सुटकेच्या युगाच्या कार्यामागील सत्य कथा
माझ्या संपूर्ण सहा-हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेमध्ये, तीन टप्पे किंवा तीन युगांचा समावेश आहे: सुरुवातीचे नियमशास्त्राचे युग; कृपेचे युग (जे सुटकेचे युगदेखील आहे); आणि शेवटच्या दिवसांचे राज्याचे युग. या तीन युगांतील माझे कार्य प्रत्येक युगाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या आशयाचे आहे, परंतु प्रत्येक टप्प्यावर, हे कार्य मनुष्याच्या गरजा पूर्ण करते—किंवा, अधिक नेमकेपणाने सांगायचे तर, मी सैतानाविरुद्ध लढत असलेल्या युद्धात तो ज्या युक्त्या वापरतो त्या युक्त्यांनुसार केले जाते. माझ्या कार्याचा उद्देश सैतानाला पराभूत करणे, माझे शहाणपण आणि सर्वशक्तिमानता प्रकट करणे, सैतानाचे सर्व डावपेच उघड करणे व त्याद्वारे सैतानाच्या अधिपत्याखाली राहणारी संपूर्ण मानवजाती वाचवणे हा आहे. हे माझे शहाणपण आणि सर्वशक्तिमानता दर्शवण्यासाठी व सैतानाचा असह्य हिडीसपणा उघडकीस आणण्यासाठी आहे; त्याहूनही अधिक म्हणजे, सृष्टीतील प्राणीमात्रांना चांगले आणि वाईट यांच्यात फरक करण्याची अनुमती देण्यासाठी, मी सर्व गोष्टींचा शासक आहे हे जाणण्यासाठी, सैतान मानवजातीचा शत्रू, पतित, दुष्ट आहे हे स्पष्टपणे पाहण्यासाठी व चांगल्या आणि वाईट, सत्य व असत्य, पावित्र्य आणि मलिनता व काय महान आणि काय अधम यांच्यातील फरक पूर्ण खात्रीने त्यांना सांगता यावा याकरिता अनुमती देण्यासाठी आहे. अशा प्रकारे, अज्ञानी मानवजात माझ्याबद्दल साक्ष देण्यास सक्षम होईल, की मानवजातीला भ्रष्ट करणारा मी नाही व केवळ मी—निर्माणकर्ता—मानवजातीचे रक्षण करू शकतो, लोक आनंद घेऊ शकतील अशा गोष्टी त्यांना देऊ शकतो; आणि त्यांना कळेल, की मी सर्व गोष्टींचा शासक आहे व सैतान हा फक्त मी निर्माण केलेल्या प्राणीमात्रांपैकी एक आहे आणि तो नंतर माझ्या विरोधात गेला. माझी सहा-हजार वर्षांची व्यवस्थापन योजना तीन टप्प्यांत विभागली गेली आहे आणि मी निर्माण केलेल्या प्राणीमात्रांना माझ्याबद्दल साक्ष देण्यास सक्षम बनवण्यासाठी व माझी इच्छा समजून घेण्यासाठी आणि मीच सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी मी अशा प्रकारे कार्य करतो. अशाप्रकारे, माझ्या सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेच्या सुरुवातीच्या कार्यादरम्यान, मी नियमशास्त्राचे कार्य पार पाडले, ज्या कार्यामध्ये यहोवाने लोकांचे नेतृत्व केले होते. दुसऱ्या टप्प्यात, यहूदीयाच्या खेड्यांमध्ये कृपेच्या युगाचे सुरुवातीचे कार्य पार पाडले. येशू कृपेच्या युगातील सर्व कार्याचे प्रतिनिधित्व करतो; त्याने देह धारण केला होता आणि वधस्तंभावर खिळला होता व त्याने कृपेचे युगदेखील सुरू केले होते. सुटकेचे कार्य पूर्ण करण्यासाठी, नियमशास्त्राचे युग संपवण्यासाठी आणि कृपेचे युग सुरू करण्यासाठी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले व म्हणूनच त्याला “सर्वोच्च सेनापती,” “पापार्पण” आणि “उद्धारक” म्हटले गेले. परिणामी, येशूचे कार्य यहोवाच्या कार्याशी तत्त्वतः समान असले, तरी ते आशयानुसार वेगळे होते. पृथ्वीवरील देवाच्या कार्यासाठी आधार—मूळ स्थान—स्थापित करून आणि नियमशास्त्रे व आज्ञा जारी करून यहोवाने नियमशास्त्राच्या युगाची सुरुवात केली. त्याने केलेल्या कार्याचे हे दोन भाग आहेत आणि ते नियमशास्त्राच्या युगाचे प्रतिनिधित्व करतात. कृपेच्या युगात येशूने जे कार्य केले ते नियमशास्त्रे जारी करण्यासाठी नव्हते, परंतु ते पूर्ण करण्यासाठी होते, त्याद्वारे कृपेच्या युगाची सुरुवात करण्याचे आणि दोन हजार वर्षे चाललेल्या नियमशास्त्राच्या युगाची समाप्ती करण्याचे होते. तो नेतृत्व करणारा होता, जो कृपेचे युग सुरू करण्यासाठी आला होता, तरीही त्याच्या कार्याचा मुख्य भाग सुटकेचा होता. आणि म्हणून त्याचे कार्यदेखील दुहेरी होते: नवीन युगाची सुरुवात करणे व त्याने वधस्तंभावर खिळून सुटकेचे कार्य पूर्ण करणे, ज्यानंतर तो निघून गेला. आणि यापुढे नियमशास्त्राचे युग संपले व कृपेचे युग सुरू झाले.
येशूने जे कार्य केले ते त्या युगातील मनुष्याच्या गरजांनुसार होते. त्याचे कार्य मानवजातीची सुटका करण्याचे, त्यांच्या पापांना क्षमा करण्याचे होते आणि म्हणूनच त्याची प्रवृत्ती पूर्णपणे नम्रता, संयम, प्रेम, धार्मिकता, सहनशीलता, करुणा व दयेची होती. त्याने मानवजातीवर प्रचंड कृपा केली आणि आशीर्वाद दिले व लोक ज्याचा आनंद घेऊ शकतील अशा सर्व गोष्टी त्याने त्यांच्या आनंदासाठी दिल्या: शांतता आणि सुख, त्याची सहनशीलता व प्रेम, त्याची करुणा आणि दया. त्या वेळी, लोकांना ज्या गोष्टींचा भरपूर आनंद घेता आला—त्यांच्या हृदयातील शांती आणि सुरक्षिततेची भावना, त्यांच्या आत्म्यांमधील आश्वासकतेची भावना व तारणहार येशूवर त्यांचे अवलंबित्व—ते सर्व ते ज्या युगापर्यंत जगले त्याच युगापर्यंत होते. कृपेच्या युगात, सैतानाने मनुष्याला आधीच भ्रष्ट केले होते आणि म्हणून संपूर्ण मानवजातीची सुटका करण्याचे कार्य साध्य करण्यासाठी असीम कृपा, अपार सहनशीलता व संयम आवश्यक होता आणि त्याहूनही अधिक, परिणामकारकतेसाठी, मानवजातीच्या पापांचे प्रायश्चित करण्याकरिता पुरेसे अर्पण आवश्यक होते. कृपेच्या युगात मानवजातीने जे पाहिले ते केवळ मानवजातीच्या पापांसाठी माझ्या प्रायश्चिताचे अर्पण होते: येशू. त्यांना एवढेच माहीत होते, की देव दयाळू आणि सहनशील असू शकतो व त्यांनी फक्त येशूची करुणा व दया पाहिली. याचे एकच कारण म्हणजे त्यांचा जन्म कृपेच्या युगात झाला होता. आणि म्हणूनच, त्यांची सुटका होण्याआधी, येशूने त्यांच्यावर बहाल केलेल्या अनेक प्रकारच्या कृपेचा त्यांना उपभोग घ्यावा लागला जेणेकरून, त्यांना त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे, त्यांना त्यांच्या कृपेचा आनंद घेऊन त्यांच्या पापांची क्षमा केली जाऊ शकली व येशूच्या सहनशीलतेचा आणि संयमाचा आनंद घेऊन सुटका होण्याची संधीदेखील मिळू शकली. केवळ येशूच्या सहनशीलतेमुळे आणि संयमामुळे त्यांनी क्षमा मिळवण्याचा व येशूने दिलेल्या विपुल कृपेचा आनंद घेण्याचा अधिकार प्राप्त केला. येशूने म्हटल्याप्रमाणे: मी नीतिमानांची नाही, तर पापी लोकांची सुटका करण्यासाठी आलो आहे, पापी लोकांना त्यांच्या पापांची क्षमा करण्यासाठी आलो आहे. जेव्हा येशूने देह धारण केला, तेव्हा जर त्याने मनुष्याच्या गुन्ह्यांबद्दल न्याय, शाप आणि असहिष्णुतेची प्रवृत्ती दाखवली असती, तर मनुष्याला कधीही सुटकेची संधी मिळाली नसती व तो कायमचा पापी राहिला असता. असे झाले असते तर, सहा हजार वर्षांची व्यवस्थापन योजना नियमशास्त्राच्या युगात थांबली असती आणि नियमशास्त्राचे युग सहा हजार वर्षे वाढले असते. मनुष्याची पापे अधिकच वाढली असती व अधिक गंभीर झाली असती आणि मानवजातीची निर्मिती व्यर्थ ठरली असती. मनुष्य केवळ नियमशास्त्रानुसार यहोवाची सेवा करू शकला असता, पण त्यांची पापे प्रथम निर्माण केलेल्या मनुष्यांपेक्षा जास्त झाली असती. येशूने मानवजातीवर जितके जास्त प्रेम केले, त्यांच्या पापांची क्षमा केली व त्यांच्यावर पुरेशी करुणा आणि दया केली, तितकीच मानवजात येशूद्वारे वाचवली जाण्याची, येशूने मोठ्या किंमतीला परत विकत घेतलेली हरवलेली कोकरू म्हणण्याची हकदार होती. सैतान या कार्यात हस्तक्षेप करू शकला नाही, कारण प्रेमळ आई आपल्या कुशीतल्या बाळाला जशी सांभाळते तसेच येशूने त्याच्या अनुयायांना सांभाळले. तो त्यांच्यावर रागावला नाही किंवा तिरस्काराने वागला नाही, तर त्याने त्यांना दिलासा दिला; तो त्यांच्यावर कधीही रागाने ओरडला नाही, परंतु “इतरांना साताच्या सत्तर वेळा क्षमा करा” असे म्हणण्यापर्यंत त्यांच्या पापांना सहन केले आणि त्यांच्या मूर्खपणाकडे व अज्ञानाकडे डोळेझाक केली. अशाप्रकारे त्याच्या हृदयाने इतरांची अंतःकरणे बदलली होती आणि केवळ अशा प्रकारे लोकांना त्याच्या सहनशीलतेद्वारे त्यांच्या पापांची क्षमा मिळाली.
येशू त्याच्या देहधारणेमध्ये पूर्णपणे भावनाविरहित असला तरीही त्याने नेहमी त्याच्या शिष्यांना दिलासा दिला, त्यांच्यासाठी तरतूद केली, त्यांना मदत केली व त्यांना पाठिंबा दिला. त्याने कितीही कार्य केले किंवा त्याने कितीही दुःख सहन केले, तरी त्याने लोकांकडून कधीही अवाजवी मागण्या केल्या नाहीत, परंतु त्याने नेहमी धीर धरला आणि त्यांची पापे सहन केली, अशा तऱ्हेने की कृपेच्या युगातील लोक त्याला प्रेमाने “प्रिय तारणहार येशू” म्हणत. त्या काळातील लोकांसाठी—सर्व लोकांसाठी—येशूकडे जे होते ते म्हणजे करुणा आणि दया. लोकांनी केलेले अपराध त्याने कधीच लक्षात ठेवले नाहीत आणि त्यांच्याशी त्याची वागणूक कधीही त्यांच्या अपराधांवर आधारित नव्हती. कारण ते युग वेगळे होते, त्याने अनेकदा लोकांना भरपूर अन्न दिले जेणेकरून, ते पोटभर जेवू शकतील. त्याने त्याच्या सर्व अनुयायांवर कृपा केली, आजारी लोकांना बरे केले, भुते काढून टाकली, मृतांना उठवले. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा व त्याने जे काही केले ते कळकळीने आणि प्रामाणिकपणे केले आहे हे त्यांना दिसावे, यासाठी, तो एका कुजलेल्या प्रेताचे पुनरुत्थान करण्यापर्यंत गेला व त्यांना दाखवून दिले, की त्याच्या हातात मृतदेखील पुन्हा जिवंत होऊ शकतात. अशा प्रकारे, त्याने शांतपणे सहन केले आणि त्यांच्यामध्ये सुटकेचे कार्य केले. येशूला वधस्तंभावर खिळले जाण्यापूर्वीच, येशूने मानवजातीची पापे स्वतःवर घेतली होती व मानवजातीसाठी पापाचे अर्पण बनला होता. वधस्तंभावर खिळले जाण्यापूर्वीच, त्याने मानवजातीची सुटका करण्यासाठी वधस्तंभावर जाण्याचा मार्ग खुला केला होता. शेवटी, त्याला वधस्तंभावर खिळले गेले, त्याने वधस्तंभासाठी स्वतःचे बलिदान दिले आणि मानवजातीवर त्याची सर्व करुणा, दया व पवित्रता बहाल केली. मानवजातीच्या बाबतीत, तो नेहमीच सहनशील होता, त्याने कधीही सूड घेतला नाही, त्यांच्या पापांना क्षमा केली, त्यांना पश्चात्ताप करण्यास प्रोत्साहित केले आणि संयम, सहनशीलता व प्रेम करण्यास शिकवले, त्याच्या पावलांवर चालण्यास आणि वधस्तंभासाठी स्वतःचा त्याग करण्यास शिकवले. भाऊ आणि बहिणींवरील त्याचे प्रेम मरीयेवरील त्याच्या प्रेमापेक्षा जास्त होते. त्याने केलेल्या कार्याचे तत्त्व आजारी लोकांना बरे करणे व भुते काढून टाकणे हे होते, हे सर्व त्याच्या सुटकेसाठी होते. तो कोठेही गेला तरी त्याने त्याच्या अनुयायांवर कृपा केली. त्याने गरीबांना श्रीमंत केले, लंगड्याला चालायला, आंधळ्यांना पाहायला आणि बहिऱ्याला ऐकायला सक्षम केले. त्याने अगदी कनिष्ठ, निराधार, पापी लोकांनाही त्याच्याबरोबर एकाच मेजावर बसण्यासाठी आमंत्रित केले, त्यांना कधीही टाळले नाही तर नेहमी धीर धरून असे म्हटले: जेव्हा मेंढपाळ शंभर पैकी एक मेंढी गमावतो तेव्हा तो हरवलेल्या मेंढीचा शोध घेण्यासाठी नव्याण्णव मेंढ्या मागे सोडतो, आणि जेव्हा त्याला ती सापडते तेव्हा तो खूप आनंदित होतो. एक मेंढी तिच्या कोकरांवर प्रेम करते तसे त्याने त्याच्या अनुयायांवर प्रेम केले. जरी ते त्याच्या नजरेत मूर्ख व अज्ञानी असले आणि पापी असले व त्याही व्यतिरिक्त समाजातील सर्वात नम्र सदस्य असले तरीही, त्याने या पापींना—ज्यांना इतरांनी तुच्छ लेखले—त्यांना त्याने त्याच्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळले. त्याने त्यांच्यावर कृपा केल्यामुळे, वेदीवर कोकरू अर्पण केल्याप्रमाणे त्याने त्यांच्यासाठी त्याचा जीव दिला. तो त्यांचा सेवक असल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये फिरत होता, त्यांना त्याचा वापर करू देत होता आणि त्याचा वध करू देत होता, बिनशर्त त्यांच्या अधीन होत होता. त्याच्या अनुयायांसाठी, तो प्रेमळ तारणहार येशू होता, परंतु परुशी लोकांसाठी, ज्यांनी लोकांना उच्च स्थानावरून व्याख्यान दिले, त्यांच्यासाठी त्याने करुणा व दया दाखवली नाही तर तिरस्कार आणि संताप दर्शवला. त्याने परुशी लोकांमध्ये फारसे कार्य केले नाही, केवळ अधूनमधून त्यांना ओरडला व फटकारले; तो त्यांच्यामध्ये सुटकेचे कार्य करण्यासाठी गेला नाही किंवा त्याने संकेत आणि चमत्कार केले नाहीत. त्याने त्याच्या अनुयायांना त्याची सर्व करुणा आणि दया बहाल केली, या पापी लोकांसाठी शेवटपर्यंत टिकून राहिला, त्याला वधस्तंभावर खिळले जाईपर्यंत व सर्व मानवजातीची पूर्णपणे सुटका करेपर्यंत त्याने प्रत्येक अपमान सहन केला. हे त्याचे एकूण कार्य होते.
येशूच्या सुटकेशिवाय, मानवजात कायमच पापात जगली असती आणि पापाची संतती, भूतांची संतती बनली असती. अशा प्रकारे पुढे चालत राहिल्यास, संपूर्ण जग सैतानाचे वास्तव्य असलेली भूमी, त्याचे निवासस्थान बनले असते. तथापि, सुटकेच्या कार्यासाठी, मानवजातीबद्दल करुणा व दया दाखवणे आवश्यक होते; केवळ अशाच प्रकारे मानवजात क्षमा मिळवू शकली आणि शेवटी देवाकडून पूर्ण होण्याचा व पूर्णपणे प्राप्त होण्याचा अधिकार प्राप्त करू शकली. कार्याच्या या टप्प्याशिवाय, सहा हजार वर्षांच्या व्यवस्थापन योजनेची प्रगती होऊ शकली नसती. जर येशूला वधस्तंभावर खिळले नसते, जर त्याने फक्त आजारी लोकांना बरे केले असते आणि भुतांना काढून टाकले असते, तर लोकांना त्यांच्या पापांसाठी पूर्णपणे क्षमा करता आली नसती. येशूने पृथ्वीवर त्याचे कार्य करण्यात घालवलेल्या साडेतीन वर्षांत, त्याने त्याचे सुटकेचे केवळ अर्धे कार्य पूर्ण केले; मग, वधस्तंभावर खिळे ठोकून व पापी देहाचे प्रतिरूप बनून, दुष्टाला सोपवून, त्याने वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण केले आणि मानवजातीच्या नशिबावर प्रभुत्व मिळवले. तो सैतानाच्या हाती सोपवला गेल्यानंतरच त्याने मानवजातीची सुटका केली. साडेतेहतीस वर्षे त्याने पृथ्वीवर दुःख सहन केले, त्याची थट्टा केली गेली, निंदा केली गेली आणि त्याला वाळीत टाकले गेले, अगदी इथपर्यंत की त्याला डोके ठेवायलाही जागा नव्हती, विश्रांतीची जागा नव्हती व नंतर त्याला त्याच्या संपूर्ण अस्तित्वासह वधस्तंभावर खिळले गेले—एक पवित्र आणि निष्पाप शरीर—वधस्तंभावर खिळले गेले. त्याने सर्व प्रकारचे दुःख सहन केले. सत्तेत असलेल्या लोकांनी त्याची थट्टा केली व फटके मारले आणि सैनिक त्याच्या तोंडावर थुंकले; तरीही तो शांत राहिला व शेवटपर्यंत टिकून राहिला, बिनशर्त मृत्यूच्या अधीन झाला, ज्यानंतर त्याने संपूर्ण मानवजातीची सुटका केली. त्यानंतरच त्याला विश्रांती घेण्याची परवानगी देण्यात आली. येशूने केलेले कार्य केवळ कृपेच्या युगाचे प्रतिनिधित्व करते; ते नियमशास्त्राच्या युगाचे प्रतिनिधित्व करत नाही किंवा शेवटच्या दिवसांच्या कार्याचे प्रतिनिधित्व करत नाही. कृपेच्या युगात येशूच्या कार्याचे हे मूलतत्त्व आहे, असे दुसरे युग ज्यामधून मानवजात पुढे गेली आहे—सुटकेचे युग.