अनेकांना बोलावले जाते, पण काहींनाच निवडले जाते
माझे अनुयायी होण्यासाठी मी अनेकांचा शोध घेतला. या सर्व अनुयायांमध्ये धर्मोपदेशक आहेत, जे नेतृत्व करणारे, देवाची मुले आहेत, देवाचे लोक आहेत, आणि असे आहेत जे सेवा करतात. माझ्यावरच्या त्यांच्या निष्ठेनुसार मी त्यांची वर्गवारी करतो. सर्वांची वेगवेगळी वर्गवारी झाली, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव स्पष्ट झाला, की मी प्रत्येक व्यक्तीला तिच्या योग्य असलेल्या विभागात क्रमांकानुसार समर्पक जागी नेमेन. मनुष्यजातीचा उद्धार करण्याच्या माझ्या ध्येयासाठी हे असेल. ज्यांना वाचवून माझ्या घरात आणण्याची माझी इच्छा आहे अशा व्यक्तींना मी गटागटाने बोलवतो आणि शेवटच्या दिवसांतील माझे काम ते सर्वजण स्वीकारतील अशी व्यवस्था करतो. त्याच वेळेस मी त्यांच्या प्रकारानुसार त्यांची वर्गवारी करतो, आणि नंतर त्यांच्या कृत्यांनुसार त्यांना बक्षीस अथवा शिक्षा देतो. माझ्या कामातील पायऱ्या अशा आहेत.
आज, मी पृथ्वीवर राहतो आणि मी माणसामधे वास करतो. लोक माझे काम अनुभवतात, माझे बोलणे पाहतात, अशा वेळी मी माझ्या प्रत्येक अनुयायाला सर्व सत्ये बहाल करतो, जेणेकरून त्यांना माझ्याकडून जीवन मिळेल आणि चालण्याचा योग्य मार्ग मिळेल. कारण मी देव आहे, जीवन देणारा आहे. माझ्या अनेक वर्षांच्या कामादरम्यान लोकांनी पुष्कळ मिळवले आहे, पुष्कळ सोडून दिले आहे, तरीही मी म्हणतो की ते खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. कारण लोक केवळ तोंडाने मी देव आहे असे मान्य करतात, पण मी जी सत्ये सांगतो त्याच्याशी असहमत असतात, आणि शिवाय मी त्यांना आचरायला सांगतो ती सत्ये आचरत नाहीत. म्हणजे लोक केवळ देवाचे अस्तित्व मानतात, पण सत्याचे नाही; लोक केवळ देवाचे अस्तित्व मानतात, पण जीवनाचे नाही; लोक केवळ देवाचे नाव मानतात, पण त्याचे मूलतत्व नाही. मी त्यांच्या उत्साहाचा तिरस्कार करतो कारण मला फसवण्यासाठी केवळ ऐकायला चांगले असे शब्द ते वापरतात; त्यांच्यापैकी कोणीही माझी खरी उपासना करत नाही. तुमच्या शब्दांत सर्पाचा मोह आहे; शिवाय ते शब्द अत्यंत अहंकारी आहेत—आद्य-देवदूताने जाहीर केलेले एक सत्य. सर्वात म्हणजे तुमची कृत्ये अत्यंत क्षुद्र, दरिद्री, आणि असभ्य आहेत; तुमच्या अविवेकी इच्छा आणि लोभी हेतूंचा कानाला त्रास होतो. तुम्ही सगळे माझ्या घराला लागलेली कसर झालेले आहात, तिरस्कारपूर्वक काढून टाकले पाहिजे अशा वस्तू आहात. कारण तुमच्यापैकी कोणाचेही सत्यावर प्रेम नाही; त्याऐवजी तुम्हाला आशीर्वाद हवे आहेत, तुम्हाला स्वर्गात जायचे आहे, ख्रिस्त त्याचे सामर्थ्य पृथ्वीवर उपयोगात आणतानाची त्याची उदात्त दृष्टी तुम्हाला निरखायची आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्यासारख्या अत्यंत खोलवर भ्रष्ट झालेल्या लोकांना, ज्यांना देव म्हणजे काय याची काहीही कल्पना नाही ते देवाला अनुसरण्याच्या लायक कसे असतील? तुम्ही स्वर्गात कसे जाऊ शकाल? ज्या देखाव्यांचे अभूतपूर्व वैभव आहे असे भव्य देखावे पाहण्यास तुम्ही लायक कसे ठराल? तुमची तोंडे फसवणूक आणि ओंगळ शब्दांनी भरलेली आहेत, विश्वासघात आणि उर्मट शब्दांनी भरली आहेत. तुम्ही माझ्याशी कधीही प्रामाणिकपणे बोलला नाहीत, कधी पवित्र शब्द नाहीत, माझ्या शब्दाचा अनुभव आल्यानंतर शरणागतीचे शब्द नाहीत. शेवटी तुमचा विश्वास आहे तरी कसा? तुमच्या हृदयात कामना आणि पैसा याशिवाय काही नाही, आणि मनात ऐहिक गोष्टींव्यतिरिक्त काही नाही. माझ्याकडून काहीतरी कसे मिळेल हेच गणित तुम्ही रोज करता. दर दिवशी किती संपत्ती आणि किती ऐहिक गोष्टी माझ्याकडून तुम्ही मिळवल्या आहेत हेच मोजता. ज्या गोष्टी उपभोगता येतील त्या अधिक चांगल्या प्रतीच्या आणि अधिक संख्येने मिळू देत यासाठी प्रत्येक दिवशी तुम्ही आणखी आशीर्वादांची वाट पहात असता. दर क्षणी तुमच्या मनात मी नसतो, माझ्याकडून येणारे सत्यही नसते, तर तुमचा पती किंवा पत्नी, तुमचे मुलगे, मुली, आणि तुम्ही जे खाता, परिधान करता ते असते. आपल्याला आणखी कसे मिळेल, अधिक कसे उपभोगता येईल याचा तुम्ही विचार करता. पण तुमचे पोट फुटेपर्यंत जरी भरलेले असले तरी तुम्ही एक प्रेतच आहात. नाही का? तुम्ही सुंदर पेहेरावाने स्वतःला बाह्यतः आकर्षक बनवले असले तरी जीवन नसलेले एक चालते प्रेतच नाही आहात का? तुमचे केस पांढरे होईपर्यंत तुम्ही पोटासाठी काम करता, मात्र तुमच्यापैकी कोणीही माझ्या कामासाठी एका केसाचाही त्याग करत नाही. तुमच्या शरीरातील मांसासाठी, तुमच्या मुलामुलींसाठी तुम्हाला सतत कुठेतरी जायचे असते, तुम्ही शरीर कष्टवत असता, मेंदू शिणवत असता—मात्र तुमच्यातील एकही जण माझ्या इच्छेची पर्वा किंवा काळजी करत नाही. माझ्याकडून काय मिळवण्याची तुम्ही अजूनही आशा करता?
मी काम करत असताना कधीच घाई करत नाही. माझ्यामागे लोक कशाही प्रकारे येत असले तरी मी माझे काम प्रत्येक पायरीनुसार, माझ्या नियोजनानुसार करतो. त्यामुळे तुम्ही माझ्या पूर्णपणे विरुद्ध वागलात तरीही मी निरंतर काम करतो, आणि मला जे सांगायचे आहे ते सांगत राहतो. मी पूर्वीच योजले होते अशांना माझ्या घरी बोलावतो जेणेकरून ते माझे शब्द ऐकतील. माझ्या शब्दांना जे शरण जातात, जे माझ्या शब्दांसाठी तळमळतात, त्यांना मी माझ्या सिंहासनापुढे आणतो; जे माझ्या शब्दांकडे पाठ फिरवतात, जे माझी आज्ञा पाळत नाहीत आणि उघडपणे मला जुमानत नाहीत, त्यांना अंतिम शिक्षेची वाट बघण्यासाठी एका बाजूला करतो. लोक भ्रष्ट व्यवहारात आणि वाईट प्रवृत्तीच्या हाताखाली जगतात आणि म्हणून माझ्यामागे येणाऱ्यांपैकी अनेक जण सत्यासाठी झुरत नसतात. म्हणजेच बहुतेक जण माझी खऱ्या अर्थाने उपासना करत नाहीत, तर फसवणुकीच्या मार्गाने भ्रष्टाचार आणि बंडाने माझा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी मी म्हणतो: बोलावलेले फार आहेत परंतू निवडलेले थोडके आहेत. ज्यांना बोलावले जाते ते कमालीचे भ्रष्ट झालेले असतात आणि सर्वजण एकाच युगात राहतात—पण ज्यांना निवडलेले असते ते त्यांचा एक भाग असतात, त्यांचा सत्यावर विश्वास असतो आणि त्याला ते मानतात, सत्य आचरतात. हे लोक समग्रातील अत्यंत छोटा हिस्सा असतात. त्यांच्यामधून मला अधिक गौरव मिळेल. या शब्दांवरून तुम्हाला कळलं का, की तुम्ही निवडले गेलेल्यांपैकी आहात की नाही ते? तुमचा शेवट कसा असणार आहे ते?
मी म्हटल्याप्रमाणे माझ्यामागे येणारे अनेक आहेत पण माझ्यावर खरोखर प्रेम असणारे अल्प आहेत. कदाचित काहीजण म्हणतील, “मी तुझ्यावर प्रेम केले नसते तर एवढी मोठी किंमत मी मोजली असती का? मी तुझ्यावर प्रेम केले नसते तर इथपर्यंत तुझ्यामागे आलो असतो का?” निश्चितच तुझ्याकडे अनेक कारणे आहेत, आणि अर्थातच तुझे प्रेम फार महान आहे, पण माझ्याबद्दलच्या तुझ्या प्रेमाचे मूलतत्व काय आहे? ज्याला “प्रीती” म्हणतात, ती भावना शुद्ध, आणि कलंकरहित असते, जिथे तुम्ही हृदयाचा उपयोग प्रीती करणे, अनुभूति घेणे, आणि विवेकी राहण्यासाठी करता. प्रीतीत अटी नसतात, अडथळे नसतात आणि अंतर नसते. प्रीतीत संशय नसतो, फसवणूक नसते, आणि कपट नसते. प्रीतीत व्यापारी वृत्ती नसते आणि काहीही अशुद्ध नसते. जर तू प्रीती करत असशील तर तू फसवणूक, तक्रार, विश्वासघात, बंड करणार नाहीस, काहीतरी लाभाची वा वसुलीची किंवा अमुक रक्कम मिळवण्याची इच्छा बाळगणार नाहीस. जर तुझी प्रीती असेल तर तू आनंदाने स्वतःला समर्पित करशील, आनंदाने कष्ट सहन करशील, मला अनुरूप होशील. तुझ्याकडे जे आहे ते तू माझ्यासाठी सोडून देशील, तुझे कुटुंब, तुझे भविष्य, तुझे तारुण्य आणि तुझे लग्न यांचा त्याग करशील. हे केले नाही तर तुझी प्रीती म्हणजे प्रीती नसेलच, तर ती असेल फसवणूक आणि विश्वासघात! कोणत्या प्रकारची प्रीती आहे तुझी? ते खरे प्रेम आहे? की खोटे? तू किती त्याग केला आहेस? तू किती देऊ केले आहेस? मला तुझ्याकडून किती प्रीती मिळाली आहे? तुला माहीत आहे? तुमची हृदये वाईटपणा, विश्वासघात, आणि फसवणुकीने भरली आहेत, आणि तसे असल्यामुळे तुमची प्रीती किती अशुद्ध आहे ते? तुम्ही विचार करता की तुम्ही आधीच माझ्याकरिता पुरेसा त्याग केला आहे; तुम्हाला वाटते की तुम्ही मला अगोदरच पुरेशी प्रीती दिली आहे. पण मग तुमचे शब्द आणि कृती नेहमीच विरुद्ध आणि फसवी का असते? तुम्ही माझ्यामागे येता, तरी माझ्या शब्दाला मानत नाही. याला प्रीती म्हणतात का? तुम्ही माझ्यामागे येता तरी नंतर मला बाजूला ठेवता. यालाच प्रीती म्हणतात का? तुम्ही माझ्यामागे येता, तरी माझ्यावर तुम्ही अविश्वास दाखवता. याला प्रीती म्हणतात का? तुम्ही माझ्यामागे येता, तरी तुम्ही माझे अस्तित्व स्वीकारू शकत नाही. याला प्रीती म्हणतात का? तुम्ही माझ्यामागे येता, तरी मी जो आहे त्याच्याशी सुसंगत असे मला वागवत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वळणावर माझ्यासाठी गोष्टी कठीण करून ठेवता. याला प्रीती म्हणतात का? तुम्ही माझ्यामागे येता, तरी तुम्ही मला प्रत्येक बाबतीत चकवण्याचा आणि फसवण्याचा प्रयत्न करता. याला प्रेम म्हणतात का? तुम्ही माझी सेवा करता तरी मला भीत नाही. याला प्रीती म्हणतात का? तुम्ही सर्व प्रकारे आणि सर्व बाबतीत माझा विरोध करता. याला प्रीती म्हणतात का? तुम्ही पुष्कळ समर्पित केले आहे हे खरे आहे, तरी मला तुम्ही जसे वागायला हवे आहे तसे कधीच वागला नाहीत. याला प्रीती म्हणता येईल का? नीट पाहिले तर तुमच्या अंतःकरणात माझ्याबद्दलच्या प्रीतीची छोटीशीही खूण नाही. इतक्या वर्षांच्या कामानंतर आणि मी अनेक शब्दांनी सांगून झाल्यावरही तुम्ही खरोखर काय मिळवले आहे? मागे वळून याकडे काळजीपूर्वक बघणे आवश्यक नाही? मी तुम्हाला निक्षून सांगतो: मी ज्यांना माझ्याकडे बोलवतो ते कधीच भ्रष्ट झालेले नसतात असे नाही; तर मी ज्यांना निवडतो ते माझ्यावर खरी प्रीती करणारे असतात. म्हणून तुम्ही तुमच्या शब्द आणि कृतींबद्दल जागरूक असले पाहिजे आणि तुमचे हेतू आणि विचारांचे परीक्षण केले पाहिजे जेणेकरून ते ठराविक रेषा ओलंडणार नाहीत. शेवटच्या दिवसांत मला तुमची प्रीती देऊ करण्याचा कसोशीने प्रयत्न करा, नाहीतर माझा तुमच्यावरील संताप कधीच जाणार नाही!