दोन देहधारण हे देहधारणाचे महत्त्व पूर्ण करतात
देवाने केलेल्या कार्याच्या प्रत्येक टप्प्याचे स्वतःचे व्यावहारिक महत्त्व आहे. त्यावेळी, जेव्हा येशू आला तेव्हा तो पुरुषाच्या रूपात आला आणि जेव्हा देव या वेळी आला, तेव्हा त्याचे रूप स्त्रीचे आहे. यावरून, आपण पाहू शकता, की स्त्री आणि पुरुष या देवाच्या दोन्ही निर्मिती त्याच्या कार्यात उपयोगी पडू शकतात आणि त्याच्यामध्ये लिंगभेद नसतो. जेव्हा त्याचा आत्मा येतो, तेव्हा तो त्याला पाहिजे असलेला कोणताही देह धारण करू शकतो आणि तो देह त्याचे प्रतिनिधित्व करू शकतो; पुरुष असो वा स्त्री, जोपर्यंत तो देहधारी आहे तोपर्यंत तो देवाचे प्रतिनिधित्व करू शकतो. जेव्हा येशू आला, तेव्हा जर तो स्त्रीच्या रूपात दिसला असता, दुसऱ्या शब्दांत, जर पवित्र आत्म्याने एका लहान मुलाला नव्हे, तर मुलीला जन्म दिला असता, तरीही कार्याचा तो टप्पा पूर्ण झालाच असता. तसे झाले असते, तर कार्याचा सध्याचा टप्पा त्याऐवजी पुरुषाकडून पूर्ण करावा लागला असता, पण तरीही सर्व कार्य पूर्ण झाले असते हे नक्की. प्रत्येक टप्प्यात केलेल्या कार्याचे स्वतःचे महत्त्व असते; कार्याच्या कोणत्याही टप्प्याची पुनरावृत्ती होत नाही किंवा दुसऱ्याशी संघर्ष होत नाही. त्यावेळी, येशू त्याचे कार्य करत असताना, त्याला एकुलता एक पुत्र म्हटले गेले होते आणि “पुत्र” म्हणजे पुल्लिंग. सध्याच्या काळात एकुलत्या एका पुत्राचा उल्लेख का नाही? कारण कार्याच्या आवश्यकतांमुळे येशूचे लिंग बदलणे आवश्यक ठरले आहे. देवामध्ये लिंगभेद नसतो. तो त्याचे कार्य त्याच्या इच्छेनुसार करतो आणि त्याचे कार्य करताना तो कोणत्याही बंधनांच्या अधीन नसतो, तर तो विशेषत्वाने मुक्त असतो. तरीही कार्याच्या प्रत्येक टप्प्याचे स्वतःचे व्यावहारिक महत्त्व असते. देव दोनदा देहधारी झाला आणि शेवटच्या काळात त्याचे देहधारण ही शेवटची वेळ आहे, हे स्वयंस्पष्ट आहे. तो त्याची सर्व कृत्ये स्पष्ट करण्यासाठी आला आहे. जर या टप्प्यात मनुष्याला साक्ष देण्यासाठी वैयक्तिकरीत्या कार्य करण्यासाठी तो देहधारी झाला नसता, तर देव केवळ पुरुष आहे, स्त्री नाही या धारणेला मनुष्य सदैव चिकटून राहिला असता. याआधी, सर्व मनुष्यमात्रांचा असा विश्वास होता, की देव केवळ पुरुष असू शकतो आणि स्त्रीला देव म्हणता येणार नाही, कारण पुरुषांना स्त्रियांवर अधिकार आहे, असेच सर्व मानवजात मानत असे. त्यांचा असा विश्वास होता, की कोणतीही स्त्री अधिकार प्राप्त करू शकत नाही, केवळ पुरुषच ते प्राप्त करू शकतात. इतकेच काय, त्यांनी असेही म्हटले, की पुरुष स्त्रीचा प्रमुख आहे आणि स्त्रीने पुरुषाच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे आणि ती त्याची अवज्ञा करू शकत नाही. भूतकाळात, जेव्हा असे म्हटले जात होते, की पुरुष हा स्त्रीचा प्रमुख आहे, तेव्हा हे आदाम आणि हव्वा यांच्यासाठी म्हटले गेले होते, ज्यांना सर्पाने फसवले होते—ज्यांना यहोवाने सुरुवातीला निर्माण केले होते, ते पुरुष व स्त्री यांच्यासाठी म्हटले गेले नव्हते. अर्थात, स्त्रीने आपल्या पतीच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम केले पाहिजे आणि पतीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि त्यांची काळजी घेणे शिकले पाहिजे. हे यहोवाने ठरवून दिलेले नियम आणि आज्ञा आहेत, ज्यांचे मानवजातीने पृथ्वीवरील त्यांच्या जीवनात पालन केले पाहिजे. यहोवा स्त्रीला म्हणाला, “तुझा ओढा तुझ्या नवर्याकडे राहायला हवा आणि त्याने तुझ्यावर स्वामित्व गाजवले पाहिजे.” तो असे बोलला जेणेकरून, मानवजात (म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही) यहोवाच्या अधिपत्याखाली सामान्य जीवन जगू शकेल आणि मानवजातीच्या जीवनाची एक रचना असेल आणि ती त्यांच्या योग्य क्रमातून बाहेर पडणार नाही. म्हणून, पुरुष आणि स्त्रीने कसे वागले पाहिजे यासाठी यहोवाने योग्य नियम केले, मात्र हे केवळ पृथ्वीवर राहणाऱ्या निर्मिलेल्या सर्व प्राण्यांच्या संदर्भात होते आणि देहधारी देवाचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. देव हा त्याच्या निर्मिलेल्या प्राण्यांसारखा कसा असू शकतो? त्याची वचने ही केवळ त्याने निर्मिती केलेल्या मानवजातीसाठी होती; मानवजातीने सामान्य जीवन जगावे, यासाठी त्याने स्त्री आणि पुरुषांसाठी नियम स्थापित केले. सुरुवातीला, जेव्हा यहोवाने मानवजातीची निर्मिती केली, तेव्हा त्याने पुरुष आणि स्त्री असे दोन प्रकारचे मनुष्य निर्माण केले आणि म्हणून त्याच्या देहधारींमध्ये पुरुष आणि स्त्री अशी विभागणी आहे. त्याने आदाम आणि हव्वा यांना सांगितलेल्या वचनांवर आधारित त्याचे कार्य ठरवले नाही. दोन वेळा त्याने देहधारण केला, हे त्याने मनुष्यजातीला प्रथम निर्माण केले तेव्हाच्या त्याच्या विचारसरणीनुसार पूर्णपणे निर्धारित केले आहे; म्हणजेच, त्याने आपल्या दोन देहधारणांचे कार्य पुरुष आणि स्त्री हे भ्रष्ट होण्यापूर्वी त्यांच्यावर आधारित पूर्ण केले आहे. सर्पाने फसवलेल्या आदाम आणि हव्वेला यहोवाने सांगितलेली वचने जर मनुष्याने आत्मसात केली आणि ते देवाच्या देहधारणेच्या कार्यात लागू केले, तर येशूलाही आपल्या पत्नीवर जसे प्रेम करावे, तसे प्रेम करावे लागणार नाही का? असे झाले, तर देव तरीही देव असेल का? आणि असे असेल तरीही, तो त्याचे कार्य पूर्ण करू शकेल का? जर देहधारी देव स्त्री असणे चुकीचे असेल, तर देवाने स्त्रीची निर्मिती करणे ही सर्वात मोठी चूक ठरली नसती का? जर लोक अजूनही मानत असतील, की देवाने स्त्री म्हणून देहधारण करणे चुकीचे आहे, तर येशू, ज्याने लग्न केले नाही आणि म्हणून आपल्या पत्नीवर प्रेम केले नाही, तो सध्याच्या देहधारणाइतकाच चुकत नाही का? सध्याच्या काळातील देवाच्या देहधारणाचे सत्य जोखण्यासाठी तू यहोवाने हव्वेला बोललेली वचने वापरतोस, तर कृपेच्या युगात देहधारी झालेल्या प्रभू येशूचा न्याय करण्यासाठी यहोवाने आदामासाठी उच्चारलेली वचने वापरणे आवश्यक आहे. ही एकच बाब नाही का? जर तू प्रभू येशूचे मोजमाप त्या पुरुषानुसार करत आहेस ज्याला सर्पाने फसवले नव्हते, तर तू आजच्या देहधारी देवाच्या सत्याचा न्याय सर्पाने फसवलेल्या स्त्रीनुसार करू शकत नाहीस. हे अन्यायकारक असेल! अशा प्रकारे देवाचे मोजमाप करणे हे सिद्ध करते, की तुझ्याकडे तर्कशुद्धतेचा अभाव आहे. जेव्हा यहोवा दोनदा देहधारी बनला, तेव्हा त्याच्या देहाचे लिंग पुरुष आणि स्त्री यांच्याशी संबंधित होते ज्यांना सर्पाने फसवले नव्हते; सर्पाने फसवले नाही अशा पुरुष आणि स्त्रीच्या अनुषंगाने तो दोनदा देहधारी झाला. असे समजू नका, की येशूचे पुरुषत्व आदामासारखेच होते, ज्याला सर्पाने फसवले होते. दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, ते दोन वेगळ्या स्वभावाचे पुरुष आहेत. येशूचे पुरुषत्व तो सर्व स्त्रियांचा प्रमुख आहे परंतु सर्व पुरुषांचा नाही हे नक्कीच सिद्ध तर करत नाही ना? तो सर्व यहुद्यांचा (स्त्री व पुरुष दोघांचाही) राजा नाही का? तो स्वतः देव आहे, तो केवळ स्त्रीचा प्रमुख नाही तर पुरुषाचाही प्रमुख आहे. तो सर्व प्राणीमात्रांचा प्रभू आहे आणि सर्व प्राण्यांचा प्रमुख आहे. तू येशूचे पुरुषत्व हे स्त्रीच्या प्रमुखाचे प्रतीक कसे ठरवू शकता? ही निंदा नाही का? येशू हा एक पुरुष आहे जो भ्रष्ट झालेला नाही. तो देव आहे; तो ख्रिस्त आहे; तो प्रभू आहे. तो भ्रष्ट झालेल्या आदामासारखा पुरुष कसा असू शकतो? येशू हा देवाच्या सर्वात पवित्र आत्म्याने धारण केलेला देह आहे. आदामाचे पुरुषत्व असलेला तो देव आहे असे तू कसे म्हणू शकतोस? अशावेळी देवाची सगळी कार्ये चुकली नसती का? सापाने फसवलेल्या आदामाचे पुरुषत्व यहोवाने येशूमध्ये समाविष्ट केले असते का? सध्याच्या काळातील देहधारणा हे देहधारी देवाच्या कार्याचे आणखी एक उदाहरण नाही का, ज्याचे लिंग येशूपेक्षा वेगळे आहे परंतु स्वभावाने त्याच्यासारखा आहे? देहधारी देव स्त्री असू शकत नाही असे म्हणण्याचे धाडस तू अजूनही करतोस का, कारण सर्पाकडून प्रथम स्त्री फसवली गेली होती? स्त्री ही सर्वात अपवित्र आणि मानवजातीच्या भ्रष्टतेचे उगमस्थान असल्याने, देव स्त्री म्हणून देहधारी होऊ शकत नाही, असे म्हणण्याचे धाडस तू अजूनही करतोस का? “स्त्रीने सदैव पुरुषाची आज्ञा पाळावी आणि ती कधीच देवाचे प्रकटीकरण किंवा प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करू शकत नाही” असे अद्यापही म्हणण्याचे धाडस तू करतोस का? तुला पूर्वी समजले नव्हते, परंतु तू आता देवाच्या कार्याची, विशेषतः देहधारी देवाची निंदा करत राहू शकतोस का? जर हे तुला कळत नसेल, तर जीभ सांभाळ, नाही तर तुझा मूर्खपणा आणि अज्ञान समोर येईल आणि तुझी कुरूपता उघड होईल. तुला सर्व काही समजले आहे, असे समजू नकोस. मी तुला सांगतो, की तू पाहिलेले आणि अनुभवलेले सर्व माझ्या व्यवस्थापन योजनेचा हजारावा अंश समजून घेण्यासाठीदेखील अपुरे आहे. मग तू इतके गर्विष्ठ का वागतोस? तुझ्याकडे असलेली थोडीशी प्रतिभा आणि अल्पसे ज्ञान हे येशूला त्याच्या कार्याच्या एका सेकंदात वापरण्यासाठीदेखील अपुरे आहे! तुला प्रत्यक्षात किती अनुभव आहे? तू तुझ्या जीवनात जे काही पाहिले आहेस आणि जे सर्व काही ऐकले आहेस आणि तू ज्याची कल्पना केली आहेस ते मी एका क्षणात केलेल्या कार्यापेक्षा कमी आहे! तू यात दोष न शोधणे चांगले. तू हवे तेवढे गर्विष्ठ असलास, परंतु तू मुंगीच्यादेखील बरोबरीचा नसलेला प्राणी आहेस! तू जे काही तुझ्या पोटात धरतोस ते मुंगीच्या पोटात असलेल्यापेक्षा कमी असते! असा विचार करू नकोस, की काही अनुभव आणि ज्येष्ठता प्राप्त केल्यामुळे तुला तावातावाने आणि मोठ्या बोलण्याचा अधिकार मिळेल. तुझा अनुभव आणि तुझी ज्येष्ठता हे मी उच्चारलेल्या वचनांचे उत्पादन नाही का? ते तुझे स्वतःचे श्रम आणि परिश्रमाच्या बदल्यात होते यावर तुझा विश्वास आहे का? आज, तू पाहत आहेस, की मी देहधारी झालो आहे आणि केवळ या कारणास्तव तुझ्यामध्ये संकल्पनांचा भरणा आहे आणि त्यातून धारणांना तर अंतच नाही. जर मी देहधारी नसतो, तर जरी तुझ्याकडे विलक्षण प्रतिभा असती, तरीही तुझ्याकडे इतक्या संकल्पना नसत्या; आणि यातूनच तुझ्या धारणा निर्माण होत नाहीत का? जर येशू त्या पहिल्या वेळी देह झाला नसता, तर तुला देहधारणेबद्दल कळले तरी असते का? पहिल्या देहधारीने तुला हे ज्ञान दिले, म्हणूनच तू दुसऱ्या देहधारीचा न्याय करण्याचा उद्धटपणा करत नाही का? आज्ञाधारक अनुयायी होण्याऐवजी तू त्याची चिकित्सा का करत आहेस? जेव्हा तू या प्रवाहात प्रवेश केलास आणि देहधारी देवासमोर आलास, तर तो तुला त्याचे संशोधन करण्याची परवानगी देईल का? तू तुझ्या स्वतःच्या कौटुंबिक इतिहासाविषयी संशोधन करू शकतोस, परंतु तू जर देवाच्या “कौटुंबिक इतिहासा” विषयी संशोधन करण्याचा प्रयत्न केलास तर आजचा देव तुला असा अभ्यास करण्याची परवानगी देईल का? तू आंधळा नाहीस का? तू स्वतःचाच अवमान करत नाहीस का?
जर केवळ येशूचे कार्य केले गेले असते आणि शेवटच्या काळातील या टप्प्यात कार्याची जोड त्याला दिली गेली नसती, तर, मनुष्य सदैव या धारणेला चिकटून राहील, की केवळ येशू हाच देवाचा एकमेव पुत्र आहे, म्हणजेच देवाचा एकच पुत्र आहे आणि त्यानंतर जो कोणी दुसर्या नावाने येतो तो देवाचा एकुलता एक पुत्र नसेल, मग स्वतः देव असणे तर दूरच. मनुष्याची अशी धारणा असते, की जो कोणी पापार्पण म्हणून सेवा करतो किंवा जो देवाच्या वतीने सत्ता स्वीकारतो आणि सर्व मानवजातीची सुटका करतो, तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. असे काही आहेत ज्यांचा असा विश्वास आहे, की जोपर्यंत येणारा पुरुष आहे तोपर्यंत तो देवाचा एकुलता एक पुत्र आणि देवाचा प्रतिनिधी मानला जाऊ शकतो. असे म्हणणारेदेखील काही आहेत, की येशू हा यहोवाचा पुत्र, त्याचा एकुलता एक पुत्र आहे. या केवळ फुलवून सांगितलेल्या धारणा नाहीत का? जर कार्याचा हा टप्पा शेवटच्या युगात पूर्ण झाला नसता, तर देवाच्या दिशेने संपूर्ण मानवजात गडद सावलीखाली सापडली असती. असे झाले असते, तर पुरुष स्वतःला स्त्रीपेक्षा वरचढ समजेल आणि स्त्रिया कधीच डोके ताठ ठेवू शकणार नाहीत आणि मग एका स्त्रीलाही वाचवता येणार नाही. लोक नेहमी मानतात, की देव पुरुष आहे, एवढेच नव्हे तर त्याने सदैव स्त्रीला तुच्छ लेखले आहे आणि तो तिचे तारण करणार नाही. असे असते तर, यहोवाने निर्माण केलेल्या आणि भ्रष्ट झालेल्या सर्व स्त्रियांना वाचवण्याची संधी कधीच मिळणार नाही, हे खरे ठरणार नाही का? मग यहोवाने स्त्री निर्माण करणे, म्हणजेच हव्वेला निर्माण करणे हे व्यर्थ ठरले नसते का? आणि स्त्री अनंतकाळ नष्ट होणार नाही का? या कारणास्तव, केवळ स्त्रीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचे रक्षण करण्यासाठी शेवटच्या काळातील कार्याचा टप्पा हाती घेतला जातो. देव जर स्त्री रूपात अवतरला असेल, तर तो केवळ स्त्रीला वाचवण्यासाठी आहे, असा विचार जर कोणी केला, तर तो खरोखरच मूर्ख ठरेल!
आजच्या कार्याने कृपेच्या युगाचे कार्य पुढे सरकले आहे; म्हणजेच, संपूर्ण सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेअंतर्गत कार्य पुढे सरकले आहे. कृपेचे युग संपले असले, तरी देवाच्या कार्यात प्रगती झाली आहे. कार्याचा हा टप्पा कृपेचे युग आणि नियमशास्त्राचे युग यांच्यावर आधारित आहे, असे मी वारंवार का म्हणतो? कारण आजचे कार्य म्हणजे कृपेच्या युगातील निरंतर सुरू राहिलेले कार्य आहे आणि नियमशास्त्राच्या युगात केलेल्या कार्याचीच पुढची प्रगती आहे. हे तीन टप्पे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत, या साखळीतील प्रत्येक दुवा पुढील भागाशी घट्ट जोडलेला आहे. मी असेही का म्हणतो, की कार्याचा हा टप्पा येशूने केलेल्या कार्याच्या पायावरच आहे? समजा, हा टप्पा येशूने केलेल्या कार्यावर उभा राहिला नसता, तर या टप्प्यावर आणखी एकदा वधस्तंभावर खिळले जावे लागले असते आणि मागील टप्प्यातील सुटकेचे कार्य पुन्हा नव्याने करावे लागले असते. हे निरर्थक ठरेल. आणि त्यामुळे कार्य पूर्ण झाले असे नाही, तर युग पुढे सरकले आहे आणि कार्याचा स्तर पूर्वीपेक्षा उंचावला आहे. असे म्हणता येईल, की कार्याचा हा टप्पा नियमशास्त्राच्या युगाच्या पायावर आणि येशूच्या कार्याच्या खडकावर बांधला गेला आहे. देवाचे कार्य टप्प्याटप्प्याने रचले जाते आणि हा टप्पा म्हणजे नवीन सुरुवात नाही. केवळ कामाच्या तीन टप्प्यांचे संयोजन ही सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना मानली जाऊ शकते. या टप्प्यातील कार्य हे कृपेच्या युगातील कार्याच्या पायावरच केले गेले आहे. जर कार्याच्या या दोन टप्प्यांचा संबंध नसेल, तर या टप्प्यात वधस्तंभावर खिळण्याची पुनरावृत्ती का होत नाही? मी मनुष्याची पापे का सहन करत नाही, तर उलट थेट मनुष्याचा न्याय करायला आणि ताडण करायला आलो? माझे आताचे आगमन पवित्र आत्म्यामुळे नसल्याने जर वधस्तंभावर खिळले गेल्यानंतर मनुष्याचा न्याय करण्याचे आणि ताडणाचे माझे कार्य केले नसते, तर मी मनुष्याचा न्याय करण्यास आणि ताडण करण्यास पात्र होणार नाही. याचे नेमके कारण म्हणजे, मी येशूबरोबर आहे आणि मी थेट मनुष्याला ताडण आणि न्याय देण्यासाठी आलेलो आहे. या टप्प्यातील कार्य संपूर्णपणे मागील टप्प्यातील कार्यावर आधारित आहे. म्हणूनच अशा प्रकारचे कार्यच मनुष्याला टप्प्याटप्प्याने तारण प्राप्त करून देऊ शकते. येशू आणि मी एकाच आत्म्यापासून आलो आहोत. जरी आमच्या देहाचे नाते नसले, तरी आमचे आत्मे एक आहेत; जरी आम्ही जे काही करतो आणि जे कार्य हाती घेतो, त्यातील घटक सारखे नसले तरी, आम्ही तत्त्वतः सारखेच आहोत; आमचे देह भिन्न रूपे घेतात, परंतु युगातील बदल आणि आमच्या कार्याच्या वेगवेगळ्या आवश्यकतांमुळे हे असे आहे; आमची सेवाकार्ये एकसारखी नाहीत, म्हणून आम्ही जे कार्य पुढे आणतो आणि आम्ही मनुष्यापुढे प्रकट करतो त्या प्रवृत्तीदेखील भिन्न आहेत. म्हणूनच मनुष्य आज जे पाहतो आणि समजतो, ते भूतकाळाच्या विपरीत आहे, जे युगातील बदलामुळे आहे. ते सर्व लिंग आणि त्यांच्या देहाच्या स्वरूपामध्ये वेगळे आहेत आणि ते एकाच कुटुंबात जन्मलेले नाहीत, एकाच कालावधीतील तर बिलकुलच नाहीत, तरीही त्यांचे आत्मे एक आहेत. त्यांच्या देहांमध्ये रक्ताचे किंवा कोणत्याही प्रकारचे शारीरिक नाते नाही, तरी हे नाकारता येत नाही, की ते दोन वेगवेगळ्या कालखंडातील देहधारी देव आहेत. ते देहधारी देव आहेत हे निर्विवाद सत्य आहे. मात्र, ते समान रक्तरेषेचे नाहीत आणि त्यांच्यामध्ये सामायिक सामान्य मानवी भाषा नाही (एक पुरुष होता जो यहुद्यांची भाषा बोलत होता आणि दुसरी स्त्री होती जी केवळ चीनी बोलत होती). या कारणांमुळेच ते वेगवेगळ्या देशांमध्ये आणि प्रत्येकाला आवडेल असे कार्य करण्यासाठी आणि वेगवेगळ्या कालखंडातही वास्तव्य करत होते. ते एकच आत्मा असूनही, त्यांच्यात एकच सार असूनही, त्यांच्यामध्ये देहाच्या बाह्य कवचांमध्ये पूर्ण समानता नाही. त्यांच्यात जे काही सामायिक आहे, ते म्हणजे मानवता, परंतु त्यांच्या देहाचे बाह्य स्वरूप आणि त्यांच्या जन्माची परिस्थिती याबाबत मात्र ते एकसारखे नाहीत. या गोष्टींचा त्यांच्या संबंधित कार्यावर किंवा मनुष्याला त्यांच्याविषयी असलेल्या ज्ञानावर कोणताही प्रभाव पडत नाही, कारण अंतिम विश्लेषणात, ते एकच आत्मा आहेत आणि कोणीही त्यांना वेगळे करू शकत नाही. जरी त्यांच्यात रक्ताचे नाते नसले, तरीही, त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाकडे त्यांच्या आत्म्याचे अधिकार आहेत, जे त्यांना वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या कार्याचे वाटप करतात आणि त्यांचा देह वेगवेगळ्या रक्तरेषांचे असतात. यहोवाचा आत्मा हा येशूच्या आत्म्याचा पिता नाही आणि येशूचा आत्मा हा यहोवाच्या आत्म्याचा पुत्र नाही: ते एकच आत्मा आहेत. त्याचप्रमाणे, आजचा देहधारी देव आणि येशू यांचे रक्ताचे नाते नाही, परंतु ते एक आहेत, कारण त्यांचे आत्मे एक आहेत. देव दया आणि प्रेमळ दयाळूपणाचे, तसेच मनुष्याला न्याय देण्याचे आणि ताडणाचे आणि मनुष्याला शाप देण्याचे कार्य करू शकतो; आणि शेवटी, तो जगाचा नाश करण्याचे आणि दुष्टांना शिक्षा करण्याचे कार्य करू शकतो. हे सर्व तो स्वतः करत नाही का? ही देवाची सर्वशक्तिमानता नाही का? तो मनुष्यासाठी नियम जाहीर करण्यास आणि त्याला आज्ञा देण्यासदेखील समर्थ होता, तसेच तो सुरुवातीच्या इस्रायली लोकांना पृथ्वीवर त्यांचे जीवन जगण्यास आणि मंदिर व वेदी बांधण्यात मार्गदर्शन करण्यास आणि सर्व इस्रायली लोकांना त्याच्या अधिपत्याखाली ठेवण्यास समर्थ होता. त्याच्या अधिकारामुळे तो दोन हजार वर्षे इस्रायली लोकांसोबत पृथ्वीवर राहिला. इस्रायली लोकांनी त्याच्याविरुद्ध बंड करण्याचे धाडस केले नाही; सर्वांनी यहोवाचा आदर केला आणि त्याच्या आज्ञा पाळल्या. त्याच्या अधिकाराने आणि त्याच्या सर्वशक्तिमानतेने असे कार्य केले गेले. मग, कृपेच्या युगात, येशू संपूर्ण पतित मानवजातीची (केवळ इस्रायली लोकांचीच नव्हे) सुटका करण्यासाठी आला. त्याने मनुष्याबद्दल दया आणि प्रेमळपणा दाखवला. कृपेच्या युगात मनुष्याने पाहिलेला येशू प्रेमळ दयाळूपणाने भरलेला होता आणि तो मनुष्यावर निरंतर प्रेम करत होता, कारण तो मनुष्यजातीला पापापासून वाचवण्यासाठी आला होता. या काळात, देव दयेने आणि प्रेमळ दयाळूपणे मनुष्यासमोर प्रकट झाला; म्हणजेच, तो मनुष्यासाठी पापार्पण बनला आणि मनुष्याच्या पापांसाठी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले जेणेकरून, त्यांना कायमची क्षमा मिळावी. तो दयाळू, कनवाळू, सहनशील आणि प्रेमळ होता. आणि कृपेच्या युगात ज्यांनी येशूचे अनुसरण केले, त्या सर्वांनीही सर्व गोष्टींमध्ये धीर धरण्याचा आणि प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला. ते सहनशील होते आणि मारहाण, शाप किंवा दगडफेक झाल्यानंतरही त्यांनी कधीही उलट लढाई केली नाही. पण अंतिम टप्प्यात यापुढे असे होऊ शकत नाही. जरी येशू आणि यहोवा एकाच आत्म्याचे होते, तरी त्यांचे कार्य पूर्णपणे एकसारखे नव्हते. यहोवाच्या कार्याने युगाचा अंत झाला नाही, परंतु त्याने युगाला मार्गदर्शन केले, पृथ्वीवरील मानवजातीच्या जीवनाची सुरुवात केली आणि आजचे कार्य म्हणजे परराष्ट्रांमधील ज्यांना खोलवर भ्रष्ट केले गेले आहे त्यांच्यावर विजय मिळवणे आणि चीनमधील केवळ देवाच्या निवडलेल्या लोकांचेच नव्हे, तर संपूर्ण विश्वाचे आणि संपूर्ण मानवजातीचे नेतृत्व करणे. हे कार्य केवळ चीनमध्येच केले जात आहे, असे तुला वाटू शकते, परंतु खरे तर परदेशातही त्याचा प्रसार होण्यास सुरुवात झाली आहे. चीनबाहेरील लोक वेळोवेळी खरा मार्ग का शोधतात? कारण आत्मा आधीच कार्य करण्यास तयार आहे आणि आज बोलली गेलेली वचने संपूर्ण विश्वातील लोकांसाठी निर्देशित केली आहेत. यासह अर्धे कार्य आधीच सुरू झाले आहे. जगाच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत, देवाच्या आत्म्याने हे महान कार्य सुरू केले आहे आणि शिवाय वेगवेगळ्या युगांमध्ये आणि वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळे कार्य केले आहे. प्रत्येक युगातील लोकांना त्याची वेगळी प्रवृत्ती दिसते, तो करत असलेल्या वेगवेगळ्या कार्यातून ती स्वाभाविकपणे प्रकट होते. तो देव आहे, दयाळूप्रेमळपणाने भरलेला आहे; तो मनुष्यासाठी पापार्पण आहे आणि मनुष्याचा मेंढपाळ आहे; पण तो मनुष्याचा न्याय, ताडण आणि शापदेखील आहे. तो मनुष्याला पृथ्वीवर दोन हजार वर्षे जगण्यास मदत करू शकतो आणि भ्रष्ट मानवजातीची पापापासून सुटका करू शकतो. आज, तो त्याला न ओळखणाऱ्या मानवजातीवर विजय मिळवण्यास आणि त्यांना चीत करण्यास सक्षम आहे, जेणेकरून सर्वजण त्याच्या पूर्णपणे अधीन राहतील. शेवटी, तो केवळ एक दयाळू आणि प्रेमळ देव नाही, केवळ शहाणपणाचा आणि चमत्कारांचा देव नाही, केवळ पवित्र देव नाही, मनुष्याचा न्याय करणारा देव आहे, हे दाखवण्यासाठी, तो संपूर्ण विश्वातील लोकांमध्ये अशुद्ध आणि अनीतिमान असलेल्या सर्व गोष्टी जाळून टाकेल. मानवजातीतील दुष्टांसाठी, तो आग आहे, न्याय आणि शिक्षा आहे; ज्यांना परिपूर्ण व्हायचे आहे त्यांच्यासाठी तो क्लेश, परिष्करण आणि परीक्षा आहे, तसेच सांत्वन, भरणपोषण, वचनांची तरतूद, व्यवहार आणि छाटणी आहे. आणि ज्यांना बाहेर काढून टाकले जाते, त्यांच्यासाठी तो शिक्षा आणि प्रतिशोध आहे. मला सांगा, देव सर्वशक्तिमान नाही का? तू कल्पना करतोस त्याप्रमाणे केवळ वधस्तंभावर खिळण्यासाठीच नाही, तर कोणतीही आणि सर्व कार्ये करण्यास तो समर्थ आहे. तू देवाबद्दल फार कमी विचार करतोस! त्याच्या वधस्तंभावर खिळण्याच्या माध्यमातून तो केवळ मानवजातीची सुटका करण्याचे कार्य करू शकतो, असा तुझा विश्वास आहे का? आणि त्यानंतर, तू जीवनवृक्षाच्या फळाचे सेवन करण्यासाठी आणि जीवनसरितेचे पाणी पिण्यासाठी स्वर्गापर्यंत त्याच्या मागे जाशील? … ते इतके सोपे असू शकेल? मला सांग, तू काय साध्य केले आहेस? तुझ्याकडे येशूचे जीवन आहे का? तुझी खरोखरच त्याने सुटका केली होती, परंतु वधस्तंभावर खिळण्याचे कार्य स्वतः येशूचे होते. मनुष्य म्हणून तू कोणते कर्तव्य पार पाडले आहेस? तुझ्याकडे केवळ बाह्य धार्मिकता आहे, परंतु तुला त्याचा मार्ग समजत नाही. तू त्याला असेच प्रकट करतोस का? जर तू देवाचे जीवन प्राप्त केले नसशील किंवा त्याच्या नीतिमान प्रवृत्तीची संपूर्णता पाहिली नसशील, तर तू जीवन असल्याचा दावा करू शकत नाहीस आणि तू स्वर्गाच्या राज्याच्या द्वारातून प्रवेश करण्यास पात्र नाहीस.
देव केवळ आत्माच नाही तर तो देहदेखील धारण करू शकतो. एवढेच नव्हे, तर तो गौरवाचे शरीर आहे. येशू, तुम्ही त्याला पाहिले नसले तरी, त्या काळातील यहूदी इस्रायली लोकांनी त्याला पाहिले होते. तो सुरुवातीला दैहिक शरीर होता, परंतु त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर तो गौरवाचे शरीर बनला. तो सर्वव्यापी आत्मा आहे आणि सर्व ठिकाणी कार्य करू शकतो. तो यहोवा किंवा येशू किंवा मशीहा असू शकतो; शेवटी, तो सर्वशक्तिमान देवदेखील बनू शकतो. तो नीतिमत्त्व, न्याय आणि ताडण आहे; तो शाप आणि क्रोध आहे; पण तो दया आणि प्रेमळपणादेखील आहे. त्याने केलेले सर्व कार्य त्याचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे. तो कोणत्या प्रकारचा देव आहे, असे तू म्हणतोस? तू स्पष्ट करू शकत नाहीस. तुला खरोखरच काही स्पष्ट करता येत नसेल, तर तू देवाबद्दल निष्कर्ष काढू नयेस. देवाने एका टप्प्यात सुटकेचे कार्य केले म्हणून तो निरंतर दयाळू आणि प्रेमळ दयाळू देव आहे, असा निष्कर्ष काढू नका. तो केवळ दयाळू आणि प्रेमळ देव आहे, याची तू खात्री बाळगू शकतोस का? जर तो केवळ दयाळू आणि प्रेमळ देव असेल, तर तो शेवटच्या दिवसांत युगाचा अंत का करेल? तो इतकी संकटे का पाठवेल? लोकांच्या धारणा आणि विचारांनुसार, देव शेवटपर्यंत दयाळू आणि प्रेमळ असावा, जेणेकरून मानवजातीच्या अगदी शेवटच्या सदस्याचे तारण होऊ शकेल. पण, देवाला शत्रू मानणाऱ्या या दुष्ट मानवजातीचा नाश करण्यासाठी शेवटच्या दिवसांत तो भूकंप, रोगराई, दुष्काळ यांसारखी मोठी संकटे का पाठवतो? तो मनुष्याला ही संकटे का सहन करू देतो? तो कोणत्या प्रकारचा देव आहे याबद्दल, तुमच्यापैकी कोणीही काही म्हणण्यास धजावत नाही आणि कोणीही हे स्पष्ट करण्यास सक्षम नाही. तो आत्मा आहे याची तू खात्री बाळगू शकतोस का? तो इतर कोणी नसून तो येशूचा देह आहे असे म्हणण्याचे धाडस तुझ्यात आहे का? आणि तो देव आहे जो मनुष्यासाठी कायमचा वधस्तंभावर खिळला जाईल, असे म्हणण्याची तुझी हिंमत आहे का?