खरी व्यक्ती होणे म्हणजे काय

मनुष्याचे व्यवस्थापन करणे हे नेहमीच माझे कर्तव्य राहिलेले आहे. त्याहूनही जास्त म्हणजे, जेव्हा मी जग निर्माण केले तेव्हा मी मनुष्यावरचा विजय नियत केला होता. हे लोकांना कदाचित माहीत नसेल, की शेवटच्या दिवसांमध्ये मी मनुष्यावर संपूर्ण विजय प्राप्त करेन किंवा मानवजातीमधील बंडखोर मनुष्यांवर प्राप्त केलेला विजय हा मी सैतानाच्या केलेल्या पराभवाचा पुरावा आहे. पण जेव्हा माझ्या शत्रूने माझ्यासह लढाईत भाग घेतला, तेव्हा मी त्याला आधीच सांगितले, की सैतानाने ज्यांच्यावर कब्जा केला आहे आणि आपली अपत्ये, त्याच्या घराचे रक्षण करणारे एकनिष्ठ सेवक बनवले आहे त्यांच्यावर मी विजय प्राप्त करेन. विजय मिळवणे याचा मूळ अर्थ पराभव करणे, अपमानाचा विषय बनवणे; इस्रायली लोकांच्या भाषेत, त्याचा अर्थ पराभव करणे, नष्ट करणे व माझ्याविरुद्ध आणखी प्रतिकार करण्यास असमर्थ बनवणे असा आहे. पण आज, तुम्ही हा शब्द वापरता तेव्हा त्याचा अर्थ जिंकून घेणे असा आहे. मनुष्यांमधील दुष्टांना पूर्णपणे नष्ट करणे आणि उखडून टाकणे हाच माझा उद्देश राहिला आहे, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे, जेणेकरून ते माझ्याविरुद्ध बंड करणार नाहीत व माझ्या कार्यात व्यत्यय आणणे किंवा ते बिघडवणे ही तर दूरचीच गोष्ट. मनुष्याबद्दल विचार करायचा, तर या शब्दाचा अर्थ विजय असा झालेला आहे. या शब्दाचे अर्थ काहीही असले, तरी मानवजातीवर विजय मिळवणे हे माझे कार्य आहे. कारण मानवजात माझ्या व्यवस्थापनाचे एक उपांग आहे हे खरे असले, तरी अधिक नेमकेपणे सांगायचे झाल्यास, मानवजात म्हणजे माझा शत्रूच आहे. दुष्ट आणि माझी आज्ञा न पाळणारा मनुष्यच आहे. मानवजात म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मी शाप दिलेल्या दुष्टांची संतती आहे. माझ्याशी द्रोह करणाऱ्या आद्यदेवदूताचे वंशज म्हणजे मानव आहे. फार पूर्वी मी तिरस्कृत केल्याने तेव्हापासून माझा कायमचा व जुळवून घेता न येणारा शत्रू बनलेल्या सैतानाचा वारस म्हणजे मानवजात आहे. कारण संपूर्ण मानवजातीच्या डोक्यावरचे आकाश अशांत व अंधारलेले आहे, स्पष्टतेचा जराही अंश नसलेले आहे आणि मानवी जग घोर अंधःकारात बुडालेले आहे, त्यामुळे त्यात राहणारा मनुष्य स्वतःच्या चेहऱ्यासमोर धरलेला स्वतःचा हातदेखील बघू शकत नाही किंवा मान उंचावली तर सूर्याला बघू शकत नाही. त्याच्या पायाखालचा रस्ता चिखलाने भरलेला व खड्ड्यांनी भरलेला आहे, त्रासदायक वळणावळणांचा आहे; सगळ्या जमिनीवर प्रेतांचा खच आहे. अंधाऱ्या कोपऱ्यांत मृतांचे अवशेष भरले आहेत आणि थंड व काळोख्या कोपऱ्यांत राक्षसांचे घोळके वस्तीला आले आहेत. आणि मनुष्यां च्या जगात सर्वत्र राक्षसांच्या घोळक्यांची येजा सुरू आहे. सर्व प्रकारच्या पशूंची घाणीने भरलेली संतती लढाईत मग्न आहे, तो आवाज हृदयात धडकी भरवणारा आहे. अशा वेळी, अशा जगात, अशा “पृथ्वीवरील स्वर्गात”, जीवनाचे सौख्य शोधायला मनुष्य कुठे जातो? त्याच्या जीवनाचे गंतव्यस्थान शोधण्यासाठी तो कुठे जाऊ शकेल? पूर्वापार सैतानाच्या टाचांखाली चिरडली गेलेली मानवजात पहिल्यापासूनच सैतानाचे रूप धारण करून आहे—त्याहूनही जास्त म्हणजे, मानवजात हे सैतानाचे मूर्त रूप आहे व सैतानाची साक्ष देणारा स्पष्ट व मोठ्या आवाजाचा पुरावा म्हणून ती उभी आहे. अशी मानवजात, अधोगतीला गेलेल्या लोकांचा असा गट, ह्या भ्रष्ट मानवी परिवाराची अशी संतती, देवाची साक्ष कशी देऊ शकेल? माझा महिमा कुठून येतो? माझ्या साक्षीबद्दल बोलायला कोणी एखादा कुठून सुरुवात करू शकतो? कारण मनुष्याला—मी फार पूर्वी निर्माण केलेल्या आणि जो माझ्या महिम्याने व माझ्या वास्तव्याने परिपूर्ण होता त्या मनुष्याला—माझ्या विरोधात उभ्या असणाऱ्या शत्रूने भ्रष्ट करून आधीच त्यावर कब्जा केला आहे, त्याला मलिन केले आहे. त्याने माझा महिमा हिसकावून घेतला आहे आणि त्याने मनुष्याला सैतानाच्या कुरूपतेने अतिशय भरलेल्या विषाने व चांगल्या-वाईटाचे ज्ञान देणाऱ्या वृक्षाच्या फळाच्या रसाने भरून टाकले आहे. सुरुवातीला मी मनुष्याला निर्माण केले; म्हणजे मी मनुष्याच्या पूर्वजाला, आदामाला निर्माण केले. त्याला जोमाने सळसळणारे, उत्साहाने सळसळणारे रूप आणि शरीर दिलेले होते व त्याहूनही जास्त म्हणजे तो माझ्या महिम्याच्या सान्निध्यात होता. मी मनुष्याची निर्मिती केली तो एक गौरवशाली दिवस होता. त्यानंतर आदामाच्या शरीरातून हव्वाची निर्मिती केली गेली आणि तीही मनुष्याची पूर्वज होती. आणि म्हणून मी निर्माण केलेले लोक माझ्या श्वासाने परिपूर्ण व माझ्या महिम्याने सळसळणारे होते. आदामाचा जन्म मुळात माझ्या हातापासून झाला आणि तो माझ्याच प्रतिमेची प्रतिकृती होता. अशा प्रकारे, “आदाम” या शब्दाचा मूळ अर्थ होता, मी निर्माण केलेला एक जीव, जो माझ्या प्रमुख ऊर्जेने युक्त, माझ्या महिम्याने युक्त, ज्याच्याकडे रूप व प्रतिमा आहे, आत्मा आणि श्वास आहे. तो असा एकमेव निर्मिलेला प्राणी होता, चेतनेने युक्त होता, ज्याच्याकडे माझे प्रतिनिधित्व करण्याची, माझी प्रतिमा धारण करण्याची, माझा श्वास प्राप्त करण्याची क्षमता होती. सुरुवातीला, हव्वा ही अशी दुसरी मनुष्य होती जिला श्वास मिळाले होते व जिची निर्मिती माझ्या आदेशावरून झाली होती, त्यामुळे “हव्वा” या शब्दाचा मूळ अर्थ होता असा एक निर्मिलेला प्राणी जो माझा महिमा पुढे नेईल, जो माझ्या सामर्थ्याने युक्त आहे आणि त्याहून जास्त म्हणजे ज्याला माझ्या महिम्याचे वरदान मिळाले आहे. हव्वा आदामापासून उत्पन्न झाली, त्यामुळे तिनेही माझी प्रतिमा धारण केली, कारण ती माझ्या प्रतिमेवरून निर्माण केलेली दुसरी मनुष्य होती. “हव्वा” या शब्दाचा मूळ अर्थ होता चेतना असलेला, हाडामांसाचा सजीव मनुष्य, माझी दुसरी साक्ष तसेच मनुष्यांमधील माझी दुसरी प्रतिमा. ते मनुष्यांचे पूर्वज होते, मनुष्याचा शुद्ध व मौल्यवान खजिना होते आणि पहिल्यापासूनच, चेतनेने युक्त असलेले सजीव व्यक्ती होते. तथापि, मनुष्यांच्या पूर्वजांना दुष्ट प्रवृत्तींनी तुडवून टाकले, बंदी बनवले व मानवी जगाला पूर्ण अंधारात बुडवून टाकले, जेणेकरून सर्व मानव संतती माझ्या अस्तित्वावर विश्वास ठेवणार नाही. याहून अधिक भयंकर तिरस्काराची गोष्ट म्हणजे, या दुष्ट प्रवृत्ती लोकांना भ्रष्ट करत असताना आणि त्यांना चिरडून टाकत असताना अत्यंत क्रूरतेने, तो माझा महिमा, माझी साक्ष, मी त्यांना प्रदान केलेले चैतन्य, श्वास, मी त्यांच्यात फुंकलेले प्राण, मानवी जगातील माझा सर्व महिमा व मी मनुष्यासाठी शिंपलेले माझे रक्त हे सर्व काही काढून घेत आहे. मानवजात आता प्रकाशात राहिलेली नाही, मी लोकांना दिलेले सर्व काही ते गमावून बसले आहेत आणि मी दिलेला महिमा त्यांनी टाकून दिला आहे. सृष्टीतील सर्व सजीवांचा प्रभू मीच आहे, हे ते कसे मान्य करू शकतील? स्वर्गातील माझ्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास कसा टिकून राहू शकेल? माझ्या महिम्याचे पृथ्वीवरील प्रकटीकरण त्यांना कसे आढळेल? आपल्या स्वतःच्या पूर्वजांनी ज्याचा, आपला निर्माणकर्ता प्रभू म्हणून आदर केला, त्याचा स्वीकार ही नातवंडे कसा करतील? या बिचाऱ्या नातवंडांनी, मी आदाम व हव्वाला प्रदान केलेला महिमा, प्रतिमा आणि साक्ष, तसेच ज्यावर ते अस्तित्वासाठी अवलंबून आहेत, असे मी मानवजातीला प्रदान केलेले जीवनही उदारपणे दुष्टाला “सादर” करून टाकले आहे. आणि दुष्टाच्या अस्तित्वाची त्यांना जराही कुणकूण नाही व माझा महिमा ते त्याला देऊन टाकतात. वर येऊन व्यापून टाकणारा “घाणेरडा गाळ” या संज्ञेचा उगम हाच नाही का? अशी मानवजात, असे दुष्ट दानव, अशी चालतीबोलती प्रेते, अशा सैतानाच्या आकृत्या, असे माझे शत्रू यांना माझा महिमा कसा प्राप्त होईल? मी माझा महिमा पुन्हा प्राप्त करेन, मनुष्यांमध्ये अस्तित्वात असणारी माझी साक्ष पुन्हा प्राप्त करेन आणि फार पूर्वी जे माझे होते व जे मी मानवजातीला दिले होते, ते सर्व मी पुन्हा प्राप्त करेन—मी मानवजातीवर पूर्णपणे विजय प्राप्त करेन. तथापि, मी जे मनुष्य निर्माण केले ते पवित्र मनुष्य होते, त्यांनी माझी प्रतिमा आणि माझा महिमा धारण केला होता, हे तुला माहीत असले पाहिजे. ते सैतानाचे नव्हते, तसेच ते त्याच्यामुळे तुडवलेही गेलेले नव्हते. ते विशुद्धतेने माझे प्रकटीकरण होते, सैतानाच्या विषाचा अंशही त्यांच्यात नव्हता. व म्हणून, मी मानवजातीला सांगतो, की मला फक्त जे माझ्या हाताने निर्माण केले आहे, तेच हवे आहे—ज्यांच्यावर माझे प्रेम आहे आणि ज्या इतर कुणालाही वश नाहीत अशा पवित्र व्यक्ती. त्याहून जास्त म्हणजे, मला त्यांच्यामुळे आनंद होईल व मी त्यांना माझा महिमा समजेन. मात्र, मला सैतानाने भ्रष्ट केलेली, आज सैतानाला वश असलेली आणि जी माझी मूळ निर्मिती नाही अशी मानवजात नको आहे. मानवी जगात अस्तित्वात असलेला माझा महिमा पुन्हा प्राप्त करण्याचा माझा उद्देश असल्याने, सैतानाचा पराभव करण्याच्या माझ्या पराक्रमाचा पुरावा म्हणून मी मनुष्यांमध्ये जे वाचले आहेत त्यांच्यावर पूर्णपणे विजय प्राप्त करेन. माझे स्फटिक निर्मळ स्वत्व, माझ्या आनंदाचा विषय म्हणून मी फक्त माझ्याच साक्षीचा विचार करतो. ही माझी इच्छा आहे.

आज मानवजात जिथे आहे, तिथे पोचण्यासाठी त्यांना इतिहासात हजारो वर्षे लागली आहेत. तरीही सुरुवातीला मी निर्माण केलेली मानवजात दीर्घकाळापासून अधोगतीमध्ये बुडाली आहे. मानवता ही आता मला अपेक्षित असलेली मानवता नाही आणि अशा प्रकारे, माझ्या दृष्टीने, मानवजात या संज्ञेलाही लोक पात्र नाहीत. किंबहुना, ते सैतानाने बंदिवान केलेल्या मानवजातीवरील कलंक आहेत, सैतानाचा वास असलेली चालतीबोलती कुजलेली प्रेते आहेत व त्यांमध्ये सैतान स्वतःला लपेटतो. लोकांचा माझ्या अस्तित्वावर विश्वास नाही, ना ते माझ्या आगमनाचे स्वागत करतात. मनुष्य माझ्या विनंत्यांना फक्त नाखुषीने प्रतिसाद देतो. तात्पुरते त्यानुसार वागतो. आणि जीवनातील सुखदुःखे प्रामाणिकपणाने मला सांगत नाही. लोक मला अगम्य समजतात, त्यामुळे ते माझ्याकडे पाहून नाखुषीने स्मित करतात, त्यांचा दृष्टिकोन सत्ताधीश असणाऱ्या आरामात लोळणाऱ्या व्यक्तीचा असतो. कारण लोकांना माझ्या कार्याचे ज्ञानच नाही व आत्ताच्या इच्छेचे ज्ञान तर दूरचीच गोष्ट. मी तुम्हा लोकांना प्रामाणिकपणे सांगतो: जेव्हा तो दिवस येईल, तेव्हा माझी पूजा करणाऱ्या कोणाही व्यक्तीचा त्रास तुमच्या त्रासापेक्षा सुसह्य असेल. प्रत्यक्षात, तुमच्या माझ्यावरच्या विश्वासाचे प्रमाण ईयोबाच्या विश्वासापेक्षा जास्त नाही—यहूदी परुशांचा विश्वासदेखील तुमच्या विश्वासापेक्षा जास्त आहे—आणि म्हणून, जर अग्नीवर्षावाचा दिवस आला, तर येशूने परुशांची कानउघाडणी केली तेव्हाच्या त्यांच्या त्रासापेक्षा, तुमचा त्रास हा जास्त असेल, मोशेला विरोध करणाऱ्या २५० नेत्यांच्या त्रासापेक्षा जास्त असेल व आपल्या विनाशाच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या सदोमाच्या त्रासापेक्षाही जास्त असेल. मोशेने जेव्हा शिळेवर आघात केला आणि यहोवाने दिलेले पाणी उसळून वर आले, तेव्हा त्यामागे त्याचा विश्वास होता. जेव्हा दावीदाने आनंदभरित हृदयाने, माझ्या म्हणजे यहोवाच्या स्तुतीप्रीत्यर्थ लायर हे वाद्य वाजवले, तेव्हा त्यामागे त्याचा विश्वास होता. ईयोबाने जेव्हा आपले अगणित पशुधन व अमाप संपत्ती गमावली आणि त्याचे शरीर पुटकुळ्यांनी भरून गेले, तेव्हा त्यामागे त्याची श्रद्धा होती. जेव्हा तो माझा, परमेश्वराचा, आवाज ऐकू शकला व माझा, यहोवाचा महिमा पाहू शकला, तेव्हा त्यामागे त्याची श्रद्धा होती. येशू ख्रिस्ताचे अनुसरण पेत्र करू शकला त्याचे कारण त्याची श्रद्धा होती. तो माझ्यासाठी सुळावर जाऊ शकला आणि महान साक्ष देऊ शकला त्याचे कारण त्याची श्रद्धा होती. जेव्हा योहानाला मनुष्याच्या पुत्राची देदीप्यमान प्रतिमा दिसली, त्याचे कारण त्याची श्रद्धा होती. जेव्हा त्याने शेवटच्या दिवसांमधील दृष्य पाहिले, त्याचेही सर्वात मोठे कारण त्याची श्रद्धा होती. परराष्ट्रांमधील तशाकथित समूहांना माझा साक्षात्कार प्राप्त झाला आहे व मी माझे मनुष्यांमधील कार्य करण्यासाठी सदेह परत आलो आहे हे त्यांना कळले याचे कारण त्यांची श्रद्धा होती. जे माझ्या कठोर वचनांनी व्यथित झाले आहेत आणि तरीही त्यांनीच दिलासा दिला आहे व ते वाचले आहेत—त्यांनी हे आपल्या श्रद्धेमुळेच केलेले नाही का? ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तरीही जे कष्ट भोगतात, त्यांना सुद्धा जगाने नाकारलेले नाही का? जे माझ्या वचनांच्या बाहेर राहतात, कसोट्यांच्या त्रासापासून दूर पळतात, ते सर्वजण जगात वाहवत राहात नाहीत का? इतस्ततः फडफडणाऱ्या शिशिरातील पानांसारखीच त्यांची अवस्था असते. त्यांना ना निवाऱ्याची जागा असते, ना माझी सांत्वनपर वचने असतात. मी त्यांना ताडण देत नाही किंवा परिष्कृत करत नाही, तरीही ते एका जागेवरून दुसऱ्या जागी भटकणारे, स्वर्गाच्या राज्याच्या बाहेर रस्त्यांवर भटकणारे भिकारी नव्हेत का? जग हे खरोखर तुझे विश्रांतिस्थान आहे का? माझे ताडण टाळून तू खरोखरच जगाकडून पुसटसे पसंतीदर्शक स्मित प्राप्त करू शकशील का? जे रिकामपण लपवलेच जाऊ शकत नाही ते तुझ्या हृदयातील रिकामपण झाकण्यासाठी तू खरोखर मौजमजेचा भडिमार वापरू शकतोस का? तू तुझ्या कुटुंबातील सर्वांना कदाचित मूर्ख बनवू शकशील, पण तू मला कधीही मूर्ख बनवू शकणार नाहीस. कारण तुझी श्रद्धा अतिशय अल्पशी आहे, तरीही तू आजतागायत आयुष्यात शक्य असलेला कोणताही आनंद शोधण्यास असमर्थ आहेस. माझे तुला कळकळीचे सांगणे आहे: तुमचे पूर्ण आयुष्य यथातथा व देहासाठीच्या धावपळीत घालवण्याऐवजी, मनुष्य सहन करू शकणार नाही असा त्रास भोगण्याऐवजी, तुमचे अर्धे आयुष्य माझ्यासाठी घालवलेत, तरी ते अधिक उत्तम ठरेल. स्वतःला इतके जपण्याचा आणि माझ्या ताडणापासून पळण्याचा काय उपयोग आहे? माझ्या क्षणिक शिक्षेपासून लपण्याचा व त्यामुळे चिरकाल अपमान, चिरकाल ताडण ओढवून घेण्याचा काय उपयोग आहे? खरे तर मी कोणालाही माझ्या इच्छेनुसार वाकवत नाही. जर कोणी खरोखरच माझ्या योजनेला शरण जाण्यास इच्छुक असेल, तर मी त्यांना वाईट वागवत नाही. पण ज्याप्रमाणे ईयोबाने माझ्यावर, यहोवावर, विश्वास ठेवला त्याप्रमाणे सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुमची श्रद्धा जर थोमा पेक्षा जास्त असेल, तर तुम्हा लोकांची श्रद्धा माझ्या प्रशंसेस पात्र असेल, तुमच्या एकनिष्ठेतून तुम्ही माझा शाश्वत परमानंद प्राप्त कराल आणि तुमच्या काळात तुम्ही नक्कीच माझा महिमा प्राप्त कराल. तथापि, वाऱ्याने उडालेल्या धुळीचे कण डोळ्यांत गेलेल्या व तोंडात सैतानाची देणगी असलेल्या, जगाची सत्ता बळकावलेल्या दुष्टाने ज्यांची झाकोळलेली मने पूर्वीपासून झपाटून टाकली आहेत अशा सदोम शहरातील लोकांप्रमाणे जे लोक जगावर आणि सैतानावर विश्वास ठेवतात, त्यांनी त्यांची हृदये कठोर केलेली आहेत. त्यांचे विचार प्राचीन काळातील सैतानाने जवळजवळ बंदिस्त करून टाकलेले आहेत. आणि म्हणून, मानवजातीची श्रद्धा नाहीशी झालेली आहे व ते माझ्या कार्याची दखलही घेऊ शकत नाहीत. ते फक्त माझ्या कार्याला क्षुल्लक समजण्याचा दुबळा प्रयत्न तेवढा करू शकतात किंवा त्याचे ढोबळ विश्लेषण करू शकतात, कारण फार पूर्वीपासून त्यांना सैतानाच्या विषाने झपाटले आहे.

मी मनुष्यावर विजय प्राप्त करेन कारण लोकांना मीच निर्माण केले होते आणि त्याखेरीज, त्यांनी माझ्या सृष्टीतील सर्व विपुल गोष्टींचा आस्वाद घेतला आहे. पण लोकांनी मला नाकारलेही आहे; मी त्यांच्या हृदयात नाही व ते मला त्यांच्या अस्तित्वावरचा भार मानतात. इतका की, मला खरोखर पाहूनदेखील ते मला नाकारतात आणि माझ्या पराभव करण्याचे शक्य ते सगळे मार्ग शोधण्यात मेंदू शिणवतात. लोक मला त्यांना गंभीरपणे वागवू देत नाहीत किंवा त्यांच्याकडून काही काटेकोर मागण्या करू देत नाहीत, तसेच ते मला त्यांच्या अनीतीचा न्याय करण्याची किंवा त्यासाठी ताडण करण्याचीही परवानगी देत नाहीत. यामुळे त्यात स्वारस्य घेणे तर दूरच, त्यांना हे त्रस्त करणारे वाटते. आणि म्हणून, माझे कार्य हे माझ्यामुळे खाणाऱ्या, पिणाऱ्या, मजा करणाऱ्या पण मला न जाणणाऱ्या मानवजातीला पराभूत करणे हे आहे. मी मनुष्याला निःशस्त्र करेन व मग माझ्या देवदूतांसह, माझ्या महिम्यासह, मी माझ्या निवासस्थानी परतेन. कारण लोकांच्या कृतींमुळे माझे हृदय फार पूर्वीपासून विदीर्ण झाले आहे आणि माझ्या कार्याचे तुकडे तुकडे केले गेलेले आहेत. मी आनंदात परतण्यापूर्वी दुष्टाने माझा जो महिमा हिरावून घेतला आहे, तो परत मिळवणे हा माझा उद्देश आहे. हे करताना मनुष्याला आपले आयुष्य जगत राहू देणे, “शांततेत व समाधानात जगत राहू देणे”, “स्वतःची शेते पिकवू” देणे, हा माझा उद्देश आहे आणि मी यानंतर त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. पण आता मला दुष्टाच्या हातून माझा महिमा पूर्णपणे परत मिळवायचा आहे, या जगाची निर्मिती करताना मी जो महिमा मनुष्यामध्ये घातलेला आहे, तो पूर्णपणाने परत मिळवायचा आहे. पुन्हा कधीही मी तो पृथ्वीवरच्या मानववंशाला देणार नाही. कारण लोक माझा महिमा जतन करण्यात अपयशी ठरले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांनी त्याची जागा सैतानाच्या प्रतिमेला दिली आहे. माझे आगमन लोकांना मूल्यवान वाटत नाही, माझ्या महिम्याचा दिवस त्यांना मोलाचा वाटत नाही. माझे पावित्र्य स्वीकारताना त्यांना आनंद होत नाही व माझा महिमा मला परत करण्याची तर दूरचीच गोष्ट, तसेच दुष्टाचे विष त्यागण्याचीही त्यांची इच्छा नसते. त्याच त्या जुन्या पद्धतीने मनुष्य मला फसवत राहतो, लोक अद्यापही चमकती स्मिते आणि आनंदी चेहरे घेऊन त्याच जुन्या पद्धतीने वावरतात. माझा महिमा त्यांना सोडून गेल्यावर जी खोल विषण्णता मनुष्यांना झेलावी लागणार आहे, त्याची त्यांना जाणीव नाही. खास करून, त्यांना याची जाणीव नसते, की जेव्हा संपूर्ण मानवजातीपुढे माझा दिवस येईल, तेव्हा नोहाच्या काळातील लोकांसाठी होता त्यापेक्षाही कठीण काळ त्यांच्यावर ओढवणार आहे, कारण माझा महिमा निघून गेल्यावर इस्रायल किती अंधारमय झाले हे त्यांना माहीत नाही. कारण पहाट झाल्यावर, रात्र किती काळीकुट्ट होती हे मनुष्य विसरतो. जेव्हा सूर्य पुन्हा अस्ताला जातो व मनुष्यावर अंधार पसरतो, तेव्हा तो पुन्हा आक्रोश करतो आणि अंधारात दातओठ खातो. माझा महिमा इस्रायलमधून नाहीसा झाला, तेव्हा इस्रायली लोकांसाठी ते त्रासाचे दिवस सहन करणे किती कठीण होते हे तुम्ही लोक विसरला आहात का? तुम्हा लोकांसाठी माझा महिमा पाहण्याची व माझ्या महिम्याचा दिवस वाटून घेण्याची हीच वेळ आहे. ही घाणेरडी जागा सोडून माझा महिमा जेव्हा निघून जाईल, तेव्हा मनुष्य अंधारात आक्रोश करेल. आता महिमामय दिवस आहे जेव्हा मी माझे कार्य करतो आहे आणि जेव्हा मी मनुष्याला त्रासापासून मुक्त करतो आहे, कारण मी त्रास व यातनांचा काळ त्यांना देणार नाही. मला फक्त मानवजातीवर पूर्णपणे विजय मिळवायचा आहे आणि मनुष्यामधील दुष्टांना पूर्णपणे पराभूत करायचे आहे.

मागील:  तुझ्या दृष्टीने देव म्हणजे काय?

पुढील:  श्रद्धेविषयी तुला काय माहीत आहे?

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger