अध्याय १८
देवाच्या सर्व वचनांमध्ये त्याच्या प्रवृत्तीचा भाग समाविष्ट असतो. देवाची प्रवृत्ती शब्दांत पूर्णपणे व्यक्त करता येत नाही, हे त्याच्यामध्ये किती समृद्धी आहे हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे. लोक जे पाहू शकतात आणि ज्याला स्पर्श करू शकतात ते लोकांच्या क्षमतेप्रमाणेच मर्यादित आहे. देवाची वचने स्पष्ट असली, तरी लोक ती पूर्णपणे समजू शकत नाहीत. उदाहरणार्थ ही वचने घ्या: “विजेच्या लखलखाटात प्रत्येक प्राणी त्याच्या खऱ्या रूपात प्रकट होतो. त्याचप्रमाणे, माझ्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या, मनुष्याला पूर्वीचे पावित्र्य पुन्हा प्राप्त झाले आहे. हे जुन्या काळातील भ्रष्ट जगा! शेवटी, ते घाणेरड्या पाण्यात कोसळले आहे आणि पृष्ठभागाच्या खाली बुडून चिखलात विरघळले आहे!” देवाच्या सर्व वचनांमध्ये त्याचे व्यक्तित्व आहे आणि जरी सर्व लोकांना या वचनांची जाणीव असली, तरीही त्यांचा अर्थ कोणालाही कळला नाही. देवाच्या दृष्टीने, जे त्याला विरोध करतात ते सर्व त्याचे शत्रू आहेत, म्हणजेच जे वाईट आत्म्यांशी संबंधित आहेत ते जनावर आहेत. यावरून चर्चची खरी स्थिती लक्षात येते. सर्व मनुष्य देवाच्या वचनांनी प्रकाशित होतात व या प्रकाशात, ते इतरांकडून फटकारणे, ताडण अथवा थेट उपेक्षा यांच्याविना, गोष्टी करण्याच्या इतर मानवी पद्धतींच्या अधीन न होता आणि इतरांनी गोष्टी दर्शवल्याशिवाय स्वतःचे परीक्षण करतात. “अत्यंत सूक्ष्म दृष्टिकोनातून” ते अगदी स्पष्टपणे पाहतात, की त्यांच्या अंतःकरणात खरोखर किती मलीनता आहे. देवाच्या वचनांमध्ये, प्रत्येक प्रकारच्या आत्म्याचे वर्गीकरण केले जाते व त्याच्या मूळ स्वरूपात प्रकट केले जाते; ज्यांच्याकडे देवदूतांचे आत्मे आहेत ते अधिक प्रकाशमान आणि प्रबुद्ध होतात, म्हणून देवाची वचने आहेत, “त्यांनी पूर्वीचे पावित्र्य परत प्राप्त केले.” ही वचने देवाने प्राप्त केलेल्या अंतिम परिणामावर आधारित आहेत. या क्षणासाठी, अर्थातच, हा परिणाम अद्याप पूर्णपणे प्राप्त करता येत नाही—ही फक्त पूर्वकल्पना आहे, ज्याद्वारे देवाची इच्छा दिसून येते. ही वचने हे दाखवण्यासाठी पुरेशी आहेत, की मोठ्या संख्येने लोक देवाच्या वचनांमध्ये चिरडले जातील व सर्व लोकांच्या पवित्रीकरणाच्या प्रक्रियेत हळूहळू पराभूत होतील. येथे, “चिखलात विरघळणे” हे देवाने अग्नीने जगाचा नाश करण्याचा विरोध करत नाही आणि “वीज” म्हणजे देवाच्या क्रोधाला सूचित करते. जेव्हा देव त्याचा महान क्रोध झोकून देतो, तेव्हा संपूर्ण जगाला ज्वालामुखीच्या स्फोटाप्रमाणे सर्व प्रकारच्या आपत्तींचा अनुभव येईल. आकाशात उंचावर उभे राहून, हे पाहिले जाऊ शकते, की पृथ्वीवर, प्रत्येक प्रकारचे संकट दिवसेंदिवस सर्व मानवजातीच्या जवळ येत आहे. उंचावरून खाली पाहताना, पृथ्वीवर भूकंपाच्या आधीच्या दृश्यांसारखी विविध दृश्ये दिसतात. ज्वालामुखी फुटतो, त्यातील शिलारस मुक्तपणे वाहतो, पर्वत हलतात आणि एकंदरीत उदासीन प्रकाश चमकतो. संपूर्ण जग आगीत बुडाले आहे. हा देवाच्या क्रोधाच्या वेळेचा देखावा आहे आणि ही त्याच्या न्यायाची वेळ आहे. जे रक्तामांसाचे आहेत ते सर्व सुटू शकणार नाहीत. अशा प्रकारे, संपूर्ण जगाचा नाश करण्यासाठी देशादेशांमधील युद्धे व लोकांमधील संघर्षांची आवश्यकता असणार नाही; त्याऐवजी, जग देवाच्या ताडणाच्या पाळण्यात “जाणीवपूर्वक आनंद” घेईल. कोणीही सुटू शकणार नाही; प्रत्येक व्यक्तीने या दिव्यातून एक एक करून जाणे आवश्यक आहे. त्यानंतर, संपूर्ण विश्व पुन्हा एकदा पवित्र तेजाने चमकेल आणि संपूर्ण मानवजात पुन्हा एकदा नवीन जीवन सुरू करेल. आणि देव विश्वाच्या वर विश्रांती घेईल व सर्व मानवजातीला दररोज आशीर्वाद देईल. स्वर्ग असह्यपणे उजाड होणार नाही, परंतु जगाच्या निर्मितीपासून त्याला कधीही न मिळालेले चैतन्य परत मिळवून देईल आणि जेव्हा देव नवीन जीवन सुरू करेल, तेव्हा “सहावा दिवस” येईल. देव व मानवजात दोघेही विश्रांतीमध्ये प्रवेश करतील आणि विश्व यापुढे गढूळ किंवा घाणेरडे राहणार नाही, परंतु नूतनीकरण केले जाईल. म्हणूनच देव म्हणाला: “पृथ्वी आता मृत्यूसारखी स्थिर आणि शांत नाही, स्वर्ग आता उजाड व दुःखी नाही.” स्वर्गाच्या राज्यात, कधीही अनीति अथवा मानवी भावना किंवा मानवजातीची कोणतीही भ्रष्ट प्रवृत्ती आढळली नाही, कारण तेथे सैतानाचा त्रास नाही. सर्व “लोक” देवाची वचने समजण्यास सक्षम आहेत आणि स्वर्गातील जीवन हे आनंदाने भरलेले जीवन आहे. स्वर्गातील सर्व लोकांकडे शहाणपण व देवाची प्रतिष्ठा आहे. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील फरकांमुळे, स्वर्गातील नागरिकांना “लोक” म्हटले जात नाही; उलट, देव त्यांना “आत्मा” म्हणतो. या दोन शब्दांमध्ये मूलभूत फरक आहे—ज्यांना आता “लोक” म्हटले जाते त्यांना सैतानाने भ्रष्ट केले आहे, तर “आत्मा” यांना भ्रष्ट केलेले नाही. सरतेशेवटी, देव पृथ्वीवरील लोकांना स्वर्गातील आत्म्यांचे गुणधर्म असलेले प्राणी बनवेल व नंतर ते सैतानाच्या त्रासाला बळी पडणार नाहीत. हा वचनांचा खरा अर्थ आहे, “माझी पवित्रता संपूर्ण विश्वात पसरली आहे.” “पृथ्वी तिच्या आदिम स्थितीत स्वर्गाची आहे व स्वर्ग पृथ्वीशी एकरूप आहे. मनुष्य हा स्वर्ग आणि पृथ्वी यांना जोडणारा धागा आहे व मनुष्याच्या पवित्रतेमुळे, मनुष्याच्या नूतनीकरणामुळे, स्वर्ग यापुढे पृथ्वीपासून लपलेला नाही आणि पृथ्वी यापुढे स्वर्गासमोर शांत राहणार नाही.” हे देवदूतांचे आत्मे असलेल्या लोकांच्या संदर्भात म्हटले आहे व या टप्प्यावर, “देवदूत” पुन्हा एकदा शांततेने एकत्र राहण्यास सक्षम होतील आणि त्यांची मूळ स्थिती परत मिळवू शकतील, यापुढे स्वर्ग व पृथ्वीच्या क्षेत्रांमध्ये देहामुळे विभक्त होणार नाहीत. पृथ्वीवरील “देवदूत” स्वर्गातील देवदूतांशी संवाद साधण्यास सक्षम असतील, पृथ्वीवरील लोकांना स्वर्गातील रहस्ये माहीत असतील आणि स्वर्गातील देवदूतांना मानवी जगाची रहस्ये कळतील. स्वर्ग व पृथ्वी एकत्र होतील, त्यांच्यामध्ये कोणतेही अंतर राहणार नाही. हे राज्य साकार होण्याचे सौंदर्य आहे. हेच देव पूर्ण करेल आणि सर्व मनुष्य व आत्मे याचीच आकांक्षा बाळगतात. पण धार्मिक जगतातील लोकांना याची काहीच माहिती नाही. ते फक्त तारणहार येशू पांढऱ्या मेघावर आरूढ होऊन येण्याची आणि पृथ्वीवर “कचरा” सोडून त्यांच्या आत्म्यांना घेऊन जाण्याची वाट पाहत आहेत (येथे “कचरा” असे मृतदेहांसाठी म्हटले आहे). सर्व मनुष्य ही धारणा बाळगत नाहीत का? म्हणूनच देव म्हणाला: “हे, धार्मिक जगा! पृथ्वीवरील माझ्या अधिकाराने ते कसे नष्ट होणार नाही?” पृथ्वीवरील देवाचे लोक परिपूर्ण झाल्यामुळे, धार्मिक जग उलथून टाकले जाईल. देवाने सांगितलेल्या “अधिकार” या शब्दाचा खरा अर्थ हा आहे. देव म्हणाला: “माझ्या दिवसात माझ्या नावाचा अपमान करणारा कोणी आहे का? सर्व मनुष्य त्यांची आदरयुक्त नजर माझ्यावर ठेवतात आणि त्यांच्या अंतःकरणात ते गुपचूप माझा धावा करतात.” धार्मिक जगाच्या नाशाच्या परिणामांबद्दल त्याने हेच सांगितले. त्याच्या वचनांमुळे धार्मिक जग संपूर्णपणे देवाच्या सिंहासनासमोर अधीन जाईल व यापुढे पांढरा मेघ खाली येण्याची वाट पाहणार नाही किंवा आकाशाकडे पाहणार नाही, तर त्याऐवजी देवाच्या सिंहासनासमोर त्याच्यावर विजय प्राप्त केला जाईल. म्हणूनच ही वचने, “त्यांच्या अंतःकरणात ते गुपचूप माझा धावा करतात”—धार्मिक जगासाठी हा परिणाम असेल, ज्यावर देव संपूर्णपणे विजय प्राप्त करेल. देवाच्या सर्वशक्तिमानतेचा हाच अर्थ आहे आहे—सर्व धार्मिक लोकांना, मानवजातीतील सर्वात बंडखोर लोकांना पाडणे, जेणेकरून ते पुन्हा कधीही त्यांच्या स्वतःच्या धारणांना चिकटून राहणार नाहीत, की ते देवाला ओळखू शकतात.
जरी देवाच्या वचनांनी राज्याच्या सौंदर्याबद्दल वारंवार भाकीत केले असले, त्याच्या विविध पैलूंबद्दल सांगितले आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचे वर्णन केले असले, तरीही ते राज्याच्या युगातील प्रत्येक स्थिती पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत, कारण लोकांची ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्याच्या उच्चारणांची सर्व वचने बोलली गेली आहेत, परंतु लोकांनी त्यांच्या आत फ्लोरोस्कोपद्वारे, क्ष-किरणांद्वारे जसे होते तसे पाहिले नाही व त्यामुळे त्यांच्यात स्पष्टता आणि समज नाही व पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. हा देहाचा सर्वात मोठा दोष आहे. जरी त्यांच्या अंतःकरणात, लोकांना देवावर प्रेम करण्याची इच्छा असली, तरी सैतानाच्या त्रासामुळे ते त्याचा प्रतिकार करतात, म्हणून देवाने लोकांच्या सुन्न आणि मंद हृदयांना वेळोवेळी स्पर्श केला आहे, जेणेकरून ती पुनरुज्जीवित होऊ शकतील. देव जे काही उघड करतो ती सैतानाची कुरूपता आहे, म्हणूनच त्याची वचने जितकी कठोर असतील, तितका सैतान लज्जित होईल, तितकी लोकांची अंतःकरणे कमी सीमित होतील व लोकांचे प्रेम अधिक जागृत होईल. देव अशा प्रकारे कार्य करतो. सैतानाचा पर्दाफाश झाल्यामुळे आणि तो उघड झाल्यामुळे, तो आता लोकांच्या हृदयावर ताबा मिळवण्याचे धाडस करत नाही व त्यामुळे देवदूतांना त्रास दिला जात नाही. अशा प्रकारे ते देवावर मनापासून आणि मनाने प्रेम करतात. केवळ यावेळीच हे स्पष्ट होते, की त्यांच्या खऱ्या स्वभावानुसार देवदूत हे देवाचे आहेत व ते देवावर प्रेम करतात. केवळ या मार्गानेच देवाची इच्छा साध्य होऊ शकते. “सर्व मनुष्यांच्या हृदयात, आता माझ्यासाठी जागा आहे. यापुढे मला मनुष्यांकडून तिरस्कार किंवा नकार मिळणार नाही, कारण माझे महान कार्य आधीच पूर्ण झाले आहे व यापुढे त्यात अडथळा येणार नाही.” वर वर्णन केलेल्या गोष्टीचा हा अर्थ आहे. सैतानाच्या त्रासामुळे, लोकांना देवावर प्रेम करण्यासाठी वेळ मिळत नाहीत आणि ते नेहमीच जगाच्या गोष्टींमध्ये अडकून राहतात व सैतानाच्या मोहात पडतात, त्यामुळे ते गोंधळून कार्य करतात. म्हणूनच देवाने म्हटले आहे, की मानवजातीने “जीवनातील अनेक संकटे, जगातील अनेक अन्याय, मानवी जीवनातील अनेक चढउतार सहन केले आहेत, परंतु आता ते माझ्या प्रकाशात राहतात. कालच्या अन्यायांसाठी कोण रडत नाही?" जेव्हा लोक ही वचने ऐकतात, तेव्हा त्यांना असे वाटते, की जणू देव त्यांच्या दुःखात सहभागी आहे, त्यांच्या बाबतीत सहानुभूती व्यक्त करत आहे आणि त्या वेळी ते त्यांचे दुःख वाटून घेत आहे. त्यांना अचानक मानवी जगाची वेदना जाणवते व ते विचार करतात: “हे अगदी खरे आहे—मी जगातल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद घेतला नाही. माझ्या आईच्या उदरातून बाहेर पडल्यापासून आजपर्यंत मी मानवी जीवन अनुभवले आहे आणि मी काहीही कमावलेले नाही, परंतु मी खूप त्रास सहन केला आहे. हे सर्व खूप पोकळ आहे! आणि आता मला सैतानाने भ्रष्ट केले आहे! अरेरे! जर देवाकडून तारण प्राप्त झाले नाही, तर जेव्हा माझ्या मृत्यूची वेळ येईल, तेव्हा मी माझे संपूर्ण आयुष्य व्यर्थ ठरणार नाही का? मानवी जीवनाला काही अर्थ आहे का? देवाने सांगितले, की सूर्याखाली सर्व काही पोकळ आहे यात आश्चर्य नाही. जर आज देवाने मला ज्ञान दिले नसते, तर मी अजूनही अंधारात असतो. किती वाईट!” या क्षणी, त्यांच्या हृदयात शंका उत्पन्न होते: "जर मी देवाची प्रतिज्ञा मिळवू शकत नाही, तर मी जीवन कसे अनुभवू शकेन?" ही वचने वाचणाऱ्या प्रत्येकाला प्रार्थना करताना अश्रू येतील. अशी मानवी मानसिकता आहे. हे वाचूनही प्रतिक्रिया व्यक्त न करणे हे मानसिकरीत्या असंतुलित व्यक्ती वगळता इतर कोणासाठीही अशक्य आहे. दररोज, देव सर्व प्रकारच्या लोकांच्या अवस्था प्रकट करतो. कधीकधी, तो त्यांच्या वतीने तक्रारी मांडतो. काहीवेळा, तो लोकांना विशिष्ट वातावरणावर मात करण्यास व त्यातून यशस्वीरीत्या पार पडण्यास मदत करतो. कधीकधी, तो त्यांच्यासाठी लोकांचे “परिवर्तन” दर्शवतो. अन्यथा, लोकांनी आयुष्यात किती वृद्धी केली आहे हे त्यांना कळणार नाही. काही वेळा, देव लोकांचे वास्तविक अनुभव दर्शवतो आणि कधीकधी, तो त्यांच्या कमतरता व दोष दर्शवतो. काही वेळा, तो त्यांच्याकडून नवीन अपेक्षा व्यक्त करतो व काही वेळा, ते त्याला किती प्रमाणात समजून घेतात हे तो दर्शवतो. तथापि, देवाने असेही म्हटले आहे: “मी अनेक लोकांचे मनापासून बोललेले शब्द ऐकले आहेत, अनेक लोकांकडून दुःखातील त्यांच्या वेदनादायक अनुभवांबद्दलचे वर्णन ऐकले आहे; मी अनेकांना अत्यंत कठीण परिस्थितीत, माझ्याप्रति निष्ठा अर्पण करताना व खडकाळ वाटेवर चालताना, मार्ग शोधताना पाहिले आहे.” हे सकारात्मक पात्रांचे वर्णन आहे. “मानवी इतिहासातील नाटक” याच्या प्रत्येक भागामध्ये केवळ सकारात्मक पात्रेच नाहीत तर नकारात्मक पात्रेदेखील आहेत. म्हणूनच, देव या नकारात्मक पात्रांची कुरूपता प्रकट करतो. अशा प्रकारे, “विश्वासघातकी” लोकांच्या तुलनेतील त्यांच्या विरोधाभासातूनच “सरळमार्गी मनुष्य” याची अखंड निष्ठा आणि निर्भय धैर्य प्रकट होते. सर्व लोकांच्या जीवनात, नकारात्मक घटक असतात व कोणत्याही अपवादाशिवाय, सकारात्मक घटकदेखील असतात. देव सर्व लोकांबद्दलचे सत्य प्रकट करण्यासाठी दोन्हीचा वापर करतो, जेणेकरून विश्वासघातकी लोक त्यांचे मस्तक झुकवतील व त्यांची पापे कबूल करतील आणि जेणेकरून प्रोत्साहनाने सरळमार्गी मनुष्य एकनिष्ठ राहतील. देवाच्या वचनांचे अर्थ खूप खोल आहेत. काही वेळा, लोक ते वाचतात व हसून वेडे होतात, तर इतर वेळी, ते फक्त शांतपणे त्यांचे मस्तक झुकवतात. काही वेळा ते आठवण काढतात, कधी हमसून हमसून रडतात आणि त्यांच्या पापांची कबुली देतात, कधीकधी ते गडबडतात व कधीकधी ते शोधतात. एकूणच, देव ज्या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये बोलतो, त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रियांमध्ये बदल होत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती देवाची वचने वाचते, तेव्हा काही वेळा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे असे जवळचे लोक चुकून मानूही शकतात. या वचनांचा विचार करा: “आणि म्हणूनच, पृथ्वीवरील वादग्रस्त विवाद आता राहिले नाहीत व माझी वचने प्रकट केल्यानंतर, आधुनिक युगातील विविध ‘शस्त्रे’ मागे घेण्यात आली आहेत.” “शस्त्रे” हा शब्दच दिवसभर हास्यास उत्तेजन देऊ शकतो आणि जेव्हा एखाद्याला योगायोगाने “शस्त्रे” हा शब्द आठवतो, तेव्हा तो स्वतःशीच हसतो. हे असे नाही का? हे पाहून तुला हसू कसे येत नाही?
जेव्हा तू हसतोस, तेव्हा देव मानवजातीकडून काय अपेक्षा करतो हे समजून घेण्यास विसरू नका आणि चर्चची खरी स्थिती पाहण्यास विसरू नका: “संपूर्ण मानवजात सामान्य स्थितीत परत आली आहे व तिने नवीन जीवनाची सुरुवात केली आहे. बरेच लोक सभोवतालच्या नवीन वातावरणात राहून, त्यांच्या आजूबाजूला पाहतात, त्यांना असे वाटते की जणू त्यांनी पूर्णपणे नवीन जगात प्रवेश केला आहे आणि यामुळे, ते त्यांच्या सध्याच्या वातावरणाशी लगेच जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा लगेचच योग्य मार्गावर प्रवेश करू शकत नाहीत.” हीच सध्या चर्चची खरी स्थिती आहे. सर्व लोकांनी ताबडतोब योग्य मार्गावर जावे यासाठी खूप चिंताग्रस्त होऊ नका. पवित्र आत्म्याचे कार्य एका विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यानंतर, सर्व लोक ते लक्षात न घेता त्यात प्रवेश करतील. जेव्हा तू देवाच्या वचनांचे मूलतत्त्व समजून घेशील, तेव्हा तुला कळेल, की त्याच्या आत्म्याने कोणत्या टप्प्यावर कार्य केले आहे. देवाची इच्छा आहे: “मी मनुष्याच्या अनीतीवर अवलंबून, फक्त “शिक्षणाचा” समर्पक उपाय करून प्रत्येकाला योग्य मार्गावर जाण्यासाठी सक्षम करतो.” ही देवाची बोलण्याची व कार्य करण्याची पद्धत आहे आणि ती मानवजातीचीदेखील विशिष्ट पद्धत आहे. यानंतर, त्याने लोकांचे मानवजातीच्या आणखी एका स्थितीकडे लक्ष वेधले: “जर मनुष्य माझ्यामध्ये असलेल्या आनंदाचा उपभोग घेण्यास तयार नसेल, तर मी फक्त त्यांच्या हृदयातील इच्छेनुसार त्यांना अथांग खड्ड्यात पाठवणे एवढेच मी करू शकतो.” देव परिपूर्णतेने बोलला आणि लोकांना तक्रार करण्याची किंचितही संधी दिली नाही. देव व मनुष्य यांच्यात नेमका हाच फरक आहे. देव मनुष्याशी नेहमी मोकळेपणाने आणि मुक्तपणे बोलत असतो. देव म्हणतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याच्या प्रामाणिक हृदयाचे दर्शन घडते, ज्यामुळे लोक त्यांच्या स्वतःच्या हृदयाची देवाच्या हृदयाशी तुलना करतात व त्यामुळे ते त्यांचे हृदय त्याच्यासाठी खुले करण्यास सक्षम होतात, जेणेकरून ते इंद्रधनुष्याच्या वर्णपटामध्ये कोठे आहेत हे ते पाहू शकतील. देवाने कधीही कोणत्याही व्यक्तीच्या श्रद्धेची किंवा प्रेमाची प्रशंसा केली नाही, परंतु त्याने नेहमीच लोकांकडून अपेक्षा केल्या आहेत आणि त्यांची कुरूप बाजू उघड केली आहे. हे दर्शवते, की लोकांची “पातळी” किती कमी आहे व त्यांची “घडण” किती न्यून आहे. या कमतरता भरून काढण्यासाठी त्यांना अधिक “अभ्यास” करण्याची गरज आहे, म्हणूनच देव सतत लोकांवर “त्याचा राग काढतो”. एक दिवस, जेव्हा देव मानवजातीबद्दल संपूर्ण सत्य प्रकट करेल, तेव्हा लोक परिपूर्ण केले जातील आणि देव निश्चिंत होईल. लोक यापुढे देवाची खुशामत करणार नाहीत व तो यापुढे त्यांना “शिक्षित” करणार नाही. तेव्हापासून, लोक “स्वतःच्या बळावर जगण्यास” सक्षम होतील, परंतु आता ती वेळ नाही. लोकांमध्ये अजूनही बरेच काही आहे ज्याला “बनावट” म्हटले जाऊ शकते आणि परीक्षेच्या आणखी अनेक फेऱ्या आवश्यक आहेत, आणखी काही “तपासण्या” आहेत जिथे त्यांचो “कर” योग्यरीत्या भरले जाऊ शकतात. तरीही बनावट माल आढळल्यास ते विकले जाऊ नयेत म्हणून ते जप्त केले जातील व त्यानंतर तस्करीच्या मालाची ती तुकडी नष्ट केली जाईल. एखादे काम करण्याचा हा चांगला मार्ग नाही का?