केवळ वेदनादायक कसोट्यांचा अनुभव घेऊनच तू देवाचे प्रेम जाणून घेऊ शकतोस
आज तू देवावर किती प्रेम करता? आणि देवाने तुझ्यामध्ये जे काही केले आहे त्याबद्दल तुला किती माहिती आहे? या गोष्टी तू जाणून घेतल्या पाहिजेस. जेव्हा देव पृथ्वीवर येतो, तेव्हा त्याने मनुष्यामध्ये जे काही केले आहे आणि मनुष्याला जे काही पाहण्याची परवानगी दिली आहे, ते मनुष्याने त्याच्यावर प्रेम करावे व त्याला खऱ्या अर्थाने ओळखावे यासाठीच आहे. मनुष्य देवासाठी दुःख सहन करण्यास सक्षम आहे आणि तो इथपर्यंत पोहोचू शकला आहे, हे एका बाबतीत देवाच्या प्रेमामुळे व दुसऱ्या बाबतीत देवाच्या तारणामुळे आहे; एवढेच नव्हे, तर देवाने मनुष्यामध्ये केलेला न्याय आणि ताडणाचे कार्य यामुळेच आहे. जर तुम्ही देवाचा न्याय, ताडण व कसोट्या यांपासून वंचित असाल व जर देवाने तुम्हाला त्रास सहन करायला लावले नसेल, तर तुम्ही संपूर्ण प्रामाणिकपणे देवावर खऱ्या अर्थाने प्रेम करत नाही. देव मनुष्यामध्ये जेवढे मोठे कार्य करतो आणि मनुष्याला जेवढा अधिक त्रास होतो, तेवढे देवाचे कार्य किती अर्थपूर्ण आहे हे अधिक स्पष्ट होते व मनुष्याचे हृदय देवावर खरे प्रेम करण्यास सक्षम होते. देवावर प्रेम कसे करावे, हे तुम्ही कसे शिकता? यातना आणि परिष्करणाशिवाय, वेदनादायक कसोट्यांशिवाय—व त्यापुढे जाऊन, जर देवाने मनुष्याला केवळ कृपा, प्रेम आणि दयाच दिली—तर तू खरोखर देवावर प्रेम करण्याच्या टप्प्यावर पोहोचू शकशील का? एकीकडे, देवाच्या कसोट्यांदरम्यान मनुष्याला त्याच्या कमतरता कळतात व तो क्षुद्र, तुच्छ आणि नीच आहे, त्याच्याकडे काहीही नाही व तो काहीही नाही हे त्याला कळते; दुसरीकडे, त्याच्या कसोट्यांच्या वेळी देव मनुष्यासाठी वेगवेगळे वातावरण निर्माण करतो ज्यामुळे मनुष्याला देवाच्या प्रेमाचा अधिक अनुभव घेता येतो. वेदना जरी प्रचंड असली आणि कधी कधी अलंघ्य असली तरी—अगदी चिरडून टाकणाऱ्या दुःखाची पातळी गाठली तरीही—ती अनुभवल्यानंतर, मनुष्याला दिसते की देव त्याच्यामध्ये किती सुंदर कार्य करत आहे व या पायाच्या बळावरच मनुष्यामध्ये देवाविषयी खरे प्रेम जन्माला येते. आज मनुष्याला दिसते, की केवळ देवाची कृपा, प्रेम आणि दया यांद्वारे तो स्वतःला खऱ्या अर्थाने जाणून घेण्यास असमर्थ आहे व मनुष्याचे तत्त्व जाणून घेण्यास तर तो अगदीच असमर्थ आहे. केवळ देवाचे परिष्करण आणि न्याय या दोन्हीद्वारे व परिष्करणाच्या प्रक्रियेदरम्यान, मनुष्य त्याच्या कमतरता जाणून घेऊ शकतो आणि त्याच्याकडे काहीही नाही हे समजून घेऊ शकतो. अशाप्रकारे, मनुष्याचे देवावरील प्रेम हे देवाचे परिष्करण व न्याय यांच्या पायावर बांधलेले आहे. जर तू केवळ देवाच्या कृपेचा, शांत कौटुंबिक जीवनाचा किंवा भौतिक आशीर्वादाचा आनंद घेत असशील, तर तुला देव प्राप्त झालेला नाही आणि तुझा देवावरील विश्वास यशस्वी मानला जाऊ शकत नाही. देवाने देहातील कृपेच्या कार्याचा एक टप्पा आधीच पार पाडला आहे व आधीच मनुष्याला भौतिक आशीर्वाद दिले आहेत, परंतु केवळ कृपा, प्रेम आणि दया यांनी मनुष्य परिपूर्ण होऊ शकत नाही. मनुष्याच्या अनुभवांमध्ये, तो देवाचे काही प्रेम पाहतो व देवाचे प्रेम आणि दया पाहतो, तरीही काही काळ अनुभवल्यानंतर, तो पाहतो की देवाची कृपा व त्याचे प्रेम आणि दया हे मनुष्याला परिपूर्ण बनवण्यास असमर्थ आहेत, मनुष्याच्या आत जे भ्रष्ट आहे, ते प्रकट करण्यास असमर्थ आहेत व मनुष्याला त्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीपासून मुक्त करण्यास किंवा त्याचे प्रेम आणि विश्वास परिपूर्ण करण्यास असमर्थ आहेत. देवाच्या कृपेचे कार्य हे एका काळातील कार्य होते व देवाला जाणून घेण्यासाठी मनुष्य देवाच्या कृपेचा आनंद घेण्यावर अवलंबून राहू शकत नाही.
देवाकडून मनुष्याची परिपूर्णता कोणत्या साधनांद्वारे साधली जाते? हे त्याच्या नीतिमान प्रवृत्तीच्या माध्यमातून साध्य होते. देवाच्या प्रवृत्तीमध्ये प्रामुख्याने नीतिमत्ता, क्रोध, गौरव, न्याय आणि शाप यांचा समावेश होतो व तो मुख्यतः त्याच्या न्यायाने मनुष्याला परिपूर्ण करतो. काही लोकांना समजत नाही आणि ते विचारतात, की देव केवळ न्याय व शापाद्वारेच मनुष्याला परिपूर्ण बनवण्यास सक्षम का आहे. ते म्हणतात, “जर देवाने मनुष्याला शाप दिला, तर मनुष्य मरणार नाही का? जर देवाने मनुष्याचा न्याय केला, तर मनुष्याला दोषी ठरवले जाणार नाही का? मग तरीही तो परिपूर्ण कसा होणार?” ज्यांना देवाचे कार्य माहीत नाही, अशा लोकांचे हे शब्द असतात. देव ज्याला शाप देतो ती मनुष्याची अवज्ञा असते आणि ज्याचा तो न्याय करतो ती मनुष्याची पापे असतात. जरी तो कठोरपणे व अथकपणे बोलत असला, तरी तो मनुष्याच्या अंतःकरणात जे काही आहे ते प्रकट करतो, या कठोर शब्दांतून तो मनुष्याच्या अंतःकरणात जे आहे हे प्रकट करतो, तरीही अशा न्यायांद्वारे, तो मनुष्याला देहाच्या घटकाचे सखोल ज्ञान देतो आणि अशा प्रकारे मनुष्य देवाच्या अधीन होतो. मनुष्याचा देह पापाचा व सैतानाचा आहे, अवज्ञाकारी आहे आणि तो देवाच्या ताडणाची वस्तू आहे. अशाप्रकारे, मनुष्याला स्वतःला जाणून घेण्यास अनुमती देण्यासाठी, देवाच्या न्यायाची वचने त्याच्यावर पडली पाहिजेत व प्रत्येक प्रकारचे परिष्करण वापरले पाहिजे; तरच देवाचे कार्य प्रभावी होऊ शकते.
देवाने उच्चारलेल्या वचनांवरून असे दिसून येते, की त्याने आधीच मनुष्याच्या देहाची निंदा केली आहे. मग ही वचने शिव्याशापांची वचने नाहीत का? देवाने उच्चारलेली वचने मनुष्याचे खरे रंग प्रकट करतात आणि अशा प्रकटीकरणांद्वारे त्याचा न्याय केला जातो व जेव्हा तो पाहतो, की तो देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा त्याला आतून दुःख आणि पश्चात्ताप होतो, त्याला वाटते, की तो देवाचा खूप ऋणी आहे व देवाची इच्छा साध्य करू शकत नाही. काही वेळा पवित्र आत्मा तुला अंतःकरणातून शिस्त लावतो आणि ही शिस्त देवाच्या न्यायाद्वारे येते; काही वेळा देव तुझी निंदा करतो व त्याचा चेहरा तुझ्यापासून लपवतो, जेव्हा तो तुझी दखल घेत नाही आणि तुझ्यामध्ये कार्य करत नाही, तुझ्या परिष्करणासाठी निःशब्दपणे तुझे ताडण करतो. मनुष्यामध्ये देवाचे कार्य हे प्रामुख्याने त्याची नीतिमान प्रवृत्ती स्पष्ट करण्यासाठी आहे. मनुष्य शेवटी देवाला कोणती साक्ष देतो? मनुष्य साक्ष देतो, की देव नीतिमान देव आहे, नीतिमत्ता, क्रोध, ताडण व न्याय ही त्याची प्रवृती आहे; मनुष्य देवाच्या नीतिमान प्रवृत्तीची साक्ष देतो. देव मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठी त्याच्या न्यायाचा उपयोग करतो, त्याने मनुष्यावर प्रेम केले आहे आणि मनुष्याला वाचवले आहे—पण त्याच्या प्रेमात किती सामावलेले आहे? त्यामध्ये न्याय, वैभव, क्रोध व शाप आहे. भूतकाळात देवाने मनुष्याला शाप दिला असला तरी, त्याने मनुष्याला पूर्णपणे अथांग खड्ड्यात टाकलेले नाही, तर मनुष्याच्या श्रद्धेच्या परिष्करणासाठी त्याचा उपयोग केला; त्याने मनुष्याला ठार मारले नाही, तर मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी कृती केली. देह हा सैतानाचा बनलेला आहे—देवाने ते अगदी बरोबर सांगितले आहे—परंतु देवाने सोबत वाहिलेली तथ्ये त्याच्या वचनांनुसार पूर्ण झालेली नाहीत. तो तुला शाप देतो, जेणेकरून तू त्याच्यावर प्रेम करावेस आणि तुला देहाचे सार कळावे; तो तुझे ताडण करतो, जेणेकरून तू जागृत व्हावेस, तुला तुझ्यामधील कमतरता कळाव्यात व मनुष्याला स्वतःची निव्वळ अयोग्यता कळावी. अशाप्रकारे, देवाचे शाप, त्याचा न्याय आणि त्याचा गौरव व क्रोध—ते सर्व मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी आहेत. आज देव जे काही करतो आणि जी नीतिमान प्रवृत्ती तुमच्यामध्ये स्पष्ट करतो, हे सर्व मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी आहे. देवाचे प्रेम हे असे आहे.
मनुष्याच्या पारंपरिक धारणांनुसार, त्याचा असा विश्वास आहे, की देवाचे प्रेम म्हणजे त्याची कृपा, दया आणि मनुष्याच्या दुर्बलतेबद्दल असलेली सहानुभूती आहे. जरी या गोष्टी म्हणजेदेखील देवाचे प्रेमच असल्या, तरी त्या खूपच एकतर्फी आहेत व ज्याद्वारे देव मनुष्याला परिपूर्ण बनवतो, त्यासाठीचे हे प्राथमिक माध्यम नाही. काही लोक आजारपणामुळे देवावर विश्वास ठेवू लागतात. हे आजारपण म्हणजे तुझ्यावर देवाची कृपा आहे; त्याशिवाय तू देवावर विश्वास ठेवला नसतास आणि जर तू देवावर विश्वास ठेवला नसतास तर इथपर्यंत पोहोचला नसतास—व म्हणूनच ही कृपा म्हणजेदेखील देवाचे प्रेमच आहे. येशूवर विश्वास ठेवण्याच्या काळात, लोकांनी बरेच काही केले जे देवाला प्रिय नव्हते, कारण त्यांना सत्य समजले नव्हते, तरीही देवाकडे प्रेम आणि दया आहे व त्याने मनुष्याला इथपर्यंत आणले आहे आणि जरी मनुष्याला काहीही समजत नसले, तरीही देव मनुष्याला त्याचे अनुसरण करण्याची परवानगी देतो, एवढेच नव्हे, तर त्याने मनुष्याला आजपर्यंत आणले आहे. हे देवाचे प्रेमच नाही का? देवाच्या प्रवृत्तीत जे प्रकट होते तेच देवाचे प्रेम आहे—हे अगदी बरोबर आहे! जेव्हा चर्चची इमारत शिखरापर्यंत पोहोचली, तेव्हा देवाने सेवा करणार्यांच्या कार्याची पायरी पूर्ण केली व मनुष्याला अथांग खड्ड्यात टाकले. सेवा करणार्यांच्या काळातील वचने हे सर्व शाप होते: तुझ्या देहाचे शाप, तुझ्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीचे शाप आणि देवाच्या इच्छांची पूर्तता न करणाऱ्या तुझ्याविषयीच्या गोष्टींचे शाप. त्या पायरीमध्ये देवाने केलेले कार्य गौरवाच्या रूपात प्रकट झाले, त्यानंतर लवकरच देवाने ताडणाच्या कार्याची पायरी पार पाडली व त्यानंतर मृत्यूची कसोटी आली. अशा कार्यात, मनुष्याने देवाचा क्रोध, गौरव, न्याय आणि ताडण पाहिले, तरीही त्याने देवाची कृपा, त्याचे प्रेम व त्याची दयादेखील पाहिली. देवाने जे काही केले आणि जे काही त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे प्रकट झाले, ते सर्व देवाचे मनुष्यावरील प्रेम होते व देवाने जे काही केले ते मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होते. मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी त्याने हे केले आणि त्याने मनुष्यासाठी त्याच्या पातळीनुसार तरतूद केली आहे. जर देवाने हे केले नसते, तर मनुष्य देवासमोर येण्यास असमर्थ ठरला असता व देवाचा खरा चेहरा जाणून घेण्यासाठी त्याला कोणताच मार्ग उरला नसता. जेव्हा मनुष्याने प्रथम देवावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली तेव्हापासून आजतागायत, देवाने मनुष्यासाठी त्याच्या पातळीनुसार हळुहळू तरतूद केली आहे, ज्यामुळे मनुष्याने अंतःकरणातून हळुहळू त्याला ओळखले आहे. आजच्या दिवसापर्यंत येऊन पोहचल्यानंतरच, देवाचा न्याय किती अद्भूत आहे याची जाणीव मनुष्याला होते. सेवा करणार्यांच्या कार्याची पायरी हे निर्मितीच्या काळापासून आजतागायत शाप देण्याच्या कार्याची पहिली घटना होती. मनुष्याला अथांग खड्ड्यात जाण्याचा शाप होता. जर देवाने तसे केले नसते, तर आज मनुष्याला देवाचे खरे ज्ञान मिळाले नसते; देवाच्या शापामुळेच मनुष्याला अधिकृतपणे त्याच्या प्रवृत्तीचा सामना करावा लागला. सेवा करणार्यांच्या कसोट्यांतून मनुष्य प्रकट झाला. त्याने पाहिले, की त्याची निष्ठा अस्वीकार्य आहे, त्याची पातळी खूपच कमी आहे, तो देवाच्या इच्छेला संतुष्ट करण्यास असमर्थ आहे आणि सतत देवाला संतुष्ट करण्याचे त्याचे दावे म्हणजे शब्दांहून अधिक काही नाहीत. जरी सेवा करणार्यांच्या कार्याच्या पायरीवर देवाने मनुष्याला शाप दिला असला तरी, आता मागे वळून पाहता, देवाच्या कार्याची ती पायरी अद्भूत होती: यामुळे मनुष्याला एक कलाटणी मिळाली व त्याच्या जीवनाच्या प्रवृत्तीत मोठा बदल झाला. सेवा करणार्यांच्या काळापूर्वी, मनुष्याला जीवनाचा पाठपुरावा, देवावर विश्वास ठेवण्याचा अर्थ किंवा देवाच्या कार्याचे शहाणपण याची काहीच समज नव्हती आणि देवाचे कार्य मनुष्याची कसोटी घेऊ शकते हेदेखील त्याला समजले नाही. सेवा करणार्यांच्या काळापासून आजतागायत, मनुष्य पाहतो, की देवाचे कार्य किती विलक्षण आहे—ते मनुष्यासाठी अथांग आहे. देव कसे कार्य करतो याची कल्पना मनुष्य आपल्या मेंदूचा वापर करून करू शकत नाही व तो त्याची पातळी किती कमी आहे आणि तो त्याच्याबद्दल खूप अवज्ञाकारी आहे, हे देखील पाहतो. जेव्हा देवाने मनुष्याला शाप दिला, तेव्हा तो परिणाम साध्य करण्यासाठी होता व त्याने मनुष्याला ठार मारले नाही. जरी त्याने मनुष्याला शाप दिला असला तरी, त्याने वचनांद्वारे तसे केले आणि त्याचे शाप प्रत्यक्षात मनुष्यावर पडले नाहीत, कारण देवाने ज्याला शाप दिला ती मनुष्याची अवज्ञा होती व म्हणूनच त्याच्या शापांची वचनेदेखील मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठी बोलली गेली. देव मनुष्याचा न्याय करो किंवा त्याला शाप देवो, या दोन्ही गोष्टी मनुष्याला परिपूर्ण बनवतात: या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या आत जे अशुद्ध आहे, ते परिपूर्ण करण्यासाठी केल्या जातात. याद्वारे मनुष्याचे परिष्करण होते आणि मनुष्यामध्ये जी उणीव आहे ती त्याच्या वचनांतून व कार्याने परिपूर्ण केली जाते. देवाच्या कार्याची प्रत्येक पायरी—मग ती कठोर वचने असोत किंवा न्याय असो किंवा ताडण असो—मनुष्याला परिपूर्ण बनवते व ती अगदी योग्य असते. युगानुयुगात कधीच देवाने असे कार्य केले नाही; आज, तो तुमच्यामध्ये कार्य करतो जेणेकरून, तुम्ही त्याच्या शहाणपणाची प्रशंसा कराल. जरी तुम्हाला अंतःकरणात काही वेदना झाल्या आहेत, तुमचे अंतःकरण स्थिर आणि शांत आहे; तुम्हाला देवाच्या कार्याच्या या टप्प्याचा आनंद घेता आला हा तुम्हाला लाभलेला आशीर्वाद आहे. भविष्यात तुम्ही काय मिळवू शकता याची पर्वा न करता, आज तुमच्यामध्ये देवाचे जे कार्य तुम्ही पाहत आहात ते सर्व प्रेमच आहे. जर मनुष्याला देवाचा न्याय व परिष्करण अनुभवता येत नसेल, तर त्याची कृती आणि उत्साह सदैव पृष्ठभागाच्या पातळीवर राहील व त्याची प्रवृत्ती सदैव अपरिवर्तित राहील. हे देवाकडून प्राप्त होणे म्हणून गणले जाते का? आज, जरी मनुष्यामध्ये उद्धट आणि गर्विष्ठ असे बरेच काही असले, तरी मनुष्याची प्रवृत्ती पूर्वीपेक्षा खूपच स्थिर आहे. देवाचे तुझ्याशी वर्तन हे तुला वाचवण्यासाठी केले आहे व जरी तुला त्या वेळी काही वेदना होत असतील, तरी तो दिवस येईल जेव्हा तुझ्या प्रवृत्तीत बदल होईल. त्यावेळी, तू मागे वळून पहाशील आणि देवाचे कार्य किती शहाणपणाचे आहे ते तुला दिसेल व त्या वेळी तू देवाची इच्छा खऱ्या अर्थाने समजून घेण्यास सक्षम असशील. आज, असे काही लोक आहेत जे म्हणतात की त्यांना देवाची इच्छा समजते, परंतु ते फारसे वास्तववादी नाही. खरं तर, ते खोटे बोलत आहेत, कारण त्यांना अद्याप समजलेले नाही, की देवाची इच्छा मनुष्याला वाचवायची आहे की मनुष्याला शाप देण्याची आहे. कदाचित तुला ते आता स्पष्टपणे दिसत नसेल, पण तो दिवस येईल जेव्हा तुला दिसेल, की देवाला गौरव प्राप्त होण्याचा दिवस आला आहे आणि तुला दिसेल की देवावर प्रेम करणे किती अर्थपूर्ण आहे, जेणेकरून तुला मानवी जीवनाचे आकलन होईल व तुझा देह प्रेमळ देवाच्या जगात राहतील, जेणेकरून तुझा आत्मा मुक्त होईल, तुझे जीवन आनंदाने भरलेले असेल आणि तू सदैव देवाच्या जवळ राहशील व त्याच्याकडे पहाशील. त्या वेळी, तुला खरोखरच उमजेल, की आज देवाचे कार्य किती मौल्यवान आहे.
आज बहुतेक लोकांना ते ज्ञान नाही. त्यांचा असा विश्वास आहे, की दुःखाचे काहीच मोल नाही, त्यांचा जगाने त्याग केला आहे, त्यांचे गृहजीवन त्रासाचे आहे, ते देवाचे प्रिय नाहीत आणि त्यांच्या संधी अंधकारमय आहे. काही लोकांचे दुःख टोकाला पोहोचते व त्यांचे विचार मृत्यूकडे वळतात. हे देवावरील खरे प्रेम नसते; असे लोक भित्रे असतात, त्यांच्याकडे चिकाटी नसते, ते दुर्बल आणि शक्तिहीन असतात! देव मनुष्याने त्याच्यावर प्रेम करावे यासाठी उत्सुक आहे, परंतु मनुष्य त्याच्यावर जितके अधिक प्रेम करेल, तितके मनुष्याचे दुःख अधिक असेल व मनुष्य त्याच्यावर जितके अधिक प्रेम करेल तितक्या मनुष्याच्या कसोट्या अधिक असतील. जर तू त्याच्यावर प्रेम करत असशील, तर सर्व प्रकारचे दुःख तुझ्यावर येईल—आणि जर तू प्रेम करत नसशील, तर कदाचित तुझ्यासाठी सर्व काही सुरळीत होईल व तुझ्या सभोवताली सर्व काही शांत असेल. जेव्हा तू देवावर प्रेम करतोस तेव्हा तुला असे वाटेल, की तुझ्या सभोवतालचे बरेच काही अलंघ्य आहे आणि तुझी पातळी खूपच कमी असल्यामुळे तुझे परिष्करण केले जाईल; शिवाय, तू देवाला संतुष्ट करण्यास असमर्थ असशील व तुला सदैव वाटेल, की देवाची इच्छा खूप उदात्त आहे, ती मनुष्याच्या आवाक्याबाहेर आहे. या सर्व गोष्टींमुळे तुझे परिष्करण केले जाईल—कारण तुझ्यामध्ये पुष्कळ दुर्बलता आहे आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ असलेले बरेच काही आहे, तुझे आंतरिकरित्या परिष्करण केले जाईल. तरीही तुम्ही हे स्पष्टपणे पाहिले पाहिजे, की शुद्धीकरण केवळ परिष्करणाद्वारेच साध्य होते. म्हणूनच, या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही देवाची साक्ष दिली पाहिजे. तुमचे दुःख कितीही मोठे असले, तरी तुम्ही शेवटपर्यंत चालत राहिले पाहिजे व अगदी अखेरच्या श्वासापर्यंतदेखील तुम्ही देवाशी प्रामाणिक आणि देवाच्या अधीन असले पाहिजे; केवळ हेच खऱ्या अर्थाने देवावर प्रेम करणे आहे व केवळ हीच सक्षम आणि परिपूर्ण साक्ष आहे. जेव्हा तुम्हाला सैतान मोहात पाडतो, तेव्हा तू म्हटले पाहिजेस: “माझे हृदय देवाला वाहिलेले आहे व देवाने मला आधीच प्राप्त केले आहे. मी तुला संतुष्ट करू शकत नाही—मी माझे सर्व काही देवाला संतुष्ट करण्यासाठी समर्पित केले पाहिजे.” तू देवाला जितके अधिक संतुष्ट करशील, तितके देव तुला अधिक आशीर्वाद देईल आणि देवावरील तुझ्या प्रेमाचे बळ वृद्धिंगत होईल; त्याचप्रमाणे तुझी श्रद्धा व संकल्पही वृद्धिंगत होतील आणि तुला जाणवेल, की देवावर प्रेम करण्यात व्यतीत केलेल्या जीवनापेक्षा अधिक मौल्यवान किंवा महत्त्वपूर्ण काहीही नाही. असे म्हणता येईल, की जर मनुष्य देवावर प्रेम करत असेल, तर तो दुःखापासून दूर राहील. जरी अशाही काही वेळा असतात, जेव्हा तुझा देह कमकुवत असतो व तू अनेक वास्तविक संकटांनी ग्रासलेला असतोस, या काळात तू खरोखरच देवावर विसंबून राहशील आणि तुझ्या आत्म्यात तुला सांत्वन मिळेल व तुला खात्री वाटेल, की तुझ्यावर अवलंबून राहण्यासारखे काहीतरी आहे. अशाप्रकारे, तू अनेक वातावरणांवर मात करू शकशील आणि त्यामुळे तुला होणाऱ्या त्रासामुळे तू देवाबद्दल तक्रार करणार नाहीस. त्याउलट, तुला गाणे, नाचणे व प्रार्थना करणे, एकत्र येणे आणि संवाद साधणे, देवाचा विचार करणे आवडेल व तुला असे वाटेल, की देवाने व्यवस्था केलेले तुझ्या सभोवतालचे सर्व लोक, प्रकरणे आणि गोष्टी योग्य आहेत. जर तू देवावर प्रेम करत नसशील, तर तू ज्याकडे पाहत आहेस ते सर्व तुला त्रासदायक वाटेल व तुझ्या डोळ्यांना काहीही आनंद देणार नाही; तुझ्या अंतःकरणात तू मुक्त नव्हे तर दीन असशील, तुझे अंतःकरण सदैव देवाविषयी तक्रार करेल आणि तुला सदैव असे वाटेल की तुला खूप यातना सहन कराव्या लागत आहेत व ते खूप अन्यायकारक आहे. जर तू आनंदासाठी नव्हे, तर देवाला संतुष्ट करण्यासाठी आणि सैतानाचा आरोप होऊ नये म्हणून पाठपुरावा करत असशील, तर असे अनुसरण तुला देवावर प्रेम करण्यासाठी मोठे बळ देईल. मनुष्य देवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी अमलात आणण्यास समर्थ आहे व तो जे काही करतो ते देवाला संतुष्ट करण्यास सक्षम आहे—वास्तविकतेचा ताबा याचा अर्थ हाच आहे. देवाच्या समाधानाचा पाठपुरावा करणे म्हणजे देवावरील तुझ्या प्रेमाचा उपयोग करून त्याची वचने आचरणात आणणे; वेळ कितीही असो—इतरांची शक्ती नसली तरीही—तुझ्यामध्ये अजूनही एक हृदय आहे जे देवावर प्रेम करते, जे देवासाठी उत्कटतेने तळमळत असते आणि जे त्याचे स्मरण करते. ही खरी पातळी आहे. तुझी पातळी किती जास्त आहे हे तुझे देवावरील प्रेम किती मोठे आहे यावर अवलंबून आहे, कसोटीच्या वेळी तू ठाम उभे राहण्यास सक्षम आहात की नाही, तुझ्यावर विशिष्ट परिस्थिती आल्यावर तू कमकुवत पडतोस की नाही व जेव्हा तुझे भाऊ आणि बहिणी तुला नाकारतात तेव्हा तू तुझी बाजू मांडू शकतोस की नाही; तथ्यांचे आगमन हेच दर्शवेल की तुमचे देवावरील प्रेम कसे आहे. देवाच्या पुष्कळशा कार्यांवरून हे दिसून येते, की देव खरोखरच मनुष्यावर प्रेम करतो, जरी मनुष्याच्या आत्म्याचे डोळे अद्याप पूर्णपणे उघडले गेले नाहीत व तो देवाचे बरेचसे कार्य आणि त्याची इच्छा स्पष्टपणे पाहू शकत नाही, तसेच देवाबद्दलच्या अनेक सुंदर गोष्टीही पाहू शकत नाही; मनुष्याचे देवावर खरे प्रेम फारच कमी आहे. या सर्व काळात तू देवावर विश्वास ठेवला आहेस व आज देवाने सुटकेचे सर्व मार्ग बंद केले आहेत. वास्तविक सांगायचे तर, तुझ्याकडे योग्य मार्ग स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, असा योग्य मार्ग ज्यावर तुला देवाच्या कठोर निर्णयाने आणि सर्वोच्च तारणामुळे नेले गेले आहे. कष्ट व परिष्करण अनुभवल्यानंतरच मनुष्याला हे समजते, की देव प्रेमळ आहे. आजपर्यंतचा अनुभव घेतल्यावर असे म्हणता येईल की, मनुष्याला देवाच्या प्रेमाचा अंश कळला आहे, परंतु हे अद्याप पुरेसे नाही, कारण मनुष्यामध्ये खूपच कमतरता आहेत. मनुष्याने देवाच्या अद्भूत कार्याचा आणि देवाने व्यवस्था केलेल्या दुःखाच्या परिष्करणाचा अधिकाधिक अनुभव घेतला पाहिजे. तरच मनुष्याची जीवन प्रवृत्ती बदलू शकते.