तुझ्या दृष्टीने देव म्हणजे काय?
लोक पूर्वापार देवावर विश्वास ठेवत आले आहेत, तरीही त्यांच्यातील अनेकजणांना “देव” या शब्दाचा अर्थ समजत नाही आणि ते केवळ चकित होऊन अनुसरण करतात. मनुष्याने देवावर नक्की विश्वास का ठेवावा किंवा देव म्हणजे काय, याची त्यांना जराही कल्पना नसते. देवावर विश्वास ठेवणे व त्याचे अनुसरण करणे एवढेच जर लोकांना माहीत असले, परंतु देव काय आहे हे माहीत नसले आणि जर ते देवाला जाणतही नसले, तर हा एक मोठा विनोद नाही का? इतका पल्ला गाठूनही, लोकांनी अनेक स्वर्गीय रहस्ये पाहिली आहेत व मनुष्याला कधीही न कळलेले सखोल ज्ञान जाणले आहे, तरीही मनुष्याने ज्यांवर याआधी कधीही चिंतन केलेले नाही, अशा अनेक प्राथमिक सत्यांविषयी लोक अनभिज्ञ आहेत. काहीजण म्हणतील, “आमचा देवावर अनेक वर्षे विश्वास आहे. आम्हाला देव माहीत नाही असे कसे होईल? हा प्रश्न आम्हाला कमी लेखणारा नाही का?” मात्र वास्तविकतः, लोक आज जरी माझे अनुसरण करत असले, तरी आजच्या कार्याबद्दल ते काहीही जाणत नाहीत आणि त्यांना अगदी सरळ व सोप्या प्रश्नांचे सुद्धा आकलन होत नाही, देवाविषयीच्या अशा अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नांची गोष्ट तर दूरच. तुला ज्यांच्याविषयी अजिबात आस्था नाही, तू जे प्रश्न जाणलेले नाहीस, ते जाणून घेणे तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, हे लक्षात घे. कारण तू फक्त गर्दीचे अनुसरण करणेच जाणतोस, तू स्वतःला कशाने सज्ज केले पाहिजेस याकडे तू अजिबात लक्ष देत नाहीस, त्याविषयी जराही काळजी करत नाहीस. तू देवावर श्रद्धा का ठेवावीस, हे तुला खरोखरच माहीत आहे का? देव म्हणजे काय हे तुला खरोखरच माहीत आहे का? देवावर श्रद्धा असणारी व्यक्ती या नात्याने, तुम्ही जर या गोष्टी समजून घेऊ शकला नाहीत, तर देवावर विश्वास ठेवणाऱ्याची प्रतिष्ठा तुम्ही गमावता असे होत नाही का? माझे आजचे कार्य असे आहे: लोकांना त्यांचे मूलतत्त्व, मी जे करतो ते सर्व समजावून देणे आणि देवाचा खरा चेहरा समजण्यास मदत करणे. माझ्या व्यवस्थापन योजनेचा हा शेवटचा अंक आहे, माझ्या कार्याचा हा शेवटचा टप्पा आहे. म्हणूनच मी तुम्हाला जीवनाची सर्व रहस्ये अगोदरच सांगतो आहे, जेणेकरून तुम्ही लोक माझ्याकडून त्यांचा स्वीकार करू शकाल. हे अंतिम युगाचे कार्य आहे, त्यामुळे, तुम्ही निव्वळ अतिशय अपुरे व असहाय्य असल्यामुळे जरी हे समजण्यास किंवा अंगी बाणवण्यास असमर्थ असलात, तरी तुम्ही ज्याविषयी पूर्वी कधीही स्वागतशील नव्हता, अशी जीवनरहस्ये मी तुम्हाला सांगितलीच पाहिजेत. मी माझे कार्य पूर्ण करेन; मी जे कार्य पूर्ण करणे अपेक्षित आहे ते मी पूर्ण करेन आणि मी तुम्हा सर्वांना जे करण्यासाठी बोलावले आहे ते सांगेन, अन्यथा जेव्हा अंधःकार होतो, तेव्हा तुम्ही पुन्हा भरकटाल व दुष्टाच्या कारस्थांना बळी पडाल. तुम्हाला न समजणारे असे अनेक मार्ग आहेत, तुम्हाला ज्यांचे ज्ञान नाही अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही लोक फार अज्ञानी आहात; तुमची पातळी आणि तुमच्यातील उणिवा मला पुरेपूर माहीत आहेत. म्हणून, अनेक वचने समजून घेण्याची तुमची क्षमता नसली, तरी सुद्धा ज्या सत्यांबाबत तुम्ही आजवर कधीच उत्सुक नव्हतात, ती सर्व सत्ये तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा आहे, कारण मला काळजी वाटत असते की तुमच्या सध्याच्या पातळीत तुम्ही तुमच्या माझ्याविषयीच्या साक्षीवर ठाम राहू शकणार नाही. असे नाही की मला तुमच्याविषयी काहीच वाटत नाही; तुम्ही सर्वजण अजून माझ्या औपचारिक प्रशिक्षणातून जायची आवश्यकता असलेले पशू आहात व तुमच्यात किती मोठेपण आहे हे मला अजिबातच दिसत नाही. तुमच्यावर कार्य करण्यात मी माझी इतकी ऊर्जा खर्च करूनही, तुमच्यात सकारात्मक घटक प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे दिसते आणि नकारात्मक घटक बोटांवर मोजता येतील व सैतानाला लाज वाटावी अशा साक्षी बनतील. तुमच्यातले जवळजवळ सर्व काही म्हणजे सैतानाचे विष आहे. तुम्ही मला तारणाच्या पलीकडे असल्यासारखे दिसता. या परिस्थितीत, मी तुमच्या विविध अभिव्यक्तींकडे आणि प्रयत्नांकडे पाहतो व अखेरीस, मला तुमची खरी पातळी कळते. म्हणूनच मी कायम तुम्हा लोकांबाबत चिंतातूर असतो: मनुष्यांना जर त्यांच्या स्वतःवर सोडून दिले, तर तुलनेने, मनुष्ये आज जशी आहेत तशी किंवा त्यापेक्षा चांगली होतील का? तुमचा लहान मुलासारखा स्वभाव तुम्हाला चिंताग्रस्त बनवत नाही का? तुम्ही खरोखरच इस्रायलच्या निवडलेल्या लोकांसारखे—माझ्याशी आणि केवळ माझ्याशीच सर्वकाळ एकनिष्ठ राहू शकता का? तुमच्यातून जे व्यक्त होते ते तुमच्या पालकांपासून भरकटलेल्या मुलांचे खोडकरपण नव्हे, तर तुमच्या मालकाच्या चाबकाच्या टप्प्याच्या बाहेर असलेल्या पशूंचे उफाळून येणारे पशुत्व आहे. तुम्हाला तुमचा स्वभाव माहीत असायला हवा जी तुम्हा सर्वांमधील समान कमतरतादेखील आहे; तुम्हा सर्वांचे दुखणे हेच आहे. अशा प्रकारे, आज माझे तुम्हाला एवढेच सांगणे आहे, की तुम्ही तुमच्या माझ्याविषयीच्या साक्षीवर ठाम राहावे. कोणत्याही परिस्थितीत, जुने दुखणे उलटू देऊ नका. साक्ष बाळगणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे—माझ्या कार्याचा तो आत्मा आहे. मरीयेने ज्याप्रमाणे तिला स्वप्नात झालेले यहोवाचे प्रकटीकरण स्वीकारले, तशी तुम्ही माझी वचने स्वीकारली पाहिजेत: विश्वास ठेवून व मग आज्ञापालन करून. फक्त हेच पवित्र असणे आहे. कारण माझी वचने जास्तीत जास्त ऐकणारे, माझा सर्वाधिक आशीर्वाद असणारे असे तुम्ही लोकच आहात. मी तुम्हाला माझ्या मौल्यवान गोष्टी दिलेल्या आहेत, मी तुम्हाला सर्व काही दिले आहे, तरीही तुम्ही इस्रायलच्या लोकांपेक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात वेगळे आहात. तुम्ही आणि ते अगदी दोन ध्रुवांवर आहात. पण त्यांच्या तुलनेत, तुम्हाला खूप काही जास्त मिळाले आहे; ते माझ्या दर्शनाची व्याकुळतेने वाट पाहात असताना, तुम्ही माझ्यासोबत आनंदात दिवस घालवत आहात, माझ्या कृपेचा लाभ घेत आहात. हा फरक लक्षात घेतला, तर माझ्याबद्दल कुरकूर करण्याचा व माझ्या वस्तूंमध्ये वाटा मागण्याचा तुम्हाला काय हक्क आहे? तुम्हाला खूप काही मिळालेले नाही का? मी तुम्हाला इतके देतो, पण त्या बदल्यात तुम्ही मला फक्त हृदयद्रावक दुःख आणि चिंता, बेजबाबदार अशी नाराजी व असमाधान देता. तुम्ही इतके तिरस्करणीय आहात—तरीही तुम्ही दयेसाठी पात्रदेखील आहात, त्यामुळे माझी सगळी नाराजी गिळून टाकून पुन्हा तुमच्यावरील माझे आक्षेप व्यक्त करण्यावाचून माझ्याकडे पर्याय राहात नाही. हजारो वर्षांपेक्षाही जास्त काळ चाललेल्या कार्यात, मी कधीही मानवजातीला कडक विरोध दर्शवलेला नाही, कारण मानवजातीला विकासादरम्यान, तुमच्यातील फक्त “भोंदू” असलेलेच सर्वाधिक नामवंत झाल्याचे मला आढळले आहे, जसे की प्राचीन काळच्या प्रसिद्ध पूर्वजांनी तुमच्यासाठी ठेवलेला मौल्यवान वारसा. त्या अधःपतित डुकरांचा आणि कुत्र्यांचा मला अतिशय तिरस्कार आहे. तुमच्याकडे सुद्धा सदसद्विवेकबुद्धी अजिबातच नाही! तुमचेही चारित्र्य हीन आहे! तुमची हृदये कठोर झाली आहेत! अशी वचने व कार्य जर मी इस्रायली लोकांच्या बाबतीत केले असते, तर मला फार पूर्वीच महिमा प्राप्त झाला असता. पण तुमच्यामध्ये ते असाध्य आहे; तुमच्याकडे फक्त निष्ठुर दुर्लक्ष आहे, थंड प्रतिसाद आहे आणि तुमच्या सबबी आहेत. तुम्ही अतिशय असंवेदनशील व अत्यंत नालायक आहात!
तुम्ही तुमचे सर्व काही माझ्या कार्याला समर्पित केले पाहिजे. मला लाभदायक असलेले कार्य तुम्ही केले पाहिजे. तुम्हाला जे समजत नाही, ते सर्व काही स्पष्ट करून सांगण्याची माझी तयारी आहे, जेणेकरून तुमच्याकडे जे जे नाही ते सर्व तुम्हाला माझ्याकडून प्राप्त व्हावे. तुमचे दोष जरी अगणित असले, तरी तुमच्यावर जे करणे आवश्यक आहे ते कार्य, तुम्हा लोकांना माझी अंतिम क्षमा प्रदान करून, करत राहण्याची माझी इच्छा आहे, जेणेकरून तुम्हाला माझ्यापासून तुमच्यात नसलेला व जगाने आजवर कधीही पाहिलेला नाही असा मोठेपणाचा लाभ मिळेल. मी अनेक वर्षे कार्य केले आहे, पण तरीही आजवर कोणाही मनुष्याने मला ओळखलेले नाही. मी आजवर कोणालाही सांगितलेली नाहीत ती रहस्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो.
मनुष्यांमध्ये, त्यांना न दिसणारा, ते ज्याच्याशी कधीही संलग्न होऊ शकले नाहीत तो आत्मा मी होतो. माझ्या पृथ्वीवरील कार्याच्या तीन टप्प्यांमुळे (जगाची निर्मिती, सुटका आणि विनाश), मी त्यांच्यामध्ये माझे कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या वेळी त्यांच्यामध्ये प्रकट होतो (जाहीरपणे कधीही नाही). मी प्रथम मनुष्यांमध्ये आलो, ते सुटकेच्या युगात अर्थात, मी एका यहूदी कुटुंबात आलो; कारण, देवाला पृथ्वीवर येताना ज्यांनी प्रथम पाहिले ते यहूदी होते. मी स्वतः हे कार्य केले याचे कारण, मला माझ्या सुटकेच्या कार्यात माझे देह धारण करणे हे पापकर्म म्हणून वापरायचे होते. अशा प्रकारे, मला पाहणारे पहिले लोक होते कृपेच्या युगातील यहूदी. मी देह धारण करून कार्य करण्याची ती पहिलीच वेळ होती. राज्याच्या युगात माझे कार्य असते जिंकणे व परिपूर्ण बनवणे, त्यामुळे मी पुन्हा देह धारण करून माझे मेंढपाळाचे कार्य करतो. देह धारण करून कार्य करण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. कार्याच्या शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये लोक ज्याच्याशी जोडले जातात तो अदृश्य, अस्पर्श्य आत्मा नसतो, तर देहात प्रकट झालेला आत्मा असणारी व्यक्ती असतो. अशा प्रकारे, मनुष्याच्या दृष्टिने, मी पुन्हा मनुष्य होतो, माझा चेहरामोहरा देवासारखा नसतो. तसेच, लोक ज्या देवाला पाहतात तो फक्त पुरुष नसतो, स्त्रीदेखील असतो, ज्याने ते अवाक् होतात व गोंधळात पडतात. वर्षानुवर्षे कायम असलेल्या जुन्या मान्यतांना माझ्या कार्याद्वारे मी वेळोवेळी तिलांजली दिली आहे. लोक चकित झाले आहेत! देव म्हणजे फक्त पवित्र आत्मा, आत्मा, सातपट तीव्र झालेला आत्मा किंवा सर्वव्यापी आत्मा आहे एवढेच नव्हे, तर तो मनुष्य सुद्धा असतो—एक सामान्य मनुष्य, एक अपवादात्मकरीत्या सामान्य मनुष्य. तो फक्त पुरुषच नसतो, तर स्त्रीदेखील असतो. ते दोघेही मनुष्यांच्या पोटी जन्मलेले असतात हे त्यांच्यातील साम्य आहे आणि एकाचा जन्म पवित्र आत्म्याच्या पोटी झाला व दुसऱ्याची थेट आत्म्याद्वारे गर्भधारणा झाली असली, तरी जन्म मनुष्याच्या पोटी झाला हा त्यांच्यातील फरक आहे. ते देवाच्या दोन्ही देहधारणांमध्ये समान आहेत जे परमपिता परमेश्वराचे कार्य पार पाडतात आणि एकाने सुटकेचे कार्य केले तर दुसरे विजयाचे कार्य करते, हाच त्यामधील फरक आहे, दोघेही परमपिता परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतात, पण एक प्रेमळ दयेने व क्षमेने परिपूर्ण तारणकर्ता आहे आणि दुसरा क्रोध व न्यायाने परिपूर्ण असा नीतिमानतेचा देव आहे. एक सर्वोच्च नियंता आहे, ज्याने सुटकेचे कार्य केले, तर दुसरा नीतिमान देव आहे जो विजयाचे कार्य साध्य करतो. एक प्रारंभ आहे, तर दुसरा अंत आहे. एक निष्पाप देह आहे, तर दुसरा सुटका पूर्ण करून कार्य सुरू ठेवणारा आणि कधीही पाप न करणारा देह आहे. हे दोन्ही आत्मे एकच असतात, पण ते वेगवेगळ्या देहांमध्ये राहत असतात व त्यांचा जन्म वेगवेगळ्या ठिकाणी झालेला असतो आणि त्यांच्यात अनेक सहस्र वर्षांचे अंतर असते. मात्र त्यांचे सर्व कार्य परस्परांना पूरक आहे, त्यांच्यात कधीही संघर्ष नसतो व त्यांच्याविषयी एकत्रच बोलता येते. दोन्ही मनुष्येच होती, पण एक लहान मुलगा होता तर दुसरी लहान मुलगी होती. इतक्या सगळ्या वर्षांत लोकांनी जे पाहिले आहे तो फक्त आत्मा नाही आणि फक्त मनुष्य, पुरुष नाही, तर मानवी धारणांची खिल्ली न उडवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत; जसे की, मनुष्यांना माझा थांग पूर्णपणे लागू शकत नाही. ते माझ्यावर अर्धवट विश्वास ठेवतात व अर्धवट संशय घेतात—जणू काही मी अस्तित्वात आहे, पण तरीही मी एखादे फसवे स्वप्न आहे—म्हणूनच, आजपर्यंत, देव म्हणजे काय हे लोकांना कळलेले नाही. तू खरोखर एका वाक्यात माझे सार सांगू शकतोस का? “येशू म्हणजेच देव आणि देव म्हणजेच येशू” असे म्हणण्याचे तुझे खरोखर धाडस आहे का? “देव म्हणजे केवळ आत्मा व आत्मा म्हणजे देव” असे म्हणण्याइतका तू खरोखर धाडसी आहेस का? “देव म्हणजे केवळ देहधारी मनुष्य” असे तू म्हणू शकतोस का? “येशूची प्रतिमा हीच देवाची महान प्रतिमा आहे” असे म्हणण्याचे धाडस खरेच तुझ्याकडे आहे का? देवाची प्रवृत्ती आणि प्रतिमा यांचे सांगोपांग वर्णन करण्यासाठी भाषा वापरण्याची तुझी क्षमता आहे का? “देवाने स्वतःच्या प्रतिमेवरून फक्त पुरुषाला निर्माण केले, स्त्रीला नाही” असे म्हणण्याचे खरोखरीचे धाडस तुझ्याकडे आहे का? तू जर असे म्हटलेस, तर मी निवडलेल्या लोकांमध्ये स्त्री असणारच नाही, किंबहुना स्त्री हा मानवजातीचा घटकच असणार नाही. आता तुला देव काय आहे हे खरोखर कळले का? देव म्हणजे मनुष्य आहे का? देव म्हणजे आत्मा आहे का? देव खरोखर पुरुष आहे का? मी जे करणार आहे ते कार्य फक्त येशूच पूर्ण करू शकतो का? माझ्या गाभ्याचे मूलतत्त्व सांगण्यासाठी, जर तू वरीलपैकी फक्त एकाची निवड केलीस, तर तू अत्यंत अज्ञानी एकनिष्ठ श्रद्धाळू आहेस. मी जर एकदा देह धारण करून कार्य केले व फक्त एकदाच केले, तर तुम्ही लोक मला मर्यादा घालाल का? एका दृष्टिक्षेपात तू मला खरोखर पूर्णपणे ओळखू शकतोस का? तुझ्या आयुष्यात तू जे पाहिले आहेस, त्याआधारे तू माझे सार पूर्णपणे सांगू शकतोस का? माझ्या दोन्ही देहधारणांमध्ये मी जर सारखेच कार्य केले, तर तुम्ही लोक मला कसे जाणाल? तुम्ही मला कायम वधस्तंभावर खिळून ठेवाल का? तू दावा करता तितका देव साधा आहे का?
तुमची श्रद्धा जरी खूप प्रामाणिक असली, तरी तुमच्यातील कोणीच माझे संपूर्ण वर्णन करू शकत नाही, तुम्ही पाहिलेल्या गोष्टींची संपूर्ण साक्ष कोणीच देऊ शकत नाही. विचार करा: आज तुमच्यातील अनेक जण कर्तव्यच्युत झालेले आहेत, देहाचा पाठपुरावा करण्याऐवजी, देहाला सुख देत आहेत आणि देहाचा हावरटपणे उपभोग घेत आहेत. तुमच्याकडे सत्य नाहीच. मग तुम्ही लोकांनी जे पाहिले आहे त्याची साक्ष तुम्ही कशी देऊ शकता? तुम्ही माझे साक्षीदार होऊ शकता असा विश्वास तुम्हाला खरोखरच वाटतो का? आज तू जे पाहिले आहेस त्याची साक्ष देण्यास तू असमर्थ आहेस असा दिवस जर आला, तर निर्माण केलेल्या जीवांचे कार्यच तू हरवून बसशील व तुझ्या अस्तित्वाला काही अर्थच उरणार नाही. तू मनुष्य म्हणवण्यास लायक राहणार नाहीस. तू मनुष्य राहणारच नाहीस, असे म्हणायलाही हरकत नाही! मी तुमच्यावर अमाप कार्य केले आहे, पण तू सध्या काहीच शिकत नसल्यामुळे, तुला कशाचीच जाणीव नसल्यामुळे आणि तुझे कष्ट परिणामशून्य असल्यामुळे, माझ्या कार्याचा विस्तार करण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा तू फक्त शून्य नजरेने, अवाक्षरही न बोलता व अत्यंत निरुपयोगीपणे बघत राहशील. यामुळे तू सर्वकालीन पापी होणार नाहीस का? जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा तुला खोलवर पश्चात्ताप होणार नाही का? तू निराशेच्या गर्तेत बुडणार नाहीस का? आजचे माझे सर्व कार्य हे रिकामपणातून किंवा कंटाळा आला म्हणून केलेले नाही, तर ते माझ्या भविष्यातील कार्याचा पाया घालण्यासाठी आहे. मी कोंडीत सापडलो आहे आणि म्हणून काहीतरी नवीन शोधण्याची गरज आहे असे मुळीच नाही. तू माझे कार्य समजून घेतले पाहिजेस; ते काही रस्त्यावर खेळणाऱ्या पोराचे कार्य नाही, ते माझ्या पित्याचा प्रतिनिधी म्हणून केलेले कार्य आहे. हे सर्व मी स्वतःच केलेले आहे असे नाही, तर मी माझ्या पित्याचे प्रतिनिधित्व करतो आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. दरम्यान, तुमची भूमिका ही कटाक्षाने अनुसरण करण्याची, आज्ञापालन करण्याची, बदलण्याची व साक्ष देण्याची आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवावा, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे; तुमच्यापैकी प्रत्येकाने समजून घेण्याचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या पित्याने त्याच्या महानतेसाठी, त्याने सृष्टी निर्माण केली त्या क्षणापासून तुम्हा सर्वांना माझ्याशी जोडून टाकले. माझ्या कार्यासाठी आणि त्याच्या महानतेसाठी त्याने तुम्हा लोकांना नियत केले. माझ्या पित्यामुळेच तुमचा माझ्यावर विश्वास आहे; माझ्या पित्याच्या पूर्वनियोजनामुळेच तुम्ही माझे अनुसरण करता. यातील काहीच तुम्ही स्वतः निवडलेले नाही. याहूनही जास्त महत्त्वाचे म्हणजे माझ्यासाठी साक्ष देण्याच्या हेतूने माझ्या पित्याने मला जे दिले ते तुम्ही लोकच आहात, हे तुम्ही समजून घ्यावे. त्याने तुम्हाला माझ्याकडे सोपवलेले असल्यामुळे, मी घालून दिलेल्या मार्गाचे पालन तुम्ही केले पाहिजे, त्याचप्रमाणे माझ्या शिकवणीच्या मार्गाने व भाषेप्रमाणे तुम्ही लोकांनी चालले पाहिजे, कारण माझ्या मार्गांचा अवलंब करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमच्या माझ्यावरील विश्वासाचा मूळ हेतू हा आहे. म्हणून, मी तुम्हा लोकांना हे सांगतो: माझ्या पित्याने केवळ माझ्या मार्गांचे पालन करण्यासाठी तुम्हा लोकांना मला प्रदान केले. तथापि, तुमचा माझ्यावर केवळ विश्वास आहे; तुम्ही माझे नाही, कारण तुम्ही इस्रायली कुटुंबातील नाही, तर प्राचीन सर्पाच्या कुळातील आहात. माझे तुम्हाला एवढेच सांगणे आहे, की तुम्ही माझ्यासाठी साक्ष द्यावी, पण आज तुम्ही माझ्या मार्गाने चालावे. हे सर्व भविष्यातील साक्षीसाठी आहे. तुम्ही जर केवळ माझे ऐकणारे लोक म्हणूनच कार्य केले, तर तुम्हाला काहीही मूल्य असणार नाही व माझ्या पित्याने तुम्हाला माझ्याकडे सोपवण्याचे महत्त्व हरवून जाईल. मी तुम्हाला जे आग्रहपूर्वक सांगतो आहे ते म्हणजे, तुम्ही माझ्या मार्गांचे अनुसरण करायला हवे.