अंधाराच्या प्रभावातून मुक्त व्हा आणि देव तुम्हाला प्राप्त करेल

अंधाराचा प्रभाव म्हणजे काय? हा तथाकथित “अंधाराचा प्रभाव” सैतानाच्या फसवणुकीचा, भ्रष्टाचाराचा, लोकांना बांधून ठेवण्याचा आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रभाव आहे; सैतानाचा प्रभाव हा असा प्रभाव आहे ज्यामध्ये मृत्यूची आभा आहे. जे सैतानाच्या अधिपत्याखाली राहतात त्या सर्वांचा नाश होतो. देवावर श्रद्धा बाळगल्यानंतर तू अंधाराच्या प्रभावातून कसे सुटू शकतोस? तू देवाला मनापासून प्रार्थना केल्यावर, तू तुझे हृदय त्याच्याकडे पूर्णपणे वळवतोस, त्याच वेळी तुझे हृदय देवाच्या आत्म्याने प्रेरित होते. तू स्वतःला पूर्णपणे त्याला समर्पित करण्यास तयार होतोस आणि या क्षणी, तू अंधाराच्या प्रभावातून सुटलेला असतोस. जर मनुष्य जे काही करतो ते देवाला संतुष्ट करत असेल व त्याच्या अपेक्षांनुसार असेल, तर तो देवाच्या वचनांमध्ये आणि त्याचे संगोपन व संरक्षणाखाली जगतो. जर लोक देवाच्या वचनांचे पालन करू शकत नसतील, जर ते नेहमी त्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असतील, त्याच्याशी निष्काळजीपणे वागत असतील आणि त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नसतील—तर हे सर्व लोक अंधाराच्या प्रभावाखाली जगत आहेत. ज्या मनुष्यांना देवाचे तारण मिळालेले नाही ते सैतानाच्या अधिपत्याखाली जगत आहेत; म्हणजेच ते सर्व अंधाराच्या प्रभावाखाली जगत आहेत. जे देवावर विश्वास ठेवत नाहीत, ते सैतानाच्या अधिपत्याखाली जगत आहेत. जे देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात, तेदेखील कदाचित त्याच्या प्रकाशात जगत नसतील, कारण जे त्याच्यावर विश्वास ठेवतात ते कदाचित त्याच्या वचनांमध्ये जगत नसतील किंवा देवाच्या अधीन होऊ शकत नसतील. मनुष्य देवावर विश्वास ठेवण्यापुरता मर्यादित आहे आणि त्याला देवाचे ज्ञान नसल्यामुळे, तो अजूनही जुन्या नियमांमध्ये, मृत वचनांमध्ये, अंधकारमय व अनिश्चित जीवन जगत आहे, त्याला देवाने पूर्णपणे शुद्ध केलेले नाही किंवा देवाने त्याला पूर्णपणे प्राप्त केलेले नाही. म्हणूनच, हे सांगण्याची गरज नाही, की जे देवावर विश्वास ठेवत नाहीत ते अंधाराच्या प्रभावाखाली जगत आहेत, जे देवावर विश्वास ठेवतात तेदेखील अजूनही अंधाराच्या प्रभावाखाली असू शकतात, कारण त्यांच्याकडे पवित्र आत्म्याचे कार्य नाही. ज्यांना देवाची कृपा अथवा दया मिळाली नाही आणि जे पवित्र आत्म्याचे कार्य पाहू शकत नाहीत ते सर्व अंधाराच्या प्रभावाखाली जगत आहेत; आणि बहुतेक वेळा, असे लोक केवळ देवाच्या कृपेचा आनंद घेतात, मात्र त्याला ओळखत नाहीत. जर एखाद्या मनुष्याने देवावर विश्वास ठेवला, मात्र त्याचे बरेचसे आयुष्य अंधाराच्या प्रभावाखाली व्यतीत केले, तर या अस्तित्व अर्थहीन आहे—आणि देव अस्तित्वात आहे यावर विश्वास नसलेल्या लोकांचा उल्लेख करण्याची काय गरज आहे?

जे लोक देवाचे कार्य स्वीकारू शकत नाहीत किंवा जे देवाचे कार्य स्वीकारतात परंतु त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत, ते सर्व अंधाराच्या प्रभावाखाली जगणारे लोक आहेत. जे सत्याचा पाठपुरावा करतात आणि देवाच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम आहेत, त्यांनाच त्याच्याकडून आशीर्वाद मिळतील व फक्त तेच अंधाराच्या प्रभावातून सुटतील. ज्यांची सुटका झाली नाही, जे नेहमी काही गोष्टींवर नियंत्रण ठेवतात आणि जे त्यांचे हृदय देवाला देऊ शकत नाहीत, ते सैतानाच्या बंधनात असलेले लोक आहेत, जे मृत्यूच्या आभामध्ये राहतात. जे लोक त्यांच्या स्वतःच्या कर्तव्याशी एकनिष्ठ नाहीत, जे देवाच्या आज्ञेशी एकनिष्ठ नाहीत आणि जे चर्चमध्ये त्यांची कार्ये पार पाडण्यात अयशस्वी होतात, ते अंधाराच्या प्रभावाखाली जगणारे लोक आहेत. जे जाणूनबुजून चर्चच्या जीवनात व्यत्यय आणतात, जे जाणूनबुजून त्यांच्या बंधूभगिनींमध्ये कलह पेरतात अथवा जे कपटी गट तयार करतात ते असे लोक आहेत जे सैतानाच्या बंधनात, अंधाराच्या प्रभावाखाली अजून खोलवर राहतात. ज्यांचा देवाशी असामान्य संबंध आहे, ज्यांच्या इच्छा नेहमी अवाजवी असतात, ज्यांना नेहमी फायदा करून घ्यायचा असतो व जे कधीही त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते लोक अंधाराच्या प्रभावाखाली राहतात. जे नेहमी आळशी असतात आणि गांभीर्याने सत्याचे आचरण कधीच करत नाहीत व जे देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्याऐवजी केवळ स्वतःच्या देहाची तृप्ती करू पाहतात, तेदेखील मृत्यूने झाकलेल्या अंधाराच्या प्रभावाखाली जगणारे लोक आहेत. जे देवासाठी काम करताना कुटिलपणा आणि फसवणूक करतात, जे देवाशी निष्काळजीपणे वागतात, जे देवाची फसवणूक करतात व जे नेहमी स्वतःचाच विचार करतात, ते लोक अंधाराच्या प्रभावाखाली राहतात. जे लोक देवावर मनापासून प्रेम करू शकत नाहीत, जे सत्याचा पाठपुरावा करत नाहीत आणि जे त्यांची प्रवृत्ती बदलण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, ते सर्व अंधाराच्या प्रभावाखाली जगणारे लोक आहेत.

जर देवाकडून प्रशंसा प्राप्त करायची असेल, तर प्रथम सैतानाच्या अंधकारमय प्रभावातून वाचले पाहिजे, तुझे हृदय देवासमोर उघडले पाहिजे आणि ते पूर्णपणे त्याच्याकडे वळवले पाहिजे. तू आता करत असलेल्या गोष्टींची देव स्तुती करेल का? तू तुझे हृदय देवाकडे वळवले आहेस का? देवाला तुझ्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी तू केल्या आहेस का? त्या सत्याशी सुसंगत आहेत का? नेहमी स्वतःचे परीक्षण करा व देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करण्यावर लक्ष केंद्रित करा; हृदय त्याच्यासमोर ठेवा, त्याच्यावर प्रामाणिकपणे प्रेम करा व एकनिष्ठपणे देवासाठी स्वतःहून कष्ट करा. जे लोक हे करतात त्यांना नक्कीच देवाची स्तुती मिळेल. जे लोक देवावर विश्वास ठेवतात, तरीही सत्याचा पाठपुरावा करत नाहीत, त्यांच्याकडे सैतानाच्या प्रभावातून सुटण्याचा कोणताही मार्ग नाही. जे लोक त्यांचे जीवन प्रामाणिकपणे जगत नाहीत, जे इतरांसमोर एक प्रकारे वागतात परंतु त्यांच्या पाठीमागे वेगळ्या पद्धतीने वागतात, ज्या लोकांचे मूलतत्त्व कपटी, धूर्त असते आणि देवाशी निष्ठा नसलेले असते, तरीही ते नम्रता, संयम व प्रेमाचा देखावा करतात—असे लोक अंधाराच्या प्रभावाखाली जगणाऱ्यांचे नमुनेदार प्रतिनिधी आहेत; ते सर्पाचे प्रतीक आहेत. जे लोक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी देवावर विश्वास ठेवतात, जे ढोंगी आणि गर्विष्ठ आहेत, जे बढाई मारतात व स्वतःच्या दर्जाचे रक्षण करतात, ते सैतानावर प्रेम करणारे आणि सत्याचा विरोध करणारे लोक आहेत. हे लोक देवाला विरोध करतात व पूर्णपणे सैतानाचे आहेत. जे देवाच्या ओझ्याकडे लक्ष देत नाहीत, जे मनापासून देवाची सेवा करत नाहीत, जे नेहमी स्वतःच्या स्वार्थाचा व त्यांच्या कुटुंबाच्या हिताचा विचार करतात, जे देवासाठी कष्ट करण्यासाठी सर्व काही सोडू शकत नाहीत आणि जे कधीही त्याच्या वचनांनुसार जगत नाहीत, ते त्याच्या वचनांच्या बाहेरचे लोक आहेत. असे लोक देवाची स्तुती प्राप्त करू शकत नाहीत.

देवाने मनुष्यांना निर्माण केले, जेणेकरून ते त्याच्या विपुलतेचा आनंद घेऊ शकतील आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करू शकतील; अशा प्रकारे, मनुष्य त्याच्या प्रकाशात जगेल. आज, जे लोक देवावर प्रेम करू शकत नाहीत, त्याच्या ओझ्याकडे लक्ष देत नाहीत, त्यांचे हृदय त्याला पूर्णपणे देऊ शकत नाहीत, त्याचे हृदय स्वतःचे म्हणून घेऊ शकत नाहीत व त्याचे ओझे स्वतःचे म्हणून वाहून नेऊ शकत नाहीत—देवाचा प्रकाश अशा कोणत्याही मनुष्यांवर पडत नाही आणि म्हणूनच ते सर्व अंधाराच्या प्रभावाखाली जगत आहेत. ते अशा मार्गावर आहेत जे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे व ते जे काही करतात त्यात सत्याचा अंशही नाही. ते सैतानाबरोबर चिखलात लोळत आहेत; ते असे लोक आहेत जे अंधाराच्या प्रभावाखाली राहतात. जर तू वरचेवर देवाच्या वचनांचे सेवन आणि प्राशन करू शकतोस व त्याच्या इच्छेकडे लक्ष देऊ शकतोस आणि त्याची वचने आचरणात आणू शकतोस, तर तू देवाचा आहेस व तू त्याच्या वचनांमध्ये राहणारी व्यक्ती आहेस. तू सैतानाच्या नियंत्रणातून सुटून देवाच्या प्रकाशात जगण्यास तयार आहेस का? जर तू देवाच्या वचनांमध्ये राहतोस, तर पवित्र आत्म्याला त्याचे कार्य करण्याची संधी मिळेल; जर तू सैतानाच्या प्रभावाखाली राहत असशील, तर तू पवित्र आत्म्याला अशी संधी देणार नाही. पवित्र आत्मा मनुष्यांवर करत असलेले कार्य, तो त्यांच्यावर टाकत असलेला प्रकाश आणि तो त्यांना देत असलेला आत्मविश्वास फक्त क्षणभर टिकतो; जर लोकांनी सावधगिरी बाळगली नाही व लक्ष दिले नाही, तर पवित्र आत्म्याचे कार्य त्यांच्या हातून निसटून जाईल. जर मनुष्य देवाच्या वचनांमध्ये राहत असतील, तर पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर असेल आणि त्यांच्यावर कार्य करेल. जर मनुष्य देवाच्या वचनांमध्ये राहत नसेल, तर ते सैतानाच्या बंधनात राहतात. जर मनुष्य भ्रष्ट प्रवृत्तीने जगत असतील, तर त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती किंवा कार्य नसते. जर तू देवाच्या वचनांच्या मर्यादेत राहत असशील व जर तू देवाला अपेक्षित असलेल्या स्थितीत राहत असशील, तर तू त्याचा आहेस आणि त्याचे कार्य तुझ्यावर केले जाईल; जर तू देवाच्या आवश्यकतांच्या मर्यादेत जगत नसशील, परंतु सैतानाच्या अधिपत्याखाली जगत असशील, तर तू निश्चितपणे सैतानाच्या भ्रष्टतेत जगत आहेस. केवळ देवाच्या वचनांमध्ये राहून व त्याला हृदय देऊन तू त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकतोस; देवाने सांगितल्याप्रमाणे तू ते केले पाहिजे, त्याच्या वचनांना तुझ्या अस्तित्वाचा आणि तुझ्या जीवनाचा पाया बनवला पाहिजेस; तरच तू देवाचा होशील. जर तू खरोखर देवाच्या इच्छेनुसार आचरण केलेस, तर तो तुझ्यावर कार्य करेल व तू त्याच्या आशीर्वादाखाली, त्याच्या चेहऱ्याच्या प्रकाशात जगशील; पवित्र आत्मा जे कार्य करतो ते तू समजून घेशील आणि देवाच्या उपस्थितीचा आनंद अनुभवशील.

अंधाराच्या प्रभावातून वाचण्यासाठी, तुम्ही प्रथम देवाशी एकनिष्ठ असले पाहिजे आणि सत्याचा पाठपुरावा करण्यास मनापासून उत्सुक असले पाहिजे; तरच तुमची स्थिती योग्य असू शकते. अंधाराच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी योग्य स्थितीत जगणे ही पूर्वअट आहे. योग्य स्थिती नसणे म्हणजे देवाशी एकनिष्ठ नसणे व सत्याचा पाठपुरावा करण्यास मनापासून उत्सुक नसणे; आणि अंधाराच्या प्रभावातून सुटका हा प्रश्नच उद्भवत नाही. माझी वचने म्हणजे अंधाराच्या प्रभावातून मनुष्याच्या सुटकेचा आधार आहेत व जे लोक माझ्या वचनांनुसार आचरण करू शकत नाहीत, ते अंधाराच्या प्रभावाच्या बंधनातून सुटू शकणार नाहीत. योग्य स्थितीत जगणे म्हणजे देवाच्या वचनांच्या मार्गदर्शनाखाली जगणे, देवाशी एकनिष्ठ राहणे, सत्य शोधण्याच्या अवस्थेत जगणे, देवासाठी प्रामाणिकपणे स्वतःहून कष्ट करण्याच्या वास्तविकतेत जगणे आणि देवावर मनापासून प्रेम करण्याच्या स्थितीत जगणे. जे लोक या स्थितींमध्ये व या वास्तविकतेत राहतात ते सत्याच्या खोलात प्रवेश करताना हळूहळू बदलत जातील आणि कार्य जसजसे खोलवर जाईल तसतसे ते बदलतील; आणि शेवटी, ते नक्कीच देवाने प्राप्त केलेले व देवावर मनापासून प्रेम करणारे लोक बनतील. जे अंधाराच्या प्रभावातून सुटले आहेत, ते हळूहळू देवाची इच्छा जाणून घेऊ शकतात आणि ते हळूहळू समजू शकतात, शेवटी ते देवाचे विश्वासू बनतात. ते देवाविषयी कोणत्याही धारणा बाळगत नाहीत व त्याच्याविरुद्ध बंड करत नाहीत, तसेच त्यापूर्वी ज्या धारणा आणि बंडखोरी त्यांच्या मनात होती त्याबद्दल त्यांना अधिक तिरस्कार वाटतो व त्यांच्या हृदयात देवाबद्दलचे खरे प्रेम निर्माण होते. जे लोक अंधाराच्या प्रभावातून सुटू शकत नाहीत, ते सर्व पूर्णपणे देह आणि विद्रोहाने भरलेले आहेत; त्यांचे हृदय मानवी धारणा व जगण्याच्या तत्त्वज्ञानाने, तसेच त्यांचे स्वतःचे हेतू आणि विचारांनी भरले आहे. देवाला मनुष्याकडून असामान्य प्रेम हवे आहे; मनुष्याने त्याच्या वचनांमध्ये व्यापून राहावे व त्याच्यावर संपूर्ण हृदयाने प्रेम करावे अशी त्याची अपेक्षा आहे. देवाच्या वचनांमध्ये जगणे, त्यांनी जे शोधले पाहिजे ते त्याच्या वचनांमध्ये शोधणे, देवावर त्याच्या वचनांसाठी प्रेम करणे, त्याच्या वचनांसाठी धावणे, त्याच्या वचनांसाठी जगणे—ही अशी ध्येये आहेत जी साध्य करण्यासाठी मनुष्याने प्रयत्न केले पाहिजेत. सर्व काही देवाच्या वचनांवर आधारित उभारले पाहिजे; तरच मनुष्य देवाच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल. जर मनुष्य देवाच्या वचनांनी सुसज्ज नसेल, तर तो सैतानाने पछाडलेला किडा आहे! याचे आकलन करा: देवाचे वचन तुझ्यामध्ये किती रुजले आहे? तू कोणत्या गोष्टींमध्ये त्याच्या वचनांनुसार जगत आहेस? जर देवाच्या वचनांनी तुला पूर्णपणे व्यापून टाकले नसेल, तर तुझ्या हृदयात नेमके काय आहे? तुझ्या दैनंदिन जीवनात, तुझ्यावर सैतानाचे नियंत्रण आहे की तू देवाच्या वचनांनी व्यापलेला आहेस? त्याची वचने तुझ्या प्रार्थनांचा पाया आहेत का? देवाच्या वचनांच्या ज्ञानाने तू तुझ्या नकारात्मक अवस्थेतून बाहेर आला आहेस का? तुझ्या अस्तित्वाचा पाया म्हणून देवाची वचने जाणून घेणे—यामध्ये प्रत्येकाने प्रवेश केला पाहिजे. जर त्याची वचने तुझ्या जीवनात उपस्थित नसतील, तर तू अंधाराच्या प्रभावाखाली जगत आहेस, तू देवाविरुद्ध बंड करत आहेस, तू त्याला विरोध करत आहेस आणि त्याच्या नावाचा अपमान करत आहेस. अशा लोकांचा देवावरचा विश्वास हा निव्वळ दुराचार व व्यत्यय आहे. तू तुझे किती आयुष्य त्याच्या वचनांनुसार जगले आहेस? तू तुझे किती आयुष्य त्याच्या वचनांनुसार जगले नाहीस? देवाच्या वचनाची तुझ्याकडून जी अपेक्षा आहे त्यापैकी किती पूर्ण झाली आहे? तू ती वचने किती हरवली आहेस? तू अशा गोष्टी जवळून पाहिल्या आहेस का?

अंधाराच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी पवित्र आत्म्याचे कार्य आणि मनुष्याचे समर्पित सहकार्य दोन्ही आवश्यक आहे. मनुष्य योग्य मार्गावर नाही असे मी का म्हणतो? जे लोक योग्य मार्गावर आहेत ते प्रथम त्यांचे हृदय देवाला देऊ शकतात. हे असे कार्य आहे ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण मानवजात नेहमीच अंधाराच्या प्रभावाखाली राहिली आहे व हजारो वर्षांपासून सैतानाच्या बंधनात आहे. त्यामुळे हा प्रवेश केवळ एक-दोन दिवसांत मिळू शकत नाही. मनुष्यांना स्वतःच्या स्थितीची समज प्राप्त व्हावी म्हणून मी आज हा मुद्दा मांडला; अंधाराचा प्रभाव काय आणि प्रकाशात जगणे म्हणजे काय हे मनुष्याला समजल्यास प्रवेश करणे सोपे होते. याचे कारण असे, की सैतानाचा प्रभाव म्हणजे काय हे तुला त्यापासून सुटण्याआधी माहीत असणे आवश्यक आहे; त्यानंतरच तुझ्याकडे त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग असेल. त्यानंतर काय करायचे, हा मनुष्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रवेश करा व कधीही निष्क्रीयपणे प्रतीक्षा करू नका. केवळ अशाच प्रकारे देव तुम्हाला प्राप्त करू शकतो.

मागील:  देहधारी देव आणि देवाने वापरलेले लोक यांच्यातील अत्यंत महत्वाचा फरक

पुढील:  श्रद्धेमध्ये, वास्तवावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे—धार्मिक कर्मकांडांमध्ये गुंतणे म्हणजे श्रद्धा नव्हे

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger