फक्त देवावर प्रेम करणे म्हणजेच देवावर विश्वास ठेवणे आहे
आज, तुम्ही देवावर प्रेम करण्याचा आणि त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना, एका प्रकारे तुम्हाला कष्ट व परिष्करण सहन करावे लागेल आणि दुसर्या प्रकारे, तुम्हाला किंमत मोजावी लागेल. देवावर प्रेम करण्याच्या धड्यापेक्षा कोणताही धडा अधिक सखोल नाही व असे म्हणता येईल, लोक आयुष्यभराच्या विश्वासातून जो धडा शिकतात, तो म्हणजे देवावर प्रेम करणे. याचा अर्थ असा आहे, की जर तुझा देवावर विश्वास असेल, तर तू देवावर प्रेम केले पाहिजेस. जर तुझा देवावर फक्त विश्वास असेल परंतु त्याच्यावर प्रेम नसेल आणि तू देवाविषयी ज्ञान मिळवले नसशील व तू तुझ्या अंतःकरणातून आलेल्या खऱ्या प्रेमाने देवावर कधीही प्रेम केले नसशील, तर देवावरील तुझा विश्वास व्यर्थ आहे; जर देवावरील तुझ्या विश्वासामध्ये, तू त्याच्यावर प्रेम करत नसशील, तर तुझे जगणे व्यर्थ आहे आणि तुझे संपूर्ण जीवन सर्व जीवनांपेक्षा सर्वात खालच्या स्तरावरचे आहे. जर तुझ्या संपूर्ण जीवनात, तू देवावर कधीही प्रेम केले नसशील किंवा त्याला संतुष्ट केले नसशील, तर तुझ्या जगण्याला काय अर्थ आहे? आणि देवावर तुझ्या विश्वासाला काय अर्थ आहे? हे व्यर्थ प्रयत्न नाहीत का? याचाच अर्थ असा आहे, की जर लोकांना देवावर विश्वास ठेवायचा असेल व त्याच्यावर प्रेम करायचे असेल, तर त्यांना किंमत मोजावीच लागते. वरवर एका ठरावीक पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्यांनी त्यांच्या अंतःकरणाचा खोलवर खरा ठाव घेतला पाहिजे. जर तू गाणे गाण्यास आणि नृत्य करण्यास उत्साही असशील, परंतु सत्य आचरणात आणण्यास असमर्थ असशील, तर तुझे देवावर प्रेम आहे असे म्हणता येईल का? देवावर प्रेम करण्यासाठी, सर्व गोष्टींमध्ये देवाची इच्छा शोधणे व जेव्हा तुझ्यासोबत काही घडते, तेव्हा सखोल तपासणी करणे, देवाची इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि या गोष्टीत देवाची इच्छा काय आहे, तो तुला काय साध्य करण्यास सांगत आहे व तू त्याच्या इच्छेकडे कसे लक्ष द्यायला पाहिजे हे पाहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ: असे काहीतरी घडते ज्यासाठी तुला त्रास सहन करावे लागतात, त्या वेळी देवाची इच्छा काय आहे आणि तू त्याच्या इच्छेकडे कसे लक्ष द्यायला पाहिजेस हे तुम्हाला समजले पाहिजे. तू स्वतःला संतुष्ट करू नये: सर्वप्रथम स्वतःला एका बाजूला ठेव. देहापेक्षा अधिक खालावलेली गोष्ट कोणतीही नाही. तू देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व तू तुझे कर्तव्य पूर्ण केले पाहिजेस. अशा विचारांनी, देव तुला या बाबतीत विशेष ज्ञान देईल आणि तुझ्या अंतःकरणालादेखील दिलासा मिळेल. लहान असो किंवा मोठे, जेव्हा तुझ्यासोबत काही घडते तेव्हा, सर्वप्रथम स्वतःला एका बाजूला ठेवले पाहिजे व सर्व गोष्टींमध्ये देहाला सर्वात खालच्या स्तरावरचे मानले पाहिजे. तू देहाला जितके संतुष्ट करशी तितका तो अधिक स्वैरपणे वागतो; यावेळी त्याला संतुष्ट केल्यास, पुढील वेळी तो अधिक मागेल. जसजसे हे सुरू राहते, तसतसे लोक देहावर अधिक प्रेम करू लागतात. देहाच्या इच्छा नेहमीच अमर्याद असतात; तो नेहमीच तुला त्याला संतुष्ट करण्यास आणि त्याला सर्वांगीण तृप्त करण्यास सांगतो, मग ते खाण्याच्या गोष्टी असोत, परिधान करण्याच्या असोत किंवा संयम गमावणे असो अथवा स्वतःचा कमकुवतपणा व आळशीपणा असो… तू देहाला जितके संतुष्ट करशील तितक्या त्याच्या इच्छा वाढतील आणि देह तितकाच भ्रष्ट होत जाईल, हे अशा टप्प्यावर पोहोचते की जेथे लोकांचा देह सखोल धारणांनादेखील आश्रय देतो व देवाची अवज्ञा करतो आणि स्वतःला उदात्त करतो व देवाच्या कार्याबद्दल संशय घेतो. तू देहाला जितके संतुष्ट करतोस, तितका देहाचा कमकुवतपणा वाढतो; तुला नेहमी असे वाटत राहील, की तुझ्या कमकुवतपणाबद्दल कोणीही सहानुभूती दाखवत नाही, तुझा नेहमी विश्वास असेल, की देव खूप पुढे निघून गेला आहे आणि तू म्हणशील: “देव इतका कठोर कसा असू शकतो? तो लोकांना मध्ये विश्रांती का देऊ करत नाही?” जेव्हा लोक देहाला संतुष्ट करतात व त्याचे खूपच लाड करतात, तेव्हा ते स्वतःचा नाश करतात. जर तू खरोखर देवावर प्रेम करत असशील आणि देहाला संतुष्ट करत नसाल, तर तुला दिसेल, की देव जे काही करतो ते अगदी योग्य व चांगले आहे आणि तुझ्या बंडखोरपणाबद्दलचा त्याचा शाप व तुझ्या अधार्मिकतेचा न्याय योग्य आहे. अशी एखादी वेळ असेल जेव्हा देव तुला शिक्षा करतो आणि शिस्त लावतो व तुला शांत करण्यासाठी वातावरण तयार करतो, तुला त्याच्यासमोर येण्यास भाग पाडतो—आणि तुला नेहमी असे वाटेल, की देव जे करत आहे ते अद्भूत आहे. अशा प्रकारे तुला असे वाटेल, की जास्त त्रास होत नाही व देव खूप प्रेमळ आहे. जर तू देहाच्या कमकुवतपणाला गोंजारत असशील आणि देव खूप पुढे निघून जात आहे असे म्हणत असशील, तर तुला नेहमीच वेदना होतील व कायम उदासीनता जाणवेल आणि तुला देवाच्या सर्व कार्यांबद्दल योग्य माहिती नसेल व असे वाटेल, की देवाला मनुष्याच्या कमकुवतपणाबद्दल अजिबात सहानुभूती नाही व मनुष्याच्या अडचणींबद्दल तो अनभिज्ञ आहे. आणि अशा प्रकारे तुला नेहमीच दुःखी व एकटेपणा जाणवेल, जणू काही तुझ्यावर मोठा अन्याय झाला आहे आणि यावेळी तू तक्रार करण्यास सुरुवात करशील. तू देहाच्या कमकुवतपणाला अशाप्रकारे जितके प्रोत्साहन देशील, तितका देव पुढे निघून जातो आहे असे तुला वाटत राहिल, ते इथपर्यंत की तू देवाचे कार्य नाकारशील व देवाला विरोध करण्यास सुरुवात करशील आणि त्याची पूर्णपणे अवज्ञा करशील. अशा स्थितीत, तू देहाच्या विरुद्ध बंड केलेच पाहिजेस व त्याचे लाड करू नयेत: “माझा पती (पत्नी), मुले, संधी, विवाह, कुटुंब—यापैकी काहीही महत्त्वाचे नाही! माझ्या अंतःकरणात फक्त देव आहे आणि मी देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व देहाला नाही.” तुझ्याकडे हा संकल्प असणे आवश्यक आहे. जर तुझ्याकडे नेहमी असा संकल्प असेल, तर जेव्हा तू सत्य आचरणात आणून स्वतःला बाजूला ठेवशील, तेव्हा तू थोडेफार प्रयत्न करून ते करू शकाल. असे म्हणतात, की एकदा एका शेतकऱ्याला रस्त्यावर गारठून ताठ झालेला साप दिसला होता. शेतकऱ्याने तो उचलून आपल्या छातीशी धरला आणि साप चैतन्यमय झाल्यावर तो शेतकऱ्याला चावला व शेतकरी मरण पावला. मनुष्याचा देह सापासारखा आहे: त्याचे सार त्यांच्या जीवनास हानी पोहोचवणे आहे—आणि जेव्हा तो पूर्णपणे स्वतःच्याच मार्गाने जातो, तेव्हा तुझ्या जीवनाला शिक्षा मिळते. देह सैतानाचा आहे. त्याच्यामध्ये अमर्याद इच्छा असतात, तो फक्त स्वतःचाच विचार करतो, त्याला आरामाचा आनंद घ्यायचा असतो व मोकळेपणाने मौजमजा करायची असते, सुस्ती आणि आळशीपणात राहायचे असते व त्याला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत संतुष्ट केल्यावर, अंततः तो तुला गिळंकृत करतो. म्हणजेच, जर तू त्याला यावेळी संतुष्ट केलेस, तर पुढील वेळी तो आणखी मागण्या करेल. त्याच्या नेहमीच अमर्याद इच्छा आणि नवीन मागण्या असतात व तू देहाचे चोचले पुरवतोस त्याचा फायदा घेत तुला आणखी आणखी सुखसोयींमध्ये जगता यावे यासाठी तो प्रोत्साहन देतो—आणि जर तू त्यावर मात केली नाहीस, तर शेवटी तू स्वतःचा नाश करशील. तू देवासमोर जीवन प्राप्त करू शकतोस की नाही व तुझा अंतिम शेवट काय असेल, हे तू देहाच्या विरुद्ध तुझे बंड कसे पार पाडतोस यावर अवलंबून आहे. देवाने तुला वाचवले आहे आणि तुला निवडले आहे व तुझ्यासाठी आधीपासूनच काही निश्चित केले आहे, तरीदेखील आज जर तू त्याला संतुष्ट करण्यास तयार नसशील, सत्य आचरणात आणण्यास तयार नसशील, देवावर खरोखर प्रेम करणाऱ्या अंतःकरणाने स्वतःच्या देहाविरुद्ध बंड करण्यास तयार नसशील, तर अंततः तू स्वतःचा नाश करशील आणि त्यामुळे अत्यंत वेदना सहन करशील. जर तू नेहमीच शारिरीक मौजमजेला प्रोत्साहन देत असशील, तर जोपर्यंत तुझे अंतःकरण पूर्णपणे अंधारात जात नाही तोपर्यंत सैतान तुला हळूहळू गिळंकृत करेल व तुला जीवन किंवा आत्म्याच्या भावनांपासून वंचित ठेवेल. जेव्हा तू अंधारात जगतोस, तेव्हा तुला सैतानाने कैद केलेले असेल, तुझ्या अंतःकरणात देव राहणार नाही आणि त्या वेळी तू देवाचे अस्तित्व नाकारशील व त्याला सोडून जाशील. अशाप्रकारे, जर लोकांना देवावर प्रेम करायचे असेल तर त्यांनी वेदनेची किंमत मोजायला पाहिजे आणि कष्ट सहन करायला पाहिजे. बाहेरच्या तळमळीची व कष्टाची, अधिक वाचन आणि धावपळ यांची आवश्यकता नाही; त्याऐवजी, त्यांनी त्यांच्यातील या बाबी बाजूला ठेवल्या पाहिजेतः अमर्याद विचार, वैयक्तिक स्वारस्ये व त्यांचे स्वतःचे विचार, धारणा आणि हेतू. अशी देवाची इच्छा आहे.
देवाने लोकांच्या बाह्य प्रवृत्तीला हाताळणे हादेखील त्याच्या कार्याचा एक भाग आहे; उदाहरणार्थ, लोकांच्या बाह्य, असामान्य मानवतेशी, किंवा त्यांची जीवनशैली व सवयी, त्यांच्या पद्धती आणि रीतिरिवाज, तसेच त्यांच्या बाह्य पद्धती व त्यांच्या तळमळीशी व्यवहार करणे. पण जेव्हा तो लोकांना सत्य आचरणात आणण्यास आणि त्यांची प्रवृत्ती बदलण्यास सांगतो, तेव्हा मुख्यत्वे ज्या गोष्टी हाताळल्या जातात त्या म्हणजे त्यांच्यातील हेतू व धारणा. केवळ तुझ्या बाह्य प्रवृत्तीला हाताळणे कठीण नाही; हे तुला आवडत असलेल्या गोष्टी न खाण्यास सांगण्यासारखे आहे, जे सोपे आहे. तथापि, जे अंतःकरणातील धारणांना स्पर्श करते, ते सोडून देणे सोपे नाही. यासाठी लोकांना देहाच्या विरोधात बंड करावे लागते आणि किंमत मोजावी लागते व देवासमोर दुःख सहन करावे लागते. हे विशेषतः लोकांच्या हेतूंच्या बाबतीत आहे. लोक देवावर विश्वास ठेवू लागल्यापासून, त्यांनी अनेक चुकीच्या हेतूंना मनात थारा दिला आहे. जेव्हा तू सत्य आचरणात आणत नाहीस, तेव्हा तुला असे वाटते, की तुझे सर्व हेतू बरोबर आहेत, परंतु जेव्हा काही घडते, तेव्हा तुला दिसेल, की तुझ्यामध्ये अनेक चुकीचे हेतू आहेत. अशा प्रकारे, जेव्हा देव लोकांना परिपूर्ण बनवतो, तेव्हा तो त्यांना जाणीव करून देतो, की त्यांच्यामध्ये अनेक धारणा आहेत ज्या देवाविषयीच्या त्यांच्या ज्ञानात अडथळा आणत आहेत. जेव्हा तू ओळखतोस, की तुमचे हेतू चुकीचे आहेत, तेव्हा जर तू तुमच्या धारणा आणि हेतूंनुसार आचरण करणे थांबवू शकत असशील व देवाला साक्ष देण्यास सक्षम होशील आणि तुझ्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्या नव्या जाणीवेवर ठाम राहाल, तर हे सिद्ध होते, की तू देहाविरुद्ध बंड केले आहेस. जेव्हा तू देहाविरुद्ध बंड करतोस, तेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये अपरिहार्यपणे द्वंद्व निर्माण होईल. सैतान त्याच्या प्रयत्नांनी लोकांना त्याचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करेल, त्यांना देहाच्या धारणांचे अनुसरण करण्यास प्रवृत्त करेल व देहाचे हित उचलून धरेल—परंतु देवाची वचने लोकांना ज्ञान देतील आणि ते अंतःकरणातून प्रकाशित होतील व यावेळी देवाचे अनुसरण करायचे की सैतानाचे अनुसरण करायचे हा तुझा निर्णय असेल. लोकांनी मुख्यतः त्यांच्या अंतःकरणातील गोष्टींचा सामना करण्यासाठी, देवाविरुद्धच्या त्यांच्या विचारांशी आणि धारणांशी लढण्यासाठी सत्य आचरणात आणावे असे देव लोकांना सांगतो. पवित्र आत्मा लोकांना त्यांच्या अंतःकरणात स्पर्श करतो व त्यांना ज्ञान देतो आणि प्रकाशित करतो. म्हणून जे काही घडते त्या प्रत्येकामागे एक लढाई असते: प्रत्येक वेळी जेव्हा लोक सत्य आचरणात आणतात किंवा देवाचे प्रेम आचरणात आणतात, तेव्हा एक मोठी लढाई असते व जरी त्यांच्या देहाच्या बाबतीत सर्व काही चांगले वाटत असले तरीदेखील, प्रत्यक्षात त्यांच्या अंतःकरणात खोलवर जन्म-मृत्यूची लढाई सुरूच राहते—आणि या तीव्र लढाईनंतरच, प्रचंड चिंतनानंतरच, विजय किंवा पराभवाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हसावे की रडावे हेच कळत नाही. लोकांमधील अनेक हेतू चुकीचे असल्यामुळे, नाहीतर देवाचे बरेचसे कार्य त्यांच्या धारणांशी विसंगत असल्यामुळे, जेव्हा लोक सत्य आचरणात आणतात, तेव्हा पडद्यामागे एक मोठी लढाई लढली जाते. हे सत्य आचरणात आणल्यानंतर, अंततः देवाला संतुष्ट करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, पडद्यामागे, लोकांनी दुःखाचे असंख्य अश्रू ढाळले असतील. या लढाईमुळेच लोक दु:ख व परिष्कृतता सहन करतात; हे खरे दुःख आहे. जेव्हा लढाई तुझ्यावर येते, तेव्हा जर तू खरोखर देवाच्या बाजूने उभे राहण्यास सक्षम असशील, तर तू देवाला संतुष्ट करू शकशील. सत्य आचरणात आणताना, अंतःकरणातून दुःख होणे अपरिहार्य आहे; जर ते सत्य आचरणात आणत असतील, लोकांमध्ये सर्व काही बरोबर असेल, तर देवाने त्यांना परिपूर्ण बनवण्याची गरज नाही आणि कोणतीही लढाई होणार नाही व त्यांना त्रास होणार नाही. लोकांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या देवाच्या वापरासाठी योग्य नाहीत त्यामुळे आणि देहाच्या बंडखोर प्रवृत्तीमुळे लोकांनी अधिक गंभीरपणे देहाविरुद्ध बंड करण्याचा धडा शिकण्याची आवश्यकता आहे. देवाने मनुष्याला त्याच्यासोबत सहन करण्यास सांगितलेले दुःख हेच आहे असे देव म्हणतो. जेव्हा अडचणी येतात, तेव्हा त्वरा करा व देवाची प्रार्थना करा: “हे देवा! मी तुला संतुष्ट करू इच्छित आहे, मला तुझे अंतःकरण संतुष्ट करण्यासाठी शेवटचा त्रास सहन करायची इच्छा आहे आणि मला कितीही मोठे अडथळे आले तरीही मी तुला संतुष्ट केलेच पाहिजे. जरी मला माझे संपूर्ण आयुष्य त्यागावे लागले, तरी सुद्धा मी तुम्हाला संतुष्ट केलेच पाहिजे!” या संकल्पासह, अशा प्रकारे प्रार्थना केली, तर तू तुझ्या साक्षीत ठाम राहू शकशील. प्रत्येक वेळी ते सत्य आचरणात आणतात, प्रत्येक वेळी ते परिष्कृत होतात, प्रत्येक वेळी त्यांची कसोटी घेतली जाते व प्रत्येक वेळी देवाचे कार्य त्यांच्यावर येते, तेव्हा लोकांना अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात. हे सर्व म्हणजे लोकांसाठी कसोटी आहे आणि म्हणून या सर्वांमध्ये लढाई सुरू आहे. त्यांना मोजावी लागणारी ही खरी किंमत आहे. देवाची आणखी वचने वाचणे व अधिक धावाधाव करणे हे त्या किंमतीचा एक भाग आहे. लोकांनी हे केलेच पाहिजे, हे त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे जी त्यांनी पार पाडली पाहिजे, परंतु लोकांनी त्यांच्यातील जे बाजूला ठेवून देण्याची गरज आहे, ते बाजूला ठेवले पाहिजे. जर तू तसे केले नाहीस, तर बाह्य दुःख कितीही मोठे असले, कितीही धावपळ केली, तरी सर्व व्यर्थ ठरेल! म्हणजेच, तुझ्या बाह्य दुःखाला काही मूल्य आहे की नाही हे केवळ तुझ्यातील बदल ठरवू शकतात. जेव्हा आंतरिक प्रवृत्ती बदलली असेल व सत्य आचरणात आणलेले असेल, तेव्हा तुझ्या सर्व बाह्य दुःखांना देवाची मान्यता मिळेल; जर आंतरिक प्रवृत्तीत काही बदल झाला नाही, तर तू बाहेर कितीही दुःख सहन केलेस किंवा कितीही धावपळ केलीस तरी देवाकडून मान्यता मिळणार नाही—आणि देवाने पुष्टी न केलेले कष्ट व्यर्थ आहेत. अशा प्रकारे, तुझ्यामध्ये बदल झाला आहे की नाही व तू सत्य आचरणात आणले आहेस की नाही आणि देवाच्या इच्छेचे, देवाच्या ज्ञानाचे व देवाप्रती निष्ठेचे समाधान मिळवण्यासाठी स्वतःच्या हेतू आणि धारणांविरुद्ध बंड केले आहे की नाही यानुसार, तू मोजलेली किंमत देवाने मंजूर केली आहे की नाही हे ठरवले जाते. तू कितीही धावपळ केलीस, तरी जर तुला स्वतःच्या हेतूंविरुद्ध बंड करण्याचे माहीतच नसेल, परंतु केवळ बाह्य कृती व उत्कटतेचा शोध घ्यायचा असेल आणि जीवनाकडे कधीही लक्ष दिले नसेल, तर तुझे त्रास व्यर्थ ठरतील. जर, एखाद्या विशिष्ट वातावरणात, तुला काहीतरी सांगायचे असेल, परंतु ते बोलणे बरोबर नाही, असे तुला अंतःकरणातून वाटत असेल, असे म्हणणे तुझ्या बंधू-भगिनींसाठी हितकारक नाही व त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो, असे वाटत असेल, तर तू ते बोलणार नाहीस, अंतःकरणातून वेदना सहन करण्याचे ठरवशील, कारण हे शब्द देवाची इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ आहेत. यावेळी, तुझ्या अंतःकरणात एक लढाई असेल, परंतु तू वेदना सहन करण्यास आणि तुला जे आवडते त्याचा त्याग करण्यास तयार होशील. देवाला संतुष्ट करण्यासाठी तू हे कष्ट सहन करण्यास तयार असशील व जरी तुला अंतःकरणातून वेदना सहन कराव्या लागल्या, तरी तू देहाच्या मौजमजेला प्रोत्साहन देणार नाहीस आणि देवाचे हृदय संतुष्ट करशील व त्यामुळे तुलासुद्धा अंतःकरणातून दिलासा मिळेल. हेच खरोखर किंमत मोजणे आहे आणि देवाला हवी असलेली किंमत हीच आहे. जर तू अशा प्रकारे आचरण केलेस, तर देव तुला नक्कीच आशीर्वाद देईल; जर तू हे साध्य करू शकत नसशील, तर तुला कितीही समजले किंवा तू कितीही चांगले बोलू शकलास, तरी सर्व काही निष्फळ ठरेल! जर देवावर प्रेम करण्याच्या मार्गावर, देव सैतानाशी युद्ध करताना तू देवाच्या बाजूने उभे राहण्यास समर्थ राहिलास व सैतानाकडे परत गेला नाहीस, तर तुला देवाचे प्रेम साध्य होईल आणि तू तुझ्या साक्षीत खंबीरपणे उभे राहशील.
देव लोकांमध्ये करत असलेल्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यात, बाहेरून ते लोकांमधील परस्परसंवाद असल्याचे दिसते, जणू काही ते मानवी व्यवस्थेतून किंवा मानवी हस्तक्षेपातून जन्माला आलेले आहे. पण पडद्यामागे, कार्याची प्रत्येक पायरी व जे काही घडते, ती सैतानाने देवासमोर ठेवलेली एक खेळी आहे आणि देवासमोर त्यांच्या साक्षीत लोकांनी ठामपणे उभे राहणे आवश्यक असते. ईयोबची परीक्षा घेतली गेली तेव्हा, उदाहरणार्थ: पडद्यामागे, सैतान देवाशी पैज लावत होता व ईयोबच्या बाबतीत जे घडले ते मनुष्याची कृत्ये आणि मनुष्याचा हस्तक्षेप होता. देव तुमच्यामध्ये करत असलेल्या प्रत्येक कार्याच्या मागे सैतानाची देवासोबतची खेळी आहे—या सर्वांच्या मागे एक लढाई आहे. उदाहरणार्थ, जर तू तुझ्या बंधुभगिनींबद्दल पूर्वग्रहदूषित असशील, तर तुझ्याकडे असे शब्द असतील जे तुला बोलायचे आहेत—जे शब्द देवाला आवडणार नाहीत असे तुला वाटते—परंतु जर ते बोलला नाहीस, तर तुला अंतःकरणात अस्वस्थता जाणवेल व या क्षणी, तुझ्यामध्ये एक लढाई सुरू होईल: “मी बोलू की नाही?” हीच ती लढाई आहे. अशा प्रकारे, तू सामना करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक लढाई असते आणि जेव्हा तुझ्यामध्ये लढाई असते, तेव्हा तुझ्या प्रत्यक्ष सहकार्यामुळे व वास्तविक दुःखामुळे देव तुझ्यामध्ये कार्य करतो. सरतेशेवटी, तू अंतःकरणातील गोष्टी बाजूला ठेवू शकतोस आणि राग आपोआपच नाहीसा होतो. हा देवाबरोबरच्या तुझ्या सहकार्याचा परिणाम आहे. लोक जे काही करतात त्यासाठी त्यांना त्यांच्या प्रयत्नांच्या रूपाने एक विशिष्ट किंमत मोजावी लागते. प्रत्यक्ष त्रासाशिवाय, ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत; ते देवाला संतुष्ट करण्याच्या जवळपासही जात नाहीत व ते फक्त जोरजोरात पोकळ घोषणा देत असतात! या पोकळ घोषणा देवाला संतुष्ट करू शकतात का? जेव्हा देव आणि सैतान आध्यात्मिक क्षेत्रात युद्ध करतात, तेव्हा तू देवाला कसे संतुष्ट करावेस व तू त्याच्यासाठी तुझी साक्ष कशी ठाम ठेवावीस? तुला हे माहीत असले पाहिजे, की तुझ्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही एक मोठी कसोटी आहे आणि ही अशी वेळ आहे जेव्हा देवाला तू साक्ष देण्याची गरज असते. ते बाहेरून महत्त्वाचे वाटत नसले तरी, जेव्हा या गोष्टी घडतात, तेव्हा त्या दर्शवतात, की तुझे देवावर प्रेम आहे की नाही. जर तुझे देवावर प्रेम असेल, तर तू त्याच्याविषयीच्या तुझ्या साक्षीत ठामपणे उभे राहण्यास सक्षम असशील व जर तू त्याच्यावरचे प्रेम आचरणात आणले नसेल, तर हे दाखवते, की तू सत्य आचरणात आणणारा व्यक्ती नाहीस, तू सत्याशिवाय आणि जीवनाशिवाय आहेस व तू फोल आहेस! लोकांसोबत जे काही घडते ते तेव्हाच घडते जेव्हा देवाला त्यांनी त्याच्यासाठीच्या साक्षीमध्ये ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता असते. या क्षणी तुझ्यासोबत काहीही मोठे घडत नसले तरी आणि तू मोठी साक्ष देत नसशीलत, तरी तुझ्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक तपशील हा देवाला साक्ष देणारा आहे. जर तू तुझ्या बंधुभगिनींकडून, तुझ्या कुटुंबातील सदस्यांकडून व सभोवतालच्या सर्वांकडून कौतुक जिंकू शकत असशील; जर, एके दिवशी, अश्रद्ध व्यक्तींनी येऊन तू जे काही करतोस त्याचे कौतुक केले व देव जे काही करतो ते सर्व आश्चर्यकारक आहे असे त्यांना वाटले, तर तू साक्ष दिलेली असशील. तुझ्याकडे अंतर्दृष्टी नसली आणि तुझी क्षमता कमी असली तरीही, देवाने तुझ्यामध्ये घडवलेल्या परिपूर्णतेमुळे, तू त्याला संतुष्ट करू शकतोस व त्याच्या इच्छेकडे लक्ष देऊ शकतोस, म्हणजे तू इतरांना दाखवून देऊ शकतोस, की त्याने सर्वात कमी क्षमता असलेल्या लोकांमध्ये कोणते महान कार्य केले आहे. जेव्हा लोकांना देवाविषयी ज्ञान मिळते आणि ते सैतानाचा प्रभाव बाजूला ठेवून देवासाठी साक्ष देतात, मोठ्या प्रमाणात देवाशी एकनिष्ठ होतात, तेव्हा लोकांच्या या गटापेक्षा अधिक ठाम कोणीही नसते व ही सर्वात मोठी साक्ष आहे. तू महान कार्य करण्यास सक्षम नसलास तरी देखील, तू देवाला संतुष्ट करण्यास सक्षम आहेस. इतर लोक त्यांच्या धारणा बाजूला ठेवू शकत नाहीत, परंतु तू हे करू शकतोस; इतर लोक त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांदरम्यान देवाची साक्ष देऊ शकत नाहीत, परंतु तू तुमची खरी पातळी आणि कृती हे देवाच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी व त्याच्यासाठी उत्कृष्ट साक्ष देण्यासाठी वापरू शकतोस. केवळ हेच देवावर प्रेम करणे आहे. जर तू हे करण्यास असमर्थ असशील, तर तू तुझ्या कुटुंबातील सदस्यांसमोर, तुझ्या बंधुभगिनींसमोर किंवा जगातील लोकांसमोर साक्ष देऊ शकत नाहीस. जर तू सैतानासमोर साक्ष देऊ शकत नसशील, तर सैतान तुझ्यावर हसेल, तो तुझी चेष्टा करेल, तो तुझ्याशी खेळणे असल्यासारखा वागेल, तो तुला अनेकदा मूर्ख बनवेल आणि तुला वेड्यासारखे वागायला लावेल. भविष्यात, तुला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो—पण आज, जर तू देवावर खऱ्या अंतःकरणाने प्रेम करत असशील व पुढे कितीही संकटे आली तरी, तुझ्यासोबत काहीही घडले तरी, तू तुझ्या साक्षीत खंबीरपणे उभे राहण्यास सक्षम असशील आणि देवाला संतुष्ट करू शकशील, तेव्हा तुझ्या अंतःकरणाला दिलासा मिळेल व भविष्यात कितीही संकटे आली तरी तुम्ही घाबरणार नाहीस. भविष्यात काय होईल ते तुम्ही पाहू शकत नाही; आजच्या परिस्थितीत तुम्ही लोक फक्त देवाला संतुष्ट करू शकता. तुम्ही कोणतेही महान कार्य करण्यास असमर्थ आहात आणि वास्तविक जीवनात देवाची वचने अनुभवून तुम्ही त्याला संतुष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व सैतानाला लज्जित करणारी मजबूत आणि निर्णायक साक्ष दिली पाहिजे. जरी तुझा देह संतुष्ट झाला नाही तरीही व दुःख सहन केले असेल तरीही, तू देवाला संतुष्ट केलेले असेल आणि सैतानाला लज्जित केलेले असेल. जर तू नेहमी अशा प्रकारे आचरण केलेस, तर देव तुझ्यासमोर एक मार्ग खुला करेल. जेव्हा, एक दिवस, मोठी कसोटी येईल, तेव्हा इतर लोक खाली पडतील, परंतु तरीही तू खंबीरपणे उभे राहण्यास सक्षम असशील: तू मोजलेल्या किंमतीमुळे, देव तुझे रक्षण करेल जेणेकरून, तू खंबीरपणे उभे राहू शकशील व खाली पडणार नाहीस. जर, सामान्यतः, तू सत्य आचरणात आणण्यास आणि देवावर खरोखर प्रेम करणार्या अंतःकरणाने त्याला संतुष्ट करण्यास सक्षम असशील, तर भविष्यातील कसोट्यांमध्ये देव नक्कीच तुझे रक्षण करेल. जरी तू मूर्ख असशील व तुझी पातळी आणि क्षमता कमी असली, तरी देव तुझ्यासोबत भेदभाव करणार नाही. तुझा हेतू योग्य आहे की नाही यावर ते अवलंबून आहे. आज, तू देवाला संतुष्ट करण्यास सक्षम आहेस, लहान सहान गोष्टींकडे लक्ष देतोस, सर्व गोष्टींमध्ये देवाला संतुष्ट करतोस, तुझ्याकडे असे अंतःकरण आहे जे देवावर मनापासून प्रेम करते, तू तुझे खरे अंतःकरण देवाला अर्पण करतोस व तुला न समजणाऱ्या काही गोष्टी असल्या तरी देखील, तू तुझे हेतू सुधारण्यासाठी देवासमोर येऊ शकतोस आणि देवाची इच्छा शोधू शकतोस व तू देवाला संतुष्ट करण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करू शकतोस. कदाचित तुझे बंधुभगिनी तुझा त्याग करतील, परंतु तुझे अंतःकरण देवाला संतुष्ट करेल आणि तू देहसुखाचा लोभ धरणार नाहीस. तू नेहमी अशाप्रकारे आचरण केल्यास, मोठी संकटे येतील तेव्हा तुझे रक्षण केले जाईल.
लोकांच्या कसोट्या त्यांच्या कोणत्या अंतर्गत स्थितीला लक्ष्य करतात? त्या लोकांच्या बंडखोर प्रवृत्तीला लक्ष्य करतात ज्या प्रवृत्ती देवाला संतुष्ट करण्यास असमर्थ आहेत. लोकांमध्ये बरेच काही अशुद्ध आहे व बरेच काही ढोंगी आहे आणि म्हणूनच देव लोकांना शुद्ध करण्यासाठी त्यांना कसोट्यांना सामोरे जाण्यास लावतो. परंतु, आज जर तू देवाला संतुष्ट करू शकत असशील, तर भविष्यातील कसोट्या तुझ्यासाठी परिपूर्णतेसाठी असेल. जर, आज, तू देवाला संतुष्ट करू शकत नसशील, तर भविष्यातील कसोट्या तुला मोहात पाडतील व तू नकळत खाली पडशील आणि त्या वेळी तू स्वतःला मदत करू शकणार नाहीस, कारण तू देवाचे कार्य चालू ठेवू शकत नाहीस व तुझ्यामध्ये वास्तविक पातळी नाही. आणि म्हणूनच, जर तुला भविष्यात खंबीरपणे उभे राहायचे असेल, देवाला अधिक चांगल्या प्रकारे संतुष्ट करायचे असेल व शेवटपर्यंत त्याचे अनुसरण करायचे असेल, तर आज तू मजबूत पाया तयार केला पाहिजेस. तू सर्व गोष्टींमध्ये सत्य आचरणात आणून देवाला संतुष्ट केले पाहिजेस आणि त्याच्या इच्छेकडे लक्ष दिले पाहिजेस. जर तू नेहमी अशा प्रकारे आचरण करत असशील, तर तुझ्यामध्ये एक पाया असेल व त्याच्यावर प्रेम करणारे अंतःकरण देव तुझ्यामध्ये तयार करेल आणि तो तुला एकश्रद्धा प्रदान करेल. एके दिवशी, जेव्हा खरोखरच कसोटी तुझ्यावर येऊन आदळेल, तेव्हा तुला कदाचित काही वेदना सहन कराव्या लागतील व एका विशिष्ट टप्प्यापर्यंत अत्यंत पीडा सहन करावी लागेल आणि मरणासारखे चिरडणारे दुःख सहन करावे लागेल—परंतु तुझे देवावरील प्रेम बदलणार नाही व ते आणखी सखोल होईल. हे असेच देवाचे आशीर्वाद असतात. जर तू देव जे काही सांगतो व करतो, ते आज्ञाधारक अंतःकरणाने स्वीकारण्यास सक्षम असशील, तर तुला नक्कीच देवाचा आशीर्वाद मिळेल व म्हणून तू देवाचा आशीर्वाद असलेला आणि त्याचे वचन प्राप्त करणारा व्यक्ती होशील. जर, आज तू आचरण केले नाहीस, तर एके दिवशी जेव्हा तुला कसोटी द्यावी लागेल, तेव्हा तू विश्वास नसलेला किंवा प्रेमळ अंतःकरणाशिवाय असशील व त्यावेळी कसोटी हा मोह बनेल; तू सैतानाच्या मोहात बुडून जाशील आणि सुटकेचा कोणताही मार्ग नसेल. आज, जेव्हा तुला एखादी छोटीशी कसोटी पार पाडावी लागते, तेव्हा तू खंबीरपणे उभे राहण्यास सक्षम असशील, परंतु एके दिवशी तुला मोठी कसोटी पार पाडावी लागेल, तेव्हा तू खंबीरपणे उभे राहू शकशीलच असे नाही. काही लोक गर्विष्ठ असतात व त्यांना वाटते, की ते आधीच परिपूर्ण आहेत. अशा वेळी जर तू खोलवर गेला नाहीस, आणि आत्मसंतुष्ट राहिलास, तर तू धोक्यात येथील. आज, देव मोठ्या कसोट्यांचे काम करत नाही व सर्व काही ठीक दिसते, परंतु जेव्हा देव तुझी कसोटी घेतो, तेव्हा तुला आढळेल की तू खूपच कमी पडत आहेस, कारण तुझी पातळी खूपच कमी आहे आणि तू मोठ्या कसोट्यांना तोंड देण्यास असमर्थ आहेस. जर तू जसा आहेस तसा राहिलास आणि सुस्त अवस्थेत राहिलास, तर जेव्हा संकटे येतील, तेव्हा तू खाली पडशील. तुझी पातळी किती कमी आहे हे तू वारंवार पाहिले पाहिजेस; फक्त अशा प्रकारेच तुझी प्रगती होईल. जर फक्त कसोट्यांच्या वेळीच तुला उमगले की तुझी पातळी इतकी कमी आहे, तुझी इच्छाशक्ती इतकी कमकुवत आहे, तुझ्यामध्ये सत्य खूप कमी आहे व तू देवाच्या इच्छेसाठी अपुरा आहेस, जर तुला या गोष्टी फक्त तेव्हाच लक्षात आल्या, तर खूपच उशीर झालेला असेल.
जर तुला देवाची प्रवृत्ती माहीत नसेल, तर तू कसोटीच्या वेळी अपरिहार्यपणे पडशील, कारण देव लोकांना कसे परिपूर्ण बनवतो, तो कोणत्या साधनाने त्यांना परिपूर्ण बनवतो हे तुला माहीत नसते आणि जेव्हा देव तुझी कसोटी घेतो व ती तुझ्या धारणांशी जुळत नाही, तेव्हा तू खंबीरपणे उभे राहू शकणार नाहीस. देवाचे खरे प्रेम ही त्याची संपूर्ण प्रवृत्ती आहे आणि जेव्हा देवाची संपूर्ण प्रवृत्ती लोकांना दाखवली जाते, तेव्हा यामुळे तुझ्या देहाला काय प्राप्त होते? जेव्हा देवाची नीतीमान प्रवृत्ती लोकांना दाखवली जाते, तेव्हा त्यांच्या देहाला अपरिहार्यपणे खूप वेदना होतात. जर तुला हे दुःख झाले नाही, तर देव तुला परिपूर्ण बनवू शकत नाही किंवा तू देवाला खरे प्रेम समर्पित करू शकणार नाहीस. जर देव तुला परिपूर्ण बनवत असेल, तर तो नक्कीच त्याची संपूर्ण प्रवृत्ती तुला दाखवेल. सृष्टीच्या निर्मितीच्या काळापासून आजपर्यंत, देवाने त्याची संपूर्ण प्रवृत्ती मनुष्याला कधीच दाखवली नाही—पण शेवटच्या दिवसांत तो ती या लोकांच्या गटासमोर प्रकट करतो, ज्यांना त्याने पूर्वनिश्चित केले आहे आणि त्यांना निवडले आहे व लोकांना परिपूर्ण बनवून, तो त्याची प्रवृत्ती उघड करतो, ज्याद्वारे तो लोकांचा एक गट परिपूर्ण करतो. हेच देवाचे लोकांवरील खरे प्रेम आहे. देवाचे खरे प्रेम अनुभवण्यासाठी लोकांना अत्यंत वेदना सहन कराव्या लागतात आणि मोठी किंमत मोजावी लागते. यानंतरच देव त्यांना प्राप्त करेल व मग ते त्यांचे खरे प्रेम देवाला परत देऊ शकतील आणि तेव्हाच देवाचे हृदय संतुष्ट होईल. जर लोकांना देवाकडून परिपूर्ण व्हायचे असेल व त्याच्या इच्छेनुसार वागायचे असेल आणि त्यांचे खरे प्रेम देवाला पूर्णपणे द्यायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या परिस्थितीतून खूप दुःख व अनेक यातना अनुभवल्याच पाहिजेत, मृत्यूपेक्षाही वाईट वेदना त्यांना सहन कराव्या लागतील. सरतेशेवटी त्यांना त्यांचे खरे अंतःकरण देवाला परत देण्यास भाग पाडले जाईल. एखादी व्यक्ती देवावर खरोखर प्रेम करते की नाही, हे कष्ट आणि परिष्करण यादरम्यान प्रकट होते. देव लोकांचे प्रेम शुद्ध करतो व हे केवळ कष्ट आणि परिष्करण यादरम्यानच साध्य होते.