देवाच्या इच्छेशी मेळ साधून सेवा कशी करावी

जेव्हा एखाद्याचा देवावर विश्वास असतो, तेव्हा नेमक्या कशा प्रकारे त्याने देवाची सेवा करावी? जे देवाची सेवा करतात, त्यांनी कोणत्या अटी पूर्ण कराव्यात आणि कोणती सत्ये समजून घ्यावीत? व तुमच्या सेवेत तुम्ही कुठे विचलित होण्याची शक्यता असते? या सगळ्या गोष्टींची उत्तरे तुम्हाला माहीत असायला हवीत. तुमचा देवावर कसा विश्वास आहे आणि पवित्र आत्म्याने आखून दिलेल्या मार्गावरून तुम्ही कसे चालता व सर्व गोष्टींतील देवाच्या आयोजनाला कसे शरण जाता यांचा हे प्रश्न विचार करतात आणि अशा प्रकारे तुम्हाला देवाच्या तुमच्यातील कार्याची प्रत्येक पायरी समजून घेण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही इथपर्यंत पोहोचता, तेव्हा देवावरची श्रद्धा म्हणजे काय, देवावर योग्य प्रकारे विश्वास कसा ठेवावा व देवाच्या इच्छेशी मेळ साधून कृती करण्यासाठी तुम्ही काय करावे, हे तुम्ही समजून घ्याल. ही गोष्ट तुम्हाला देवाच्या कार्याप्रति पूर्णपणे आणि अतिशय आज्ञाधारक बनवेल; तुमच्या कोणत्याही तक्रारी नसतील व तुम्ही देवाच्या कार्याचा निवाडा किंवा विश्लेषण करणार नाही, संशोधन करणे दूरच. अशा तऱ्हेने, आजीवन तुम्ही सर्वजण देवाचे आज्ञापालन करण्यास सक्षम राहाल, मेंढ्यांप्रमाणे तुम्ही देवाला तुम्हाला मार्गदर्शन आणि कत्तल करू द्याल जेणेकरून, तुम्ही सर्वजण १९९० च्या दशकातील पेत्र व्हाल व वधस्तंभावरदेखील, किंचितही तक्रार न करता देवावर निरतिशय प्रेम करू शकाल. मगच तुम्ही १९९० च्या दशकातील पेत्र म्हणून जगू शकाल.

ज्याने निर्धार केला आहे असा प्रत्येकजण देवाची सेवा करू शकतो—पण जे देवाच्या इच्छेकडे पुरेपूर लक्ष देतात आणि देवाची इच्छा समजून घेतात तेच देवाची सेवा करण्यास पात्र व अधिकारी असतात. मला तुमच्यात हे आढळले आहे: अनेक लोकांना असे वाटते, की जर ते देवासाठी सुवार्तेचा जोरदार प्रसार करत आहेत, देवासाठीच्या मार्गावर चालत आहेत, देवासाठी स्वतःला कष्ट देत आहेत आणि गोष्टींचा त्याग करत आहेत व इतर बऱ्याच गोष्टी करत आहेत, तर हीच देवाची सेवा आहे. त्याहून अधिक धार्मिक लोकांना असे वाटते, की हातात बायबल घेऊन इकडेतिकडे फिरणे, स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करणे व लोकांना पश्चात्ताप करायला आणि कबुलीजबाब द्यायला लावून त्यांना वाचवणे म्हणजे देवाची सेवा करणे आहे. अनेक धार्मिक अधिकाऱ्यांना असे वाटते, की प्रगत अभ्यास करून व सेमिनरी प्रशिक्षण घेऊन चॅपलमध्ये प्रवचन देणे आणि बायबलमधील शास्त्रांच्या वाचनातून लोकांना शिकवण देणे म्हणजे देवाची सेवा करणे आहे. तसेच, गरीब प्रदेशांत असेही लोक आहेत ज्यांना वाटते, की आजारी लोकांना बरे करणे व त्यांच्या बंधुभगिनींमधील भूत उतरवणे किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करणे म्हणजे देवाची सेवा करणे आहे. तुमच्यामधील अनेकांना असे वाटते, की देवाच्या वचनांचे सेवन व प्राशन करणे, दररोज देवाची प्रार्थना करणे, तसेच सगळीकडच्या चर्चना भेट देणे आणि तेथे काम करणे म्हणजे देवाची सेवा करणे आहे. काही बंधुभगिनींना असे वाटते, की कधीही विवाह न करणे किंवा कुटुंबाचा सांभाळ करणे व त्यांचे संपूर्ण अस्तित्व देवाला अर्पण करणे म्हणजे देवाची सेवा करणे आहे. मात्र देवाची सेवा करणे याचा खरा अर्थ काय हे फारच कमी लोकांना माहीत आहे. देवाची सेवा करणारे लोक आकाशातील ताऱ्यांइतके असंख्य असले, तरी जे थेट सेवा करतात आणि जे देवाच्या इच्छेनुसार सेवा करू शकतात अशा लोकांची संख्या नगण्य—अगदीच यथातथा—असते. मी असे का म्हणतो? मी असे म्हणतो कारण “देवाची सेवा” या शब्दप्रयोगाचे सार तुम्हाला समजत नाही व देवाच्या इच्छेनुसार सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला फारच कमी समज आहे. देवाच्या इच्छेशी मेळ साधून कोणत्या प्रकारची देवाची सेवा करता येते हे लोकांनी नेमकेपणाने समजण्याची तातडीची गरज आहे.

तुम्हाला जर देवाच्या इच्छेनुसार सेवा करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला प्रथम हे समजून घेतले पाहिजे, की देवाला कोणत्या प्रकारच्या लोकांमुळे आनंद होतो, देवाला कोणत्या प्रकारच्या लोकांचा तिरस्कार वाटतो, देव कोणत्या प्रकारच्या लोकांना परिपूर्ण बनवतो आणि कोणत्या प्रकारचे लोक देवाची सेवा करण्यास पात्र असतात. तुमच्याकडे किमान एवढे ज्ञान तर असलेच पाहिजे. तसेच, देवाच्या कार्याची ध्येये व सद्यस्थितीत देव कोणते कार्य करेल हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. हे समजल्यानंतर आणि देवाच्या वचनांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, तुम्ही प्रथम प्रवेश करायला हवा व प्रथम देवाचा आदेश प्राप्त करायला हवा. तुम्हाला देवाच्या वचनांचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर आणि तुम्ही देवाचे कार्य खरोखर जाणून घेतल्यानंतर, तुम्ही देवाची सेवा करण्यास पात्र होता. आणि तुम्ही जेव्हा त्याची सेवा करता तेव्हा देव तुमचे आध्यात्मिक डोळे उघडतो व तुम्हाला त्याच्या कार्याचे अधिक आकलन होऊ देतो आणि ते अधिक स्पष्टपणे पाहू देतो. जेव्हा तू या वास्तविकतेत प्रवेश करशील, तेव्हा तुझे अनुभव अधिक सखोल व वास्तविक होतील आणि तुमच्यातील ज्यांना असे अनुभव आहेत ते चर्चमध्ये वावरू शकतील व तुमच्या बंधुभगिनींना सुविधा देऊ शकतील जेणेकरून, तुम्ही स्वतःच्या उणिवा भरून काढण्यासाठी एकमेकांच्या बलस्थानांचा उपयोग करू शकाल आणि तुमच्या आत्म्यांचे अधिक समृद्ध ज्ञान मिळवू शकाल. हा परिणाम साध्य केल्यानंतरच तुम्ही देवाच्या इच्छेनुसार सेवा करू शकाल व तुमच्या सेवेदरम्यान देव तुम्हाला परिपूर्ण बनवेल.

जे देवाची सेवा करतात ते देवाचे निकटवर्ती असायला हवेत, त्यांनी देवाला प्रसन्न करायला हवे आणि ते देवाशी पराकोटीच्या निष्ठेसाठी सक्षम असायला हवेत. तुझी कृती वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक, तू देवाचा आनंद देवासमोर प्राप्त करू शकतोस, तू देवासमोर ठाम उभा राहू शकतोस व लोकांनी तुला कसेही वागवले, तरीही तू ज्या मार्गावर चालायला हवे त्याच मार्गावर चालतोस आणि देवाच्या भाराची पूर्ण काळजी घेतोस. केवळ असेच लोक देवाचे निकटवर्ती असतात. देवाचे निकटवर्ती त्याची थेट सेवा करू शकतात याचे कारण त्यांना देवाचा महान आदेश आणि देवाचा भार मिळालेला असतो, ते देवाचे हृदय स्वतःचे बनवू शकतात व देवाचा भार स्वतःचा भार म्हणून घेऊ शकतात आणि ते त्यांच्या भविष्यातील संधींचा फार विचार करत नाहीत: त्यांना संधी नसतानादेखील व त्यांना काहीही मिळवायचे नसतानादेखील, ते प्रेमळ हृदयाने नेहमीच देवावर विश्वास ठेवतील. आणि म्हणून, अशा प्रकारची व्यक्ती ही देवाची निकटवर्ती असते. देवाचे निकटवर्ती हे त्याचे विश्वासू असतात; केवळ देवाचे विश्वासूच त्याची अस्वस्थता व त्याचे विचार वाटून घेऊ शकतात आणि त्यांचा देह जरी वेदनामय व अशक्त असला, तरी ते वेदना सहन करू शकतात आणि त्यांचे ज्यावर प्रेम आहे त्या गोष्टीचा त्याग करू शकतात. देव अशा लोकांवर जास्त भार टाकतो व देव जे करू इच्छित असतो ते अशा लोकांच्या साक्षीतून उत्पन्न होते. अशा प्रकारे, हे लोक देवाला प्रसन्न करत असतात, ते देवाचे प्रिय सेवक असतात आणि केवळ असेच लोक देवासह अधिराज्य करू शकतात. तू जेव्हा खऱ्या अर्थाने देवाचा निकटवर्ती झालेला असशील, तेव्हा तू देवासह अधिराज्य करशील.

येशू देवाचा आदेश—संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराचे कार्य—पूर्ण करू शकला, कारण त्याने स्वतःसाठी कोणत्याही योजना किंवा व्यवस्था न करता देवाच्या इच्छेला पुरेपूर मान दिला. म्हणूनच तो देवाचा निकटवर्ती—स्वयमेव देव—देखील होता आणि तुम्ही सर्व हे चांगल्या प्रकारे जाणता. (खरे तर, तो स्वयमेव देवच होता ज्याच्यासाठी देवाने साक्ष दिली. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी येशूची बाब उपयोगात आणण्यासाठी मी येथे याचा उल्लेख करत आहे.) तो देवाची व्यवस्थापन योजना अगदी केंद्रस्थानी ठेवू शकला व तो नेहमीच स्वर्गस्थ पित्याची प्रार्थना करत होता आणि स्वर्गस्थ पित्याची इच्छा पाहात होता. त्याने प्रार्थना केली व तो म्हणाला: “हे देवा पित्या! तुझी जी इच्छा असेल ती साध्य कर आणि माझ्या इच्छांप्रमाणे कृती करू नकोस तर तुझ्या योजनेप्रमाणे कर. मनुष्य कमजोर असेलही, पण तू त्याच्यासाठी चिंता का करावीस? मनुष्य, जो तुझ्या हातातल्या एखाद्या मुंगीसारखा आहे, तो तुझ्या चिंतेस पात्र कसा होऊ शकेल? माझ्या मनात, केवळ तुझी इच्छा साध्य व्हावी हीच इच्छा आहे व मला वाटते, की तू तुझ्या स्वतःच्या इच्छांनुसार माझ्या बाबतीत जे करायचे आहे ते करू शकतोस.” जेरुसलेमच्या मार्गावर असताना, येशूला वेदना होत होत्या, जणू काही त्याच्या हृदयात सुरी पिळवटली जात होती, तरीही आपल्या वचनापासून ढळण्याचा त्याचा जराही हेतू नव्हता; जेथे त्याला वधस्तंभावर चढवण्यात येणार होते तेथे जाण्यासाठी एक ताकदवान शक्ती त्याला कायम भाग पाडत होती. अखेरीस, त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि तो पापी देहासारखा झाला, मानवजातीच्या उद्धाराचे कार्य त्याने पूर्ण केले. मृत्यूच्या व अधोलोकाच्या शृंखला तोडून तो मुक्त झाला. त्याच्यासमोर, मर्त्यत्व, नरक आणि अधोलोक यांची ताकद हरवून गेली व ते त्याच्याकडून पराभूत झाले. तो तेहतीस वर्षे जगला, या संपूर्ण काळात त्याने नेहमीच देवाच्या त्यावेळच्या कार्यानुसार देवाची इच्छा पूर्ण करण्याचा पराकोटीचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या वैयक्तिक लाभ-हानीचा विचार कधीही केला नाही आणि केवळ परमपिता देवाच्या इच्छेचा नेहमी विचार केला. अशा प्रकारे, त्याला बाप्तिस्मा दिला गेल्यावर देव म्हणाला: “हा माझा ‘पुत्र’, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” त्याने देवासमोर केलेली सेवा ही देवाच्या इच्छेशी मेळ साधणारी असल्यामुळे, देवाने संपूर्ण मानवजातीचा उद्धार करण्याचा भार त्याच्या खांद्यांवर सोपवला व त्याच्याकडून ते पूर्ण करून घेतले आणि तो हे महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यास पात्र व अधिकारी होता. जीवनभर त्याने देवासाठी अगणित हालअपेष्टा भोगल्या आणि असंख्य वेळा त्याला सैतानाने भुलवण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीही नाउमेद झाला नाही. देवाने त्याला इतके प्रचंड कार्य दिले कारण त्याचा त्याच्यावर विश्वास होता व प्रेम होते आणि म्हणून देव स्वतः म्हणाला: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” त्या वेळी, फक्त येशूच हा आदेश पूर्ण करू शकला व कृपेच्या युगात संपूर्ण मानवजातीचा उद्धार करण्याच्या देवाच्या कार्याच्या पूर्ततेचा हा एक व्यावहारिक पैलू होता.

येशूप्रमाणे जर तुम्ही देवाच्या भाराची पुरेपूर काळजी घेऊ शकलात आणि तुमच्या देहाकडे दुर्लक्ष करू शकलात, तर देव त्याची महत्त्वाची कार्ये तुमच्यावर सोपवेल जेणेकरून, देवाची सेवा करण्यासाठी आवश्यक अटी तुम्ही पूर्ण कराल. केवळ अशाच परिस्थितीत तुम्ही असे म्हणण्याचे धाडस करू शकता, की तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे कृती करत आहात व त्याचा आदेश पूर्ण करत आहात आणि तेव्हाच तुम्ही असे म्हणण्याचे धाडस करू शकता, की तुम्ही खरोखर देवाची सेवा करत आहात. येशूच्या उदाहरणाशी तुलना करता, तू देवाचा निकटवर्ती आहेस असे म्हणण्यास तू धजावतोस का? तू देवाच्या इच्छेप्रमाणे करत आहेस असे म्हणण्यास तू धजावतोस का? तू खरोखर देवाची सेवा करता आहेस असे म्हणण्यास तू धजावतोस का? आज, देवाची सेवा कशी करायची हे तुला माहीत नाही, असे असताना तू देवाचा निकटवर्ती आहेस असे म्हणण्यास तू धजावतोस का? तू देवाची सेवा करतोस असे जर तू म्हणालास, तर तू त्याची निंदा करतोस असे होत नाही का? यावर विचार करा: तू देवाची सेवा करत आहेस की स्वतःची? तू सैतानाची सेवा करतोस, तरीही तू हट्टीपणाने म्हणतोस, की तू देवाची सेवा करत आहेस, असे करण्याने तू त्याची निंदा करत नाहीस का? अनेक लोक माझ्या मागे प्रतिष्ठेचे फायदे उकळतात, खातात पितात, त्यांना झोपायला आणि देहाची सर्वतोपरि काळजी घ्यायला त्यांना आवडते, देहाला काही पर्याय नाही याची त्यांना कायम भीती असते. ते त्यांचे चर्चमधील योग्य कार्य पार पाडत नाहीत, तर चर्चवर फुकटचा भार बनून राहतात किंवा ते माझ्या वचनांनी त्यांच्या बंधुभगिनींना फटकारतात, अधिकाराच्या पदांवर राहून इतरांवर वर्चस्व गाजवतात. हे लोक म्हणत असतात, की ते देवाच्या इच्छेनुसार कृती करत आहेत आणि ते नेहमीच म्हणतात, की ते देवाचे निकटवर्ती आहेत—हे मूर्खपणाचे नाही का? तुझे हेतू जर योग्य असतील, पण तू देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करू शकत नसशील, तर तू मूर्खपणा करत आहेस; पण जर तुझे हेतू योग्य नसतील आणि तरीही तू देवाची सेवा करतोस असे म्हणत असशील, तर तू देवाचा विरोधक आहेस आणि तुला देवाने शिक्षा द्यायला हवी! अशा लोकांबद्दल मला जराही सहानुभूती नाही! देवाच्या घरात ते फुकटचा भार असतात, कायम देहाच्या सुखांची अभिलाषा बाळगून असतात आणि देवाच्या हेतूंचा ते जराही विचार करत नाहीत. ते कायम स्वतःसाठी काय चांगले असेल तेच पाहतात व देवाच्या इच्छेकडे लक्षच देत नाहीत. ते जे करतात त्या कोणत्याही गोष्टीत ते देवाच्या आत्म्याची छाननी स्वीकारत नाहीत. ते आपल्या बंधुभगिनींना फसवतात, दुतोंडीपणा करत असतात, द्राक्षांच्या बागेतील कोल्ह्यासारखे नेहमीच बागेतील द्राक्षे चोरत असतात, बागेची नासाडी करत असतात. असे लोक देवाचे निकटवर्ती असू शकतात का? देवाचे वरदान प्राप्त करण्यास तू पात्र आहेस का? तू तुझ्या जीवनासाठी आणि चर्चसाठी कोणताही भार उचलत नाहीस, मग तू देवाचा आदेश प्राप्त करण्यास पात्र आहेस का? तुझ्यावर विश्वास ठेवण्याचे धाडस कोण करेल? तू जर अशी सेवा केलीस, तर देव तुझ्यावर मोठे कार्य सोपवेल का? यामुळे कार्यात विलंब होणार नाही का?

मी हे यासाठी म्हणतो आहे, की देवाच्या इच्छेशी मेळ साधून सेवा करण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत हे तुम्हाला कळावे. तुम्ही जर देवाला तुमचे हृदय दिले नाही, तुम्ही जर येशूप्रमाणे देवाच्या इच्छेची पुरेपूर काळजी घेतली नाहीत, तर देव तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि शेवटी देव तुमचा न्याय करेल. कदाचित आज, देवाच्या तुझ्या सेवेत तू कायम देवाला फसवण्याचा हेतू मनात बाळगून आहेस आणि नेहमी त्याला गौण लेखतोस. थोडक्यात, बाकी काहीही असले तरी, तू जर देवाला फसवलेस, तर तुला कठोर न्यायाचा सामना करावा लागेल. सर्वप्रथम देवाला तुमचे अंतःकरण देण्यासाठी तुम्ही अखंड निष्ठेने केवळ देवाची सेवा करण्यासाठी नुकतेच योग्य मार्गावर पाऊल ठेवल्याचा फायदा करून घ्यावा. तू देवासमोर किंवा इतर लोकांसमोर कुठेही असशील तरीही, तुझे हृदय कायम देवाकडेच लागलेले असायला हवे आणि येशूने केले त्याप्रमाणे देवावर प्रेम करण्याचा तुझा निर्धार असायला हवा. अशा प्रकारे, देव तुला परिपूर्ण बनवेल, जेणेकरून तू त्याच्या हृदयाच्या जवळचा असा देवाचा सेवक बनशील. तुला देवाने परिपूर्ण बनवावे आणि तुझी सेवा त्याच्या इच्छेशी मेळ साधणारी असावी अशी तुझी खरोखरच इच्छा असेल, तर तू देवावरील विश्वासाबाबतचे तुझे आधीचे दृष्टिकोन बदलायला हवेस आणि पूर्वी ज्याप्रकारे देवाची सेवा करत होतात ते जुने मार्गही बदलायला हवेस जेणेकरून, तुला देव अधिक परिपूर्ण बनवेल. अशा प्रकारे, देव तुला सोडून देणार नाही आणि पेत्राप्रमाणे तू जे देवावर प्रेम करतात त्यांच्या समक्ष राहशील. तू जर पश्चात्तापरहित राहिलास, तर तुझा शेवट हा यहूदाप्रमाणेच होईल. देवावर विश्वास असणाऱ्या सर्वांनी हे समजून घ्यायला हवे.

मागील:  दुष्टांना नक्कीच शिक्षा केली जाईल

पुढील:  देवाच्या मनुष्याच्या उपयुक्ततेविषयी

सेटिंग्ज

  • मजकूर
  • संकल्पना

एकच रंग

संकल्पना

फाँट्स

फाँट आकार

ओळींमधील अंतर

ओळींमधील अंतर

पानाची रुंदी

अनुक्रमणिका

शोधा

  • हा मजकूर शोधा
  • हे पुस्तक शोधा

Connect with us on Messenger