तुझ्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी पुरेशी सत्कृत्ये कर
मी तुमच्यात बरेच कार्य केले आहे आणि अर्थातच, अनेक प्रवचनेही दिली आहेत. तरीही, शेवटच्या दिवसांमध्ये माझ्या कार्याचा उद्देश माझ्या शब्दांतून आणि माझ्या कार्यातून पूर्णपणे साध्य झालेला नाही, असे मला वाटल्यावाचून राहात नाही. कारण या शेवटच्या दिवसांमध्ये, माझे कार्य हे कुणा विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा विशिष्ट लोकांसाठी नाही, तर ते माझी अंगभूत प्रकृती प्रकट करण्यासाठी आहे. तरीही अनेक कारणांमुळे—मग ते कदाचित वेळेची कमतरता असेल किंवा धावपळीचा दिनक्रम असेल—माझ्या प्रवृत्तीद्वारे लोकांनी माझे कोणतेही ज्ञान प्राप्त केलेले नाही. अशा प्रकारे मी माझी नवी योजना, माझे अंतिम कार्य सुरू करतो आहे आणि माझ्या कार्याचे एक नवीन पर्व सुरू करतो आहे जेणेकरून, मला पाहणारे सर्वजण माझ्या अस्तित्वामुळे छाती पिटून अखंड अश्रू ढाळतील आणि आक्रोश करतील. याचे कारण, मी जगामध्ये मानवजातीचा अंत समोर आणला आहे आणि या क्षणापासून, माझी संपूर्ण प्रवृत्ती मानवजातीसमोर आहे जेणेकरून मला ओळखणारे आणि मला न ओळखणारेही सर्वजण, मी खरोखरच मानवी जगात, जिथे सर्व गोष्टी वृद्धिंगत होतात त्या पृथ्वीवर आलो आहे हे पाहू शकतील आणि त्यांचे डोळे तृप्त होतील. ही माझी योजना आहे, आणि मी मानवजातीची निर्मिती केल्यापासूनचा माझा एकमेव “जाहीरनामा” आहे. तुम्ही माझ्या प्रत्येक कृतीकडे संपूर्ण लक्ष द्यावे, कारण माझा न्यायदंड पुन्हा एकदा मानवजातीच्या, मला विरोध करणाऱ्या सर्वांच्या निकट आला आहे.
मला जे कार्य करणे आवश्यक आहे, ते मी स्वर्गासह सुरू करत आहे. आणि अशा प्रकारे मी जनांच्या प्रवाहातून वाट काढत व माझ्या हालचाली आणि माझी वाणी कोणाच्या लक्षातही येऊ न देता, स्वर्ग आणि पृथ्वीदरम्यान भ्रमण करत आहे. म्हणून, माझी योजना निर्वेधपणे सुरू राहते. परंतु तुमची सगळी इंद्रिये इतकी बधिर झालेली आहेत, की माझ्या कार्याच्या टप्प्यांविषयी तुम्ही सगळे अनभिज्ञ आहात. पण एक दिवस नक्की असा येईल, जेव्हा तुम्हाला माझ्या हेतूंचे आकलन होईल. आज, मी तुमच्याबरोबर राहत आहे, तुमच्याबरोबर दुःख भोगत आहे आणि मानवजातीचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन मला फार पूर्वीपासूनच समजलेला आहे. मला याविषयी अधिक काही बोलायचे नाही आणि या त्रासदायक विषयाची आणखी उदाहरणे देऊन मला तुम्हाला आणखी बेअब्रूदेखील करायचे नाही. मला एवढीच आशा आहे, की तुम्ही जे केले आहे ते सर्व तुम्हाला तुमच्या अंतःकरणात आठवत असेल जेणेकरून, आपण ज्या दिवशी पुन्हा भेटू त्या दिवशी आपण आपल्या हिशोबांचा पडताळा घेऊ शकू. तुमच्यापैकी कुणावरही खोटे आरोप करायची माझी इच्छा नाही, कारण मी कायमच न्यायाने, प्रामाणिकपणाने आणि सन्मानाने वागलो आहे. अर्थात, मला हीदेखील आशा आहे, की तुम्ही प्रामाणिक असाल आणि स्वर्ग व पृथ्वीच्या तसेच तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या विरुद्ध जाईल असे काहीही तुम्ही करणार नाही. तुमच्याकडून मला एवढ्याच गोष्टीची अपेक्षा आहे. अनेक लोकांना अगदी सहज अस्वस्थ आणि आजारी वाटते, कारण त्यांनी अक्षम्य अपराध केलेले असतात व अनेकांना स्वतःची लाज वाटत असते, कारण त्यांनी कधीही एखादेसुद्धा सत्कृत्य केलेले नसते. मात्र आपल्या पापांची जराही खंत न वाटणारेही अनेकजण असतात, त्यांची अधिकाधिक अधोगती होते, त्यांच्या निंदनीय गुणांना झाकणारा मुखवटा गळून पडतो—अजून तो पूर्णपणे उघडा पडलेला नसतो—आणि ते माझ्या प्रवृत्तीची परीक्षा पाहतात. मी कुणा एका व्यक्तीच्या कृतींचा विचार करत नाही किंवा त्याकडेच लक्ष देत नाही. किंबहुना, मी मला जे करणे आवश्यक आहे असे कार्य करतो, मग ते माहिती गोळा करणे असो, प्रदेशातून भ्रमंती करणे असो किंवा मला हिताचे असलेले काही कार्य करणे असो. महत्त्वाच्या प्रसंगी, मी मुळात योजना केल्याप्रमाणे, क्षणाचाही विलंब किंवा क्षणाचीही घाई न करता आणि सहजपणे माझे कार्य मानवांमध्ये करत राहतो. मात्र, माझ्या कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीजणांना बाजूला केले जाते, कारण त्यांचा खुशमस्करेपणा आणि त्यांची नाटकी शरणागती यांचा मला तिरस्कार आहे. जे माझा द्वेष करतात त्यांचा मी निश्चितच त्याग करतो, मग ते जाणूनबुजून केलेले असो वा अजाणतेपणे केलेले असो. थोडक्यात, मला ज्यांच्याविषयी तिरस्कार आहे त्या सर्वांनी माझ्यापासून दूर राहावे अशी माझी इच्छा असते. साहजिकच, माझ्या घरी राहणाऱ्या दुष्टांना मी सोडणार नाही हे वेगळे सांगायला नको. मानवाच्या शिक्षेचा दिवस समीप आलेला आहे, त्यामुळे त्या सर्व तिरस्करणीय जीवांना माझ्या घरातून बाहेर काढण्याची मला घाई नाही, कारण माझी स्वतःची एक योजना आहे.
आता वेळ आली आहे, की मी प्रत्येक व्यक्तीचा शेवट निर्धारित करावा. ज्या टप्प्यावर मी मानवाचे कार्य सुरू केले तो टप्पा नव्हे. माझ्या नोंदवहीमध्ये मी प्रत्येक व्यक्तीचे शब्द आणि कृत्ये एकेक करून लिहून घेतो, ज्या मार्गाने त्यांनी मला अनुसरले आहे ते लिहून घेतो, त्यांची अंगभूत वैशिष्ट्ये आणि ते स्वतःहून कसे परिपूर्ण झाले आहेत हे लिहून घेतो. अशा प्रकारे, ती व्यक्ती कशीही असली, तरीही कोणीही माझ्या हातून सुटणार नाही आणि मी नेमून दिल्याप्रमाणे सर्वजण आपल्यासारख्याच लोकांसोबत असतील. मी प्रत्येक व्यक्तीचे गंतव्यस्थान त्याचे वय, ज्येष्ठता, त्रासाचे प्रमाण यांवरून ठरवत नाही, त्यांना मिळणाऱ्या सहानुभूतीवरून तर अजिबात ठरवत नाही, तर त्यांच्याकडे सत्य आहे का, यावरून ठरवतो. याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही. जे देवाच्या इच्छेचे पालन करत नाहीत, अशा सर्वांनाच शिक्षा मिळते हे तुम्ही सर्वांनी समजून घेतले पाहिजे. यात कधीच बदल होणार नाही. त्यामुळे, ज्यांना शिक्षा होते, त्यांना अशा प्रकारे देवाच्या न्यायीपणामुळे किंवा त्यांच्या अनेक दुष्कृत्यांचे प्रायश्चित्त म्हणून शिक्षा मिळते. माझी योजना सुरू झाल्यापासून आजवर मी त्यात एकही बदल केलेला नाही. माझे म्हणणे एवढेच आहे, की मानवाचा विचार करता, ज्यांना मी खरोखर मान्यता दिली आहे त्यांच्याप्रमाणेच ज्यांना उद्देशून मी बोलतो असे लोकदेखील संख्येने कमी होताना दिसतात. मात्र, माझी योजना कधीही बदललेली नाही, हे मी आवर्जून सांगतो. याउलट मानवाची श्रद्धा आणि प्रेमच सतत बदलते असते, कमी होत असते, इतके की प्रत्येक माणूस माझा तिरस्कार करण्यापासून, ते माझ्याविषयी भावनाशून्य होण्यापर्यंत आणि मला दूर कऱण्यापर्यंतही ते बदलते. जोपर्यंत मला घृणा आणि तिरस्कार वाटत नाही व अखेर मी शिक्षा देत नाही तोपर्यंत, माझा तुमच्याविषयीचा दृष्टिकोन ना आपुलकीचा असेल ना दुराव्याचा असेल. मात्र, तुमच्या शिक्षेच्या दिवशीदेखील मी तुम्हाला पाहीन, पण तुम्ही मला पाहू शकणार नाही. तुमचे आयुष्य माझ्या दृष्टीने आधीच धकाधकीचे आणि रटाळ झाले आहे. त्यामुळे साहजिकच, मी राहण्यासाठी वेगळा परिसर निवडला आहे, तिथे तुमच्या दुष्ट शब्दांनी होणारी वेदना टाळणे आणि तुमच्या असह्य अपराधपूर्ण वर्तनाला आळा घालणे शक्य होईल आणि तुम्ही मला मूर्ख बनवू शकणार नाही किंवा मला क्षुल्लक समजू शकणार नाही. मी तुम्हाला सोडून जाण्यापूर्वी, जे सत्याच्या समर्थनात नाही, ते करण्यापासून मी तुम्हाला रोखले पाहिजे. किंबहुना, जे सर्वांना प्रिय आहे, ज्यामध्ये सर्वांचे हित आहे आणि जे तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत घेऊन जाण्यास अनुकूल आहे, तेच तुम्ही केले पाहिजे, अन्यथा इतर कोणालाही नाही तर तुम्हालाच घोर संकटाला सामोरे जावे लागेल.
जे स्वतःला विसरून माझ्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर मी क्षमेचा वर्षाव करतो. दरम्यान, दुष्टांना मिळणारी शिक्षा हे माझ्या न्यायी प्रवृत्तीचे निदर्शक आहे आणि त्याहीपेक्षा माझ्या क्रोधाची साक्ष आहे. जेव्हा संकट येते, तेव्हा मला विरोध करणारे सर्वजण अश्रू ढाळतात, कारण ते दुष्काळ आणि रोगराईला बळी पडतात. ज्यांनी सर्व प्रकारची दुष्कृत्ये केली आहेत, मात्र अनेक वर्षे माझ्या मार्गाचे अनुसरण केले आहे, त्यांनाही त्यांच्या पापाची भरपाई करावीच लागेल; त्यांनाही लक्षावधी वर्षांत कुणी अनुभवले नसेल अशा संकटाचा सामना करावा लागेल आणि ते नेहमीच भीतीच्या सावटाखाली राहतील. आणि जे माझ्या प्रति एकनिष्ठ राहिले आहेत, असे माझे अनुयायी आनंदी होतील आणि माझ्या सामर्थ्याचे गुणगान करतील. त्यांना अतुलनीय समाधानाचा अनुभव येईल आणि आजपर्यंत मी मानवजातीला प्रदान केलेला नाही असा आनंद ते उपभोगतील. कारण मला मानवाची सत्कृत्ये प्रिय आहेत आणि त्याच्या दुष्कृत्यांचा मला तिरस्कार आहे. मी मानवजातीचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली तेव्हापासून मी अशा लोकांचा समूह प्राप्त करण्यास उत्सुक आहे जे माझे समविचारी असतील. तसेच, जे माझे समविचारी नाहीत, त्यांना मी कधीही विसरत नाही; मी मनापासून त्यांचा तिरस्कार करतो, त्यांना योग्य शिक्षा देण्याच्या संधीची मी वाट पाहतो आणि ते पाहण्यात मला आनंद मिळतो. अखेर तो दिवस आता उगवला आहे आणि मला आणखी वाट पाहायला लागणार नाही!
माझे अंतिम कार्य हे फक्त मानवाला शिक्षा देण्यासाठी नाही, तर मानवाचे गंतव्यस्थान निश्चित करणे हेदेखील आहे. तसेच, याचा उद्देश सर्व लोकांनी माझ्या सत्कृत्यांची आणि कृतींची दखल घ्यावी हादेखील आहे. मी जे केले आहे ते योग्य आहे आणि मी जे केले आहे ते माझ्या प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे, हे प्रत्येक व्यक्तीने पाहावे अशी माझी इच्छा आहे. मानवजातीचा उदय मानवाच्या कृतीतून किंवा निसर्गातून झालेला नाही, तर सृष्टीतील प्रत्येक सजीवाचे पोषण करणारा मीच आहे. माझ्या अस्तित्वाशिवाय, मानवजात केवळ नष्ट होईल, तिच्यावर आपत्तींचा डोंगर कोसळेल. कोणताही मानव कधी सुंदर सूर्य आणि चंद्र किंवा हिरवीगार सृष्टी पाहू शकणार नाही; मानवाला फक्त थंड रात्रीचा आणि मृत्यूच्या सावटाच्या अथांग खाईचा अनुभव येईल. माझ्याकडेच मानवाचे एकमेव पापविमोचन होईल. मीच मानवाची एकमेव आशा आणि त्याहीपेक्षा, संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाचा आधार आहे. जरी कोणी माझ्याकडे लक्ष देत नसले, तरीही माझ्याशिवाय मानवजात एका जागी खोळंबून राहील. मी नसलो तर मानवजातीला संकटे झेलावी लागतील आणि सर्व प्रकारच्या भुतांच्या पायदळी पिचून जावे लागेल. मी असे कार्य केले आहे जे इतर कोणीही करू शकणार नाही आणि माझ्या कार्याची परतफेड म्हणून मानव थोडीफार सत्कृत्ये करेल, इतकीच मला आशा आहे. काहीजण जरी माझ्या कार्याची परतफेड करू शकले, तरी इतक्या वर्षांत माझे मानवांमध्ये येणेजाणे फलद्रूप झाले याचा फार आनंद वाटून मी मानवी जगातील माझा प्रवास संपवून माझ्या कार्याचा पुढचा टप्पा उलगडेन. माझ्या दृष्टीने, लोकांची संख्या किती आहे याला महत्त्व नाही. त्यांची सत्कृत्ये माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. काहीही असले तरी, तुमच्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी तुम्ही पुरेशी सत्कृत्ये कराल अशी मला आशा आहे. मग मला समाधान वाटेल; अन्यथा तुमच्यातील कोणीही तुमच्यावर येणाऱ्या आपत्तीपासून वाचू शकणार नाही. ही आपत्ती माझ्यापासूनच निर्माण होते आणि अर्थात ती मीच घडवून आणलेली असते. मला जर तुमचा चांगुलपणा दिसला नाही, तर तुमची या आपत्तीतून सुटका होणार नाही. संकटाच्या काळात, तुमच्या कृती पूर्णपणे योग्य समजल्या गेल्या नाहीत कारण तुमची श्रद्धा आणि प्रेम पोकळ होते आणि तुम्ही एकतर घाबरट किंवा खंबीर ठरलात. याविषयी, मी फक्त चांगल्या किंवा वाईटाचा निवाडा करेन. ज्या प्रकारे तुमच्यातील प्रत्येकजण कृती करतो किंवा स्वतःला व्यक्त करतो, ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, त्याच्याच आधारे मी तुमचा अंत निश्चित करेन. मात्र, मी एक स्पष्ट केले पाहिजे: संकटाच्या काळात ज्यांनी माझ्या प्रति थोडीही एकनिष्ठा दाखवली नाही, त्यांच्याविषयी यापुढे मी क्षमाशील असणार नाही, कारण माझी क्षमा इथपर्यंतच असते. ज्याने एकदा माझ्याशी द्रोह केला आहे, तो मला प्रिय राहात नाही. तसेच आपल्या मित्रांशी द्रोह करणाऱ्यांच्यासोबत राहणेही मला आवडत नाहीत. ही माझी प्रवृत्ती आहे, मग ती व्यक्ती कोणीही असो. मी तुम्हाला हे सांगितले पाहिजे: जो माझ्या हृदयाला दुःख पोहोचवेल, त्याला माझ्याकडून पुन्हा क्षमा मिळणार नाही आणि जे माझ्याशी कायम एकनिष्ठ राहिले असतील, ते कायम माझ्या हृदयात राहतील.