देवाचे आजचे कार्य जाणणे
या काळातले देवाचे कार्य जाणणे म्हणजे बहुतांशी, शेवटच्या दिवसांमधले देहधारी देवाचे प्रमुख सेवाकार्य काय आहे आणि तो काय करण्यासाठी पृथ्वीवर आला आहे हे जाणणे होय. माझ्या वचनांमध्ये मी यापूर्वी उल्लेख केला आहे, की जाण्यापूर्वी एक आदर्श प्रस्थापित करण्यासाठी देव (शेवटच्या दिवसांमध्ये) पृथ्वीवर आला आहे. देव हा आदर्श कसा प्रस्थापित करतो? तो वचने उच्चारून व संपूर्ण भूमीमध्ये कार्य करून आणि बोलून हे करतो. हे देवाचे शेवटच्या दिवसांमधील कार्य आहे; तो फक्त पृथ्वीला वचनांचे जग करण्यासाठी बोलतो जेणेकरून, प्रत्येक व्यक्तीला त्याची वचने प्राप्त होतील व त्याच्या वचनांद्वारे ज्ञान प्राप्त होईल आणि जेणेकरून, मनुष्याचा आत्मा जागृत होईल व त्याला दृष्टांतांची स्पष्टता मिळेल. शेवटच्या दिवसांमध्ये, देहधारी देव प्रामुख्याने वचने उच्चारण्यासाठी पृथ्वीवर आला आहे. जेव्हा येशू आला, तेव्हा त्याने स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रसार केला आणि त्याने वधस्तंभावर खिळण्याचे उद्धाराचे कार्य साध्य केले. त्याने नियमशास्त्राच्या युगाचा शेवट केला व जे जुने होते ते सर्व नष्ट केले. येशूच्या आगमनाने नियमशास्त्राचे युग संपले आणि कृपेच्या युगाचे आगमन झाले; शेवटच्या दिवसांतील देहधारी देवाच्या आगमनाने कृपेच्या युगाचा शेवट केला आहे. तो प्रामुख्याने त्याची वचने उच्चारण्यासाठी, मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी वचने वापरण्याकरिता, मनुष्याला तेजस्वी व ज्ञानाने प्रकाशित करण्यासाठी, आणि मनुष्याच्या हृदयातून अस्पष्ट देवाची जागा हटवण्यासाठी आला आहे. येशू आला तेव्हा त्याने केलेल्या कार्याचा हा टप्पा नव्हे. जेव्हा येशू आला, तेव्हा त्याने अनेक चमत्कार केले, त्याने आजारी लोकांना बरे केले व भुतांना पळवून लावले आणि त्याने वधस्तंभावर खिळण्याचे उद्धाराचे कार्य केले. परिणामतः, लोकांच्या धारणेमध्ये, देव असाच असावा असे त्यांना वाटते. कारण जेव्हा येशू आला, तेव्हा त्याने मनुष्याच्या हृदयातून अस्पष्ट देवाची प्रतिमा काढून टाकण्याचे कार्य केले नाही; तो जेव्हा आला, तेव्हा त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, त्याने आजारी लोकांना बरे केले व भुतांना पळवून लावले आणि त्याने स्वर्गाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रसार केला. एक प्रकारे, शेवटच्या दिवसांमधील देहधारी देव मनुष्याच्या धारणेतील अस्पष्ट देवाची जागा काढून टाकतो जेणेकरून, मनुष्याच्या अंतःकरणात अस्पष्ट देवाची प्रतिमा शिल्लक राहणार नाही. त्याच्या प्रत्यक्ष वचनांमधून व प्रत्यक्ष कार्यातून, त्याच्या सर्व प्रदेशांतील भ्रमणातून आणि तो मनुष्यांमध्ये करत असलेल्या अत्यंत वास्तविक व सामान्य कार्यातून तो मनुष्याला देवाची वास्तविकता समजू देतो आणि मनुष्याच्या हृदयातून अस्पष्ट देवाची जागा दूर करतो. दुसऱ्या बाबतीत, देव मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी व सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी त्याच्या देहाने उच्चारलेल्या वचनांचा वापर करतो. शेवटच्या दिवसांमध्ये देव जे साध्य करेल ते हेच कार्य आहे.
तुम्हाला हे माहीत असले पाहिजे:
१. देवाचे कार्य अलौकिक नाही आणि तुम्ही त्याविषयीच्या धारणा बाळगू नये.
२. या वेळी देहधारी देव जे कार्य करण्यासाठी आलेला आहे, ते मुख्य कार्य तुम्ही समजून घेतले पाहिजे.
तो आजारी लोकांना बरे करण्यासाठी किंवा भुतांना पळवून लावण्यासाठी किंवा चमत्कार करण्यासाठी आलेला नाही व तो पश्चात्तापाच्या सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी किंवा मनुष्याची सुटका करण्यासाठीही आलेला नाही. याचे कारण, येशूने ते कार्य आधीच केलेले आहे आणि देव त्याच कार्याची पुनरावृत्ती करत नाही. आज, देव कृपेच्या युगाचा अंत करण्यासाठी व कृपेच्या युगातील सर्व आचरणे बाजूला करण्यासाठी आला आहे. तो व्यावहारिक देव प्रामुख्याने तो खरा आहे हे दाखवण्यासाठी आलेला आहे. जेव्हा येशू आला, तेव्हा त्याने काही वचने उच्चारली; त्याने प्रामुख्याने चमत्कार दाखवले, संकेत आणि चमत्कार केले व आजारी लोकांना बरे केले आणि भुतांना पळवून लावले किंवा लोकांची खात्री पटवण्यासाठी व तो खरोखरच देव आहे आणि तो भावनारहित देव आहे हे त्यांना दाखवून देण्यासाठी त्याने भविष्यवाण्या उच्चारल्या. अंतिमतः, त्याने वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण केले. आजचा देव संकेत व चमत्कार प्रकट करत नाही किंवा आजारी लोकांना बरे करत नाही आणि भुतांना पळवून लावत नाही. जेव्हा येशू आला, तेव्हा त्याने केलेले कार्य हे देवाच्या एका भागाचे प्रतिनिधित्व करत होते, पण यावेळी कार्याचा जो टप्पा बाकी आहे तो करण्यासाठी देव आला आहे, कारण देव तेच कार्य पुन्हा करत नाही; तो नित्य नवीन असणारा व कधीही वृद्ध न होणारा देव आहे आणि म्हणून तू आज जे सर्व पाहतोस ते व्यावहारिक देवाचे कार्य व वचने आहेत.
शेवटच्या दिवसांमधील देहधारी देव हा प्रामुख्याने त्याची वचने उच्चारण्यासाठी, मनुष्याच्या जीवनाला जे आवश्यक आहे ते स्पष्ट करून सांगण्यासाठी, मनुष्याने ज्यात प्रवेश करायला हवा त्याकडे निर्देश करण्यासाठी, मनुष्याला देवाच्या कृती दाखवण्यासाठी, आणि मनुष्याला देवाचे शहाणपण, सर्वशक्तिमानता, व अद्भूतता दाखवण्यासाठी आला आहे. देव ज्या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे बोलतो त्याद्वारे मनुष्याला देवाची सर्वोच्चता, भव्यता, आणि त्याचप्रमाणे देवाची नम्रता व सुप्तपणाही दिसतो. देव सर्वोच्च आहे, पण तो नम्र आणि लपलेला आहे व सर्वांत लहान होऊ शकतो, हे मनुष्याला दिसते. त्याची काही वचने थेट आत्म्याच्या दृष्टिकोनातून उच्चारली जातात, काही थेट मनुष्याच्या दृष्टिकोनातून उच्चारली जातात आणि काही त्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टिकोनातून उच्चारली जातात. यामध्ये, देवाच्या कार्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलल्याचे दिसू शकते व हे तो वचनांद्वारे मनुष्याला पाहू देतो. शेवटच्या दिवसांमधील देवाचे कार्य हे सामान्य तसेच वास्तविक आहे आणि अशा प्रकारे शेवटच्या दिवसांतील लोकांचा समूह सर्व कसोट्यांमधील खडतर अशा कसोटीला सामोरा जाणार आहे. देवाच्या सामान्यतेमुळे व वास्तविकतेमुळे, सर्व लोकांनी अशा कसोट्यांचा सामना केला आहे; देवाच्या सामान्यतेमुळे आणि वास्तविकतेमुळे मनुष्य देवाच्या अशा कसोट्यांमध्ये खाली उतरला आहे. येशूच्या युगात, धारणा किंवा कसोट्या नव्हत्या. येशूने केलेले बरेचसे कार्य मनुष्याच्या धारणांशी सुसंगत असल्यामुळे, लोकांनी त्याचे अनुसरण केले आणि लोकांना त्याच्याविषयी कोणत्याही धारणा नव्हत्या. आजच्या कसोट्या या मनुष्यासमोर असलेल्या आजपर्यंतच्या सर्वांत कठीण कसोट्या आहेत व हे लोक कठीण यातनांमधून पार पडले आहेत असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ याच यातना असा असतो. आज, देव या लोकांमध्ये श्रद्धा, प्रेम, कष्टांचा स्वीकार आणि आज्ञाधारकपणा निर्माण करण्याविषयी बोलतो. शेवटच्या दिवसांतील देहधारी देवाने उच्चारलेली वचने ही मनुष्याच्या प्रकृती व मूलतत्त्वानुसार असतात, मनुष्याच्या वर्तनानुसार असतात आणि आज मनुष्याला यातच प्रवेश करायचा आहे. त्याची वचने वास्तविक व सामान्यदेखील आहेत: तो भविष्याविषयी बोलत नाही, तसेच तो भूतकाळाकडे मागे वळूनही पाहत नाही; तो फक्त ज्यात प्रवेश केला पाहिजे, जे आचरणात आणले पाहिजे आणि आज समजून घेतले पाहिजे त्याविषयी बोलतो. आजच्या दिवशी जर अशा एखाद्या व्यक्तीचा उदय व्हायचा असेल, जी संकेत व चमत्कार दाखवू शकते, भुतांना पळवून लावू शकते, आजारी लोकांना बरे करू शकतो आणि अनेक चमत्कार करू शकतो व जर अशा व्यक्तीने दावा केला की तो म्हणजे येशू आलेला आहे, तर तो येशूची नक्कल करणाऱ्या दुष्ट आत्म्यांनी केलेला बनाव असेल. हे लक्षात ठेवा! देव त्याच कार्याची पुनरावृत्ती करत नाही. येशूच्या कार्याचा टप्पा याआधीच पूर्ण झाला आहे आणि देव कार्याचा तो टप्पा कधीही हाती घेणार नाही. देवाचे कार्य मनुष्याच्या धारणांशी सुसंगत नसते; उदाहरणार्थ, जुन्या करारात मशीहाच्या येण्याची भविष्यवाणी केलेली होती व येशूचे आगमन हा या भविष्यवाणीचा परिणाम होता. हे आधीच घडलेले असल्यामुळे, पुन्हा दुसरा मशीहा येणे हे चुकीचे आहे. येशू याआधीच एकदा आला आहे आणि यावेळी येशू पुन्हा आला तर ते चुकीचे ठरेल. प्रत्येक युगाचे एक नाव असते व प्रत्येक नावात त्या युगाचे वैशिष्ट्य सामावलेले असते. मनुष्याच्या धारणांनुसार, देवाने नेहमी संकेत आणि चमत्कार दाखवले पाहिजेत, नेहमी आजारी लोकांना बरे केले पाहिजे व भुतांना पळवून लावले पाहिजे आणि नेहमी येशूसारखेच असले पाहिजे. मात्र यावेळी, देव तसा अजिबात नाही. शेवटच्या दिवसांमध्ये जर देवाने अजूनही संकेत व चमत्कार दाखवले आणि अजूनही भुतांना पळवून लावले व आजारी लोकांना बरे केले—त्याने जर अगदी येशूप्रमाणेच केले—तर देव त्याच कार्याची पुनरावृत्ती करतो असे होईल आणि येशूच्या कार्याचे काहीच महत्त्व वा मूल्य उरणार नाही. अशा प्रकारे, देव प्रत्येक युगात कार्याचा एक टप्पा पार पाडतो. त्याच्या कार्याचा प्रत्येक टप्पा पूर्ण झाला, की दुष्ट आत्मे लगेच त्याची नक्कल करतात व सैतान देवाच्या पावलावर पाऊल ठेवून चालू लागला की देव त्याची पद्धत बदलतो. देवाने त्याच्या कार्याचा टप्पा पूर्ण केल्यानंतर दुष्ट आत्मे त्याची नक्कल करतात. तुम्हाला याबाबत स्पष्ट माहिती असली पाहिजे. देवाचे आजचे कार्य हे येशूच्या कार्याहून वेगळे का आहे? आज देव संकेत आणि चमत्कार का प्रकट करत नाही, भुतांना का पळवून लावत नाही व आजारी लोकांना का बरे करत नाही? येशूचे कार्य आणि नियमशास्त्राच्या युगात केलेले कार्य जर एकसारखेच असते, तर कृपेच्या युगात तो देवाचे प्रतिनिधित्व करू शकला असता का? तो वधस्तंभावर खिळण्याचे कार्य पूर्ण करू शकला असता का? नियमशास्त्राच्या युगाप्रमाणे जर येशूने मंदिरात प्रवेश केला असता व शब्बाथ पाळला असता, तर त्याच्यावर कोणीही खटला भरला नसता, सर्वांनी त्याला आपले मानले असते. जर असे झाले असते, तर त्याला वधस्तंभावर खिळले गेले असते का? तो सुटकेचे कार्य पूर्ण करू शकला असता का? शेवटच्या दिवसांतील देहधारी देवाने जर येशूने केले त्याप्रमाणेच संकेत आणि चमत्कार दाखवले तर त्यात काय अर्थ आहे? शेवटच्या दिवसांमध्ये जर देवाने त्याच्या व्यवस्थापन योजनेचा भाग दर्शवणारा कार्याचा दुसरा भाग पार पाडला, तरच मनुष्याला देवाचे अधिक सखोल ज्ञान प्राप्त होऊ शकते व केवळ त्यानंतरच देवाची व्यवस्थापन योजना पूर्ण होऊ शकते.
शेवटच्या दिवसांमध्ये, देव प्रामुख्याने त्याची वचने उच्चारण्यासाठी आला आहे. तो आत्म्याच्या दृष्टिकोनातून, मनुष्याच्या दृष्टिकोनातून, आणि त्रयस्थ व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बोलतो; तो वेगवेगळ्या माध्यमांद्वारे बोलतो, एका काळासाठी एक मार्ग वापरतो व तो मनुष्याच्या धारणा बदलण्यासाठी आणि मनुष्याच्या अंतःकरणातून अस्पष्ट देवाची प्रतिमा काढून टाकण्यासाठी बोलण्याची पद्धत वापरतो. देव जे करतो ते हेच मुख्य कार्य आहे. देव आजारी लोकांना बरे करण्यासाठी, भुतांना पळवून लावण्यासाठी, चमत्कार करण्यासाठी व मनुष्याला भौतिक वरदान देण्यासाठी आला आहे असे मनुष्याला वाटते, त्यामुळे मनुष्याच्या धारणेतून अशा गोष्टी दूर करण्यासाठी देव कार्याचा—ताडण आणि न्यायाच्या कार्याचा—हा टप्पा पार पाडतो, जेणेकरून, मनुष्य देवाची वास्तविकता व सामान्यता समजू शकेल आणि त्याच्या अंतःकरणातून येशूची प्रतिमा दूर होऊन त्या जागी देवाची नवी प्रतिमा येईल. ज्याक्षणी मनुष्याच्या अंतःकरणातील देवाची प्रतिमा जुनी होते, त्याक्षणी ती मूर्ती बनते. येशूने येऊन जेव्हा कार्याचा तो टप्पा पार पाडला, तेव्हा त्याने देवाच्या संपूर्णत्वाचे प्रतिनिधित्व केले नव्हते. त्याने काही संकेत व चमत्कार दाखवले, काही वचने उच्चारली आणि अखेरीस त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. त्याने देवाच्या एका भागाचे प्रतिनिधित्व केले. देवाचे सर्व काही आहे त्याचे प्रतिनिधित्व तो करू शकला नाही, तर त्याने देवाच्या कार्याचा एक भाग पार पाडत देवाचे प्रतिनिधित्व केले. याचे कारण, देव फार महान आहे, फार अद्भूत आहे व तो अथांग आहे आणि प्रत्येक युगात देव त्याच्या कार्याचा फक्त एक भाग पार पाडतो. या युगात देवाने केलेले कार्य म्हणजे प्रामुख्याने मनुष्याच्या आयुष्यासाठी वचनांची तरतूद, मनुष्याच्या स्वभावाचे, मूलतत्त्वाचे आणि त्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे प्रकटीकरण, आणि धार्मिक धारणा, जुनाट विचार आणि कालबाह्य विचार दूर करणे; आणि देवाच्या वचनांना सामोरे जाऊन मनुष्याचे ज्ञान व संस्कृती यांचे शुद्धीकरण केले पाहिजे. शेवटच्या दिवसांमध्ये, मनुष्याला परिपूर्ण करण्यासाठी देव वचनांचा वापर करतो, संकेत व चमत्कारांचा वापर करत नाही. मनुष्याला उघडे पाडण्यासाठी, मनुष्याचा न्याय करण्यासाठी, मनुष्याचे ताडण करण्यासाठी आणि मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी तो त्याची वचने वापरतो जेणेकरून, देवाच्या वचनांमध्ये मनुष्याला देवाचे ज्ञान व प्रेमळपणा दिसेल आणि त्याला देवाची प्रवृत्ती समजून येईल व देवाच्या वचनांच्या माध्यमातून, मनुष्य देवाची कृत्ये पाहील. नियमशास्त्राच्या युगात, परमेश्वराने मोशेला त्याच्या वचनांच्या मदतीने इजिप्तच्या बाहेर नेले, आणि इस्रायली लोकांना काही वचने सांगितली; त्यावेळी देवाच्या कृत्यांचा काही भाग उलगडून सांगितलेला होता, पण मनुष्याची क्षमता मर्यादित होती व त्याचे ज्ञान कशानेही पूर्ण होत नव्हते, त्यामुळे देवाने बोलणे आणि कार्य करणे सुरू ठेवले. कृपेच्या युगात, मनुष्याने पुन्हा एकदा देवाच्या कृत्यांचा एक भाग पाहिला. येशू संकेत व चमत्कार दाखवू शकत होता, आजारी लोकांना बरे करू शकत होता आणि भुतांना पळवून लावू शकत होता व तो वधस्तंभावर खिळला जाऊ शकत होता, त्यानंतर तीन दिवसांनी त्याचे पुनरुत्थान झाले आणि तो मनुष्यासमोर देह धारण करून प्रकट झाला. देवाबद्दल मनुष्याला याहून जास्त काही माहीत नव्हते. देवाने जितके दाखवले तितकेच मनुष्याला माहीत आहे व देवाने जर मनुष्याला अधिक काहीही दाखवले नसते, तर मनुष्य आणि देव यांच्यातील मर्यादा इतकीच असेल. अशा प्रकारे, देव कार्य करत राहतो, जेणेकरून मनुष्याचे त्याच्याबद्दलचे ज्ञान अधिक सखोल होईल व मनुष्य हळूहळू देवाचे मूलतत्त्व जाणून घेऊ शकेल. शेवटच्या दिवसांत, मनुष्याला परिपूर्ण बनवण्यासाठी देव त्याच्या वचनांचा वापर करतो. देवाच्या वचनांनी तुझी भ्रष्ट प्रवृत्ती उघडी पडते आणि तुझ्या धार्मिक धारणांची जागा देवाची वास्तविकता घेते. शेवटच्या दिवसांतला देहधारी देव प्रामुख्याने “वचन देह होते, वचन देहरूपात येते, व वचन देहरूपात प्रकट होते” ही वचने पूर्ण करण्यासाठी आला आहे आणि तुम्हाला जर याचे पूर्ण ज्ञान नसेल, तर तुम्ही ठाम उभे राहू शकणार नाही. शेवटच्या दिवसांमध्ये, देवाचा प्रमुख उद्देश हा कार्याचा असा टप्पा साध्य करणे आहे, ज्यामध्ये वचन देहात प्रकट होते व हा देवाच्या व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहे. अशा प्रकारे, तुमचे ज्ञान स्पष्ट असले पाहिजे; देवाने कशाही प्रकारे कार्य केले, तरी देव मनुष्याला त्याला मर्यादा घालू देत नाही. देवाने शेवटच्या दिवसांमध्ये जर हे कार्य केले नसते, तर मनुष्याचे त्याच्याबद्दलचे ज्ञान पुढे जाऊ शकले नसते. देवाला वधस्तंभावर खिळता येते आणि देव सोडोमचा नाश करू शकतो व येशू मृतांमधून पुनरुत्थित होऊ शकतो आणि पेत्रासमोर प्रकट होऊ शकतो, एवढेच तुला कळले असते…. पण देवाची वचने सर्व काही साध्य करू शकतात व मनुष्याला जिंकू शकतात हे तू कधीच म्हंटले नसतेस. केवळ देवाच्या वचनांचा अनुभव घेऊनच तू असे ज्ञान सांगू शकतोस आणि तू देवाचे कार्य जितके जास्त अनुभवतोस, तितके तुझे त्याच्याबद्दलचे ज्ञान पूर्ण होईल. त्यानंतरच तू देवाला तुझ्या स्वतःच्या धारणांमध्ये बंदिस्त करणे थांबवशील. देवाच्या कार्याचा अनुभव घेतल्याने मनुष्याला त्याचे ज्ञान होते; देवाला जाणण्याचा दुसरा कोणताही योग्य मार्ग नाही. आज अनेक लोक असे आहेत जे फक्त संकेत व चमत्कार दिसण्याची आणि मोठ्या आपत्तिकाळाची वाट पाहात बसतात. तुझा देवावर विश्वास आहे की मोठ्या आपत्तीवर? जेव्हा मोठ्या आपत्ती येतील, तेव्हा फार उशीर झालेला असेल आणि जर देवाने तुमच्याकडे मोठ्या आपत्ती पाठवल्या नाहीत, तर तो देव नाही का? तुझा संकेत व चमत्कारांवर विश्वास आहे की खुद्द देवावर विश्वास आहे? इतरांनी जेव्हा येशूची थट्टा केली, तेव्हा त्याने संकेत आणि चमत्कार दाखवले नव्हते, मग तो देव नव्हता का? तुझा संकेत व चमत्कारांवर विश्वास आहे की देवाच्या मूलतत्त्वावर विश्वास आहे? मनुष्याचे देवावरील विश्वासाबद्दलचे दृष्टिकोन चुकीचे आहेत! नियमशास्त्राच्या युगात यहोवाने अनेक वचने उच्चारली, पण आजदेखील त्यातील काही पूर्ण होणे बाकी आहे. यहोवा देव नव्हता असे तू म्हणू शकतोस का?
आज, तुम्हा सगळ्यांना हे स्पष्ट माहीत असले पाहिजे, की शेवटच्या दिवसांत, “वचन देहधारी होते” ही बाब तत्त्वतः देवाकडून साध्य केली जाते. पृथ्वीवरील त्याच्या प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून, तो मनुष्याला त्याला जाणू देतो आणि त्याच्यात रमायला लावतो व त्याची प्रत्यक्ष कृत्ये पाहू देतो. तो संकेत आणि चमत्कार करू शकतो, तसेच काही वेळा तो हे करू शकत नाही हे तो मनुष्याला स्पष्टपणे दाखवतो; हे त्या युगावर अवलंबून असते. यावरून तू पाहू शकतोस, की देव संकेत आणि चमत्कार घडवण्यास असमर्थ नाही, तर तो जे कार्य करावयाचे आहे त्यानुसार व युगानुसार तो त्याच्या कार्याची पद्धत बदलतो. कार्याच्या सध्याच्या टप्प्यात, तो संकेत आणि चमत्कार दाखवत नाही; त्याने येशूच्या युगात काही संकेत व चमत्कार दाखवले कारण त्याचे त्या काळातील कार्य वेगळे होते. आज देव ते कार्य करत नाही आणि काही लोकांना वाटते, की तो संकेत व चमत्कार दाखवण्यास असमर्थ आहे किंवा त्यांना वाटते, की त्याने जर संकेत आणि चमत्कार दाखवले नाहीत, तर तो देवच नाही. ही चुकीची धारणा नाही का? देव संकेत व चमत्कार दाखवू शकतो, पण तो वेगळ्या युगात कार्य करतो आहे आणि म्हणून तो असे कार्य करत नाही. हे वेगळे युग असल्यामुळे व देवाच्या कार्याचा हा वेगळा टप्पा असल्यामुळे, देवाने सरळ दाखवून दिलेली कृत्येदेखील वेगळी आहेत. मनुष्याचा देवावरील विश्वास हा संकेत आणि आश्चर्यांवरचा विश्वास नाही किंवा चमत्कारांवरचा विश्वास नाही, तर नवीन युगातील त्याच्या वास्तविक कार्यावरील विश्वास आहे. देव ज्याप्रकारे कार्य करतो त्यावरून मनुष्य देवाला जाणतो व या ज्ञानातून मनुष्यामध्ये देवावरचा, म्हणजेच देवाच्या कार्यावरचा आणि कृत्यांवरचा विश्वास उत्पन्न होतो. कार्याच्या या टप्प्यात, देव मुख्यतः बोलतो. संकेत आणि चमत्कार दिसण्याची वाट पाहू नका; ते तुम्हाला दिसणार नाहीत! याचे कारण तू कृपेच्या युगात जन्माला आला नव्हतास. जर आला असतास, तर तुला संकेत आणि चमत्कार दिसले असते, पण तू शेवटच्या दिवसांमध्ये जन्माला आला आहेस आणि म्हणून तू देवाची फक्त वास्तविकता आणि सामान्यता पाहू शकतोस. शेवटच्या दिवसांमध्ये अलौकिक येशू दिसण्याची अपेक्षा करू नकोस. तू फक्त देहधारी व्यावहारिक देवाला पाहू शकतोस, जो कोणत्याही सामान्य मनुष्यासारखाच आहे. प्रत्येक युगात, देव वेगवेगळी कृत्ये उघड करतो. प्रत्येक युगात, तो देवाच्या कृत्यांचा काही भाग उघड करतो आणि प्रत्येक युगातील कार्य देवाच्या प्रवृत्तीचा एक पैलू आणि देवाच्या कृत्यांचा एक भाग उघड करते. तो जी कृत्ये उघड करतो ती तो ज्या युगात कार्य करतो त्यानुसार बदलतात, पण त्या सर्वांतून मनुष्याला देवाचे अधिक सखोल ज्ञान मिळते, अधिक खरा आणि अधिक विनम्र असा देवावरचा विश्वास मिळतो. देवाच्या सर्व कृतींमुळे मनुष्य देवावर विश्वास ठेवतो, कारण देव फार अद्भूत आहे, फार महान आहे, कारण तो सर्वशक्तिमान आणि अथांग आहे. देव संकेत व चमत्कार घडवू शकतो आणि आजारी लोकांना बरे करू शकतो व भुतांना पळवून लावू शकतो म्हणून जर तू देवावर विश्वास ठेवत असशील, तर तुझा दृष्टिकोन चुकीचा आहे आणि काही लोक तुला म्हणतील, “दुष्ट आत्मेदेखील अशा गोष्टी करू शकतात, नाही का?” यामुळे देवाची प्रतिमा व सैतानाची प्रतिमा यांत संभ्रम उत्पन्न होत नाही का? आज मनुष्याचा देवावर विश्वास आहे तो त्याच्या अनेक कृत्यांमुळे, तो करत असलेल्या प्रचंड कार्यामुळे आणि तो ज्या वेगवेगळ्या माध्यमांद्वारे बोलतो त्यामुळे. देव मनुष्याला जिंकून घेण्यासाठी व त्याला परिपूर्ण बनवण्यासाठी त्याच्या उच्चारणांचा उपयोग करतो. देवाच्या अनेक कृत्यांमुळे मनुष्य त्याच्यावर विश्वास ठेवतो, तो संकेत आणि चमत्कार करू शकतो म्हणून नव्हे. देवाच्या कृत्यांचे साक्षी होऊनच लोक देवाला जाणू शकतात. देवाची प्रत्यक्ष कृत्ये, तो कार्य कसे करतो, कोणत्या सुज्ञ पद्धती वापरतो, कसे बोलतो व मनुष्याला कसे परिपूर्ण बनवतो हे जाणून—केवळ हे पैलू जाणून—आणि त्याला काय आवडते, त्याला कशाचा तिरस्कार वाटतो व तो मनुष्यावर कसे कार्य करतो हे जाणून तुला देवाच्या वास्तविकतेचे आकलन होते आणि त्याची प्रवृत्ती समजते. देवाच्या आवडीनिवडी समजून घेऊन, तू सकारात्मक व नकारात्मक यांत भेद करू शकतोस आणि देवाच्या तुझ्या ज्ञानातून तुझ्या जीवनाची प्रगती होते. थोडक्यात, तू देवाच्या कार्याचे ज्ञान मिळवले पाहिजेस, व देवावर विश्वास ठेवण्याबाबतचे तुझे दृष्टिकोन स्पष्ट असले पाहिजेत.