देहधारणेचे रहस्य (४)

तुम्हाला बायबल आणि त्याच्या निर्मितीमागील कथा माहीत असली पाहिजे. ज्यांनी देवाचे नवीन कार्य स्वीकारले नाही त्यांच्यासाठी हे ज्ञान नाही. त्यांना माहीत नाही. जर तू त्यांच्याशी या मूलतत्त्वाच्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोललास, तर ते यापुढे तुझ्यासोबत बायबलबद्दल हेकेखोरपणे वागणार नाहीत. जी भविष्यवाणी केली गेली आहे, तिची ते सतत तपासणी करत असतात: हे विधान पूर्ण झाले आहे का? ते विधान प्रत्यक्षात आले आहे का? त्यांचा सुवार्तेचा स्वीकार बायबलच्या अनुषंगाने आहे व ते बायबलनुसार सुवार्तेचे प्रवचन देतात. त्यांचा देवावरील विश्वास बायबलच्या वचनांवर आधारित आहे; बायबलशिवाय ते देवावर विश्वास ठेवणार नाहीत. ते या पद्धतीने बायबलची क्षुद्रपणे तपासणी करत जगतात. जेव्हा ते पुन्हा एकदा बायबलमध्ये डोके घालतात आणि तुला स्पष्टीकरण विचारतात, तेव्हा तू म्हणतोस, “सर्वप्रथम, तुम्ही प्रत्येक विधानाची पडताळणी करू नये. त्याऐवजी, पवित्र आत्मा कसे कार्य करतो ते पाहू या. हा मार्ग खरोखर पवित्र आत्म्याचे कार्य आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण ज्या मार्गाने चालत आहोत त्याची सत्याशी तुलना करू या व असा मार्ग योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण पवित्र आत्म्याच्या कार्याचा वापर करू या. हे विधान किंवा ते विधान भाकीत केल्याप्रमाणे झाले आहे की नाही, यात आपण मनुष्यांनी नाक खुपसू नये. त्याऐवजी आपण पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी आणि देव करत असलेल्या नवीनतम कार्याविषयी बोलणे चांगले आहे.” बायबलमधील भविष्यवाण्या म्हणजे त्या वेळी संदेष्ट्यांनी प्रसारित केलेली देवाची वचने व देवाने वापरलेल्या मनुष्यांनी ईश्वरी प्रेरणा मिळवून लिहिलेली वचने आहेत; फक्त स्वतः देव त्या वचनांचे स्पष्टीकरण देऊ शकतो, फक्त पवित्र आत्माच त्या वचनांचा अर्थ सांगू शकतो आणि फक्त स्वतः देवच सात शिक्के फोडून ग्रंथ उघडू शकतो. तुम्ही म्हणता: “तू देव नाहीस व मीही नाही, मग देवाच्या वचनांचे स्पष्टीकरण देण्याचे धाडस सहजासहजी कोण करतो? ती वचने समजावून सांगण्याचे धाडस तुझ्यात आहे का? जरी यिर्मया, योहान आणि एलीया हे संदेष्टे येणार असले, तरी ती वचने समजावून सांगण्याचे धाडस करणार नाहीत, कारण ते कोकरू नाहीत. फक्त कोकरू सात शिक्के फोडू शकतो व ग्रंथ उघडू शकतो आणि इतर कोणीही त्याची वचने स्पष्ट करू शकत नाही. मी देवाचे नाव घेण्याचे धाडस करत नाही, देवाची वचने समजावून सांगण्याचा प्रयत्न तर दूरच. मी फक्त देवाची आज्ञा पाळणारा असू शकतो. तू देव आहेस का? देवाने निर्मिलेल्या कोणत्याही प्राण्यांमध्ये ग्रंथ उघडण्याचे किंवा ती वचने समजावून सांगण्याचे धाडस नाही व म्हणून मी त्यांना समजावून सांगण्याचे धाडसही करत नाही. तू त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न न केलेला बरा. त्यांना कोणीही समजावण्याचा प्रयत्न करू नये. आपण पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल बोलू या; मनुष्य इतके करू शकतो. मला यहोवा आणि येशूच्या कार्याबद्दल थोडेसे माहीत आहे, परंतु मला अशा कार्याचा कोणताही वैयक्तिक अनुभव नसल्यामुळे, मी त्याबद्दल फक्त थोड्या प्रमाणात बोलू शकतो. यशया किंवा येशूने त्यांच्या काळात बोललेल्या वचनांच्या अर्थाबद्दल, मी कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी बायबलचा अभ्यास करत नाही, उलट मी देवाच्या सध्याच्या कार्याचे अनुसरण करतो. तू खरे तर बायबलला छोटा ग्रंथ मानतोस, पण तो फक्त कोकरू उघडू शकेल असे नाही का? कोकराशिवाय, तो आणखी कोण उघडू शकेल? तू कोकरू नाहीस व मी स्वतः देव असल्याचा दावा करण्याचे धाडस करणे तर दूरच, म्हणून आपण बायबलचे विश्लेषण करू नये किंवा त्याची क्षुद्रपणे तपासणी करू नये. पवित्र आत्म्याने केलेल्या कार्याबद्दल, म्हणजेच, स्वतः देवाने केलेल्या सध्याच्या कार्याबद्दल चर्चा करणे अधिक चांगले आहे. देव कोणत्या तत्त्वांद्वारे कार्य करतो आणि त्याच्या कार्याचे मूलतत्त्व काय आहे ते आपण पाहू या, आज आपण ज्या मार्गावर चालत आहोत तो योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांचा वापर करून व अशा प्रकारे त्याची खात्री करून घेऊ या.” जर तुम्हाला विशेषतः धार्मिक जगतातील लोकांना सुवार्ता सांगायची असेल, तर तुम्हाला बायबल समजले पाहिजे आणि तुम्ही बायबलच्या अंतर्गत कथेवर प्रभुत्व प्राप्त केले पाहिजे; अन्यथा, तू सुवार्ता कधीच सांगू शकत नाहीस. जर तू व्यापक विषयावर प्रभुत्व मिळवलेस व बायबलमधील मृत वचनांची क्षुद्रपणे पद्धतीने तपासणी करणे थांबवलेस, परंतु केवळ देवाच्या कार्याबद्दल आणि जीवनाच्या सत्याबद्दल बोललास, तर मग तू खऱ्या अंतःकरणाने सत्याचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांना प्राप्त करू शकतोस.

यहोवाचे कार्य, त्याने स्थापित केलेली नियमशास्त्रे आणि त्याने लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता वापरलेली तत्त्वे, नियमशास्त्राच्या युगात त्याने केलेल्या कार्याचा आशय, त्याने त्याची नियमशास्त्रे स्थापित केल्याचे महत्त्व, कृपेच्या युगासाठी त्याच्या कार्याचे महत्त्व व या अंतिम टप्प्यात देव काय कार्य करतो: तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत. पहिला टप्पा नियमशास्त्राच्या युगाचे कार्य आहे, दुसरा कृपेच्या युगाचे कार्य आहे आणि तिसरा शेवटच्या दिवसांचे कार्य आहे. देवाच्या कार्याच्या या टप्प्यांबद्दल तुमच्या मनात स्पष्टता असली पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण तीन टप्पे आहेत. कार्याच्या प्रत्येक टप्प्याचे मूलतत्त्व काय आहे? सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेच्या कार्यात किती टप्पे पार पाडले जातात? हे टप्पे कसे पार पाडले जातात व प्रत्येक टप्पा विशिष्ट पद्धतीने का पार पाडला जातो? हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रत्येक युगातील कार्याचे प्रातिनिधिक मूल्य असते. यहोवाने कोणते कार्य पार पाडले? त्याने ते विशिष्ट प्रकारे का केले? त्याला यहोवा का म्हटले गेले? पुन्हा, कृपेच्या युगात येशूने कोणते कार्य केले आणि त्याने ते कोणत्या पद्धतीने केले? कार्याच्या प्रत्येक टप्प्याद्वारे व प्रत्येक युगाद्वारे देवाच्या प्रवृत्तीचे कोणते पैलू दर्शवले जातात? नियमशास्त्राच्या युगात त्याच्या प्रवृत्तीचे कोणते पैलू व्यक्त केले गेले? आणि कृपेच्या युगात कोणते व्यक्त केले गेले? आणि शेवटच्या युगात? हे असे अत्यावश्यक प्रश्न आहेत ज्याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता असली पाहिजे. सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेत देवाची संपूर्ण प्रवृत्ती प्रकट झाली आहे. ही कृपेच्या युगात तसेच नियमशास्त्राच्या युगात, इतकेच नाही तर शेवटच्या दिवसांच्या काळातदेखील प्रकट होते. शेवटच्या दिवसांत केलेले कार्य न्याय, क्रोध व ताडण यांचे प्रतिनिधित्व करते. शेवटच्या दिवसांत केलेले कार्य नियमशास्त्राच्या युगात केलेल्या किंवा कृपेच्या युगात केलेल्या कार्याची जागा घेऊ शकत नाही. तथापि, तीन टप्पे, एकमेकांशी जोडून एक अस्तित्व बनवतात आणि हे सर्व एकाच देवाचे कार्य आहे. साहजिकच, या कार्याची अंमलबजावणी वेगवेगळ्या युगात विभागली गेली आहे. शेवटच्या दिवसांत केलेले कार्य सर्व काही समाप्त करते; नियमशास्त्राच्या युगात जे कार्य केले गेले ते सुरुवात करण्याचे कार्य होते; आणि कृपेच्या युगात जे कार्य केले गेले ते सुटकेचे कार्य होते. या संपूर्ण सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेतील कार्याच्या दृष्टांतांबद्दल, कोणीही अंतर्दृष्टी किंवा समज प्राप्त करू शकत नाही व हे दृष्टांत कोडेच राहतात. शेवटच्या दिवसांत, राज्याचे युग सुरू करण्यासाठी केवळ वचनाचे कार्य पार पाडले जाते, परंतु ते सर्व युगांचे प्रतिनिधी नाही. शेवटचे दिवस हे शेवटच्या दिवसांपेक्षा जास्त काहीही नाहीत आणि राज्याच्या युगापेक्षा जास्त नाहीत व ते कृपेचे युग किंवा नियमशास्त्राचे युग यांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. फक्त एवढेच आहे, की शेवटच्या दिवसांत सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेतील सर्व कार्ये तुमच्यासमोर प्रकट होतात. हे रहस्य उलगडणे आहे. या प्रकारचे रहस्य कोणीही मनुष्य उघड करू शकत नाही. मनुष्याला बायबलची कितीही समज असली तरी ती वचनांशिवाय शून्य आहे, कारण मनुष्याला बायबलचे मूलतत्त्व समजत नाही. बायबल वाचताना, मनुष्याला काही सत्ये समजू शकतात, मनुष्य काही वचने समजावून सांगू शकतो किंवा काही प्रसिद्ध परिच्छेद आणि अध्यायांची क्षुद्रपणे तपासणी करू शकतो, परंतु त्या वचनांमधील अर्थ त्याला कधीच समजू शकणार नाही, कारण मनुष्य फक्त मृत वचने पाहतो, यहोवा व येशूच्या कार्याची दृश्ये पाहत नाही आणि या कार्याचे रहस्य उलगडण्याचा मनुष्याकडे कोणताही मार्ग नाही. म्हणूनच, सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेचे रहस्य हे सर्वात मोठे, सर्वात खोलवर लपलेले आहे व मनुष्यासाठी पूर्णपणे अथांग असे रहस्य आहे. जोपर्यंत स्वतः देव त्याची इच्छा स्पष्ट करत नाही आणि मनुष्यासमोर प्रकट करत नाही, तोपर्यंत देवाच्या इच्छेचे थेट आकलन कोणीही करू शकत नाही; अन्यथा, या गोष्टी मनुष्यासाठी कायमचे कोडे राहतील, कायमची सीलबंद रहस्ये राहतील. धार्मिक जगतातील लोकांचा विषय सोडून द्या; जर आज तुम्हाला सांगितले नसते, तर तुम्हाला ते समजले नसते. सहा हजार वर्षांचे हे कार्य संदेष्ट्यांच्या सर्व भविष्यवाण्यांपेक्षा अधिक रहस्यमय आहे. हे सृष्टीच्या निर्मितीपासून आत्तापर्यंतचे सर्वात मोठे रहस्य आहे व युगानुयुगातील संदेष्ट्यांपैकी कोणीही ते कधीही ओळखू शकले नाही, कारण हे रहस्य केवळ अंतिम युगात उघड झाले आहे आणि यापूर्वी कधीही उघड झाले नाही. जर तुम्ही या रहस्याचे आकलन करू शकलात व जर तुम्ही ते संपूर्णपणे प्राप्त करण्यास सक्षम असाल, तर सर्व धार्मिक व्यक्ती या रहस्याने नष्ट होतील. केवळ हाच सर्वात मोठा दृष्टांत आहे; हे असे आहेत जे समजून घेण्याची मनुष्याला खूप आकांक्षा असते, परंतु तेच त्याला सर्वात अस्पष्ट असतात. तुम्ही कृपेच्या युगात असताना, येशूने केलेले कार्य किंवा यहोवाने केलेले कार्य काय आहे हे तुम्हाला माहीत नव्हते. यहोवाने नियमशास्त्रे का स्थापित केली, त्याने लोकसमुदायाला नियमशास्त्रे का पाळायला सांगितली किंवा मंदिर का बांधले पाहिजे हे लोकांना समजले नाही आणि इस्रायली लोकांना इजिप्तमधून वाळवंटात व नंतर कनानमध्ये का नेले गेले हे लोकांना समजणे तर दूरच. आजपर्यंत या बाबी उघडकीस आल्या नव्हत्या.

शेवटच्या दिवसांतील कार्य तीन टप्प्यांमधील अंतिम टप्पा आहे. हे दुसर्‍या नवीन युगाचे कार्य आहे आणि ते व्यवस्थापनाच्या संपूर्ण कार्याचे प्रतिनिधित्व करत नाही. सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजेनच्या कार्याची तीन टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. कोणताही एक टप्पा तीन युगांच्या कार्याचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, परंतु संपूर्ण भागाच्या फक्त एका भागाचे प्रतिनिधित्व करू शकतो. यहोवा हे नाव देवाच्या संपूर्ण प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. नियमशास्त्राच्या युगात त्याने त्याचे कार्य पार पाडले यावरून हे सिद्ध होत नाही, की देव केवळ नियमशास्त्रानुसारच देव असू शकतो. यहोवाने मनुष्यासाठी कायदे तयार केले व त्याला आज्ञा दिल्या, मनुष्याला मंदिर आणि वेदी बांधण्यास सांगितले; त्याने केलेले कार्य केवळ नियमशास्त्राच्या युगाचे प्रतिनिधित्व करते. त्याने केलेले हे कार्य हे सिद्ध करत नाही, की देव हा केवळ असा देव आहे जो मनुष्याला नियमशास्त्र पाळण्यास सांगतो किंवा तो मंदिरातील देव आहे अथवा तो वेदीच्या समोरील देव आहे. असे म्हणणे असत्य ठरेल. नियमशास्त्रानुसार केलेले कार्य केवळ एका युगाचे प्रतिनिधित्व करू शकते. म्हणूनच, जर देवाने केवळ नियमशास्त्राच्या युगात कार्य केले असते, तर मनुष्य देवाला पुढील परिभाषेमध्ये मर्यादित करेल, मनुष्य असे म्हणेल, “देव हा मंदिरातील देव आहे व देवाची सेवा करण्यासाठी आपण याजकाची वस्त्रे परिधान करून मंदिरात प्रवेश केला पाहिजे.” जर कृपेच्या युगातील कार्य कधीही पार पाडले नसते आणि नियमशास्त्राचे युग आजपर्यंत सुरू राहिले असते, तर मनुष्याला हे कळले नसते की देव दयाळू व प्रेमळदेखील आहे. जर नियमशास्त्राच्या युगातील कार्य केले गेले नसते आणि त्याऐवजी केवळ कृपेच्या युगात कार्य केले गेले असते, तर मनुष्याला फक्त हेच समजले असते, की देव केवळ मनुष्याची सुटका करू शकतो व मनुष्याच्या पापांना क्षमा करू शकतो. मनुष्याला हेच कळेल, की तो पवित्र आणि निष्पाप आहे व मनुष्यासाठी तो स्वतःचा त्याग करण्यास आणि वधस्तंभावर खिळण्यास सक्षम आहे. मनुष्याला फक्त एवढ्याच गोष्टी कळल्या असत्या, पण इतर कशाचीही समज नसती. म्हणून प्रत्येक युग हे देवाच्या प्रवृत्तीचा एक भाग दर्शवते. देवाच्या प्रवृत्तीचे कोणते पैलू नियमशास्त्राच्या युगात, कोणते पैलू कृपेच्या युगात व कोणते पैलू सध्याच्या टप्प्यात सादर केले जातात: जेव्हा तिन्ही टप्पे एक संपूर्ण टप्पा म्हणून एकत्रित केले जातात, तेव्हाच ते देवाच्या प्रवृत्तीचे संपूर्णत्व प्रकटीकरण करू शकतात. जेव्हा मनुष्याला तिन्ही टप्पे कळतात तेव्हाच त्याला ते पूर्णपणे समजू शकते. तीन टप्प्यांपैकी कोणताही टप्पा वगळला जाऊ शकत नाही. कार्याचे हे तीन टप्पे जाणून घेतल्यावरच तुला देवाची संपूर्ण प्रवृत्ती दिसेल. देवाने त्याचे कार्य नियमशास्त्राच्या युगात पूर्ण केले या वस्तुस्थितीवरून हे सिद्ध होत नाही, की तो केवळ नियमशास्त्रांतर्गत असलेला देव आहे आणि त्याने त्याचे सुटकेचे कार्य पूर्ण केले याचा अर्थ असा नाही, की देव मानवजातीची कायमची सुटका करेल. हे सर्व मनुष्याने काढलेले निष्कर्ष आहेत. कृपेचे युग समाप्त झाले आहे, तेव्हा तू असे म्हणू शकत नाहीस, की देव केवळ वधस्तंभाचा आहे व केवळ वधस्तंभ देवाच्या तारणाचे प्रतिनिधित्व करतो. असे करणे म्हणजे देवाला सीमांकित करणे आहे. सध्याच्या टप्प्यात, देव मुख्यतः वचनाचे कार्य करत आहे, परंतु देवाने मनुष्यावर कधीही दया केली नाही आणि त्याने ताडण आणि न्याय केला आहे असे तू म्हणू शकत नाहीस. शेवटच्या दिवसांतील कार्य यहोवा आणि येशूचे कार्य व मनुष्याला न समजलेली सर्व रहस्ये उघड करते, जेणेकरून मानवजातीचे गंतव्यस्थान व अंत प्रकट होईल आणि मानवजातीमधील तारणाचे सर्व कार्य संपेल. शेवटच्या दिवसांतील कार्याचा हा टप्पा सर्व काही समाप्त करतो. मनुष्याला न समजलेली सर्व रहस्ये उलगडणे आवश्यक आहे, जेणेकरून मनुष्य ती खोलवर उलगडेल व त्याच्या अंतःकरणात पूर्णपणे स्पष्ट समज असेल. तरच मानवजातीचे प्रकारानुसार वर्गीकरण करता येईल. सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना पूर्ण झाल्यावरच मनुष्याला संपूर्णपणे देवाची प्रवृत्ती समजेल, कारण त्याचे व्यवस्थापन तेव्हाच समाप्त होईल. आता तुम्ही शेवटच्या युगातील देवाचे कार्य अनुभवले आहे, तर देवाची प्रवृत्ती काय आहे? देव केवळ वचने उच्चारणारा देव आहे असे म्हणण्याचे तुझे धाडस आहे का? असा निष्कर्ष काढण्याचे धाडस तू करणार नाहीस. काही जण म्हणतील, की देव हा असा देव आहे जो रहस्ये उलगडतो, देव हा कोकरू आहे आणि तो सात शिक्के फोडतो. पण असा निष्कर्ष काढण्याचे धाडस कोणीही करत नाही. इतर लोक म्हणू शकतात, की देव हा देहधारी आहे, परंतु हेही योग्य ठरणार नाही. तरीही इतर लोक म्हणतील, की देहधारी देव केवळ वचने उच्चारतो व संकेत दाखवत नाही आणि चमत्कार करत नाही, परंतु तू अशा प्रकारे बोलण्याचे धाडस करणे दूरच, कारण येशू देहधारी बनला व त्याने संकेत दाखवले आणि चमत्कार केले, म्हणूनच तू देवाची इतकी सहज परिभाषा करण्याचे धाडस करणार नाहीस. सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेत केलेली सर्व कार्ये आता कुठे पूर्णत्वास आली आहेत. हे सर्व कार्य मनुष्यासमोर प्रकट झाल्यानंतर व मानवजातीमध्ये पार पाडल्यानंतरच देवाची सर्व प्रवृत्ती आणि त्याच्याकडे काय आहे व देव काय आहे हे मानवजातीला कळेल. या टप्प्याचे कार्य पूर्ण झाल्यावर, मनुष्याला न समजलेली सर्व रहस्ये उघड केली जातील, पूर्वी न समजलेली सर्व सत्ये स्पष्ट केली जातील आणि मानवजातीला त्यांच्या भविष्यातील मार्ग व गंतव्यस्थानाबद्दल सांगितले जाईल. सध्याच्या टप्प्यात जे कार्य करायचे आहे त्याचा हा संपूर्ण भाग आहे. आज मनुष्य ज्या मार्गाने चालतो तो वधस्तंभाचा व दु:खाचा मार्ग असला, तरी आज मनुष्य जे काही करतो आणि जे सेवन, प्राशन करतो व जे उपभोगतो, ते नियमशास्त्रांतर्गत असलेल्या आणि कृपेच्या युगात मनुष्याच्या वाट्याला जे आले त्यापेक्षा खूप वेगळे आहे. आज मनुष्याकडून जी अपेक्षा केली जाते ती भूतकाळातील अपेक्षेपेक्षा व त्याहूनही नियमशास्त्राच्या युगात मनुष्याकडे केलेल्या अपेक्षेपेक्षा वेगळी आहे. आता, जेव्हा देव इस्रायलमध्ये त्याचे कार्य करत होता, तेव्हा नियमशास्त्रानुसार मनुष्याकडून काय अपेक्षा करण्यात आली होती? मनुष्याने शब्बाथ आणि यहोवाचे नियम पाळले पाहिजेत यापेक्षा अधिक नाही. कोणीही शब्बाथ दिवशी श्रम करू नये किंवा यहोवाच्या नियमशास्त्रांचे उल्लंघन करू नये. पण आता तसे नाही. शब्बाथ दिवशी, मनुष्य नेहमीप्रमाणे कार्य करतो, एकत्र भेटतो व प्रार्थना करतो आणि त्याच्यावर कोणतीही बंधने लादली जात नाहीत. कृपेच्या युगात असलेल्यांना बाप्तिस्मा घ्यावा लागला व त्यांना पुढे उपवास करण्यास, भाकरी फोडण्यास, द्राक्षरस पिण्यास, त्यांचे डोके झाकण्यास आणि इतरांचे पाय धुण्यास सांगितले गेले. आता, हे नियम रद्द केले गेले आहेत, परंतु मनुष्याकडून मोठ्या मागण्या केल्या जात आहेत, कारण देवाचे कार्य दिवसेंदिवस सखोल होत जाते व मनुष्याचा प्रवेश अधिकाधिक उच्च स्तरावर पोहोचतो. भूतकाळात, येशूने मनुष्यावर हात ठेवून प्रार्थना केली, परंतु आता सर्व काही बोलले गेले आहे, हात ठेवण्याचा काय उपयोग आहे? केवळ वचनेच परिणाम साध्य करू शकतात. भूतकाळात जेव्हा त्याने मनुष्यावर हात ठेवला, तेव्हा तो मनुष्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याच्या रोगांपासून बरे करण्यासाठी होता. त्या वेळी पवित्र आत्म्याने असे कार्य केले होते, परंतु आता तसे नाही. आता पवित्र आत्मा कार्य करण्यासाठी आणि परिणाम साध्य करण्यासाठी वचने वापरतो. त्याची वचने तुम्हाला स्पष्ट केली गेली आहेत व तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती आचरणात आणली पाहिजेत. त्याची वचने म्हणजे त्याच्या इच्छा आहेत; त्याची वचने म्हणजे तो करू इच्छित असलेले कार्य आहे. त्याच्या वचनांद्वारे, तुला त्याची इच्छा आणि तो तुला जे प्राप्त करण्यास सांगतो ते समजेल व हात ठेवण्याची गरज न भासता तू त्याची वचने थेट आचरणात आणू शकशील. काही जण म्हणतील, “माझ्यावर हात ठेव! मला तुझा आशीर्वाद मिळावा आणि मी तुझा भाग व्हावे म्हणून तुझे हात माझ्यावर ठेव.” या सर्व भूतकाळातील कालबाह्य प्रथा आहेत, आता त्या अप्रचलित आहेत, कारण युग बदलले आहे. पवित्र आत्मा युगानुसार कार्य करतो, यादृच्छिकपणे किंवा नियमांच्या अनुरूप नाही. युग बदलले आहे व नवीन युग अपरिहार्यपणे नवीन कार्य घेऊन येते. हे कार्याच्या प्रत्येक टप्प्यावर खरे आहे आणि म्हणून त्याच्या कार्याची कधीही पुनरावृत्ती होत नाही. कृपेच्या युगात, येशूने आजार बरे करणे, भुते काढणे, त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या मनुष्यावर हात ठेवणे व मनुष्याला आशीर्वाद देणे यासारखे बरेच कार्य केले. तथापि, असे पुन्हा करणे सध्याच्या काळात निरर्थक आहे. पवित्र आत्म्याने त्या वेळी त्या मार्गाने कार्य केले, कारण ते कृपेचे युग होते आणि मनुष्याला आनंद घेण्यासाठी पुरेशी कृपा होती. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मागितला गेला नाही व जोपर्यंत त्याचा विश्वास होता तोपर्यंत त्याला कृपामिळत होती. सगळ्यांना अतिशय दयाळूपणे वागवले गेले होते. आता युग बदलले आहे आणि देवाचे कार्य पुढे गेले आहे; ताडण व न्यायाच्या सहाय्याने मनुष्याची बंडखोरी आणि मनुष्यातील अशुद्ध गोष्टी दूर केल्या जातील. तो टप्पा सुटकेचा टप्पा असल्याने, देवाने त्या मार्गाने कार्य करणे, मनुष्याला आनंद देण्यासाठी पुरेशी कृपा दाखवणे अपेक्षित होते, जेणेकरून मनुष्याची पापातून सुटका होईल व कृपेने त्याच्या पापांना क्षमा होईल. हा सध्याचा टप्पा म्हणजे ताडण, न्याय, वचनांचा मारा, तसेच वचनांची शिस्त आणि प्रकटीकरण याद्वारे मनुष्यातील अनीती उघड करणे आहे, जेणेकरून नंतर मानवजातीला वाचवले जाईल. हे सुटकेपेक्षा अधिक सखोल कार्य आहे. कृपेच्या युगातील कृपा मनुष्याच्या आनंदासाठी पुरेशी होती; आता मनुष्याने या कृपेचा अनुभव घेतला आहे, तो यापुढे त्याचा उपभोग घेणार नाही. हे कार्य आता कालबाह्य झाले आहे व यापुढे केले जाणार नाही. आता वचनाच्या न्यायाने मनुष्याला वाचवले जाणार आहे. मनुष्याचा न्याय, ताडण आणि परिष्करण झाल्यानंतर, याची प्रवृत्ती बदलली जाते. हे सर्व मी उच्चारलेल्या वचनांमुळे नाही का? कार्याचा प्रत्येक टप्पा संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीनुसार व युगानुसार केला जातो. सर्व कार्य महत्त्वपूर्ण आहे आणि हे सर्व अंतिम तारणासाठी केले गेले आहे, जेणेकरून मानवजातीला भविष्यात एक चांगले गंतव्यस्थान मिळू शकेल व शेवटी मानवजातीचे वर्गीकरण करता येईल.

शेवटच्या दिवसांचे कार्य म्हणजे वचने उच्चारणे. वचनांच्या माध्यमातून मनुष्यामध्ये मोठे बदल घडून येऊ शकतात. ही वचने स्वीकारल्यानंतर या लोकांमध्ये आता झालेले बदल हे कृपेच्या युगातील संकेत आणि चमत्कार स्वीकारल्यानंतर लोकांमध्ये झालेल्या बदलांपेक्षा खूप मोठे आहेत. कारण, कृपेच्या युगात, हात ठेवून व प्रार्थना करून मनुष्यामधून भुते बाहेर काढली गेली होती, परंतु मनुष्यामधील भ्रष्ट प्रवृत्ती अजूनही कायम होती. मनुष्य त्याच्या आजारातून बरा झाला आणि त्याच्या पापांना क्षमा मिळाली, परंतु मनुष्याला त्याच्यातील भ्रष्ट सैतानी प्रवृत्तींपासून कसे शुद्ध करायचे आहे, याचे कार्य अजून व्हायचे होते. मनुष्याला केवळ त्याच्या श्रद्धेमुळे वाचवले गेले व त्याच्या पापांना क्षमा मिळाली, परंतु मनुष्याचा पापी स्वभाव नाहीसा झाला नाही आणि अजूनही त्याच्यामध्येच राहिला. देहधारी देवाने मनुष्याच्या पापांना क्षमा केली, परंतु याचा अर्थ असा नव्हता की मनुष्यामध्ये पाप शिल्लक राहिले नाही. मनुष्याच्या पापांची पापार्पणाद्वारे क्षमा केली जाऊ शकते, परंतु मनुष्याला यापुढे पाप करण्यापासून कसे रोखता येईल व त्याच्या पापी स्वभावाचा पूर्णपणे नाश कसा होईल आणि त्याच्यामध्ये परिवर्तन कसे होईल, या समस्येचे निराकरण करण्याचा कोणताही मार्ग त्याच्याकडे नाही. मनुष्याला त्याच्या पापांसाठी क्षमा मिळाली व हे देवाच्या वधस्तंभावर खिळण्याच्या कार्यामुळे झाले, परंतु मनुष्य आपल्या जुन्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीतच जगत राहिला. असे असल्याने, मनुष्याला त्याच्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीपासून पूर्णपणे वाचवले पाहिजे, जेणेकरून त्याचा पापी स्वभाव पूर्णपणे नष्ट होईल, पुन्हा कधीही विकसित होणार नाही, अशा प्रकारे मनुष्याच्या प्रवृत्तीत परिवर्तन होऊ शकेल. यासाठी मनुष्याने जीवनातील वृद्धीचा मार्ग समजून घेणे, जीवनाचा मार्ग समजून घेणे आणि त्याच्या प्रवृत्तीत बदल करण्याचा मार्ग समजून घेणे आवश्यक आहे. शिवाय, मनुष्याने या मार्गाच्या अनुषंगाने कार्य करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याची प्रवृत्ती हळूहळू बदलली जाईल व तो प्रकाशाच्या तेजामध्ये जगू शकेल, जेणेकरून तो जे काही करतो ते देवाच्या इच्छेनुसार होईल. जेणेकरून तो त्याच्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीचा त्याग करू शकेल आणि जेणेकरून तो सैतानाच्या अंधाराच्या प्रभावातून मुक्त होऊ शकेल, ज्यामुळे तो पापातून पूर्णपणे बाहेर येईल. तरच मनुष्याला पूर्ण तारण मिळेल. जेव्हा येशू त्याचे कार्य करत होता, तेव्हा मनुष्याचे त्याच्याबद्दलचे ज्ञान अजूनही संदिग्ध व अस्पष्ट होते. मनुष्याने नेहमी त्याला दाविदाचा पुत्र मानले आणि त्याला महान संदेष्टा, मनुष्याच्या पापांची सुटका करणारा परोपकारी प्रभू म्हणून घोषित केले. काही त्यांच्या श्रद्धेच्या बळावर, केवळ त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केल्याने बरे झाले; आंधळ्यांना दृष्टी प्राप्त झाली व मृतांनाही जिवंत केले गेले. तथापि, मनुष्याला स्वतःमध्ये खोलवर रुजलेल्या भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीचा शोध घेता आला नाही, ती कशी दूर करायची हे त्याला माहीत नव्हते. मनुष्याला बरीच कृपा मिळाली, जसे की देहाची शांती आणि आनंद, एका सदस्याच्या श्रद्धेने संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद मिळणे, आजार बरे करणे व आणखी बरेच काही. बाकीच्या गोष्टी म्हणजे मनुष्याची चांगली कृत्ये आणि त्याचे दैवी स्वरूप होते; जर कोणी या आधारावर जगू शकत असेल, तर त्यांना स्वीकार्य आस्तिक मानले जात असे. केवळ अशा प्रकारचे आस्तिकच मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेश करू शकत होते, याचा अर्थ ते वाचवले गेले होते. परंतु, त्यांच्या आयुष्यात, या लोकांना जीवनाचा मार्ग अजिबात समजला नाही. त्यांनी त्यांची प्रवृत्ती बदलण्याचा कोणताही मार्ग न ठेवता फक्त पापे करणे व नंतर त्यांच्या पापांची कबुली देणे हेच चक्र पार पाडले: कृपेच्या युगात मनुष्याची अशी स्थिती होती. मनुष्याला संपूर्ण तारण मिळाले आहे का? नाही! म्हणून, कार्याचा तो टप्पा संपल्यानंतर, न्याय आणि ताडण देण्याचे कार्य बाकी होते. हा टप्पा म्हणजे वचनाच्या सहाय्याने मनुष्याला शुद्ध करणे व त्याद्वारे त्याला अनुसरणाचा मार्ग दाखवणे. भुतांना बाहेर काढणे सुरू राहिल्यास हा टप्पा फलदायी किंवा अर्थपूर्ण ठरणार नाही, कारण तो मनुष्याच्या पापी स्वभावाचा नाश करण्यात अयशस्वी ठरेल आणि मनुष्याला त्याच्या पापांची क्षमा मिळाल्यानंतर तो थांबेल. पापार्पणाद्वारे, मनुष्याला त्याच्या पापांची क्षमा करण्यात आली आहे, कारण वधस्तंभावर खिळण्याचे कार्य आधीच संपले आहे व देवाने सैतानावर विजय मिळवला आहे. परंतु मनुष्याची भ्रष्ट प्रवृत्ती अजूनही त्याच्यातच आहे, मनुष्य अजूनही पाप करू शकतो आणि देवाचा प्रतिकार करू शकतो व देवाने मानवजातीला प्राप्त केलेले नाही. म्हणूनच कार्याच्या या टप्प्यात देव वचन वापरून मनुष्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा पर्दाफाश करतो, त्याला योग्य मार्गानुसार आचरण करण्यास प्रवृत्त करतो. हा टप्पा मागील टप्प्यापेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे, तसेच अधिक फलदायी आहे, कारण आता हे वचन आहे जे थेट मनुष्याच्या जीवनाचा पुरवठा करते आणि मनुष्याच्या प्रवृत्तीमध्ये पूर्णपणे नवचैतन्य आणण्यास सक्षम करते; कार्याचा हा अधिक सखोल टप्पा आहे. म्हणूनच, शेवटच्या दिवसांतील देहधारणेने देवाच्या देहधारणेचे महत्त्व पूर्ण केले आहे व मनुष्याच्या तारणासाठी देवाची व्यवस्थापन योजना पूर्णपणे पूर्ण केली आहे.

देवाने आत्म्याच्या पद्धतीचा आणि आत्म्याच्या ओळखीचा थेट वापर करून मनुष्याला वाचवले जात नाही, कारण त्याच्या आत्म्याला मनुष्य स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही, मनुष्य त्याच्या जवळ येऊ शकत नाही. जर त्याने आत्म्याच्या दृष्टिकोनातून थेट मनुष्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर मनुष्य त्याचे तारण प्राप्त करण्यास असमर्थ असेल. जर देवाने निर्माण केलेल्या मनुष्याचे बाह्य स्वरूप धारण केले नाही, तर मनुष्याकडे हे तारण प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नसेल. कारण मनुष्याकडे त्याच्याजवळ जाण्याचा कोणताही मार्ग नाही, ज्याप्रमाणे कोणीही यहोवाच्या छायेजवळ जाऊ शकत नव्हता. केवळ निर्मिलेला मानव बनून, म्हणजेच, तो धारण करणार असलेल्या देहात त्याचे वचन टाकून, तो त्याचे अनुसरण करणाऱ्या सर्वांमध्ये वैयक्तिकरीत्या वचनाचे कार्य करू शकतो. केवळ याद्वारेच मनुष्य वैयक्तिकरीत्या त्याची वचने पाहू व ऐकू शकतो आणि शिवाय त्याच्या वचनामध्ये प्रवेश करू शकतो व याद्वारे पूर्णपणे वाचवला जाऊ शकतो. जर देवाने देह धारण केला नसता, तर रक्तामांसातील कोणीही इतके मोठे तारण प्राप्त करू शकले नसते किंवा एकाही व्यक्तीला वाचवता आले नसते. जर देवाच्या आत्म्याने मानवजातीमध्ये थेट कार्य केले, तर संपूर्ण मानवजातीचा नाश झाला असता, अन्यथा, देवाच्या संपर्कात येण्याचा कोणताही मार्ग नसताना, ते सैतानाच्या बंदिवासात पूर्णपणे वाहून गेले असते. पहिली देहधारणा मनुष्याची पापातून सुटका करण्यासाठी, येशूच्या देहाच्या सहाय्याने त्याची सुटका करण्यासाठी होती, म्हणजेच त्याने मनुष्याला वधस्तंभापासून वाचवले, परंतु भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती मनुष्यामध्ये अजूनही कायम होती. दुसरी देहधारणा यापुढे पापार्पण म्हणून नाही तर ज्यांची पापातून सुटका केली गेली आहे त्यांना पूर्णपणे वाचवण्यासाठी आहे. हे यासाठी केले जाते, जेणेकरून ज्यांना क्षमा केली गेली आहे त्यांना त्यांच्या पापांपासून मुक्त केले जाईल आणि ते पूर्णपणे शुद्ध केले जातील व बदललेली प्रवृत्ती प्राप्त करून, ते सैतानाच्या अंधाराच्या प्रभावातून मुक्त होतील आणि देवाच्या सिंहासनासमोर परत येतील. केवळ अशा प्रकारे मनुष्य पूर्णपणे पवित्र होऊ शकतो. नियमशास्त्राचे युग संपल्यानंतर व कृपेचे युग सुरू झाल्यानंतर, देवाने तारणाचे कार्य सुरू केले, जे शेवटच्या दिवसांपर्यंत सुरू होते, मानवजातीला त्यांच्या बंडखोरीबद्दल न्याय आणि ताडण करताना, तो मानवजातीला पूर्णपणे शुद्ध करेल. तेव्हाच देव त्याच्या तारणाचे कार्य पूर्ण करेल व विश्रांतीमध्ये प्रवेश करेल. म्हणूनच, कार्याच्या तीन टप्प्यांमध्ये, मनुष्यामध्ये त्याचे कार्य स्वतः पार पाडण्यासाठी देवाने केवळ दोनदा देह धारण केला आहे. कारण कार्याच्या तीन टप्प्यांपैकी फक्त एक टप्पा हा मनुष्याला त्याचे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणे आहे, तर बाकीच्या दोन टप्प्यात तारणाचे कार्य आहे. देह धारण करूनच देव मनुष्याच्या बरोबरीने जगू शकतो, जगाचे दुःख अनुभवू शकतो आणि सामान्य देहात राहू शकतो. केवळ अशाच प्रकारे तो मनुष्यांना निर्मिलेले प्राणी म्हणून आवश्यक असलेला व्यावहारिक मार्ग पुरवू शकतो. देवाच्या देहधारणेद्वारे मनुष्याला देवाकडून संपूर्ण तारण प्राप्त होते, त्याच्या प्रार्थनेच्या उत्तरादाखल थेट स्वर्गातून नाही. कारण, मनुष्य हा रक्तामांसाचा असल्याने, त्याच्याकडे देवाच्या आत्म्याला पाहण्याचा कोणताही मार्ग नाही, त्याच्या आत्म्याकडे जाण्याचा मार्ग तर दूरच. मनुष्य ज्याच्या संपर्कात येऊ शकतो ते फक्त देहधारी देवाचे शरीर आहे व केवळ याद्वारे मनुष्य सर्व मार्ग आणि सर्व सत्ये समजून घेण्यास सक्षम आहे व संपूर्ण तारण प्राप्त करू शकतो. दुसरी देहधारणा मनुष्याला पापांतून मुक्त होण्यासाठी आणि त्याला पूर्णपणे शुद्ध करण्यासाठी पुरेशी असेल. म्हणून, दुसऱ्या देहधारणेने, देहातील देवाचे संपूर्ण कार्य समाप्त केले जाईल व देवाच्या देहधारणेचे महत्त्व पूर्ण केले जाईल. यापुढे, देहातील देवाचे कार्य पूर्णपणे समाप्त होईल. दुसऱ्या देहधारणेनंतर, तो त्याच्या कार्यासाठी तिसऱ्यांदा देह धारण करणार नाही. कारण त्याचे संपूर्ण व्यवस्थापन समाप्त झालेले असेल. शेवटच्या दिवसांच्या देहधारणेने त्याच्या निवडलेल्या लोकांना पूर्णपणे प्राप्त केलेले असेल आणि शेवटच्या दिवसांतील संपूर्ण मानवजातीचे प्रकारानुसार वर्गीकरण केलेले असेल. तो यापुढे तारणाचे कार्य करणार नाही किंवा कोणतेही कार्य करण्यासाठी देहात परत येणार नाही. शेवटच्या दिवसांच्या कार्यात, वचन हे संकेत व चमत्कारांच्या प्रकटीकरणापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे आणि वचनाचा अधिकार संकेत व चमत्कारांपेक्षा जास्त आहे. वचन मनुष्याच्या हृदयात खोलवर दडलेल्या सर्व भ्रष्ट प्रवृत्तींचा पर्दाफाश करते. त्यांना स्वतःहून ओळखण्याचा तुझ्याकडे कोणताही मार्ग नाही. जेव्हा ते वचनाद्वारे तुझ्यासमोर उघड केले जातात, तेव्हा तुला स्वाभाविकपणे त्यांची समज येईल; तू त्यांना नाकारू शकणार नाहीस आणि तुझी पूर्ण खात्री होईल. हा वचनाचा अधिकार नाही का? आज वचनाच्या कार्यामुळे साध्य केलेला हा परिणाम आहे. म्हणूनच, आजार बरे करून व भुते काढून मनुष्याला त्याच्या पापांपासून पूर्णपणे वाचवले जाऊ शकत नाही किंवा संकेत आणि चमत्कारांच्या प्रकटीकरणाद्वारे तो पूर्णपणे परिपूर्ण होऊ शकत नाही. आजार बरे करण्याचा व भुते काढण्याचा अधिकार केवळ मनुष्याला कृपा देतो, परंतु मनुष्याचा देह अजूनही सैतानाचा आहे आणि मनुष्यामध्ये अजूनही भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती आहे. दुसऱ्या शब्दांत, जे शुद्ध केले गेले नाही ते अजूनही पाप व मलीनतेशी संबंधित आहे. वचनांद्वारे मनुष्य शुद्ध झाल्यानंतरच देव त्याला प्राप्त करू शकतो आणि मनुष्य पवित्र होऊ शकतो. जेव्हा मनुष्यामधून भुते बाहेर काढली गेली व त्याची सुटका केली गेली, तेव्हा याचा अर्थ असा होतो, की तो सैतानाच्या हातातून काढून घेतला गेला आणि देवाकडे परत आला. तथापि, देवाने शुद्ध केल्याशिवाय किंवा बदलल्याशिवाय, तो भ्रष्ट मनुष्य म्हणूनच राहतो. मनुष्याच्या अंतःकरणात अजूनही मलीनता, विरोध व बंडखोरी आहे; मनुष्य केवळ त्याच्या सुटकेद्वारे देवाकडे परत आला आहे, परंतु त्याला देवाचे किंचितही ज्ञान नाही आणि तरीही तो त्याचा प्रतिकार करण्यास व विश्वासघात करण्यास सक्षम आहे. मनुष्याची सुटका होण्यापूर्वी, सैतानाचे बरेच विष त्याच्यामध्ये आधीच पेरले गेले होते आणि सैतानाने हजारो वर्षे भ्रष्ट केल्यावर, त्याच्यामध्ये असा स्वभाव अस्तित्वात आहे जो देवाचा प्रतिकार करतो. म्हणूनच, जेव्हा मनुष्याची सुटका केली जाते, तेव्हा ते सुटकेशिवाय दुसरे काहीही नसते, ज्यामध्ये मनुष्याला मोठी किंमत मोजून परत आणले जाते, परंतु त्याच्यातील विषारी स्वभाव नाहीसा झालेला नसतो. देवाची सेवा करण्यास पात्र होण्याआधी इतका अपवित्र झालेला मनुष्य बदलला पाहिजे. न्याय व ताडणाच्या या कार्याद्वारे, मनुष्याला त्याच्या स्वतःच्या मलीन आणि भ्रष्ट मूलतत्त्वाची पूर्णपणे ओळख होईल व तो पूर्णपणे बदलू शकेल आणि शुद्ध होऊ शकेल. केवळ अशा प्रकारे मनुष्य देवाच्या सिंहासनासमोर परत येण्यास पात्र होऊ शकतो. आज केले जाणारे सर्व कार्य हे मनुष्य शुद्ध व्हावा व बदलला जावा यासाठी केले जाते; वचनाद्वारे तसेच परिष्करणाद्वारे न्याय आणि ताडण करून, मनुष्य त्याची भ्रष्टता दूर करू शकतो व शुद्ध होऊ शकतो. कार्याच्या या टप्प्याला तारण मानण्यापेक्षा ते शुद्धीकरणाचे कार्य आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. खरे तर हा टप्पा विजयाचा तसेच तारणाच्या कार्यातील दुसरा टप्पा आहे. वचनाद्वारे न्याय आणि ताडण करूनच देव मनुष्याला प्राप्त करतो व शुद्ध करणे, न्याय करणे आणि उघड करणे यांसाठी वचन वापरून मनुष्याच्या हृदयातील सर्व अशुद्धता, धारणा, हेतू व वैयक्तिक आकांक्षा पूर्णपणे उघड करतो. मनुष्याला त्याच्या पापांपासून सुटका मिळाली असेल आणि क्षमा केली गेली असेल, परंतु देवाने मनुष्याच्या पापांची आठवण ठेवली नाही व मनुष्याला त्याच्या अपराधांनुसार वागणूक दिली नाही असेच मानले जाऊ शकते. तथापि, जेव्हा मनुष्य देहामध्ये राहतो, पापापासून मुक्त झालेला नसतो, तेव्हा तो केवळ पाप करणे सुरू ठेवू शकतो, त्याची भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती अविरतपणे प्रकट करू शकतो. हे असे जीवन आहे जे मनुष्य जगतो, पाप करण्याचे आणि क्षमा मिळवण्याचे कधीही न संपणारे चक्र. बहुसंख्य मानवजात दिवसा पाप करून संध्याकाळी कबूल करते. अशा प्रकारे, जरी पापार्पण मनुष्यासाठी कायमचे प्रभावी असले तरी ते मनुष्याला पापापासून वाचवू शकणार नाही. तारणाचे केवळ अर्धे कार्य पूर्ण झाले आहे, कारण मनुष्याची प्रवृत्ती अजूनही भ्रष्टच आहे. उदाहरणार्थ, जेव्हा लोकांना समजले की ते मवाबाचे वंशज आहेत, तेव्हा त्यांनी तक्रारीची वचने समोर आणली, जीवनाचा पाठपुरावा करणे सोडून दिले व ते पूर्णपणे नकारात्मक झाले. यावरून हे दिसून येत नाही का की मानवजात अजूनही पूर्णपणे देवाच्या अधीन होऊ शकत नाही? ही त्यांची भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीच नाही का? जेव्हा तुझे ताडण केले जात नव्हते, तेव्हा तुझे हात इतर सर्वांपेक्षा उंच होते, अगदी येशूच्या हातांपेक्षाही. आणि तू मोठ्याने ओरडलास: “देवाचा प्रिय पुत्र हो! देवाचा जिवलग हो! सैतानासमोर नतमस्तक होण्यापेक्षा आम्ही मरण पत्करू! जुन्या सैतानाविरुद्ध बंड करा! अग्निवर्ण अजगराविरुद्ध बंड करा! अग्निवर्ण अजगर सत्तेतून भ्रष्ट होऊ दे! देव आम्हाला परिपूर्ण करो!” तुमच्या आरोळ्या इतर सर्वांपेक्षा उच्च स्वराच्या होत्या. पण नंतर ताडणाची वेळ आली व पुन्हा एकदा मानवजातीची भ्रष्ट प्रवृत्ती उघड झाली. मग, त्यांच्या आरोळ्या थांबल्या आणि त्यांचा संकल्प अयशस्वी झाला. हा मनुष्याचा भ्रष्टाचार आहे; पापापेक्षा खोलवर चालणारी, ही सैतानाने पेरलेली व मनुष्याच्या अंतःकरणात खोलवर रुजलेली गोष्ट आहे. मनुष्याला त्याच्या पापांची जाणीव होणे सोपे नाही; स्वतःचा खोलवर रुजलेला स्वभाव ओळखण्याचा त्याच्याकडे कोणताही मार्ग नाही आणि हा परिणाम साध्य करण्यासाठी त्याने वचनाच्या न्यायावर अवलंबून असणे आवश्यक आहे. केवळ अशा प्रकारे मनुष्याला येथून हळूहळू बदलता येईल. मनुष्य भूतकाळात अशा प्रकारे ओरडत असे, कारण त्याला त्याच्या मूळ भ्रष्ट प्रवृत्तीची समज नव्हती. मनुष्यामध्ये या अशुद्धता असतात. न्याय आणि ताडणाच्या एवढ्या मोठ्या कालावधीत मनुष्य तणावाच्या वातावरणात जगला. हे सर्व वचनाद्वारे साध्य झाले नाही का? सेवेकऱ्यांच्या कसोटीपूर्वी तूही मोठ्याने ओरडला नाहीस का? “राज्यात प्रवेश करा! हे नाव स्वीकारणाऱ्या सर्वांचा राज्यात प्रवेश होईल! सर्वांनी देवामध्ये सहभागी व्हावे!” सेवेकऱ्यांच्या कसोटीची वेळ आली, तेव्हा तू ओरडला नाहीस. अगदी सुरुवातीलाच सर्वजण ओरडले, “हे देवा! तू मला जिथे ठेवशील तिथे मी तुझ्या मार्गदर्शनाखाली राहीन.” “माझा पौल कोण असेल?” ही देवाची वचने वाचून लोक म्हणाले, “मी तयार आहे!” मग त्यांना ही वचने दिसली, “आणि ईयोबाच्या श्रद्धेचे काय?” आणि म्हणाले, “मी ईयोबाची श्रद्धा बाळगण्यास तयार आहे. देवा, कृपया माझी परीक्षा घे!” जेव्हा सेवेकऱ्यांच्या कसोटीची वेळ आली, तेव्हा ते त्याच वेळी कोसळले व पुन्हा उभे राहू शकले नाहीत. त्यानंतर, हळूहळू त्यांच्या हृदयातील अशुद्धता कमी होत गेली. हे वचनाने साध्य झाले नाही का? म्हणूनच, आज तुम्ही जे अनुभवले आहे ते येशूच्या संकेत आणि चमत्कारांच्या कार्याद्वारे प्राप्त झालेल्या परिणामांपेक्षाही श्रेष्ठ असे वचनाद्वारे प्राप्त झालेले परिणाम आहेत. देवाचा गौरव व देवाचा अधिकार जो तू पाहत आहेस ते केवळ वधस्तंभावर खिळण्याने, आजार बरे करण्याने आणि भुते काढण्याने पाहिले जात नाही तर त्याहूनही अधिक त्याच्या वचनाच्या न्यायाने दिसून येते. हे तुला दाखवते, की देवाच्या अधिकारात व सामर्थ्यामध्ये केवळ संकेत, आजार बरे करणे आणि भुते काढणे यांचा समावेश नाही, तर देवाच्या वचनाचा न्याय देवाच्या अधिकाराचे प्रतिनिधित्व करण्यास व त्याची सर्वशक्तिमानता प्रकट करण्यास अधिक सक्षम आहे.

मनुष्याने आता जे काही साध्य केले आहे—त्याची सध्याची पातळी, ज्ञान, प्रेम, निष्ठा, आज्ञाधारकता आणि अंतर्दृष्टी—हे वचनाच्या न्यायाद्वारे प्राप्त झालेले परिणाम आहेत. वचनाद्वारे आजपर्यंत तू निष्ठा ठेवू शकतोस व उभे राहण्यास सक्षम आहेस. आता मनुष्य पाहतो, की देहधारी देवाचे कार्य खरोखरच विलक्षण आहे आणि त्यात बरेच काही आहे जे मनुष्याला प्राप्त करता येऊ शकत नाही व ती रहस्ये आणि चमत्कार आहेत. त्यामुळे अनेक जण अधीन गेले आहेत. काही जण त्यांच्या जन्माच्या दिवसापासून कधीही कोणाही मनुष्याला अधीन गेले नाहीत, तरीही जेव्हा ते आजच्या दिवशी देवाची वचने पाहतात, तेव्हा ते पूर्णपणे अधीन जातात व त्यांच्या ते लक्षातदेखील येत नाही आणि ते तपासणी करण्याचे किंवा दुसरे काहीही बोलण्याचे धाडस करत नाहीत. मानवजात वचनाच्या खाली पडली आहे व वचनाच्या न्यायाच्या अधीन गेली आहे. जर देवाचा आत्मा थेट मनुष्याशी बोलला असता, तर सर्व मानवजात वाणीच्या अधीन गेली असती, ज्या प्रकारे पौल दिमिष्काच्या रस्त्यावर प्रकाशात जमिनीवर पडला होता त्याप्रमाणे मानवजात प्रकटीकरणाच्या वचनांशिवाय खाली पडेल. जर देवाने अशाच प्रकारे कार्य करणे पुढे सुरू ठेवले, तर मनुष्याला वचनाच्या न्यायाने स्वतःचा भ्रष्टाचार कधीच कळू शकणार नाही आणि त्याद्वारे तारण प्राप्त करू शकणार नाही. केवळ देह धारण करूनच देव वैयक्तिकरीत्या त्याची वचने प्रत्येक मनुष्याच्या कानात सांगू शकतो, जेणेकरून ज्यांना कान आहेत ते सर्व त्याची वचने ऐकतील व वचनाद्वारे त्याचा न्याय प्राप्त करतील. आत्म्याने प्रकट होऊन मनुष्याला घाबरवून अधीन होण्यास भाग पाडण्याऐवजी त्याच्या वचनाने साध्य केलेला फक्त हाच परिणाम आहे. या व्यावहारिक आणि तरीही विलक्षण कार्यातूनच मनुष्याची अनेक वर्षे खोलवर दडलेली जुनी प्रवृत्ती पूर्णपणे उघड होऊ शकते, जेणेकरून मनुष्य ती ओळखून त्यात बदल घडवून आणेल. या सर्व गोष्टी देहधारी देवाचे व्यावहारिक कार्य आहे, ज्यामध्ये, बोलणे व व्यावहारिक पद्धतीने न्याय अंमलात आणणे समाविष्ट आहे, तो वचनाद्वारे मनुष्यावर न्यायाचे परिणाम साध्य करतो. हा देहधारी देवाचा अधिकार आहे आणि देवाच्या देहधारणेचे महत्त्व आहे. हे देहधारी देवाच्या अधिकाराची ओळख करून देण्यासाठी, वचनाच्या कार्याने साध्य केलेले परिणाम ज्ञात करण्यासाठी व आत्मा देहात आला आहे हे ओळखण्यासाठी आणि वचनाद्वारे मनुष्याचा न्याय करून त्याचा अधिकार प्रदर्शित करण्यासाठी केले जाते. जरी त्याचा देह हे साधारण व सामान्य मानवतेचे बाह्य स्वरूप असले तरी, त्याची वचने जे परिणाम साध्य करतात त्याने मनुष्याला हे दर्शवले जाते, की त्याच्याकडे सर्व अधिकार आहेत, तो स्वतः देव आहे आणि त्याची वचने हे स्वतः देवाची अभिव्यक्ती आहेत. याद्वारे सर्व मानवजातीला दाखवले जाते, की तो स्वतः देव आहे, तो स्वतः देव आहे ज्याने देह धारण केला आहे, कोणीही त्याचा अपमान करणार नाही व कोणीही त्याच्या वचनाद्वारे केलेल्या न्यायाला ओलांडू शकत नाही आणि अंधाराची कोणतीही शक्ती त्याच्या अधिकारावर विजय मिळवू शकत नाही. तो असे वचन आहे जो देह झाला आहे, त्याचा अधिकार व त्याने वचनाद्वारे केलेला न्याय या कारणांमुळे मनुष्य पूर्णपणे त्याच्या अधीन जातो. त्याच्या देहधारी देहाने केलेले कार्य हा त्याच्याकडे असलेला अधिकार आहे. तो देह धारण करण्याचे कारण म्हणजे देहालाही अधिकार असू शकतो आणि तो मानवजातीमध्ये व्यावहारिक रीतीने कार्य करण्यास सक्षम आहे, अशा प्रकारे की ते मनुष्याला दृश्यमान व मूर्त आहे. सर्व अधिकार असलेल्या देवाच्या आत्म्याने प्रत्यक्षपणे केलेल्या कार्यापेक्षा हे कार्य अधिक वास्तविक आहे आणि त्याचे परिणामही स्पष्ट आहेत. याचे कारण असे, की देवाचा देहधारी देह व्यावहारिक मार्गाने बोलू व कार्य करू शकतो. त्याच्या देहाच्या बाह्य स्वरूपाला कोणताही अधिकार नाही आणि मनुष्य त्याच्याकडे जाऊ शकतो, उलटपक्षी त्याच्या मूलतत्त्वाला अधिकार असतो, परंतु त्याचा अधिकार कोणालाही दिसत नाही. जेव्हा तो बोलतो व कार्य करतो, तेव्हा मनुष्य त्याच्या अधिकाराचे अस्तित्व शोधू शकत नाही; हे त्याला व्यावहारिक स्वरूपाचे कार्य करण्यास अधिक सुकर करते. हे सर्व व्यावहारिक कार्य परिणाम साध्य करू शकते. त्याच्याकडे अधिकार आहे हे कोणाही मनुष्याला समजत नाही किंवा त्याचा अपमान करू शकत नाही हे मनुष्य पाहू शकत नाही किंवा त्याचा क्रोध पाहू शकत नाही, तरीही तो त्याच्या पडद्यामागील अधिकाराद्वारे, त्याच्या छुप्या क्रोधाद्वारे आणि तो उघडपणे बोलत असलेल्या वचनांद्वारे त्याच्या वचनांचे अपेक्षित परिणाम साध्य करतो. दुसऱ्या शब्दांत, त्याच्या आवाजाचा स्वर, त्याच्या बोलण्याचा कठोरपणा व त्याच्या वचनांमधील सर्व शहाणपणामुळे, मनुष्याला पूर्ण खात्री पटते. अशा प्रकारे, मनुष्य देहधारी देवाच्या वचनाच्या अधीन जातो, ज्याला वरचेवर अधिकार नसतो, ज्यामुळे मनुष्याला वाचवण्याचे देवाचे उद्दिष्ट पूर्ण होते. त्याच्या देहधारणेच्या महत्त्वाचा हा आणखी एक पैलू आहे: अधिक वास्तविकपणे बोलणे आणि त्याच्या वचनांच्या वास्तविकतेचा मनुष्यावर परिणाम होऊ देणे, जेणेकरून मनुष्य देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचा साक्षीदार होऊ शकेल. म्हणूनच, जर हे कार्य देहधारणेद्वारे केले गेले नसते, तर ते कोणतेच परिणाम साध्य करू शकणार नाही व पापी लोकांना पूर्णपणे वाचवू शकणार नाही. जर देवाने देह धारण केला नसता, तर तो आत्मा राहिला असता, जो मनुष्यासाठी अदृश्य आणि अमूर्त दोन्ही आहे. मनुष्य हा देहातील प्राणी असल्याने, तो व देव दोन वेगवेगळ्या जगांमधील आहेत आणि वेगळ्या स्वभावांचे आहेत. देवाचा आत्मा मनुष्याशी विसंगत आहे, जो देहातील आहे व त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा कोणताही मार्ग नाही, मनुष्य आत्मा धारण करण्यास असमर्थ आहे हे तर सांगायलाच नको. असे असल्याने, देवाचा आत्मा त्याचे मूळ कार्य करण्यासाठी एक निर्मिलेला प्राणी बनला पाहिजे. देव सर्वोच्च स्थानावर जाऊ शकतो आणि स्वतःला मानव प्राणी बनण्याइतका नम्र बनवू शकतो, मानवजातीमध्ये कार्य करू शकतो व त्यांच्यामध्ये राहू शकतो, परंतु मनुष्य सर्वोच्च स्थानावर जाऊ शकत नाही आणि आत्मा बनू शकत नाही व त्याने सर्वात खालच्या ठिकाणी उतरणे तर दूरच. म्हणूनच देवाने त्याचे कार्य पार पाडण्यासाठी देह धारण केला पाहिजे. त्याच प्रकारे, पहिल्या देहधारणेच्या वेळी, केवळ देहधारी देवाचा देहच वधस्तंभावर खिळून मनुष्याची सुटका करू शकला, तर देवाच्या आत्म्याला मनुष्यासाठी पापार्पण म्हणून वधस्तंभावर खिळण्याचा कोणताही मार्ग नव्हता. देव मनुष्यासाठी पापार्पण म्हणून सेवा करण्यासाठी थेट देह धारण करू शकतो, परंतु देवाने त्याच्यासाठी तयार केलेले पापार्पण घेण्यासाठी मनुष्य थेट स्वर्गात जाऊ शकत नाही. असे असताना, देवाला स्वर्ग आणि पृथ्वीच्या दरम्यान काही वेळा ये जा करण्यास सांगणे शक्य आहे, हे तारण घेण्यासाठी मनुष्याने स्वर्गात जाणे शक्य नाही, कारण मनुष्य पडला आहे व त्याशिवाय, मनुष्य स्वर्गात जाऊच शकत नाही, पापार्पण प्राप्त करणे तर दूरच. म्हणून, येशूने मानवजातीमध्ये येणे आणि वैयक्तिकरीत्या असे कार्य करणे आवश्यक होते जे मनुष्याला शक्य नव्हते. प्रत्येक वेळी जेव्हा देव देह धारण करतो, तेव्हा ते पूर्णपणे आवश्यक असते. जर देवाच्या आत्म्याद्वारे कोणतेही टप्पे थेट पार पाडता आले असते, तर त्याने देहधारी होण्याचा अपमान सहन केला नसता.

कार्याच्या या अंतिम टप्प्यात, वचनाद्वारे परिणाम साध्य केले जातात. वचनाद्वारे, मनुष्याला अनेक रहस्ये आणि देवाने मागील पिढ्यांमध्ये केलेले कार्य समजते; वचनाद्वारे, मनुष्याला पवित्र आत्म्याकडून ज्ञान प्राप्त होते; वचनाद्वारे, मनुष्याला भूतकाळातील पिढ्यांनी कधीही न उलगडलेली रहस्ये समजतात, तसेच भूतकाळातील संदेष्टे व प्रेषितांचे कार्य आणि त्यांनी ज्या तत्त्वांद्वारे कार्य केले ते समजते; वचनाद्वारे, मनुष्याला स्वतः देवाची प्रवृत्ती, तसेच मनुष्याची बंडखोरी व प्रतिकारशक्तीदेखील समजते आणि त्याला स्वतःचे मूलतत्त्व कळते. कार्याच्या या टप्प्यांद्वारे व उच्चारलेल्या सर्व वचनांद्वारे, मनुष्याला आत्म्याचे कार्य, अवतारी देवाचा देह करत असलेले कार्य आणि त्याहूनही अधिक, त्याच्या संपूर्ण प्रवृत्तीची ओळख होते. देवाच्या सहा हजार वर्षांतील व्यवस्थापनाच्या कार्याचे तुझे ज्ञानही या वचनाद्वारे प्राप्त केले जाते. पूर्वीच्या धारणांचे ज्ञान आणि त्या बाजूला ठेवण्यात मिळालेले यशही या वचनाद्वारेच प्राप्त झाले नाही का? मागील टप्प्यात, येशूने संकेत दाखवले व चमत्कार केले, परंतु या टप्प्यात कोणतेही संकेत दाखवले नाहीत आणि चमत्कार केले नाहीत. देव संकेत व चमत्कार का प्रकट करत नाही हीदेखील वचनाद्वारे प्राप्त झालेली तुझी समज नव्हती का? म्हणूनच, या टप्प्यात उच्चारलेली वचने भूतकाळातील प्रेषित आणि संदेष्ट्यांनी केलेल्या कार्याला मागे टाकतात. संदेष्ट्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्यादेखील हा परिणाम साध्य करू शकल्या नसत्या. संदेष्टे फक्त भविष्यवाण्या बोलले, भविष्यात काय घडेल याबद्दल ते बोलले, परंतु त्या वेळी देव करू इच्छित असलेल्या कार्याबद्दल बोलले नाही. किंवा ते मानवजातीला त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी अथवा मानवजातीला सत्य सांगण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी रहस्ये प्रकट करण्यासाठी बोलले नाहीत, जीवन देण्याइतके बोलणे तर दूरच. या टप्प्यात उच्चारलेल्या वचनांमध्ये भविष्यवाणी व सत्य आहे, परंतु मुख्यतः ही वचने मनुष्याला जीवन प्रदान करतात. सध्याची वचने संदेष्ट्यांच्या भविष्यवाण्यांसारखी नाहीत. हा मनुष्याच्या जीवनासाठी, मनुष्याच्या जीवनाची प्रवृत्ती बदलण्यासाठी कार्याचा एक टप्पा आहे आणि भविष्यवाणी बोलण्यासाठी नाही. पहिला टप्पा म्हणजे यहोवाचे कार्य: त्याचे कार्य पृथ्वीवर देवाची उपासना करण्यासाठी मनुष्याकरिता मार्ग तयार करणे हे होते. पृथ्वीवरील कार्यासाठी मूळ स्थान शोधण्याच्या कार्याची सुरुवात होती. त्या वेळी, यहोवाने इस्रायली लोकांना शब्बाथ पाळण्यास, त्यांच्या पालकांचा आदर करण्यास व एकमेकांसोबत शांतीने राहण्यास शिकवले. कारण त्यावेळच्या लोकांना मनुष्य कशाने घडला हे समजत नव्हते किंवा पृथ्वीवर कसे जगायचे हेही समजत नव्हते. कार्याच्या पहिल्या टप्प्यात मानवजातीला त्यांचे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणे त्याच्यासाठी आवश्यक होते. यहोवाने त्यांच्याशी जे काही बोलले ते सर्व मानवजातीला पूर्वी माहीत नव्हते किंवा त्या गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या. त्या वेळी, देवाने अनेक संदेष्ट्यांना भविष्यवाण्या सांगण्यासाठी उभे केले आणि त्या सर्वांनी यहोवाच्या मार्गदर्शनाखाली असे केले. देवाच्या कार्यात ही फक्त एक गोष्ट होती. पहिल्या टप्प्यात, देवाने देह धारण केला नाही व म्हणून त्याने सर्व जमाती आणि राष्ट्रांना संदेष्ट्यांद्वारे सूचना दिल्या. जेव्हा येशूने त्याच्या काळात कार्य केले, तेव्हा तो आजच्या दिवसाइतका बोलला नाही. शेवटच्या दिवसांत वचनाच्या कार्याचा हा टप्पा पूर्वीच्या युगांमध्ये व पिढ्यांमध्ये कधीही झाला नाही. यशया, दानिएल आणि योहान यांनी अनेक भविष्यवाण्या सांगितल्या असल्या तरी, त्यांच्या भविष्यवाण्या आता उच्चारल्या जाणाऱ्या वचनांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या होत्या. ते जे बोलले त्या फक्त भविष्यवाण्या होत्या, पण आता उच्चारलेली वचने तशी नाहीत. मी आता बोलत असलेल्या सर्व गोष्टी भविष्यवाण्यांमध्ये बदलल्या, तर तुम्ही समजू शकाल का? समजा मी जे बोललो ते माझ्या गेल्यानंतरच्या गोष्टींबद्दल आहे, तर मग तुला कसे समजेल? वचनाचे कार्य येशूच्या काळात किंवा नियमशास्त्राच्या युगात कधीही केले गेले नाही. कदाचित काही जण म्हणतील, “यहोवाने त्याच्या कार्याच्या वेळीही वचने उच्चारली नाहीत का? येशूने, तो कार्य करत असताना आजार बरे करणे, भुते काढणे, संकेत दाखवणे व चमत्कार करणे या व्यतिरिक्त, वचनेदेखील उच्चारली नाहीत का?” सांगितलेल्या गोष्टींमध्ये फरक आहे. यहोवाने उच्चारलेल्या वचनांचे मूलतत्त्व काय होते? तो केवळ अशा मानवजातीला पृथ्वीवर त्यांचे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करत होता, ज्यांनी जीवनातील आध्यात्मिक गोष्टींना स्पर्श केला नव्हता. यहोवा जेव्हा बोलला तेव्हा तो सर्व ठिकाणच्या लोकांना सूचना देण्यासाठी बोलत होता असे का म्हटले जाते? “सूचना” या शब्दाचा अर्थ स्पष्टपणे सांगणे आणि थेट आदेश देणे असा होतो. त्याने मनुष्याला जीवन दिले नाही; उलट, त्याने फक्त मनुष्याचा हात धरला व बोधकथांचा फारसा उपयोग न करता त्याचा आदर कसा करावा हे शिकवले. इस्रायलमध्ये यहोवाने जे कार्य केले ते मनुष्याला हाताळण्याचे किंवा त्याला शिस्त लावण्याचे अथवा न्याय व ताडण करण्याचे नव्हते, तर ते त्याला मार्गदर्शन करण्यासाठी होते. यहोवाने मोशेला त्याच्या लोकांना वाळवंटात मान्ना गोळा करायला सांगण्याची आज्ञा दिली. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी त्यांना त्या दिवशी खाण्याइतपत मान्ना गोळा करायचा होता. मान्ना दुसर्‍या दिवसापर्यंत ठेवता येत नव्हता, कारण ते नंतर खराब होत असे. त्याने लोकांना व्याख्यान दिले नाही किंवा त्यांचे स्वभाव उघड केले नाहीत अथवा त्यांनी त्यांच्या कल्पना आणि विचार उघड केले नाहीत. त्याने लोकांना बदलले नाही तर त्यांचे जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले. त्या काळातील लोक लहान मुलांसारखे होते, त्यांना काहीही समजत नव्हते व केवळ काही मूलभूत यांत्रिक हालचाली करण्यास सक्षम होते आणि म्हणूनच यहोवाने केवळ लोकसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी नियमशास्त्रे ठरवण्याचे कार्य केले.

सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी, जे लोक खऱ्या मनाने शोध घेतात त्यांना आज केलेल्या कार्याचे ज्ञान मिळावे आणि पूर्ण खात्री पटावी, यासाठी प्रत्येक टप्प्यात केलेल्या कार्याची अंतर्गत कथा, मूलतत्त्व व त्याचे महत्त्व तुला स्पष्टपणे समजले पाहिजे. जेणेकरून, तुझी सहभागिता ऐकून, इतरांना यहोवाचे कार्य, येशूचे कार्य आणि त्याहूनही अधिक, आजच्या देवाचे सर्व कार्य, तसेच या तीन टप्प्यांमधील कार्याचे संबंध व फरक समजू शकतील. जेणेकरून त्यांनी ऐकणे पूर्ण केल्यावर, इतरांना दिसेल की तीन टप्पे एकमेकांमध्ये व्यत्यय आणत नाहीत, परंतु सर्व एकाच आत्म्याचे कार्य आहे. जरी ते वेगवेगळ्या युगात कार्य करत असले आणि ते करत असलेल्या कार्याचा आशय वेगळा असला आणि ते जी वचने उच्चारतात ती वेगळी असली, तरीही ते ज्या तत्त्वांनुसार कार्य करतात ती तत्त्वे एकच आहेत. या गोष्टी सर्वात महान दृष्टांत आहेत जे देवाचे अनुसरण करणाऱ्या सर्व लोकांना समजले पाहिजे.

मागील:  देहधारणेचे रहस्य (३)

पुढील:  दोन देहधारण हे देहधारणाचे महत्त्व पूर्ण करतात

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger