध्याची मदत असू शकतो आणि हे सर्व आजच्या आणि भूतकाळातील देहधारणेसाठी आवश्यक आहे.

मनुष्याला सैतानाने भ्रष्ट केले आहे आणि मनुष्य हा देवाने निर्मिलेल्या सर्व प्राण्यांमध्ये सर्वोच्च आहे, म्हणून मनुष्याला देवाच्या तारणाची गरज आहे. देवाच्या तारणाचे लक्ष्य मनुष्य आहे, सैतान नाही आणि ज्याचे तारण केले जाईल तो मनुष्याचा देह आणि आत्मा आहे, तो सैतान नाही. सैतान हा देवाच्या उच्चाटनाच्या कार्याचे लक्ष्य आहे, मनुष्य हा देवाच्या तारणाचे लक्ष्य आहे आणि मनुष्याचा देह सैतानाने भ्रष्ट केला आहे, म्हणून प्रथम मनुष्याच्या देहाची सुटका करायला हवी. मनुष्याचा देह अत्यंत भ्रष्ट झाला आहे आणि ती देवाला विरोध करणारी गोष्ट बनली आहे, इतके की तो उघडपणे देवाला विरोध करतो आणि त्याचे अस्तित्व नाकारतो. हा भ्रष्ट देह अगदीच असह्य आहे आणि देहाच्या भ्रष्ट प्रवृत्तीला सामोरे जाणे किंवा तिच्यामध्ये बदल घडवणे यापेक्षा कठीण काहीही नाही. सैतान विघ्न निर्माण करण्यासाठी मनुष्याच्या देहात येतो आणि देवाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी आणि देवाची योजना बिघडवण्यासाठी मनुष्याच्या देहाचा उपयोग करतो करतो. अशा प्रकारे मनुष्य सैतान बनला आहे आणि देवाचा शत्रू बनला आहे. मनुष्याचे तारण होण्यासाठी, प्रथम त्याच्यावर विजय प्राप्त करायला हवा. यामुळेच देव आव्हानाला सामोरे जातो आणि त्याला जे कार्य करायचे आहे ते करण्यासाठी आणि सैतानाशी युद्ध करण्यासाठी देह धारण करतो. भ्रष्ट झालेल्या मनुष्याचे तारण आणि देवाविरुद्ध बंड करणाऱ्या सैतानाचा पराभव आणि उच्चाटन हे देवाचे उद्दिष्ट आहे. मनुष्यावर विजय प्राप्त करण्याच्या कार्याद्वारे तो सैतानाचा पराभव करतो, त्याच वेळी तो भ्रष्ट मानवजातीला वाचवतो. अशा प्रकारे, हे कार्य एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य करते. तो देहात कार्य करतो, देहात बोलतो आणि मनुष्यासोबत अधिक चांगले गुंतण्यासाठी आणि मनुष्यावर अधिक चांगल्या रितीने विजय प्राप्त करण्यासाठी देहात सर्व कार्य करतो. शेवटच्या वेळी जेव्हा देव देह बनतो, तेव्हा त्याचे शेवटच्या दिवसांचे कार्य देहात पूर्ण केले जाईल. तो सर्व मनुष्यांचे प्रकारानुसार वर्गीकरण करेल, त्याचे संपूर्ण व्यवस्थापन पूर्ण करेल आणि त्याचे सर्व कार्य देहात पूर्ण करेल. पृथ्वीवरील त्याचे सर्व कार्य संपल्यानंतर, तो पूर्णपणे विजयी होईल. देहात कार्य करताना, देवाने मानवजातीवर पूर्णपणे विजय प्राप्त केलेला असेल आणि मानवजातीला पूर्णपणे प्राप्त केलेले असेल. याचा अर्थ त्याचे संपूर्ण व्यवस्थापन समाप्त झालेले असेल, असे नाही का? जेव्हा देव सैतानाला पूर्णपणे पराभूत करून आणि विजय प्राप्त करून देहात त्याचे कार्य पूर्ण करतो, त्यानंतर मनुष्याला भ्रष्ट करण्याची कोणतीही संधी सैतानाला प्राप्त होणार नाही. देवाच्या पहिल्या देहधारणेचे कार्य म्हणजे मनुष्याची त्याच्या पापांमधून सुटका करणे आणि त्याला क्षमा करणे. आता हे मानवजातीला जिंकण्याचे आणि पूर्णपणे प्राप्त करण्याचे कार्य आहे, जेणेकरून सैतानाला त्याचे कार्य करण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहणार नाही आणि तो पूर्णपणे पराभूत झालेला असेल आणि देव पूर्णपणे विजयी झालेला असेल. हे देहाचे कार्य आहे आणि ते स्वतः देवानेच केलेले कार्य आहे. देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांतील प्रारंभिक कार्य थेट आत्म्याद्वारे केले गेले, ते देहाद्वारे केले गेलेले नव्हते. मात्र देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांमधील शेवटचे कार्य देहधारी देवाद्वारे केले जाते, ते थेट आत्म्याद्वारे केले जात नाही. मधल्या अवस्थेतील सुटकेचे कार्यही देवाने देहातच पार पाडले. व्यवस्थापनाच्या संपूर्ण कार्यामध्ये, सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे मनुष्याला सैतानाच्या प्रभावापासून वाचवणे. मुख्य कार्य म्हणजे भ्रष्ट मनुष्यावर संपूर्ण विजय प्राप्त करणे आणि त्याद्वारे विजय प्राप्त केलेल्या मनुष्याच्या हृदयात देवाचा मूळ आदर पुन्हा स्थापित करणे आणि त्याला सामान्य जीवन म्हणजेच, देवाने निर्मिलेल्या प्राण्याचे सामान्य जीवन साध्य करण्याची परवानगी देणे. हे कार्य महत्त्वपूर्ण आहे आणि तो व्यवस्थापनाच्या कार्याचा गाभा आहे. तारणाच्या कार्याच्या तीन टप्प्यांत, नियमशास्त्राच्या युगातील कार्याचा पहिला टप्पा व्यवस्थापनाच्या कार्याच्या गाभ्यापासून फार वेगळा होता; त्यामध्ये तारणाच्या कार्याचा केवळ किंचित अंश होता आणि सैतानाच्या प्रभावातून मनुष्याला वाचवण्याच्या देवाच्या कार्याची ती सुरुवात नव्हती. कार्याचा पहिला टप्पा थेट आत्म्याद्वारे पार पाडला गेला कारण, नियमशास्त्रानुसार, मनुष्याला केवळ नियमशास्त्राचे पालन करणे माहीत होते आणि मनुष्याकडे त्याहून अधिक सत्य नव्हते, तसेच नियमशास्त्राच्या युगातील कार्यामध्ये मनुष्याच्या प्रवृत्तीमधील बदलांचा क्वचितच समावेश होता, सैतानाच्या प्रभावापासून मनुष्याला कसे वाचवायचे या कार्याशी तर त्याचा फारच कमी संबंध होता. अशा प्रकारे, देवाच्या आत्म्याने कार्याचा हा अत्यंत साधा टप्पा पूर्ण केला, ज्यामध्ये मनुष्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा काहीही संबंध नव्हता. कार्याच्या या टप्प्याचा व्यवस्थापनाच्या गाभ्याशी फारसा संबंध नव्हता आणि मनुष्याच्या तारणाच्या अधिकृत कार्याशीदेखील त्याचा फारसा संबंध नव्हता आणि म्हणून देवाला त्याचे कार्य वैयक्तिकरीत्या करण्यासाठी देह धारण करण्याची आवश्यकता नव्हती. आत्म्याने केलेले कार्य अव्यक्त आणि अथांग असते आणि मनुष्यासाठी ते अत्यंत भयावह आणि अगम्य असते; आत्मा तारणाचे कार्य करण्यास आणि मनुष्याला थेट जीवन प्रदान करण्यास अनुकूल नसतो. मनुष्यासाठी सर्वात योग्य म्हणजे आत्म्याच्या कार्याला अशा दृष्टिकोनात रूपांतरित करणे जो मनुष्यासाठी जवळचा असेल, म्हणजेच मनुष्यासाठी सर्वात योग्य गोष्ट म्हणजे देवाने त्याचे कार्य करण्यासाठी एक सामान्य व्यक्ती बनणे. यासाठी आत्म्याच्या कार्याची जागा घेण्यासाठी देवाने देहधारण करणे आवश्यक आहे आणि मनुष्यासाठी, देवासाठी कार्य करण्याकरीता यापेक्षा दुसरा योग्य मार्ग नाही. कार्याच्या या तीन टप्प्यांपैकी, दोन टप्पे देहाद्वारे पार पाडले जातात आणि हे दोन टप्पे व्यवस्थापन कार्याचे प्रमुख टप्पे आहेत. दोन देहधारणा परस्परांना पूरक आहेत आणि ते एकमेकांना परिपूर्णपणे पूरक आहेत. देवाच्या देहधारणेच्या पहिल्या टप्प्याने दुसऱ्या टप्प्याचा पाया घातला आणि असे म्हणता येईल, की देवाच्या दोन देहधारणा या एका पूर्णत्वाचा भाग आहेत आणि त्या एकमेकांशी विसंगत नाहीत. देवाच्या कार्याचे हे दोन टप्पे देवाने त्याच्या देहधारी ओळखीमध्ये पार पाडले आहेत, कारण ते संपूर्ण व्यवस्थापन कार्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जवळजवळ असे म्हणता येईल, की देवाच्या दोन देहधारणांच्या कार्याविना, संपूर्ण व्यवस्थापनाचे कार्य ठप्प होईल आणि मानवजातीला वाचवण्याचे कार्य केवळ पोकळ बोलण्याखेरीज दुसरे काहीही उरणार नाही. हे कार्य महत्त्वाचे आहे की नाही हे मानवजातीच्या गरजांवर, मानवजातीच्या भ्रष्टतेच्या वास्तविकतेवर आणि सैतानाच्या अवज्ञा आणि त्याच्याकडून कार्यात अडथळा आणण्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते. कार्यकर्त्याने पार पाडलेल्या कार्याचे स्वरूप आणि त्या कार्याचे महत्त्व यानुसार ते कार्य करण्यासाठी योग्य व्यक्ती निश्चित केली जाते. या कार्याच्या महत्त्वाचा विचार केला जातो, की कार्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा—प्रत्यक्षपणे देवाच्या आत्म्याने केलेले कार्य किंवा देवाच्या देहधारणेने केलेले कार्य किंवा मनुष्याद्वारे केलेले कार्य—तेव्हा सर्वप्रथम मनुष्याद्वारे केलेले कार्य दूर केले जाते. त्यानंतर कार्याचे स्वरूप आणि आत्म्याच्या विरुद्ध देहाच्या कार्याचे स्वरूप यावर आधारित असा निर्णय शेवटी घेतला जातो, की देहाने केलेले कार्य हे थेट आत्म्याने केलेल्या कार्यापेक्षा मनुष्यासाठी अधिक फायदेशीर आहे आणि ते अधिक लाभदायक आहे. हे कार्य आत्म्याने करायचे की देहाने करायचे हे देवाने ठरवले, त्या वेळी त्यामागे देवाचा हा विचार असतो. कार्याच्या प्रत्येक टप्प्याचे एक महत्त्व आणि आधार असतो. त्या निराधार कल्पना नसतात किंवा त्या मनमानी कृतीदेखील नसतात; त्यांमागे एक विशिष्ट शहाणपण असते. देवाच्या सर्व कार्यामागील हेच सत्य आहे. विशेषत, यासारख्या महान कार्यात देवाची योजना अधिक मोठी असते, कारण देहधारी देव मनुष्यांमध्ये वैयक्तिकरीत्या कार्य करत असतो. म्हणून, देवाचे शहाणपण आणि त्याचे संपूर्ण अस्तित्व त्याच्या कार्यातील प्रत्येक कृती, विचार आणि कल्पनांमध्ये प्रतिबिंबित होते; हे देवाचे अधिक ठोस आणि पद्धतशीर अस्तित्व आहे. हे सूक्ष्म विचार आणि कल्पना यांची कल्पना करणे मनुष्यासाठी कठीण आहे आणि मनुष्याने यावर विश्वास ठेवणेदेखील कठीण आहे आणि त्याशिवाय, मनुष्याला हे जाणून घेणेदेखील कठीण आहे. मनुष्याने केलेले कार्य सामान्य तत्त्वानुसार केले जाते, जे मनुष्यासाठी अत्यंत समाधानकारक असते. तरीही देवाच्या कार्याशी तुलना करता, त्यामध्ये खूप मोठी तफावत असते; जरी देवाची कार्ये महान असली आणि देवाचे कार्य भव्य प्रमाणात असले, तरी त्यामागे अनेक सूक्ष्म आणि अचूक योजना आणि व्यवस्था असतात, ज्यांची मनुष्याला कल्पनाही करता येत नाही. त्याच्या कार्याचा प्रत्येक टप्पा केवळ तत्त्वानुसारच पार पाडला जातो असे नाही, तर प्रत्येक टप्प्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या मानवी भाषेतून व्यक्त करता येत नाहीत आणि या गोष्टी मनुष्यासाठी अदृश्य असतात. हे आत्म्याचे कार्य असो किंवा देवाच्या देहधारणेचे कार्य असो, प्रत्येकामध्ये देवाच्या कार्याच्या योजना असतात. तो निराधारपणे कार्य करत नाही आणि तो क्षुल्लक कार्य करत नाही. जेव्हा आत्मा थेट कार्य करतो, तेव्हा ते त्याच्या उद्दिष्टांसह असते आणि जेव्हा तो कार्य करण्यासाठी मनुष्य बनतो (म्हणजे, जेव्हा तो त्याचे बाह्य आवरण बदलतो) तेव्हा त्यामध्ये अधिक मोठे उद्दिष्ट असते. नाहीतर तो सहजपणे त्याची ओळख का बदलेल? नाहीतर तो सहजपणे असा मनुष्य का बनेल ज्याला नीच समजले जाते आणि ज्याचा छळ केला जातो?

देहातील त्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्याबद्दल कार्याच्या संदर्भात बोलले जाते आणि जो शेवटी हे कार्य पूर्ण करतो तो आत्मा नव्हे, तर देहधारी देव असतो. काहींचा असा विश्वास असतो, की देव कदाचित एखाद्या अज्ञात वेळी पृथ्वीवर येईल आणि मनुष्याला दर्शन देईल, त्यानंतर तो वैयक्तिकरीत्या संपूर्ण मानवजातीचा न्याय करेल, कोणालाही न सोडता एक-एक करून त्यांची परीक्षा घेईल. जे अशा प्रकारे विचार करतात, त्यांना देहधारणेच्या कार्याचा हा टप्पा माहीत नसतो. देव मनुष्याचा एकेक करून न्याय करत नाही आणि तो एकेक करून मनुष्याची परीक्षा घेत नाही; असे करणे हे न्यायाचे कार्य होणार नाही. सर्व मानवजातीचा भ्रष्टाचार सारखाच नाही का? सर्व मानवजातीचे मूलतत्त्व एकच नाही का? मानवजातीचे भ्रष्ट मूलतत्त्व, सैतानाने दूषित केलेले मनुष्याचे मूलतत्त्व आणि मनुष्याच्या सर्व पापांचा न्याय केला जातो. देव मनुष्याच्या क्षुल्लक आणि नगण्य दोषांचा न्याय करीत नाही. न्यायाचे कार्य प्रातिनिधिक असते आणि ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी केले जात नाही. उलट, हे असे कार्य आहे ज्यामध्ये संपूर्ण मानवजातीच्या न्यायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकांच्या समूहाचा न्याय केला जातो. लोकांच्या समूहावर वैयक्तिकरीत्या त्याचे कार्य पार पाडून, देहातील देव संपूर्ण मानवजातीच्या कार्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याचे कार्य वापरतो, त्यानंतर ते हळूहळू पसरले जाते. न्यायाचे कार्यही असेच असते. देव एखाद्या विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीचा किंवा लोकांच्या विशिष्ट गटाचा न्याय करत नाही, तर त्याऐवजी संपूर्ण मानवजातीच्या अनीतीचा न्याय करतो—उदाहरणार्थ, मनुष्याचा देवाला विरोध किंवा मनुष्याचा त्याच्याबद्दलचा अनादर किंवा देवाच्या कार्यात मनुष्याचा अडथळा इत्यादी. ज्याचा न्याय केला जातो, ते म्हणजे मानवजातीचे देवाच्या विरोधाचे मूलतत्त्व असते आणि हे कार्य शेवटच्या दिवसांतील विजय प्राप्त करण्याचे कार्य असते. मनुष्याने पाहिलेले देहधारी देवाचे कार्य आणि वचने हे शेवटच्या दिवसांत महान पांढऱ्या सिंहासनासमोरील न्यायाचे कार्य आहे, ज्याची कल्पना भूतकाळात मनुष्याने केली होती. सध्या देहधारी देवाकडून जे कार्य केले जात आहे, ते कार्य म्हणजे महान पांढर्‍या सिंहासनासमोरचा न्याय आहे. आजचा देहधारी देव हा शेवटच्या दिवसांत संपूर्ण मानवजातीचा न्याय करणारा देव आहे. हा देह आणि त्याचे कार्य, त्याची वचने आणि त्याची संपूर्ण प्रवृत्ती हे त्याचे संपूर्ण स्वरूप आहे. जरी त्याच्या कार्याची व्याप्ती मर्यादित असली आणि त्यात संपूर्ण विश्वाचा थेट समावेश करता येत नसला, तरीही न्यायाच्या कार्याचे मूलतत्त्व म्हणजे सर्व मानवजातीचा थेट न्याय आहे—तो केवळ केवळ चीनच्या निवडलेल्या लोकांसाठी किंवा मोजक्या लोकांसाठीच नाही. देहातील देवाच्या कार्यादरम्यान, जरी या कार्याच्या व्याप्तीमध्ये संपूर्ण विश्वाचा समावेश नसला, तरी ते संपूर्ण विश्वाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करते आणि त्याच्या देहाच्या कार्यक्षेत्रातील कार्य पूर्ण केल्यानंतर, तो त्वरित त्याचा संपूर्ण विश्वात विस्तार करेल, ज्या प्रकारे येशूचे पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण यानंतर त्याची सुवार्ता संपूर्ण विश्वात पसरली, त्याचप्रमाणे हे होईल. ते आत्म्याचे कार्य असो किंवा देहाचे कार्य असो, हे कार्य मर्यादित कार्यक्षेत्रात केले जाते, परंतु हे असे कार्य आहे जे संपूर्ण विश्वाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करते. शेवटच्या दिवसांत, देव त्याच्या देहधारी ओळखीमध्ये प्रकट होऊन त्याचे कार्य करतो आणि देहातील देव हा महान पांढऱ्या सिंहासनासमोर मनुष्याचा न्याय करणारा देव असतो. तो आत्मा असो वा देह असो, जो न्यायाचे कार्य करतो तो शेवटच्या काळात मानवजातीचा न्याय करणारा देव असतो. हे त्याच्या कार्याआधारे निश्चित केले जाते, त्याचे बाह्य स्वरूप किंवा इतर अनेक घटकांनुसार नाही. जरी मनुष्य या वचनांबद्दल धारणा बाळगत असला तरी, देहधारी देवाच्या न्यायाची आणि संपूर्ण मानवजातीवर विजयाची वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. मनुष्य त्याबद्दल काहीही विचार करो, वस्तुस्थिती ही वस्तुस्थितीच असते. कोणीही असे म्हणू शकत नाही की “कार्य देवाने केले आहे, परंतु देह देव नाही.” हे मूर्खपणाचे आहे, कारण हे कार्य देहातील देवाखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही. हे कार्य आधीच पूर्ण झाले असल्याने, या कार्यानंतर देवाकडून मनुष्याचा न्याय करण्याचे कार्य दुसऱ्यांदा दिसणार नाही; देवाने त्याच्या दुसऱ्या देहधारणेत संपूर्ण व्यवस्थापनाचे सर्व कार्य याआधीच पूर्ण केले आहे आणि देवाच्या कार्याचा चौथा टप्पा असू शकत नाही. कारण रक्तमांसाच्या आणि भ्रष्ट झालेल्या मनुष्याचा न्याय केला जातो, सैतानाच्या आत्म्याचा थेट न्याय केला जात नाही, म्हणून न्यायाचे कार्य आध्यात्मिक जगात पार पाडले जात नाही, तर ते मनुष्यामध्ये पार पाडले जाते. मनुष्याच्या देहाच्या भ्रष्टतेचा न्याय करण्याच्या कार्यासाठी देहातील देवापेक्षा अन्य कोणीही योग्य आणि पात्र नाही. जर देवाच्या आत्म्याद्वारे थेट न्याय केला गेला असता, तर तो सर्वसमावेशक ठरला नसता. शिवाय, असे कार्य मनुष्यासाठी स्वीकारणे कठीण झाले असते, कारण आत्मा मनुष्याच्या समोरासमोर येऊ शकत नाही आणि त्यामुळे, त्याचे परिणाम त्वरित होणार नाहीत, मनुष्याने देवाची पाप सहन न करण्याची प्रवृत्ती स्पष्टपणे पाहणे तर दूरच. देहातील देवाने मानवजातीच्या भ्रष्टतेचा न्याय केला तरच सैतानाचा पूर्णपणे पराभव होऊ शकतो. सामान्य मानवता असलेल्या मनुष्याप्रमाणेच, देहातील देव मनुष्याच्या अनीतिमत्त्वाचा थेट न्याय करू शकतो; हे त्याच्या जन्मजात पवित्रतेचे आणि त्याच्या विलक्षणतेचे लक्षण आहे. केवळ देवच मनुष्याचा न्याय करण्यास पात्र आहे आणि न्याय करण्याच्या स्थितीत आहे, कारण त्याच्याकडे सत्य आणि नीतिमत्त्व आहे आणि म्हणूनच तो मनुष्याचा न्याय करण्यास सक्षम आहे. ज्यांच्याकडे सत्य आणि नीतिमत्त्व नाही, ते इतरांचा न्याय करण्यास योग्य नाहीत. जर हे कार्य देवाच्या आत्म्याने केले असते, तर त्याला सैतानावर विजय मिळवणे असे मानता आले नसते. आत्मा हा मुळातच मर्त्य प्राणिमात्रांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे आणि देवाचा आत्मा मुळातच पवित्र आहे आणि त्याने देहावर विजय प्राप्त केलेला आहे. जर आत्म्याने हे कार्य थेट केले असते, तर तो मनुष्याच्या सर्व अवज्ञाचा न्याय करू शकला नसता आणि मनुष्याची सर्व अनीती प्रकट करू शकला नसता. कारण न्यायाचे कार्यदेखील देवाबद्दलच्या मनुष्याच्या धारणांद्वारे पार पडते आणि मनुष्याच्या ठायी आत्म्याबद्दल कधीही कोणत्याही धारणा नव्हत्या आणि म्हणून आत्मा मनुष्याची अनीती अधिक चांगल्या प्रकारे प्रकट करण्यास असमर्थ आहे, अशी अनीती पूर्णपणे प्रकट करणे तर दूरच. देहधारी देव हा त्या सर्वांचा शत्रू आहे जे त्याला ओळखत नाहीत. मनुष्याच्या धारणांचा आणि विरोधाचा न्याय करून, तो मानवजातीच्या सर्व अवज्ञा प्रकट करतो. देहातील त्याच्या कार्याचे परिणाम आत्म्याच्या कार्यापेक्षा अधिक स्पष्ट असतात. आणि म्हणून, सर्व मानवजातीचा न्याय थेट आत्म्याद्वारे केला जात नाही, तर ते देहधारी देवाचे कार्य असते. देहातील देव मनुष्याला दिसू शकतो आणि त्याला स्पर्श करता येतो आणि देहातील देव मनुष्यावर पूर्णपणे विजय प्राप्त करू शकतो. देहातील देवाशी असलेल्या त्याच्या नातेसंबंधात, मनुष्य विरोधापासून आज्ञाधारकतेपर्यंत, छळापासून स्वीकृतीपर्यंत, धारणांपासून ज्ञानापर्यंत आणि नकारापासून प्रेमापर्यंत प्रगती करतो—हे देहधारी देवाच्या कार्याचे परिणाम आहेत. मनुष्य केवळ त्याच्या न्यायाच्या स्वीकृतीमुळेच वाचतो, मनुष्य केवळ त्याच्या तोंडून निघालेल्या वचनांतून हळूहळू त्याला ओळखू लागतो, त्याच्या विरोधाच्या वेळी मनुष्यावर विजय प्राप्त केला जातो आणि त्याचे ताडण स्वीकारताना त्याच्याकडून मनुष्याला जीवनाचा पुरवठा प्राप्त होतो. हे सर्व कार्य देहातील देवाचे कार्य असते आणि आत्मा म्हणून केलेले देवाचे कार्य नसते. देहधारी देवाने केलेले कार्य हे सर्वात मोठे आणि सर्वात सखोल कार्य असते आणि देवाच्या कार्याच्या तीन टप्प्यांमधील महत्त्वाचा भाग म्हणजे देहधारणेच्या कार्याचे दोन टप्पे असतात. मनुष्याचा तीव्र भ्रष्टाचार हा देहधारी देवाच्या कार्यातील मोठा अडथळा असतो. विशेषतः, शेवटच्या काळातील लोकांवर केलेले कार्य अत्यंत कठीण असते आणि वातावरण प्रतिकूल असते आणि प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीची क्षमता खूपच कमी असते. तरीही या कार्याच्या शेवटी, कोणत्याही दोषांविना, ते योग्य परिणाम साध्य करेल; हा देहाच्या कार्याचा परिणाम आहे आणि हा प्रभाव आत्म्याच्या कार्यापेक्षा अधिक प्रेरक आहे. देवाच्या कार्याचे तीन टप्पे देहात पूर्ण केले जातील आणि ते देहधारी देवाने पूर्ण केले पाहिजेत. सर्वात महत्वाचे आणि सर्वात निर्णायक कार्य देहात पार पाडले जाते आणि मनुष्याचे तारण हे देहात देवाने वैयक्तिकरीत्या केले पाहिजे. जरी सर्व मानवजातीला असे वाटते, की देहातील देव मनुष्याशी संबंधित नाही तरी, वस्तुतः हा देह संपूर्ण मानवजातीच्या भवितव्याशी आणि अस्तित्वाशी संबंधित आहे.

देवाच्या कार्याचा प्रत्येक टप्पा संपूर्ण मानवजातीसाठी अमलात आणला जातो आणि संपूर्ण मानवजात हे त्याचे लक्ष्य असते. जरी हे त्याचे देहात केलेले कार्य असले, तरीही संपूर्ण मानवजात हे त्याचे लक्ष्य आहे; तो सर्व मानवजातीचा देव आहे आणि तो निर्मिलेल्या आणि न निर्मिलेल्या सर्व प्राणिमात्रांचा देव आहे. जरी देहात केलेले त्याचे कार्य मर्यादित कार्यक्षेत्रात असले आणि या कार्याचे उद्दिष्टदेखील मर्यादित असले, तरी प्रत्येक वेळी तो त्याचे कार्य करण्यासाठी देहधारी बनतो तेव्हा तो त्याच्या कार्याचे लक्ष्य निवडतो जे सर्वोच्चरीत्या प्रातिनिधिक असते; तो कार्य करण्यासाठी साध्या आणि सामान्य लोकांचा समूह निवडत नाही, तर त्याऐवजी त्याच्या कार्याचे लक्ष्य म्हणून लोकांचा असा एक समूह निवडतो जो देहात केलेल्या त्याच्या कार्याचे प्रतिनिधी बनण्यास सक्षम आहे. लोकांच्या या समूहाची निवड केली जाते, कारण देहात केलेल्या त्याच्या कार्याची व्याप्ती मर्यादित आहे आणि विशेषतः ते त्याच्या देहासाठी तयार आहे आणि देहात करावयाच्या त्याच्या कार्यासाठी विशेषत्वाने निवडलेले आहे. देवाने केलेली त्याच्या कार्याच्या लक्ष्याची निवड निराधार नाही, परंतु ती तत्त्वांनुसार केलेली आहे: कार्याचे लक्ष्य हे देवाच्या देहात करावयाच्या कार्यासाठी फायदेशीर असावे आणि ते संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असावे. उदाहरणार्थ, यहूदी येशूचे वैयक्तिक सुटकेचे कार्य स्वीकारण्यासाठी संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम होते आणि चिनी लोक देहधारी देवाचा वैयक्तिक विजय स्वीकारण्यासाठी संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहेत. यहूद्यांनी संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करण्याला एक आधार आहे आणि चिनी लोकांनी देवाच्या वैयक्तिक विजयाचा स्वीकार करण्यात संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व करण्यालाही एक आधार आहे. यहूदी लोकांमध्ये केलेल्या सुटकेच्या कार्यापेक्षा अन्य कोणतीही गोष्ट सुटकेचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने प्रकट करत नाही आणि चीनी लोकांमध्ये केलेल्या विजयाच्या कार्यापेक्षा अन्य कोणत्याही गोष्टीने विजयाच्या कार्याची परिपूर्णता आणि यश प्रकट होत नाही. देहधारी देवाचे कार्य आणि वचने ही केवळ लोकांच्या एका लहान गटासाठी असल्याचे भासले, तरी प्रत्यक्षात, या लहान गटातील त्याचे कार्य हे संपूर्ण विश्वाचे कार्य आहे आणि त्याची वचने संपूर्ण मानवजातीसाठी आहेत. देहात केलेले त्याचे कार्य संपुष्टात आल्यानंतर, जे त्याचे अनुसरण करतात, ते त्यांच्यामध्ये त्याने केलेल्या कार्याचा प्रसार करण्यास सुरुवात करतील. देहात केलेल्या त्याच्या कार्याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, त्याची अचूक वचने आणि उपदेश आणि त्याची विशिष्ट हे त्याचे अनुसरण करणाऱ्या लोकांसाठी मागे सोडून जाऊ शकतो, जेणेकरून नंतर त्याचे अनुयायी त्याने देहात केलेली सर्व कार्ये आणि संपूर्ण मानवजातीसाठी त्याची इच्छा यांना अधिक अचूकपणे आणि अधिक ठोसपणे अशा लोकांपर्यंत पोहोचवू शकतील, जे त्या मार्गाचा स्वीकार करतात. केवळ देवाने मानवी देहात केलेले कार्य खऱ्या अर्थाने देवाने मनुष्यासोबत असण्याची आणि त्याच्यासोबत राहण्याची वस्तुस्थिती पूर्ण करते. केवळ हेच कार्य देवाचा चेहरा पाहण्याची, देवाच्या कार्याची साक्ष देण्याची आणि देवाचे वैयक्तिक वचन ऐकण्याची मनुष्याची इच्छा पूर्ण करते. देहधारी देव त्या युगाचा शेवट करतो जेव्हा केवळ यहोवाची पाठ मनुष्यजातीला दिसली होती आणि त्याच वेळी तो मानवजातीने अस्पष्ट देवावर विश्वास ठेवण्याच्या युगाचीही सांगता करतो. विशेषतः, शेवटच्या देहधारी देवाचे कार्य सर्व मानवजातीला अशा युगात आणते, जे अधिक वास्तववादी, अधिक व्यावहारिक आणि अधिक सुंदर आहे. तो केवळ नियमशास्त्र आणि सिद्धांताच्या युगाची सांगता करत नाही, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो मानवजातीसमोर असा देव प्रकट करतो जो वास्तविक आणि सामान्य आहे, जो नीतिमान आणि पवित्र आहे, जो व्यवस्थापन योजनेचे कार्य उघड करतो आणि जो मानवजातीची रहस्ये आणि गंतव्यस्थान प्रदर्शित करतो, ज्याने मानवजातीची निर्मिती केली आणि व्यवस्थापन कार्याचा शेवट केला आणि जो हजारो वर्षांपासून लपलेला आहे. तो अस्पष्टतेच्या युगाचा पूर्ण अंत करतो, ज्यामध्ये संपूर्ण मानवजातीने देवाचा चेहरा शोधण्याची इच्छा व्यक्त केली परंतु ते साध्य झाले नाही अशा युगाचा तो अंत करतो, ज्या युगात संपूर्ण मानवजातीने सैतानाची सेवा केली त्या युगाचा तो शेवट करतो आणि तो संपूर्ण मानवजातीला नवीन युगात घेऊन जातो. देवाच्या आत्म्याच्या नव्हे, तर देहात केलेल्या देवाच्या कार्याचा हा सर्व परिणाम आहे. जेव्हा देव त्याच्या देहात कार्य करतो, तेव्हा त्याचे अनुसरण करणारे अशा गोष्टींचा शोध घेत नाहीत, ज्या अस्तित्वात असल्यासारखे भासते आणि अस्तित्वात नसल्यासारखेही भासते आणि ते अस्पष्ट देवाच्या इच्छेनुसार अंदाज करणे थांबवतात. जेव्हा देव देहात केलेल्या त्याच्या कार्याचा प्रसार करतो, तेव्हा त्याचे अनुसरण करणारे लोक त्याने देहात केलेले कार्य सर्व धर्म आणि संप्रदायांपर्यंत पोहोचवतील आणि ते त्याची वचने संपूर्ण मानवजातीच्या कानापर्यंत पोहोचवतील. त्याची सुवार्ता प्राप्त करणाऱ्यांच्या जे कानी पडते, ते सर्व काही त्याच्या कार्याचे तथ्य असेल, त्या मनुष्याने वैयक्तिकरीत्या पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टी असतील आणि ती तथ्ये असतील, सांगोवांगीच्या ऐकीव गोष्टी नसतील. ही वस्तुस्थिती म्हणजे ज्यांच्या सहाय्याने तो कार्याचा प्रसार करतो ते पुरावे आणि साधनेदेखील आहेत. वस्तुस्थिती असल्याखेरीज, त्याची सुवार्ता सर्व देशांमध्ये आणि सर्व ठिकाणी पसरणार नाही; तथ्यांविना परंतु केवळ मनुष्याच्या कल्पनेने, तो संपूर्ण विश्वावर विजय प्राप्त करण्याचे कार्य कधीही करू शकणार नाही. आत्मा मनुष्यासाठी अभेद्य आहे आणि मनुष्यासाठी अदृश्य आहे आणि आत्म्याचे कार्य मनुष्यासाठी देवाच्या कार्याचा कोणताही पुरावा किंवा तथ्ये मागे सोडण्यास असमर्थ आहे. मनुष्य कधीच देवाचा खरा चेहरा पाहू शकत नाही, तो सदैव अस्तित्वात नसलेल्या अस्पष्ट देवावर विश्वास ठेवतो. मनुष्य कधीच देवाचा चेहरा पाहणार नाही किंवा देवाने वैयक्तिकरीत्या उच्चारलेली वचने कधीही ऐकणार नाही. शेवटी मनुष्याच्या कल्पना पोकळच आहेत आणि त्या देवाच्या खऱ्या चेहऱ्याची जागा घेऊ शकत नाहीत; देवाची अंतर्निहित प्रवृत्ती आणि स्वतः देवाचे कार्य यांचा आव आणणे मनुष्याला शक्य नाही. स्वर्गातील अदृश्य देव आणि त्याचे कार्य केवळ देहधारी देवच पृथ्वीवर आणू शकतो, जो वैयक्तिकरीत्या त्याचे कार्य मनुष्यामध्ये करतो. देवाने मनुष्याला दर्शन देण्याचा हा सर्वात आदर्श मार्ग आहे, ज्यामध्ये मनुष्य देवाला पाहतो आणि देवाचा खरा चेहरा ओळखतो आणि तो देहधारी नसलेल्या देवाकडून हे साध्य होऊ शकत नाही. या टप्प्यापर्यंत त्याचे कार्य पार पाडून, देवाच्या कार्याने याआधीच इष्टतम परिणाम साध्य केलेला आहे आणि पूर्ण यश प्राप्त केलेले आहे. देहात केलेल्या देवाच्या वैयक्तिक कार्याने त्याच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे नव्वद टक्के कार्य हे आधीच पूर्ण केलेले आहे. या देहाने त्याच्या सर्व कार्याची एक चांगली सुरुवात केली आहे आणि त्याच्या सर्व कार्याचा सारांश दिला आहे आणि त्याचे सर्व कार्य जाहीर केले आहे आणि या सर्व कार्यासाठीची शेवटची पूर्ण भरपाई केली आहे. यापुढे, देवाच्या कार्याचा चौथा टप्पा पार पाडण्यासाठी दुसरा देहधारी देव नसेल आणि देवाच्या तिसऱ्या देहधारणेचे कोणतेही चमत्कारी कार्य कधीही होणार नाही.

देहात केलेल्या देवाच्या कार्याचा प्रत्येक टप्पा त्याच्या संपूर्ण युगाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करतो आणि मनुष्याच्या कार्याप्रमाणे तो विशिष्ट कालावधीचे प्रतिनिधित्व करत नाही. आणि म्हणून त्याच्या शेवटच्या देहधारणेच्या कार्याच्या समाप्तीचा अर्थ असा नाही, की त्याचे कार्य पूर्ण झाले आहे, कारण त्याने देहात केलेले कार्य संपूर्ण युगाचे प्रतिनिधित्व करते आणि केवळ त्या कालावधीचे प्रतिनिधित्व करत नाही ज्यामध्ये तो देहात कार्य करतो. हे एवढेच आहे, की तो देहात असताना संपूर्ण युगातील त्याचे कार्य पूर्ण करतो, त्यानंतर ते सर्वत्र पसरते. देहधारी देवाने त्याचे सेवाकार्य पूर्ण केल्यानंतर, तो त्याचे भविष्यातील कार्य त्याचे अनुसरण करणाऱ्यांवर सोपवेल. अशा प्रकारे त्यांचे संपूर्ण युगाचे कार्य अखंड चालू राहिल. देहधारी देवाचे संपूर्ण युगाचे कार्य संपूर्ण विश्वात पसरल्यानंतरच ते पूर्ण झाल्याचे मानले जाईल. देहधारी देवाचे कार्य एका नवीन युगाची सुरुवात करते आणि जे त्याचे कार्य चालू ठेवतात, त्यांचा त्याच्याकडून वापर केला जातो. मनुष्याने केलेले कार्य हे सर्व देहात केलेले देवाचे सेवाकार्य असते आणि ते या व्याप्तीच्या पलीकडे जाण्यास असमर्थ असते. जर देहधारी देव त्याचे कार्य करण्यासाठी आला नसता, तर मनुष्य जुन्या युगाचा अंत करू शकला नसता आणि नवीन युगाची सुरुवात करू शकला नसता. मनुष्याने केलेले कार्य हे केवळ त्याच्या कर्तव्याच्या मर्यादेत आहे, जे मानवी पद्धतीने करणे शक्य आहे आणि ते देवाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करत नाही. केवळ देहधारी देवच येऊन त्याने करावयाचे कार्य पूर्ण करू शकतो आणि त्याच्याखेरीज हे कार्य त्याच्या वतीने कोणीही करू शकत नाही. अर्थात, मी जे बोलतो ते देहधारणेच्या कार्याच्या संदर्भात आहे. हा देहधारी देव प्रथम कार्याचा एक टप्पा पार पाडतो जो मनुष्याच्या धारणांना अनुरूप नाही, त्यानंतर तो मनुष्याच्या धारणांना अनुरूप नसलेले आणखी कार्य करतो. या कार्याचा उद्देश मनुष्यावर विजय प्राप्त करणे हा आहे. एका अर्थाने, देहधारी देव मनुष्याच्या धारणेशी जुळत नाही, शिवाय तो अधिक कार्य करतो जे मनुष्याच्या धारणेशी जुळत नाही आणि म्हणून मनुष्य त्याच्याबद्दल आणखी टीकात्म मते बनवतो. तो केवळ त्याच्याबद्दल असंख्य धारणा असलेल्या लोकांमध्ये विजय प्राप्त करण्याचे कार्य करतो. ते त्याच्याशी कसेही वागले तरीही, एकदा त्याने आपले सेवाकार्य पूर्ण केले की, सर्व लोक त्याच्या अधिपत्याखाली येतील. या कार्याची वस्तुस्थिती केवळ चिनी लोकांमध्येच दिसून येत नाही, तर संपूर्ण मानवजातीवर कशाप्रकारे विजय प्राप्त केला जाईल हेदेखील दर्शवते. या लोकांवर होणारे परिणाम हे संपूर्ण मानवजातीवर होणार्‍या परिणामांची पूर्ववर्ती आहेत आणि भविष्यात तो करणाऱ्या कार्याचे परिणाम या लोकांवर होणार्‍या प्रभावांपेक्षा अधिक असतील. देहात केलेले देवाचे कार्य मोठ्या धूमधडाक्यात केले जात नाही किंवा ते अस्पष्टतेत दडलेले नसते. हे वास्तविक आणि प्रत्यक्ष असते आणि हे असे कार्य असते ज्यामध्ये एक अधिक एक दोन होतात. हे कोणापासून लपून राहिलेले नसते आणि कोणाला फसवत नाही. लोक जे पाहतात त्या खऱ्या आणि अस्सल गोष्टी असतात आणि मनुष्याला जे साध्य होते ते खरे सत्य आणि ज्ञान असते. जेव्हा कार्य संपेल, तेव्हा मनुष्याला त्याच्याबद्दल नवीन ज्ञान प्राप्त होईल आणि जे खरोखर त्याचा पाठपुरावा करतात त्यांच्या ठायी त्याच्याबद्दल कोणत्याही धारणा राहणार नाहीत. हा केवळ चिनी लोकांवर त्याच्या कार्याचा प्रभाव नाही, तर संपूर्ण मानवजातीवर विजय प्राप्त करण्याच्या त्याच्या कार्याचा परिणाम आहे, कारण संपूर्ण मानवजातीवर विजय प्राप्त करण्याच्या कार्यासाठी या देहापेक्षा आणि या देहात केलेल्या कार्यापेक्षा अन्य काहीही अधिक फायदेशीर नाही. ते आज त्याच्या आजच्या कार्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याच्या भविष्यातील कार्यासाठीही फायदेशीर आहे. हा देह संपूर्ण मानवजातीवर विजय प्राप्त करेल आणि संपूर्ण मानवजातीला प्राप्त करेल. ज्याद्वारे संपूर्ण मानवजात देवाला पाहील, देवाची आज्ञा पाळेल आणि देवाला ओळखेल, असे यापेक्षा चांगले कार्य नाही. मनुष्याने केलेल्या कार्याची व्याप्ती मर्यादित असते आणि जेव्हा देव त्याचे कार्य करतो तेव्हा तो एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी बोलत नाही, परंतु संपूर्ण मानवजातीशी आणि त्याची वचने स्वीकारणाऱ्या सर्व लोकांशी बोलतो. त्याने घोषित केलेला शेवट हा सर्व मानवजातीचा अंत असतो, तो केवळ एका विशिष्ट व्यक्तीचा अंत नसतो. तो कोणालाही विशेष वागणूक देत नाही किंवा तो कोणाचाही बळी घेत नाही आणि तो संपूर्ण मानवजातीसाठी कार्य करतो आणि बोलतो. या देहधारी देवाने आधीच संपूर्ण मानवजातीचे प्रकारानुसार वर्गीकरण केले आहे, आधीच संपूर्ण मानवजातीचा न्याय केला आहे आणि संपूर्ण मानवजातीसाठी योग्य गंतव्यस्थानाची व्यवस्था केली आहे. जरी देव केवळ त्याचे कार्य चीनमध्ये करत असला, तरी प्रत्यक्षात त्याने संपूर्ण विश्वाचे कार्य आधीच केले आहे. त्याची वचने आणि व्यवस्था टप्प्याटप्प्याने करण्यापूर्वी, त्याच्या कार्याचा संपूर्ण मानवजातीमध्ये प्रसार करेपर्यंत तो थांबू शकत नाही. त्याला खूप उशीर तर होणार नाही ना? आता तो भविष्यातील कार्य आधीच पूर्ण करण्यास सक्षम आहे. कारण जो कार्य करत आहे तो देहामधील देव आहे, तो मर्यादित व्याप्तीत अमर्याद कार्य करत आहे आणि नंतर तो मनुष्याला त्याचे कर्तव्य बजावण्यास भाग पाडेल; हे त्याच्या कार्याचे तत्त्व आहे. तो केवळ काही काळ मनुष्यासोबत राहू शकतो आणि संपूर्ण युगाचे कार्य पूर्ण होईपर्यंत तो मनुष्यासोबत राहू शकत नाही. तो देव असल्यामुळेच तो त्याच्या भावी कार्याचे भाकीत करतो. त्यानंतर, तो त्याच्या वचनांद्वारे संपूर्ण मानवजातीचे प्रकारानुसार वर्गीकरण करेल आणि मानवजात त्याच्या वचनांनुसार त्याच्या कार्यात टप्प्याटप्प्याने प्रवेश करेल. यातून कोणीही सुटणार नाही आणि सर्वांनी यानुसार अनुसरण केले पाहिजे. म्हणून, भविष्यात युगाला त्याच्या वचनांद्वारे मार्गदर्शन केले जाईल आणि आत्म्याद्वारे मार्गदर्शन केले जाणार नाही.

देहात करावयाचे देवाचे कार्य देहातच पार पडले पाहिजे. जर ते थेट देवाच्या आत्म्याने केले गेले, तर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. जरी ते आत्म्याद्वारे केले गेले तरी, कार्याला फारसे महत्त्व नसेल आणि शेवटी ते मनाला पटणारे नसेल. सर्व प्राणिमात्रांना हे जाणून घ्यायचे आहे, की निर्मात्याच्या कार्याला महत्त्व आहे की नाही आणि ते कशाचे प्रतिनिधित्व करते आणि ते कशासाठी केले जाते आणि देवाचे कार्य अधिकार आणि शहाणपणाने परिपूर्ण आहे की नाही आणि ते अत्यंत मौल्यवान आहे की नाही. तो जे कार्य करतो ते संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी, सैतानाला पराभूत करण्यासाठी आणि सर्व गोष्टींमध्ये त्याची साक्ष देण्यासाठी केले जाते. म्हणूनच, तो जे कार्य करतो ते खूप महत्त्वाचे असले पाहिजे. मनुष्याचा देह सैतानाने भ्रष्ट केला आहे आणि अगदी आंधळे करून त्याचे गंभीर नुकसान केले आहे. देव देहात वैयक्तिकरीत्या कार्य का करतो याचे सर्वात मूलभूत कारण म्हणजे त्याच्या तारणाचे लक्ष्य मनुष्य आहे, जो रक्तमांसाचा बनलेला आहे आणि सैतानदेखील देवाच्या कार्यात अडथळा आणण्यासाठी मनुष्याच्या देहाचा वापर करतो. सैतानाशी लढाई हे खरे तर मनुष्यावर विजय प्राप्त करण्याचे कार्य आहे आणि त्याच वेळी मनुष्य हा देवाच्या तारणाचे लक्ष्य आहे. अशाप्रकारे देहधारी देवाचे कार्य आवश्यक आहे. सैतानाने मनुष्याचे शरीर भ्रष्ट केले आणि मनुष्य सैतानाचे रूप बनला, तसेच देवाने पराभूत होण्याचे लक्ष्य बनला. अशाप्रकारे, सैतानाशी युद्ध करण्याचे आणि मानवजातीला वाचवण्याचे कार्य पृथ्वीवर घडते आणि सैतानाशी युद्ध करण्यासाठी देवाने मनुष्य बनले पाहिजे. हे अत्यंत व्यावहारिकतेचे कार्य आहे. जेव्हा देव देहात कार्य करत असतो, तेव्हा तो प्रत्यक्षात सैतानाशी देहात लढत असतो. जेव्हा तो देहात कार्य करतो, तेव्हा तो त्याचे कार्य आध्यात्मिक क्षेत्रात करत असतो आणि तो त्याचे संपूर्ण कार्य आध्यात्मिक क्षेत्रात पृथ्वीवर साकार करतो. ज्याच्यावर विजय प्राप्त केला जातो, तो मनुष्य असतो, मनुष्य जो त्याची अवज्ञा करतो आणि जो पराभूत होतो, तो सैतानाचे मूर्त स्वरूप असतो (अर्थात, हादेखील मनुष्य असतो), जो त्याच्याशी वैर बाळगतो आणि जो शेवटी वाचवला जातो तोदेखील मनुष्यच असतो. अशाप्रकारे, प्राणिमात्राचे बाह्य आवरण असलेला मनुष्य बनणे हे देवासाठी अधिकच आवश्यक असते, जेणेकरून तो सैतानाशी खरी लढाई करू शकेल, त्याची आज्ञा न पाळणाऱ्या, त्याच्यासारखेच बाह्य आवरण असलेल्या आणि सैतानाने इजा केलेल्या मनुष्यावर विजय प्राप्त करू शकेल. त्याचा शत्रू मनुष्य आहे, त्याच्या विजयाचे लक्ष्य मनुष्य आहे आणि त्याच्या तारणाचे लक्ष्य मनुष्य आहे, ज्याला त्यानेच निर्माण केले आहे. म्हणून त्याने मनुष्य बनले पाहिजे आणि अशा प्रकारे, त्याचे कार्य अधिक सोपे होते. तो सैतानाला पराभूत करण्यास आणि मानवजातीवर विजय प्राप्त करण्यास सक्षम आहे आणि त्याशिवाय, मानवजातीला वाचवण्यास सक्षम आहे. जरी हा देह सामान्य आणि वास्तविक असला तरी, तो सामान्य देह नाही: तो केवळ मानवी देह नाही, तर तो देह मनुष्य आणि दैवी दोन्ही आहे. हा त्याच्यामधील आणि मनुष्यामधील फरक आहे आणि तीच देवाच्या ओळखीची खूण आहे. तो करू इच्छित असलेले कार्य केवळ देहच करू शकतो आणि देहात करावयाचे देवाचे सेवाकार्य पूर्ण करू शकतो आणि मनुष्यामध्ये त्याचे कार्य पूर्णपणे पूर्ण करू शकतो. तसे नसते तर, त्याचे मनुष्यांमधील कार्य नेहमीच पोकळ आणि सदोष असते. जरी देव सैतानाच्या आत्म्याशी लढाई करू शकतो आणि विजयी होऊ शकतो, तरी भ्रष्ट मनुष्याच्या जुन्या स्वभावाचे कधीही निराकरण होऊ शकत नाही आणि जे देवाची अवज्ञा करतात आणि त्याला विरोध करतात ते कधीही त्याच्या अधिपत्याखाली येऊ शकत नाहीत, म्हणजेच, तो मानवजातीवर कधीही विजय प्राप्त करू शकत नाही आणि संपूर्ण मानवजातीला कधीही प्राप्त करू शकत नाही. जर पृथ्वीवरील त्याचे कार्य सोडवले जाऊ शकत नाही, तर त्याचे व्यवस्थापन कधीही संपुष्टात येणार नाही आणि संपूर्ण मानवजात विश्रांतीत प्रवेश करू शकणार नाही. जर देव त्याच्या सर्व प्राणिमात्रांसोबत विश्रांतीत प्रवेश करू शकत नसेल, तर अशा व्यवस्थापन कार्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि परिणामी देवाचे वैभव नाहीसे होईल. जरी त्याच्या देहाला अधिकार नसला, तरी तो जे कार्य करतो त्याचा परिणाम साध्य होईल. ही त्याच्या कार्याची अपरिहार्य दिशा आहे. त्याच्या देहाला अधिकार असो वा नसो, जोपर्यंत तो स्वत: देवाचे कार्य करण्यास सक्षम आहे तोपर्यंत तो स्वतःच देव आहे. हा देह कितीही सामान्य असला तरी, त्याने जे कार्य करायला हवे ते तो करू शकतो, कारण हा देह म्हणजेच देव आहे आणि तो केवळ मनुष्य नाही. मनुष्य जे करू शकत नाही असे कार्य हा देह करू शकतो याचे कारण म्हणजे त्याचे आंतरिक मूलतत्त्व कोणत्याही मनुष्यापेक्षा वेगळे आहे आणि तो मनुष्याला वाचवू शकतो याचे कारण म्हणजे त्याची ओळख कोणत्याही मनुष्यापेक्षा वेगळी आहे. हा देह मानवजातीसाठी इतका महत्त्वाचा आहे कारण तो मनुष्य आहे आणि त्याहूनही अधिक म्हणजे तो देव आहे, कोणीही सामान्य मनुष्य जे करू शकत नाही असे कार्य तो करतो आणि पृथ्वीवर त्याच्यासोबत राहणाऱ्या भ्रष्ट मनुष्याला तो वाचवू शकतो. जरी तो मनुष्यासारखाच असला तरी, देहधारी देव मानवजातीसाठी इतर कोणत्याही मौल्यवान व्यक्तीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे, कारण तो जे कार्य करतो ते देवाच्या आत्म्याद्वारे केले जाऊ शकत नाही आणि देवाची साक्ष देण्यासाठी तो देवाच्या आत्म्यापेक्षा अधिक सक्षम असतो आणि मानवजातीला पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी देवाच्या आत्म्यापेक्षा अधिक सक्षम असतो. परिणामी, जरी हा देह सामान्य असला तरी, मानवजातीसाठी त्याचे योगदान आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी त्याचे महत्त्व त्याला अत्यंत मौल्यवान बनवते आणि या देहाचे खरे मूल्य आणि महत्त्व कोणत्याही मानवासाठी अतुलनीय असते. जरी हा देह सैतानाचा थेट नाश करू शकत नसला तरी, तो त्याच्या कार्याचा उपयोग मानवजातीवर विजय प्राप्त करण्यासाठी आणि सैतानाला पराभूत करण्यासाठी आणि सैतानाला पूर्णपणे त्याच्या अधिपत्याखाली आणण्यासाठी करू शकतो. देवाने देहधारण केल्यामुळेच तो सैतानाला पराभूत करू शकतो आणि मानवजातीला वाचवण्यास सक्षम असतो. तो सैतानाचा थेट नाश करत नाही, तर त्याऐवजी सैतानाने भ्रष्ट केलेल्या मानवजातीवर विजय प्राप्त करण्याचे कार्य करण्यासाठी तो देह धारण करतो. अशाप्रकारे, तो त्याने निर्मिलेल्या प्राणिमात्रांमध्ये स्वतःची अधिक चांगल्या रितीने साक्ष देण्यास अधिक सक्षम असतो आणि भ्रष्ट मनुष्याला वाचवण्यास अधिक सक्षम असतो. देवाच्या आत्म्याने सैतानाचा थेट नाश करण्यापेक्षा, देहधारी देवाकडून सैतानाचा पराभव अधिक साक्ष देतो आणि अधिक प्रेरक असतो. मनुष्याला निर्माणकर्त्याला ओळखण्यास मदत करण्यास देहातील देव अधिक सक्षम असतो आणि त्याने निर्मिलेल्या प्राणिमात्रांमध्ये स्वतःची साक्ष देण्यास अधिक सक्षम असतो.

मागील:  देवाच्या कार्याचे तीन टप्पे जाणून घेणे हा देवाला जाणून घेण्याचा मार्ग आहे

पुढील:  देवाने धारण केलेल्या देहाचे मूलतत्त्व

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger