पेत्राने येशूला कसे ओळखले

पेत्राने येशूसोबत घालवलेल्या काळात, त्याने येशूमध्ये अनेक प्रेमळ वैशिष्ट्ये पाहिली, अनेक अनुकरणीय पैलू पाहिले आणि अनेक पैलूंनी त्याच्यासाठी तरतूद केली. जरी पेत्राने येशूमध्ये देवाचे अस्तित्व अनेक प्रकारे पाहिले व अनेक प्रेमळ गुण पाहिले, तरी तो येशूला प्रथम ओळखत नव्हता. पेत्र २० वर्षांचा असताना त्याने येशूचे अनुसरण करण्यास सुरुवात केली आणि सहा वर्षे तो त्याचे अनुसरण करत होता. त्या काळात तो येशूला कधीच ओळखू शकला नाही; पेत्र निव्वळ येशूबद्दलच्या पूर्णपणे कौतुकापोटी त्याचे अनुसरण करण्यास तयार होता. जेव्हा येशूने प्रथम त्याला गालील समुद्राच्या किनाऱ्यावर बोलावले, तेव्हा त्याने विचारले: “शिमोन बार्योना, तू माझे अनुसरण करशील का?” पेत्र म्हणाला: “ज्याला स्वर्गीय पित्याने पाठवले आहे त्याचे मी अनुसरण केले पाहिजे. ज्याला पवित्र आत्म्याने निवडले आहे त्याला मी कबूल केले पाहिजे. मी तुझे अनुसरण करेन.” त्या वेळी, पेत्राने आधीच येशू नावाच्या मनुष्याबद्दल ऐकले होते—संदेष्ट्यांपैकी महान व देवाचा प्रिय पुत्र—आणि पेत्र सतत त्याला शोधण्याची व त्याला पाहण्याची संधी मिळण्याची आशा बाळगत होता (कारण अशाचप्रकारे पवित्र आत्म्याद्वारे त्याचे नेतृत्व केले जात होते). जरी पेत्राने त्याला कधीही पाहिले नव्हते आणि त्याने त्याच्याबद्दल फक्त अफवा ऐकल्या होत्या, तरी हळूहळू त्याच्या हृदयात येशूबद्दलची तळमळ व प्रेम वाढू लागले आणि त्याला एक दिवस येशूला पाहण्याची इच्छा होती. आणि येशूने पेत्राला कसे बोलावले? त्याने सुद्धा पेत्र नावाच्या मनुष्याबद्दल ऐकले होते, परंतु पवित्र आत्म्याने त्याला अद्याप अशी सूचना दिली नव्हती: “गालील समुद्राकडे जा, तेथे शिमोन बार्योना नावाचा एक मनुष्य आहे.” येशूने ऐकले होते, की शिमोन बार्योना नावाचा एक मनुष्य आहे व लोकांनी त्याचे प्रवचन ऐकले आहे, त्यानेही स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली होती आणि ज्या लोकांनी त्याचे ऐकले होते त्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. हे ऐकल्यानंतर, येशू त्या व्यक्तीच्या मागे गालील समुद्रापर्यंत गेला; जेव्हा पेत्राने येशूची हाक स्वीकारली तेव्हा तो त्याच्यामागे गेला.

येशूचे अनुसरण करताना, पेत्राने त्याच्याबद्दल अनेक मते तयार केली आणि नेहमी त्याच्या स्वतःच्या दृष्टीकोनातून त्याचा न्याय केला. पेत्राला आत्म्याविषयी काही प्रमाणात समज असली तरी, त्याची समज काहीशी अस्पष्ट होती, म्हणूनच तो म्हणाला: “ज्याला स्वर्गीय पित्याने पाठवले आहे त्याचे मी अनुसरण केले पाहिजे. ज्याला पवित्र आत्म्याने निवडले आहे त्याला मी स्वीकारले पाहिजे.” येशूने केलेल्या गोष्टी त्याला समजल्या नाहीत व त्याबद्दल स्पष्टता नव्हती. काही काळ येशूचे अनुसरण केल्यावर, त्याने जे काही केले आणि सांगितले त्यात व स्वतः येशूमध्ये पेत्राचा रस वाढला. त्याला असे वाटू लागले, की येशूने आपुलकी आणि आदर या दोन्ही गोष्टींना प्रेरणा दिली; त्याला त्याच्याशी संलग्न होणे व त्याच्या शेजारी राहणे आवडले आणि येशूची वचने ऐकून त्याला पुरवठा व मदत मिळाली. ज्या काळात तो येशूचे अनुसरण करत होता, त्या दरम्यान, पेत्राने त्याच्या जीवनातील सर्व गोष्टींचे निरीक्षण केले व त्या मनावर घेतल्या: त्याच्या कृती, वचने, हालचाली आणि भाव. येशू सामान्य मनुष्यांसारखा नाही याची त्याला खोलवर समज आली. जरी त्याचे मानवी स्वरूप अत्यंत सामान्य असले तरी, तो मनुष्याबद्दल प्रेम, करुणा व सहिष्णुतेने परिपूर्ण होता. त्याने जे काही केले किंवा सांगितले ते सर्व इतरांना खूप मदत करणारे होते आणि पेत्राने यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अथवा मिळवलेल्या गोष्टी येशूकडून पाहिल्या व मिळवल्या. त्याने पाहिले, की जरी येशूच्या ठायी उच्च पातळी किंवा कोणतीही असामान्य माणुसकी नसली तरी त्याच्याबद्दल खरोखरच विलक्षण आणि असामान्य आभा होती. जरी पेत्र हे पूर्णपणे स्पष्ट करू शकला नाही, तरीही तो पाहू शकत होता, की येशू इतर सर्वांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागला, कारण त्याने केलेल्या गोष्टी सामान्य मनुष्यांपेक्षा खूप वेगळ्या होत्या. येशूच्या संपर्कात असल्यापासून, पेत्राने हेदेखील पाहिले, की त्याचे चरित्र सामान्य मनुष्यापेक्षा वेगळे आहे. तो नेहमी स्थिरपणे वागला व कधीही घाईने वागला नाही, कधीही अतिशयोक्ती केली नाही अथवा एखाद्या विषयाला कमी लेखले नाही आणि त्याने आपले जीवन अशा प्रकारे पार पाडले, की सामान्य आणि प्रशंसनीय असे एक पात्र प्रकट केले. संभाषणात, येशू स्पष्टपणे व कृपेने बोलला, नेहमी आनंदी परंतु निर्मळपणे संवाद साधला—आणि तरीही त्याचे कार्य पार पाडताना त्याने कधीही त्याची प्रतिष्ठा गमावली नाही. पेत्राने पाहिले, की येशू काहीवेळा मितभाषी होता, तर इतर वेळी तो सतत बोलत होता. काहीवेळा तो इतका आनंदी होता, की तो आनंदाने बागडणाऱ्या व खेळणाऱ्या कबुतरासारखा दिसला आणि इतर वेळी तो इतका दुःखी होता, की तो अजिबात बोलला नाही, जणू तो एक थकलेल्या व दमलेल्या आईसारखा दुःखाने भारलेला दिसत होता. काही वेळा तो शत्रूला मारण्यासाठी निघालेल्या शूर सैनिकासारखा रागाने भरला होता किंवा काही प्रसंगी तो गर्जणाऱ्या सिंहासारखाही होता. कधी कधी तो हसला; इतर वेळी तो प्रार्थना करत होता आणि रडत होता. येशू कसेही वागला तरी पेत्राच्या मनात त्याच्याबद्दल असीम प्रेम व आदर वाढत राहिला. येशूच्या हसण्याने तो आनंदाने भरून गेला, त्याच्या दु:खाने त्याला दु:खात बुडवले, त्याच्या रागाने त्याला घाबरवले, तर त्याची दया, क्षमा आणि त्याने लोकांकडून केलेल्या कठोर मागण्यांमुळे तो खरोखर येशूवर प्रेम करू लागला व त्याच्याबद्दल खरा आदर आणि तळमळ निर्माण झाली. अर्थात, पेत्र येशूसोबत अनेक वर्षे राहिल्यानंतर त्याला हळूहळू या सर्व गोष्टींची जाणीव झाली.

पेत्र हा विशेषतः समंजस मनुष्य होता, तो नैसर्गिक बुद्धीने जन्माला आला होता, तरीही त्याने येशूचे अनुसरण करताना अनेक मूर्खपणाच्या गोष्टी केल्या. अगदी सुरुवातीस, त्याच्या मनात येशूबद्दल काही धारणा होत्या. त्याने विचारले: “लोक म्हणतात, की तू संदेष्टा आहेस, तर मग जेव्हा तू आठ वर्षांचा होतास आणि जेव्हा तुला गोष्टी समजायला लागल्या, तेव्हा तुला माहीत होते का, की तू देव आहेस? तुझी गर्भधारणा पवित्र आत्म्याने झाली हे तुला माहीत होते का?” येशूने उत्तर दिले: “नाही, मला माहीत नव्हते. मी तुला सामान्य मनुष्यासारखाच वाटत नाही का? मी इतरांसारखाच आहे. पित्याने पाठवलेली व्यक्ती ही सामान्य व्यक्ती आहे, असामान्य नाही. आणि, जरी मी करत असलेले कार्य माझ्या स्वर्गीय पित्याचे, माझ्या प्रतिमेचे, मी जो व्यक्ती आहे त्याचे प्रतिनिधित्व करते, तरी हे देहधारी शरीर माझ्या स्वर्गीय पित्याचे पूर्णपणे प्रतिनिधित्व करू शकत नाही—हे त्याचा फक्त एक भाग आहे. जरी मी आत्म्यापासून आलो असलो, तरीही मी एक सामान्य व्यक्ती आहे व माझ्या पित्याने मला या पृथ्वीवर एक सामान्य व्यक्ती म्हणून पाठवले आहे, असामान्य म्हणून नाही.” जेव्हा पेत्राने हे ऐकले, तेव्हाच त्याला येशूबद्दल थोडीशी समज प्राप्त झाली. आणि येशूच्या अगणित तासांच्या कार्यातून, त्याच्या शिकवणीतून, त्याच्या सांभाळ करण्यातून व त्याच्या पालनपोषणातून गेल्यानंतरच त्याला खूप सखोल समज प्राप्त झाली. जेव्हा येशू वयाच्या ३० व्या वर्षामध्ये होता, तेव्हा त्याने पेत्राला संपूर्ण मानवजातीच्या सुटकेसाठी त्याच्या येऊ घातलेल्या वधस्तंभावर खिळले जाण्याबद्दल सांगितले आणि तो कार्याचा एक टप्पा पूर्ण करण्यासाठी आला असल्याचे सांगितले. येशूने पेत्राला असेही सांगितले, की वधस्तंभावर खिळल्यानंतर तीन दिवसांनी, मनुष्याचा पुत्र पुन्हा जागा होईल व एकदा जागा झाल्यानंतर तो ४० दिवसांसाठी लोकांसमोर येईल. ही वचने ऐकून पेत्र दुःखी झाला आणि त्याने ही वचने मनावर घेतली; तेव्हापासून, तो येशूच्या अधिक जवळ आला. काही काळ अनुभव घेतल्यानंतर, पेत्राला हे समजले की येशूने जे काही केले ते देवाचे अस्तित्व आहे व त्याला वाटले, की येशू असामान्यतः प्रेमळ आहे. जेव्हा त्याला ही समज आली, तेव्हाच पवित्र आत्म्याने त्याला अंतःकरणातून ज्ञानाने प्रकाशित केले. तेव्हाच येशू त्याच्या शिष्यांकडे आणि इतर अनुयायांकडे वळला व त्याने विचारले: “योहान, मी कोण आहे याबद्दल तुझे काय म्हणणे आहे?” योहानाने उत्तर दिले: “तू मोशे आहेस.” मग तो लूककडे वळला: “आणि लूक, मी कोण आहे याबद्दल तुझे काय म्हणणे आहे?” लूकने उत्तर दिले: “तू संदेष्ट्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस.” मग त्याने एका भगिनीला विचारले व तिने उत्तर दिले: “तू सर्वांत श्रेष्ठ संदेष्टा आहेस जो अनंतकाळापासून अनंतकाळपर्यंत अनेक वचने उच्चारतो. कोणाच्याही भविष्यवाण्या तुझ्यासारख्या महान नाहीत किंवा तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान कोणाचेही नाही; तू संदेष्टा आहेस.” मग येशूने पेत्राकडे वळून विचारले: “पेत्र, मी कोण आहे याबद्दल तुझे काय म्हणणे आहे?” पेत्राने उत्तर दिले: “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू स्वर्गातून आला आहेस. तू पृथ्वीवरचा नाहीस. तू देवाच्या निर्मिलेल्या प्राणिमात्रांसारखा नाहीस. आम्ही पृथ्वीवर आहोत आणि तू येथे आमच्याबरोबर आहेस, पण तू स्वर्गातून आला आहेस व या जगामधला नाहीस आणि तू पृथ्वीवरचा नाहीस.” त्याच्या अनुभवातूनच पवित्र आत्म्याने त्याला प्रबुद्ध केले, ज्यामुळे त्याला हे समजू शकले. या ज्ञानप्राप्तीनंतर, त्याने येशूने केलेल्या प्रत्येक गोष्टीची आणखी प्रशंसा केली, त्याला तो त्याहूनही अधिक प्रेमळ वाटला व येशूपासून विभक्त होण्यास त्यांचे अंतःकरण नेहमीच नाखूष होते. म्हणूनच, वधस्तंभावर खिळल्यानंतर आणि पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने पहिल्यांदा स्वतःला पेत्रासमोर प्रकट केले तेव्हा, तेव्हा पेत्र विलक्षण आनंदाने ओरडला: “प्रभू! तू जागा झाला आहेस!” मग, रडत, पेत्राने एक अतिशय मोठा मासा पकडला, तो शिजवला व येशूला दिला. येशू हसला, पण बोलला नाही. येशूचे पुनरुत्थान झाले आहे हे पेत्राला माहीत असले तरी, त्यामागील रहस्य त्याला समजले नाही. जेव्हा त्याने येशूला मासा खायला दिला, तेव्हा येशूने ते नाकारले नाही, परंतु तो बोलला नाही किंवा जेवायला बसला नाही. त्याऐवजी, तो अचानक गायब झाला. पेत्रासाठी हा एक मोठा धक्का होता आणि तेव्हाच त्याला समजले, की येशूचे पुनरुत्थान पूर्वीच्या येशूपेक्षा वेगळे आहे. पेत्राला हे समजल्यानंतर, तो दु:खी झाला, परंतु प्रभुने त्याचे कार्य पूर्ण केले हे जाणून त्याला दिलासा मिळाला. त्याला माहीत होते, की येशूने त्याचे कार्य पूर्ण केले आहे, त्याचा मनुष्यासोबत राहण्याचा कालावधी संपला आहे व तेव्हापासून मनुष्याला स्वतःच्या मार्गाने चालावे लागेल. येशूने त्याला एकदा सांगितले होते: “मी ज्या कडू दवण्यातून प्यायलो ते तूदेखील प्यावे (पुनरुत्थानानंतर त्याने हेच सांगितले). मी चाललेल्या मार्गावर तूदेखील चालले पाहिजे. माझ्यासाठी तुला तुझा जीव द्यावा लागेल.” आताच्या विपरीत, त्यावेळचे कार्य समोरासमोर संभाषणाच्या स्वरूपात नव्हते. कृपेच्या युगात, पवित्र आत्म्याचे कार्य विशेषतः लपलेले होते आणि पेत्राला खूप त्रास सहन करावा लागला. कधीकधी, पेत्र हे उद्गारण्याच्या टप्प्यावर पोहोचला: “देवा! माझ्याकडे या जीवनाशिवाय काहीही नाही. जरी ते तुझ्यासाठी फारसे मोलाचे नसले, तरी ते तुला अर्पण करण्याची माझी इच्छा आहे. जरी मनुष्य तुमच्यावर प्रेम करण्यास अयोग्य आहेत व त्यांचे प्रेम आणि अंतःकरणे निरुपयोगी आहेत, तरी मला विश्वास आहे, की तुला मनुष्यांच्या हृदयाची इच्छा माहीत आहे. आणि जरी मनुष्यांच्या शरीरांना तुझी स्वीकृती लाभत नसली, तरी तू माझ्या हृदयाचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे.” अशाप्रकारे प्रार्थना केल्याने त्याला प्रोत्साहन मिळाले, खासकरून जेव्हा त्याने प्रार्थना केली: “मी माझे हृदय पूर्णपणे देवाला समर्पित करण्यास तयार आहे. जरी मी देवासाठी काहीही करू शकत नसलो तरी, मी एकनिष्ठपणे देवाला संतुष्ट करण्यास व मनापासून स्वतःला समर्पित करण्यास तयार आहे. माझा विश्वास आहे, की देवाने माझ्या हृदयाकडे पाहिले पाहिजे.” तो म्हणाला: “मी माझ्या आयुष्यात काहीही मागितले नाही, पण देवावरचे माझे प्रेम आणि माझ्या मनाची इच्छा देवाने स्वीकारावी. मी इतके दिवस प्रभू येशूसोबत होतो, तरीही मी त्याच्यावर प्रेम केले नाही; ते माझे सर्वात मोठे ऋण आहे. जरी मी त्याच्यासोबत राहिलो, तरी मी त्याला ओळखले नाही व मी त्याच्या पाठीमागे काही अयोग्य गोष्टी बोललो. या गोष्टींचा विचार केल्याने मला प्रभू येशूचे आणखी ऋणी असल्यासारखे वाटते.” तो नेहमी अशा प्रकारे प्रार्थना करत असे. तो म्हणाला: “मी धुळीपेक्षा कमी आहे. हे एकनिष्ठ हृदय देवाला समर्पित करण्याशिवाय मी काहीही करू शकत नाही.”

पेत्राच्या अनुभवांची एक परिसीमा होती, जेव्हा त्याचे शरीर जवळजवळ पूर्णपणे तुटलेले होते, परंतु तरीही येशूने त्याला अंतःकरणातून प्रोत्साहन दिले. आणि एकदा, येशू पेत्रासमोर प्रकट झाला. पेत्राला जेव्हा खूप दुःख होत होते व त्याला वाटले की त्याचे हृदय तुटले आहे, तेव्हा येशूने त्याला अशी सूचना दिली: “तू पृथ्वीवर माझ्यासोबत होतास आणि मी येथे तुझ्यासोबत होतो. आणि जरी आधी आपण स्वर्गात एकत्र असलो, तरीही ते सर्व शेवटी आध्यात्मिक जगाचे आहे. आता मी आध्यात्मिक जगात परत आलो आहे व तू पृथ्वीवर आहेस, कारण मी पृथ्वीचा नाही आणि तू सुद्धा पृथ्वीचा नसलास तरी तुला पृथ्वीवरील तुझे कार्य पूर्ण करायचे आहे. तू सेवक असल्यामुळे तू तुझे कर्तव्य पार पाडले पाहिजेस.” तो देवाच्या जवळ परत जाऊ शकेल हे ऐकून पेत्राला दिलासा मिळाला. त्या वेळी, पेत्र जवळजवळ अंथरुणाला खिळला होता, एवढ्या वेदनेत होता; त्याला असे म्हणण्याइतका पश्चाताप झाला: “मी इतका भ्रष्ट झालो आहे, की मी देवाला संतुष्ट करू शकत नाही.” येशू त्याला दर्शन देऊन म्हणाला: “पेत्र, तू माझ्यासमोर एकदा केलेला संकल्प विसरला आहेस का? मी जे काही बोललो ते तू खरंच विसरलास का? तू माझ्यासाठी केलेला संकल्प विसरला आहेस का?” तो येशूच आहे हे पाहून पेत्र त्यांच्या पलंगावरून उठला व येशूने त्याचे सांत्वन केले: “मी पृथ्वीचा नाही, मी तुला आधीच सांगितले आहे—हे तुला समजले पाहिजे, पण मी तुला सांगितलेली दुसरी गोष्ट तू विसरला आहेस का? ‘तूदेखील पृथ्वीवरचा नाहीस, या जगाचा नाहीस.’ सध्या, तुला कार्य करायचे आहे. तू असा दुःखी होऊ शकत नाहीस. तू असा त्रासामध्ये राहू शकत नाहीस. जरी मनुष्य आणि देव एकाच जगात एकत्र राहू शकत नसले, तरी माझ्याकडे माझे कार्य आहे व तुझ्याकडे तुझे कार्य आहे आणि एक दिवस जेव्हा तुझे कार्य पूर्ण होईल, तेव्हा आपण एकाच क्षेत्रात एकत्र राहू व मी तुला कायमचे माझ्यासोबत राहण्यासाठी घेऊन जाईन.” ही वचने ऐकून पेत्राला दिलासा आणि धीर मिळाला. त्याला माहीत होते, की हे दुःख त्याला सहन करावे लागेल व अनुभवावे लागेल आणि तेव्हापासून त्याला प्रेरणा मिळाली. येशूने प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी त्याला खास दर्शन दिले, त्याला विशेष ज्ञान व मार्गदर्शन दिले आणि त्याने त्याच्यावर बरेच कार्य केले. आणि पेत्राला सर्वात जास्त कशाचा पश्चाताप झाला? “तू जिवंत देवाचा पुत्र आहेस” असे पेत्राने म्हटल्यानंतर, काही वेळातच येशूने पेत्राला आणखी एक प्रश्न विचारला (मात्र बायबलमध्ये असे लिहिलेले नाही). येशूने त्याला विचारले: “पेत्र! तू कधी माझ्यावर प्रेम केलेस का?” पेत्राला त्याचा काय अर्थ आहे हे समजले व म्हणाला: “प्रभू! मी एकदा स्वर्गातील पित्यावर प्रेम केले होते, परंतु मी कबूल करतो, की मी तुझ्यावर कधीही प्रेम केले नाही.” तेव्हा येशू म्हणाला: “जर लोक स्वर्गातील पित्यावर प्रेम करत नाहीत, तर ते पृथ्वीवरील पुत्रावर कसे प्रेम करू शकतात? आणि जर लोक परमपिता परमेश्वराने पाठवलेल्या पुत्रावर प्रेम करत नाहीत, तर ते स्वर्गातील पित्यावर कसे प्रेम करू शकतात? जर लोक पृथ्वीवरील पुत्रावर खरोखर प्रेम करतात, तर ते स्वर्गातील पित्यावर खरोखर प्रेम करतात.” जेव्हा पेत्राने ही वचने ऐकली तेव्हा त्याला कळले, की त्याच्यात काय कमतरता आहे. “मी स्वर्गातील पित्यावर प्रेम केले होते, परंतु मी तुझ्यावर कधीही प्रेम केले नाही” या त्याच्या वचनांबद्दल त्याला नेहमी अश्रू वाहण्याएवढा पश्चाताप वाटला. येशूच्या पुनरुत्थानानंतर व स्वर्गारोहणानंतर, त्याला या वचनांबद्दल अधिक पश्चात्ताप व दुःख वाटले. त्याचे भूतकाळातील कार्य आणि त्याची सध्याची पातळी लक्षात ठेवून, तो अनेकदा येशूसमोर प्रार्थनेत येत असे, देवाची इच्छा पूर्ण न केल्यामुळे व देवाच्या मानकांना पुरे न पडल्यामुळे, त्याला नेहमी पश्चात्ताप आणि ऋणी वाटत असे. हे मुद्दे त्याच्यासाठी सर्वात मोठे ओझे बनले. तो म्हणाला: “एक दिवस मी माझ्याकडे जे काही आहे व मी स्वतः जे काही आहे ते तुला समर्पित करेन आणि जे सर्वात मौल्यवान आहे ते मी तुला देईन.” तो म्हणाला: “देवा! माझी एकच श्रद्धा व एकच प्रेम आहे. माझ्या जीवनाला काही किंमत नाही आणि माझ्या शरीराला काही किंमत नाही. माझी एकच श्रद्धा व एकच प्रेम आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दल श्रद्धा आहे आणि माझ्या हृदयात तुझ्याबद्दल प्रेम आहे; तुला देण्यासारख्या माझ्याकडे फक्त या दोन गोष्टी आहेत, बाकी काही नाही.” येशूच्या वचनांनी पेत्राला खूप प्रोत्साहन मिळाले, कारण येशूला वधस्तंभावर खिळण्याआधी त्याने पेत्राला सांगितले होते: “मी या जगाचा नाही व तूदेखील या जगाचा नाहीस.” नंतर, जेव्हा पेत्र अत्यंत दुःखाच्या टप्प्यावर पोहोचला, तेव्हा येशूने त्याला आठवण करून दिली: “पेत्र, तू विसरलास का? मी या जगाचा नाही आणि फक्त माझ्या कार्यासाठीच मी आधी निघून गेलो होतो. तू पण जगाचा नाहीस, खरंच विसरलास का? मी तुला दोनदा सांगितले आहे, तुला आठवत नाही का?” हे ऐकून पेत्र म्हणाला: “मी विसरलो नाही!” तेव्हा येशू म्हणाला: “तू स्वर्गात एकदा माझ्यासोबत आनंदी काळ घालवला व माझ्या बाजूला वेळ घालवला. तुला माझी आठवण येते आणि मला तुझी आठवण येते. जरी माझ्या नजरेत नमूद करण्याजोगी सृष्टी नसली, तरी जो निष्पाप व प्रेमळ आहे त्याच्यावर मी प्रेम कसे करू शकत नाही? तू माझे वचन विसरलास का? पृथ्वीवरील माझे कार्य तू स्वीकारले पाहिजे; मी तुझ्यावर सोपवलेले कार्य तू पूर्ण केले पाहिजे. एके दिवशी मी तुला माझ्यासोबत नक्कीच घेऊन जाईन.” हे ऐकल्यानंतर, पेत्राला आणखी प्रोत्साहन मिळाले व त्याला आणखी मोठी प्रेरणा मिळाली, जसे की तो वधस्तंभावर होता तेव्हा तो म्हणू शकला: “देवा! मी तुझ्यावर पुरेसे प्रेम करू शकत नाही! जरी तू मला मरण्यास सांगितलेस, तरी मी तुझ्यावर पुरेसे प्रेम करू शकत नाही. तू माझ्या आत्म्याला कुठेही पाठवलेस, तू तुझी भूतकाळातील वचने पूर्ण करो वा न करो, तू नंतर काहीही केलेस, तरी मी तुझ्यावर प्रेम करेन आणि तुझ्यावर विश्वास ठेवेन.” त्याची श्रद्धा व खरे प्रेम हे त्याने धरून ठेवले होते.

एका संध्याकाळी, पेत्रासह अनेक शिष्य, येशूसोबत मासेमारीच्या होडीवर होते आणि पेत्राने येशूला एक अतिशय भोळा प्रश्न विचारला: “प्रभू! मी तुला एक प्रश्न विचारू इच्छितो, जो मला खूप दिवसांपासून पडला आहे.” येशूने उत्तर दिले: “मग कृपया विचार!” पेत्राने मग विचारले: “नियमशास्त्राच्या युगात केलेले कार्य तू केले होते का?” येशू हसला, जणू काही तो म्हणत होता: “हे मूल, किती भोळे आहे!” मग तो जाणूनबुजून पुढे म्हणाला: “ते माझे कार्य नव्हते. हे यहोवा व मोशेचे कार्य होते.” पेत्राने हे ऐकले आणि तो उद्गारला: “अरे! तर ते तुझे कार्य नव्हते.” एकदा पेत्राने हे म्हटल्यावर येशू पुढे बोलला नाही. पेत्राने स्वतःच विचार केला: “हे तू केले नाहीस, म्हणून तू नियमशास्त्राचा नाश करण्यास आला आहेस, कारण ते तुझे कार्य नव्हते.” त्याचे हृदयही हलके झाले. नंतर, येशूला समजले, की पेत्र खूप भोळा होता, परंतु त्याला त्या वेळी काहीच समज नसल्यामुळे, येशूने दुसरे काहीही सांगितले नाही किंवा त्याचे थेट खंडन केले नाही. एकदा येशूने एका सभास्थानात प्रवचन दिले जेथे पेत्रासह बरेच लोक उपस्थित होते. येशूने त्याच्या प्रवचनात, म्हटले: “जो अनंतकाळापासून अनंतकाळापर्यंत येईल, तो सर्व मानवजातीची पापापासून सुटका करण्यासाठी कृपेच्या युगात सुटकेचे कार्य करेल, परंतु मनुष्याला पापातून बाहेर काढण्यासाठी त्याला कोणत्याही नियमांचे बंधन नसेल. तो नियमशास्त्रातून बाहेर पडेल व कृपेच्या युगात प्रवेश करेल. तो सर्व मानवजातीची सुटका करेल. तो नियमशास्त्राच्या युगापासून कृपेच्या युगात पुढे जाईल, परंतु त्याला कोणीही ओळखणार नाही, जो यहोवाकडून आला आहे. मोशेने जे कार्य केले ते यहोवाने मान्य केले होते; यहोवाने केलेल्या कार्यामुळे मोशेने नियमशास्त्राचा मसुदा तयार केला.” एकदा असे म्हटल्यावर, तो पुढे म्हणाला: “जे कृपेच्या युगात कृपेच्या युगाच्या आज्ञा रद्द करतात, त्यांना आपत्तीचा सामना करावा लागेल. त्यांनी मंदिरात उभे राहून देवाने केलेला नाश स्वीकारला पाहिजे आणि त्यांच्यावर अग्नी कोसळेल.” ही वचने ऐकून पेत्रावर काही प्रमाणात परिणाम झाला व त्याच्या अनुभवाच्या संपूर्ण कालावधीत, येशूने पेत्राचे पालनपोषण केले आणि त्याला सांभाळले, त्याच्याशी मनापासून बोलला, ज्यामुळे पेत्राला येशूबद्दल थोडीशी अधिक चांगली समज प्राप्त झाली. त्या दिवशी मासेमारीच्या होडीवर असताना येशूने काय उपदेश केला होता व त्याने येशूला विचारलेला प्रश्न, येशूने दिलेला प्रतिसाद, तसेच तो कसा हसला होता याचा पेत्राने विचार केला, शेवटी पेत्राला या सर्व बाबी उलगडल्या. त्यानंतर, पवित्र आत्म्याने पेत्राला प्रबुद्ध केले आणि तेव्हाच त्याला समजले, की येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. पेत्राची समज पवित्र आत्म्याच्या ज्ञानप्राप्तीतून आली, परंतु त्याची समजून घेण्याची एक प्रक्रिया होती. प्रश्न विचारून, येशूचा उपदेश ऐकून, नंतर येशूची विशेष सहभागिता लाभल्याने व त्याची सांभाळ करण्याची विशेष पद्धत याद्वारे पेत्राला येशू हा जिवंत देवाचा पुत्र असल्याची जाणीव झाली. ते एका रात्रीत साध्य झाले नाही; ही एक प्रक्रिया होती आणि नंतरच्या अनुभवांमध्ये ही त्याच्यासाठी मदत ठरली. येशूने इतर लोकांमध्ये परिपूर्णतेचे कार्य का केले नाही, फक्त पेत्रामध्ये का केले? कारण येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे हे फक्त पेत्राला समजले होते; इतर कोणालाही हे माहीत नव्हते. जरी असे अनेक शिष्य होते ज्यांना त्यांच्या अनुसरणाच्या काळात बरेच काही माहीत होते, तरी पण त्यांचे ज्ञान वरवरचे होते. म्हणूनच येशूने पेत्राला परिपूर्ण बनवण्यासाठीचा नमुना म्हणून निवडले होते. तेव्हा येशूने पेत्राला जे सांगितले तेच तो आजच्या लोकांना सांगतो, ज्यांचे ज्ञान व जीवनाचा प्रवेश पेत्राच्या मर्यादेपर्यंत पोहोचला पाहिजे. या आवश्यकतेला आणि या मार्गाला अनुसरूनच देव प्रत्येकाला परिपूर्ण करेल. आज लोकांमध्ये खरा विश्वास व खरे प्रेम असणे का आवश्यक आहे? पेत्राने जे अनुभवले ते तुम्हीही अनुभवले पाहिजे; पेत्राला त्याच्या अनुभवातून मिळालेली फळे तुमच्यातही प्रकट झाली पाहिजेत; आणि पेत्राने अनुभवलेल्या वेदना तुम्हीदेखील अनुभवल्या पाहिजेत. तुम्ही ज्या मार्गावर चालता त्याच मार्गावर पेत्र चालला होता. तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात पेत्राने सुद्धा त्या वेदना सहन केल्या. जेव्हा तुम्हाला गौरव प्राप्त होतो व जेव्हा तुम्ही वास्तविक जीवन जगता, तेव्हा तुम्ही पेत्राच्या प्रतिमेप्रमाणे जगता. मार्ग एकच आहे आणि त्याचे अनुसरण केल्याने मनुष्य परिपूर्ण होतो. तथापि, पेत्राच्या तुलनेत तुमची क्षमता काहीशी कमी आहे, कारण काळ बदलला आहे व त्यामुळे मनुष्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रमाणही वाढले आहे, कारण यहूदीया हे प्राचीन संस्कृती असलेले दीर्घकाळ टिकलेले राज्य होते. म्हणूनच, तुमची क्षमता सुधारण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल, ते करणे आवश्यक आहे.

पेत्र एक अतिशय समजूतदार व्यक्ती होता, त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीत हुशार होता आणि तो अत्यंत प्रामाणिकदेखील होता. त्याला अनेक धक्के बसले. समाजाशी त्याचा पहिला संपर्क वयाच्या १४ व्या वर्षी आला, जेव्हा तो शाळेत गेला व सभास्थानीही गेला. त्याच्यामध्ये खूप उत्साह होता आणि सभांना उपस्थित राहण्याची त्याची इच्छा होती. त्या वेळी, येशूने अद्याप अधिकृतपणे त्याचे कार्य सुरू केले नव्हते; ही केवळ कृपेच्या युगाची सुरुवात होती. पेत्र १४ वर्षांचा असताना धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात येऊ लागला; १८ वर्षांचा होईपर्यंत तो धार्मिक उच्चभ्रूंच्या संपर्कात आला, परंतु धर्माच्या पडद्यामागील अराजकता पाहिल्यानंतर त्याने तिथून माघार घेतली. हे लोक किती कावेबाज, धूर्त व षडयंत्र करणारे आहेत, हे पाहून त्याला अत्यंत घृणा वाटली (त्यावेळी पवित्र आत्म्याने त्याला परिपूर्ण बनवण्याचे कार्य केले. त्याने विशेषतः त्याला प्रवृत्त केले व त्याच्यावर काही विशेष कार्य केले) आणि म्हणूनच वयाच्या १८ व्या वर्षी त्याने सभास्थानातून माघार घेतली. त्याच्या पालकांनी त्याचा छळ केला व त्याला विश्वास ठेवू दिला नाही (ते दुष्ट आणि नास्तिक होते). शेवटी, पेत्राने घर सोडले आणि सर्वत्र प्रवास केला, दोन वर्षे मासेमारी व प्रचार केला, त्या काळात त्याने काही लोकांचे नेतृत्वदेखील केले. आता तू पेत्राने घेतलेला अचूक मार्ग स्पष्टपणे पाहण्यास सक्षम असले पाहिजेस. जर तू पेत्राचा मार्ग स्पष्टपणे पाहू शकत असशील, तर तू आज करत असलेल्या कार्याबद्दल तुला खात्री असेल, त्यामुळे तू तक्रार करणार नाहीस किंवा निष्क्रीय होणार नाहीस अथवा कशाचीही इच्छा बाळगणार नाहीस. तू त्या वेळी पेत्राची मनःस्थिती अनुभवली पाहिजेस: तो दुःखाने त्रस्त होता; त्याने यापुढे भविष्य किंवा आशीर्वाद मागितले नाहीत. त्याने जगात नफा, आनंद, कीर्ती किंवा भाग्य शोधले नाही; त्याने फक्त सर्वात अर्थपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, जे देवाच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी आणि त्याने जे सर्वात मौल्यवान आहे ते देवाला समर्पित करण्यासाठी होते. मग तो मनाने तृप्त व्हायचा. त्याने अनेकदा येशूला या वचनांनी प्रार्थना केली: “हे प्रभू येशू ख्रिस्त, मी एकेकाळी तुझ्यावर प्रेम केले, पण मी तुझ्यावर खरे प्रेम केले नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे असे मी म्हटले असले, तरी मी तुझ्यावर कधीही खऱ्या मनाने प्रेम केले नाही. मी फक्त तुझ्याकडे पाहिले, तुझी पूजा केली व तुझी आठवण काढली, परंतु मी तुझ्यावर कधीही प्रेम केले नाही किंवा तुझ्यावर खरी श्रद्धा ठेवली नाही.” त्याने त्याचा संकल्प करण्यासाठी सतत प्रार्थना केली आणि येशूच्या वचनांनी त्याला नेहमीच प्रोत्साहन मिळाले व त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. नंतर, काही काळ अनुभव घेतल्यानंतर, येशूने त्याची परीक्षा घेतली आणि त्याला त्याच्यासाठी आणखी तळमळ करण्यास प्रवृत्त केले. तो म्हणाला: “प्रभू येशू ख्रिस्त! मला तुझी किती आठवण येते व तुझ्याकडे पाहण्याची किती इच्छा होते. माझ्याकडे खूप कमतरता आहेत व तुझ्या प्रेमाची पूर्तता मी करू शकत नाही. मी तुला विनवणी करतो, की मला लवकर घेऊन जा. तुला माझी कधी गरज भासेल? तू मला कधी घेऊन जाणार? मी पुन्हा तुझ्या चेहऱ्याकडे कधी पाहीन? मला यापुढे या देहात जगण्याची, भ्रष्ट होत राहण्याची इच्छा नाही आणि यापुढे बंड करण्याची माझी इच्छा नाही. माझ्याकडे जे काही आहे ते शक्य तितक्या लवकर मी तुला अर्पण करण्यास तयार आहे आणि मी तुला आणखी दुःखी करू इच्छित नाही.” अशाप्रकारे त्याने प्रार्थना केली, परंतु येशू त्याच्यामध्ये काय परिपूर्ण करेल हे त्याला त्यावेळी माहीत नव्हते. त्याच्या परीक्षेच्या यातनांच्या वेळी, येशूने त्याला पुन्हा दर्शन दिले व म्हणाला: “पेत्र, मला तुला अशा प्रकारे परिपूर्ण बनवायचे आहे, की तू फलिताचा अंश होशील, जे मी तुला परिपूर्ण करण्याचे स्पष्ट रूप असेल आणि ज्याचा मी आनंद घेईन. तू माझ्यासाठी खरोखर साक्ष देऊ शकतोस का? मी तुला जे करण्यास सांगतो ते तू केले आहेस का? मी उच्चारलेली वचने तू जगलास का? तू एकदा माझ्यावर प्रेम केलेस, परंतु तू माझ्यावर प्रेम केलेस तरी तू माझ्या अपेक्षा पूर्ण केल्यास का? तू माझ्यासाठी काय केलेस? तू माझ्या प्रेमासाठी अयोग्य आहेस हे तू ओळखलेस, पण तू माझ्यासाठी काय केलेस?” पेत्राने पाहिले, की त्याने येशूसाठी काहीही केलेले नाही व देवासाठी त्याचे प्राण देण्याची त्याची पूर्वीची शपथ त्याला आठवली. आणि म्हणूनच, त्याने यापुढे तक्रार केली नाही व तेव्हापासून त्याच्या प्रार्थना अधिक चांगल्या झाझ्या. त्याने प्रार्थना केली: “प्रभू येशू ख्रिस्त! मी एकदा तुला सोडले आणि तू सुद्धा मला एकदा सोडलेस. आपण परस्परांपासून दूर वेळ घालवला आहे व एकमेकांच्या सहवासातही राहिलो आहोत. तरीही तू माझ्यावर इतर सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतोस. मी वारंवार तुझ्याविरुद्ध बंड केले आहे आणि तुला वारंवार दुःख दिले आहे. अशा गोष्टी मी कशा विसरू शकतो? मी नेहमी लक्षात ठेवतो व तू माझ्यावर केलेले कार्य आणि तू माझ्यावर जे कार्य सोपवले आहेस ते मी कधीही विसरत नाही. तू माझ्यावर केलेल्या कार्यासाठी मी माझ्याकडून जे काही करता येईल ते केले आहे. मी काय करू शकतो हे तुला माहीत आहे व मी कोणती भूमिका निभावू शकतो हेही तुला माहीत आहे. मी तुझ्या नियोजित योजनांच्या अधीन जाऊ इच्छितो आणि माझ्याकडे जे काही आहे ते मी तुला समर्पित करेन. मी तुझ्यासाठी काय करू शकतो हे फक्त तुलाच माहीत आहे. जरी सैतानाने मला खूप मूर्ख बनवले व मी तुझ्याविरुद्ध बंड केले, तरी माझा विश्वास आहे, की तू मला त्या अपराधांबद्दल लक्षात ठेवत नाहीस आणि तू माझ्याशी त्यांच्या आधारावर वागत नाहीस. मी माझे संपूर्ण आयुष्य तुला समर्पित करू इच्छितो. मी काहीही मागत नाही व मला इतर कसली आशा किंवा योजनाही नाही; मला फक्त तुझ्या इच्छेनुसार कृती करण्याची आणि तुझ्या इच्छेनुसार वागण्याची इच्छा आहे. मी तुझ्या कडू दवण्यातून पिईन व आज्ञा देण्यासाठी मी तुझाच आहे.”

तुम्ही ज्या मार्गाने चालत आहात त्याबद्दल तुम्ही स्पष्ट असले पाहिजे; भविष्यात तुम्ही कोणता मार्ग धराल, देव काय परिपूर्ण करेल आणि तुमच्यावर कोणते कार्य सोपवले आहे, याबद्दल तुम्ही स्पष्ट असले पाहिजे. एक दिवस, कदाचित, तुमची परीक्षा होईल व जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा जर तुम्ही पेत्राच्या अनुभवातून प्रेरणा घेऊ शकलात, तर ते दर्शवेल की तुम्ही खरोखरच पेत्राच्या मार्गावर चालत आहात. पेत्राची खरी श्रद्धा आणि प्रेम व देवाप्रति असलेल्या त्याच्या निष्ठेबद्दल देवाने त्याची प्रशंसा केली. आणि त्याचा प्रामाणिकपणा व त्याच्या हृदयातील देवाबद्दलची तळमळ यामुळेच देवाने त्याला परिपूर्ण बनवले. जर तुझ्यात खरोखरच पेत्रासारखे प्रेम आणि श्रद्धा असेल तर येशू नक्कीच तुला परिपूर्ण बनवेल.

मागील:  जे देवाला ओळखतात तेच देवाची साक्ष देऊ शकतात

पुढील:  जे देवावर प्रेम करतात, ते सदैव त्याच्या प्रकाशात राहतील

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger