नियमशास्त्राच्या युगातील कार्य

यहोवाने इस्रायली लोकांवर केलेल्या कार्याद्वारे मानवजातीमध्ये देवाचे पृथ्वीवरील उगमस्थान स्थापित केले, जेथे तो उपस्थित होता असे हे पवित्र स्थान होते. त्याने त्याचे कार्य इस्रायली लोकांपुरते मर्यादित ठेवले. सुरुवातीला, त्याने इस्रायलच्या बाहेर कार्य केले नाही, परंतु त्याऐवजी त्याने त्याचे कार्यक्षेत्र सीमित ठेवण्यासाठी त्याला योग्य वाटणारे लोक निवडले. इस्रायल याच ठिकाणी देवाने आदाम आणि हव्वा यांना निर्माण केले व याच ठिकाणच्या मातीपासून यहोवाने मनुष्य निर्माण केला; हेच ठिकाण त्याच्या पृथ्वीवरील कार्याचा आधार बनले. नोहाचे वंशज आणि आदामाचे वंशज असलेले इस्रायलचे लोक यहोवाच्या पृथ्वीवरील कार्याचा मानवी रुपातील पाया होते.

या वेळी, इस्रायलमध्ये सुरू असलेल्या यहोवाच्या कार्याचे महत्त्व, उद्दिष्टे आणि पुढील पावले संपूर्ण पृथ्वीवर त्याचे कार्य सुरू करण्यासाठीची होती, ते कार्य इस्रायलला केंद्रस्थानी ठेऊन परराष्ट्रांमध्ये टप्प्याटप्प्याने विस्तारत गेले. तो याच तत्त्वानुसार संपूर्ण विश्वात त्याचे कार्य करत असतो—तो आधी एक नमुना प्रस्थापित करतो व नंतर विश्वातील सर्व लोकांना त्याची सुवार्ता प्राप्त होईपर्यंत त्या गोष्टीचा विस्तार करत राहतो. पहिले इस्रायली लोक नोहाचे वंशज होते. हे लोक केवळ यहोवाच्या श्वासाने संपन्न होते आणि जीवनाच्या मूलभूत गरजांची काळजी घेण्याइतपत पुरेसे त्यांना समजले होते, मात्र यहोवा कोणत्या प्रकारचा देव आहे किंवा मनुष्यासाठी त्याची इच्छा काय आहे हे त्यांना माहीत नव्हते, संपूर्ण सृष्टीच्या प्रभूचा आदर कसा करावा, हे तर त्यांना मुळीच माहीत नव्हते. आपण काही नियम व कायदे पाळायचे आहेत का याबद्दल[अ] किंवा निर्मिलेल्या प्राण्यांनी निर्माणकर्त्यासाठी एखादे कर्तव्य पार पाडायचे आहे का, याबद्दल आदामाच्या वंशजांना काहीही माहीत नव्हते. पतीने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी घाम गाळायचा असतो आणि परिश्रम करायचे असतात व पत्नीने तिच्या पतीच्या अधीन राहून यहोवाने निर्माण केलेल्या मानवजातीचा वंश वाढवत तो पुढे न्यायचा असतो, एवढेच त्यांना माहीत होते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, अशा लोकांकडे फक्त यहोवाचा श्वास होता आणि त्याने दिलेले जीवन होते, मात्र देवाने आखून दिलेल्या नियमशास्त्रांचे पालन कसे करावे किंवा सर्व सृष्टीच्या प्रभूला कसे संतुष्ट करावे याबद्दल त्यांना काहीही माहीत नव्हते. त्यांना अगदीच कमी जाण होती. त्यामुळे जरी त्यांच्या अंतःकरणात कुटिल किंवा कपटी असे काही नसले व त्यांच्यात मत्सर आणि कलह क्वचितच उद्भवत असला, तरीदेखील त्यांना सर्व सृष्टीचा प्रभू यहोवा याबद्दलचे ज्ञान किंवा समज नव्हती. मनुष्याच्या या पूर्वजांना फक्त यहोवाच्या गोष्टी सेवन करायला व यहोवाच्या गोष्टींचा आनंद घेणे एवढेच माहीत होते; मात्र यहोवाचा आदर करणे हे त्यांना माहीत नव्हते; गुडघे टेकून ज्याची उपासना करायची आहे, तो यहोवाच आहे, याची जाणीव त्यांना नव्हती. मग त्यांना त्याची निर्मिती कशी म्हणता येईल? जर असे असेल, तर मग “यहोवा सर्व सृष्टीचा प्रभू आहे” आणि “मनुष्याने त्याचे अस्तित्व प्रत्यक्षात आणावे, त्याचा गौरव करावा व त्याचे प्रतिनिधित्व करावे यासाठी त्याने मनुष्याला निर्माण केले” ही वचने व्यर्थपणेच बोलली गेलेली नाहीत का? यहोवाबद्दल आदर नसलेले लोक त्याच्या गौरवाची साक्ष कसे बनू शकतात? ते त्याच्या गौरवाचे प्रत्यक्ष प्रकटीकरण कसे बनू शकतात? तर मग “मी मनुष्याला माझ्या प्रतिरूपात निर्माण केले आहे” ही यहोवाची वचने दुष्ट सैतानाच्या हातात शस्त्र बनणार नाहीत का? मग ही वचने यहोवाने निर्माण केलेल्या मनुष्यासाठी अपमानास्पद ठरणार नाहीत का? कार्याचा तो टप्पा पूर्ण करण्यासाठी, यहोवाने मानवजातीला निर्माण केल्यानंतर, आदामापासून नोहापर्यंत त्यांना कुठल्याही सूचना किंवा मार्गदर्शन केले नाही. उलट, जलप्रलयाने जगाचा नाश घडून आल्यावरच तो नोहाचे आणि आदामाचे वंशज असणाऱ्या इस्रायली लोकांना औपचारिकपणे मार्गदर्शन करू लागला. इस्रायलमधील त्याचे कार्य व वचनांनी संपूर्ण इस्रायल देशात जीवन जगणाऱ्या सर्व लोकांना मार्गदर्शन केले, त्यामुळे मानवजातीला हे दिसून आले, की यहोवाकडून त्यांना जीवन प्राप्त झाले होते, तसेच धुळीतून एक मनुष्यरुप निर्माण करण्यास आणि त्या मनुष्यात श्वास फुंकण्यास यहोवा सक्षम तर होताच, पण शिवाय तो प्रसंगी मानवजातीला भस्म करू शकतो व तिला शाप देऊ शकतो आणि मानवजातीवर राज्य करण्यासाठी त्याच्या दंडाचा वापर करू शकतो, हेही त्या मनुष्यांना कळले. तसेच, यहोवा दिवसाच्या व रात्रीच्या तासांनुसार पृथ्वीवरील मनुष्याला जीवनाबद्दलचे मार्गदर्शन करू शकतो आणि मानवी समाजामध्ये बोलू शकतो व कार्य करू शकतो, हेदेखील त्यांनी पाहिले. त्याने केलेले कार्य त्याच्या निर्मिलेल्या प्राण्यांना केवळ हे कळवण्यासाठी होते, की मनुष्य मातीतून वर आलेला आहे आणि यहोवाने त्याला वर उचललेले आहे, इतकेच नव्हे तर मनुष्य त्याच्याद्वारे निर्माण झाला आहे, याची जाणीवही त्याला करून द्यायची होती. इतकेच नव्हे तर, विश्वातील सर्वांनी यहोवाचा आदर करावा व त्याला महान मानावे यासाठी इतर लोकांना आणि राष्ट्रांना (ही खरेतर इस्रायलपासून वेगळी नव्हती, तर इस्रायलमधील समाजाच्याच त्या शाखा होत्या, तरीही ती आदाम व हव्वा यांचे वंशज होते), यांना इस्रायलकडून यहोवाची सुवार्ता प्राप्त होण्यासाठी त्याने प्रथम इस्रायलमध्ये त्याच्या कार्यास सुरुवात केली. जर यहोवाने त्याचे कार्य इस्रायलमध्ये सुरू केले नसते आणि त्याऐवजी नुसतेच मानवजातीला निर्माण करून त्यांना पृथ्वीवर निश्चिंत जीवन जगू दिले असते, तर त्या परिस्थितीत, मनुष्याच्या जन्मजात स्वभावामुळे (स्वभाव म्हणजे मनुष्याला काही विशिष्ट गोष्टी दिसत नाहीत व त्या त्याला कधीच कळू शकत नाहीत, म्हणजेच येथे असे म्हणायचे आहे, की यहोवाने मानवजातीला निर्माण केले आणि त्याने असे का केले हेदेखील मनुष्याला कधीही कळणार नाही), यहोवाने मानवजातीला निर्माण केले आहे किंवा तोच सर्व सृष्टीचा प्रभू आहे हे मनुष्याला कधीही कळले नसते. जर यहोवाने मनुष्याला निर्माण करून पृथ्वीवर ठेवून दिले असते व काही काळासाठी मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी सोबत राहण्याऐवजी थेट त्याची जबाबदारी संपली असे ठरवले असते, तर सर्व मानवजात पुन्हा शून्यवत झाली असती; अगदी स्वर्ग आणि पृथ्वी, यहोवाने बनवलेल्या असंख्य गोष्टी व सर्व मानवजात, परत धुळीला मिळाली असती आणि इतकेच नव्हे, तर ती सैतानाकडून पायदळी तुडवली गेली असती. अशा प्रकारे “पृथ्वीवर, म्हणजे त्याच्या निर्मितीमध्ये, त्याला उभे राहण्यासाठी, पवित्र स्थान असावे” ही यहोवाची इच्छा मातीमोल झाली असती. आणि म्हणूनच, मानवजातीला निर्माण केल्यानंतर, तिच्या जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी त्या लोकांमध्ये राहण्याची व त्यांच्याशी बोलण्याची त्याने तयारी केलेली होती—हे सारे त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याची योजना साध्य करण्यासाठी होते. इस्रायलमध्ये त्याने केलेले कार्य केवळ बाकी सर्व गोष्टींची निर्मिती करण्यापूर्वी त्याने बनवलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी होते व म्हणूनच इस्रायली लोकांमध्ये त्याने सर्वप्रथम केलेले कार्य आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींची निर्मिती परस्परांशी विसंगत नव्हती, तर त्याचे व्यवस्थापन, त्याचे कार्य व त्याचा गौरव यांसाठी, तसेच त्याच्या निर्माण केलेल्या मानवजातीला अधिक सखोल अर्थ प्राप्त व्हावा या दोन्ही उद्देशांसाठी ते कार्य केले गेले. त्याने नोहा होऊन गेल्यानंतर पुढे दोन हजार वर्षांपर्यंत पृथ्वीवरील मानवजातीला जीवनाबद्दलचे मार्गदर्शन केले, यादरम्यान त्याने मानवजातीला सर्व सृष्टीचा प्रभू, यहोवाचा आदर कसा करावा, मनुष्याने त्याचे वर्तन कसे ठेवावे आणि आयुष्यात कसे जगावे यासाठीचे मार्गदर्शन केले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवासाठीचा साक्षीदार म्हणून कसे वागावे, त्याचे आज्ञापालन कसे करावे आणि त्याचा आदर कसा करावा व जशी दावीद आणि त्याचे याजक करत असत तशी संगीताने त्याची स्तुती कशी करावी, हे शिकवले.

यहोवाने जी दोन हजार वर्षे त्याचे कार्य केले, आधीच्या काळात मनुष्याला काहीच ज्ञान नव्हते आणि जलप्रलयाने जगाचा नाश होण्याआधी जवळजवळ सर्वच मानवजात वासनांधता व भ्रष्टता यांच्या रसातळाशी पोहोचलेली होती, त्या काळी मनुष्यांची अंतःकरणे यहोवापासून पूर्णपणे वंचित होती आणि त्याचा मार्ग जाणून घेण्यापासून ती दूर होती. यहोवा जे कार्य करणार आहे, ते त्यांना कधीच उमजले नाही. त्यांच्याकडे तर्कबुद्धीचा अभाव होता, ज्ञानही कमी होते व ते अगदी यंत्रवत श्वास घेत होते, त्या वेळची मानवजात मनुष्य, देव, जग, जीवन यांसारख्या इतर अनेक गोष्टींविषयी पूर्णतः अनभिज्ञ होती. पृथ्वीवर वास्तव्य करताना ते सापासारख्या अनेक मोहात गुंतले आणि त्यांनी यहोवाला अपमानकारक होतील अशा अनेक गोष्टी बोलल्या, मात्र ते अज्ञानी असल्यामुळे, यहोवाने त्यांचे ताडण केले नाही किंवा शिस्तदेखील लावली नाही. जलप्रलयानंतरच, जेव्हा नोहा ६०१ वर्षांचा झाला, तेव्हा कुठे यहोवाने त्याला औपचारिकपणे त्याचे दर्शन दिले व त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मार्गदर्शन केले, नोहा व त्याच्या वंशजांसह प्रलयातून वाचलेल्या पक्ष्यांना आणि प्राण्यांना, यहोवाने नियमशास्त्राच्या युगाच्या शेवटापर्यंत नेले, हे युग एकूण २,५०० वर्षांपर्यंत चालले. तो त्याचे कार्य इस्रायलमध्ये करत होता, म्हणजे इस्रायलमध्ये सुरुवातीला २,००० वर्षे व नंतर एकाच वेळी इस्रायलमध्ये आणि त्याच्या बाहेरच्या प्रदेशात तो पुढील ५०० वर्षे कार्य करत होता, अशी एकत्रितपणे २,५०० वर्षे त्याने कार्य केले. या काळादरम्यान, त्याने यहोवाची सेवा करण्यासाठी इस्रायली लोकांना मंदिर बांधण्याची आज्ञा दिली, लोकांनी याजकिय वस्त्रे परिधान करावीत व पहाटे मंदिरात अनवाणी प्रवेश करावा असे त्याने बजावले, असे न केल्यास त्यांची पादत्राणे मंदिराला अशुद्ध करतील आणि मंदिराच्या सर्वोच्च स्थानावरून त्यांच्यावर अग्निशलाका कोसळेल व त्यांचा जळून मृत्यू होईल, असे त्याने सांगितले होते. लोकांनी त्यांची कर्तव्ये पार पाडली आणि ते यहोवाच्या योजनांनुसार कार्य करू लागले. त्यांनी मंदिरात यहोवाची प्रार्थना केली व यहोवाने उद्देशांचे प्रकटीकरण केल्यानंतर, म्हणजेच यहोवाने ते बोलून दाखवल्यानंतर, त्यांनी अन्य लोकसमुदायांचे नेतृत्व केले आणि त्यांनी यहोवाचा—त्यांच्या देवाचा आदर करण्याबाबत शिकवण दिली. आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांच्या अंतःकरणात यहोवाबद्दल आदर निर्माण व्हावा, यासाठी यहोवाने त्यांना सांगितले, की त्यांनी एक मंदिर आणि एक वेदी बांधावी व यहोवाने निर्धारित केलेल्या दिवशी, म्हणजे वल्हांडण सणाच्या दिवशी, त्यांनी यहोवाची सेवा करण्यासाठी नवजात वासरे आणि कोकरे यांना वेदीवर अर्पण करण्यासाठी म्हणून पोषण करावे. त्यांनी या नियमाचे पालन करणे अथवा न करणे हा त्यांच्या यहोवावरील निष्ठेचा मापदंड बनला. यहोवाने त्यांच्यासाठी शब्बाथ दिवसाचीही नियुक्ती केली, जो त्याच्या निर्मितीचा सातवा दिवस होता. त्याने या शब्बाथनंतरचा दिवस, हा पहिला दिवस म्हणून निर्माण केला, तो लोकांनी यहोवाची स्तुती करण्याचा, त्याला गोष्टी अर्पण करण्याचा व त्याच्यासाठी संगीत वाजवण्यासाठीचा दिवस होता. या दिवशी, यहोवाच्या वेदीवर अर्पण केलेले अन्न लोकांना खाण्याकरता देता यावे, म्हणजेच त्यांना यहोवाच्या वेदीवरील अर्पणांचा आनंद घेता यावा म्हणून यहोवाने वेदीवरील अर्पणे वाटण्यासाठी सर्व याजकांना एकत्र येण्यास सांगितले. आणि यहोवाने म्हटले, की ते आशीर्वादित आहेत, त्यांनी यहोवाबरोबर एक भाग सामायिक केला आहे व ते त्याने निवडलेले लोक आहेत (हा इस्रायली लोकांसोबत यहोवाचा करार होता). म्हणूनच, यहोवा हा केवळ आपलाच देव आहे, परराष्ट्रीयांचा देव नाही असे इस्रायली लोक अजूनही म्हणतात.

नियमशास्त्राच्या युगात, यहोवाने इजिप्तमधून त्याच्यामागे आलेल्या इस्रायली लोकांना देण्यासाठी मोशेसमोर अनेक आज्ञा ठेवल्या. या आज्ञा यहोवाने इस्रायली लोकांना दिल्या होत्या आणि त्यांचा इजिप्शियन लोकांशी कोणताही संबंध नव्हता; त्या आज्ञा इस्रायली लोकांना रोखून ठेवण्यासाठी होत्या व त्याने त्यांच्याकडून मागण्या करण्यासाठी या आज्ञांचा वापर केला. त्यांनी शब्बाथ पाळला की नाही, त्यांनी त्यांच्या आईवडिलांबद्दल आदर बाळगला की नाही, त्यांनी मूर्तींची पूजा केली की नाही आणि अशाच इतर गोष्टी त्यात होत्या—या तत्वांच्या आधारावर ते पापी किंवा नीतिमान आहेत याचा न्याय होत असे. त्यांपैकी काही जणांना यहोवाच्या अग्नीद्वारे मारले गेले होते, काहींवर दगडफेक करून ठार मारण्यात आले होते, तर काहींना यहोवाचा आशीर्वाद मिळाला होता. त्यांनी यहोवाच्या या आज्ञांचे पालन केले की नाही, यानुसार हे सारे ठरवण्यात आले होते. ज्यांनी शब्बाथ पाळला नाही, त्यांना दगडफेक करून ठार मारण्यात आले. ज्या याजकांनी शब्बाथ पाळला नाही, ते यहोवाच्या अग्नीमध्ये खाक झाले. ज्यांनी त्यांच्या आई-वडिलांबद्दल आदर बाळगला नाही, त्यांना दगडाने ठेचून मारण्यात आले. या सर्व गोष्टींची यहोवाने प्रशंसा केली होती. यहोवाने लोकांच्या जीवनात त्यांचे नेतृत्व करत असताना, त्यांनी यहोवाचे वचन ऐकावे व त्याच्या आज्ञांचे पालन करावे आणि त्याच्याविरुद्ध बंड करू नये, यासाठी त्याच्या या आज्ञा व नियमशास्त्रे प्रस्थापित केली होती. त्याने या नियमशास्त्रांचा उपयोग नवजात मानवजातीला त्याच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी, स्वतःच्या भावी कार्याचा पाया घालण्यासाठीचा चांगला मार्ग म्हणून केला. म्हणूनच, यहोवाने केलेल्या कार्याच्या आधारे, पहिल्या युगाला नियमशास्त्राचे युग म्हटले गेले आहे. जरी यहोवाने पुष्कळ वचने उच्चारली असली आणि बरेच कार्य केले असले, तरी त्याने केवळ लोकांना सकारात्मक मार्गदर्शनच केले आहे. साऱ्या अज्ञानी लोकांना मनुष्य कसे असावे, कसे जगावे, यहोवाचा मार्ग कसा समजून घ्यावा, हे त्याने शिकवले. त्याने केलेले बहुतांश कार्य लोकांनी त्याच्या मार्गांकडे लक्ष द्यावे व त्याच्या नियमशास्त्रांचे पालन करावे यासाठीचे होते. कमी प्रमाणात भ्रष्ट झालेल्या लोकांवर हे कार्य केले गेले; त्यांची मूळ प्रवृत्ती बदलण्याइतपत किंवा जीवनात त्यांची प्रगती होईपर्यंत त्याचा विस्तार झाला नाही. लोकांवर निर्बंध घालणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे यांसाठी नियमशास्त्रांचा वापर कसा करता येईल, याविषयीच त्याचा मुख्यत्वे विचार होता. त्या काळी इस्रायली लोकांसाठी यहोवा हा केवळ मंदिरातील देव होता, स्वर्गातील देव होता. तो मेघाचा स्तंभ होता, अग्नीचा स्तंभ होता. आज लोक ज्यांना त्याचे नियमशास्त्र व आज्ञा म्हणून ओळखतात, त्यांचे पालन करणे एवढीच अट यहोवाने लोकांसमोर ठेवली होती—कुणी त्याला निर्बंधदेखील म्हणू शकेल—कारण यहोवाने जे काही केले, ते त्यांचे पूर्ण रूपांतर करण्यासाठी नव्हते, तर मनुष्याकडे असायला हव्यात, त्याहून अधिक गोष्टी त्यांना देण्यासाठी आणि त्यांना त्याच्या स्वतःच्या तोंडून शिकवण देण्यासाठी होते, मनुष्य निर्माण झाल्यानंतर, त्याच्याकडे फारसे काही नव्हते. म्हणूनच, यहोवाने पृथ्वीवरील लोकांना जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी त्यांच्याकडे असायला हव्यात, अशा गोष्टी त्यांना दिल्या, ज्या लोकांचे तो नेतृत्व करत होता, त्यांनी त्याचे पूर्वज आदाम व हव्वा यांच्याहीपेक्षा प्रगती करावी असे त्याला वाटत होते, कारण यहोवाने त्यांना जे दिले होते, ते त्याने सुरुवातीला जे आदाम आणि हव्वेला दिले होते त्यापेक्षा अधिक होते. बाकी काहीही असो, यहोवाने इस्रायलमध्ये जे कार्य केले, ते केवळ मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी व मानवाजातीने त्यांच्या निर्माणकर्त्याला जाणावे यासाठीचे होते. त्याने लोकांवर विजय मिळवला नाही किंवा त्यांचे रूपांतर केले नाही, तर त्यांना फक्त मार्गदर्शनच केले. नियमशास्त्राच्या युगातील यहोवाच्या कार्याचा हा परिपाक आहे. ही त्याची पार्श्वभूमी आहे, एक सत्यकथा आहे, संपूर्ण इस्रायलच्या भूमीतील त्याच्या कार्याचे मूलतत्त्व आहे आणि मानवजातीला यहोवाच्या हाताखाली ठेवण्यासाठी त्याच्या सहा हजार वर्षांच्या कार्याची येथे सुरुवात आहे. यामधूनच त्याच्या सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेत अधिक कार्य निर्माण झाले.

तळटीप:

अ. मूळ मजकुरात “आज्ञा पाळावी” असा शब्दप्रयोग नाही.

मागील:  सुवार्ता पसरवण्याचे काम हे माणसाला वाचवण्याचे काम देखील आहे

पुढील:  सुटकेच्या युगाच्या कार्यामागील सत्य कथा

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger