देव आणि मनुष्य एकत्र विश्रांतीमध्ये प्रवेश करतील

सुरुवातीला देव विश्रांती घेत होता. त्या वेळी पृथ्वीवर मनुष्य किंवा इतर काहीही नव्हते आणि देवाने अद्याप कोणतेही कार्य केलेले नव्हते. मानवजात अस्तित्वात आल्यानंतर व मानवजात भ्रष्ट झाल्यानंतरच त्याने व्यवस्थापनाचे कार्य सुरू केले; तेव्हापासून, त्याने पुढे कधी विश्रांती घेतली नाही, उलट तो स्वतःला मानवजातीमध्ये व्यग्र करू लागला. मानवजात भ्रष्ट झाल्यामुळे तसेच मुख्य देवदूताच्या बंडखोरीपणामुळे देवाने त्याची विश्रांती गमावली. जर देवाने सैतानाला पराभूत केले नाही आणि भ्रष्ट मानवजातीचे रक्षण केले नाही, तर तो पुन्हा कधीही विश्रांती घेऊ शकणार नाही. मनुष्याला जशी विश्रांतीची कमतरता असते, तशीच देवालाही असते व जेव्हा तो पुन्हा विश्रांती घेतो तेव्हा मनुष्यालाही विश्रांती लाभते. विश्रांतीमध्ये जगणे म्हणजे युद्धाखेरीज, मलिनतेखेरीज आणि कोणत्याही अनीतिमत्त्वाखेरीज जीवन. म्हणजेच, हे सैतानाच्या व्यत्ययापासून (येथे “सैतान” म्हणजे शत्रू शक्ती) व सैतानाच्या भ्रष्टाचारापासून विरहित असलेले जीवन आहे आणि ते देवाच्या विरोधात असलेल्या कोणत्याही शक्तीच्या आक्रमणास प्रवृत्त नाही; हे असे जीवन आहे ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट स्वतःच्या प्रकारानुसार चालते व सृष्टीच्या प्रभूची उपासना करू शकते आणि ज्यामध्ये स्वर्ग व पृथ्वी पूर्णपणे शांत असतात—“मनुष्यांचे शांत जीवन” असा या शब्दांचा अर्थ आहे. जेव्हा देव विश्रांती घेतो, तेव्हा पृथ्वीवर अनीतिमत्त्व कायम राहणार नाही किंवा शत्रू सैन्याकडून कोणतेही आक्रमण होणार नाही आणि मानवजात नवीन क्षेत्रात प्रवेश करेल—यापुढे सैतानाने भ्रष्ट केलेली मानवजात राहणार नाही, तर सैतानाने भ्रष्ट केल्यानंतर वाचवलेली मानवजात शिल्लक राहील. मानवजातीचा विश्रांतीचा दिवस हा देवाचादेखील विश्रांतीचा दिवस असेल. मानवजातीच्या विश्रांतीमध्ये प्रवेश करण्याच्या असमर्थतेमुळे देवाने त्याची विश्रांती गमावली, तो मुळात विश्रांती घेण्यास असमर्थ होता म्हणून नव्हे. विश्रांतीमध्ये प्रवेश करण्याचा अर्थ असा नाही, की सर्व हालचाल थांबेल किंवा विकसित होणे थांबेल. याचा अर्थ असाही नाही, की देव कार्य करणे थांबवेल किंवा मनुष्य जगणे थांबवेल. जेव्हा सैतानाचा नाश होईल, त्याच्या दुष्कृत्यांमध्ये सामील झालेल्या दुष्टांना शिक्षा केली जाईल व त्यांचे निर्मूलन केले जाईल आणि जेव्हा देवाच्या विरोधी सर्व शक्तींचे अस्तित्व संपुष्टात येईल, तेव्हा ते विश्रांतीमध्ये प्रवेश करण्याचे चिन्ह असेल. देव विश्रांतीमध्ये प्रवेश करतो याचा अर्थ तो यापुढे मानवजातीच्या तारणाचे कार्य पार पाडणार नाही. मानवजातीने विश्रांतीमध्ये प्रवेश करण्याचा अर्थ असा, की संपूर्ण मानवजात देवाच्या प्रकाशात व त्याच्या आशीर्वादाखाली, सैतानाच्या भ्रष्टतेविना जगेल आणि यापुढे अनीति घडणार नाही. देवाच्या देखरेखीखाली, मनुष्य पृथ्वीवर सामान्यपणे जगतील. जेव्हा देव व मानवजात एकत्र विश्रांतीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा याचा अर्थ असा होतो की मानवजातीला वाचवले आहे आणि सैतानाचा नाश झाला आहे, मनुष्यांमध्ये देवाचे कार्य पूर्ण झाले आहे. देव यापुढे मनुष्यांमध्ये कार्य करत राहणार नाही व ते यापुढे सैतानाच्या अधिपत्याखाली राहणार नाहीत. यामुळे, देव यापुढे व्यग्र राहणार नाही आणि मनुष्य यापुढे सदैव फिरत राहणार नाहीत; देव व मानवजात एकाच वेळी विश्रांतीमध्ये प्रवेश करतील. देव त्याच्या मूळ ठिकाणी परत येईल आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणी परत येईल. ही अशी गंतव्यस्थाने आहेत जिथे देवाचे संपूर्ण व्यवस्थापन पूर्ण झाल्यावर देव व मनुष्य वास करतील. देवाला देवाचे गंतव्यस्थान आहे आणि मानवजातीला मानवजातीचे गंतव्यस्थान आहे. विश्रांती घेत असताना, देव पृथ्वीवरील सर्व मनुष्यांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करत राहील व त्याच्या प्रकाशात असताना, ते स्वर्गातील एका खऱ्या देवाची उपासना करतील. देव यापुढे मानवजातीमध्ये राहणार नाही किंवा मनुष्य देवाच्या गंतव्यस्थानी त्याच्यासोबत राहू शकणार नाहीत. देव आणि मनुष्य एकाच क्षेत्रात राहू शकत नाहीत; उलट, दोघांच्याही राहणीमानाच्या स्वतःच्या पद्धती आहेत. देव सर्व मानवजातीला मार्गदर्शन करणारा आहे व संपूर्ण मानवजात हे देवाच्या व्यवस्थापन कार्याचे प्रत्यक्ष रूप आहे. मनुष्यांना दिशा दाखवली जाते आणि ते देवासारखेच नसतात. “विश्रांती” म्हणजे एखाद्याच्या मूळ ठिकाणी परत जाणे. म्हणून, जेव्हा देव विश्रांतीमध्ये प्रवेश करतो, याचा अर्थ तो त्याच्या मूळ ठिकाणी परत आला आहे. तो यापुढे पृथ्वीवर राहणार नाही किंवा मानवजातीत राहून त्यांच्या आनंदात व दुःखात सहभागी होणार नाही. जेव्हा मनुष्य विश्रांतीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा याचा अर्थ असा होतो की ते निर्मितीच्या खऱ्या वस्तू बनले आहेत; ते पृथ्वीवरून देवाची उपासना करतील आणि सामान्य मानवी जीवन जगतील. लोक यापुढे देवाची अवज्ञा करणार नाहीत किंवा त्याचा प्रतिकार करणार नाहीत व आदाम आणि हव्वा यांच्या मूळ जीवनाकडे परत येतील. देव व मनुष्य यांनी विश्रांतीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे संबंधित जीवन आणि गंतव्यस्थाने हीच असतील. सैतान व देव यांच्यातील युद्धात सैतानाचा पराभव ही अपरिहार्य प्रवृत्ती आहे. अशाप्रकारे, देवाचे व्यवस्थापन कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याने विश्रांतीमध्ये प्रवेश करणे आणि मानवजातीचे संपूर्ण तारण व विश्रांतीमध्ये प्रवेश करणे हीदेखील अपरिहार्य प्रवृत्ती बनली आहे. मानवजातीचे विश्रांतीचे ठिकाण पृथ्वीवर आहे आणि देवाचे विश्रांतीचे ठिकाण स्वर्गात आहे. विश्रांतीमध्ये देवाची उपासना करत असताना मनुष्य पृथ्वीवर राहतील व देव उर्वरित मानवजातीचे नेतृत्व करत असताना, तो पृथ्वीवरून नव्हे तर स्वर्गातून त्यांचे नेतृत्व करेल. देव अजूनही आत्मा असेल, तर मनुष्य अजूनही देह असतील. देव आणि मनुष्य दोघेही वेगळ्या पद्धतीने विश्रांती घेतात. देव विश्रांती घेत असताना, तो मनुष्यांमध्ये येऊन प्रकट होईल; मनुष्य विश्रांती घेत असताना, देव त्यांना स्वर्गात जाण्यासाठी तसेच तेथील जीवनाचा आनंद घेण्यासाठी नेईल. देव व मानवजातीने विश्रांतीमध्ये प्रवेश केल्यानंतर, सैतान यापुढे अस्तित्वात राहणार नाही; त्याचप्रमाणे, त्या दुष्ट लोकांचे अस्तित्वही नाहीसे होईल. देव आणि मानवजातीच्या विश्रांतीपूर्वी, ज्यांनी पृथ्वीवर देवाचा छळ केला होता त्या दुष्ट व्यक्तींचा, तसेच तेथे त्याच्या आज्ञा न मानणाऱ्या शत्रूंचाही नाश झालेला असेल; शेवटच्या दिवसांतील मोठ्या संकटांनी त्यांचा नाश केलेला असेल. एकदा त्या दुष्ट लोकांचा समूळ नाश झाला, की पृथ्वीला सैतानाचा त्रास पुन्हा कधीच कळणार नाही. त्यावेळीच मानवजातीला संपूर्ण तारण प्राप्त होईल व देवाचे कार्य पूर्ण होईल. देव आणि मानवजातीला विश्रांतीमध्ये प्रवेश करण्यासाठी या पूर्व-आवश्यकता आहेत.

सर्व गोष्टींचा अंत होण्याचा दृष्टिकोन देवाच्या कार्याची पूर्णता तसेच मानवजातीच्या विकासाचा अंत दर्शवतो. याचा अर्थ असा, की सैतानाने भ्रष्ट केलेले मनुष्य त्यांच्या विकासाच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचलेले असतील व आदाम आणि हव्वा यांच्या वंशजांनी त्यांचा प्रसार पूर्ण केलेला असेल. याचा अर्थ असा, की अशा मानवजातीला, सैतानाने भ्रष्ट केल्यामुळे, पुढे विकसित होत राहणे अशक्य होईल. सुरुवातीला आदाम व हव्वा भ्रष्ट झाले नव्हते, परंतु एदेन बागेमधून हाकलून दिलेले आदाम आणि हव्वा सैतानाने भ्रष्ट केले होते. जेव्हा देव व मनुष्य एकत्र विश्रांतीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा आदाम आणि हव्वा—ज्यांना एदेन बागेतून हाकलण्यात आले होते—व त्यांच्या वंशजांचा अंत होईल. तरीही भविष्यातील मानवजातीमध्ये आदाम आणि हव्वा यांच्या वंशजांचा समावेश असेल, परंतु ते सैतानाच्या अधिपत्याखाली राहणारे मनुष्य नसतील. त्याऐवजी, ते असे लोक असतील ज्यांना वाचवले आहे व ज्यांचे शुद्धीकरण केले आहे. ही अशी मानवजात असेल ज्यांचा न्याय आणि तारण केले आहे व जी पवित्र आहे. हे लोक मुळातील मानवजातीसारखे नसतील; जवळजवळ असे म्हणता येईल, की ते सुरुवातीच्या आदाम आणि हव्वा यांच्या मानवजातीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे असतील. हे लोक सैतानाने भ्रष्ट झालेल्या सर्व लोकांमधून निवडले जातील व ते असे लोक असतील जे अखेर देवाचा न्याय आणि ताडण यातून खंबीरपणे पार पडलेले असतील; ते भ्रष्ट मानवजातीतील मनुष्यांचा अखेरचा उरलेला समूह असतील. हेच लोक देवासह अंतिम विश्रांतीमध्ये प्रवेश करू शकतील. जे लोक शेवटच्या दिवसांत देवाचा न्याय व ताडणाच्या कार्यादरम्यान—म्हणजेच शुद्धीकरणाच्या अंतिम कार्यादरम्यान—खंबीरपणे उभे राहण्यास समर्थ आहेत, तेच देवासोबत अंतिम विश्रांतीमध्ये प्रवेश करतील; म्हणजेच, जे लोक विश्रांतीमध्ये प्रवेश करतात, ते सैतानाच्या प्रभावापासून मुक्त झालेले असतील आणि शुद्धीकरणाचे अंतिम कार्य पार पाडल्यानंतर देवाने त्यांना प्राप्त केलेले असेल. हे मनुष्य, ज्यांना अखेरीस देवाने प्राप्त केलेले असेल, ते अंतिम विश्रांतीमध्ये प्रवेश करतील. देवाचे ताडण व न्यायाचा उद्देश हा मूलतः अंतिम विश्रांतीसाठी मानवजातीला शुद्ध करणे हा आहे; अशा शुद्धीकरणाविना, मानवजातीपैकी कोणाचेही प्रकारानुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकत नाही किंवा ती विश्रांतीमध्ये प्रवेश करू शकत नाही. हे कार्य मानवजातीसाठी विश्रांतीमध्ये प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग आहे. केवळ देवाचे शुद्धीकरणाचे कार्य मनुष्यांना त्यांच्या अनीतिमत्त्वापासून शुद्ध करेल आणि केवळ ताडण व न्यायाचे त्याचे कार्य मानवजातीमधील अवज्ञाकारी घटकांना प्रकाशात आणेल, त्यामुळे ज्यांना वाचवले जाऊ शकते त्यांना आणि ज्यांना वाचवले जाऊ शकत नाही अशा लोकांना वेगळे केले जाईल, जे टिकून राहतील व जे टिकून राहणार नाहीत अशा लोकांना वेगळे केले जाईल. जेव्हा हे कार्य संपुष्टात येईल, तेव्हा ज्या लोकांना राहण्याची परवानगी दिली जाईल, ते सर्व शुद्ध होतील आणि मानवजातीच्या उच्च अवस्थेत प्रवेश करतील, ज्यामध्ये ते पृथ्वीवरील अधिक आश्चर्यकारक असे दुसरे मानवी जीवन अनुभवतील; म्हणजेच दुसऱ्या शब्दांत, ते त्यांच्या मानवी विश्रांतीचा दिवस सुरू करतील व देवासोबत एकत्र राहतील. ज्यांना राहण्याची परवानगी दिलेली नाही त्यांना ताडण आणि न्याय प्राप्त झाल्यानंतर, त्यांचे खरे रंग पूर्णपणे प्रकाशात येतील, त्यानंतर ते सर्व नष्ट होतील व सैतानाप्रमाणे त्यांना यापुढे पृथ्वीवर जगण्याची परवानगी दिली जाणार नाही. भविष्यातील मानवजातीमध्ये यापुढे या प्रकारच्या कोणत्याही लोकांचा समावेश होणार नाही; असे लोक अंतिम विश्रांतीच्या भूमीत प्रवेश करण्यास योग्य नसतात किंवा ते देव आणि मानवजातीच्या विश्रांतीच्या दिवसात सामील होण्यास योग्य नसतात. कारण ते शिक्षेचे लक्ष्य आहेत व ते दुष्ट, अनीतिमान लोक आहेत. त्यांना एकदा वाचवण्यात आले होते आणि त्यांचा न्याय व ताडणदेखील झाले आहे; त्यांनी एकदा देवाची सेवादेखील केली. मात्र, जेव्हा शेवटचा दिवस येईल, तेव्हा त्यांच्या दुष्टपणामुळे आणि त्यांच्या अवज्ञेमुळे व त्यांना वाचवले जाऊ न शकल्यामुळे त्यांना बाहेर काढून टाकले जाईल आणि त्यांना नष्ट केले जाईल; ते भविष्यातील जगात पुन्हा कधीही अस्तित्वात येणार नाहीत व यापुढे भविष्यातील मानवजातीमध्ये राहणार नाहीत. मग ते मृतांचे आत्मे असोत किंवा देहात जिवंत असलेले लोक असोत, दुष्कर्म करणारे सर्व लोक आणि ज्यांना वाचवण्यात आले नाही असे सर्व लोक यांचा नाश होईल. जेव्हा मानवजातीतील पवित्र लोक विश्रांती घेतील, तेव्हा हे होईल. हे दुष्ट आत्मे व मनुष्य किंवा नीतिमान लोकांचे आत्मे आणि जे नीतिमत्व करतात ते, ते कोणत्याही युगात असले तरीही, जे वाईट करतात ते सर्व शेवटी नष्ट होतील व जे नीतिमान आहेत ते सर्व टिकून राहतील. एखाद्या व्यक्तीला किंवा आत्म्याला तारण मिळेल की नाही हे पूर्णपणे अंतिम युगाच्या कार्याच्या आधारावर ठरवले जात नाही; उलट, त्यांनी देवाला प्रतिकार केला आहे की नाही किंवा देवाप्रति अवज्ञा केली आहे का यावरून ठरवले जाते. पूर्वीच्या युगातील लोक ज्यांनी दुष्कृत्य केले आणि ते तारण प्राप्त करू शकले नाहीत, ते निःसंशयपणे, शिक्षेचे लक्ष्य ठरतील व सध्याच्या युगात जे वाईट कृत्य करतात आणि ज्यांना वाचवता येत नाही तेदेखील निश्चितपणे शिक्षेचे लक्ष्य ठरतील. मनुष्यांचे वर्गीकरण चांगल्या व वाईटाच्या आधारावर केले जाते, ते कोणत्या युगात राहतात यावर नाही. एकदा असे वर्गीकरण केले, की त्यांना लगेचच शिक्षा किंवा बक्षीस मिळणार नाही; उलट, देव शेवटच्या दिवसांतील त्याचे विजयाचे कार्य पूर्ण केल्यानंतरच वाईटाला शिक्षा करण्याचे आणि चांगल्याचा बक्षीस देण्याचे त्याचे कार्य पार पाडेल. वास्तविकतः, जेव्हा त्याने मानवजातीच्या तारणाचे त्याचे कार्य करण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच तो मनुष्यांना चांगल्या व वाईटामध्ये वेगळे करत आहे. त्याचे कार्य पूर्ण झाल्यानंतरच तो नीतिमानांना बक्षीस देईल आणि दुष्टांना शिक्षा देईल, एवढेच. असे नाही, की तो त्याचे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांना श्रेणींमध्ये विभागेल करेल व त्यानंतर लगेचच वाईटाला शिक्षा आणि चांगल्याला बक्षीस देण्याचे कार्य सुरू करेल. उलट, त्याचे कार्य पूर्ण झाल्यानंतरच हे कार्य केले जाईल. वाईटाला शिक्षा देण्याच्या व चांगल्याला बक्षीस देण्याच्या देवाच्या अंतिम कार्यामागील संपूर्ण हेतू हा सर्व मनुष्यांना पूर्णपणे शुद्ध करणे हा आहे, जेणेकरून तो शुद्ध पवित्र मानवजातीला चिरंतन विश्रांतीमध्ये आणू शकेल. त्याच्या कार्याचा हा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे; त्याच्या व्यवस्थापनाच्या संपूर्ण कार्याचा तो अंतिम टप्पा आहे. जर देवाने दुष्टांचा नाश केला नाही, उलट त्यांना राहू दिले, तरीही प्रत्येक मनुष्य विश्रांतीमध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि देव सर्व मानवजातीला एका चांगल्या क्षेत्रात आणू शकणार नाही. असे कार्य पूर्ण होणार नाही. जेव्हा त्याचे कार्य पूर्ण होईल, तेव्हा संपूर्ण मानवजात पूर्णपणे पवित्र होईल; केवळ अशा प्रकारे देव विश्रांतीत निवांतपणे जगू शकेल.

आजकाल लोक दैहिक गोष्टींचा त्याग करू शकत नाहीत; ते देह, जग, पैसा किंवा त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे भोग सोडू शकत नाहीत. बहुसंख्य लोक निष्काळजीपणे पाठपुरावा करतात. खरे तर, हे लोक त्यांच्या अंतःकरणात देवाला अजिबात बसवत नाहीत; आणखी वाईट म्हणजे ते देवाला घाबरत नाहीत. त्यांच्या अंतःकरणात देव नसतो आणि म्हणून देव जे काही करतो ते त्यांना समजू शकत नाही व त्याने उच्चारलेल्या वचनांवर विश्वास ठेवणे तर दूरच. असे मनुष्य खूपच देहबुद्धीचे असतात; ते खूप खोलवर भ्रष्ट आहेत आणि त्यांच्यामध्ये सत्याचा पूर्णतः अभाव आहे. इतकेच काय, देव देह धारण करू शकतो यावर त्यांचा विश्वास नाही. जो कोणी देहधारी देवावर विश्वास ठेवत नाही—म्हणजेच, जो दृश्य देवावर किंवा त्याच्या कार्यावर व वचनांवर विश्वास ठेवत नाही आणि उलट स्वर्गातील अदृश्य देवाची उपासना करतो—अशा व्यक्तींच्या हृदयात देव नसतो. असे लोक बंडखोर व देवाला विरोध करणारे असतात. त्यांच्यात माणुसकी आणि तर्काचा अभाव असतो, ते काहीही सत्य बोलू शकत नाही. शिवाय, हे लोक, दृश्यमान व मूर्त देवावर विश्वास ठेवत नाहीत, तरीही ते अदृश्य आणि अमूर्त देवाला सर्वात विश्वासार्ह व सर्वात आनंददायक मानतात. ते ज्याचा शोध घेतात ते वास्तविक सत्य नसते किंवा ते जीवनाचे खरे मूलतत्त्व नसते; तर ती देवाची इच्छा असणे तर दूरच. उलट, ते उत्साह शोधतात. ज्या गोष्टी त्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ बनवू शकतात, त्यावर ते निःसंशयपणे विश्वास ठेवतात आणि त्याचा पाठपुरावा करतात. ते सत्य शोधण्यासाठी नाही, तर केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवावर विश्वास ठेवतात. असे लोक दुष्ट नाहीत का? ते अत्यंत आत्मविश्‍वासू असतात व स्वर्गातील देव त्यांच्यासारख्या “चांगल्या लोकांचा” नाश करेल, यावर त्यांचा अजिबात विश्वास नसतो. उलट, त्यांचा असा विश्वास असतो, की देव त्यांना राहू देईल, एवढेच नव्हे तर, देवासाठी अनेक गोष्टी केल्याबद्दल आणि त्याच्याप्रति लक्षणीय “निष्ठा” प्रदर्शित केल्याबद्दल त्यांना चांगले बक्षीस देईल. जर ते दृश्यमान देवाचादेखील पाठपुरावा करत असतील, तर त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत हे कळताच, ते ताबडतोब देवावर प्रहार करतात किंवा संतापाने उडत राहतात. ते स्वतःला तिरस्करणीय लोक असल्याचे दाखवतात, जे सदैव केवळ त्यांच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात; ते सत्याचा पाठपुरावा करणारे सचोटीचे लोक नसतात. असे लोक तथाकथित दुष्ट आहेत, जे ख्रिस्ताचे अनुसरण करतात. जे लोक सत्याचा पाठपुरावा करत नाहीत ते सत्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत व मानवजातीचे भविष्यातील परिणाम जाणण्यास ते अधिकच असमर्थ असतात, कारण ते दृश्यमान देवाच्या कोणत्याही कार्यावर किंवा वचनांवर विश्वास ठेवत नाहीत—आणि मानवजातीच्या भविष्यातील गंतव्यस्थानावर विश्वास ठेवण्यास समर्थ नसणे हेही यात समाविष्ट आहे. म्हणून, जरी ते दृश्यमान देवाचे अनुसरण करत असले, तरीही ते दुष्कृत्य करतात व सत्याचा बिलकुल शोध घेत नाहीत किंवा मला आवश्यक असलेले सत्य ते आचरणात आणत नाहीत. उलट, स्वतःचा नाश होईल यावर विश्वास नसणारे लोकच नष्ट होतील. ते सर्व स्वतःला इतके हुशार मानतात आणि त्यांना वाटते, की तेच स्वतः सत्याचे आचरण करणारे लोक आहेत. ते त्यांचे दुष्ट आचरण हेच सत्य मानतात व म्हणून तेच हृदयात जतन करतात. असे दुष्ट लोक आत्मविश्‍वासाने भरलेले असतात; ते सत्याला सिद्धांत मानतात आणि त्यांच्या वाईट कृत्यांना सत्य मानतात, परंतु अखेर, त्यांनी जे पेरले तेच उगवते. लोक जेवढे अधिक आत्मविश्‍वासाने भरलेले तितके ते अधिक गर्विष्ठ असतात, तितकेच ते सत्याची प्राप्ती करण्यास असमर्थ असतात; लोक जितके स्वर्गातील देवावर विश्वास ठेवतात, तितकाच ते देवाला विरोध करतात. या लोकांनाच शिक्षा होईल. मानवजातीने विश्रांतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला शिक्षा मिळेल की बक्षीस, हे त्यांनी सत्य शोधले आहे की नाही, त्यांनी देवाला ओळखले आहे की नाही व ते दृश्यमान देवाच्या अधीन होऊ शकतात की नाही, यानुसार निर्धारित केले जाईल. ज्यांनी दृश्‍यमान देवाची सेवा केली आहे, तरीही त्याला ओळखत नाही किंवा त्याच्या अधीन होत नाही, त्यांच्यात सत्याचा अभाव असतो. असे लोक दुष्कर्म करणारे असतात आणि दुष्कर्म करणारे निःसंशयपणे शिक्षा भोगतील; एवढेच नव्हे, तर त्यांना त्यांच्या दुष्ट वर्तनानुसार शिक्षा दिली जाईल. देव हा मनुष्यांसाठी आहे, ज्यावर विश्वास ठेवला पाहिजे व तो त्यांच्या आज्ञापालनास पात्र आहे. ज्यांचा केवळ अस्पष्ट आणि अदृश्य देवावर विश्वास आहे, ते असे लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवत नाहीत व देवाच्या अधीन होण्यास असमर्थ आहेत. जर हे लोक अजूनही दृश्यमान देवावर त्यांचे विजयाचे कार्य पूर्ण होईपर्यंत विश्वास ठेवू शकत नाहीत आणि अवज्ञाकारी राहून देहधारी देवाचा प्रतिकार करत राहतात, तर हे “अस्पष्टतावादी” विनाशाच्या वस्तू बनतील, यात शंका नाही. हे असेच आहे, की तुमच्यापैकी काही जण—जे तोंडदेखले देवधारी देवाला ओळखतात, परंतु देहधारी देवाच्या अधीन राहण्याचे सत्य आचरणात आणू शकत नाहीत, त्यांना अखेर बाहेर काढून टाकले जाईल व त्यांना नष्ट केले जाईल. शिवाय, जो कोणी दृश्यमान देवाला तोंडदेखले ओळखतो, त्याने व्यक्त केलेल्या सत्याचे प्राशन आणि सेवन करतो व त्याच वेळी अस्पष्ट आणि अदृश्य देवाचा पाठपुरावा करतो, तो नक्कीच विनाशाचा विषय होईल. या लोकांपैकी कोणीही देवाचे कार्य संपल्यानंतर येणाऱ्या विश्रांतीच्या वेळेपर्यंत राहू शकणार नाही किंवा अशा लोकांसारखी एकही व्यक्ती त्या विश्रांतीच्या काळात राहू शकत नाही. आसुरी लोक जे सत्याचे पालन करत नाहीत; देवाचा प्रतिकार व अवज्ञा हे त्यांचे मूलतत्त्व असते आणि त्याच्या अधीन होण्याचा त्यांचा किंचितही हेतू नसतो. अशा लोकांचा सर्वनाश होईल. तुझ्याकडे सत्य आहे की नाही व तू देवाला विरोध करतोस की नाही हे तुझ्या मूलतत्त्वावर अवलंबून असते, तुझ्या दिसण्यावर किंवा तुम्ही अधूनमधून कसे बोलता किंवा कसे वागता यावर अवलंबून नसते. एखाद्या व्यक्तीचा नाश होईल की नाही हे त्याच्या मूलतत्त्वानुसार ठरवले जाते; एखाद्याच्या वर्तनातून आणि सत्याच्या पाठपुराव्यातून प्रकट झालेल्या मूलतत्त्वानुसार ते ठरवले जाते. जे लोक कार्य करताना एकमेकांसारखे असतात व जे समान प्रमाणात कार्य करतात, ज्यांची मानवी मूलतत्त्वे चांगली आहेत चांगले आहे आणि ज्यांच्याकडे सत्य आहे, ते असे लोक आहेत ज्यांना राहू दिले जाईल, तर ज्यांची मानवी मूलतत्त्वे वाईट आहेत व जे दृश्यमान देवाची अवज्ञा करतात, ते विनाशाचा विषय होतील. मानवजातीच्या गंतव्यस्थानाशी संबंधित देवाचे सर्व कार्य किंवा वचने ही प्रत्येक व्यक्तीच्या मूलतत्त्वानुसार योग्यरीत्या लोकांशी व्यवहार करतील; यात किंचितही चूक होणार नाही आणि एकही चूक होणार नाही. जेव्हा लोक कार्य करतात, तेव्हाच मानवी भावना किंवा अर्थ मिसळतात. देव जे कार्य करतो ते सर्वात योग्य आहे; तो कोणत्याही निर्मितीविरुद्ध खोटे दावे आणत नाही. सध्या असे बरेच लोक आहेत ज्यांना मानवजातीचे भविष्यातील गंतव्यस्थान समजू शकत नाही व जे मी उच्चारलेल्या वचनांवर विश्वास ठेवत नाहीत. जे लोक विश्वास ठेवत नाहीत, तसेच जे सत्याने आचरण करत नाहीत, ती सर्व भुते आहेत!

आजकाल, जे शोध घेतात आणि जे शोध घेत नाहीत ते दोन पूर्णपणे भिन्न प्रकारचे लोक असतात, ज्यांची गंतव्यस्थानेदेखील खूप भिन्न असतात. जे सत्याच्या ज्ञानाचा पाठपुरावा करतात व सत्याने आचरण करतात, त्यांनाच देव तारण देईल. ज्यांना खरा मार्ग माहीत नसतो ते राक्षस आणि शत्रू असतात; ते मुख्य देवदूताचे वंशज असतात व ते विनाशाच्या वस्तू ठरतात. जे अस्पष्ट देवावर धार्मिकतेने विश्वास ठेवणारे असतात—तेदेखील भुते नाहीत का? ज्यांच्याकडे सदसद्विवेकबुद्धी असते पण ते खरा मार्ग स्वीकारत नाहीत, ते भुते आहेत; देवाला प्रतिकार करणे हेच त्यांचे मूलतत्त्व असते. जे खरा मार्ग स्वीकारत नाहीत तेच देवाला विरोध करतात आणि अशा लोकांनी कितीही त्रास सहन केला तरीही त्यांचा नाश होतो. जे लोक जगाचा त्याग करण्यास तयार नसतात, जे आपल्या पालकांपासून वेगळे होणे सहन करू शकत नाहीत व जे स्वतःच्या देहभोगांपासून स्वतःची सुटका करू शकत नाहीत, ते सर्व देवाचे अवज्ञाकारी असतात आणि ते सर्व विनाशाच्या वस्तू होतील. जो कोणी देहधारी देवावर विश्वास ठेवत नाही तो राक्षसी असतो एवढेच नव्हे तर तो नष्ट होईल. जे श्रद्धा बाळगतात पण सत्य आचरणात आणत नाही, जे देहधारी देवावर विश्वास ठेवत नाहीत व जे देवाच्या अस्तित्वावर बिलकुल विश्वास ठेवत नाहीत, तेदेखील विनाशाच्या वस्तू होतील. ज्यांना राहू दिले जाईल ते सर्व लोक असे आहेत ज्यांनी परिष्करणाचा त्रास सहन केला आहे आणि तरीही खंबीरपणे उभे राहिले आहेत; या लोकांनी खरोखरच परीक्षांचा सामना केला आहे. जो देवाला ओळखत नाही तो शत्रू आहे; म्हणजेच, जो देहधारी देवाला ओळखत नाही—मग तो या प्रवाहाच्या आत असो वा नसो—तो ख्रिस्तविरोधी आहे! सैतान कोण आहे, भुते कोण आहेत व देवावर विश्वास न ठेवणारे जरी देवाचा प्रतिकार करत नसले, तरी देवाचे शत्रू असलेले कोण आहेत? हे देवाची अवज्ञा करणारे लोक नाहीत काय? जे लोक श्रद्धा ठेवण्याचा दावा करतात, तरीही ज्यांच्याकडे सत्याचा अभाव आहे, असेच हे लोक नाहीत काय? ते असे लोक नाहीत का, जे देवासाठी साक्ष देण्यास असमर्थ असताना केवळ आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात? तू आजही त्या भुतांमध्ये मिसळतोस आणि त्यांच्याबद्दल विवेक व प्रेम बाळगतोस, परंतु या प्रकरणात तू सैतानाप्रति चांगले हेतू देत नाहीस का? तू भुतांच्याच समूहात नाहीस का? जर आजही लोक चांगल्या आणि वाईटात फरक करू शकत नसतील व देवाच्या इच्छेचा पाठपुरावा करण्याच्या किंवा कोणत्याही प्रकारे देवाच्या हेतूंना स्वतःचे म्हणून आश्रय देण्याच्या कोणत्याही हेतूशिवाय अंधपणाने प्रेमळ आणि दयाळू बनत राहतात, त्यांचा अंत तर अधिक वाईट होईल. जो देहधारी देवावर विश्वास ठेवत नाही तो देवाचा शत्रू आहे. जर तू शत्रूबद्दल विवेक व प्रेम सहन करू शकत असशील, तर तुझ्यामध्ये नीतिमानतेची कमतरता नाही का? मी ज्यांचा तिरस्कार करतो आणि मी ज्यांच्याशी असहमत आहे, त्यांच्याशी तू अनुरूप असशील व त्यांच्याबद्दल प्रेम किंवा वैयक्तिक भावना बाळगत असशील, तर तू अवज्ञाकारी नाही का? तू देवाला जाणूनबुजून विरोध करत नाहीस का? अशा व्यक्तीकडे सत्य असते का? जर लोक शत्रूंबद्दल विवेक बाळगतात, राक्षसांवर प्रेम करतात आणि सैतानावर दया करतात, तर ते जाणूनबुजून देवाच्या कार्यात व्यत्यय आणत नाहीत का? जे लोक केवळ येशूवर विश्वास ठेवतात व शेवटच्या दिवसांतील देहधारी देवावर विश्वास ठेवत नाहीत, तसेच जे लोक देहधारी देवावर विश्वास असल्याचा तोंडदेखला दावा करतात परंतु दुष्टकर्म करतात, ते सर्व ख्रिस्तविरोधी आहेत, ज्यांचा देवावर विश्वासदेखील नाही त्यांचा तर उल्लेख करणेही दूर. हे सर्व लोक विनाशाच्या वस्तू होतील. मनुष्य ज्या मानकांद्वारे इतर मनुष्याचा न्याय करतो ती त्यांच्या वर्तनावर आधारित आहेत; ज्यांचे आचरण चांगले आहे ते नीतिमान आहेत, तर ज्यांचे आचरण घृणास्पद आहे ते दुष्ट आहेत. देव ज्या मानकांद्वारे मनुष्यांचा न्याय करतो त्यांचे मूलतत्त्व त्याच्या अधीन आहे की नाही यावर आधारित आहे; जो देवाच्या अधीन असतो तो नीतिमान असतो, तर जो देवाच्या अधीन नसतो, तो शत्रू आणि दुष्ट असतो, या व्यक्तीचे वर्तन चांगले असो किंवा वाईट व त्यांचे बोलणे योग्य की अयोग्य याची पर्वा न करता हे ठरते. काही लोक भविष्यात चांगले गंतव्यस्थान प्राप्त करण्यासाठी चांगल्या कृत्यांचा वापर करू इच्छितात आणि काही लोकांना चांगले गंतव्यस्थान प्राप्त करण्यासाठी चांगली वचने वापरण्याची इच्छा असते. प्रत्येकजण चुकीने असे मानतो, की देव लोकांचे वर्तन पाहिल्यानंतर किंवा त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांचा निकाल ठरवतो; त्यामुळे अनेक लोक याचा गैरफायदा घेऊन देवाची फसवणूक करून क्षणिक कृपा प्राप्त करू इच्छितात. भविष्यात, जे लोक विश्रांतीच्या स्थितीत टिकून राहतील, ते सर्व संकटाच्या दिवसातून पार पडलेले असतील व त्यांनी देवासाठी साक्षही दिलेली असेल; ते सर्व असे लोक असतील ज्यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडली आहेत आणि ज्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला देवाच्या अधीन केले आहे. ज्यांना केवळ सत्याचे आचरण टाळण्याच्या हेतूने सेवा करण्याच्या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांना राहू दिले जाणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या निकालाच्या व्यवस्थेसाठी देवाकडे योग्य मानके आहेत; तो हे निर्णय केवळ एखाद्याच्या बोलण्यानुसार व आचरणानुसार घेत नाही किंवा तो एका कालावधीत कसे वागतो यावरूनही हे निर्णय घेत नाही. एखाद्याने पूर्वी त्याच्यासाठी केलेली सेवा पाहून तो त्याच्या दुष्ट वर्तनाबद्दल त्याला माफी देणार नाही किंवा देवासाठी कधी तरी एक वेळ खर्च केली म्हणून तो त्याचे मृत्यूपासून रक्षण करणार नाही. कोणीही त्यांच्या दुष्टतेबद्दलचा परिणाम टाळू शकत नाही आणि कोणीही त्यांचे वाईट वर्तन लपवून त्याद्वारे विनाशाच्या यातना टाळू शकत नाही. जर लोक खरोखरच त्यांचे स्वतःचे कर्तव्य पार पाडू शकले, तर याचा अर्थ असा आहे की त्यांना आशीर्वाद मिळोत किंवा दुर्दैवाने त्रास होवो, ते देवाबद्दल निरंतर विश्वासू आहेत व बक्षीसाच्या मागे लागलेले नाहीत. जर लोकांनी आशीर्वाद दिसले म्हणून देवावर विश्वास ठेवला, परंतु कोणतेही आशीर्वाद दिसत नाहीत, म्हणून त्यांचा विश्वास उडाला आणि जर शेवटी, ते अजूनही देवासाठी साक्ष देण्यास किंवा त्यांच्यावर असलेली कर्तव्ये पूर्ण करण्यास असमर्थ ठरले, तर त्यांनी यापूर्वी एकदा देवाची विश्‍वासूपणे सेवा केली असूनही ते विनाशाच्या वस्तू बनतील. थोडक्यात, दुष्ट लोक अनंतकाळ टिकू शकत नाहीत किंवा ते विश्रांतीमध्ये प्रवेश करू शकत नाहीत; केवळ नीतिमानच विश्रांतीचे स्वामी आहेत. एकदा का मानवजात योग्य मार्गावर आली, की लोकांना सामान्य मानवी जीवन मिळेल. ते सर्व जण आपापली कर्तव्ये पार पाडतील व देवाबद्दल पूर्णपणे विश्वासू असतील. ते त्यांची अवज्ञा आणि त्यांची भ्रष्ट प्रवृत्ती पूर्णपणे झटकून टाकतील व ते देवासाठी आणि देवामुळे जगतील, त्यांची अवज्ञा व प्रतिकार या दोन्ही गोष्टी संपुष्टात येतील. ते सर्व जण पूर्णपणे देवाच्या अधीन होण्यास समर्थ असतील. हे देव आणि मानवजातीचे जीवन असेल; ते राज्याचे जीवन असेल व ते विश्रांतीचे जीवन असेल.

जे लोक त्यांच्या पूर्णपणे अविश्वासू मुलांना आणि नातेवाईकांना चर्चमध्ये ओढतात ते सर्व अत्यंत स्वार्थी आहेत व ते केवळ दयाळूपणाचे प्रदर्शन करत आहेत. हे लोक केवळ प्रेमळ असण्यावर लक्ष केंद्रित करतात, त्यांचा विश्वास आहे की नाही आणि देवाची इच्छा आहे की नाही याची पर्वा न करता ते हे करतात. काही जण त्यांच्या पत्नींना देवासमोर आणतात किंवा त्यांच्या पालकांना देवासमोर ओढतात व पवित्र आत्मा याला सहमत असो किंवा नसो, तो त्यांच्यामध्ये कार्य करत असो किंवा नसो, ते अंधपणाने देवासाठी “प्रतिभावान लोकांना दत्तक घेणे” सुरू ठेवतात. या अविश्वासू लोकांप्रती दयाळूपणा दाखवून कोणता फायदा मिळू शकेल? जरी पवित्र आत्म्याच्या उपस्थितीविना असलेले हे लोक देवाचे अनुसरण करण्यासाठी संघर्ष करत असले, तरीही एखाद्याच्या विश्वासाप्रमाणे त्यांना वाचवले जाऊ शकत नाही. ज्यांना तारण मिळू शकते त्यांना प्राप्त करणे प्रत्यक्षात इतके सोपे नाही. जे लोक पवित्र आत्म्याचे कार्य आणि परीक्षांना सामोरे गेलेले नाहीत व देहधारी देवाकडून परिपूर्ण झालेले नाहीत, ते पूर्ण होण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. म्हणून, ज्या क्षणापासून ते नाममात्र देवाचे अनुसरण करू लागतात, त्या लोकांमध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती नसते. त्यांची परिस्थिती आणि वास्तविक स्थितींच्या प्रकाशात, ते पूर्ण केले जाऊ शकत नाहीत. अशा प्रकारे, पवित्र आत्मा त्यांच्यावर जास्त ऊर्जा खर्च न करण्याचा निर्णय घेतो किंवा तो त्यांना कोणतेही ज्ञान किंवा मार्गदर्शन करत नाही; तो त्यांना केवळ अनुसरणाची अनुमती देतो व शेवटी त्यांचे परिणाम प्रकट करेल—हे पुरेसे आहे. मानवजातीचा उत्साह आणि हेतू सैतानाकडून येतात व या गोष्टी कोणत्याही प्रकारे पवित्र आत्म्याचे कार्य पूर्ण करू शकत नाहीत. लोक कसेही असले, तरी त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य असले पाहिजे. मनुष्यच मनुष्याला पूर्ण करू शकतो का? पती आपल्या पत्नीवर प्रेम का करतो? पत्नी आपल्या पतीवर प्रेम का करते? मुले त्यांच्या पालकांप्रती कर्तव्यनिष्ठ का असतात? पालक आपल्या मुलांवर दडपण का टाकतात? लोक प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचे हेतू ठेवतात? त्यांच्या स्वतःच्या योजना आणि स्वार्थी इच्छा पूर्ण करणे हाच त्यांचा हेतू नाही का? देवाच्या व्यवस्थापन योजनेसाठी कार्य करण्याचा त्यांचा खरोखर उद्देश असतो का? ते खरोखर देवाच्या कार्यासाठी वर्तन करतात का? निर्मिलेला जीव म्हणून असलेली त्यांची कर्तव्ये पूर्ण करण्याचा त्यांचा हेतू आहे का? ज्या क्षणापासून त्यांनी देवावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून ते पवित्र आत्म्याचे अस्तित्व प्राप्त करू शकले नाहीत, त्यांना पवित्र आत्म्याचे कार्य कधीही प्राप्त होऊ शकत नाही; हे लोक निश्चितपणे नष्ट होणार्‍या वस्तू आहेत. एखाद्याचे त्यांच्यावर कितीही प्रेम असले, तरी ते पवित्र आत्म्याच्या कार्याची जागा घेऊ शकत नाही. लोकांचा उत्साह व प्रेम हे मानवी हेतू दर्शवतात, परंतु ते देवाच्या हेतूंचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आणि ते देवाच्या कार्याचा पर्यायदेखील असू शकत नाहीत. जे लोक देवावर नाममात्र विश्वास ठेवतात व देवावर विश्वास ठेवण्याचा वास्तविक अर्थ काय हे जाणून न घेता त्याचे अनुसरण करण्याचे ढोंग करतात, अशा लोकांविषयी एखाद्याने शक्य तितके प्रेम किंवा दयाळूपणा दाखवला, तरीही त्यांना देवाची सहानुभूती लाभणार नाही किंवा त्यांना पवित्र आत्म्याचे कार्यही प्राप्त होणार नाही. जे लोक प्रामाणिकपणे देवाचे अनुसरण करतात ते कमी क्षमतेचे असले आणि बरेच सत्य समजून घेऊ शकत नसले, तरीही ते अधूनमधून पवित्र आत्म्याचे कार्य प्राप्त करू शकतात; मात्र, ज्यांची क्षमता लक्षणीयरीत्या चांगली आहे, परंतु ते प्रामाणिकपणे विश्वास ठेवत नाही, त्यांना पवित्र आत्म्याची उपस्थिती प्राप्त होऊच शकत नाही. अशा लोकांना तारण प्राप्त होण्याची बिलकुल शक्यता नाही. जरी त्यांनी देवाची वचने वाचली किंवा अधूनमधून प्रवचने ऐकली किंवा देवाची स्तुतीही केली, तरीही अखेर ते विश्रांतीच्या वेळेपर्यंत जगू शकणार नाहीत. लोक मनापासून शोधतात की नाही हे इतरांनी त्यांचा न्याय कसा केला किंवा आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे कसे पाहतात, यावर अवलंबून नसते, परंतु पवित्र आत्मा त्यांच्यावर कार्य करतो की नाही व त्यांना पवित्र आत्म्याची उपस्थिती प्राप्त झाली आहे की नाही यावर ते अवलंबून असते. शिवाय, त्यांच्या प्रवृत्ती बदलतात की नाही आणि विशिष्ट कालावधीत पवित्र आत्म्याच्या कार्यानंतर त्या पार पडल्यानंतर त्यांनी देवाचे कोणतेही ज्ञान प्राप्त केले आहे की नाही, यावर ते अवलंबून असते. जर पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीवर कार्य करत असेल तर, या व्यक्तीचा स्वभाव हळुहळू बदलेल व देवावर विश्वास ठेवण्याविषयी त्यांचा दृष्टिकोन हळुहळू शुद्ध होईल. लोक देवाचे किती काळ अनुसरण करतात हे लक्षात न घेता, जोपर्यंत त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला आहे, याचा अर्थ पवित्र आत्मा त्यांच्यावर कार्य करत आहे. जर ते बदलले नाहीत, तर याचा अर्थ पवित्र आत्मा त्यांच्यावर कार्य करत नाही. या लोकांनी जरी काही सेवा केली, तरी आशीर्वाद प्राप्त करण्याची इच्छा त्यांना असे करण्यास प्रवृत्त करते. केवळ अधूनमधून सेवा करणे हे प्रवृत्तीतील बदलाचा अनुभव घेण्याची जागा घेऊ शकत नाही. अखेर, त्यांचा नक्कीच नाश केला जाईल, कारण राज्यामध्ये सेवा करणार्‍यांची गरज भासणार नाही किंवा जे परिपूर्ण आहेत किंवा देवाविषयी विश्वासू आहेत अशा लोकांची सेवा करण्यासाठी ज्यांची प्रवृत्ती बदललेली नाही अशा लोकांची गरज भासणार नाही. भूतकाळात बोलली गेलेली वचने, “जेव्हा कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे भाग्य फळफळते”, हे कृपेच्या युगासाठी योग्य आहेत, परंतु मानवजातीच्या गंतव्यस्तानाशी ते संबंधित नाहीत. ते केवळ कृपेच्या युगातील एका टप्प्यासाठी योग्य होते. त्या शब्दांचा अर्थ लोकांना लाभलेली शांती आणि भौतिक आशीर्वादांवर निर्देशित केला होता; त्यांचा असा अर्थ नव्हता, की जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाचवले जाईल किंवा त्यांचा अर्थ असाही नव्हता, की जेव्हा एखाद्याला आशीर्वाद लाभतो तेव्हा एखाद्याच्या संपूर्ण कुटुंबाला देखील विश्रांती लाभू शकते. एखाद्याला आशीर्वाद लाभतो की दुःख भोगावे लागते हे एखाद्याच्या मूलतत्त्वानुसार ठरवले जाते, इतरांसोबत सामायिक केलेल्या कोणत्याही सामान्य मूलतत्त्वानुसार नाही. त्या प्रकारच्या म्हणण्याला किंवा नियमाला राज्यामध्ये स्थान नाही. जर एखादी व्यक्ती शेवटी टिकून राहण्यास समर्थ असेल, तर त्याचे कारण असे, की त्यांनी देवाच्या गरजा पूर्ण केल्या आहेत व जर ते शेवटी विश्रांतीच्या वेळेपर्यंत राहू शकत नसतील, तर त्याचे कारण असे की त्यांनी देवाची आज्ञा मोडली आहे आणि देवाच्या गरजांची पूर्तता केलेली नाही. प्रत्येकाला एक योग्य गंतव्यस्थान असते. ही गंतव्यस्थाने प्रत्येक व्यक्तीच्या मूलतत्त्वानुसार निर्धारित केली जातात व इतर लोकांशी त्यांचा काहीही संबंध नसतो. मुलाचे दुष्ट वर्तन त्यांच्या पालकांना हस्तांतरित केले जाऊ शकत नाही किंवा मुलाचे नीतिमत्त्व त्यांच्या पालकांसह सामायिक केले जाऊ शकत नाही. पालकांचे दुष्ट वर्तन त्यांच्या मुलांमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाही किंवा पालकांचे नीतिमत्त्व त्यांच्या मुलांबरोबर सामायिक केले जाऊ शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या पापांचा भार सहन करतो आणि प्रत्येकजण आपापल्या आशीर्वादांचा आनंद घेतो. कोणीही दुसऱ्या व्यक्तीचा पर्याय असू शकत नाही; हेच नीतिमत्त्व आहे. मनुष्याच्या दृष्टिकोनातून, जर पालकांना आशीर्वाद लाभत असतील, तर त्यांची मुलेदेखील त्यासाठी समर्थ असावीत व जर मुलांनी दुष्कर्म केले तर त्यांच्या पालकांनी त्या पापांचे प्रायश्चित केले पाहिजे. हा मानवी दृष्टिकोन आहे आणि गोष्टी करण्याची मानवी पद्धत आहे; तो देवाचा दृष्टिकोन नाही. प्रत्येकाचा परिणाम त्यांच्या आचरणातून येणार्‍या मूलतत्त्वानुसार ठरवला जातो व तो नेहमीच योग्यरीत्या निर्धारित केला जातो. कोणीही दुसऱ्याच्या पापांचा भार सहन करू शकत नाही; एवढेच नव्हे तर कोणालाही दुसर्‍याच्या ऐवजी शिक्षा दिली जाऊ शकत नाही. हे बिनशर्त आहे. पालकांनी त्यांच्या मुलांची काळजी घेणे हे सूचित करत नाही, की ते त्यांच्या मुलांच्या वतीने धार्मिक कृत्ये करू शकतात किंवा मुलाच्या त्याच्या पालकांप्रति असलेल्या कर्तव्यनिष्ठ प्रेमाचा अर्थ असा नाही, की ते त्यांच्या पालकांच्या वतीने धार्मिक कृत्ये करू शकतात. या शब्दांचा खरा अर्थ हाच आहे, “मग दोघे मैदानात राहतील. दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.” लोक त्यांच्या दुष्कर्मे करणार्‍या मुलांना त्यांच्या सखोल प्रेमाच्या आधारावर विश्रांतीमध्ये घेऊ शकत नाहीत किंवा कोणीही त्यांच्या पत्नीला (किंवा पतीला) त्यांच्या स्वतःच्या नीतिमान आचरणाच्या आधारावर विश्रांतीमध्ये घेऊ शकत नाही. हा प्रशासकीय नियम आहे; याबाबत कोणीही अपवाद असू शकत नाही. सरतेशेवटी, नीतिमत्त्वाने कृत्य करणारे नीतिमत्त्वाने कृत्य करतात आणि दुष्कर्म करणारे दुष्कर्म करतात. नीतिमानांना शेवटी जगण्याची परवानगी दिली जाईल, तर दुष्टांचा नाश केला जाईल. पवित्र हे पवित्र असतात; ते मलिन नसतात. मलिन हे मलिन असतात व त्यांचा एकही भाग पवित्र नसतो. ज्या लोकांचा नाश केला जाईल, ते सर्व दुष्ट लोक आहेत आणि जे वाचतील ते सर्व नीतिमान आहेत—जरी दुष्टांच्या मुलांनी चांगली कृत्ये केली व जरी नीतिमानांच्या पालकांनी वाईट कृत्ये केली तरीही हे असेच असते. विश्वास ठेवणारा पती आणि अविश्वासू पत्नी यांच्यात कोणताही संबंध नसतो व विश्वास ठेवणारी मुले आणि अविश्वासू पालक यांच्यात कोणताही संबंध नसतो; हे दोन प्रकारचे लोक पूर्णपणे विसंगत असतात. विश्रांतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एखाद्याचे शारीरिक नातेवाईक असतात, परंतु एकदा विश्रांतीमध्ये प्रवेश घेतल्यावर ज्यांच्याबद्दल बोलावे असे कोणीही शारीरिक नातेवाईक राहणार नाहीत. जे त्यांचे कर्तव्य करतात ते कर्तव्य न करणार्‍यांचे शत्रू असतात; जे देवावर प्रेम करतात व जे त्याचा द्वेष करतात ते एकमेकांच्या विरोधात असतात. जे विश्रांतीमध्ये प्रवेश करतील आणि ज्यांचा नाश झाला असेल ते दोन विसंगत प्रकारचे प्राणी आहेत. जे प्राणी त्यांची कर्तव्ये पार पाडतात ते जगू शकतील, तर जे त्यांची कर्तव्ये पार पाडत नाहीत ते विनाशाच्या वस्तू होतील; एवढेच नव्हे, हे अनंतकाळ टिकेल. निर्मिलेला जीव म्हणून तुझे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तू तुझ्या पतीवर प्रेम करतेस का? निर्मिलेला जीव म्हणून कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तू तुझ्या पत्नीवर प्रेम करतोस का? निर्मिलेला जीव म्हणून कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तू तुझ्या अविश्वासू पालकांप्रति कर्तव्यनिष्ठ आहेस का? देवावर विश्वास ठेवण्याबद्दलचा मानवी दृष्टिकोन योग्य की अयोग्य? तू देवावर विश्वास का ठेवतोस? तुला काय प्राप्त करायचे आहे? तू देवावर प्रेम कसे करतोस? जे निर्मिलेले जीव म्हणून त्यांची कर्तव्ये पार पाडू शकत नाहीत व जे सर्वतोपरी प्रयत्न करू शकत नाहीत, ते विनाशाच्या वस्तू बनतील. आजच्या लोकांमध्ये शारीरिक संबंध आहेत, तसेच रक्ताची नातीही आहेत, पण भविष्यात हे सर्व तुटून पडतील. विश्वासणारे आणि अविश्वासणारे हे परस्परांशी अनुरूप नाहीत; उलट ते एकमेकांचे विरोधक आहेत. जे विश्रांतीमध्ये आहेत ते देव आहे यावर विश्वास ठेवतील व देवाच्या अधीन होतील, तर जे देवाची अवज्ञा करतात त्यांचा सर्वनाश होईल. यापुढे पृथ्वीवर कुटुंबे अस्तित्वात राहणार नाहीत; पालक किंवा मुले किंवा पती-पत्नी संबंध कसे असू शकतील? विश्वास आणि अविश्वासाच्या अत्यंत विसंगतीने असे शारीरिक संबंध पूर्णपणे तोडलेले असतील!

मानवजातीमध्ये मूलतः कोणतीही कुटुंबे नव्हती; केवळ एक पुरुष व एक स्त्री—हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्य अस्तित्वात होते. कोणतेही देश नव्हते, कुटुंबांबद्दल काहीही म्हणण्यासारखे नव्हते, परंतु मानवजातीच्या भ्रष्टाचारामुळे सर्व प्रकारच्या लोकांनी स्वतःला वैयक्तिक कुळांमध्ये संघटित केले, नंतर देश आणि वंश विकसित झाले. या देश व वंशांमध्ये लहान वैयक्तिक कुटुंबांचा समावेश होता आणि अशा प्रकारे भाषा व सीमांच्या फरकांनुसार सर्व प्रकारचे लोक विविध वंशांमध्ये वितरीत केले गेले. वास्तविकतः, जगात कितीही वंश असले, तरी मानवजातीचा पूर्वज एकच आहे. सुरुवातीला, केवळ दोन प्रकारचे मनुष्य होते, हे दोन प्रकार म्हणजे पुरुष आणि स्त्री. मात्र, देवाच्या कार्याच्या प्रगतीमुळे, इतिहासातील घडामोडींमुळे व भौगोलिक बदलांमुळे, हे दोन प्रकारचे मनुष्य वेगवेगळ्या प्रमाणात आणखी अधिक प्रकारच्या मनुष्यांमध्ये विकसित झाले. मुळात, मानवजातीमध्ये कितीही वंश असले तरीही, संपूर्ण मानवजात ही अजूनही देवाची निर्मिती आहे. लोक कोणत्याही वंशाचे असले तरी ते सर्व त्याने निर्मिलेले आहेत; ते सर्व आदाम आणि हव्वा यांचे वंशज आहेत. जरी ते देवाच्या हातांनी बनवलेले नसले, तरी ते आदाम व हव्वा यांचे वंशज आहेत, ज्यांना देवाने वैयक्तिकरीत्या निर्मिलेले आहे. लोक कोणत्याही प्रकारचे असले तरी ते सर्व त्याने निर्मिलेले आहेत; ते देवाने निर्मिलेल्या मानवजातीचे असल्याने, त्यांचे गंतव्यस्थान तेच असले पाहिजे जे मानवजातीचे आहे आणि मनुष्यांना संघटित करणाऱ्या नियमांनुसार त्यांची विभागणी केली गेली आहे. म्हणजेच, सर्व दुष्कर्म करणारे व सर्व नीतिमान हे शेवटी निर्मिलेले जीव आहेत. दुष्कर्म करणारे जीव शेवटी नष्ट होतील आणि सत्कृत्य करणारे जीव जिवंत राहतील. या दोन प्रकारच्या जीवांसाठी ही सर्वात योग्य व्यवस्था आहे. दुष्ट लोक, त्यांच्या अवज्ञामुळे, हे नाकारू शकत नाहीत की ते देवाची निर्मिती असले तरी त्यांना सैतानाने ताब्यात घेतले आहे व म्हणून त्यांचे वाचवले जाऊ शकत नाही. जे निर्मिलेले जीव नीतिमान आचरण करतात, ते जिवंत राहतील या वस्तुस्थितीनुसारही, हे नाकारू शकत नाहीत की त्यांना देवाने निर्मिलेले आहे आणि सैतानाने भ्रष्ट केल्यानंतरही त्यांना तारण प्राप्त झालेले आहे. दुष्कर्म करणारे असे जीव आहेत जे देवाची अवज्ञा करतात; ते असे प्राणी आहेत ज्यांना वाचवले जाऊ शकत नाही व सैतानाने आधीच त्यांना पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. जे दुष्कृत्य करतात, तेही मनुष्यच असतात; ते असे मनुष्य आहेत जे अत्यंत भ्रष्ट झाले आहेत आणि ज्यांना वाचवले जाऊ शकत नाही. नीतिमान आचरण करणारे लोकही तसे निर्मिलेले जीव आहेत, तसेच तेही भ्रष्ट केले गेले आहेत, परंतु ते असे मनुष्य आहेत जे त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीपासून मुक्त होण्यास तयार आहेत व देवाच्या अधीन राहण्यास समर्थ बनले आहेत. नीतिमान आचरणाचे लोक नीतिमत्त्वाने काठोकाठ भरलेले नसतात; उलट, त्यांना तारण प्राप्त झालेले असते आणि ते त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीपासून मुक्त झालेले असतात; ते देवाला अधीन होऊ शकतात. अखेर ते दृढपणे उभे राहतील. तरी याचा अर्थ असा नाही, की त्यांना सैतानाने कधीही भ्रष्ट केलेले नाही. देवाने निर्मिलेल्या सर्व जीवांमध्ये त्याचे कार्य संपुष्टात आल्यानंतर, काही लोक नष्ट होतील व काही वाचतील. त्याच्या व्यवस्थापन कार्याचा हा एक अपरिहार्य कल आहे; कोणीही ते नाकारू शकत नाही. दुष्कर्म करणाऱ्यांना जगू दिले जाणार नाही; जे लोक अखेरपर्यंत देवाच्या अधीन राहतात आणि त्याचे अनुसरण करतात ते टिकून राहतील. हे कार्य मानवजातीच्या व्यवस्थापनाचे असल्याने, काही टिकून राहतील व काहींना बाहेर काढून टाकले जाईल. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी हे वेगवेगळे परिणाम आहेत आणि ते देवाने निर्मिलेल्यांसाठी ती सर्वात योग्य व्यवस्था आहेत. मानवजातीसाठी देवाची अंतिम व्यवस्था म्हणजे कुटुंबे तोडून, वांशिकतेला चिरडून व कुटूंबे किंवा राष्ट्रीय सीमा नसलेल्या व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय सीमा उद्ध्वस्त करणे ही आहे. कारण मनुष्य शेवटी, एकाच पूर्वजापासून आलेला आहे आणि तो देवाचीच निर्मिती आहे. थोडक्यात, दुष्कर्म करणारे सर्व जीव नष्ट होतील व जे निर्मिलेले जीव देवाची आज्ञा पाळतात ते जिवंत राहतील. अशा प्रकारे, येणार्‍या विश्रांतीच्या काळात कोणतीही कुटुंबे, कोणतेही देश आणि विशेषत: कोणतीही वांशिकता राहणार नाही; या प्रकारची मानवजात ही सर्वात पवित्र मानवजात असेल. आदाम व हव्वा यांना मुळात यासाठीच तयार करण्यात आले होते, जेणेकरून मानवजातीला पृथ्वीवरील सर्व गोष्टींची काळजी घेता येईल; मनुष्य हा मूळतः सर्व गोष्टींचा स्वामी होता. मनुष्यांना निर्माण करण्यामागे यहोवाचा हेतू त्यांना पृथ्वीवर अस्तित्वात राहू देण्याचा आणि त्यावरील सर्व गोष्टींची काळजी घेण्याचा होता, कारण मानवजात मुळात भ्रष्ट झालेली नव्हती व ती दुष्कर्म करण्यास असमर्थ होती. तथापि, मनुष्य भ्रष्ट झाल्यानंतर, ते यापुढे सर्व गोष्टींची काळजी घेणारे राहिले नाहीत. देवाच्या तारणाचा उद्देश मानवजातीचे हे कार्य पुन्हा स्थापित करणे, मानवजातीचे मूळ कारण आणि मूळ आज्ञाधारकता पुन्हा स्थापित करणे हे आहे; विश्रांतीमध्ये असलेली मानवजात ही देवाला त्याच्या तारणाच्या कार्याद्वारे प्राप्त होण्याची आशा असलेल्या परिणामाचे प्रतीक असेल. जरी ते यापुढे एदेन बागेमधील जीवनासारखे जीवन नसेल, परंतु त्यांचे मूलतत्त्व समानच असेल; मानवजात ही त्यांची पूर्वीची भ्रष्ट झालेली राहणार नाही, तर ती भ्रष्ट झाल्यानंतर तारण प्राप्त झालेली मानवजात असेल. ज्यांना तारण प्राप्त झाले आहे ते अखेर (म्हणजे, देवाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर) विश्रांतीमध्ये प्रवेश करतील. त्याचप्रमाणे, ज्यांना शिक्षा होणार आहे त्यांचे परिणामदेखील शेवटी पूर्णपणे प्रकट होतील व देवाचे कार्य संपल्यानंतरच त्यांचा नाश होईल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, त्याचे कार्य पूर्ण झाल्यानंतर, दुष्कर्म करणारे आणि ज्यांना वाचवले गेले आहे त्या सर्वांना उघडे पाडले जाईल, कारण सर्व प्रकारचे लोक (मग ते दुष्कर्म करणारे असोत किंवा ज्यांना वाचवले गेले आहे ते असोत) उघड करण्याचे कार्य प्रत्येकामध्ये केले जाईल. दुष्कर्म करणाऱ्यांना एकाच वेळी बाहेर काढून टाकले निर्मूलन केले जाईल व ज्यांना राहू दिले जाईल त्यांना उघड केले जाईल. त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांचे परिणाम एकाच वेळी समोर येतील. दुष्कर्म करणार्‍यांना बाजूला ठेवल्याखेरीज आणि त्यांना एका वेळी थोडासा न्याय किंवा शिक्षा दिल्याखेरीज ज्या लोकांच्या समूहाला तारण दिले आहे त्यांना देव विश्रांती घेऊ देणार नाही; ते वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. जेव्हा दुष्टांचा नाश होईल व जे वाचू शकतील ते विश्रांतीमध्ये प्रवेश करतील, तेव्हा संपूर्ण विश्वात देवाचे कार्य पूर्ण होईल. ज्यांना आशीर्वाद लाभतात आणि ज्यांना दु:ख भोगावे लागते त्यांच्यामध्ये प्राधान्याचा क्रम नसेल; ज्यांना आशीर्वाद लाभतात ते निरंतर जगतील, तर ज्यांना दुःख सहन करावे लागते ते कायमचे नष्ट होतील. कार्याचे हे दोन टप्पे एकाच वेळी पूर्ण केले जातील. अवज्ञाकारी लोकांच्या अस्तित्वामुळेच अधीन होणाऱ्यांचे नीतिमत्त्व प्रकट होईल व याचे मुख्य कारण म्हणजे दुष्टांना त्यांच्या दुष्ट वर्तनामुळे भोगावे लागलेले दुर्दैव प्रकट होईल असा आशीर्वाद प्राप्त झालेले लोक. जर देवाने दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला नाही, तर जे लोक प्रामाणिकपणे देवाच्या अधीन आहेत त्यांना सूर्य कधीच दिसणार नाही; जर देवाने त्याच्या अधीन असलेल्यांना योग्य गंतव्यस्थानावर नेले नाही, तर देवाची अवज्ञा करणाऱ्यांना त्यांचा योग्य बदला मिळू शकणार नाही. ही देवाच्या कार्याची प्रक्रिया आहे. जर त्याने वाईटाला शिक्षा करण्याचे आणि चांगल्याला बक्षीस देण्याचे हे कार्य केले नाही तर त्याने निर्मिलेल्यांना कधीही आपापल्या गंतव्यस्थानात प्रवेश करता येणार नाही. एकदा का मानवजातीने विश्रांतीमध्ये प्रवेश केला, की दुष्टांचा नाश होईल व संपूर्ण मानवजात योग्य मार्गावर येईल; सर्व प्रकारचे लोक त्यांनी जी कार्ये पार पाडावीत, त्यानुसार त्यांच्या स्वतःच्या प्रकारासोबत असतील. केवळ हाच मानवजातीचा विश्रांतीचा दिवस असेल, मानवजातीच्या विकासासाठी तो अपरिहार्य कल असेल आणि जेव्हा मानवजात विश्रांतीमध्ये प्रवेश करेल, तेव्हाच देवाची महान व अंतिम सिद्धी पूर्ण होईल; हा त्याच्या कामाचा अंतिम भाग असेल. हे कार्य मानवजातीचे सर्व दैहिक जीवन तसेच मानवजातीचे भ्रष्ट जीवन समाप्त करेल. मनुष्य यापुढे नवीन क्षेत्रात प्रवेश करेल. जरी सर्व मनुष्य देहात राहतील, तरी हे जीवन आणि भ्रष्ट मानवजातीचे जीवन याच्या मूलतत्त्वामध्ये महत्त्वपूर्ण फरक असेल. या अस्तित्वाचे महत्त्व व भ्रष्ट मानवजातीच्या अस्तित्वाचे महत्त्वही लक्षणीयरीत्या वेगळे आहे. जरी हे एखाद्या नवीन प्रकारच्या व्यक्तीचे जीवन नसले, तरी ते तारण मिळालेल्या मानवजातीचे जीवन तसेच मानवता आणि तर्क पुन्हा प्राप्त झालेले जीवन असे म्हटले जाऊ शकते. हे असे लोक आहेत जे एकेकाळी देवाची अवज्ञा करणारे होते, ज्यांना देवाने जिंकले आहे व ज्यांना नंतर त्याने वाचवले आहे; हे असे लोक आहेत ज्यांनी देवाचा अनादर केला आणि नंतर त्याची साक्ष दिली. ते त्याच्या परीक्षेला सामोरे गेल्यानंतर व टिकून राहिल्यानंतर, त्यांचे अस्तित्व सर्वात अर्थपूर्ण अस्तित्व असेल; ते असे लोक आहेत ज्यांनी सैतानासमोर देवाची साक्ष दिली आणि जगण्यासाठी योग्य असलेले मनुष्य आहेत. ज्यांचा नाश होईल ते असे लोक आहेत जे देवाची साक्ष देऊ शकत नाहीत व जगत राहण्यासाठी योग्य नाहीत. त्यांचा नाश हा त्यांच्या दुष्ट वर्तनाचा परिणाम असेल आणि अशा प्रकारचा नाश त्यांच्यासाठी सर्वोत्तम गंतव्यस्थान आहे. भविष्यात, जेव्हा मानवजात सुंदर क्षेत्रात प्रवेश करेल, तेव्हा पती-पत्नी, वडील व मुलगी किंवा आई आणि मुलगा यांच्यातील असे कोणतेही नाते राहणार नाही ज्याची लोक कल्पना करतात. त्या वेळी, प्रत्येक मनुष्य आपापल्या प्रकाराचे अनुसरण करेल व कुटुंबे आधीच उद्ध्वस्त झालेली असतील. पूर्णपणे अपयश झाल्यानंतर, सैतान मानवजातीला पुन्हा कधीही त्रास देणार नाही आणि मनुष्यांमध्ये यापुढे भ्रष्ट सैतानी प्रवृत्ती राहणार नाहीत. त्या अवज्ञाकारी लोकांचा आधीच नाश झालेला असेल व जे लोक अधीन असतील तेच उरतील. त्यामुळे फार कमी कुटुंबे अखंड टिकून राहतील; शारीरिक संबंध कसे चालू राहू शकतील? मानवजातीच्या याआधीच्या दैहिक जीवनावर पूर्णपणे बंदी घातली जाईल; मग लोकांमध्ये शारीरिक संबंध कसे असू शकतील? भ्रष्ट सैतानी प्रवृत्तीविना, मानवी जीवन यापुढे भूतकाळातील जुने जीवन राहणार नाही, तर ते एक नवीन जीवन असेल. पालक मुलांना गमावतील आणि मुले पालकांना गमावतील. पती पत्नीला गमावतील व पत्नी पतीला गमावतील. सध्या लोकांमध्ये शारीरिक संबंध अस्तित्त्वात आहेत, परंतु प्रत्येकाने विश्रांतीमध्ये प्रवेश केल्यावर ते यापुढे अस्तित्वात राहणार नाहीत. केवळ या प्रकारच्या मानवजातीमध्ये नीतिमत्त्व आणि पवित्रता असेल; केवळ अशा प्रकारची मानवजातच देवाची उपासना करू शकते.

देवाने मनुष्यांना निर्माण केले आणि त्यांना पृथ्वीवर ठेवले व तेव्हापासून त्याने त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्याने त्यांना वाचवले आणि मानवजातीसाठी पापार्पण म्हणून सेवा केली. अखेर, त्याने तरीही मानवजातीवर विजय प्राप्त केला पाहिजे, मनुष्यांना पूर्णपणे वाचवले पाहिजे व त्यांना त्यांच्या मूळ प्रतिमेत पुन्हा स्थापित केले पाहिजे. हे असे कार्य आहे ज्यामध्ये तो सुरुवातीपासून गुंतलेला आहे—ते म्हणजे मानवजातीला त्यांच्या मूळ प्रतिमेत पुन्हा स्थापित करणे. देव त्याचे राज्य स्थापित करेल आणि मनुष्याचे मूळ स्वरूप पुन्हा स्थापित करेल, याचा अर्थ असा की देव पृथ्वीवर व सर्व निर्मितीमध्ये त्याचा अधिकार पुन्हा स्थापित करेल. सैतानाने भ्रष्ट केल्यावर मानवजातीने त्यांचे देवभीरू अंतःकरण तसेच देवाची निर्मिती म्हणून करावयाचे कर्तव्य गमावले, त्यामुळे मनुष्य देवाची अवज्ञा करणारा शत्रू बनला. तेव्हा मानवजात सैतानाच्या अधिपत्याखाली राहिली आणि तिने सैतानाच्या आदेशांचे पालन केले; अशा प्रकारे, देवाला त्याने निर्मिलेल्यांमध्ये कार्य करण्याचा कोणताही मार्ग उरला नाही व त्यांचा भीतीयुक्त आदर प्राप्त करण्यात तो अधिकच असमर्थ ठरला. देवाने मनुष्यांना निर्माण केले होते आणि त्यांनी देवाची उपासना केली पाहिजे, परंतु त्यांनी प्रत्यक्षात त्याच्याकडे पाठ फिरवली व त्याऐवजी सैतानाची पूजा केली. सैतान त्यांच्या हृदयातील मूर्ती बनला. अशाप्रकारे, देवाने त्यांच्या अंतःकरणातील त्याचे स्थान गमावले, म्हणजे त्याने मानवजातीच्या निर्मितीमागील अर्थ गमावला. म्हणून, त्याच्या मानवजातीच्या निर्मितीमागील अर्थ पुन्हा स्थापित करण्यासाठी, त्याने त्यांचे मूळ स्वरूप पुन्हा स्थापित केले पाहिजे आणि मानवजातीला त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीपासून मुक्त केले पाहिजे. मनुष्यांना सैतानापासून परत प्राप्त करण्यासाठी, त्याने त्यांना पापांपासून वाचवले पाहिजे. केवळ अशा प्रकारे देव हळुहळू त्यांचे मूळ स्वरूप व कार्य पुन्हा स्थापित करू शकतो आणि अखेर, त्याचे राज्य पुन्हा स्थापित करू शकतो. मनुष्यांना देवाची उपासना अधिक चांगल्या प्रकारे करता यावी व पृथ्वीवर अधिक चांगले जीवन जगता यावे, यासाठी अवज्ञा करणाऱ्या त्या पुत्रांचा अंतिम नाशदेखील केला जाईल. देवाने मनुष्यांना निर्माण केल्यामुळे तो त्यांना त्याची उपासना करायला भाग पाडेल; कारण त्याला मानवजातीचे मूळ कार्य पुन्हा स्थापित करायचे आहे, तो ते पूर्णपणे आणि कोणत्याही भेसळीविना पुन्हा स्थापित करेल. त्याचा अधिकार पुन्हा स्थापित करणे म्हणजे मनुष्यांनी त्याची उपासना करणे व त्याच्या अधीन होणे; याचा अर्थ असा, की देव मनुष्यांनी त्याच्यामुळे जगवेल आणि त्याच्या अधिकारामुळे त्याच्या शत्रूंचा नाश करेल. याचा अर्थ असा, की देव त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट कोणाच्याही प्रतिकाराखेरीज मनुष्यांमध्ये टिकवून ठेवेल. देव ज्या राज्याची स्थापना करू इच्छितो ते त्याचे स्वतःचे राज्य आहे. ज्या मानवजातीची त्याला इच्छा आहे ती त्याची उपासना करेल, त्याला पूर्णपणे अधीन असेल व त्याचे वैभव प्रकट करेल. जर देवाने भ्रष्ट मानवजातीला वाचवले नाही, तर त्याच्या मानवजातीच्या निर्मितीमागील अर्थच नष्ट होईल; त्याला मनुष्यांमध्ये यापुढे अधिकार राहणार नाही आणि त्याचे राज्य यापुढे पृथ्वीवर अस्तित्वात राहू शकणार नाही. जर देवाने त्याच्या आज्ञा न मानणाऱ्या शत्रूंचा नाश केला नाही तर तो त्याचे संपूर्ण वैभव प्राप्त करू शकणार नाही किंवा पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापन करू शकणार नाही. ही त्याचे कार्य व त्याची महान कामगिरी पूर्णत्वाला गेल्याची चिन्हे असतील: मानवजातीमधील अवज्ञाकारी लोकांचा पूर्णपणे नाश करणे आणि ज्यांना पूर्ण केले गेले आहे त्यांना विश्रांतीमध्ये आणणे. जेव्हा मनुष्यांना त्यांच्या मूळ प्रतिमेत पुन्हा स्थापित केले जाईल व जेव्हा ते त्यांची संबंधित कर्तव्ये पूर्ण करू शकतील, त्यांच्या स्वत:च्या योग्य ठिकाणी राहू शकतील आणि देवाच्या सर्व व्यवस्थेच्या अधीन राहू शकतील, तेव्हा देवाला पृथ्वीवर त्याची उपासना करणाऱ्या लोकांचा एक समूह प्राप्त होईल व तो पृथ्वीवर त्याची उपासना करणारे एक राज्यदेखील स्थापित करेल. पृथ्वीवर त्याचा शाश्वत विजय होईल आणि जे त्याला विरोध करतात ते सर्व अनंतकाळासाठी नष्ट होतील. मानवजात निर्माण करण्याचा त्याचा मूळ हेतू यामुळे पुन्हा स्थापित होईल; सर्व गोष्टी निर्माण करण्याचा त्याचा हेतू पुन्हा स्थापित होईल व पृथ्वीवर, सर्व गोष्टींमध्ये आणि त्याच्या शत्रूंमध्ये त्याचा अधिकार पुन्हा स्थापित होईल. ही त्याच्या एकूण विजयाची प्रतीके असतील. यापुढे, मानवजात विश्रांतीमध्ये प्रवेश करेल व योग्य मार्गावर असलेले जीवन सुरू करेल. देव मानवजातीसह चिरंतन विश्रांतीमध्येदेखील प्रवेश करेल आणि स्वतः व मनुष्य दोघांसाठीही सामायिक केलेले अनंतकाळचे जीवन सुरू करेल. पृथ्वीवरील मलिनता आणि अवज्ञा नाहीशी होईल व सर्व आक्रोश नाहीसे होतील आणि या जगात जे काही देवाला विरोध करते ते नाहीसे होईल. केवळ देव व त्याने ज्यांना तारण दिले आहे ते लोकच राहतील; केवळ त्याची निर्मिती राहील.

मागील:  मनुष्याचे सामान्य जीवन पुनर्संचयित करणे आणि त्याला एका अद्भुत गंतव्यस्थानावर नेणे

पुढील:  तू येशूचे आध्यात्मिक शरीर पाहाशील तेव्हा, देवाने स्वर्ग आणि पृथ्वी नव्याने निर्माण केलेली असेल

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger